अशांतिपर्व

शांतिपर्वातील कथा : 1

sothebys.com

1920 ते 2005 असे 85 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स. मा. गर्गे यांची ओळख, इतिहास संशोधक व समाज शास्त्रज्ञ अशी दुहेरी सांगता येईल. त्याबरोबरच त्यांनी पाव शतकाहून अधिक काळ पत्रकारिताही केली. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' या नियतकालिकात 'शांतिपर्वातील कथा' या लेखमालेत 11 कथा लिहिल्या आणि नंतर लगेचच 1962 मध्ये त्या पुस्तकरूपाने आल्या. त्याची दुसरी आवृत्ती 1992 मध्ये त्यांनी स्वतःच प्रकाशित केली, त्यानंतर दीर्घकाळ ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट राहिले आहे. गर्गे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2020 मध्ये आले, तेव्हा या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आणावी आणि त्याआधी ते 'कर्तव्य साधना'वरून प्रसिद्ध करावे असा विचार होता, तसे बोलणेही संजय गर्गे यांच्याशी केले होते. आणि नंतर मात्र कोरोना संकटामुळे ते मागे पडत गेले.. कोणत्याही काळात व कोणत्याही देशात या कथा कमी अधिक लागू पडणाऱ्या आहेत, पण आताची वेळ कदाचित अधिक योग्य आहे. म्हणून या कथा आजपासून सलग 11 दिवस क्रमशः प्रकाशित करीत आहोत. 

धर्मराज : सर्व पृथ्वी जिंकली. पण विजयाचा आनंद मिळत नाही. मनाला शांती लाभत नाही. लोभाच्या प्रेरणेने ज्ञातीचा भयंकर संहार केला. राज्यलोभाने कर्णाला मारले. गुरुजनांचा नाश केला. त्या युद्धाच्या स्मृतीनेदेखील मनाचा दाह वाढत आहे. कापसाच्या राशीला जाळणाऱ्या अग्नीप्रमाणे त्या स्मृती माझे अवयव न् अवयव होरपळून काढीत आहेत. अमंगल अशा मांसाचा अभिलाष करणाऱ्या श्वानाप्रमाणे आम्हाला राज्यसुखाचे आमिष इष्ट वाटले. आम्हीच सर्व लोकांच्या नाशाला कारणीभूत झालो. पण युद्धामुळे आमचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत आणि कौरवांच्याही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. आमचाही उत्कर्ष नाही आणि त्यांचाही उत्कर्ष नाही. आम्ही अनेक शूरांना ठार केले. पापकर्म केले, जगातील सुंदर वस्तूंचा नाश केला. क्रोधाच्या भरात कौरवांचा वध केला. त्यामुळे क्रोध शमला. पण त्याची जागा शोकाने घेतली.

अर्जुना! आपल्या हातून भयंकर पातक घडले आहे. अशा स्थितीत राज्य करणे मला योग्य वाटत नाही. तूच राज्य कर. मला राज्य नको, सुख नको आणि सत्ताही नको. मी तुम्हा सर्वांचा निरोप घेऊन बनात निघून जातो. तपश्चर्या आणि ज्ञानप्राप्ती हेच माझे यापुढचे जीवन. 

अर्जुन : आश्चर्य वाटते! आपला संकल्प म्हणजे विचारशक्ती नष्ट झाल्याचेच लक्षण आहे. जीवनातून, परिवारातून आणि राज्यांतून असे पलायन करावयाचे होते, तर युद्धाचा एवढा खटाटोप कशाला केला? अनेक पृथ्वीपतींचा वध कशाला केला? आणि आता वनात जाण्याचा अधर्म कशाला करता? त्याने का सुख लाभणार आहे? अरे! ज्याला धर्म म्हणतात त्याचा आरंभच मुळी द्रव्यापासून होतो. या लोकात दारिद्र्य हे महापातक आहे. तू राज्य सोडून दारिद्र्य पत्करण्यास का तयार व्हावे, हेच मला समजत नाही. दारिद्र्य पत्करण्यात कसला मोठेपणा? निर्धनतेची प्रशंसा? कशासाठी? महापातकी आणि महादरिद्री हे दोन्ही अभिन्न असतात. द्रव्यापासूनच सर्व क्रियांचा आरंभ होतो. द्रव्याच्या योगानेच धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते. ज्याच्याजवळ द्रव्य असेल त्यालाच पौरुष आणि पांडित्य, मित्र आणि बंधू ही सर्व लाभतात. हत्तीच्या साहाय्यानेच इतर हत्ती पकडता येतात. द्रव्यानेच द्रव्य मिळते. कुलीनपणा, धर्मवृद्धी यामागे द्रव्याची उष्णता असते. निर्धनाला इहलोक नाही आणि परलोकही नाही. पर्वतातून नदीचा उगम होतो, त्याप्रमाणे द्रव्यापासून धर्माची उत्पत्ती होते.

पृथ्वी जिंकली यात आनंद मानावयाचा सोडून दुःख कसले मानतोस! पृथ्वीच्या लोभानेच द्रव्यलाभ होईल. पृथ्वी जिंकणे हा आपला धर्म आहे. तिचा उपभोग घेणे, तिला संपन्न करणे हे तुझे कर्तव्य आहे. ते तू पार पाडले नाहीस, तर तुला राज्यासंबंधी कर्तव्यच्युतीचे पाप लागेल.

धर्मराज मला पटत नाही हे! मी राज्याचा स्वीकार करणार नाही. मला पृथ्वी नको, राज्य नको आणि द्रव्यही नको. घोर तप करून शरीर कृश करण्यासाठी माझा निश्चय झाला आहे. अत्यंत क्षुद्र कारणाने आणि अत्यंत स्वार्थी इच्छेने राजे लोक इतरांना बद्ध करतात. मला ते दुष्ट राज्य नको आणि त्याचा उपभोगही नको.

भीम : धर्मा! तुझे विचार विपरित वाटतात. अर्थज्ञान न करून घेता वेदांची घोकंपट्टी करणाऱ्या वैदिकाची बुद्धी नष्ट होते, तशी तुझी बुद्धी नष्ट झाली आहे. तुझे हे विचार युद्ध सुरू होण्याच्या अगोदर का सांगितले नाहीस? आम्ही कोणाचा वध तरी केला नसता. ही पृथ्वी सर्व प्राण्यांचे अन्न आहे, असे विद्वान लोक समजतात. तिचा उपभोग घेतलाच पाहिजे. विहीर खणावी आणि पाणी न पिता चिखल अंगाला फासून चालते व्हावे, तशी तुझी कृती वाटते. वृक्षावर चढून मध मिळवावा आणि तो न चाखताच फेकून द्यावा. क्षुधेने पीडित होऊन अन्न मिळवावे आणि ते जागचे जागीच ठेवून त्याच्या शेजारी मरून पडावे, असे आहे तुझे वर्तन!

पण त्यात तुझी तरी कसली चूक? तुझ्यासारख्या मंदबुद्धीच्या सामर्थ्यशून्य माणसाचे नेतृत्व पत्करले ही आमचीच चूक झाली. तू बनात निघून जाण्याचा विचार करीत आहेस, पण बुद्धिमान माणसे अशा संन्यासाचे नावही काढीत नाहीत. क्षत्रियाने संन्यास घेणे म्हणजे धर्माचा अतिक्रम करणे होय. अरे! संन्यासाच्या योगाने राजाला सिद्धी मिळत नसते. कर्म केल्यावाचून सिद्धी नाही. कर्म केले पाहिजे! शौर्याने कर्म केले पाहिजे! फलाच्या उपभोगासाठी कर्म केले पाहिजे.

धर्मराज : तुझा युक्तिवाद मला पटत नाही. मी मनाशी निश्चय केला आहे तोच खरा.

नकुल : पृथापुत्रा! हे काय तू डोक्यात घेऊन बसला आहेस? राज्याचा त्याग करून मूर्खाप्रमाणे अरण्यात जाऊन राहतो तो कसला त्यागी? राजाच्या दुर्बलतेमुळे, अनवधानाने किंवा अज्ञानाने प्रजेचे रक्षण होत नसेल तर तो कसला राजा? लुटारूंपासून, आक्रमकांपासून प्रजेचे संरक्षण करण्यास जो राजा समर्थ नसतो त्याला कलीच म्हटले पाहिजे 

धर्मराज : तूही अर्जुन आणि भीमाप्रमाणेच मला उपदेश करीत आहेस. पण आता त्याचा उपयोग नाही. माझा निश्चय ठाम आहे.

सहदेव : धर्मा! बाह्यवस्तूंच्या त्यागाने मोक्ष मिळतो असे तुला वाटते तरी कसे? बाहुबलाने आपण पृथ्वी जिंकली आहे. जो राजा पृथ्वीचा उपभोग घेत नाही त्याचे जीवित निष्फल आहे. 

धर्मराज : अंहं! मला मान्य नाही!

द्रौपदी : हे वीरा! तुझ्या चमत्कारिक निर्णयाने तू आमच्या अंतःकरणावर प्रहार करीत आहेस. नेभळ्या मनुष्याला पृथ्वीचा उपभोग मिळत नाही. ज्याच्या हाती शासनशक्ती नाही तो क्षत्रिय शोभत नाही. त्याला प्रजा मानीत नाही. दुष्टांना नष्ट करणे, सज्जनांना संरक्षण देणे आणि संग्रामातून पलायन न करणे हाच क्षत्रियांचा धर्म. ज्याला क्षमा आणि क्रोध, दान आणि ग्रहण, भीती आणि निर्भयता, निग्रह आणि अनुग्रह यांचे तारतम्य राखता येते तोच धर्मवेत्ता. तू पृथ्वीचे दान मिळविले नाहीस. युद्ध करून तुला तिची प्राप्ती झाली आहे. अशा स्थितीत तिचा त्याग करणे तुला शोभत नाही. तुझ्या या वेडेपणामुळे सर्व पांडवांना वेड लागण्याची पाळी आली आहे. तुझा निश्चय बदल. न्यायाने राज्य कर आणि प्रजेचे संरक्षण करून आपले कर्तव्य पार पाड.

अर्जुन : धर्मराजा! माझ्या विचाराकडे पुन्हा एकदा लक्ष दे! राजानेच अरण्यात निघून जावयाचे ठरविल्यावर जगाचे शासनकार्य तरी कसे चालणार? आणि मग जगात धर्म, नीती ही कशी टिकणार? शासन शक्ती हीच प्रजेचे शासन करते. तीच सर्वांचे संरक्षण करते. लोक निद्रावश झाले तरी शासनशक्ती जागरूक असते. शासनशक्ती हाच धर्म. दण्डच (शासनशक्ती) सर्व धर्माचे, अर्थाचे आणि कामाचे संरक्षण करतो. तू त्याचा स्वीकार कर आणि लोकव्यवहाराकडे लक्ष दे. दण्डशक्तीने लोकांचे संरक्षण केले नाही तर सर्वनाश ओढवेल. दण्ड हा नीतीचा आधार आहे. दण्ड उभारला नाही तर श्वान आणि कावळे यांचे फावेल. राज्य धर्मांने संपादन केलेले असो अथवा अधर्माने, त्याविषयी शोक करीत बसण्याचे कारण नाही. लोकव्यवहार चालविण्यासाठी राज्याचे संरक्षण केलेच पाहिजे म्हणून मी पुन्हा तुला सांगतो, तू दण्डाचा स्वीकार कर आणि प्रजेचे संरक्षण कर.

व्यास : अर्जुन सांगतो ते खरे आहे. जो राजा राष्ट्राचे संरक्षण करीत नाही, त्याला राज्यात घडणाऱ्या पातकाचा स्वीकार करावा लागतो. शत्रूंचा निग्रह केलाच पाहिजे. प्रजेला उपद्रव होणे हे राजाला लांच्छनास्पद आहे.

धर्मराज : तुम्हा सर्वांचे म्हणणे मी ऐकले. पण मला हे राज्य आणि त्यातील उपभोग सुखाचे वाटत नाहीत. इंधन जास्त घातले म्हणजे अग्नी अधिक भडकतो, तसेच सत्तेच्या लोभाचे आहे. आपण पृथ्वी जिंकली; पण पृथ्वीने आपले समाधान जिंकले. आपली मनःशांती नष्ट केली. महायुद्धात झालेल्या हानीमुळे मला अत्यंत शोक होत आहे. पतिविरहाने दुःखित झालेल्या अनेक स्त्रियांचे आर्त स्वर माझ्या कानी येत आहेत. वृद्ध माता-पित्यांचे आक्रोश मला ऐकू येत आहेत आणि अनेक बालकांचे करुण स्वर हृदयाचा थरकाप करीत आहेत. मला हे सर्व सहन होत नाही. त्या सर्वांच्या दुःखांना युद्धच कारणीभूत झाले ना? आणि युद्ध कशासाठी केले? राज्यप्राप्तीच्या लोभानेच ना! हे सर्व विचार मला अस्वस्थ करीत आहेत.

व्यास : या सर्व विवेचनात तुला राजधर्माचा विसर पडला आहे असे दिसते. पण लक्षात ठेव, गृहस्थाश्रमाचा त्याग करून अरण्यात जाणे तुला विहित नाही. धुरेचा बैल ज्याप्रमाणे धुरेचा भार आपल्या मानेवर घेतो, त्याप्रमाणे राज्याचा भार तू आपल्या शिरावर घेतलाच पाहिजे. क्षत्रियाचे ते कर्तव्यच आहे. यज्ञ, विद्या, दंडधारण, प्रजेचे संरक्षण, द्रव्याचे अर्जन आणि दान हीच राजाची पवित्र कर्मे होत. बिळांमध्ये राहणाऱ्या मूषकांना ज्याप्रमाणे सर्प भक्षण करतो, त्याप्रमाणे शत्रूशी विरोध न करणाऱ्या राजाला ही भूमी ग्रासून टाकते. तुला राजधर्माचा विसर पडला आहे. तो तू चांगला समजून घे. तो समजून घेण्याची तुझी इच्छा आहे का?

धर्मराज : होय! माझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे. मला धर्म आणि अधर्म, कर्तव्य आणि अकर्तव्य समजून घेतलेच पाहिजे, 

व्यास : मग तुला त्यासाठी पितामह भीष्मांकडे गेले पाहिजे. तो एकच महापुरुष राजधर्माचे खरेखुरे मर्म सांगू शकेल.

- स. मा. गर्गे

Tags: शांतिपर्व महाभारत राजकारण रूपककथा कथा पत्रकारिता संशोधन Load More Tags

Comments:

Hira janardan

सुबोध आणि ओघवती शैली.

विष्णू दाते

सुंदर कथा, पुढील कथा वाचायला उत्सुक!!

Add Comment