राजाचे शील

शांतिपर्वातील कथा : 7

"कोणाही प्राण्याचा द्रोह न करणे, दान करणे आणि अनुग्रह करणे हे प्रशंसनीय असे शील होय. ज्याच्या योगाने लज्जा उत्पन्न होईल, असे कोणतेही कर्म करता कामा नये. तर, जनसमुदायामध्ये ज्याच्या योगाने प्रशंसा होईल तेच कर्म करावे. हे नराधिपते, शीलावाचूनही एखाद्या ठिकाणी एखाद्याला संपत्ती मिळते. पण ती संपत्ती चिरकाल उपभोगता येत नाही. एवढेच नव्हे, तर अशा द्रव्याने समूळ नाशच होतो. म्हणूनच मी म्हणते, शील हीच राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, हे चिरंतन लक्षात ठेव."

राजाला सैन्यबल हवे. बुद्धिबलाशिवाय त्याचे चालणार नाही आणि द्रव्यबल तर राज्याचा आधार होय. पण केवळ एवढ्यानेच राजा सर्वसमर्थ होईल काय? पृथ्वीवरील थोर राजांजवळ एवढीच सामर्थ्ये होती काय? की राजाला आणखी काही गुणांची आवश्यकता असते? धर्मराजाच्या मनात असे अनेक प्रश्न उत्पन्न झाले. त्याला त्याची उत्तरे नीटशी सापडेनात. म्हणून त्याने आपली शंका भीष्माचार्यांना बोलून दाखविली. भीष्माचार्य प्रसन्नपणे हसले. जणू काय ते अशा प्रश्नांची अपेक्षाच करीत होते. त्यांना या प्रश्नांची उत्तरे देताना विशेष आनंद झाला असावा असे त्यांच्या सुहास्य मुद्रेवरून स्पष्ट होत होते.

भीष्म : तुझा प्रश्न मूलगामी आहे. किंबहुना सर्व प्रश्नांचा प्रश्न आहे. राजाला अनेक गुण लागतात. विविध गुणांच्या समुच्चयाने त्याचे सामर्थ्य वाढत जाते. प्रजापालनाच्या कार्यात तो दक्ष, धैर्यसंपन्न आणि कार्यनिष्ठ असला पाहिजे. त्याला काळाचा प्रभाव समजला पाहिजे. त्याची धारणा शक्ती असाधारण असावी आणि तो क्षमाशीलही असावा. प्रजेचे हित हेच त्याचे सर्वश्रेष्ठ कार्य. लोकांचे रंजन करणारा म्हणून तर त्याला राजा म्हणायचे. पण या सर्व गुणांच्या मुळाशी एक महान गुण आहे आणि राजाच्या ठिकाणी त्याचा प्रभाव नसेल तर तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ सत्ताधीश म्हणवून घेण्यास पात्रच ठरू शकणार नाही.

धर्म : असा कोणता तो महान गुण आहे ? 

भीष्म : शील! राजा शीलसंपन्न असला पाहिजे. राजाचे शील गेले, की त्याची सर्व सामर्थ्येही सोडून जातात. सत्य, सदाचार, संपत्ती या सर्वांचा मुख्य आधार शील असते. शीलाने त्याग केल्याबरोबर राजा प्रल्हादाची कशी दयनीय अवस्था झाली याचा एक प्रसंग मी तुला सांगतो.

फार प्राचीन काळची कथा आहे. दैत्यकुलोत्पन्न राजा प्रल्हाद अत्यंत शीलसंपन्न होता. त्याने कोणाचाही कधी द्रोह केला नाही. त्याचे दातृत्व तर प्रसिद्धच होते. आपल्या प्रत्येक कृतीने इतरांचे हित झाले पाहिजे अशी त्याची दृष्टी होती. शीलाच्या सामर्थ्यावरच त्याने देवेंद्राचे राज्य काढून घेतले आणि तो त्रैलोक्याचा धनी बनला. इंद्राला इंद्रपद सोडावे लागले. महाज्ञानी इंद्रावर मोठा बिकट प्रसंग ओढवला. तो विचार करू लागला, माझे श्रेष्ठपद प्रल्हादाला कसे प्राप्त झाले, हे समजत नाही. विचार करून त्याची बुद्धी थकली. पण प्रल्हादाच्या विशेष गुणांचा शोध लागला नाही.

तो बृहस्पतीकडे गेला आणि म्हणाला, “जगात सर्वश्रेष्ठ काय आहे, हे जाणण्याची मला इच्छा आहे.” बृहस्पतीने इंद्राला मोक्षप्राप्तीस उययुक्त अशी माहिती सांगितली आणि “हीच काय ती सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे,” असे म्हटले.

पण इंद्राचे तेवढ्याने समाधान झाले नाही. तो पुन्हा म्हणाला, “याहूनही श्रेष्ठ असे काय आहे?”

बृहस्पतीने त्याला शुक्राकडे जाण्याचा सल्ला दिला.

इंद्र शुक्राकडे गेला आणि त्यालाही तोच प्रश्न विचारला. शुक्राने त्याला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून दिली. पण त्यामुळेही इंद्राचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा प्रश्न विचारला, “याहून काही श्रेष्ठ आहे काय?”

शुक्र म्हणाला, “या प्रश्नाचे उत्तर तुला प्रल्हादाकडे मिळेल, तोच तुझे समाधान करू शकेल.”

इंद्राने प्रल्हादाकडे जावयाचे ठरविले, वेष पालटला आणि तो प्रल्हादाकडे गेला. प्रल्हादाने त्या अतिथींचे यथायोग्य आतिथ्य केले आणि विचारले, “हे द्विजश्रेष्ठा, मी आता आपल्या कार्याला लागतो.” इंद्राने त्याला क्षणभर थांबविले आणि विचारले, “राजश्रेष्ठा, मला सर्वश्रेष्ठ असे काय आहे ते समजून घ्यावयाचे आहे. आपणच माझे समाधान करू शकाल.” प्रल्हादाने तत्काळ उत्तर दिले, “त्रैलोक्याचे राज्य करण्यात मी मग्न झालो आहे. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मला मुळीच वेळ नाही.”

अतिथी : आता नसले तरी, तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू मला प्रश्नाचे उत्तर दे.

प्रल्हाद : मग ठीक आहे.

कालांतराने अतिथी इंद्र आणि प्रल्हाद यांची चर्चा झाली. इंद्राने प्रल्हादाला अनेक प्रश्न विचारले आणि प्रल्हादानेही त्याचे समाधान करण्याच्या दृष्टीने उत्तरे दिली.

इंद्राची ज्ञानजिज्ञासा, सेवाबुद्धी आणि विनयसंपन्नता पाहून प्रल्हादाला अत्यानंद झाला. तो प्रसन्न चित्ताने इंद्राला म्हणाला, “हे पांथस्था, तू योग्य प्रकारे गुरुसेवा केली आहेस. त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण असो. तू माझ्याकडून कोणताही वर मागून घे. मी तो अवश्य पूर्ण करीन.”

इंद्र म्हणाला, “मला काही नको.” पण प्रल्हादाने त्याला खूपच आग्रह केला. त्यावर इंद्र म्हणाला, “राजा, तू खरोखर प्रसन्न झाला असशील आणि माझे कल्याण व्हावे अशीच इच्छा असेल तर मला फक्त एकच वर दे. तुझे शील मला मिळावे अशी इच्छा आहे. तेव्हा एवढे वरदान दे.”

प्रल्हादाने “तथास्तु” म्हटले. 

प्रल्हादाने तथास्तु म्हटले खरे, पण नंतर त्याला अतिशय दुःख झाले. प्रल्हाद चिंतामग्न बसला होता. तेवढ्यात एक धिप्पाड तेजस्वी मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने त्या मूर्तीला विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर मूर्तीने उत्तर दिले, “माझे नाव शील. तू माझा त्याग केल्यामुळे मी तुझ्याजवळून निघून जात आहे. ज्या पांथस्थाने तुझी मनोभावे सेवा केली, त्याच्या शरीरात मी प्रवेश करणार आहे.”

एवढे शब्द त्या प्रकाशमूर्तीने उच्चारले आणि लगेच ती अंतर्धान पावली. एक प्रकाशमूर्ती निघून गेली आणि लगेच त्याच्यापाठोपाठ प्रल्हादाच्या शरीरातून आणखी एक पुरुष बाहेर पडला.

प्रल्हाद : तू कोण ?

पुरुष : मी धर्म. जिकडे शील तिकडे मी. शील आणि धर्म एकरूपच असतात.

प्रल्हादाने आपल्या शरीराकडे पाहिले. आणखी एक प्रज्वलित आकृती शरीरांतून बाहेर पडू लागली. त्याने पुन्हा तोच प्रश्न त्या आकृतीला विचारला. प्रकाशाकृतीने उत्तर दिले, “माझे नाव सत्य. मी धर्माचाच अनुयायी असल्यामुळे आज जिकडे धर्म गेला तिकडेच मी जात आहे!”

सत्याच्या पाठोपाठ एक धिप्पाड पुरुष प्रल्हादाचे शरीर सोडून जाऊ लागला. प्रल्हादाने त्यालाही विचारले, “अरे बाबा, तुझे नाव काय? आणि तू मला सोडून का जात आहेस?”

त्याला उत्तर मिळाले, “मला सदाचार म्हणतात. जेथे सत्य तेथे सदाचार.”

सदाचाराच्या प्रयाणापाठोपाठ आणखी एक मूर्ती प्रल्हादाला सोडून जाऊ लागली. तिने आपले नाव सांगितले, ‘बल.’ बलाने सांगितले, “जिकडे सत्य आणि सदाचार तिकडेच माझे वास्तव्य.”

वरीलप्रमाणे चार महापुरुषांनी प्रल्हादाचे शरीर सोडले आणि ते सर्व दूर दूर निघून गेले. प्रल्हाद भयचकित होऊन पुढे काय घडते, याकडे पाहू लागला. तोच त्याच्या शरीरातून एक तेजोमय देवी बाहेर पडली. तिचे सौंदर्य अवर्णनीय होते आणि तिचा प्रकाश दिपवून टाकीत होता. प्रल्हादाने तिला प्रश्न विचारण्यासाठी तोंड उघडले, तोच ती म्हणाली, “मी लक्ष्मी आहे. हे अमोघ पराक्रमी वीरा, मी आपण होऊनच तुझ्या ठिकाणी वास्तव्य करीत होते. पण यापुढे मला तुझ्या सान्निध्यात राहता येणार नाही. बलाने तुला सोडले. मग मी तरी कशी राहणार? अरे, जेथे सामर्थ्य तेथेच संपत्ती.”

प्रल्हाद म्हणाला, “हे कमलवासिनी लक्ष्मी, तू चाललीस तरी कोठे? तू या लोकाची मुख्य अधिदेवता असून सत्यनिष्ठ आहेस. तेव्हा तू मला असे सांग की, ज्या पांथस्थाच्या शरीरात शील, धर्म, सत्य, सदाचार आणि बल यांनी प्रवेश केला आणि आता तुही प्रवेश करीत आहेस, तो आहे तरी कोण? आणि तुम्ही सर्वच त्याच्याकडे का जात आहात?” 

लक्ष्मी : तो पांथस्थ दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष इंद्रच आहे. हे धर्मज्ञा, शीलाच्याच साहाय्याने तू त्रैलोक्य हस्तगत केले होतेस, हे इंद्राला तुझ्याकडूनच समजले. त्याने तुझे शीलहरण केले. ते गेल्याबरोबर त्याचे अनुयायीही त्याच्यामागे निघून गेले. धर्म, सत्य, सदाचार, बल आणि मी या सर्वांचे मूलकारण शील हेच होय.

प्रल्हाद : पण हे शील म्हणजे तरी काय?

लक्ष्मी : कोणाही प्राण्याचा द्रोह न करणे, दान करणे आणि अनुग्रह करणे हे प्रशंसनीय असे शील होय. ज्याच्या योगाने लज्जा उत्पन्न होईल, असे कोणतेही कर्म करता कामा नये. तर, जनसमुदायामध्ये ज्याच्या योगाने प्रशंसा होईल तेच कर्म करावे. हे नराधिपते, शीलावाचूनही एखाद्या ठिकाणी एखाद्याला संपत्ती मिळते. पण ती संपत्ती चिरकाल उपभोगता येत नाही. एवढेच नव्हे, तर अशा द्रव्याने समूळ नाशच होतो. म्हणूनच मी म्हणते, शील हीच राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, हे चिरंतन लक्षात ठेव.

- स. मा. गर्गे

Tags: महाभारत व्यास शांतिपर्व युधिष्ठीर भीष्म राजा प्रल्हाद राजकारण समाजकारण शील Load More Tags

Comments:

Dhakalu Mahadev Davari

खूपच बोधप्रद कथा आहेत. धन्यवाद.

Add Comment