जगात सर्वाधिक अनुयायी असणारा धर्म म्हणजे ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती धर्म. ज्यू धर्मातून तयार झालेला हा नवा धर्म. आज जगातील तब्बल दोन अब्ज नागरिक ख्रिस्ती धर्माशी जोडलेले आहेत. आपली कालगणना सुरु होते ती ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू याच्या जन्मापासून. म्हणजे येशूच्या जन्माला आता 2020 वर्षे पूर्ण होतील. येशूला ज्या दिवशी क्रूसिफाय करण्यात आले, म्हणजे सुळावर चढवण्यात आले, तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे. धर्माचा उगम आणि धर्मसंस्थापक यांच्याभोवती कायमच गुढतेचे वलय निर्माण झालेले असते. येशू आणि ख्रिस्ती धर्म यांच्याभोवती असणारे गुढतेचे वलय दूर करत इतिहासाच्या जवळ जाणारी मांडणी करणारे दोन लेख 'गुड फ्रायडे'निमित्त आज आणि उद्या प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी हा पहिला लेख.
येशूच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती धर्म कसा वाढला याचा इतिहास खूप रंजक आहे. येशूच्या मृत्यूनंतर पहिली 300 वर्षे सुरुवातीचे ख्रिस्ती (Early Christians) हे भूमिगत झाले. रोमन साम्राज्यात त्यांचा छळ होत असल्यामुळे त्यांना भूमिगत होणे भागच होते. सुरुवातीचे ख्रिस्ती लोक गुप्तपणे त्यांचा धर्म पाळत असत. ज्या रोमन साम्राज्याने ख्रिस्ताला क्रुसावर चढविले त्याच ख्रिस्ताचा रोमन साम्राज्याने कसा स्वीकार केला याचा इतिहास नाट्यमय आहे.
येशूने त्याच्या 33 वर्षांच्या आयुष्यातील शेवटच्या साडेतीन वर्षांत आपल्या शिष्यांसोबत इस्राएल देशातील, गॅलिली परिसरात ठिकठिकाणी फिरून प्रवचने दिली. तो त्याचे विचार स्थानिक संदर्भ असलेल्या गोष्टीरूपात इतरांना सांगत होता. वैऱ्यांवरही प्रेम करा असे सांगणारा, एक मुक्त विवेकी विचारांचा, ज्यू धर्मातील बोजड कर्मकांड नाकारू पाहणारा एक बंडखोर तेथील लोकांना आवडू लागला होता. आपल्या मानवतावादी आणि साध्या सरळ शिकवणुकीमुळे तो त्याच्या गॅलिली परिसरात (त्याचे जन्मगाव 'नाझरेथ' येथे असल्याने) 'नाझरेथकर येशू' म्हणून नावारूपाला येऊ लागला होता. त्याला अनुयायीही मिळाले होते. त्यामध्ये गरीब, कष्टकरी, कुष्ठरोगी, अपंग, वेश्या, असे समाजातील दुर्लक्षित घटक होते.
येशू ज्या परिसरात वावरत होता तो नुकताच काही वर्षांपासून बलाढ्य रोमन साम्राज्याच्या अंमलाखाली आला होता. रोमचे साम्राज्य उत्तरेकडील यूरोपपासून उत्तरेकडील आफ्रिकेच्या वाळवंटापर्यंत, व अटलांटिक समुद्रापासून मिडल-ईस्टपर्यंत असे बलाढ्य पसरलेले होते. येशू स्थानिक असल्याने त्याला रोमन चालीरीती तसेच रोमन लोकांची लॅटिन भाषा माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
येशू व त्याचे शिष्य हे ज्यू धर्मीय होते. ज्यू धर्मात 'वल्हांडण' हा सण मोठा मानला जातो. दरवर्षी या सणाच्या निमिताने भाविक ‘जेरुसलेम’ या पवित्र नगरीची यात्रा करायचे. बऱ्याच ज्यू भाविकांची येथे गर्दी व्हायची. येशूही त्याच्या शिष्याबरोबर गॅलिली प्रदेशातील नाझरेथ या गावाहून 100 किलोमीटर दूर असलेल्या जेरुसलेम शहरात येण्यास निघाला. येशूच्या आयुष्यातील शेवटचा आणि ख्रिस्ती धर्मात महत्वाचा मानलेला 'इव्हेंटफुल' आठवडा आता सुरु होणार होता.
जेरुसलेम शहर काही मैलाच्या अंतरावर आलेले असताना येशूने त्याच्या दोन शिष्यांना पुढे शहरात जाऊन दोन गाढवी (खेचरे) आणण्यास पाठविले. तोपर्यंत जेरुसलेमेतही कष्टकरी वर्गांत येशूचे नाव माहीत झाले होते. 'नाझरेथकर येशू' येत आहे अशी पूर्वकल्पना शिष्यांनी तिथल्या लोकांना दिली. येशूने मग जेरुसलेमेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून गाढवावर बसून शिष्यांसह शहरात प्रवेश केला. त्याचे स्थानिक लोकांनी ऑलिव्ह झाडाच्या फांद्या उंचावून 'होसान्ना होसान्ना' म्हणून उत्स्फूर्त स्वागत केले. दूरच्या नाझरेथ गावातील एका तरुणाचे जेरुसलेम सारख्या शहरात असे स्वागत होणे अभूतपूर्व होते.
मात्र या कृत्याने जेरुसलेमेतील ज्यू धर्माधिकारी सावध झाले. येशूचे असे गाढवावर बसून जेरुसलेमेत येणे त्यांना आवडले नाही. याचे कारण म्हणजे ज्यूंच्या शास्त्रलेखात असे म्हटले होते की, "पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर..." थोडक्यात, अप्रत्यक्षरीत्या 'येशू स्वतःला ज्यूंचा राजा म्हणून घोषित करत आहे' असे ज्यू धर्मगुरूंना वाटले. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. दुसऱ्या बाजूला, तेथे तैनात असलेल्या रोमन सैन्यांना ज्यू धर्मात काय चालू आहे त्याच्याशी काही एवढे देणे घेणे नव्हते. कारण रोमन सैनिक प्राचीन रोमन धर्म पाळत होते, त्यांचा धर्म ज्यू नव्हता. कदाचित जर येशू सफेद घोड्यावरून आला असता तर रोमनांना ते आव्हानात्मक वाटले असते. कारण सफेद घोडा रोमन साम्राज्यात राजाचे प्रतीक म्हणून मानले जात होते.
पण ज्यू धर्माधिकाऱ्यांना येशूचे हे असे गाढवावरून 'पवित्र शहर' जेरुसलेमेत येणे आवडले नव्हते. त्यांचा राग अधिक उफाळण्यास आणखीन एक घटना कारणीभूत ठरली जी येशूच्या जेरुसलेमेतील मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी घडली. येशू जेरुसलेमेतील पवित्र ज्यू मंदिरात आला, त्याने मंदिरात प्रवेश घेण्यासाठी तेव्हाच्या पद्धतीनुसार रीतसर कर भरला आणि तो आत आला. वल्हांडण सणाच्या लगबगीमुळे तेथे मंदिरात बाजार भरला होता. ज्यू चालीरीतीनुसार विविध पशूंचे बळीही तिथेच दिले जात होते. मंदिरातील हा गडबड-गोंधळ पाहून तो चिडला व तेथील धर्माधिकाऱ्यांना म्हणाला "माझ्या पित्याचे (देवाचे) घर प्रार्थनेचे घर आहे. पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे." येशूचे म्हणणे तेथील धार्मिक शास्त्री-परुशी यांना आवडले नाही. त्या रात्री येशू जेरुसलेम शहराच्या बाहेर असलेल्या 'बेथनी' ह्या परिसरात आपल्या शिष्यांसोबत राहण्यास गेला.
तिसऱ्या दिवशी -मंगळवारी- तो परत जेरुसलेमेतील त्याच ज्यू मंदिरात आला व तेथे तो प्रवचन देऊ लागला. ते ऐकण्यासाठी त्याच्या बाजूला बरेच लोक जमले. ते काहीसे सहन न होऊन मंदिरातील मुख्य याजव क ज्येष्ठजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, "तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?" येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मला सांगा, योहान लोकांना धर्मज्ञान देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला - देवाकडून की मनुष्यांकडून?”
योहान हा तेव्हाचा एक लोकप्रिय ज्यू धर्मप्रसारक होता. ज्यू धर्मगुरूंनी त्याला मान्यता दिली नव्हती पण तो ज्यू लोकांत खूप प्रसिद्ध होता. येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. योहानाचा प्रवचन देण्याचा अधिकार देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. कारण योहान हा एक नीतिमान धर्मप्रसारक होता असे सर्व सामान्य लोक मानायचे. शेवटी चाणाक्ष धर्माधिकाऱ्यांना सामान्य लोकांची भीती असतेच ('जनता जनार्दन' हे धर्माधिकारी ओळखून असतात). म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही." येशूने असे कोंडीत पकडलेले त्यांना आवडले नाही व त्याचक्षणी ज्यू धर्माधिकाऱ्यांनी या परप्रांतीय, पेशाने सुतार असलेल्या येशूचा काटा काढण्याचा निश्चय केला.
बुधवारी, येशू ‘बेथनी’ या शहराच्या बाहेरील ठिकाणी राहिला. गुरुवारी वल्हांडण सण होता. त्याने त्याच्या दोन शिष्यांना शहरात पाठवून सणाची तयारी करण्यास सांगितले. त्या दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी वल्हांडण सणाच्या भोजनासाठी येशू व त्याचे बारा शिष्य एकत्र जमले असताना येशूने दोन गोष्टी केल्या. अशा दोन गोष्टी ज्या ख्रिस्ती धर्माचा अजूनही गाभा समजल्या जातात.
प्रथम, त्याने भांड्यात पाणी घेऊन चक्क त्याच्या बारा शिष्याचे पाय धुतले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 'गुरु असूनही मी तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. कारण जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला हे उदाहरण घालून दिले.' ख्रिस्ती धर्मातील सेवादायी कार्याची बहुतांशी प्रेरणा ह्या एका प्रसंगावर आधारित आहे. दुसरे, म्हणजे त्याने जेवणाच्या मेजावरील 'भाकर आणि द्राक्षरस' हाती घेतले, व त्याला आपली (स्वतःच्या शरीराची आणि रक्ताची) उपमा दिली. आजही येशूची आठवण म्हणून ख्रिस्ती लोक भाकर आणि द्राक्षरस पवित्र मानतात. ही दोन कृत्ये महत्वाची आहेत. येशूच्या इतर शिकवणुकीबरोबरच ह्या प्रमुख दोन कृत्याच्या आधारे, येशूच्या मृत्यूनंतर पुढची 300 वर्षे ख्रिस्ती धर्म, बंद दाराआड भूमिगत असूनही वाढतच गेला (कसे? ते आपण पुढे वाचू).
वल्हांडण सणाचे जेवण झाल्यावर त्या गुरुवार रात्री येशू आपल्या शिष्यांबरोबर एका बागेत गेला. परस्पर, ज्यू धर्माधिकारी येशूच्या मागे मोर्चाबांधणी करत होते. धार्मिक ज्यू धर्मगुरूंना स्वतःला राजा म्हणवणाऱ्या येशूला सोडायचे नव्हते. त्यांच्या मते तो अक्षम्य गुन्हा होता. त्यांनी येशूचा एक शिष्य 'ज्यूदास' ह्याला पैशाचे अमिष दाखवून येशूचा ठावठिकाणा माहीत करून घेतला, व त्याला बागेतच पकडले. शिष्यांनी काहीसा विरोध केला पण येशूने जास्त प्रतिकार केला नाही व स्वतःला त्यांच्या ताब्यात सोपविले.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी पहाटे धर्मगुरू येशूला जेरुसलेम शहराचा रोमन अधिकारी पोंती पिलात (Pontis Pilate) याच्याकडे घेऊन गेले. रोमन राज्यात शिक्षा करण्याचा अधिकार फक्त रोमन अधिकाऱ्यांनाच होता. त्यामुळे ते येशूला पिलाताकडे घेऊन गेले व 'हा स्वतःला ज्यूंचा राजा म्हणवतो, याला वधस्तंभी खिळा' अशी त्यांनी मागणी केली व तेथे बराच गोंधळ घातला. पिलाताने येशूला स्वसंरक्षणाची संधी देत विचारले, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?” परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही.
पिलातला तसे एकदम क्रूसी खिळवावे असे येशूमध्ये काही चुकीचे दिसत नव्हते. रोमन राज्यात क्रूसी खिळणे हे फक्त अट्टल गुन्हेगारांसाठीच होते. पिलात रोमन होता. त्याला ज्यू धर्मीयाविषयी काही माहिती असण्याची शक्यता नसली तरी धार्मिक बंडखोरांना (तो कोणत्याही धर्माचा का असेना) त्यांच्या समाजाचा असणारा विरोध याविषयी त्याला कल्पना होती. त्याने येशूला त्याच्याकडे घेऊन आलेल्या ज्यू धर्मगुरूंना सांगितले की, 'तुमचा वल्हांडणाचा सण आहे, त्यामुळे या आनंदाच्या दिवशी एका व्यक्तीला त्याच्या गुन्ह्याची माफी करण्याची पद्धत आहे, तेव्हा आपण येशूला माफ करून सोडून देऊया'. हे ऐकताच तेथे उपस्थित धर्मरक्षक जमावाने 'याच्या ऐवजी बरब्बाला सोडा पण याला वधस्तंभी खिळा' अशी मागणी केली. बरब्बा एक स्थानिक अट्टल दरोडेखोर होता.
पिलात काहीसा येशुच्या बाजूने झुकत आहे हे पाहून जमावातील धर्माधिकाऱ्यांनी 'तुम्ही जर योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही कैसरकडे जाऊ' अशी धमकी दिली. कैसर म्हणजे तेथील सर्वोच्च रोमन राजा. शेवटी जमावाच्या दबावाला बळी पडून त्याने येशूला देहांताची शिक्षा सुनावली व त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने येशूला रोमन सैन्याच्या हाती सोपविले. पुढारलेल्या रोमन राज्यात, रोमन नागरिकांना बरेच हक्क, संरक्षण होते. नागरिकांना त्यांच्यावरील शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार होता. येशू रोमन नागरिक नव्हता. त्यामुळे त्याला तसा काही हक्क असण्याचा प्रश्नच नव्हता.
रोमन सैन्यांकडे येशूचा ताबा आल्यावर मात्र त्यांनी येशूचा बराच छळ केला. त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवून त्याला चाबकाचे फटके मारून रक्तबंबाळ केले गेले. ज्या क्रुसावर त्याला खिळणार होते तो क्रुसही त्याच्या खांद्यावरून त्याला कालवारी टेकडीपर्यंत नेण्यास भाग पाडले. व दुपारी त्याला कालवारी टेकडीवर दोन इतर गुन्हेगारांच्या मध्ये खिळण्यात आले.
गुन्हेगाराला क्रुसावर खिळल्यावर त्याच्या गुन्ह्याची माहिती देणारा फलक क्रुसावर लावला जात असे. पिलातला येशूत काहीच गुन्हा दिसला नव्हता. फक्त 'येशू स्वतःला ज्यूंचा राजा म्हणवितो' या ज्यू धर्माधिकाऱ्यांच्या आरोपाखाली त्याने येशूला नाइलाजाने ‘धार्मिक भावना दुखावल्या’ म्हणून शिक्षा दिली होती. तसेच ज्यू धर्माधिकाऱ्यांनी पिलातावर शिक्षा देण्यासाठी जसे बंधन आणले होते, त्याचा सुप्त सूड म्हणून पिलाताने येशूच्या क्रुसावरील फलकावर, 'नाझरेथकर येशू, ज्यूंचा राजा' (INRI, 'Iesus Nazarenus Rex Iudaeorum) असे लिहिले.
येशूला क्रुसावर खिळल्यावर तो चटकन मेला नाही. तो मरत नाहीये हे पाहून एका रोमन सैनिकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला व काही मिनिटांच्या विव्हळल्यानंतर दुपारी तीन वाजता त्याने आपला प्राण सोडला. क्रुसावर खिळलेला असताना त्याने मरण्यागोदर सात वाक्ये बोलली. त्यातले, आपल्या मारेकऱ्यांना उद्देशून त्याने म्हटलेले 'हे बापा, त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाही' हे वाक्य अजरामर ठरले.
काही वेळाने रोमन सैन्य व इतर बघ्यांची पांगापांग झाल्यावर येशूचे मृत शरीर त्याच्या शिष्यांनी क्रुसावरून खाली उतरविले. व ते त्याच्या आईने, मरीयेने आपल्या कुशीत घेऊन त्याला पांढऱ्या वस्त्रात गुंडाळले. आणि मग येशूचे मृत शरीर बाजूच्याच एका थडग्यात ठेवले गेले.
येशूच्या हत्येनंतर काही वर्षांनी रोमन इतिहासकार, टॅसिटस (Tacitus) याने 'द अॅन्नल्स' (The Annals) या नोंदवहीत या संपूर्ण घटनेचे (येशूचा छळ आणि त्याचे क्रुसावर खिळले जाणे यांचे) वर्णन केलेले असले तरी रोमन अधिकाऱ्यांनी येशूला क्रुसी खिळल्याची कुठेही सरकार दरबारी नोंद घेतली नाही. अगोदर म्हटल्याप्रमाणे येशू हा स्थानिक गॅलिलीकर होता. त्यामुळे, तेव्हाचे बलाढ्य आणि सामर्थ्यशाली रोमन साम्राज्य पाहता त्यांच्या दृष्टीने जेरुसलेमेसारख्या शहरात, (खेडूत असलेल्या) तरुणाच्या मृत्यूची नोंद अदखलपात्रच होती. रोमन साम्राज्यात शिक्षा म्हणून गुन्हेगारांना क्रुसावर खिळले जाणे ही खूप सामान्य घटना होती. (येशूला क्रुसावर खिळल्यामुळे मात्र हाच क्रूस पुढे संबंध ख्रिस्ती धर्मियांचे पवित्र चिन्ह बनले.)
सहा दिवसांपूर्वीच नाझरेथहून आपल्या शिष्यांसह जेरुसलेमेस वल्हांडण सण साजरा करण्यास आलेल्या नाझरेथकर येशूचा असा करूण अंत झाला. प्रस्थापित धर्माला आव्हान देणाऱ्या बंडखोर विचारांची हत्या केली गेली. कायम त्याच्या सोबत असणारे शिष्य सैरभैर झाले. येशूची आई मरीया हिच्या शोकसागराला अंत राहिला नाही. अर्थात तेव्हा रोमन साम्राज्याच्या खिजगणतीतही नसेल की येत्या काही शतकांत अश्या काही घटना घडणार आहेत की 300 वर्षांनी ह्याच रोमन साम्राज्यावर एक नवीन सूर्य उगवणार आहे... आणि त्याचे नाव असणार आहे येशू ...
(लेखातील सर्व चित्रे pinterest.com वरून साभार)
- डॅनिअल मस्करणीस, वसई
danifm2001@gmail.com
(विवेकवादी गटामध्ये सहभागी झाल्यानंतर लेखकाने एकूणच विवेकवाद व व्यक्तिगत आणि सामाजिक चर्चामंथन करणारे 'मंच' हे अतिशय महत्वाचे पुस्तक लिहिले. साधना प्रकाशनाने हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित केले आहे.)
वाचा या लेखाचा उत्तरार्ध : रोमन साम्राज्यावरील सूर्य, येशू !
Tags: ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती ख्रिश्चन गुड फ्रायडे ज्यू धर्म रोमन जेरुसलेम क्रूस जिजस धर्मगुरू डॅनिअल मस्करणीस Jesus Christ Christians Good Friday Clergy Daniel Mascarenhas Load More Tags
Add Comment