1920 ते 2005 असे 85 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स. मा. गर्गे यांची ओळख, इतिहास संशोधक व समाज शास्त्रज्ञ अशी दुहेरी सांगता येईल. त्याबरोबरच त्यांनी पाव शतकाहून अधिक काळ पत्रकारिताही केली. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' या नियतकालिकात 'शांतिपर्वातील कथा' या लेखमालेत 11 कथा लिहिल्या आणि नंतर लगेचच 1962 मध्ये त्या पुस्तकरूपाने आल्या. त्याची दुसरी आवृत्ती 1992 मध्ये त्यांनी स्वतःच प्रकाशित केली, त्यानंतर दीर्घकाळ ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट राहिले आहे. गर्गे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2020 मध्ये आले, तेव्हा या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आणावी आणि त्याआधी ते 'कर्तव्य साधना'वरून प्रसिद्ध करावे असा विचार होता, तसे बोलणेही संजय गर्गे यांच्याशी केले होते. आणि नंतर मात्र कोरोना संकटामुळे ते मागे पडत गेले.. कोणत्याही काळात व कोणत्याही देशात या कथा कमी अधिक लागू पडणाऱ्या आहेत, पण आताची वेळ कदाचित अधिक योग्य आहे. म्हणून या कथा उद्यापासून सलग 11 दिवस क्रमशः प्रकाशित करीत आहोत. या कथांची पार्श्वभूमी व कालातीतता सांगणारे स. मा. गर्गे यांनीच लिहिलेले प्रास्ताविक आज प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक
शांतिपर्वात भीष्माचार्यांनी धर्मराजाला राजधर्म निवेदन केला आहे आणि त्याचा अर्थ विशद करण्यासाठी अनेक ठिकाणी अत्यंत मार्मिक व उद्बोधक कथांचा आश्रय घेतला आहे. त्यातील काही कथा अत्यंत त्रोटक आहेत. काटेकोरपणे त्यांना कदाचित् कथेच्या व्याख्येतही बसविता येणार नाही. काही कथा तर केवळ पौराणिक रूपकांसारख्या काहीशा गूढ भाषेत सांगितल्या आहेत. या कथांपैकी ज्यांना राजकीय तत्त्वांचा स्पर्श झाला आहे आणि ज्यातून काही निःसंदिग्ध राजकीय अर्थ व्यक्त होऊ शकेल अशा अकरा कथांची मी येथे निवड केली आहे. या कथांतील कल्पना, संवाद, प्रसंग इत्यादी सर्व शक्यतोवर मूळ ग्रंथाला अनुसरून जसेच्या तसे कायम ठेवले आहेत. कथांचा आविष्कार आकर्षक पद्धतीने करण्यासाठी त्यांना आधुनिक भाषेचा व निवेदनपद्धतीचा पेहराव चढविण्यापलीकडे मी अधिक काहीही केलेले नाही. अर्थात् असे करीत असता त्यांचा मूळ आशय बदलू नये आणि त्यामागील राजकीय तत्त्वांचा अर्थविपर्यास होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घेतली आहे.
पण कथानिवेदन हे काही शांतिपर्वाचे उद्दिष्ट नाही आणि वैशिष्ट्यही नाही. केवळ अर्थविशदीकरणाचे साधन म्हणून कथांचा उपयोग केला आहे. त्यांची तात्त्विक भूमिका समजण्यासाठी राजधर्माचे विवेचन लक्षात घेतले पाहिजे. म्हणून शेवटच्या प्रकरणात शांतिपर्वातील राजधर्माचा परिचय करून दिला आहे.
द्विधा मनोवृत्ती
व्यक्तीच्या जीवनात काय किंवा राष्ट्राच्या जीवनात काय असा एखादा क्षण येतो, प्रसंग उद्भवतो, की त्या वेळी कर्तव्य आणि अकर्तव्य यासंबंधी मनात संभ्रम उत्पन्न होतो. परस्परविरोधी दिशांना नेणाऱ्या मार्गांच्या मध्यावर उभा राहिलेला माणूस, त्यांपैकी कोणता मार्ग पत्करावा याचा निर्णय घेऊ शकत नाही. हा मार्ग की तो मार्ग, अशी त्याची द्विधा मनोवृत्ती बनते. त्याचे गोंधळलेले मन हतबुद्ध होऊन जाते. त्याची विचारशक्ती पांगळी बनते. मानसिक सामर्थ्य डळमळीत झालेला असा मनुष्य असहायपणे पलायनवाद पत्करतो. महाभारतात असे दोन प्रसंग वर्णिलेले आहेत. पहिला प्रसंग अर्जुनाच्या जीवनात उद्भवला आहे आणि दुसरा प्रसंग धर्मराजाच्या आयुष्यात निर्माण झाला आहे.
भारतीय युद्धाच्या आरंभी अर्जुनाच्या मनाची अवस्था संभ्रमित झाली होती. समरभूमीवर आपल्याभोवती निकटचे आप्त आणि मित्र पाहून त्यांच्याशी युद्ध करणे त्याच्या मनाला प्रशस्त वाटेना. 'युद्ध की युद्धत्याग?' विलक्षण पेचप्रसंग त्याच्या मनापुढे उभा राहिला.
राज्य की राज्यत्याग?
युद्धसमाप्तीनंतर असाच प्रसंग धर्मराजापुढे उभा राहिला. युद्ध जिंकले आणि राज्यप्राप्तीही झाली; पण त्यामुळे समाधान वाटण्याऐवजी मनात अशांतताच अधिक वाढली. आप्तांचा आणि मित्रांचा संहार केल्यानंतर रक्तरंजित हाताने राज्याचा उपभोग घेण्यात कसला आनंद! 'राज्य की राज्यत्याग?' परस्परविरोधी विचारांच्या कात्रीत त्याचे मन सापडले.
अर्जुनाच्या मनाची संमोहावस्था श्रीकृष्णांनी नाहीशी केली. युद्ध करणे हेच कसे कर्तव्यकर्म ठरते हे त्याला पटवून दिले. त्याला कार्यप्रवण केले. त्यासाठीच भगवद्गीतेचा जन्म झाला. धर्मराजाच्या मनाची अशांतता भीष्माचार्यांनी दूर केली. त्यासाठी त्यांना शांतिपर्वाचा ग्रंथप्रपंच करावा लागला. त्यातील राजधर्माचे महत्त्व लक्षात घेऊन धर्मराजाने राज्य करणे हे आपले कर्तव्य मानले. राज्यत्याग करून वनात जाण्याची कल्पना सोडून दिली. पलायनवादावर कर्तव्यवादाने जय मिळविला. निवृत्ती आणि निराशा यांनी ग्रासलेले त्याचे मन कार्यप्रवृत्त आणि आशावादी बनले. कर्म-अकर्माचा संभ्रम निघून गेला. राज्यावर बसून प्रजापालनाचे कर्तव्य पार पाडण्यास त्याची मनोभूमिका तयार झाली. शांतिपर्वाचे हे मर्म आहे.
शांतिपर्वात सांगितलेली सर्व राजकीय तत्त्वे आणि राजकीय व्यवहार विसाव्या शतकात जशीच्या तशी उपयुक्त ठरतील, असे मानणे भोळसटपणाचे तरी ठरेल किंवा सनातनी दुराग्रहीपणाचे तरी ठरेल. पण त्याचबरोबर काही विचारमूल्ये चिरंतन स्वरूपाची असतात हेही विसरता येणार नाही. अशा स्थलकालातीत मूल्यांची नव्या परिस्थितीत चर्चा झाली, उजळणी केली तर ती इष्टच असते. उदाहरणार्थ, शांतिपर्वात एके ठिकाणी म्हटले आहे. 'धर्मही सामर्थ्यावर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे धूम्र वायूच्या अधीन असतो, त्याप्रमाणे धर्म सामर्थ्याच्याच अनुरोधाने चालत असतो. सामर्थ्यशून्य राजाला अपमान आणि अपकीर्ती सहन करावी लागते. राज्य आणि सामर्थ्य ही एकरूपच आहेत. हे सामर्थ्य सैन्याचे असते; कोषाचे असते आणि राजनीतीचे असते.' सद्यःस्थितीच्या संदर्भात यावर निराळे भाष्य करण्याची गरज नाही. भीष्माचार्यांनी राजसत्तेच्या संदर्भात सांगितलेले हे तत्त्व आधुनिक लोकसत्तेलाही उपयुक्त ठरणारे आहे. लोकसत्तेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठीही सैन्य, कोष आणि मुत्सद्देगिरी यांची नितांत गरज असते.
भुकेच्या पोटी अनीतीचा व अराजकाचा जन्म होतो, हे विदारक सत्य 'क्रांति' या कथेत विश्वामित्राच्या रूपाने मूर्तिमंत व्यक्त झाले आहे. आणि सत्ता प्राप्त होईपर्यंत नम्र असलेली व्यक्ती, ती प्राप्त होताच सत्ता मदाने कृतघ्न बनते, स्वार्थी बनते हे 'सत्ता' या कथेतील मर्म, श्वानाच्या स्वरूपात स्पष्ट झाले आहे. 'परचक्र' या कथेतील मूषकाचे भाषण म्हणजे परराष्ट्रनीतीवरील उत्कृष्ट भाष्य आहे. मित्र कोण व शत्रू कोण, हे बारकाईने ओळखले पाहिजे असे शास्त्रकार सांगतात. संकटाच्या वेळीच खरी कसोटी लागते. कालगतीने मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र बनतात. आपल्यावर विश्वास न ठेवणाऱ्यावर विश्वास ठेवू नये, हे कोणालाही समजण्यासारखे आहे. पण ज्याचा आपल्यावर विश्वास असेल त्याच्यावरही अतिविश्वास ठेवू नये.' मूषकाच्या तोंडून वदविलेले हे सूत्र परराष्ट्रांशी वर्तन ठेवावयाच्या संदर्भात सांगितलेले आहे.
शांतिपर्वात राजधर्म, आपद्धर्म आणि मोक्षधर्म अशी तीन उपपर्वे आहेत. पहिल्या दोन उपपर्वांतील कथांचा आणि विवेचनाचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे; आणि तोही मराठी वाचकांसाठी; संस्कृत पंडितांसाठी नव्हे. कारण शांतिपर्वासंबंधी संशोधनपर प्रबंध लिहिण्याचा हा प्रयत्न नाही. त्यातील संस्कृत शब्दांचे अर्थभेद, निरनिराळ्या आवृत्त्यातील पाठभेद, त्यावरून निघणारे निष्कर्ष, कालनिर्णय इत्यादी विषयांचा मी खल केलेला नाही. यापूर्वी भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांनी महाभारताच्या उपसंहारात इतर अनेक विषयांबरोबर राजधर्माचेही विवेचन केले आहे. गणेश विष्णु चिपळूणकर आणि मंडळी यांनी प्रकाशित केलेल्या शांतिपर्वात विवेचन नाही, पण केवळ भाषांतर म्हणूनही मराठी वाचकांच्या दृष्टीने ते प्रचंड कार्य महत्त्वाचे आहे. पण त्यापूर्वीही, म्हणजे जवळ जवळ शंभर वर्षापूर्वी (इ. स. 1869) सरदार रघुनाथराव विठ्ठल विंचूरकर यांनी शांतिपर्वातील राजधर्माचे 'स्वदेशीय लोकहितार्थ' केलेले 'महाराष्ट्र भाषे'तील भाषांतर या विषयाचे औत्सुक्य व्यक्त करण्यास पुरेसे आहे.
- स. मा. गर्गे
Tags: शांतीपर्व राजकीय रूपक कथा स. मा. गर्गे राजकारण भीष्म महाभारत Load More Tags
Add Comment