धर्माचा रंग आणि रंगांचा धर्म!

धर्माच्या आधारे केल्या जाणाऱ्या रंगांच्या विभागणीला विरोध व्हायला हवा

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून विधान केले की, 'हा देश कायम भगवाच राहील, कधीही हिरवा होणार नाही.' कदाचित स्पष्ट बोलण्याचं धाडस नसेल; पण सामान्यतः त्यातून जो अर्थ ध्वनित होतो तो असा, की भारत कायमच हिंदूंचा राहील, मुस्लिमांचा होणार नाही. मी काढलेला हा अर्थ चुकीचा असेल तर प्रथम माफी मागतो. पण जर तो तसाच असेल तर मात्र; एका ज्येष्ठ रंगकर्मीने अशा क्षुल्लक बाबीमध्ये नैसर्गिक रंग वाटून टाकले किंवा अशा कल्पनेला समर्थन दिले हे मनाला खटकते. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. निसर्गभ्रमंती, गिर्यारोहण हा माझा छंद आहे. या दोन्ही पटलांवर रंग, त्याच्या छटा हा माझ्यासाठी सर्व संवेदना जाग्या ठेवून अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळं अशी श्रद्धेच्या किंवा भावनेच्या आहारी जाऊन रंगांची विभागणी करणं किंवा सूची तयार करणं मान्य नाही. त्याला किमान विरोध व्हायला पाहिजे. त्यासाठी हे तर्कट...

स्थिरावलेल्या किंवा संस्कारित मानवाचा इतिहास 10 हजार वर्षांपेक्षा जास्त जुना नाही; त्यांनतरचा तो धर्म. या धर्मांचा इतिहासपण सोळाशे ते चार हजार वर्षे यादरम्यानच आहे. तोही फार जुना नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की निसर्गाचा, त्यातील रंगांच्या उधळणीचा इतिहास काही कोटी वर्षांचा असताना; त्या तुलनेत मानवाचा इतिहास फक्त काही लाख वर्षांचा असताना, हा रंग अमुक धर्माचा, तो रंग त्या धर्माचा- हे वाटप करण्याचा अधिकार आधुनिक मानवाला कुणी दिला? आज अशी परीस्थिती आहे की हिंदूंना प्रतीत करण्यासाठी भगवा रंग आणि मुस्लिमांना प्रतीत करण्यासाठी हिरवा रंग सर्रास वापरतात; जणू काही त्या त्या धर्माची मुलं कपाळावर त्या त्या रंगाचा टिळा लावूनच जन्माला येतात. किंवा नकाशात वेगवेगळ्या बाबी दर्शवण्यासाठी वेगवेगळे रंग वापरतात आणि वापरलेल्या रंगांची सूची देतात तशी सूची धर्मांच्या वर्गीकरणाच्या बाबतीतपण बनवली गेलेली आहे.

खरं तर विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत मनुष्यानं स्वतःची दैनंदिनी, आचरण परिस्थितीला जुळवून घेण्याच्या दृष्टीनं निश्चित केलेली असते. काळानुसार तो त्यात बदल करून स्वतःचं जगणं अधिक सुलभ करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. हा निसर्गनियम आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा वरवर जरी कुणी अभ्यास केलेला असेल तर त्याला नैसर्गिक परिस्थितीला जुळवून घेण्याच्या सजीवांच्या प्रयत्नांबद्दल माहिती असेल. याच उत्क्रांतीतून मानव स्थिर झाला, तो संस्कारी झाला. त्याच्या मूलभूत गरजा जसे की अन्न-वस्त्र आणि निवारा, त्याच्या पद्धती, सण-उत्सव यांचा स्वीकार प्राप्त परिस्थितीनुसार करत गेला.

या प्रकारची समान दैनंदिनी जगणाऱ्या समाजाला, समूहाला विशिष्ट नावानं ओळखलं जाऊ लागलं; थोडक्यात कालांतरानं त्याला धर्माची ओळख मिळाली. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर केवळ बोली भाषेवरून अमुक एक व्यक्ती कोकणातली आहे, विदर्भातली आहे हे आपण ओळखतो. तिच्या शरीरयष्टीवरून, रंगावरून ती व्यक्ती  भारतीय आहे किंवा युरोपिअन आहे हे ताडतो किंवा तिचं वर्णन करतो अगदी त्याचप्रमाणं आचरणाच्या पद्धतीवरून ती व्यक्ती हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे हेही ठरवतो. या सर्व निरीक्षणाला आणि निर्णयाला भौगोलिक परिस्थिती आणि त्यामुळं दिसणारे फरक हा निकष आहे, यापेक्षा त्याला काहीही विशेष महत्त्व नाही.

जसजसं विज्ञान तंत्रज्ञान प्रगत होत गेलं तसंतसं वर्षानुवर्षं पक्क्या झालेल्या काही समजुती, श्रद्धा यांचा उलगडा होत गेला. भाषा, लिपी, जनुकीय बदल यांचा अभ्यास झाल्यानं या फरकांमागं असलेल्या कारणांचा उलगडा होत गेला. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात निसर्गातील रंग, त्याच्या लहरी (Wavelength) यांचा अभ्यास वेगवेगळ्या स्तरांवर झालेला आहे. त्यामुळं त्या त्या रंगाच्या वैशिष्ट्यांची शास्त्रीय उकल झालेली आहे. शालेय अभ्यासक्रमापासून रंग, रंगसंगती तसेच रंगांचे भौतिक गुणधर्म यांची ओळख होत आहे. त्याचा आधार घेतला की लक्षात येतं, भगवा रंग हा लाल रंगाच्या परिवारातील आहे. लाल रंगाचा प्रकाश हवेतील कणांमुळे कमी विखुरला जातो, त्याचप्रमाणं या रंगाच्या प्रकाशाच्या उच्च लहरी (Highest Wavelength) असतात. त्या लहरी हवेत कमी विखुरल्या जातात. त्यामुळे लाल रंगाच्या प्रकाशाच्या लहरींचा प्रवास जास्तीतजास्त अंतर कापू शकतो. म्हणजे अशा रंगातील वस्तू पाऊस व धुक्यामधूनसुद्धा दूरवरून दिसू शकते.

हिरवा रंग- या रंगाचा प्रकाश हवेतील कणांमुळे जास्त विखुरला जातो. त्याचप्रमाणं या रंगाच्या प्रकाशाच्या न्यूनतम लहरी (Lowest Wavelength) असतात. त्या लहरी हवेत जास्त विखुरल्या जातात. त्यामुळे कोरड्या मोकळ्या वातावरणातच अशा रंगातील वस्तू दूरवरून दिसू शकतात. पाऊस व धुक्यातून हिरव्या रंगातील वस्तू दिसण्यास तुलनेनं अवघड आहे. हे झालं रंगांच्या गुणधर्मांचं शास्त्रीय स्पष्टीकरण.

या दोन्ही रंगांचे भौतिकशास्त्रीय विश्लेषण पाहिल्यानंतर व थोडा तर्कबुद्धीनं विचार केला; तर या रंगांचा आणि त्यांचा विशिष्ट समूहाशी जोडलेला संबंध समजण्यास मदत मिळेल. फार पूर्वी मनुष्य धर्मात विभागला गेलेला नव्हता, मानव जेव्हा गटागटानं, समूहानं राहत होता तेव्हा कोसावर अंतरं मोजली जायची आणि एक-दोन कोसांवर सामान्यांची सोयरीक होत होती. पायवाटेनं प्रवास केला जात होता, तेव्हा दूरवरून एखादं ठिकाण लक्षात येण्यासाठी उंचावर निशाणी लावायला सुरुवात केली असणार. त्याच पायवाटेवर असलेल्या मोठ्या वृक्षांच्या बुंध्यात (वड, पिंपळ इ.) लाल-केशरी रंगानं रंगवलेला दगड ठेवलेला असणार (श्रद्धावान त्याला म्हसोबा, रखवालदार म्हणत असतात) ज्याचा प्रवासात दिशादर्शक म्हणून उपयोग होत असणार.

आजही 'म्हसोबापासून उजव्या-डाव्या अंगाला वळ,' अशी वाक्यं ग्रामीण भागात मार्ग, हद्दी समजावताना वापरली जातात. लाल-केशरी-भगव्या रंगांनी रंगवलेल्या या निशाणींमुळे (झेंडा, पताका, दगड) त्यांचे वस्तीस्थान, मंदिर, प्रवासातील समूह, सैन्य इत्यादींचा ठावठिकाणा लक्षात येऊ लागला किंवा त्यांना अपेक्षित स्थळाचा ठावठिकाणा समजायला मदत झाली. भारत देश आणि त्याच्या पूर्वेकडील प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती पाहता हा प्रदेश नदीनाले, डोंगरदऱ्या आणि जंगलांनी व्यापला आहे. इथे पावसाळी वातावरण, धुकं, वृक्षवल्ली, शेतीनं आच्छादलेला भूप्रदेश असल्यामुळं अपेक्षित स्थळ पटकन लक्षात येण्यासाठी लाल/ भगवा रंग निशाणासाठी वापरलेला असणार. आजही बऱ्याच घाटांतून जाताना ठरावीक अंतर गेल्यावर एखादं मंदिर व त्यावर लावलेला झेंडा अगदी ठळकपणे लक्षात येतो.

आज आपण मोटारीतून प्रवास करतो म्हणून जाणवत नाही; परंतु जेव्हा पायी किंवा बैलगाडीनं प्रवास करत असणार तेव्हा घाटातून प्रवास करतेवेळी विश्रांतीसाठी किंवा जंगलात आसरा घेण्यासाठी अशा ठिकाणांची आवश्यकता होती; जी पटकन लक्षात येण्यासाठी त्यावर झेंडा/ निशाणी फडकत ठेवली असणार. दुर्गम डोंगररांगांतून भटकंतीला गेल्यावर अशा खाणाखुणा नक्की आढळतात. आजही अशा खाणाखुणांच्या मदतीनं मार्ग शोधला जातो.

पुरातन वास्तुशात्रात मंदिरापेक्षा (कळसाच्या उंचीपेक्षा) जास्त उंचीची वास्तू बांधू नये असा एक नियम आहे. त्यामागंसुद्धा असाच एक तर्क असावा की वाटसरूंना तो कळस, त्यावर फडकत असलेलं निशाण सहज दृष्टीस पडावं. साहजिकच,  अशा भूप्रदेशात त्याचा रंग लाल/ भगवाच असायला पाहिजे. कारण हिरवा रंग तर झाडाझुडपांतून दिसणारसुद्धा नाही आणि निळा रंग आकाशाच्या पटलावर विरून जाईल. या आणि अशा शास्त्रीय आणि भौगोलिक कारणांनी परिस्थितीचं निरीक्षण करून, त्यातून आलेल्या अनुभवांतून आपल्या पूर्वजांनी लाल/ भगवा रंग झेंडा/ निशाणीसाठी निवडला असेल; जो कालांतरानं या भूप्रदेशातील लोकसमूहाचा, (हिंदू आणि बौद्ध) धर्माचा रंग झाला असेल. याच तर्कानं वाळवंटी, रूक्ष भूप्रदेशात जिथं दूरदूरवर कुठंही हिरवळ नाही अशा प्रदेशात अपेक्षित स्थळ लक्षात येण्यासाठी झेंडा/ निशाणी लावली असेल; ज्यासाठी हिरवा रंग (त्याच्या गुणधर्मामुळे) निवडला असणार.

शिवाय, कोरड्या मोकळ्या वातावरणात दुरून लक्षातपण येईल आणि डोळ्यांना आल्हाददायक, सौम्य अनुभवसुद्धा मिळेल. किंवा वाळवंटातून प्रवास करताना विश्रांतीसाठी किंवा आसरा घेण्यसाठी, पाण्याचं ठिकाण लक्षात येण्यासाठी अशा ठिकाणी झेंडा/ निशाणी लावली असेल. स्वाभाविकपणे अशा निशाणींचा रंग हिरवा निवडला असणार. कालांतराने या भूप्रदेशातील लोकसमूहाचा, (मुस्लिम) धर्माचा रंग हिरवा झाला असेल. पूर्वेकडील इंडोनेशिया मुस्लिमबहुल राष्ट्र झालेलं आहे. पण त्यांची निशाणी लाल रंगात आहे. मुस्लिमबहुल होण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीमुळं इंडोनेशियाच्या निशाणीत लाल रंगाचा अवलंब सहज झालेला असणार तो आजही स्वीकारलेला आहे. वास्तवात रंगाचा आणि धर्माचा कोणताही संबंध नसताना, रंगांच्या विशिष्ट गुणधर्मामुळं आणि त्या भौगोलिक परिस्थितीमुळं तो तो रंग त्या त्या समूहानं स्वीकारला, जो कालांतरानं धर्मासोबत जोडला गेला.

सैन्य दलाचे पोशाख हिरव्या रंगात असतात; यामागे शत्रूच्या दृष्टीस सहज पडू नये यासारखं सुरक्षेचं कारण आहे. याउलट हिमालयातील गिर्यारोहकांना पिवळा, लाल यांसारख्या भडक (फ्लोरोसंट) रंगांचे कपडे घालण्यास सुचवले जाते, जेणेकरून साथीदारांना ते पटकन दिसतील, अपघात झाल्यास त्यांना सहज लोकेट करणं शक्य व्हावं.  इतका स्वच्छ आणि स्पष्ट विचार कपडे, त्यांचा रंग, भौगोलिक परिस्थिती आणि वापरकर्त्यांची भूमिका याच्यामागं असतो. तिथे रंगनिवडीत धर्म पाहिला जात नाही. निसर्गातील प्रत्येक बाबीशी जोडलेल्या धार्मिक कथा सर्व धर्मांत आहेत. या कथांमध्ये निर्जीव डोंगर, नद्या, झरे आहेत, सजीव प्राणी-पक्षी आहेत. तसंच धर्मातील स्वार्थी लोकांनी आणि शासनकर्त्यांनी या रंगीत निशाणींसोबतसुद्धा वेगवेगळ्या कथा जोडून त्याला भावनिक, धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिलेलं आहे. इतर प्रतीकांसोबत जशा श्रद्धा जोडल्या गेल्या तशा या रंगांसोबतसुद्धा जोडल्या गेल्या आहेत.

लाल आणि हिरवा रंग आजच्या आधुनिक जीवनातसुद्धा अविभाज्य घटक बनले आहेत. या दोन रंगांमध्ये संपूर्ण जगाची ट्रॅफिक नियंत्रण सिग्नल यंत्रणा बनलेली आहे. लाल रंगाच्या प्रकाशाच्या लहरींच्या विशेष गुणधर्मामुळे (कोरड्या तसेच पावसाळी वातावरणातसुद्धा तुलनेने स्पष्ट दिसण्यामुळे) थांबण्यासाठी, धोका लक्षात येण्यासाठी सिग्नल लाल रंगाचे आहेत. इतर रंगांच्या तुलनेत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा लाल रंगामुळे धोका लवकर लक्षात येऊ शकतो. बरोबर याच्या विरुद्ध हिरव्या रंगाचे आहे. त्यामुळं ‘धोका नाही, पुढे जा’ इ. बाबी लक्षात येण्यासाठी सिग्नलचा रंग हिरवा आहे. हे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यानं संपूर्ण जगानं मान्य केलेलं आहे. इथं कुठेही धर्म हा घटक रंगनिवडीसाठी आलेला नाही. 

म्हणजे पूर्वीच्या काळी मर्यादित साधनसामग्री व ज्ञान असताना या दोन रंगांची निवड आपलं जीवनमान अधिक सुखकर करण्यासाठी केलेलं होतं. ते आधुनिक विज्ञानाचा वापर करून अधिक सुखकर करण्याऐवजी संकुचितपणे दोन धर्मांत विभागून बहुजनांचं आयुष्य दु:खीकष्टी करून बसलो आहोत. निर्मळ मनानं रंगांची मजा घेण्याचं विसरून, रंगांचा मुक्तपणे वापर करण्याची भीती बाळगायला लागलो आहोत. म्हणजे काळाच्या आणि आधुनिकतेच्या रेट्यात रंगामुळे होणाऱ्या विभाजनात अशा उथळ वक्तव्यानं किंवा वागण्यानं भर पडत आहे!

- शिवप्रसाद महाजन, ठाणे
bilvpatra@gmail.com

Tags: लेख शिवप्रसाद महाजन रंग धर्म विक्रम गोखले हिंदू मुस्लीम जमातवाद Marathi Shivprasad Colour Religion Hindu Muslim Load More Tags

Comments:

सुलतान पवार

सुंदर लेखन, छान विश्लेषण .....

सत्येंद्र सिंह

कोई कितना भी महान व्यक्ति हो, प्रकृति से ऊपर नहीं हो सकता और प्रकृति विरोधी कोई भी कार्य, कथन या वचन सराहनीय नहीं हो सकता। रंगों को धर्म से जोड़ ना और उनमें बाँटना मनुष्य के अधिकार से बाहर है।

Pragati

Very nice article

Tara

मस्तच लिहिलंय , विक्रम गोखले एक सुसंकृत संवेदनशील अभिनेता अशीच त्यांची ओळख माझ्या मानस पटलावर उमटलेली होती , मी फार चित्रपट पाहत नाही , सात आठ वर्षां पूर्वी दूर दर्शन वरुन कांही मालिका एखादा चित्रपट पाहत असे . अनेक यशस्वी मराठी अभिनेते आवडतात , ते संवेदनशील भूमिकांमुळेच . माझ्या सारख्या कित्येकांना धक्क बसला असणार अवघड आहे.

पांडूरंग आत्माराम थोरात

फार छान प्रकारे रंगाची निवड लेखकांनी दाखवली आहे. पटणारे आहे. त्यांना धन्यवाद द्यायला हवेत तसेच कर्तव्य साधनामधून वाचायला मिळाला या बद्दल संपादकांना धन्यवाद.

Add Comment

संबंधित लेख