प्रजा

शांतिपर्वातील कथा : 9

प्रतिनिधिक चित्र | फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सोळाव्या लुईचा शिरच्छेद | historycrunch.com

“प्रजेवर दोन्हीकडून मोठे संकट ओढवले आहे. लाकूड दोन्ही टोकांकडून पेटू लागले असता, मध्ये सापडलेल्या किडेमुंग्यांची जी अवस्था होते तीच अवस्था प्रजेची झाली आहे. एकीकडून दुष्ट, चोर आणि दुसरीकडून स्वतः राजा यांच्यामध्ये प्रजा सापडली आहे. काय चमत्कारिक प्रसंग आहे पाहा! कोणी राजा नसला म्हणजे राष्ट्राला भय उत्पन्न होते. म्हणून आम्हीच या वेनाला तो अयोग्य असताही राजा केले. आणि तोच आता प्रजेला भय दाखवू लागला आहे. तेव्हा प्रजेला सुख कसे मिळावे? दूध पाजून सर्पाचे पोषण करणे जसे पोषकाला घातक होते तसा स्वभावतःच दुष्ट असलेला हा सुनीथा राणीचा पुत्र वेन आम्हाला घातक झाला आहे.”

धर्मराज : हे भारता, राजा आणि प्रजा यांचे संबंध कशा प्रकारचे असावेत हे समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. राजाने अयोग्य वर्तन केले, तो मद्यपान, द्यूत, स्त्रिया आणि मृगया यात आसक्त राहू लागला, तर प्रजेने त्याच्याशी कसे वागावे? क्रोध आणि अधर्म यांच्या आहारी गेलेल्या राजाविषयी प्रजेची दृष्टी कशी असावी?

भीष्म : राजा, प्रजा हेच राज्याचे मूळ आहे. ज्याच्या राज्यात आणि राजधानीत लोक धनधान्यसंपन्न असतात, त्याच राजाची सत्ता दृढ आहे असे समजावे. जो राजा आपल्या प्रजेशी असत्याने वागतो त्याची शक्ती क्षीण होत असते. प्रजापालन, न्यायदान, संग्राम, धर्मसंरक्षण आणि योग्य वेळी शत्रूविरुद्ध कारस्थान करणे या पाच गोष्टींच्या योगानेच राजा आपल्या राष्ट्राची अभिवृद्धी करू शकतो. ज्या राजाचे वर्तन प्रजेच्या हिताविरुद्ध असेल, त्याची प्रजा क्रुद्ध होते आणि प्रसंगी ती राजाचाही नाश करते. प्रजेला कधीही दुर्बल समजू नये. कारण, दुर्बल समजल्या जाणाऱ्यांच्या दृष्टिपातानेही राजा दग्ध होऊन जातो.

ध्रुव वंशात वेन नावाचा राजा होऊन गेला. तो प्रजेचे हितरक्षण करण्यास समर्थ नव्हता. आपल्या प्रजेला गुलामाप्रमाणे वागविण्यात त्याला आनंद होत असे. अत्याचार करणारा राजा आणि असंतुष्ट मनाची प्रजा यामुळे राज्यात चोर आणि लुटारू यांचे थैमान सुरू झाले. सर्वत्र अराजक माजले. प्रजेची सुरक्षिततेची भावना नष्ट झाली. मोठ्या माशाने लहान माशांना खाऊन टाकावे, त्याप्रमाणे समाजांतील सबल लोक दुर्बलांचा नाश करू लागले. त्या भयभीत अवस्थेतून बाहेर कसे पडावे हे लोकांना कळेना. धनधान्य नाही, उपजीविकेचे साधन नाही, सुरक्षिततेची शाश्वती नाही आणि राजाच्या वर्तनाविषयी अनुमानही करता येत नाही. अशा विपरीत परिस्थितीत प्रजा सापडली.

वेन राजा आपल्या विलासांत दंग होता. त्याला दंडनीतीचे ज्ञान नव्हते आणि प्रजेच्या क्लेशाचीही कल्पना नव्हती.

राजाच्या अशा वर्तनाने सर्व प्रजा संतप्त झाली. सर्व आचार्य आणि अमात्य क्रोधाविष्ट झाले. राजा नष्ट झाल्याशिवाय प्रजेला सुख लाभणार नाही याविषयी त्यांची खात्री होऊन चुकली. ते म्हणू लागले, “प्रजेवर दोन्हीकडून मोठे संकट ओढवले आहे. लाकूड दोन्ही टोकांकडून पेटू लागले असता, मध्ये सापडलेल्या किडेमुंग्यांची जी अवस्था होते तीच अवस्था प्रजेची झाली आहे. एकीकडून दुष्ट, चोर आणि दुसरीकडून स्वतः राजा यांच्यामध्ये प्रजा सापडली आहे. काय चमत्कारिक प्रसंग आहे पाहा! कोणी राजा नसला म्हणजे राष्ट्राला भय उत्पन्न होते. म्हणून आम्हीच या वेनाला तो अयोग्य असताही राजा केले. आणि तोच आता प्रजेला भय दाखवू लागला आहे. तेव्हा प्रजेला सुख कसे मिळावे? दूध पाजून सर्पाचे पोषण करणे जसे पोषकाला घातक होते तसा स्वभावतःच दुष्ट असलेला हा सुनीथा राणीचा पुत्र वेन आम्हाला घातक झाला आहे.”

अशा प्रजाघातक्याचा वध करण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. प्रथम ब्रह्मवादी मुनींनी अभिमंत्रण केलेल्या दर्भांचा वेन राजावर मारा केला. त्यापाठोपाठ प्रक्षुब्ध प्रजेनेही अनेकविध प्रहार केले.

संतप्त प्रजेपुढे राजा हतबल झाला. त्याची प्रतिकारशक्तीच नष्ट झाली. शेवटी त्यातच त्याचा अंत झाला. प्रजेच्या क्षोभाला तो बळी पडला. 

- स. मा. गर्गे

Tags: स. मा. गर्गे इतिहास राजा राज्य राजकारण सत्ता महाभारत शांतिपर्व Load More Tags

Add Comment