राजसेवक

शांतिपर्वातील कथा : 8

"गोमायूची तुला नीट पारख झाली नाही, म्हणून तू त्याच्यावर चोरीचा आरोप करीत आहेस. मला मात्र या सर्व प्रकारामागे काही तरी कारस्थान असावे असे वाटते. वाईट लोक मत्सरामुळे भल्यांना दोष देतात. लोभी लोकांना शुद्ध आचरण आवडत नाही. मूर्खांना शहाणे आणि दरिद्र्यांना श्रीमान् आवडत नाहीत. कुरूप सुंदरांचा आणि मूर्ख पंडितांचा द्वेष करीत असतात. गोमायूवर आळ घेण्यापूर्वी तू या गोष्टीचा विचार केला नाहीस. असभ्य लोकही सभ्यासारखे दिसतात आणि सभ्यही दिसण्यात असभ्यासारखे असतात. आकाशाला तळ आहे असे दिसते आणि काजवा अग्नीच्या ठिणगीप्रमाणे भासतो; पण वस्तुत: आकाशाला तळ नाही आणि काजव्यामध्येही अग्नी नसतो. सत्ताधीशाने दुसऱ्याचा घात करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे."

धर्मराज : पितामह! राजसेवक अनेक असतात. त्यात काही सेवातत्पर तर काही स्वार्थी; काही तोंडपुजे तर काही दुतोंडी. काही राजसेवकांचे वर्तन सकृतदर्शनी अत्यंत नम्र असते, पण पोटात मात्र काही निराळाच कावा असतो. अशा विविध वृत्तींच्या आणि प्रकृतीच्या राजसेवकांची पारख कशी करावयाची हा एक विलक्षण प्रश्न माझ्यापुढे उभा आहे.

भीष्म : तू म्हणतोस तसा प्रश्न अवघड आहे यात शंका नाही. काही दुष्ट लोक सज्जनासारखे दिसतात, तर काही सज्जनांचे बाह्यरूप मनाला अप्रिय वाटण्यासारखे असते. त्यामुळे त्यांच्या अंतरंगाची खरी परीक्षा होणे कठीण असते. राजाला सेवकांच्या साहाय्याने अनेक कार्ये पार पाडावी लागतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक घटना घडवून आणाव्या लागतात. अमात्यापासून गुप्तहेरापर्यंत अनेक अधिकाराच्या जागी काम करणाऱ्या राजसेवकांवर विसंबून राजा कारभाराची सूत्रे चालवीत असतो. त्यातील कोणीही विश्वासघात केला किंवा कपटी वर्तन केले तरी राजाच्या सत्तेला आणि राज्याच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न होण्याची भीती असते. म्हणूनच योग्य राजसेवकांची निवड करणे अतिशय अवघड काम आहे. 

धर्मराज : अशी निवड करण्यात चूक झाली तर किती घोर परिणाम होतात हे मला समजावून घ्यावयाचे आहे. 

भीष्म : या संदर्भात मी तुला एक कथाच सांगतो.

अनेक वर्षांपूर्वी पौरिक नावाचा राजा होऊन गेला. तो वैभवसंपन्न होता. पण तितकाच क्रूरही होता. आपल्या वैभवाच्या सिध्दीसाठी त्याने प्रजेचा अत्यंत छळ केला. पुढे तो निधन पावला आणि कोल्हयाच्या जन्माला गेला. गोमायू त्याचे नाव. त्याला पूर्वजन्माच्या वैभवाची व वर्तनाची आठवण होऊन अतिशय दुःख झाले. त्या गतस्मृतींनी त्याचे मन व्याकुळ होऊ लागले. त्याला पश्चात्ताप झाला आणि तेव्हापासून त्याने आपल्या जीवनाला अगदी निराळे, अगदी नवे वळण देण्याचा मनात निश्चय केला. त्याने मांसाहार सोडला. झाडावरून आपोआप पडणाऱ्या फळावर तो उदरनिर्वाह करू लागला. अहिंसा आणि सत्य याचे पालन करण्याचा त्याने दृढनिश्चय केला. त्याच्या जातीतील इतर प्राण्यांना त्याचे असे शुचिर्भूत वर्तन सहन होईना. त्याचा निश्चय ढळावा म्हणून ते प्रयत्न करू लागले. ते म्हणत असत, “अरे! तू जात्याच मांसाहारी असताना अशी भलतीच व्रतवैकल्ये पाळण्याचा खटाटोप का करीत आहेस? तुझा निवास स्मशानात असताना वर्तन मात्र साधूसारखे ठेवण्याचा अट्टाहास का? तुझा जन्म कोल्ह्याचा. त्याप्रमाणेच तुझे वर्तन झाले पाहिजे. तेव्हा तू आमच्यासारखा हो. हा शुद्धपणा टाकून दे आणि आपले नेहमीचे खाद्य सेवन कर.

गोमायूने आपल्या जातिबांधवांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि मग तो त्यांना म्हणाला, “अरे, माझा जन्म कोठे झाला यावरून माझा मोठेपणा किंवा लहानपणा ठरू शकत नाही. जन्म हे काही कुल ठरविण्याचे प्रमाण होऊ शकत नाही. उच्च कुल किंवा नीच कुल हे प्रत्येकाच्या आचरणावरून ठरविले जाते. शीलानेच एखाद्याचे उच्चत्त्व ठरते. म्हणूनच मी स्मशानात जन्मलो आणि स्मशानातच वास करीत असलो तरी, माझ्या मनाला कधीही असमाधान वाटत नाही.”

गोमायूची अशी वृत्ती त्याच्या सभोवती असलेल्या सर्व प्राण्यांना चांगली माहीत झाली आणि हळूहळू ते त्याच्याविषयी आदर व्यक्त करू लागले. त्या प्रदेशातील एका व्याघ्राला गोमायूची कीर्ती समजली. त्याला वाटले, गोमायूसारखा महामंत्री आपल्याला लाभला तर आपले राज्य आदर्श बनेल. आपल्या मनातील ही इच्छा व्यक्त करण्यासाठी तो व्याघ्र गोमायूकडे गेला. व्याघ्राने गोमायूचा योग्य सत्कार केला आणि त्याला आपला महामंत्री होण्याची विनंती केली.

वनाचा सर्वाधिपती असा तो व्याघ्र आपल्याकडे मुद्दाम येऊन महामंत्री होण्याची विनंती करीत आहे या गोष्टीचा गोमायूला अभिमान वाटला. महापराक्रमी व्याघ्राने एवढे थोर अधिकारपद देऊ केल्याबद्दल त्याने कृतज्ञताही व्यक्त केली.

व्याघ्र : हे सौम्या! तुझा स्वभाव आणि विचार मला आदरणीय वाटतात म्हणूनच मी तुला माझ्या राज्याचा महामंत्री हो असे विनवीत आहे. तू माझ्याबरोबर चल. तुला इष्ट वाटेल त्याच वस्तूचा उपभोग घे. तुझ्या आदर्श आचरणामुळे माझे राज्यही आदर्श होईल आणि राजसेवकांनाही तुझे वर्तन कित्त्यासारखे पुढे ठेवता येईल.

गोमायू : हे मृगराज! माझ्यासंबंधी आपण काढलेले उद्गार म्हणजे आपल्याच थोर मनाचे निदर्शक आहेत. धर्म आणि अर्थ यामध्ये निष्णात असलेल्या अमात्याचा शोध आपण करीत आहात. अमात्यावाचून राजाला आपले आणि राज्याचे संरक्षण करणे कठीण असते. म्हणूनच योग्य अमात्य लाभणे म्हणजे राजाच्या दृष्टीने सद्भाग्यच समजावयाचे. अमात्य दुष्ट असेल तर राज्याला अपाय घडेल. चांगल्या अमात्याची नेमणूक करण्यासाठी चाललेली तुझी धडपड मला समजू शकते. पण या पदावर आरूढ होण्याची माझी मात्र इच्छा नाही. तुझ्या पूर्वीच्या सेवकांशी माझा स्वभाव जुळणार नाही. माझ्या नि:स्पृह वर्तनामुळे त्यांना अडचण वाटू लागेल. ते तुझ्या अंतःकरणात माझ्याविषयी भिन्न भाव उत्पन्न करतील. शिवाय मी कधीही कोणाचा सेवक बनलो नाही. सेवा करावयाचे ज्ञान मला नाही. स्वतंत्रवृत्तीने अरण्यात फिरणे मला अधिक आवडते. राजाच्या आश्रयाला राहणाऱ्या लोकांना किती तरी विधिनिषेध पाळावे लागतात. त्याची मर्जी सांभाळण्यासाठी आपल्या मनाची ठेवण बदलावी लागते. म्हणून मला या सर्व गोष्टी जमतील असे वाटत नाही. निर्भयता, स्वतंत्रवृत्ती आणि सरळपणा या गुणांचा त्याग करण्याची माझी इच्छा नाही, तू इतर कोणाला महामंत्रिपदाच्या जागी नेमणे अधिक चांगले.

व्याघ्र : तुझे सर्व म्हणणे मी ऐकले. म्हणूनच तुझ्यासारख्या व्यक्तीकडे अमात्यपद सोपवावे असा मी निश्चय केला आहे. तू माझ्या विनंतीचा अव्हेर करू नको.

गोमायू : ठीक आहे. तुझी एवढी श्रद्धा आणि आग्रह असेल तर मी हे अधिकारपद स्वीकारतो. पण त्यासाठी प्रथम तू माझ्याशी कसे वागावे यासंबंधी आपला काही करार झाला पाहिजे. माझे हिताचे भाषण तू ऐकले पाहिजेस. तुझ्या दुसऱ्या मंत्र्यांशी मी कधीही मसलत करणार नाही. तुझ्याभोवती असलेल्या गोतावळ्यात एका दृष्टीने मी परका आहे. म्हणून तुझे जुने राजसेवक माझ्यासंबंधी तुला खोटेनाटे सांगतील. ते माझा मत्सर करू लागतील. या सर्व संभाव्य गोष्टींचा तू विचार कर आणि मगच मला अमात्यपद द्यावयाचे किंवा नाही ते ठरव.

व्याघ्र : तू सांगितलेल्या सर्व अटी मला मान्य आहेत. मी त्यांचा पूर्वीच विचार केला आहे.

या संभाषणानंतर गोमायू त्या मृगराजाचा महामंत्री झाला. गोमायूचे वर्तन आणि कारभार व्याघ्राला अतिशय आवडू लागला. तो त्याच्या सल्ल्याने वागू लागला. त्याची प्रशंसा आणि बहुमान करून व्याघ्राने आपली पसंती व्यक्त केली.

पण नेमकी हीच गोष्ट पूर्वीच्या राजसेवकांना अप्रिय वाटू लागली. ते गोमायूचा द्वेष करू लागले. त्यांच्यापैकी काही जण प्रथम मधुर भाषणे करून त्याच्या मनाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करू लागले. धन आणि मन देऊन आपल्या बाजूला त्याला वळवू लागले. आपल्या दुष्कृत्यांमध्ये गोमायूने सहभागी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. ते परद्रव्याचा अपहार करीत असत आणि आपल्या कर्तव्यातही चुकारपणा दाखवीत असत. पण गोमायूने अशा सर्व अयोग्य प्रथा बंद पाडण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे जुन्या राजसेवकांची सर्व कारस्थाने निष्फल ठरू लागली. त्यांच्या कोणत्याही मोहाला बळी न पडण्याची गोमायूने खबरदारी घेतली होती. तो आपल्या वर्तनापासून ढळला नाही. त्याचे शुद्ध आचरण, निःस्वार्थ वृत्ती आणि सचोटी जुन्या राजसेवकांना अधिकच जाचक होऊ लागली. त्या सर्वांनी मिळून गोमायूचा नाश करण्याचे ठरविले.

एके दिवशी मृगाधिपती व्याघ्रासाठी तयार करून ठेवलेले त्याच्या आवडीचे मांस, भोजनगृहातून काढून राजसेवकांनी गोमायूच्या घरात नेऊन ठेवले. व्याघ्र नेहमीप्रमाणे आपल्या भोजनगृहात गेला तेथे त्याला मांस कोठेच दिसेना. ते कोणी तरी चोरून नेले असावे असे त्याला एका राजसेवकाने सुचविले. यावर संतापून व्याघ्र म्हणाला, “तो चोर कोण आहे, त्याला शोधून काढा.” लगेच एक राजसेवक तोंडावर नम्रतेचा भाव आणून म्हणाला, “महाराज, हा चोर कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. आपल्या आवडीचे मांस आपल्याच आवडत्या महामंत्र्याने चोरून नेले आहे.”

व्याघ्र अधिकच संतापला. गोमायूच्या निंदेची ती अपूर्व संधी हेरून जुने राजसेवक म्हणू लागले, “या गोमायूने असाच आमचा छळ चालविला आहे. तो जसा दिसतो तसा नाही. वाणीने धर्मनिष्ठ, पण स्वभावाने मात्र तो दुष्ट आहे. केवळ स्वार्थ साधण्यासाठी त्याने नम्रतेचे ढोंग चालविले आहे. आमचे म्हणणे आपणास विश्वासार्ह वाटत नसेल तर आताच आपण गोमायूच्या लबाडीचा पुरावा आम्ही देतो.” त्या राजसेवकांनी गोमायूच्या घरातून मांस आणून राजापुढे ठेवले. आणि सांगितले, “हा पाहा आपल्या महामंत्र्याचा प्रामाणिकपणा आणि राजनिष्ठा.”

व्याघ्राचा संताप अनावर झाला. गोमायूशी केलेला करार तो विसरला. “गोमायूचा वध करा”, अशी त्याने आज्ञा केली.

सर्व प्रकार एवढ्या थराला पोहोचल्याचे राजमातेला समजल्यावर ती तेथे आली आणि तिने व्याघ्राला चार हिताच्या गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, “गोमायूची तुला नीट पारख झाली नाही, म्हणून तू त्याच्यावर चोरीचा आरोप करीत आहेस. मला मात्र या सर्व प्रकारामागे काही तरी कारस्थान असावे असे वाटते. वाईट लोक मत्सरामुळे भल्यांना दोष देतात. लोभी लोकांना शुद्ध आचरण आवडत नाही. मूर्खांना शहाणे आणि दरिद्र्यांना श्रीमान् आवडत नाहीत. कुरूप सुंदरांचा आणि मूर्ख पंडितांचा द्वेष करीत असतात. गोमायूवर आळ घेण्यापूर्वी तू या गोष्टीचा विचार केला नाहीस. असभ्य लोकही सभ्यासारखे दिसतात आणि सभ्यही दिसण्यात असभ्यासारखे असतात. आकाशाला तळ आहे असे दिसते आणि काजवा अग्नीच्या ठिणगीप्रमाणे भासतो; पण वस्तुत: आकाशाला तळ नाही आणि काजव्यामध्येही अग्नी नसतो. सत्ताधीशाने दुसऱ्याचा घात करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. तू गोमायूला महामंत्री केलेस. त्याच्या प्रभावामुळे मांडलिक राजांमध्ये तुझा लौकिक वाढला. अशा व्यक्तीचा वध करण्यापूर्वी अनेकदा विचार करण्याची गरज आहे.”

मृगराज आणि राजमाता यांचा संवाद चालला असताना गोमायूच्या शत्रुसमुदायातूनच एक पुरुष धिटाईने पुढे आला आणि त्याने गोमायूविरुद्ध रचलेल्या कपटकारस्थानाची साद्यंत माहिती सांगितली.

व्याघ्राला आपली चूक लक्षात आली. त्याने गोमायूचे वर्तन शुद्ध असल्याचे घोषित केले. त्याचा बहुमान केला आणि जुन्या राजसेवकांना शिक्षा करण्याचे ठरविले.

गोमायूच्या मनाचे मात्र समाधान झाले नाही. व्याघ्राच्या चंचल बुद्धीचा त्याने धिक्कार केला. यापुढे अधिकारपदावर राहावयाचे नाही असे ठरवून तो परत आपल्या निवासस्थानाकडे निघाला. व्याघ्राने पुष्कळ आग्रह केला तरी गोमायू आपल्या निश्चयापासून ढळला नाही.

गोमायू म्हणाला, “राजा तू माझा पूर्वी बहुमान केलास आणि नंतर अपमानही केलास. मला दुसऱ्याच्या निंदेस पात्रही केलेस. अशा स्थितीत मी यापुढे या ठिकाणी राहणे योग्य नाही. तुझ्याभोवती जे राजसेवक आहेत त्यांची तुला परीक्षा झालेली नाही. भ्रष्टाचारी, सन्मानाला हपापलेले, द्रव्याचा अपहार करणारे, अत्यंत लोभी, क्रुद्ध, लोकनिंदेला पात्र ठरलेले, प्रतारणा करणारे असे अनेक राजसेवक तुझ्याभोवती गर्दी करून उभे आहेत. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आणि आपला करार मोडून तू माझा अपमान केलास. माझ्यावर अविश्वास दाखविलास. मलाही तुझ्या या चंचल वर्तनाची भीती वाटू लागली. थोडक्यात, तू शंकित, मी भयभीत आणि इतर राजसेवक असंतुष्ट अशी आहे एकंदर अवस्था. आपल्या विश्वासाचा भंग झाला आहे. एकदा ज्याचा भंग झाला ते पुन्हा जोडण्यास फार प्रयास पडतात. आपल्या व परकीयांच्या हिताकडे न पाहता केवळ राजाचेच हित पाहणारा सेवक एखादाच. स्वकार्याची अपेक्षा करणारे आणि स्वार्थ साधू इच्छिणारेच अधिक. त्यांची पारख झाली नाही तर राजाची सुरक्षितता कशी टिकणार! माझ्यापुरतेच सांगावयाचे तर, चंचल वृत्तीच्या राजाचा सहवास जीवघेणा ठरण्याचा संभव असतो हे माझ्या अनुभवाला आले आहे. कितीही सामर्थ्यसंपन्न आणि निर्भय राजसेवक असला तरी, अशा राजाच्या सेवाकार्यात त्याचा निभाव लागणार नाही. म्हणूनच मी अधिकाराचा त्याग करून वनात जावयाचे ठरविले आहे.”

राजाने गोमायूची अनेक प्रकारे मनधरणी केली. पण तिचा काही उपयोग झाला नाही.

गोमायू वनात निघून गेला. राज्याचा कारभार पूर्वी होता तसाच पुढे चालू राहिला.

- स. मा. गर्गे

Tags: राजकारण समाजशास्त्र राजा वाघ कोल्हा महाभारत भीष्म युधिष्ठीर राजकीय Load More Tags

Add Comment