अमात्य

शांतिपर्वातील कथा : 6

“प्रथम तू क्रमाक्रमाने अमात्यांचे एक एक अधिकार काढून घे. त्यामुळे आपोआपच त्यांचे सामर्थ्य कमी होत जाईल. यानंतर त्यांच्याकडून एखादा मोठा अपराध घडला म्हणजे त्यांपैकी एकेकाला वेगळे करून नष्ट करून टाक. सर्वांना एकदम नष्ट करून टाकण्याची मात्र उतावळी करू नको. या गोष्टी तू अतिशय सावधपणे पण काहीशा कठोरपणे केल्यास तर हळूहळू कारस्थाने तर उघडकीस येतीलच पण त्याबरोबर तुझे सामर्थ्यही वाढू लागेल. राजाने सर्वांत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे खरा विश्वासू कोण आणि विश्वासाचे ढोंग करणारा कोण, हे त्याला ओळखता आले पाहिजे.”

राजाचा कोष रिता झाला, की त्याची सत्ता संपली असे समजायला हरकत नाही. सैन्यबल, द्रव्यचल आणि बुद्धिबल ही राजाची तीन महान सामर्थ्ये असतात. त्यांपैकी शत्रूचे हेर सैन्याला पोखरीत असतात. हलक्या बुद्धीचे लोक राजाची बुद्धी पोखरीत असतात आणि अमात्यवर्ग राजाचे द्रव्यबल नष्ट करीत असतो. अशा अमात्यांपासून कसे सावध राहावयाचे यासंबंधी भीष्माचार्यांनी एक सुंदर कथा सांगितली आहे.

त्या वेळी राजा क्षेमदर्शी कोसल देशाचा अधिपती होता. एके दिवशी एक श्रेष्ठ मुनी त्याच्याकडे आला. कालकवृक्षीय त्याचं नाव. सत्यवक्ता आणि स्पष्टवक्ता म्हणून सर्वत्र त्याची ख्याती होती. राज्यात कोठे काय चालले आहे हे समजून घेण्याची त्याची तीव्र इच्छा असे. राजा कसा वागतो, त्याचे अमात्य राजकारणाची सूत्रे कशी हलवितात, राजाचा सेवकवर्ग किती निष्ठेने कार्य करतो, सैन्याचे सामर्थ्य कसे आहे इत्यादी अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी तो मुनी देशभर संचार करीत असे. पण या बातम्या त्याला कशा समजावयाच्या? त्याच्याजवळ एक सुंदर साधन होते. एका पिंजऱ्यात त्याने एक काकपक्षी धरून ठेवलेला होता. मुनीला काकविद्या अवगत होती. तो काक त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान सांगत असे. राज्यातील सर्व लोकांची, अधिकाऱ्यांची आणि अमात्यांची दुष्कृत्ये त्याला समजू लागली. अमात्य द्रव्याचा अपहार करीत असलेले त्याला दिसले. राजकर्मावर नियुक्त केलेले अधिकारी राजाचा कोष पोखरीत असलेले दिसले. मुनीला हे पाहवले नाही. राजाला या सर्व प्रकारांची जाणीव करून द्यावी अशी त्याची इच्छा होती. स्वार्थी सेवकांच्या लीला राजाला समजल्या पाहिजेत असे त्याला वाटत होते.

एके दिवशी तो मुनी राजदरबारात गेला. ‘मी सर्वज्ञ आहे’, अशी घोषणा करीत त्याने दरबारात प्रवेश मिळविला. त्याला त्रिकाल ज्ञानाचे सामर्थ्य देणारा काकही त्याच्याबरोबर होता.

दरबारात पोहोचल्याबरोबर त्या मुनीने प्रथम राजदर्शन घेतले आणि नंतर सभोवती बसलेल्या दरबारी मंडळीकडे दृष्टिक्षेप टाकला. कोण कोणते दुष्कृत्य करतो याचे त्याला ज्ञान होते. मौल्यवान अलंकार घातलेला मुख्य अमात्य त्याने पाहिला आणि त्याला सांगितले, “अरे, तू राजकोषाचा अपहार केला आहेस आणि ही गोष्ट अमुक अमुक मनुष्याला माहीत आहे. तरी या गोष्टीचा तू विचार कर.”

मुनीचे भाषण ऐकून अमात्य संतप्त झाला. त्याने रुष्ट होऊन मुनीकडे पाहिले. त्याची ती क्रुद्ध दृष्टी पाहून मुनी म्हणाला, “अमात्या, संतापू नकोस. मी जे काही बोललो ते सत्य आहे. माझा काक काहीही असत्य सांगणार नाही. त्याला सर्वांची रहस्ये समजतात. कोणी कितीही गुप्तपणे कृत्य करो, ते त्याला समजल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत माझा काक कधीही असत्य बोलला नाही.”

एवढे बोलूनच मुनी थांबला नाही. इतर श्रेष्ठ मंत्र्यांकडे पाहूनही त्याने स्पष्टपणे आपले विचार बोलून दाखविले, “राजाच्या कोषाचा तुम्ही सगळे अपहार करीत आहात,” असे त्याने बजावले. खरे असले तरी अप्रिय गोष्ट कोणाला आवडेल? प्रत्यक्ष राजदरबारात आणि राजासमोर झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. आपल्या गुप्त रहस्यांवर अशा प्रकारे यःकश्चित एका मुनीने एवढा झगझगीत प्रकाश टाकावा हे त्यांना रुचले नाही. राजकोषाचा अपहार ते करीत होते ही गोष्ट निश्चित. पण म्हणून का ते भर दरबारात सांगावयाचे?

ज्यांचे हात त्या दुष्कृत्यात बुडालेले होते, ते सर्व चडफडू लागले. सूड घेण्याची भावना त्यांच्या मनात झपाट्याने वाढत गेली. काय करावे याचा ते विचार करू लागले. इतर वेळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले, किंबहुना परस्परांचे शत्रू असलेले ते श्रेष्ठ राजसेवक संघटित झाले. कसेही करून त्या 'दुष्ट' कावळ्याला उपद्रव करावयाचे त्यांनी ठरविले.

मुनी राजासमोर जे काही सांगावयाचे ते सांगून लगेच दरबारातून निघून गेला. त्याच्या त्या त्रिकाल काकपक्ष्याचा पिंजराही बरोबर होता.

आता काय करावयाचे? अमात्य आणि इतर राजसेवक विचार करू लागले. एकाच्या डोक्यातून शक्कल निघाली आणि ती सर्वांना पसंत पडली. रात्रीची वेळ होती. मुनी त्या वेळी गाढ झोपी गेला होता. जवळच काकपक्ष्याचा पिंजरा होता. अमात्यांनी त्या पक्ष्यावर बाण सोडले. पक्षी बाणाने विद्ध झाला. अमात्यांचे काम संपले. ज्या पक्ष्याच्या सांगण्यावरून मुनीने राजदरबारात अमात्यांचा अपमान केला होता, त्या काकपक्ष्याचे अस्तित्वच त्यांनी संपविले.

दुसरे दिवशी मुनी सकाळीच जागा झाला. प्रथम त्याची दृष्टी काक पक्ष्याच्या पिंजऱ्यावर गेली. त्याला ते दृश्य पाहून अतिशय वेदना झाल्या. आपला त्रिकालज्ञ मित्र पिंजऱ्यामध्ये बाणांच्या तीक्ष्ण टोकांनी विदीर्ण झाल्याचे पाहून मुनीला कमालीचे दुःख झाले. काय प्रकार घडला आणि त्यामागे कोणाचा हात असावा याची त्याला चांगली कल्पना आली. तो तसाच उठला व त्याने राजाची भेट घेतली.

मुनी म्हणाला, “राजा, तुझी आज्ञा असेल तर तुला चार हिताच्या गोष्टी सांगतो.”

“मुनिराज! त्यासाठी माझी आज्ञा कशाला हवी? आपण अवश्य सांगा. माझ्या हिताची आपण एवढी काळजी घेत आहात हे पाहून मला कितीतरी समाधान वाटत आहे. तेव्हा आपण अवश्य सांगा.”

“पण त्यासाठी माझी एक अट आहे.”
“काय आहे आपली अट?”
“मला अभय पाहिजे.”
“एवढेच ना! मी आपल्याला आश्वासन देतो. आपल्याला काहीही इजा पोहोचणार नाही.”
“राजा, तुझा विजय असो. पण मला अद्यापि भीती वाटते. काही गोष्टी सत्य असल्या तरी अप्रिय असण्याचा संभव असतो आणि त्यामुळे त्या न आवडून कोणी रागावू नये अशी माझी अपेक्षा आहे.”
“आपण काहीही चिंता करू नका. हे ब्रह्मश्रेष्ठा, आपणाला वाटेल ते बोला. माझ्या हिताचे असेल ते मी अवश्य स्वीकारीन.”

“तुझ्या राष्ट्रामध्ये दुष्ट कोण आहेत आणि चांगले कोण आहेत याची माहिती मी मिळविली आहे. तुझे हितकर्ते कोण आहेत आणि तुझा नाश करण्यासाठी कोण टपलेले आहेत याचे मला चांगले ज्ञान आहे. तुला कोणाकडून धोका पोहोचण्याची भीती आहे याचीही मला चांगली कल्पना आहे आणि ही सर्व माहिती तुला सांगण्यासाठीच मी येथे आलो आहे.

हे राजा, सेवा करणे हा दोष आहे असे आचार्यांनी पूर्वीच सांगितले आहे. राजाची सेवा करणे हे तर पाप असून जे केवळ अगतिक असतात त्यांचीच ती गती आहे. राजाशी मैत्री ठेवणेही फार धोक्याचे असते. ‘अशी मैत्री म्हणजे केवळ विषारी सर्पांशीच मैत्री’, असे म्हणतात. राजाला पुष्कळ शत्रू असतात आणि अनेक मित्रही असतात. त्याच्या आश्रयाने उपजीविका करणाऱ्यांना त्या सर्वांपासूनच भीती असते. एवढेच नव्हे, तर त्यांना राजाकडूनही भीती असते. म्हणूनच राजाची सेवा करणे महान कठीण कर्म आहे असे म्हटले जाते. तो प्रसन्न ठेवला तर देवतेप्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण करतो आणि तो क्रुद्ध झाला तर अग्नीप्रमाणे समूळ दग्ध करून टाकतो. 

राजा, तू आपले हितकर्ते कोण आणि शत्रू कोण याविषयीचे संपादन कर. तुझ्या द्रव्याचा अपहार करण्याविषयी तत्पर असणारे जे कोणी आहेत, त्यांनीच माझ्या कावळ्याचा वध करून आपले वैर साधले. तुझा विनाश व्हावा आणि नंतर आपणाला राज्य मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचे कार्य तुझ्या सेवक मंडळींशी स्नेह केल्यानेच साध्य होईल तेव्हा अशा स्थितीत येथे राहणे माझ्या जीवितास धोक्याचे वाटते. कारण या राज्यात तुलाही विश्वास ठेवता येणे शक्य नाही; मग मला कसे शक्य आहे? सत्कृत्य आणि दुष्कृत्य या दोन्हींची योग्यता तुझ्या राज्यात सारखीच आहे. म्हणूनच सुज्ञ मनुष्याने येथे वास्तव्य करणे योग्य ठरणार नाही.

तू विषारी सर्पाने वेढलेल्या विहिरीसारखा झाला आहेस. अनेक श्वान, गिधाडे आणि कोल्हे यांच्या वर्तुळात सापडलेल्या राजहंसाप्रमाणे तुझी अवस्था झाली आहे. लवकर पेट घेणाऱ्या गवताच्या योगाने भयंकर दावाग्नी भडकावा आणि त्यातच चांगल्या बहरलेल्या वृक्षाची आहुती पडावी, तशी तुझी गत होण्याचा मला संभव वाटतो. तुझे राज्य म्हणजे अनेक निरपराध प्राण्यांचा वध करण्यासाठी पसरलेले एक मोठेच जाळे बनलेले आहे. बरे-वाईट पशुपक्षी त्यात केव्हा सापडतील याचा नेम राहिलेला नाही. आणि या सर्वांचे कारण म्हणजे तू ज्यांना अत्यंत विश्वासू समजतोस, ते तुझे अमात्यच होत. ते तुझ्याशी प्रतारणा करतात. पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही. एका अर्थाने तुझ्या निवासस्थानात अनेक सर्प राहत असून त्यांच्या विषारी जिव्हेची तुला कल्पना आलेली नाही.

या सर्व गोष्टींची कल्पना देण्यासाठीच मी तुझ्या राज्यात राहिलो. मला अतिशय सावधपणे राहावे लागले. तुझे हित इच्छिणाऱ्या व्यक्तींचा तुझे अमात्य द्वेष करतात. पण एवढे माहीत असूनही मी तुझ्या येथे राहिलो; ते केवळ तुझ्याभोवती जमलेल्या परिवाराची परीक्षा पाहण्यासाठी. राजा जितेंद्रिय आहे काय? त्याची अमात्य मंडळी त्याच्या आज्ञेप्रमाणे वागतात काय? तुझ्या सेवकांना तू प्रिय आहेस काय? आणि तुला तुझी प्रजा प्रिय आहे काय? हे सर्व मला पडताळून पाहायची इच्छा होती. माझ्या या मुक्कामात दोन्ही प्रकारांचे अनुभव आले आहेत. तुझ्या सदाचरणाविषयी माझी खात्री पटली. पण त्याचबरोबर तुझ्या अमात्यांचे स्वार्थी वर्तनही मला पाहावयास मिळाले. मी तुझ्यावर लुब्ध झालो आहे. यामुळेच तुझे स्वार्थी सेवक माझा द्रोह करू लागले. म्हणूनच मी यापुढे इथे राहणे योग्य नाही. जखमी झालेल्या सर्पाची ज्याप्रमाणे भीती बाळगावी लागते, त्याचप्रमाणे सूडबुध्दीने व्यथित झालेल्या अंतःकरणाचीही भीती बाळगावी लागते. ते केव्हा उलटेल याचा नेम नसतो. म्हणून आता मी निघून जाणार.”

राजा म्हणाला, “ब्राह्मणश्रेष्ठा, तू निघून जाण्याचा विचार सोडून दे आणि माझ्या राजमंदिरात येऊन राहा. तुझा द्रोह करणाऱ्यांचा मी त्याग करीन. तुझा बहुमान करावयाची माझी इच्छा आहे. माझ्या हातून राज्याचे शासनकार्य कसे चालेल, याचे मला मार्गदर्शन कर. मी कोणत्या साधनांचा उपयोग करू म्हणजे माझ्या अमात्यांचे कारस्थान उघड होईल आणि माझे सामर्थ्य वाढू लागेल?”

मुनी म्हणाला, “त्यासाठी प्रथम तू क्रमाक्रमाने अमात्यांचे एक एक अधिकार काढून घे. त्यामुळे आपोआपच त्यांचे सामर्थ्य कमी होत जाईल. यानंतर त्यांच्याकडून एखादा मोठा अपराध घडला म्हणजे त्यांपैकी एकेकाला वेगळे करून नष्ट करून टाक. सर्वांना एकदम नष्ट करून टाकण्याची मात्र उतावळी करू नको. या गोष्टी तू अतिशय सावधपणे पण काहीशा कठोरपणे केल्यास तर हळूहळू कारस्थाने तर उघडकीस येतीलच पण त्याबरोबर तुझे सामर्थ्यही वाढू लागेल. राजाने सर्वांत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे खरा विश्वासू कोण आणि विश्वासाचे ढोंग करणारा कोण, हे त्याला ओळखता आले पाहिजे.”

- स. मा. गर्गे

Tags: राजकारण अमात्य पंतप्रधान स. मा. गर्गे रूपक कथा भीष्म अर्जुन युधिष्ठीर Load More Tags

Add Comment