आज जाहीर झाले... महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022  

28 जानेवारी 2023 रोजी या सर्व 11 पुरस्कारांचे वितरण पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्यावतीने दिले जाणारे 2022 या वर्षीचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्याच्या क्षेत्रात सहा तर समाजकार्याच्या क्षेत्रात पाच असे एकूण 11 पुरस्कार या वर्षी दिले जाणार आहेत.

साहित्यामध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारे (संगमनेर) यांना जाहीर झाला आहे. ऐंशीच्या दशकात उदयाला आलेल्या कथाकार / कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी सातत्याने केलेल्या दर्जेदार लेखनाने मराठी साहित्य विश्वात स्वतःची अशी नाममुद्रा आणि ओळख निर्माण केलेली आहे. साठोत्तरी कालखंडात लिहू लागलेल्या आणि पुढे प्रभाव निर्माण करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांच्या पुढच्या टप्प्यावरचे अत्यंत महत्त्वाचे लेखक म्हणून ते आता ओळखले जातात. आशय, विषय आणि अविष्कार या तिन्ही अंगांनी केलेले सर्जनशील लेखन वेगळ्या स्वरुपाचे आणि मराठी साहित्याला अर्थपूर्ण योगदान करणारे आहे.

कथा व कादंबरीलेखनासाठी वाङ्मयप्रकार पुरस्कार राजन गवस (गारगोटी) यांना जाहीर झाला आहे. वास्तवता’, ‘दोहीयता’ आणि ‘लेखकाची नैतिकता’ ही तत्वत्रयी गवस यांच्या साहित्याच्या मुळाशी आहे. स्त्रीविषयक जाणिवा आणि बाईपण, गाव पातळीवरील राजकीय जाणिवांचे चित्रण, ग्रामीण जीवनाचे तुटलेपण आणि गावगाड्यात झालेले बदल, सामाजिक राजकीय समस्या, वंचित, उपेक्षित आणि शोषीतांचे जग ही गवस यांच्या कथांची आशयसूत्रे आहेत आणि ती त्यांच्या कथांमधून भेदकपणे प्रकट झाली आहेत. आज ते मराठी साहित्यातील एक आघाडीचे कथाकार आणि कादंबरीकार  म्हणून ओळखले जातात.

अनुवाद व लेखन या क्षेत्रातील कामासाठी विशेष पुरस्कार सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. सोनालीच्या नावावर एकूण सात पुस्तकं आहेत. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी तिला 2021मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. चांगली लेखिका आणि कुशल अनुवादक तर ती आहेच. त्याचबरोबर ती संपादक, स्तंभलेखक, शब्दांकनकार, सूत्रसंचालक, मुलाखतकारसुद्धा आहे. जगण्यासाठी आवश्यक तो पैसा मिळवण्यासाठी तिला काम करावंच लागतं. ‘स्पर्श-ज्ञान’ या ब्रेल-पाक्षिकाचं काम ती गेली दहा-अकरा वर्षं करते आहे. अरुण गांधी लिखित 'लिगसी ऑफ लव्ह' आणि 'गिफ्ट ऑफ अँगर' या पुस्तकांचे सोनालीने केलेले अनुवाद अनुक्रमे 'वारसा प्रेमाचा' आणि वरदान रागाचे या नावाने प्रकाशित झाले आहेत.

जीवनगौरव पुरस्कार दोन लाख रुपये व स्मृतीचिन्ह या स्वरूपाचा असून, वाङ्मयप्रकार पुरस्कार व विशेष पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात आहेत.

याशिवाय दोन ग्रंथ पुरस्कार आणि एक नाट्यलेखन पुरस्कार दिले जाणार आहेत. अनिल साबळे (मंचर) यांना ‘पिवळा पिवळा पाचोळा’ या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा अनिल साबळेंचा कथासंग्रह त्यांच्या आत्मानुभवामुळे आणि बालकाचे निरागस भावविश्व रेखाटण्यामुळे अत्यंत वजनदार झालेला आहे. नागरी जीवनापासून वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं निसर्गाच्या सान्निध्यातलं जनजीवन आपल्याला प्राकृतिक सौंदर्य आणि सामर्थ्य यांच्या अधिक जवळ नेते. त्यामुळे या लेखनाला डूब प्राप्त झालेली आहे. रानातील, आदिवासी विभागातील जीवनचित्रणामुळे सदर लेखन अत्यंत वास्तवदर्शी आणि तितकेच पारदर्शीही झालेले आहे. त्यांचे जंगलाशी असलेले अतूट नाते त्यांच्या सर्व लेखनातून प्रभावीपणे व्यक्त होते. 

शरद बाविस्कर (दिल्ली) यांना त्यांच्या ‘भुरा’ या आत्मकथनासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘भुरा’ या  आत्मकथनाने मराठी साहित्यात अचंबित करणारं यश मिळवलं आहे. त्यांच्या पहिल्याच पुस्तकानं त्यांनी जाणकार आणि सर्वसामान्य अशा दोन्ही प्रकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाषाशास्त्र, सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान हे शरद बाविस्कर यांचे अभ्यासविषय आहेत. आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन आहे.                                   

रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार संदेश कुलकर्णी (मुंबई) यांच्या ‘पुनश्च हनिमून’ या नाटकासाठी दिला जाणार आहे. ‘पुनश्च हनिमून’ - कोणत्याही संवेदनशील माणसाला आजच्या काळात पडणारे प्रश्न, त्यांचे तेवढ्याच संवेदनशील मनाने केलेले नाट्यलेखन, त्याचा ताकदीनं उभा केलेला प्रयोग, त्यातील संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांचा सकस अभिनय आणि नाटकाच्या स्वभावप्रवृत्तीला साजेसे नेपथ्य या साऱ्या गोष्टी अगदी जमून आलेल्या आहेत.

दोन्ही ग्रंथ पुरस्कार आणि नाट्यलेखन पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात दिले जाणार आहेत. 

समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये दोन विशेष कार्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये शांताराम पंदेरे (औरंगाबाद) यांना दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी आणि प्रमोद झिंजाडे (करमाळा) यांना त्यांनी गेल्या वर्षभरात विधवा प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेल्या कार्यासाठी हे विशेष कार्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे दोन्ही विशेष कार्य पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत.

औरंगाबादचे 69 वर्षांचे शांताराम पंदेरे यांची खरी ओळख म्हणजे गेल्या 35 वर्षांपासून दलित, भिल-ठाकर-पारधी आदिवासी, भटके-विमुक्त व महिलांवरील अत्याचारांविरोधात लढा. आदिवासी, दलित, भटके-विमुक्त समाजातील शेकडो कुटुंबांतील स्त्री-पुरूषांच्या नावावर गायरान, वन जमीन हक्क मिळविण्याच्या चळवळीत सहभाग. ‘लोकपर्याय’ या संघटनेच्या वतीने 35 वर्षांची अथक चळवळ, 73व्या घटनादुरूस्तीनुसार खास महिला ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले.

विधवा प्रथा निर्मूलन मोहिमेला महाराष्ट्रात चालना देणारे प्रमोद झिंजाडे हे करमाळ्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळ’ या नावाने एनजीओ 1982 मध्ये स्थापन केली. प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. प्रमोद झिंजाडे यांनी त्यांच्या पश्चात स्वत:च्या पत्नीने कुठलेही विधवेचे अनिष्ट नियम पाळू नयेत आणि त्यांच्यावर ते कोणी लादू नयेत म्हणून लग्नाच्या 44 वर्षांनंतर हा निर्णय बॉन्ड पेपरवर लिहून ठेवला आहे. 

दोन कार्यकर्ता पुरस्कारही दिले जाणार आहेत. त्यामध्ये, कुमारीबाई जमकातन (गडचिरोली) यांना संघर्ष पुरस्कार आणि नंदिनी जाधव (पुणे) यांना प्रबोधन पुरस्कार दिला जाणार आहे. हे दोन्ही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील आहेत.

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील जंतर गावातला डोईवरचा पदर थेट हनुवटीपर्यंत असण्याची सवय असणाऱ्या कँवर आदिवासी समाजातील कुमारीबाईंचा जन्म. अशा समाजातील कुमारीबाई पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध बंड करून उठते. 2005ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रात घरमालक पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात यावे, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. वंचित महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या बोलीभाषेत हक्कांविषयी माहिती देणे व एसएचजी ग्रुपशी जोडणे हे त्यांचे महत्त्वाचे काम आहे.

नंदिनी जाधव यांची मुख्य ओळख म्हणजे महिलांच्या केसातील वाढवलेली जट काढणे. अनिष्ट रुढी-परंपरांच्या सामाजिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नंदिनी जाधव गेली सहा वर्षांहून अधिक काळ करत आहेत. जादूटोणा कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नंदिनीताईंनी 27 जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे. नंदिनीताई सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष आहेत.

याशिवाय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यावर्षी ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (नवी दिल्ली) या संस्थेला दिला जाणार आहे, एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क हे देशभर पसरलेले चाळीसपेक्षा जास्त लोक विज्ञान संस्थांचे नेटवर्क आहे. AIPSN ने विज्ञान प्रसार आणि समाजातील विज्ञानाशी संबंधित गोष्टींशी सहभागी असलेल्या संघटनांचे नेटवर्क म्हणून आपले उपक्रम सुरू केले. शांतता आणि नि:शस्त्रीकरण, जागतिकीकरणाचे व्यापक मुद्दे, बौद्धिक संपदा अधिकार, संबंधित समस्या यासारख्या क्षेत्रांवर जागरूकता निर्माण केली आहे. AIPSN सदस्य संस्थांनी या मुद्द्यांवर अनेक अभ्यास आणि प्रकाशने आणली आहेत.

28 जानेवारी 2023 रोजी या सर्व 11 पुरस्कारांचे वितरण पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही सर्व माहिती महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांच्या निमंत्रक मनीषा गुप्ते, साहित्य पुरस्कार निवड समितीचे समन्वयक मुकुंद टाकसाळे, साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ या तिघांनी दिली. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने मागील 28 वर्षांपासून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांचे संयोजन पुणे येथील ‘मासुम’ आणि ‘साधना ट्रस्ट’ यांच्या वतीने केले जाते.

Tags: Literary and Social Work Award award Purskar Social Work Literature Marathi Sahitya Load More Tags

Add Comment