राजा 

शांतिपर्वातील कथा : 2

राष्ट्राला कोणी तरी नियंता असलाच पाहिजे, म्हणून राजाची प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे - नव्हे- राष्ट्राचे ते एक मुख्य कर्तव्य आहे. राष्ट्राला नियंता नसेल तर ते राष्ट्र दुर्बल बनेल. सर्व बाजूंनी त्याला शत्रू वेढतील. तेथे धर्म टिकणार नाही. प्रजा आपसात भांडू लागेल. सर्वत्र अराजक माजेल. अशी अराजकाची अवस्था अत्यंत वाईट. अराजकापेक्षा परकीय राजा परवडला. अराजक राष्ट्रामध्ये जीवन कंठणे अशक्य असते.

धर्मराज : पितामह! मी गोंधळून गेलो आहे. युद्धाची भीषणता मला सतत भेडसावीत आहे. माझे मन शांतपणे विचार करू शकत नाही. रणक्षेत्रावरील युद्ध जिंकले, पण मनात उद्भवलेले भावनांचे तुंबळ युद्ध जिंकणे अशक्य झाले आहे. डोळ्यांपुढे अंधार दिसत आहे. धर्म-अधर्माचा विवेक करता येत नाही. बुद्धी निराधार बनली आहे. राजधर्माची प्राथमिक तत्त्वेही मला सुचत नाहीत. राजा हा शब्द कसा प्रचारात आला? त्याची महती का व कशी वाढली? सामान्य माणसाप्रमाणेच दिसणाऱ्या राजाला लोक आदर का दाखवितात? राजाचे बाहू आणि बुद्धी इतर माणसांच्या बाहू आणि बुद्धीप्रमाणेच असताना त्याचे वर्चस्व अनेक शूर आणि बुद्धीसंपन्न माणसांवर का असावे? तो प्रसन्न असला की लोकही प्रसन्न असतात आणि तो चिंताग्रस्त बनला की लोकांच्या मनातही चिंतांचे डोंगर उभे राहतात. राजाचे एवढे महत्त्व कशासाठी मानावयाचे? राजाच्या अस्तित्वाचे आणि सामर्थ्याचे रहस्य मला सापडत नाही. राजाची उत्पत्ती कशी झाली, त्याचे कर्तव्य काय, राजाशिवाय समाज जगू शकत नाही की काय? अशा एक ना दोन अनेक शंकांनी माझ्या मनात गोंधळ उत्पन्न केला आहे.

भीष्म : धर्मा, तू मला अनेक प्रश्न विचारले आहेस. राजा आणि राजधर्म, दंड आणि दंडनीती या सर्वांचा इतिहास तुला समजावून घ्यावयाचा आहे. पण त्यासाठी तुला प्रथम शांतचित्त झाले पाहिजे. भावनांच्या आहारी गेलेल्या मनुष्याचा विवेक सुटतो आणि विवेक सुटला की ज्ञानसाधना अशक्य होते. तुझे मन गोंधळून गेले आहे. राजधर्म की वानप्रस्थ असा विकल्प तुझ्या मनात उद्भवला आहे. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी तुझा बुद्धीभेद होत आहे. प्रथम तू प्रक्षुब्ध भावनांना आवर घाल आणि एक महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेव. वनात जाऊन धर्मपालन करणाऱ्यापेक्षा राज्य करून प्रजापालनाचे कर्तव्य करणारा शंभरपट श्रेष्ठ असतो. कारण सर्व ज्ञानाची उत्पत्तीच मुळी राजधर्मापासून झाली आहे. ज्याप्रमाणे हत्तीच्या पावलांत सर्व प्राण्यांची पावले लीन होतात; त्याप्रमाणे राजधर्मामध्ये सर्व धर्मांचा अंतर्भाव होतो. इतर सर्व धर्मांचे आचरण थोडे व फलही थोडे. पण ज्याचे आचरणही मोठे आणि ज्या पासून कल्याणही मोठे होण्याची शक्यता तो केवळ राजधर्मच आहे. राजाची धर्मशील दंडनीती नष्ट झाली, तर सर्व विद्या रसातळाला जातील. ज्ञानाचे वसतिस्थान अशा सर्व धर्मांचा क्षय होईल.

धर्म : आपल्या या सर्व विवेचनावरून राजाची आवश्यकता का आहे, हे मला तितकेसे स्पष्ट समजले नाही. तसेच कोणत्या विशिष्ट परिस्थितीत तो अस्तित्वात आला हेही लक्षात आले नाही.

भीष्म : राष्ट्राला कोणी तरी नियंता असलाच पाहिजे, म्हणून राजाची प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे - नव्हे- राष्ट्राचे ते एक मुख्य कर्तव्य आहे. राष्ट्राला नियंता नसेल तर ते राष्ट्र दुर्बल बनेल. सर्व बाजूंनी त्याला शत्रू वेढतील. तेथे धर्म टिकणार नाही. प्रजा आपसात भांडू लागेल. सर्वत्र अराजक माजेल. अशी अराजकाची अवस्था अत्यंत वाईट. अराजकापेक्षा परकीय राजा परवडला. अराजक राष्ट्रामध्ये जीवन कंठणे अशक्य असते. ज्या राष्ट्राला राजा नाही, त्या राष्ट्रातील द्रव्य आणि स्त्रिया यांचा अपहार होतो. तेथे पुरुषांना दास केले जाते. सबल दुर्बलांना नष्ट करतात. दुष्ट लोक दुसऱ्यांची वाहने, वस्त्रे, अलंकार हरण करतात. धर्माचे आचरण करणाराला शासन होते. माता, पिता, आचार्य आणि वृद्ध यांचा सन्मान होत नाही. शेतीचा व्यवसाय व व्यापार नष्ट होऊ लागतात. विवाहाचे अस्तित्व नाहीसे होऊ लागते. सुबत्ता नाहीशी होते. गौळीवाडे ओस पडतात. लोक संत्रस्त आणि निराश बनतात. यज्ञमंडप कोसळून पडतात. विद्यालये ओस पडतात. अशा भयग्रस्त अवस्थेत सर्व समाजाचे अस्तित्व धोक्यात येते. राज्यात दुर्भिक्ष माजून लोक वाट फुटेल तिकडे पळायला लागतात. सर्वत्र मत्स्य-न्याय सुरू होतो.

राजाच्या भीतीमुळे प्रजा एकमेकांचे भक्षण करू शकत नाही. लोक आपल्या घरांची दारे सताड उघडी ठेवून निर्भयपणे निद्रा घेऊ शकतात. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालतात. विद्या आणि यज्ञ यांना संरक्षण मिळते. निसर्ग फुलतो आणि प्रजा सुखी होते. म्हणून राजा आणि राजधर्म यांचे अस्तित्व अपरिहार्य आहे. राज्यशकटाचे जू आपल्या मानेवर घेऊन मोठ्या सामर्थ्याने राजा प्रजापालन करू लागतो तेव्हा लोक सुखी असतात. त्याच्या अस्तित्वावरच सर्वांचे अस्तित्व अवलंबून आहे. राजा हा प्रजेचे विशाल, विकसित आणि प्रौढ असे अंतःकरण आहे. प्रजेची प्रगती, प्रतिष्ठा आणि सुखसाधन तोच आहे. अशा राजाची उत्पत्ती कशी झाली हे तू समजून घेतलेस तर तुला राजधर्माविषयी अनेक गोष्टी समजू शकतील.

असा एक कालखंड होता की, ज्या वेळी राज्य नव्हते व राजाही नव्हता, दंड नव्हता आणि दंडास पात्र असा कोणी मनुष्य नव्हता. लोक धर्माच्या साहाय्याने एकमेकांचे संरक्षण करीत असत. राजाची किंवा राज्याची गरजच नव्हती. लोक स्वतंत्र होते, निर्भय होते आणि एकमेकांना साहाय्य करीत होते.

पण ही अवस्था क्रमाक्रमाने नष्ट होत गेली. लोकांच्या मनात स्वार्थ आणि मोह यांनी प्रवेश केला. स्वार्थामुळे इतरांविषयी द्वेष वाटू लागला, आणि मोहामुळे ज्ञानाचा लोप झाला, त्यातूनच धर्मनाशाची बीजे फोफावली. कर्तव्यबुद्धी निघून गेली. दोष आणि निर्दोष यांतील भिन्नता लक्षात येईना. विद्यांचा नाश झाला, यज्ञकार्ये बंद पडली. वृष्टी थांबली. अज्ञान आणि भीती हीच सर्वत्र पसरली. या अवस्थेचा उबग येऊन सर्व लोक एकत्र जमले. त्यांनी आपसात असा नियम केला की, कठोर भाषण करणारा, निर्दयतेने शिक्षा देणारा, दुसऱ्याचे द्रव्य हरण करणारा, परस्त्रीची अभिलाषा धरणारा असा जो कोणी असेल त्याचा त्याग केला पाहिजे. सर्व वर्णांना विश्वास उत्पन्न करण्यासाठी सारखेच नियम करून त्याप्रमाणे लोकांनी वागले पाहिजे.

पण या नियमांचे पालन अनेकांकडून झाले नाही. पुन्हा लोकांचा छळ होऊ लागला. लोकांना आपल्या जीवितरक्षणाची काळजी वाटू लागली. ते चिंताग्रस्त झाले, दुःखी आणि भयभीतही झाले. त्या संकटातून बाहेर कसे पडावे असा त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला. ते सर्वजण ब्रह्मदेवाला शरण गेले आणि म्हणाले, "हे भगवन्! आम्हाला कोणी अधिपती नाही, कोणी नियंता राहिलेला नाही. त्यामुळे आमचा सर्वनाश होत आहे."

"आमचे द्रव्य हरण केले जात आहे."
"आमचे जीवन सुरक्षित नाही."
"आमच्या स्त्रियांची सुरक्षितता राहिली नाही."
"दुःख आणि चिंता यांनी आम्हाला वेढलेले आहे." 
"आम्हाला राजा पाहिजे."
"आम्हाला अधिपती पाहिजे."
"आम्हाला शासनकर्ता पाहिजे."
"तो आमचे पालन करण्यास समर्थ असावा."
"आमच्याकडून त्याचा बहुमान व्हावा अशी त्याची योग्यता असावी." 
"तो शूर असावा."
"तो राजधर्म जाणणारा असावा. "

ब्रह्मदेवाने लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यालाही लोकांच्या मागणीमागील गरज पटली. पण राजा कोणाला करावे, असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. त्याने विचार केला आणि लोकांचे अधिपतित्व स्वीकारण्याची मनूला आज्ञा केली.

परंतु मनूने ती आज्ञा अमान्य केली. अधिपती होणे त्याला पसंत पडले नाही.

मनू म्हणाला, "राज्य करणे म्हणजे पाप आहे असे मला वाटते, आणि त्यातही सदैव असन्मार्गाने वागणाऱ्या मनुष्यांवर राज्य करणे म्हणजे तर महान पाप. मला हे राज्यपद नको."

मनूचे उत्तर ऐकून लोक त्याला म्हणाले, "तू भिऊ नको. राज्यात पाप घडले तर ते त्याच्या कर्त्याला लागेल. तुझ्यावर त्याचा भार पडणार नाही. तुझे द्रव्यभांडार समृद्ध असावे म्हणून आम्ही तुला साहाय्य करू. पन्नास पशूंपैकी एक पशू, सुवर्णाच्या पन्नास भागांपैकी एक भाग आणि धान्याचा दशमांश आम्ही तुला अर्पण करू. कन्यांच्या विवाहांसंबंधी विवाद उत्पन्न झाला तर त्या तुलाच अर्पण करू. शस्त्रांनी सुसज्ज असे राज्यातील प्रमुख लोक तुझ्या आज्ञेप्रमाणे वागतील. शत्रूचा पराभव करण्यासाठी लोकांकडून सैन्य आणि संपत्ती तुला मिळेल. म्हणून हे मनू, तू आमचा राजा हो आणि आमचे संरक्षण कर. तुझा सदैव जय असो.”

मनूने लोकांचे म्हणणे मान्य केले. तो महापराक्रमी वीर मोठे सैन्य घेऊन राज्य करण्यासाठी निघाला. त्याचा सर्वत्र सन्मान होऊ लागला. त्याच्या राज्यात सर्व प्रजा स्वधर्मावर लक्ष ठेवून वागू लागली. पापाचरण करणाऱ्यांना मनूने वठणीवर आणले. प्रजेत सुखसमृद्धी आणि सुरक्षितता निर्माण केली.

लोकांना राजा मिळाला.

- स. मा. गर्गे

Tags: महाभारत राजकारण राजकीय लेख स. मा. गर्गे समाजशास्त्र नेता नागरिक Load More Tags

Add Comment