क्रांती

शांतिपर्वातील कथा : 11

1920 ते 2005 असे 85 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स. मा. गर्गे यांची ओळख, इतिहास संशोधक व समाज शास्त्रज्ञ अशी दुहेरी सांगता येईल. त्याबरोबरच त्यांनी पाव शतकाहून अधिक काळ पत्रकारिताही केली. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' या नियतकालिकात 'शांतिपर्वातील कथा' या लेखमालेत 11 कथा लिहिल्या आणि नंतर लगेचच 1962 मध्ये त्या पुस्तकरूपाने आल्या. त्याची दुसरी आवृत्ती 1992 मध्ये त्यांनी स्वतःच प्रकाशित केली, त्यानंतर दीर्घकाळ ते पुस्तक आऊट ऑफ प्रिंट राहिले आहे. गर्गे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2020 मध्ये आले, तेव्हा या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आणावी आणि त्याआधी ते 'कर्तव्य साधना'वरून प्रसिद्ध करावे असा विचार होता, तसे बोलणेही संजय गर्गे यांच्याशी केले होते. आणि नंतर मात्र कोरोना संकटामुळे ते मागे पडत गेले.. कोणत्याही काळात व कोणत्याही देशात या कथा कमी अधिक लागू पडणाऱ्या आहेत, पण आताची वेळ कदाचित अधिक योग्य होती, म्हणून 'कर्तव्यसाधना'वर या कथा 21 जूनपासून सलग 11 दिवस क्रमशः प्रकाशित केल्या. आज शेवटची, 11वी कथा प्रसिद्ध करत आहोत. - संपादक

धर्मराज : पितामह, राजधर्माची अनेक तत्त्वे आपण मला निवेदन केली. सर्वसामान्य परिस्थितीत आपली तत्त्वे आणि आपण सुचविलेले मार्ग निःसंशय फलदायक ठरतील! पण जीवनात काही आपद्प्रसंगही येतात. राजाच्या जीवनात तर असे किती तरी प्रसंग येतील! राज्यात अराजक माजले आणि लोक अधर्माने वागू लागले; तसेच प्रजेचा एकमेकावरील विश्वास उडाला आणि सर्व लोक भीतीग्रस्त झाले, तर अशा वेळी चांगल्या लोकांनी कसे वागावे हे मला समजून घ्यावयाचे आहे. राज्यात असे आपद्ग्रसंग काही वेळा उद्भवतात. सर्व देश असंतोषाने पेटून जातो. लोक अधर्माला धर्म मानू लागतात. विद्या नष्ट होऊ लागते. उपजीविकेची साधने दस्यूंच्या हाती जातात. पाऊस पडेनासा होतो. लोकांची दानत बिघडते. अशा वेळी विद्यासंपन्न लोकांनी उपजीविकेसाठी कोणता मार्ग पत्करावा? तसेच सर्व लोक कलुषित होऊन गेले असता, राजाने आपले वर्तन कसे ठेवावे? धर्म आणि अर्थ ह्यांचे रक्षण करण्यासाठी अशा आपद्काली कोणता धर्म स्वीकाराचा?

भीष्माचार्य : तुझा प्रश्न महत्त्वाचा आहे. नेहमीच्या परिस्थितीतील धर्म आणि आपद्धर्म यात फरक केला पाहिजे. वस्तुत: प्रजेच्या व्याधीचे आणि भीतीचे मुख्य कारण राजाच असतो. वर्षाकाली निसर्ग प्रफुल्लित राहणे, राजाच्या पुण्याईवरच अवलंबून असते. तरी पण प्रजेमध्ये दोष उत्पन्न करणारा अराजकाचा काळ उत्पन्न झाला. तर मनुष्याने अशा वेळी बुद्धी आणि सामर्थ्य यांचा उपयोग करून प्रथम आपले प्राण वाचवावेत. हा आपद्धर्म आहे. पण आपत्काली त्याचेच पालन केले पाहिजे. यासंबंधी तुला विश्वामित्र आणि चांडाल यांची कथा सांगतो. त्यावरून आपद्धर्म कशाला म्हणावयाचे हे तुझ्या लक्षात येईल!

फार प्राचीन काळी एकदा सतत बारा वर्षे भयंकर अवर्षण पडले, सर्वत्र प्रलयकालच ओढवला. पर्जन्यवृष्टी झाली नाही. नद्यांची पात्रे शुष्क झाली. सरोवरांचे सौंदर्य नष्ट झाले. पाणपोया बंद पडल्या. यज्ञकुंडे थंडावली. ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त झाले. अध्ययन आणि अध्यापन बंद पडले. मंगलकार्ये संपली. लोकांचे देह अस्थिपंजर दिसू लागले. भूक आणि तहान यांनी सर्वत्र थैमान घातले. मग शेती आणि गोरक्षण कोण करणार? आणि वस्तूंचा क्रयविक्रय तरी कसा होणार? ग्राम आणि नगरे ओस पडली. उत्सवसमारंभ नाहीसे झाले. सारांश, पृथ्वीवर जिकडे तिकडे मृत्यू आणि भीती, व्याधी आणि अराजक यांनीच आपली सत्ता प्रस्थापित केली. समाजातून देवता निघून गेल्या. अनुभवी लोक गेले. गाई नष्ट झाल्या. विद्वानांचा वध झाला. कोणी कोणाचा संरक्षणकर्ता उरला नाही. जणू काय समाजातील संरक्षणक्रियाच नष्ट झाली. लोक एकमेकांना खाऊ लागले. ऋषीदेखील नीतीनियमांचा त्याग करून इतस्तत: भटकू लागले.

अशा त्या भयदग्ध आणि प्रक्षुब्ध कालखंडात महर्षी विश्वामित्र भुकेने व्याकुळ होऊन वाट फुटेल तिकडे फिरू लागले. त्यांनी आपली कुटुंबीय मंडळी एका जनसमुदायात सोडून दिली. अग्नी आणि आश्रम या दोन महान साधनांचा त्यांनी त्याग केला. पोटाला दोन घास मिळविण्यासाठी अरण्यात त्यांची भ्रमंती सुरू झाली. भक्ष्य आणि अभक्ष्य यांतील तारतम्य सुटले.

असेच भटकत भटकत विश्वामित्र चांडालांच्या एका वस्तीजवळ पोचले. तेथील दृश्य अतिशय भयानक होते. चांडालांच्या झोपड्यांभोवती अनेक प्राण्यांचे छिन्नविछिन्न तुकडे विखुरलेले होते. त्यांतच मातीच्या भांड्यांचे आणि हाडांचे तुकडे मिसळलेले होते. प्राण्यांच्या कवट्या आणि जबडे यामुळे ते दृश्य अधिकच भेसूर बनले होते.

चांडालांच्या झोपड्यांना सर्पाच्या कातीच्या माळा लावलेल्या होत्या. कुक्कुटांचा कचकच होणारा आवाज आणि गर्दभांचे कर्णकटु ओरडणे यांनी त्या वस्तीचे वातावरण अनेक पटींनी भेसूर बनविले होते. वस्तीत राहणारे चांडाल एकमेकांशी अद्वातद्वा बोलत होते आणि त्यांच्या स्त्रियांचा कठोर कलकलाट चालू होता. कुत्र्याचे भुंकणे आणि दिवाभितांचे घूत्कार यामुळे ते स्थान अवर्षणाचे प्रतीक बनले होते.

अशा या भेसूर चांडाल वस्तीजवळ भुकेमुळे बेभान बनलेला महर्षी विश्वामित्र पोहोचला. त्याला भुकेशिवाय काहीही सुचत नव्हते. तो भक्ष्याचा शोध करू लागला. त्याने त्या चांडाल वस्तीत भिक्षाही मागितली. पण त्याला काहीही मिळाले नाही. एवढा ज्ञानसंपन्न ऋषी पण क्षुधेपुढे शरणागत झाला. आता आपल्यावर मृत्यूचे संकट कोसळणार अशी त्याला भीती वाटू लागली. त्याचे शरीर दुर्बल बनले आणि मनानेही तो दुर्बल झाला. तशाच विकल मनःस्थितीत त्याने एका चांडालाच्या झोपडीत चोरून प्रवेश केला. तो एका कोपऱ्यात लपून बसला. त्या वेळी त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले. ‘आता आपण काय करावे? काय केले असता आपणास व्यर्थ मृत्युमुखी पडावे लागणार नाही?’ त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला. एकीकडे क्षुधेने त्याच्या पोटातील आतडी तुटत होती आणि दुसरीकडे त्याच्या डोक्यात नीती-अनीतीच्या विचारांचा संघर्ष चालू होता. कोणत्याच मार्गांनी त्याला अन्न मिळण्याची शक्यता उरली नाही. भूमीवर पडल्यापडल्या त्याचे उलटसुलट विचार चालू होते.

रात्रीची वेळ होती. सर्वत्र सामसूम झाली. चांडालाच्या झोपडीत अंधार पसरला होता. विश्वामित्राचे डोके विचारांनी भणाणून गेले. एवढ्यात त्याला त्या झोपडीत श्वानाचे मांस बांधून ठेवलेली एक लांब दोरी दिसली, त्या मांसाची चोरी करावी काय?

शेवटी पुन्हा त्याच्या मनात झगडा सुरू झाला. “मांसाच्या तुकड्यासाठी आपल्यासारख्या महर्षीला चोरी करणे कितपत शोभेल?” चोरी करण्याचा निर्णय त्याने घेतला. कारण त्यावाचून प्राणरक्षणाचा दुसरा मार्गच राहिला नाही. आपद्काली चोरी करणे विहित आहे. विशेषतः पंडितांनी प्राणरक्षणासाठी ते अवश्य करावे असा सिद्धान्त आहे. त्याने प्रथम खालच्या जातीतील पुरुषाकडून द्रव्यग्रहण करावे. त्याच्याकडून न मिळाल्यास आपल्याहून अधिक योग्यतेच्या अशा धार्मिक पुरुषाकडून ते मिळवावे. तेव्हा पहिला मार्ग स्वीकारायचा म्हणजे या चांडालाच्या घरात असणारे हे श्वानाचे जांघाड हरण केले पाहिजे.

चोरी करून भक्ष्य मिळविण्याचा विश्वामित्राचा निश्चय कायम झाला. तोपर्यंत झोपडीतील सर्व लोक झोपी गेले. रात्र पुष्कळ झाली होती. चांडालही झोपी गेल्यासारखा दिसत होता. विश्वामित्राने हळूच हात पुढे करून ती दोरी हातात घेतली.

तो त्या मांसखंडाला हात लावणार तोच तो चांडाल जागा झाला. तो क्रूर आणि कुरूप चांडाल मोठ्याने ओरडून म्हणाला, “माझ्या घरातील सर्व लोक झोपी गेले असता मांसाच्या तुकड्याला कोण चोरून नेत आहे? पण याद राख. मी जागा आहे. त्या मांसाला हात लावलास तर तत्काल ठार करीन.”

चांडालाचे ते कठोर भाषण ऐकून विश्वामित्र मनात चरकला. उद्विग्न झाला. लज्जेमुळे त्याचे तोंड काळवंडून गेले. तो चांडालाला म्हणाला, “मी विश्वामित्र आहे. भुकेने अतिशय व्याकुळ झालो आहे आणि हे मांस चोरून नेण्यास प्रवृत्त झालो आहे. योग्य कोणते आणि अयोग्य कोणते, याचे तुला ज्ञान असेल तर तू माझा वध करू नकोस. तू सुहृद आहेस.”

महर्षीचे भाषण ऐकून तो चांडाल ताडकन् शय्येवरून उठला आणि विश्वामित्रापुढे जाऊन उभा राहिला. विश्वामित्राबद्दल त्याच्या मनात आदर होता. अश्रू ढाळीत व हात जोडून तो म्हणाला, “हे ब्रह्मनिष्ठ! एवढ्या काळोख्या रात्री आपण काय करू इच्छिता!”

विश्वामित्र : मी अत्यंत भुकेला आहे. माझे प्राण जाऊ पाहत आहेत. म्हणून मी श्वानाची ही जांघ हरण करणार आहे. भुकेच्या पोटी मला हे पापकर्म करावे लागत आहे. भक्ष्याच्या मोहामुळे माझी लज्जा नाहीशी झाली आहे. सारांश, ही क्षुधाच माझ्याकडून हा दोष घडवीत आहे. माझी श्रवणशक्ती नाहीशी झाली, बल नाहीसे झाले आणि बुद्धीचाही नाश झाला. त्यामुळे मला भक्ष्य आणि अभक्ष्य यांचा विचार राहिला नाही. म्हणूनच चोरी करणे हा अधर्म आहे, हे मला कळत असूनही श्वानाची तंगडी हरण करीत आहे. मी प्रथम तुमच्या वस्तीतून भिक्षा मागत फिरलो, पण कोणीही भिक्षा घातली नाही. तेव्हा हे पाप करण्याचे माझ्या मनात आले. अशा वेळी जे मिळेल ते ग्रहण करणे हे धर्मदृष्ट्या योग्य आहे असे तू समज.

चांडाल : महर्षि, माझे थोडे ऐका आणि ज्या योगाने धर्महानी होणार नाही तेच करा. मी आपणाला धर्म सांगतो तो ऐका. चांडालाची वस्तु आणि तीही अभक्ष्य. ती हरण करणे धर्मदृष्टया निंद्य आहे. त्यातही श्वानाची तंगडी ही एक अत्यंत निकृष्ट प्रतीची वस्तु आहे. तेव्हा तुम्ही स्वीकारलेला मार्ग योग्य नाही. तो सोडून द्या आणि प्राणसंरक्षणाचा दुसरा एखादा मार्ग स्वीकारा. मांसाच्या लोभामुळे आपल्या तपश्चर्येचे तेज नष्ट होईल. आपल्यासारख्या ज्ञानसंपन्न माणसाने धर्माचे आचरण केले पाहिजे, आपण धर्मश्रेष्ठ आहात तेव्हा असा धर्मत्याग करू नका.

विश्वामित्र : मी उपाशी आहे आणि जीव वाचविण्याचा दुसरा मार्ग मला सुचत नाही. अशा प्रसंगी जो मार्ग सापडेल त्याचा अवलंब करून मनुष्याने आपले प्राण वाचवावे व सामर्थ्य आल्यानंतर धर्माचे आचरण करावे. वेदरूपी अग्नी हेच माझे सामर्थ्य आहे. अर्थात त्याच्या साहाय्याने मला या पापाचा नाश करता येईल. पण त्यासाठी प्रथम क्षुधा थांबविण्यासाठी जे जे करणे शक्य आहे, ते उपेक्षा न करता मी करीन. कारण मरणापेक्षा जिवंत राहणे अधिक श्रेयस्कर आहे. प्राण वाचला तरच धर्म संपादन करता येईल. जिवंत राहण्याच्या इच्छेने मी बुद्धिपुरस्सर हा मार्ग स्वीकारला आहे. याला तू अनुमती दे. नंतर मी तपश्चर्या आणि विद्या यांच्या साहाय्याने सर्व पातकांचा नाश करीन. प्रकाशाने महाभयंकर अंधारही तत्काळ नष्ट होतो.

चांडाल : हे मांस भक्षण केल्याने आयुष्य वाढणार नाही, बलप्राप्ती होणार नाही आणि मनाची तृप्तीही होणार नाही. म्हणून आपण हा मोह आवरा. श्वान भक्षण करणे ब्राह्मणाला योग्य नाही व क्षत्रियालाही योग्य नाही. आपण कोणती तरी दुसरी इच्छा सांगा.

विश्वामित्र : अशा दुर्भिक्षामध्ये दुसरे मांस मिळणे शक्य नाही. माझ्या जवळ द्रव्यही नाही. मी क्षुधाक्रांत झालो आहे. निराश आणि निरुपाय झालो आहे. म्हणूनच या कुत्र्याच्या जांघेत उत्कृष्ट रसपूर्ण मांस आहे असे मला वाटते.

चांडाल : पण अजूनही आपण अधर्म स्वीकारीत आहा असे मला वाटते.

विश्वामित्र : पूर्वी अगस्त्य मुनीने क्षुधाक्रांत असता वातापी नावाचा राक्षसही भक्षण केला होता. त्याचप्रमाणे मी या आपत्तीत श्वानाचे मांस खाणार!

चांडाल : हे कृत्य करणे आपणाला योग्य नाही. एवढ्यावरही तसे योग्य वाटत असेल तर ही कुत्र्याची तंगडी घेऊन खुशाल जा. पण हा धर्म नव्हे एवढे मात्र खास.

विश्वामित्र : चांडाला, धर्म आणि अधर्म हे कोण ठरवितो? ते ठरविण्याचे साधन समाजातील शिष्ट लोकच असतात. मीही त्यांचाच मार्ग अनुसरत आहे. क्षुधेच्या काळी हेच करणे योग्य आहे असे मला वाटते.

चांडाल : असज्जनांनी जो मार्ग स्वीकारला असेल तो काही सनातन मार्ग होऊ शकत नाही. प्रसंग कसाही असो आणि काळ कितीही खडतर येवो, दुष्कर्म करणे कधीच समर्थनीय ठरत नाही. म्हणून कोणत्याही मिषाने असो आपण हा मार्ग पत्करू नये.

विश्वामित्र : खरे पाहता, ऋषि पातक करू शकत नाहीत. शिवाय पशुत्वाच्या दृष्टीने पाहिले तर श्वान आणि मृग यात तरी तरतम बाळगण्याची काय गरज असावी? माझ्या दृष्टीने दोन्हींची पातळी एकच.

चांडाल : तुमच्यासारख्या ज्ञानसंपन्नाला मी अधिक काय सांगणार? जीविताचा त्याग झाला तरी तो खुशाल होऊ द्यावा, पण अभक्ष्य भक्षण करावयाचे मनात येऊ नये असे मला वाटते. तेव्हा भुकेलेल्या अवस्थेत तुम्ही प्राण सोडा. पण असले दुष्कर्म मात्र करू नका.

विश्वामित्र : मृत्यूच येणार तर तो अभक्ष्य भक्षण न करता येणे अधिक श्रेयस्कर. पण जिवंत स्थितीत असता उपाशी राहण्याने मात्र धर्मलोप होईल. शिवाय तुझ्या म्हणण्याप्रमाणे या घटनेने पाप होतच असेल तर ते नाहीसे करणे केव्हाही शक्य आहे. पण शरीरच नष्ट झाले तर मग कसले पाप आणि कसले पुण्य! उपाशी राहिल्यास ज्ञान नष्ट होईल. आणि तसे होऊ देणे हेच मुळी पापजनक आहे. मन हे अन्नमय आहे. अन्न भक्षण न केल्यास अध्ययन केलेल्या विद्यांचेही स्मरण होत नाही. 

चांडाल : आपल्या म्हणण्याचा आशय मी समजू शकतो. पण आपण केलेले समर्थन मात्र मला पटू शकत नाही.

चांडालाने एवढे निक्षून सांगितल्यावर विश्वामित्राने आपल्या प्रतिपादनाचा रोख बदलला. त्याने आपल्या उच्चाधिकाराचा आश्रय घेऊन चांडालास दमदाटी द्यावयास सुरुवात केली. 

विश्वामित्र : अरे जा! तुझ्या ओरडण्याने मी आपल्या निश्चयापासून मुळीच ढळणार नाही. तुला धर्माविषयी विचार करण्याचा काहीही अधिकार नाही. तू स्वतःची प्रशंसा करू नकोस.

चांडाल : मित्र या नात्याने आपणास उपदेश करीत आहे. मला आपली फार कीव येते. आपणाला माझे म्हणणे श्रेयस्कर वाटले तर ते आपण अवश्य करा. पण केवळ लोभामुळे काही तरी अयोग्य करण्यास तयार होऊ नका.

विश्वामित्र : माझे धर्म कोणते आहेत याची मला चांगली कल्पना आहे तेव्हा ही श्वानाची जांघ सोडून दे. चांडाल : पण तसे केल्याने देणारा मी व घेणारे आपण असे दोघेही दोषी ठरू. 

विश्वामित्र : आज मी हे पापकर्म केले आणि जगलो तर पुढे अधिक पुण्यकारक आचरण करीन. अधिक सत्कर्मे करीन. त्यामुळे माझे अन्तःकरण शुद्ध होऊन मला धर्मप्राप्ती होईल. मग आता तूच सांग पाहू की अभक्ष्य भक्षण करून जगणे श्रेष्ठ की मरणे श्रेष्ठ?

चांडाल : इतक्या थराला गोष्टी गेल्यानंतर मी काय सांगणार? श्वानाचे मांस भक्षण करावयास योग्य आहे असे जो समजतो त्याला या जगात त्याज्य असे काहीही राहिलेले नाही, असे मला वाटते.

विश्वामित्र : जी गोष्ट स्वीकारणे अयोग्य आहे अशा गोष्टीचा अंगीकार करणे आणि जी वस्तू भक्षण करण्यास अयोग्य आहे ती भक्षण करणे यात दोष आहे हे खरे, पण प्राणरक्षणासाठी तो दोष पत्करणेही अपवादभूत आहे. म्हणूनच अशा प्रसंगी केलेली हिंसा ही हिंसा होत नाही. आणि असत्य भाषणही असत्य ठरत नाही.

चांडाल : प्राणसंरक्षण करणे हाच केवळ आपला एकमेव हेतू असेल तर आपल्याला धर्म समजला नाही असेच म्हटले पाहिजे. 

विश्वामित्र : अशा प्रसंगी अभक्ष्य भक्षण करणे हे महापातक आहे असे मला वाटत नाही. मद्य प्राशन करणारा पतित होतो असे शास्त्र आहे. पण ती केवळ आज्ञा आहे. प्रसंगविशेषी एखादे पातक केले म्हणून त्यापूर्वी केलेल्या धर्माचरणाचा नाश होतो असे नाही.

चांडाल : ठीक आहे तर! मी या पातकांतून मुक्त आहे. मला त्याचा काहीही दोष लागणार नाही. त्याची सर्व जबाबदारी आपणावरच आहे. मला मात्र निश्चित असे वाटते की, अभक्ष्य व तेही निंद्य प्रदेशातून, निंद्य कर्माने आणि निंद्य मनुष्याकडून मिळविल्यास ते सदाचारसंपन्न आणि विद्वान यांना पीडा देते.

चांडाल एवढे बोलला आणि खिन्न होऊन स्तब्ध बसला. त्याच्या मनातील वेदना चेहऱ्यावर स्पष्ट उमटल्या होत्या.

आणि त्याच वेळी महान बुद्धिसंपन्न आणि सामर्थ्यशाली पण भुकेने पिडलेल्या त्या महर्षी विश्वामित्राने श्वानाची जांघ हरण केली आणि तो तडक तेथून निघून गेला.

- स. मा. गर्गे

Tags: शांतिपर्व साधना प्रकाशन महाभारत भीष्म युधिष्ठीर Load More Tags

Add Comment