परचक्र

शांतिपर्वातील कथा : 4  

एक सूत्र असे लक्षात ठेव की, राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते. ज्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असेल त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण त्याबरोबरच कोणत्या शत्रूशी संधी केला असता परिणामी हिताचे ठरेल हेही सुज्ञ राजाने अचूक हेरले पाहिजे. हित साधण्यासाठी प्रसंगी शत्रूशीही संधी करावा. अरे! कोणत्याही परिस्थितीत जीविताचे रक्षण हे झाले पाहिजे. अज्ञानाने अथवा अविचाराने जो राजा कोणत्याच प्रसंगी शत्रूशी संधी करावयास तयार नसतो, त्याला राजनीती मुळीच समजली नाही असे म्हटले पाहिजे. उलट, सारासार विचार करून जो शत्रूशी संधी करतो आणि प्रसंगानुसार मित्राशीही विरोध दर्शवितो. त्याची राजनीती फलदायक ठरल्याशिवाय राहत नाही.

धर्मराज : पितामह, तुम्ही आतापर्यंत मला राजनीतीची किती तरी बहुमोल तत्त्वे सांगितली आहेत. तरी अद्याप माझ्या मनातील सगळ्या प्रश्नांचा आणि शंकांचा निरास झालेला नाही. 

भीष्म : भारता, कोणत्या शंकेमुळे तुझे मन गोंधळून गेले आहे ते मला सांग. मी तुझे समाधान अवश्य करीन. 

धर्म : समोरासमोर शत्रू आला तर त्याचे पारिपत्य कसे करावयाचे हे मी जाणतो. तसेच, एकाच दिशेने अनेक शत्रूंनी संघटितपणे आक्रमण केले तर त्याला कसे तोंड द्यावयाचे याचेही ज्ञान मला आहे. पण अनेक शत्रूंनी एकाच वेळी वेढा दिला तर त्यात कसा विजय संपादन करावयाचा यासंबंधीची युद्धनीती मला माहीत नाही. अशा परचक्राच्या वेळी राजाने कसे वागावे, हे मला आपल्याकडून समजून घ्यावयाचे आहे. राजा संकटात सापडला, म्हणजे त्याचे अनेक जुने शत्रू त्या संधीचा फायदा घेण्याचा अवश्य प्रयत्न करतील. अशा वेळी राजाने शत्रू कोणाला करावे, मित्रत्व कोणाशी जोडावे, युद्ध कोणाशी करावे, संधी कोणाशी घडवून आणावा? माझ्या प्रश्नाचा रोख असा की, निरनिराळ्या शेजारील राज्यांशी राजाने कोणत्या वेळी कसे वागावे, याचे रहस्य मला आपणाकडून जाणून घेण्याची इच्छा आहे.

भीष्म : तुझा प्रश्न राजनीतीच्या एका महान तत्त्वावर आधारलेला आहे. तू सांगितलेल्या परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी केवळ शौर्य पुरेसे पडणार नाही. तसेच, केवळ बुद्धीनेही सुटका होणार नाही. त्यासाठी देशकालपरिस्थिती पाहून आणि कर्तव्य-अकर्तव्याचे तारतम्य राखूनच राजाने वर्तन केले पाहिजे. प्रसंगी शत्रूशी मित्रत्व करावे लागते व काही प्रसंगी मित्रही शत्रू बनलेले असतात. एक सूत्र असे लक्षात ठेव की, राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते. ज्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असेल त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण त्याबरोबरच कोणत्या शत्रूशी संधी केला असता परिणामी हिताचे ठरेल हेही सुज्ञ राजाने अचूक हेरले पाहिजे. हित साधण्यासाठी प्रसंगी शत्रूशीही संधी करावा. अरे! कोणत्याही परिस्थितीत जीविताचे रक्षण हे झाले पाहिजे. अज्ञानाने अथवा अविचाराने जो राजा कोणत्याच प्रसंगी शत्रूशी संधी करावयास तयार नसतो, त्याला राजनीती मुळीच समजली नाही असे म्हटले पाहिजे. उलट, सारासार विचार करून जो शत्रूशी संधी करतो आणि प्रसंगानुसार मित्राशीही विरोध दर्शवितो. त्याची राजनीती फलदायक ठरल्याशिवाय राहत नाही.

धर्म : आपण सांगितलेली सूत्रे उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. पण यासंबंधी एखादा प्रसंग उदाहरणादाखल आपण विशद करून सांगावा अशी माझी इच्छा आहे.

भीष्म : तुला मी सांगितलेल्या तत्त्वांचे स्पष्टीकरण हवे आहे असेच म्हण ना! त्यासंबंधी मी काही प्राण्यांची एक कथाच तुला सांगतो. ती कथा एखाद्या राज्यालाही लागू पडू शकेल.

त्या वनात एक प्रचंड वटवृक्ष होता. मेघासारखा आकार आणि विशाल फांद्यांचा विस्तार यामुळे त्या वटवृक्षाचे व्यक्तित्त्व भव्य बनले होते. अनेक लतावेलींच्या जाळ्यांनी तो वेढलेला होता. अरण्यातील किती तरी हिंस्र पशू त्याच्या आश्रयाला राहत असत. अनेक चित्रविचित्र पक्ष्यांनी त्याच्या पर्णराजीची शोभा वाढविली होती. त्याच्या गर्द छायेखाली किती तरी पशुपक्ष्यांनी विश्रांती घेतली असेल. पशुपक्ष्यांचे ते एक नगरच होते म्हणा ना!

त्या वृक्षाच्या बुंध्याशी एका बिळात पलित नावाचा मूषक राहत होता आणि एका फांदीवर लोमष नावाच्या मार्जाराने बरीच वर्षे वस्ती केलेली होती. त्या दोघांचे मित्रत्व असण्याचा सुतराम् संभव नव्हता. अनेक पिढ्यांचे ते एकमेकांचे शत्रूच होते. वृक्षाच्या खाली दररोज रात्री एक पारधी जाळे पसरवून ठेवत असे. अंधाऱ्या रात्री काही अजाण मृग आणि तत्सम निरुपद्रवी प्राणी त्या जाळ्यात अडकून पडत. सकाळी आपली मिळकत घेऊन जाताना तो पारधी नेहमीच खुषीत असे.

दुर्दैव बिचाऱ्या त्या मार्जाराचे, जाळ्याच्या जवळून जाण्याची त्याला दुर्बुद्धी सुचली आणि एक पाऊल पुढे टाकले तो त्या जाळ्यात अडकून पडला. त्यातून सुटण्यासाठी मार्जाराची चाललेली धडपड दुरून मूषकाला दिसत होती. आपला वैरी जाळ्यात अडकला आहे हे पाहून मूषकाला अतिशय आनंद झाला. बिळाच्या बाहेर येऊन जाळ्याच्या जवळपास तो फिरू लागला. तेवढ्याने त्याचे समाधान झाले नाही. मार्जाराच्या समोर बसून ते मूषकराज हसत हसत एक मांसखंड कुरतडून खाऊ लागले..

पण तेवढ्यात उजव्या बाजूला त्याची नजर गेली आणि भीतीने त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. अरे बापरे! प्रत्यक्ष शत्रू थोड्या अंतरावर उभा होता! नकुल कसला, तो प्रत्यक्ष काळच म्हटला पाहिजे. चकाकणारी तजेलदार कांती आणि गुंजेसारखे लाल डोळे. त्याची चपलता तर विलक्षण होती. मूषकाचा वास आल्यामुळे तो त्याचा शोध काढीत त्या जाळ्यापासून थोड्या अंतरापर्यंत आला होता. पण मूषकाबरोबर मार्जारही त्याला दिसला आणि मग पुढे येण्याचे धैर्य त्याने केले नाही. होता तेथेच तो थबकला.

आपला जन्माचा वैरी संकटात सापडला आहे, म्हणून जरा कोठे आनंद होत आहे न होत आहे तोच नकुलाच्या रूपाने एक नवेच संकट आपल्यापुढे उभे असल्याची जाणीव मूषकाला झाली.

पण त्याचे दुर्दैव तेवढ्यावरच थांबले नाही. संकटातून मुक्त करण्यासाठी त्याने परमेश्वराकडे वर पाहिले, तोच वरच्या फांदीवर आणखी एक हाडवैरी बसलेला त्याला दिसला. फांदीवर बसलेला दिवांध भेसूर नजरेने मूषकाकडे पाहात होता.

एकीकडे नकुल आणि दुसरीकडे दिवांध, अशा दोन भयंकर शत्रूच्या कचाट्यात सापडल्यामुळे मूषकाची भीतीने गाळण उडाली. एकाच वेळी अनेक शत्रूंनी त्याला वेढले. चमत्कारिक दैवगतीने तो भयचक्रात सापडला. चोहोकडे त्याला मृत्यूचे दर्शन होऊ लागले. त्या तडाख्यातून आपली सुटका होईल असे त्याला वाटेना.

क्षणभर विचारशक्ती नष्ट झाल्यासारखे त्याला वाटले, पण तेवढ्यात एक सुंदर कल्पना त्याच्या डोक्यात विद्युल्लतेप्रमाणे चमकून गेली. तो प्रतिभेचा क्षण म्हणजे त्याच्या जीवितरक्षणाचा एक महत्त्वाचा क्षण होता. कसलेही संकट असो, त्यातून जीविताची सुटका करता आली तरच मनुष्याच्या बुद्धीचा उपयोग. मूषक विचार करू लागला, उजव्या बाजूला गेलो तर नकुल क्षणार्धात झडप घालील, आणि डाव्या बाजूला सरकलो तर दिवांध झर्रकन् उचलून नेईल, आणि समोरच्या मार्जाराचे पाश तुटले तर - तर काय? - मार्जार तत्काळ गट्ट करून टाकील. मग काय करावयाचे? खूप विचार केल्यानंतर त्याने मार्जाराशी मैत्री जोडावयाचे ठरविले. पिढ्यान् पिढ्या शत्रू असलेल्याशी संधी करावयाचा, ही कल्पना प्रथम त्याच्या मनाला रुचेना. पण त्याशिवाय दुसरा मार्ग सापडेना. तीन शत्रू तीन दिशेला त्याचा जीव घेण्यास टपले होते. तारतम्याने मार्जाराशी दोस्ती करणे त्याला सोयीचे वाटले. शत्रू का असेना, पण तो पूर्वपरिचयाचा आहे. त्याच्याशी दोस्ती केली तरच बाकीच्यांना फसविता येईल. शिवाय ज्ञानसंपन्न शत्रू ज्ञानशून्य मित्रापेक्षा अधिक योग्य, असे थोरांनीही सांगून ठेवले आहेच की! आणि आता तर काय प्रत्यक्ष जीवावरच बेतले आहे.

प्रथम मूषक सामोपचारपूर्वक मार्जाराच्या जवळ गेला आणि म्हणाला, "हे बघ, आपण एकमेकांचे शत्रू असलो तरी या वेळी दोघेही संकटात सापडलो आहोत. त्यातून निभावून जाण्यासाठी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, तू मला मारणार नसशील तर या संकटातून तुला सोडविण्याची मी एक नामी युक्ती सुचवितो. हे बघ, एकीकडे नकुलाचे तीक्ष्ण दात दिसत आहेत आणि दुसरीकडे त्या फांदीवर जिभल्या चाटीत दिवांध बसला आहे. त्यांपैकी कुणाच्याही तावडीत सापडून मी ठार होऊ शकेन आणि माझ्या मृत्यूनंतर काही तासांनी सूर्याच्या किरणांबरोबरच तो पारधी येथे येईल व त्याच्या हातून तुलाही यमाच्या भेटीला जाण्याखेरीज दुसरा मार्ग उरणार नाही. यावरून आपल्या दोघांच्याही संकटांची कल्पना तुला सहज येईल. तू पंडित आहेस आणि सज्जन आहेस. सुज्ञाला अधिक सांगण्याची गरज नाही. एवढेच सुचवितो की, माझ्या साहाय्यावाचून तुला हे पाश तोडता येणार नाहीत."

मार्जार म्हणाला, "खरे आहे तुझे. तुझ्या विचारीपणाविषयी आणि चातुर्याविषयी माझी खात्री पटली आहे. मी जिवंत राहावे अशी तुझी इच्छा असल्याचे ऐकून तर मला फारच आनंद होत आहे. तुझे कल्याण असो. पण मित्रा, एकाच वेळी तुझी आणि माझी या संकटातून मुक्तता कशी होणार हे मात्र मला नीटसे स्पष्ट झाले नाही. "

मूषक : त्याचा विचार करून ठेवला आहे मी. तू मला अभय दे, की मी तुझे पाश तोडून टाकतो. हा संधी तुला मान्य आहे काय? 

मार्जार : सुंदर कल्पना! मला हा संधी मान्य आहे. ताबडतोब कामाला लाग, अधिक विचार करीत बसू नको.

मूषक : पण मी तुझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू ना? खरे पाहता आपण दोघेही एकाच वृक्षाच्या परिसरात राहतो. तेव्हा आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. ही मैत्री करण्याची वेळ आहे. वेळ निघून गेल्यावर कोणतीही गोष्ट करणे सुज्ञपणाचे ठरत नाही. तेव्हा मी म्हणतो त्याला तुझी संमती आहे ना?

मार्जार : अलबत्! जे समयोचित असेल ते कृत्य मी अवश्य करीन. तुझे उपकार व्यर्थ जाणार नाहीत. माझा सारा अहंकार पार गळून गेला आहे. माझी तुझ्यावर अत्यंत भक्ती जडली आहे. यावेळी मी तुझा हितकर्ता आहे आणि आज्ञाधारक शिष्यही आहे. मी तुला शरण आलो आहे.

मूषक : मित्रा, तू प्रसंग बरोबर ओळखलास. आता त्यातून निभावून कसे जावयाचे ते मी तुला सांगतो.

मार्जार : तुझी युक्ती ऐकायला माझे कान कसे आतुर झालेले आहेत. सांग, सांग. मी काय करू ते लवकर सांग.

मूषक : हे बघ, आता मी तुझ्याजवळ येऊन बसतो. चकचकीत बाणाच्या तीक्ष्ण टोकाप्रमाणे दात असलेल्या नकुलाची मला फार भीती वाटते. तुझ्या कुशीतच माझे संरक्षण होईल. माझा वध मात्र करू नकोस. आपल्या वचनाला जागलास तर मी सत्याची शपथ घेऊन सांगतो, तुझे पाश पाहता पाहता तोडून टाकीन. त्यातून तू मुक्त झालास म्हणजे नकुलाला पळता भुई थोडी होईल आणि ते दुष्ट दिवांध झाडाच्या डोलीत दडून बसेल.

मार्जार : मला तुझी योजना संपूर्णतः मान्य आहे. तुझ्याच कृपेने माझी या प्राणघातक संकटातून मुक्तता होणार आहे. आपला संधी पाळायला मी बांधलेलो आहे असे समज. तुझे उपकार मी आजन्म विसरणार नाही.

मूषकाने लगेच तुरुतुरु धावत जाऊन मार्जाराच्या कुशीत आश्रय घेतला. मातेच्या सन्निध मुलाने बसावे तेवढ्या विश्वासाने मूषक मार्जाराला बिलगून बसले. मार्जार आणि मूषक इतक्या सलगीने आणि प्रेमाने वागू शकतात, ही कल्पनाच विस्मयकारक होती. अग्नी आणि जल यांनी एकत्र राहावे किंवा प्रकाश आणि अंधार यांचे अस्तित्व एकाच वेळी पाहावयास मिळावे इतकी ती विलक्षण घटना होती.

आणि नेमकी तीच घटना नकुल आणि दिवांध यांचे सर्व मनोरथ ढासळून पाडायला कारणीभूत ठरली. हाताशी आलेली शिकार काहीतरी दैवी चमत्काराने निसटून जावी आणि मग घोर निराशा पदरात पडावी तशी त्या नकुलाची व दिवांधाची अवस्था झाली. बिचारे मोठ्या आशेने जिभल्या चाटीत आले होते. पण दोन हाडवैऱ्यांचा मिलाफ झालेला पाहून शेवटी त्यांना हात हलवीत परत जावे लागले. मूषकाने एक समाधानाचा सुस्कारा सोडला आणि मार्जाराचे पाश तोडून टाकण्यास सुरुवात केली. त्याचे काम मंदपणे चालू होते. मार्जाराला जाळ्यातून केव्हा मोकळे होईन असे झाले होते. तो म्हणाला, "अरे जरा घाई कर. तुझे काम झाले म्हणून तू माझ्या कामाची चालढकल चालविली आहेस का? दिवस उगवायच्या आत पाश तोडून झाले नाहीत तर पारधी मला पकडून नेल्याशिवाय राहणार नाही. "

मूषक : तू काही काळजी करू नकोस. तुला गोंधळून जायचे काहीच कारण नाही. प्रसंगाचे महत्त्व माझ्या चांगले लक्षात आहे. कालघटिका त्वरेने धावत आहे आणि निशादेवीची गती वाढत आहे, याची मला कल्पना आहे. योग्य वेळी योग्य तो परिणाम निश्चित घडून येईल. तू निश्चित राहा.

मार्जार : पण, तुझे काम किती सावकाश चालले आहे बघ.

मूषक : कसेही चालू दे. तुझ्या जिवाला धक्का पोचणार नाही याची खात्री बाळग.

मार्जार : एवढे मला भरघोस आश्वासन देतोस, पण कृती मात्र उलट चालली आहे.

मूषक : हे बघ मित्रा, खरे सांगू का तुला! तू रागावणार तर नाहीस ना? योग्य वेळ येण्यापूर्वीच मी तुला मुक्त केले तर माझी अवस्था काय होईल? एवढा तू भुकेलेला! तुझ्याकडून मला मुळीच धोका पोहोचायचा नाही असे मी कसे समजू? तेव्हा योग्य काळाची वाट पाहा. एवढेच मी तुला तूर्त सांगू इच्छितो. चकाकणारा परशु खांबावर टाकून झपाझप पावले टाकीत येणारा तो उग्रमूर्ती पारधी दिसला रे दिसला, की लगेच तुझे पाश तुटले असे समज. तू पाशमुक्त झालास, की पारध्याच्या भीतीने प्रथम आपल्या निवासस्थानाकडे धूम ठोकशील. माझ्यावर झडप घालायला तुला सुचायचेदेखील नाही. खरे ना हे? माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तोच क्षण महत्त्वाचा आहे.

मार्जार : म्हणजे तू माझ्यावर अविश्वास दाखवितोस तर! अरे, तुझा - माझा मित्रत्वाचा संधी झाला आहे ना? मग अशा वेळी पूर्वीची वैरभावना मनात तरी का आणतोस? कदाचित पूर्वी कधी अज्ञानाने माझ्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा कर व या वेळी जलद गतीने हे जाळे कुरतडून टाक.

मूषक : मित्रा, तुझ्या मनाची अवस्था मी ओळखतो. माझी आणि तुझी मैत्री झाली आहे खरे, पण ती केवळ समान संकटाच्या दडपणामुळेच ना? केवळ भीतीने ज्याने आपल्याशी संधी केला आहे अशा मित्रापासून फार सावध राहिले पाहिजे. अरे, ही राजनीती आहे. सापाच्या तोंडात हात दिल्यानंतर तो सोडवून घेईपर्यंत फारच सावधगिरी बाळगली पाहिजे. माझे हे म्हणणे तुलाही पटल्याशिवाय राहणार नाही. आपल्यापेक्षा अधिक बलवानाशी मैत्री केल्यानंतर फारच सांभाळून वागले पाहिजे. मैत्रीचे एक रहस्य सांगू का तुला? कोणीच कोणाचा मित्र नसतो आणि कोणीच कोणाचा शत्रू नसतो. जीवनात येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांमुळे कोणी मित्र बनतात, तर कोणी शत्रु बनतात. आपले काम झाले म्हणजे मित्रत्व टिकेलच असे नाही. नीतिसूत्रात सांगितलेच आहे की, कोणतेही कार्य पूर्णपणे न करता त्याचे काही तरी अवशिष्ट मागे ठेवले पाहिजे. आता हेच बघ ना! तू पाशात अडकलास म्हणून माझी मनधरणी करू लागलास आणि मी दोन्ही दिशांनी शत्रुच्या पाशात अडकलो म्हणून तुझ्याशी संधी केला. प्रसंग ओळखून तू मला जवळ केलेस, तसेच वेळ येताच मी तुला मुक्त करीन.

मार्जार : अरे पण केव्हा? तो पारधी आल्यावर -

मूषक : नाही. मी या पाशाचे आतापर्यंत पुष्कळच तंतू तोडले आहेत. आता फक्त एकच बाकी राहिला आहे. पारधी समोर दिसला, की जाळ्याचा शेवटचा तंतू तुटलाच म्हणून समज.

मार्जार आणि मूषक यांचे भाषण चालूच होते. मार्जार अस्वस्थ होत होता आणि मूषक पारध्याची चाहूल लागते की काय याकडे लक्ष देत होता. पूर्वेला उषा फाकत होती. सूर्यप्रकाश धरणीचे रूप पालटीत होता. सगळीकडे सोनेरी वातावरण पसरले होते आणि तेवढ्यात पारव्याच्या पावलांचा आवाज ऐकू आला. त्याची ती राक्षसी मुद्रा हाकेच्या अंतरावर दिसू लागली. त्याची भयंकर कुत्री जिभल्या चाटीत पारव्याच्या मागे पुढे धावत होती. मार्जाराची नजर तिकडे वळली आणि तो अर्धमेला झाला. अत्यंत काकुळतीला येऊन मूषकाला तो म्हणाला, "मूषका, अजून तुला दया येत नाही का रे? तो बघ काळसर्प नजीक येत आहे. आता तू काय करणार ? "

मूषक : मी होय, हे बघ असे करणार -

असे म्हणून मूषकाने पाशाचा शेवटचा तंतु तोडला. लगेच मार्जाराने वृक्षाकडे धूम ठोकली. मूषकाकडे पाहण्याचीही त्याला शुद्ध राहिली नाही. मग त्याला मारण्याची कल्पना तर दूरच राहिली.

आपली युक्ती इतक्या अचूक पद्धतीने सफल झाली हे पाहून मूषक तडक आपल्या बिळाकडे निघून गेला.

पारधी आशेने आला आणि ते तुटके जाळे गुंडाळून हिरमुसला होऊन निघून गेला.

संकट निघून गेले. मार्जाराने झाडाच्या फांदीवरून खाली उडी मारली आणि बिळाच्या तोंडाशी जाऊन तो उभा राहिला. त्याने मूषकाला हाक मारली व म्हणाला, "मित्रा, तू मला जीवदान दिले आहेस. दोघे आता कायमचे मित्र बनलो. तुझे चातुर्य खरेच प्रशंसनीय आहे. तुझ्या सामर्थ्यामुळेच आज मला जग दिसत आहे. बाहेर ये. माझ्या घरी चल. मी तुझा सत्कार करू इच्छितो. तू माझा उपकारकर्ता आहेस. तुला माझा संशय तर येत नाही ना? माझी कृतज्ञताबुद्धी नष्ट झाली आहे, असे तुला वाटते काय? माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की, माझ्याकडून तुला कसलाच धोका पोचणार नाही. तू बुद्धिमान आहेस. तुझे कौशल्य कल्पनातीत आहे. तेव्हा तू माझा अमात्य व्हावास अशी माझी इच्छा आहे.

मूषक : तू माझे स्तुतिस्तोत्र गायिलेस, ते मी ऐकले. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. पण मित्र कोण व शत्रू कोण हे बारकाईने ओळखले पाहिजे असे शास्त्रकार सांगतात. संकटाच्या वेळीच खरी कसोटी लागते. कालगतीने मित्र शत्रू होतात व शत्रूही मित्र बनतात. याबाबतीत माझे एक सूत्र ठरले आहे. आपल्यावर विश्वास न ठेवणाऱ्यावर विश्वास ठेवू नये, हे कोणालाही समजण्यासारखे आहे. पण ज्याचा आपल्यावर विश्वास असेल त्याच्यावरही अतिविश्वास ठेवू नये. आता आपलेच उदाहरण बघ ना! मी तुला प्रिय असल्याचे सांगत आहेस. पण त्याचे कारण तरी काय रे? त्यामागे तुझा मुळीच स्वार्थ नाही असे म्हणता येईल का? मेघाच्या आकाराप्रमाणे प्राण्यांचे स्वभावही क्षणोक्षणी बदलत असतात. तेव्हा बाह्य आकारावर न जाता प्रसंगानुसार वागणे हाच शहाणपणा. खरे म्हणजे तू माझा स्वभावतःच शत्रू. पण तुझे संकट निवारण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी होते म्हणूनच आपण मित्र झालो ना? मैत्रीचे कार्य संपले. त्यामुळे तुझ्या जन्मजात स्वभावातील शत्रुभाव जागा होणे अगदी स्वाभाविक आहे. आता तुला माझा उपयोग फक्त भक्षणासाठीच होण्यासारखा आहे. मी तुझे भक्ष्य आहे आणि तू माझा भोक्ता. मी दुर्बल आहे आणि तू बलवान आहेस. आपल्या दोघांत कोणतेच साम्य नाही. म्हणून आता आपला संधी व्हायचा नाही. मायावी भाषा न करता तू येथून तात्काळ निघून जाणे यातच मी केलेल्या उपकाराची फेड झाली असे समज. स्वस्थपणे घरी जा आणि कृतज्ञ असलास तर मनात माझे कल्याण चिंतीत जा. मी तुझ्यासाठी हवे ते करीन. पण जीवित मात्र देणार नाही. जगातील सर्व वस्तू परत मिळतात पण जीवित परत मिळत नाही.

मार्जार : मी मित्रद्रोह करणार नाही असे परोपरीने मांगूनही त्यावर तुझा विश्वास बसत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.

मूषक : विश्वास ठेवण्याचा प्रसंग उद्भवला तर मी पुन्हा जरूर विश्वास ठेवीन. पण कारणावाचून शहाणा मनुष्य शत्रुच्या जवळ जात नाही हे लक्षात असू दे. आचार्य शुकांनी असे म्हटले आहे की, बलाढ्य शत्रूंशी संधी करावा, पण त्या संधीचे काम संपले, की नंतर मात्र त्यावर विश्वास ठेवू नये.

बिचारा मार्जार थकला, आणि तेथून निघून गेला. आपल्या कुटिलतेची मात्रा येथे लागू पडत नाही, हे त्याच्या फार उशिरा लक्षात आले. मूषक खरा मुत्सद्दी होता, म्हणून तर त्याच्यासारख्या यःकश्चित दुर्बळ प्राण्याने एकाच वेळी तीन आघाड्या सांभाळून तीन बलाढ्य शत्रूंच्या तावडीतून आपली मुक्तता करून घेतली. ही गोष्ट मूषकाच्या मुत्सद्देगिरीची मूर्तिमंत साक्षच होती. स्वार्थी मार्जाराच्या ती लक्षात यावयास हवी होती. पण ते शक्य नव्हते. कारण शास्त्रकारांनीच म्हटले आहे की, स्वार्थी माणसांची अगोदर बुद्धी जाते आणि तो भुकेने व्याकुळ झाला म्हणजे त्याचे तारतम्यही नष्ट होते.

स. मा. गर्गे

Tags: महाभारत भीष्म युधिष्ठीर पांडव शांतिपर्व व्यास श्रीकृष्ण Load More Tags

Comments:

आनंद गोसावी

शत्रू आणि मित्र ही नाती परिस्थितीजन्य नाहीत. पण इथे शत्रू आणि मित्र हे एकमेकांचे नैसर्गिक शत्रू मित्र आहेत. माणसामध्ये शत्रू आणि मित्र हे एक नाते आहे आणि वर म्हणाल्या प्रमाणे, हे नाते परिस्थिती जन्य नसून वस्तुस्थिती जन्य आहे, असे मला वाटते. मित्र मित्र नसतो, तेव्हा शत्रू नसतो. त्याच प्रमाणे, शत्रू शत्रू नसतो, तेव्हा मित्र नसतो. थोडक्यात, मित्र आणि शत्रू ह्या व्यक्ती नसून त्या त्यांच्या प्रवृत्ती आहे आणि त्यानुसार त्यांची विभागणी झाली आहे. अस्थिर मित्र किंवा अस्थिर शत्रू हे वास्तव असून अपेक्षित आणि स्थिर शक्यता नसलेले अस्तित्व आहे.

Vishwas Sutar

किती अचूक शब्दात जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहेl . माणसाने विवेकाने या गोष्टीचा विचार करायला हवा. धन्यवाद !

Add Comment