जगात सर्वाधिक अनुयायी असणारा धर्म म्हणजे ख्रिश्चन किंवा ख्रिस्ती धर्म. ज्यू धर्मातून तयार झालेला हा नवा धर्म. आज जगातील तब्बल दोन अब्ज नागरिक ख्रिस्ती धर्माशी जोडलेले आहेत. आपली कालगणना सुरु होते ती ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू याच्या जन्मापासून. म्हणजे येशूच्या जन्माला आता 2020 वर्षे पूर्ण होतील. येशूला ज्या दिवशी क्रूसिफाय करण्यात आले, म्हणजे सुळावर चढवण्यात आले, तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे. धर्माचा उगम आणि धर्मसंस्थापक यांच्याभोवती कायमच गुढतेचे वलय निर्माण झालेले असते. येशू आणि ख्रिस्ती धर्म यांच्याभोवती असणारे गुढतेचे वलय दूर करत इतिहासाच्या जवळ जाणारी मांडणी करणाऱ्या लेखाचा पूर्वार्ध काल प्रसिद्ध झाला असून, त्याचा हा उत्तरार्ध.
येशूच्या मृत्यूनंतर त्याचे बरेच शिष्य त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने जगात गेले. नंतर बहुतांशी शिष्यांचा त्या त्या ठिकाणी छळ होऊन मृत्यू झाला. येशूच्या शिष्यांपैकी थॉमस हा शिष्य भारतातही (केरळमध्ये) आला होता असे म्हटले जाते.
येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या बारा शिष्यांपैकी जेम्स आणि पीटर हे दोन शिष्य जेरुसलेमेत थांबले व ते येशूची शिकवणूक इतरांना देऊ लागले. अर्थात येशू व त्याचे शिष्य ज्यू होते, ज्यू ज्या देवपुत्राची वाट पाहत होते तो येशूच आहे अशी शिष्यांची व येशूला मानणाऱ्या एका छोट्या गटाची खात्री होती. पण ते स्वतःला ज्यूच मानत. किंबहुना या नवपंथातील, येशूचे अनुयायी होण्यासाठी ज्यू असणं हा महत्वाचा निकष होता. या नवीन पंथाकडे बरेचजण संशयाने पाहत होते. पण लवकरच येशूच्या या धडपडणाऱ्या शिष्यांना एक विद्वान माणूस भेटणार होता जो मोठे धोरणी निर्णय घेणार होता. त्याचे नाव पॉल.
पॉल हा येशूचा समवयस्क होता. तो जेरुसलेमेपासून 900 किलोमीटर लांब असलेल्या सिरीयात राहणारा होता. त्यामुळे येशूच्या हयातीत दोघांची काही भेट होण्याची शक्यता नव्हती. तोही ज्यू होता व त्याची भाषा ग्रीक होती. येशूचे सर्व शिष्य हे तळागाळातून आलेले होते, ते जास्त शिकलेले नव्हते. पॉल हा मात्र शिकलेला विद्वान होता. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे तो रोमन नागरिक होता (ते नागरिकत्व त्याला जन्माने नव्हे तर त्याच्या कुटुंबियांना रोमन सरकारकडून बक्षिसी म्हणून मिळाले होते). त्यामुळे रोमन साम्राज्याचे सर्व फायदे त्याच्याकडे होते. व रोमन साम्राज्यात 'रोमन' (first class citizen) म्हणून त्याचा इतर नॉन-रोमन लोकांत दबदबा होता. तोही जन्माने ज्यू असला तरी ज्यू धर्मातील 'फरीसी' (Pharisee) या तुलनेने काहीशा मवाळ पंथाचा तो सदस्य होता. तेथील धर्मपंडितांत त्याची उठबैस होती.
येशूच्या मृत्यूनंतर, येशूच्या शिष्यांनी 'येशूला देवपुत्र मानणारे' म्हणून (ज्यू धर्माचाच एक) नवीन पंथ सुरु केला होता. ती चळवळ ज्यू धर्मियापर्यंतच सीमित होती. त्याची माहिती जेव्हा पॉलच्या कानावर आली तेव्हा त्याचे या नवपंथाविषयी मत अनुकूल नव्हते. कोणा येशूला ज्यूंनी देवपुत्र मानणे त्याला बिल्कुलही आवडले नव्हते. त्याने त्याच्या (रोमन नागरिक आणि परत ज्यू-पंडित) अधिकारात अशा बऱ्याच नवख्रिस्ती लोकांना शिक्षा करून मूळ ज्यू धर्मात परतही आणले होते. किंबहुना येशूच्या नावाने भरकटलेल्या अशाच काही लोकांना भेटण्यासाठी तो एकदा येरुशलेमेहुन दमास्कस येथे जात होता, आणि त्या प्रवासात त्याला अचानक साक्षात्कार झाला की येशू खरेच ज्यूंचा देवपुत्र, (मसीहा) आहे. ही घटना ख्रिस्ती धर्मात मोठी घटना मानली जाते. कारण त्या दिवशी फक्त त्याचेच नाही तर संपूर्ण ख्रिस्ती धर्माचे भविष्य बदलणार होते. पॉलने येशूचा देवपुत्र (म्हणजेच देव, मसीहा) म्हणून स्वीकार केला. बायबलमध्ये अर्थातच या घटनेचा उल्लेख चमत्कार म्हणून केलेला असला तरी इतिहासकारांना पॉलचे येशूचा अचानक स्वीकार करणे या घटनेमागचे कोडे अजूनही पूर्णपणे उलगडले नाही.
पीटर आणि जेम्स तेव्हा जेरुसलेम परिसरात येशूची सुवार्ता पसरवीत होते. पॉल त्यांना भेटला व त्यांच्यात सामील झाला. पॉलच्या वैचारिक पार्श्वभूमीचा व रोमन नागरिक असण्याचा येशूच्या शिष्यांना फायदा झाला. तोपर्यंत येशूचे शिष्य ‘ज्यू धर्मातील खरा देव’ म्हणून ज्यू धर्मियांतच या धर्माचा प्रचार करत होते. मात्र पॉलला ते आवडले नाही, त्याने एक मोठा निर्णय घेतला. 'येशू फक्त ज्यूंचा नाही तर जे ज्यू नाहीत (gentiles) त्यांचाही आहे, त्यामुळे त्यांनाही या नवीन ख्रिस्ती धर्मात घ्यावे' असे त्याने पीटर आणि जेम्सला सुचविले आणि ख्रिस्ती धर्माचे दरवाजे सर्वांना खुले झाले.
पीटर आणि जेम्स हे ज्यूंमध्ये धर्मप्रसार करत तर पॉलने ज्युतरेतर धर्मियांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तो हजारो मैल चालला. पूर्ण रोमन साम्राज्य त्याने पिंजून काढले. येशूचा संदेश देत तो रोमपर्यंत पोहोचला. किंबहुना पहिल्या चर्चचाही पाया त्याने पीटर व जेम्स यांच्यासोबत घातला. प्राचीन रोमन साम्राज्यात नागरी, दळणवळण याच्या व्यवस्था उत्तम होत्या त्याचाही पुरेपूर फायदा पॉलला झाला.
पॉलने बरेच लिखाणही केले. ख्रिस्ती होण्याअगोदर आणि झाल्यानंतरचे सारे विचार त्याने लिहून ठेवले. त्याने काही ख्रिस्ती धर्मीयांसाठी सुरुवातीची देवळेही बांधली आणि त्यांच्या प्रमुखांनाही पत्रे लिहिली. ती सारी नंतर बायबलमध्ये अंतर्भूत केली गेली. तसा तो येशूच्या बारा शिष्यापैकी नव्हता. त्यामुळे येशूच्या शिष्यांना (पीटर आणि जेम्स) जी सन्मानाची वागणूक मिळाली ती त्याला तेव्हा मिळाली नाही. पण त्याच्या सुरुवातीच्या कार्यामुळे ख्रिस्ती धर्माच्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये येशूनंतर पॉलला मानाचे स्थान आहे.
दुसऱ्या बाजूला ज्यू धर्मातून एका नवीन धर्माचा उदय होत आहे याची कुणकुण रोमन साम्राज्याला लागली. रोमन लोकही कमालीचे धार्मिक होते. रोमन संस्कृतीत देवदेवतांना बरेच महत्व होते. वेगवेगळ्या प्रसंगासाठी वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा रोमन संस्कृतीत केली जायची (Polytheist). तसेच रोमन राजसत्ता आणि रोमन धर्मसत्ता ही घट्ट बांधलेली होती. धर्मपालन ही राजाची मोठी जबाबदारी असायची. रोमन सम्राट हा सर्वेसर्वा असायचा, त्यामुळे देवाची पूजा करणे हा राजधर्माचाच एक अविभाज्य भाग होता.
याचेच एक उदाहरण म्हणजे वेस्टल व्हर्जिन्स. प्रत्येक शहरात सहा कुमारिका (व्हर्जिन्स) 'वेस्टा' या 'निष्कलंक' आणि 'कुमारी' पणाचे प्रतीक असलेल्या रोमन देवतेची (एका मोठ्या अग्निकुंडाभोवती) आराधना करायच्या. शहरात सर्व काही आलबेल असेल तेव्हा त्याचे श्रेय या सहा कुमारिकांना (वेस्टल व्हर्जिन्सना) मिळे. पण जेव्हा वाईट दिवस यायचे (जसे युद्धातील दारुण पराभव, शेतीचा खराब हंगाम वा एखाद्या रोगाची साथ) तेव्हा या कुमारिकांना दोषी ठरविले जायचे आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना जिवंत पुरले जायचे.
या कुमारिकांना वयाच्या फक्त तीस वर्षापर्यंतच हे काम करावे लागे. मग मात्र त्यांना नगराच्या या 'पवित्र' सेवेतून मुक्त केले जाई. या नंतर त्यांना लग्न करण्याची मुभा होती व त्यांच्या सेवेसाठी रोमन सरकारकडून त्यांना आजन्म पेन्शन मिळे. नंतर रोमन सरकार इतर कुमारिकांची वेस्टल व्हर्जिन म्हणून नेमणूक करत असे. राज्य आणि धर्म याचा इतका जवळचा संबंध रोमन राज्यात होता. रोमन धर्माशी काही विपरीत म्हणजे राज्यालाही धोका असेच समजले जाई.
एरवी जेव्हा राज्यात सर्व काही सुरळीत चालू असायचे तेव्हा मात्र रोमन राज्यकर्ते सुसंस्कृतपणे वागायचे. ते शांतताप्रिय होते. कायदा आणि सुव्यवस्था याबबत खूप पुढारलेले होते. जसजसा त्यांचा साम्राज्यविस्तार होत गेला, तसतसे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशातील इतर धर्मांचाही ते आदर करायला लागले.
रोमन राज्यात ज्यूंची संख्या काही लाखांच्या आसपास होती. रोमनांना त्यांचा इतका धोका वाटत नव्हता. त्याचे ,एक कारण म्हणजे तेव्हा ज्यूंमध्ये धर्मांतर होत नव्हते. ज्यू धर्म हा रक्तातूनच मिळायचा (अब्राहामाचे वंशज). त्यात ज्यू धर्म हा रोमन धर्मापेक्षाही अधिक जुना त्यामुळे रोमनांना ज्यू धर्माविषयी काहीसा आदरच होता.
पण नवीनच स्थापन झालेल्या ख्रिस्ती धर्मात मात्र असे काही नव्हते. कोणीही व्यक्ती ख्रिस्ती होऊ शकत होता. त्यातच नवख्रिस्ती 'आमचा राजा, येशू' असे जेव्हा म्हणू लागले तेव्हा आपल्या सत्तेबाबत दक्ष असणारे रोमन सरकार काहीसे सावध होऊ लागले. परत ख्रिस्ती धर्मप्रसारक ज्याविषयी भरभरून बोलायचे तो येशू रोमन सरकारनेच गुन्हेगार म्हणून क्रुसी खिळलेला, त्यामुळे रोमन राज्यांत विशेषकरून रोममध्ये या नवख्रिस्ती लोकांविषयी अस्वस्थता वाढू लागली.
एरवी समाजात बारीक लक्ष असणाऱ्या रोमन साम्राज्याचे अगोदरच कष्टकरी वर्गात येशूच्या विचारांना मिळणाऱ्या वाढत्या मान्यतेकडे दुर्लक्षच झाले होते आणि अशातच एक दुर्घटना घडली. रोममध्ये मोठी आग लागली. त्यामध्ये 80 टक्के रोम जाळून खाक झाले. तत्कालीन रोमन राजा निरो याने या आपत्तीसाठी (वर उल्लेख केलेल्या, वेस्टल व्हर्जिनबरोबरच) या नवख्रिस्ती लोकांसही जबाबदार धरले आणि ख्रिस्ती लोकांचा छळ होण्यास सुरुवात झाली.
त्यात येशूचा शिष्य पीटर (ज्यांना नंतर पहिले पोप मानले गेले) यांनाही क्रुसावर मारण्याची शिक्षा देण्यात आली. पीटर, येशूचा शिष्य होण्यापूर्वी कोळी होता. त्याचे खरे नाव सायमन होते. येशूने 'तू माझ्या विचारांचा दगड होशील' असे म्हणून त्याला पीटर (म्हणजे दगड) हे नाव दिले होते. पीटरने 'माझ्या गुरूसारखी मृत्यू जाण्याची माझी पात्रता नाही' असे म्हणून क्रूस उलटा करून त्यावर मरण पत्करले. पॉललाही सिंहाच्या तोंडी देण्यात आले.
या छळानंतर मात्र ख्रिस्ती धर्म भूमिगत झाला. त्यानंतरही ख्रिश्चन धर्म बंद दाराच्या आड गुप्तपणे पाळला जात होता. विशेष म्हणजे सुरवातीच्या काळात कष्टकरी आणि गरीब लोकांनी हा धर्म टिकवला (Early Christians). यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे सुरुवातीचे ख्रिस्ती धर्मपालन हे बरेच व्यवहारी होते (ख्रिस्ती धर्माच्या देवपुत्र वगैरे संकल्पना गूढ, बोजड असल्या तरी). 'माझ्या नावाने दोघे किंवा तिघे जिथे हजर असतील तिथे मी आहे' असे येशू बोलायचा त्यामुळे सुरुवातीचे ख्रिस्ती एकमेकांच्या घरी गुप्तपणे एकत्र येऊन प्रार्थना करायचे (house church), त्यासाठी मंदिराची गरज नव्हती. दुसरे म्हणजे, प्रार्थना करण्यासाठी येशूने वल्हांडण सणाच्या दिवशी त्याची आठवण म्हणून भाकर आणि द्राक्षारसाचे उदाहरण दिले होते, तेही पाळणे सोपे होते कारण भाकर आणि द्राक्षारस कोणाच्याही घरी सहज उपलब्ध असे. त्यामुळे धर्म पाळण्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नसत.
एकत्र आल्याने नेटवर्किंगचाही फायदा सुरुवातीच्या नवख्रिस्ती लोकांना झाला. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे येशूने शिष्यांचे पाय धुऊन इतरांची सेवा करण्याचा दिलेला संदेश, त्याच्या अनुयायांनी खूपच गांभीर्याने पाळला. त्यामुळे साथीच्या किंवा एखाद्या आजारात एकमेकाला केलेली मदत इतरांना या धर्माकडे जास्तच आकर्षून घेऊ लागली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या नवख्रिस्ती लोकांत बहुतांश सर्व रोमन व्यवस्थेच्या बाहेर असणारे कष्टकरी, विस्थापित झालेले, मजूर अशा गरीब लोकांचाच जास्त भरणा होता. त्यांना या नेटवर्किंग व हेल्थकेअरचा व्यवहारी फायदा बराच झाला. त्यामुळे चर्चेस जरी नसली तरी धर्म जिवंत राहिला. यात स्त्रियांनीही योगदान दिले. सिसिलिया या स्त्रीने घरी प्रार्थनेचे आयोजन करण्यास सुरुवात केली (house church).
स्त्रियांना जरी बाहेर अधिकार नसले तरी घर मात्र स्त्रियांच्याच ताब्यात होते. किंबहुना सुरुवातीचे धर्मोपदेशक जे निरोच्या काळात बाहेर प्रवचने देऊ शकायचे नाहीत ते अशा घरात यायचे. तेथे प्रार्थनेसाठी येणाऱ्यांमध्ये स्त्रियांही असत. स्त्रियांमुळेही हा धर्म त्यांच्या नातेवाइकांमार्फत बराच पसरला. हळूहळू रोमन व श्रीमंत लोकही या धर्मात येऊ लागले. व ते जमीन, पैसा इत्यादी रूपात मदत करू लागले.
तरीही ख्रिस्ती लोकांचा छळ होतंच राहीला. रोमन लोकांत देवाला खुश करण्यासाठी बळी देण्याची पद्धत होती. तर ख्रिस्ती लोकांत येशुचे क्रुसावरील मरण हे एकमेव बळी मानले गेले होते. यावरूनही रोमन आणि ख्रिस्ती लोकांत खटके उडू लागले. याच कारणामुळे सिसिलियाने देवाला बळी देण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आली. हत्या करणे हे रोमन काळात सामान्य असले तरी, ख्रिस्ती लोकांत मात्र हत्या झालेल्यांना 'धर्मातील हुतात्मे' म्हणून अधिकच झळाळी मिळाली आणि यामुळे ख्रिस्ती धर्म जरी भूमिगत असला तरी अधिक संघटित झाला आणि या काळात आश्चर्यकारकरित्या वाढला.
येशूच्या मृत्यूनंतर काही हजारांत असलेली ख्रिस्ती संख्या त्या नंतरच्या 300 वर्षांत (इसवीसन 300) जगभर तब्बल 15-20 लाख इतकी झाली. सुरुवातीच्या काळात पैसा आणि सत्ता नसतानाही, ख्रिस्ती लोकांची ही वाढलेली संख्या आश्चर्यकारक मानली जाते. पण अजूनही रोमन आणि ख्रिस्ती यांच्यामध्ये सौदार्ह्याचे संबंध नव्हते. रोमनांनी शेवटचा आघात इसवीसन 303 मध्ये करून पहिला. बरेच ख्रिस्ती लोक मारले गेले. पण इसवीसन 312-315 मध्ये कोणाच्या ध्यानीमनी नसताना एक महत्वाची घटना घडली. एक निर्णायक क्षणी तत्कालीन रोमन राजा कॉंस्टंटाईन याने युद्धाच्या काळात घोषणा केली की तो 'ख्रिस्ती लोकांच्या देवाच्या नावाने लढणार आहे'. पॉलच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही ख्रिस्ती धर्मात महत्वाचा मानला जातो (कॉंस्टंटाईनच्या या निर्णयाचेही प्रयोजन इतिहासकारांना कळलेलं नाही, कारण त्याच्या सैन्यात ख्रिस्ती एवढे जास्त नव्हते. या प्रसंगाविषयीही बरेच मतप्रवाह आहेत) .
कॉंस्टंटाईन ते युद्ध जिंकला आणि रोमन राज्याचा सर्वेसर्वा झाला. त्यांनतर त्याने रोमन राज्यात ख्रिस्ती धर्माला प्रथमच अधिकृत दर्जा दिला त्यामुळे रोमन अंमलाखाली होणारे ख्रिश्चनांचे शिरकाण थांबले. व 300 वर्षे बहुतांश भूमिगत असणाऱ्या ख्रिश्चन धर्माने मोकळा श्वास घेतला. कॉंस्टंटाईनने स्वतःने जरी ख्रिस्ती धर्म मरण्याच्या वेळी स्वीकारला तरी त्याने नवीन चर्चेस बांधण्यास परवानगी दिली. तसेच तज्ज्ञांची कमिटी नेमून त्याने ख्रिस्ती धर्माची पुनर्बांधणी केली. त्याच्यानंतर आलेल्या रोमन राजांनी मग ख्रिस्ती धर्म प्रसारास अधिकृत मान्यता दिली. कॉंस्टंटाईन याने सुरुवातीच्या साध्या सोप्या ख्रिस्ती धर्माचे रोमनीकरण केले असाही आरोप काही इतिहासकार करतात. कारण यानंतर ख्रिस्ती धर्मावर बऱ्याच प्राचीन रोमन देव देवतांचा, प्रतीकांचा प्रभाव पडला.
रोमनांचे संस्थापन कौशल्य, सैन्य, आर्थिक बळ यांच्या जोरावर ख्रिस्ती धर्म जगभरात पसरण्यास सुरुवात झाली. एका निर्णायक क्षणी रोमन सम्राट ख्रिस्ती झाला खरा पण ख्रिस्ती धर्मही अशा रीतीने रोमन झाला आणि उदयास आला, बलाढ्य 1700 वर्षे जुना 'रोमन कॅथॉलिक चर्च' हा धर्म.
(लेखातील सर्व चित्रे pinterest.com वरून साभार)
- डॅनिअल मस्करणीस, वसई
danifm2001@gmail.com
(विवेकवादी गटामध्ये सहभागी झाल्यानंतर लेखकाने एकूणच विवेकवाद व व्यक्तिगत आणि सामाजिक चर्चामंथन करणारे 'मंच' हे अतिशय महत्वाचे पुस्तक लिहिले. साधना प्रकाशनाने हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित केले आहे.)
वाचा या लेखाचा पूर्वार्ध: नाझरेथकर येशू
Tags: ख्रिस्ती ख्रिश्चन गुड फ्रायडे ज्यू धर्म रोमन जेरुसलेम क्रूस जिजस धर्मगुरू डॅनिअल मस्करणीस Jesus Christ Christians Good Friday Clergy Daniel Mascarenhas पॉल वेस्टल व्हर्जिन्स काँटस्टाईन Paul Vestal Virgin कॉस्टंटाईन Constantine Load More Tags
Add Comment