सत्ता

शांतिपर्वातील कथा : 5 

"तुझ्या मनातील डाव मी ओळखला आहे. तुझी सत्तालालसा माझ्या पूर्णपणे लक्षात आली आहे. तू श्वानापासून शरभापर्यंत चढत्या श्रेणीने सामर्थ्यशाली बनत गेलास. तुझ्याविषयी वाटणाऱ्या स्नेहामुळेच मी तुला प्रत्येक वेळी शक्ती पुरवीत गेलो. वस्तुतः तू यःकश्चित श्वान. चित्त्याच्या आणि वाघाच्या किंवा हत्तीच्या आणि सिंहाच्या श्रेष्ठतर कर्तृत्वाशी तुला कधीतरी बरोबरी करता आली असती काय? पण मी तुला सामर्थ्य दिले आणि प्राणसंकटाशी झुंज देण्याचे बळ पुरविले. पण एवढे झाल्यानंतर आता तुझ्या मनात माझाच वध करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे. कृतघ्नतेची ही परमावधीच म्हटली पाहिजे."

धर्मराज : हे महाज्ञानी पितामह, आपण प्रजापालनासंबंधी केलेले विवेचन मला मान्य आहे तसेच एकट्या राजाला प्रजापालनाची सर्व कार्ये पूर्ण करता येणार नाहीत, असे जे आपण म्हणालात तेही मला पटू शकते. पण ज्यांच्या साहाय्याने ही कार्ये पार पाडावयाची ते कशा प्रकारचे असले पाहिजेत, याविषयी मला काही खूणगाठ समजून घ्यावयाची आहे. राजाच्या सान्निध्यात अनेक भृत्य असतात. पण त्यातील कोणाला गुणसंपन्न समजावयाचे याची मला नीटशी कल्पना आली नाही. कोणत्या प्रकारच्या व कोणत्या कुलात उत्पन्न झालेल्या लोकांना बरोबर घेऊन प्रयाण करावे, हे मला सांगा.

भीष्म : भारता, कोणाचेही साहाय्य न घेता एकट्या राजाला राज्य करता येणे शक्य नाही. त्याला द्रव्य मिळविता येणार नाही आणि मिळविलेल्याचे संरक्षण करता येणार नाही. ज्या राजाचे मंत्री कुलीन, राजाशी एकनिष्ठ, बुद्धिमान, चतुर आणि ज्ञानपारंगत आहेत अशाच राजाला राज्य निर्वेधपणे करता येते. ज्यांच्याकडे कोषाची वृद्धी करण्याची कामगिरी सोपविलेली असते ते विश्वासू आणि सदैव संतुष्ट असले पाहिजेत. द्रव्यलोभाने इतरांस त्यांनी वश होता कामा नये. धान्याच्या कोठाराचे संरक्षण करण्यासाठी असेच लोभशून्य आणि संग्रहतत्पर सेवक नेमलेले असावेत.

धर्म : राजाच्या सत्तेशी स्पर्धा करणारे जे कोणी प्रयत्न करतील, त्यांच्याशी वागताना काही निराळी कुशलता दाखवावी लागेल काय?

भीष्म : होय तर! अशा सत्तास्पध्यांना अतिशय जागरूकपणे कह्यात ठेवले पाहिजे. एकदा सत्ता मिळू लागली, की तिचा लोभ मर्यादेत राहत नाही. लोभाने अतिलोभाची प्रवृत्ती वाढते आणि सत्तेने सत्तामद चढू लागतो. अशा वेळी सत्ता कशी मिळाली याचाही विसर पडत जातो. त्यासंबंधी मी एक प्राचीन कथा सांगतो. तिच्यातील मर्म लक्षात घे.

त्या महामुनींचे वास्तव्य एका घनदाट अरण्यात होते. सामान्य जनांचा त्या ठिकाणी प्रवेश होणे कठीणच.

महामुनी महान तपस्वी, शांतिसंपन्न आणि शुचिर्भूत होते. ते ज्ञानसंपन्न होते, तसेच सर्वबुद्धीही होते. त्यांचा आश्रम म्हणजे अनेक पशुपक्ष्यांचा मेळावाच असे. आश्रमाच्या परिसरात सर्व जातींचे पशु-पक्षी आपले भेदभाव विसरून एकत्र येत. वाघ-सिंहासारखे क्रूर, हत्तीसारखे मदोन्मत्त आणि चित्त्यासारखे रक्तपिपासू प्राणी त्या आश्रमाजवळ आल्यावर आपले क्रौर्य विसरून जात असत. भयानक गेंडे आणि अस्वले यांनाही आपल्या स्वभावातील क्रूरता विसरावयास लावणारी ही भूमी होती. ते सर्वं प्राणी महामुनींच्या चरणाजवळ नत होत. त्यांचे कुशल विचारून आपापल्या निवासस्थानी परत जात.

त्या सर्व प्राण्यांमध्ये एक श्वानही होते. ते मात्र महामुनींचा आश्रम सोडून कोठेही जात नसे. भक्तिवान आणि निष्ठासंपन्न शिष्यासारखी त्याची वागणूक होती. सौजन्य आणि शालीनता याचा जणू मूर्तिमंत आविष्कार त्या श्वानाच्या ठिकाणी झाला आहे असे वाटत असे. ते अहोरात्र महामुनींच्या सान्निध्यात रमून जाई. महामुनींवर त्याची उत्कट भक्ती जडली होती.

एकदा काय झाले, त्या अरण्यात दूरचा कोठला तरी एक रक्तभक्षक चित्ता आला. त्याला तहान लागली होती आणि तो भुकेनेही व्याकुळ झाला होता. त्याने आपला विक्राळ जबडा पसरला, जमिनीवर शेपूट आपटले आणि आपले लालबुंद डोळे श्वानावर रोखून धरले.

चित्त्याचे ते भयंकर डोळे आणि झेप घालून ठार मारण्याचा पवित्र पाहिल्याबरोबर श्वान गर्भगळित झाले. ते थरथर कापू लागले. हा काळ आपल्याला गट्ट करील अशी त्याची खात्री झाली. ते महामुनीला शरण गेले आणि म्हणाले, “महामुनी! माझे रक्षण करा, हा क्रूर चित्ता माझा वध करू इच्छित आहे. त्याच्यापासून मला वाचवा. आपल्या प्रसादाने मी निर्भय होईन असे करा. आपण सर्वज्ञ आहात आणि सर्वसामर्थ्यशालीही आहात, मला या प्राणसंकटातून सोडवा.”

महामुनींनी श्वानाच्या जिवावरचा प्रसंग ओळखला आणि त्याने आतापर्यंत केलेल्या भक्तीची जाणीवही त्यांना झाली. त्यांनी श्वानाला अभय दिले आणि लगेच त्याचे चित्त्यात रूपांतर केले. महामुनी म्हणाले, “हे श्वाना! या चित्त्यापासून तुला मृत्यू येणार नाही. हा पाहा, तुझा श्वानाचा आकार जाऊन तू चित्ता झाला आहेस.” महामुनींनी असे म्हटल्याबरोबर त्या श्वानाची अंगकांती सुवर्णासारखी झाली आणि काळ्या ठिपक्यांनी त्याचे शरीर हुबेहूब चित्त्यासारखे बनले. तेही अरण्यातून आलेल्या चित्त्यासारखे जमिनीवर शेपूट आपटून लालबुंद डोळ्यांनी पाहू लागले. त्याचे ते रूप पाहिल्याबरोबर जबडा पसरून बसलेल्या चित्याने क्षणार्धात तेथून पळ काढला. ते श्वान चित्त्याच्या स्वरूपात वनामध्ये निर्भयपणाने फिरू लागले.

काही दिवसांनंतर एक विक्राळ वाघ तेथे आला. त्याला पाहिल्याबरोबर चित्तारूप श्वानाची पुन्हा गाळण उडाली. क्षुधेमुळे शरीर वाकलेला आणि तीक्ष्ण दाढा असलेला तो वाघ आपले भक्षण करणार या कल्पनेनेच श्वान थरथर कापू लागले. ते धावतच पुन्हा महामुनीला शरण गेले, सहवासामुळे महामुनी श्वानावर अत्यंत प्रेम करीत असत. त्यांनी तोडीस तोड म्हणून त्याला वाघ बनविले. पर-अरण्यातून आलेल्या वाघाने आपल्यासमोर आपल्यासारख्याच बलाढ्य वाघाला पाहिले आणि त्याने मागल्या पावली अरण्याचा रस्ता धरला.

वाघ बनल्यानंतर ते श्वान मांसभक्षण करू लागले. त्याची मूळची सात्त्विकवृत्ती नष्ट झाली. महामुनींच्या सहवासात असताना मांसाला स्पर्श न करणारे श्वान त्यांच्याच प्रसादाने वाघ बनल्यानंतर रक्तपिपासू झाले. अरण्यातील प्राण्यांना भक्षण करण्याची त्याची लालसा वाढतच गेली. ते निर्भयपणे अरण्यात सर्वत्र संचार करू लागले. अरण्यातील पशु-पक्षी भक्षण करावयाचे आणि पुन्हा महामुनींच्या पर्णकुटीजवळ जाऊन विश्रांती घ्यावयाची असा त्याचा नित्यक्रम बनला.

असेच एके दिवशी ते विश्रांती घेत पडले असता प्रचंड मेघाप्रमाणे दिसणारा मस्त हत्ती तेथे आला. त्या मदोन्मत्त हत्तीला पाहताच वाघाची पाचावर धारण बसली. हत्तीचे विशाल मस्तक-पिंड, शुभ्र दात आणि मेघासारखा गडगडाट ऐकून त्या व्याघ्ररूप श्वानाने महामुनींकडे पळ काढला. मुनींनी आपल्या वाघाला प्रचंड हत्ती बनविले. आपल्यासारखाच बलशाली आणि धिप्पाड हत्ती समोर पाहून अरण्यातून आलेल्या हत्तीने निमिषार्धात पलायन केले. हत्तीरूपी श्वानाला अतिशय आनंद झाला. त्याला आपले सामर्थ्य वाढल्याची जाणीव झाली. तो कमलवनात आनंदाने राहू लागला. आश्रमाच्या परिसरात त्याचे असेच अनेक दिवस निघून गेले.

काही काळानंतर त्या ठिकाणी गिरिकंदरांतून महाभयंकर सिंह आला. मानेवर विपुल आयाळ आणि आरक्त डोळे पाहिल्याबरोबर हत्तीरूपी श्वानाची पूर्वीसारखीच अवस्था झाली. पण या खेपेलाही मागच्या प्रसंगाप्रमाणेच महामुनींनी त्याला आशीर्वाद दिला आणि पाहता पाहता हत्ती बनलेल्या त्या श्वानाचे रूपांतर वनराजात झाले. अर्थातच अरण्यातून आलेल्या सिंहाने तेथून पळ काढला.

असाच आणखी एक प्रसंग येऊन सिंह बनलेल्या श्वानाला शरभाशी सामना देण्याची कठीण वेळ आली. सर्व प्राण्यांची हिंसा करणारा, रक्तभक्षक, आठ पाय व ऊर्ध्वदृष्टी असलेला बलाढ्य शरभ महामुनींच्या आश्रमाजवळ आला; शरभाचे ते अक्राळ-विक्राळ रूप आणि प्रचंड गर्जना ऐकून सिंह बनलेल्या श्वानाची गाळणच उडाली. आता तो भयंकर प्राणी आपल्याला जिवंत सोडणार नाही अशी त्याची खात्री झाली. ते पुन्हा महामुनींना शरण गेले. महामुनींनी आपल्या सिंहाला अतिसमर्थ शरभ बनविले. आपल्यासमोर आपल्याएवढाच क्रूर आणि बलाढ्य प्राणी पाहिल्याबरोबर अरण्यवासी शरभ तेथे थांबलाच नाही.

महामुनींच्या कृपेने आणि सामर्थ्याने यःकश्चित श्वान प्रथम चित्ता, नंतर वाघ, हत्ती, सिंह आणि शेवटी अरण्यातील सर्वश्रेष्ठ असे शरभ बनले. पायरी- पायरीने त्याच्या सामर्थ्याची वाढ झाली. त्याचे क्रौर्यही वाढत गेले. त्याची रक्तपिपासा अनिवार बनली. त्याबरोबरच त्याचे मूळ सद्गुण नष्ट होत गेले. सात्त्विक स्वभावाची जागा तामसी वृत्तीने घेतली. विचारांना विकाराचे स्थान मिळाले. किंबहुना, त्याची विचारशक्तीच नष्ट झाली. त्याला वाटू लागले, आपण या सर्व जगात अजिंक्य आहोत. जगातील कोणतीही शक्ती आपली बरोबरी करू शकणार नाही. त्याचा अहंकार बळावला. त्या अहंकाराच्या भरात त्याला आपल्या मूळ स्वभावाचे भान उरले नाही. त्याची क्रूरता वाढत गेली. दुष्टपणाला मर्यादा उरली नाही आणि या सर्वांबरोबरच त्याची कृतज्ञताबुद्धीही नष्ट झाली.

अरण्यात आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही अशी त्याची मनोमन खात्री पटली; पण तेवढ्यात त्याला महामुनींची आठवण झाली. त्यांच्या सामर्थ्याच्या जाणिवेने क्षणभर ते चमकले. पण क्षणभरच! लगेच त्याला महामुनीही आपल्या सामर्थ्यापुढे सामान्य वाटू लागले. त्याने विचार केला, एवढा एक ऋषी संपविला म्हणजे मग आपल्याला कोणीही प्रतिस्पर्धी उरणार नाही. आपणच या विशाल अरण्याचे सर्वाधिकारी बनू. ही कल्पना त्याच्या मनात दिवसेंदिवस बळावत गेली.

एके दिवशी महामुनींच्या आश्रमाशेजारी ते फिरत होते. महामुनींना गट्ट करून टाकण्याचा त्याने बेत केला होता.

महामुनी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी श्वानाची पावले ओळखली. त्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यांच्या लक्षात आली. त्यांनी श्वानाला समोर बोलाविले. त्याच्याकडे दृष्टी रोखून ते म्हणाले, “तुझ्या मनातील डाव मी ओळखला आहे. तुझी सत्तालालसा माझ्या पूर्णपणे लक्षात आली आहे. तू श्वानापासून शरभापर्यंत चढत्या श्रेणीने सामर्थ्यशाली बनत गेलास. तुझ्याविषयी वाटणाऱ्या स्नेहामुळेच मी तुला प्रत्येक वेळी शक्ती पुरवीत गेलो. वस्तुतः तू यःकश्चित श्वान. चित्त्याच्या आणि वाघाच्या किंवा हत्तीच्या आणि सिंहाच्या श्रेष्ठतर कर्तृत्वाशी तुला कधीतरी बरोबरी करता आली असती काय? पण मी तुला सामर्थ्य दिले आणि प्राणसंकटाशी झुंज देण्याचे बळ पुरविले. पण एवढे झाल्यानंतर आता तुझ्या मनात माझाच वध करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे. कृतघ्नतेची ही परमावधीच म्हटली पाहिजे. ज्याच्यापासून सामर्थ्य मिळाले त्या प्रेरक शक्तीलाच नष्ट करण्याची तुझी ही वृत्ती अक्षम्य आहे. ज्या पायऱ्यांवरून तू वर चढत गेलास त्या नष्ट करण्याचे धाडस तुझ्या मनात उद्भवले आहे. आज तुला अरण्याचे नेतृत्व मिळाले आहे; पण ते नेतृत्व मिळण्याची मूळ शक्ती कोणती हे तू पार विसरून गेला आहेस. ज्या शक्तीच्या आशीर्वादाने तू सर्वाधिकारी बनलास, त्या शक्तीलाच भक्षण करण्याचे कृतघ्न विचार तुझ्या मनात शिगेला पोहोचले आहेत. तुझ्या अहंकाराची परमावधी झाली आहे. तुला त्याबद्दल प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. ज्याने तुला शरभ बनविले तो पुन्हा क्षुद्र श्वानाच्या पातळीवर आणून बसवू शकणार नाही असे का तुला वाटते? पण अहंकाराने विकृत झालेल्या तुझ्या बुद्धीला एवढा विचार सुचण्याची शक्यता नाही. तू दुष्ट आहेस, ग्राम्य आहेस, तसेच सत्ताबलाने मत्त होणारा आहेस. कृतघ्ना! तू पुन्हा श्वान होशील!”

महामुनींच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच त्या शरभाचा तत्काळ शक्तिपात झाला आणि तो पूर्वीसारखाच दुबळा श्वान बनला.

- स. मा. गर्गे

Tags: महाभारत युधिष्ठीर भीष्म राजकारण सत्ता सिंहासन Load More Tags

Comments:

डॉ. प्रल्हाद जायभाये

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या फूटीवर केलेले अतिशय मार्मिक आणि समयोचित भाष्य या लेखातून वाचायला मिळते! ग्रेट टाइमिंग!!

उमेश घेवरीकर

मार्मिक...☺️

Add Comment