राज्य

शांतिपर्वातील कथा : 10

artudaipur.com

पृथुराजाच्या पराक्रमाचा पृथ्वीला चांगला प्रत्यय आला होता. ती पृथूला म्हणाली, “हे राजा, प्रजापालन करणे हेच राजाला कल्याणकारक आहे. प्रजेचे रक्षण न करता तिच्यापासून कर मात्र घेतो, अशा राजाला त्याच्या कृतकर्माची फळे तर भोगावी लागतातच, पण प्रजेने केलेल्या दुष्कर्माचीही फळे त्यालाच भोगणे अपरिहार्य असते. हे शूर राजा, प्रजेचे कल्याण करणे हा जो तुझा धर्म, तो तू नष्ट होऊ देऊ नको.”

वेनपुत्र पृथूच्या राज्याभिषेकाचा तो भव्य समारंभ.

राजा पृथू सुवर्णमय आसनावर पूर्वाभिमुख बसला होता. सर्व आयुधांनिशी सिंहासनावर आरूढ झालेली त्याची दैदिप्यमान मूर्ती प्रजेच्या आकांक्षा वाढवीत होती. अमात्य आणि आचार्य यांनीही यथायोग्य आसने भूषविली होती. राजकुलांतील स्त्री-पुरुष, कोणी रत्नमय तर कोणी हस्तिदंती आसनावर विराजमान झालेले होते. महर्षी आणि महामुनी, कवी आणि कलावंत, मांडलिक आणि मुखंड अशी विविध मंडळी आपापल्या योग्यतेनुरूप स्थानापन्न झाली होती.

राजप्रासाद प्रजाजनांच्या उत्साहाने फुलून गेला होता. मंगल वाद्यांचे सुस्वर सुरू झाले, राजपुरोहितांनी मंत्रघोष सुरू केला. सुगंध आणि सुस्वर यांनी सर्व वातावरण चैतन्यमय बनले.

पृथूचे राजसिंहासन अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसत होते. त्याचे पाय बळकट होते आणि त्यावर व्याघ्रचर्म आच्छादले होते. ज्ञानसंपन्न आचार्यांनी पृथूला त्या शुभ्रवर्ण आसनावर बसवून मंत्रोच्चारपूर्वक अनेक विधी केले, पवित्र सरितांच्या जलाने त्याला अभिषेक केला. पणव, आनक, दुंदुभी इत्यादी विविध वाद्यांचा घोष चालूच होता आणि “तुझे कल्याण होवो”, “तुझा जय होवो” अशी आशीर्वादपर वचने ऐकू येत होती. त्यावेळी पृथ्वीचे मुख तेजस्वी आणि आल्हादकारक दिसू लागले.

राज्याभिषेकाचा समारंभ पार पडला, त्यावेळी प्रजा प्रसन्न होती आणि राजा प्रजापालनाची अनेक कल्पनाचित्रे पाहत होता. तेवढ्यात राजाला मानपत्र अर्पण करण्याची कल्पना काही मुत्सद्दयांनी व्यक्त केली. प्रथम त्या कल्पनेला पृथूने विरोध दर्शविला. पण नंतर प्रजेच्या आग्रहास्तव ते स्वीकारण्याचे मान्य केले.

मानपत्र अर्पण करताना स्तुतिस्तोत्रे गाण्यात येऊ लागली. प्रशंसापर उद्गारांची गर्दी झाली. “हे राजा, तू महाप्रतापी आहेस. तुझी प्रजाहितदक्ष बुद्धी, तुझे शौर्य, तुझे...”

“थांबा”, पृथूने एकदम आज्ञा केली. “आचार्यांनो आणि मुत्सद्द्यांनो, ही प्रशंसा थांबवा. तुम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहा, पण अशी स्तुतिस्तोत्रे तुम्ही का गात आहात हे मात्र मला समजत नाही. माझा नुकताच राज्याभिषेक झाला. प्रजेसाठी कोणतेही कार्य करण्याची अद्याप मला संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रजाहितदक्ष अशी बिरुदावली मला लावणे योग्य ठरणार नाही. ही प्रशंसा थांबवा. थोर गुण संपादण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी आहे; पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय स्तुती करून घेणे मला योग्य वाटत नाही. आता गुण नाहीत पण पुढे केव्हा तरी ते लाभतील अशा खोट्या कल्पनेने अल्पबुद्धी माणूस सहज फसू शकेल. आपली अधिकाधिक प्रशंसा व्हावी अशीही तो अपेक्षा करील. अशा खोटया प्रशंसेने आपला उपहास होतो, हेही त्याला कळत नसते, पण जे समर्थ असतात, ते प्रसिद्ध असले तरी त्यांना स्वत:ची स्तुती आवडत नाही. आपल्या निंदेस पात्र होईल असे कृत्य ते करीत नाहीत. म्हणून, मुत्सद्द्यांनो, माझी प्रशंसा करू नका.” पृथुराजाची ही धीरोदात्तता आणि निःस्पृहता प्रजेला अत्यंत आदरणीय वाटली.

पृथूने पृथ्वीचे विषम स्वरूप नाहीसे केले. भूमीवरील उंचवटे आपल्या तीक्ष्ण बाणांनी छेदून टाकले. पृथ्वीचे दोहन करून अनेक धान्यांची बीजे उत्पन्न केली. कृषिव्यवसाय सुरू केला. नगरे आणि ग्रामे यांची स्थापना केली. त्याचा महापराक्रम पाहून पृथ्वी त्याला शरण गेली. सागर आणि हिमालय यांनीही आपली संपत्ती त्याच्या स्वाधीन केली. धन-धान्याची समृद्धी झाली. पृथूने अश्व, गज, रथ आणि पुरुष यांची चतुरंग सेना उभारली. त्याच्या ध्वजाचा भंग कधीच झाला नाही. त्याच्या राज्यात दुर्भिक्ष पडले नाही. प्रजेला परस्परांची भीती वाटली नाही.

पृथूने प्रजेचे संकटापासून संरक्षण केले म्हणून त्याला क्षत्रिय असे म्हणतात. त्याने प्रजेचे रंजन केले म्हणून त्याला राजा म्हणतात. त्याने दंडनीतीच्या साहाय्याने राज्य केले, तसेच हेरांच्या मदतीने प्रजेच्या वर्तनावर लक्ष ठेवले. त्याने शत्रूच्या सर्व मार्गांवर आपल्या सैन्याने तटबंदी केली. त्याने यज्ञ केले आणि संग्रामामध्ये जय मिळविला.

पृथुराजाच्या पराक्रमाचा पृथ्वीला चांगला प्रत्यय आला होता. ती पृथूला म्हणाली, “हे राजा, प्रजापालन करणे हेच राजाला कल्याणकारक आहे. प्रजेचे रक्षण न करता तिच्यापासून कर मात्र घेतो, अशा राजाला त्याच्या कृतकर्माची फळे तर भोगावी लागतातच, पण प्रजेने केलेल्या दुष्कर्माचीही फळे त्यालाच भोगणे अपरिहार्य असते. हे शूर राजा, प्रजेचे कल्याण करणे हा जो तुझा धर्म, तो तू नष्ट होऊ देऊ नको.”

पृथूच्या राज्यात भूमी नांगरल्यावाचून पीक देत होती आणि धेनू विपुल दूध पुरवीत होत्या. प्रजा निरोगी होती, तशीच निर्भयही होती. पृथूच्या संबंधामुळेच या विस्तीर्ण भूमीला पृथ्वी असे नाव मिळाले.

मनुष्याने स्थापन केलेले तेच पहिले राज्य.

- स. मा. गर्गे

Tags: महाभारत युधिष्ठीर भीष्म धर्म संस्कृती राजकारण राजकीय समाजशास्त्र पुराणे Load More Tags

Add Comment