महात्मा जोतीबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आज संपते आहे. त्यानिमित्ताने, संस्कृत धर्मकोश आणि मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जोतीबांचे स्मृतिशताब्दी वर्ष संपले त्या काळात लिहिलेल्या व 1992 मध्ये 'नॅशनल बुक ट्रस्ट'द्वारे प्रसिद्ध झालेल्या 'जोतिचरित्र' या 60 पानी संक्षिप्त चरित्रातील हे एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत. जोतीबांच्या चरित्राच्या शेवटी लिहिलेल्या या टिपणवजा प्रकरणाचे मूळ शीर्षक ‘आता धार्मिक यादवी’ असे आहे. तर्कतीर्थांनीच म्हटल्याप्रमाणे, 'हजारो वर्षांपासून पिचलेल्या आणि शोषित अशा कष्टकरी जनसमूहाने तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध मानवी जन्म, मानवी पत आणि मानवी प्रतिष्ठा तसेच विषमता, अज्ञान, आत्मोन्नती आणि शोषणमुक्ती यांसाठी जी विराट लोकचळवळ' सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उभी राहिली; त्यामागच्या जोतीबांच्या विचारांची नेमकी कालसुसंगतता समजून घेण्यासाठी हे प्रकरण उपयुक्त होऊ शकेल.
जोतीबांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीचे रूपांतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात झाले. त्यांना जोतीबांच्या बुद्धिवादाचा व विश्वमानवतावादाचा स्पर्श झालेला नव्हता. सत्यशोधक चळवळीचा विपर्यास म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ होय. भारतीय लोकशाहीच्या पन्नास वर्षांच्या अमदानीनंतर हा विपर्यास हळूहळू कमी होत आहे. परकीय आक्रमणापेक्षा आता धार्मिक यादवीचा अधिक धोका आहे. नकारात्मक आंदोलन कायम राखल्यास धार्मिक संघर्ष यादवी युद्धाचे तीव्र स्वरूप धारण करील.
जोतीबांनी सांगितलेले अर्धसत्य हिंदू-मुसलमान आणि हिंदू - शीख संघर्षामध्ये प्रभाव गाजवीत आहे. यामध्ये जातिवाद जाऊन त्या ठिकाणी नवे धर्मवाद उभे राहत आहेत. जोतीबांनी सांगितलेले विचार जातिभेदातीत व धर्मभेदातीत होते. हे लक्षात घेतले तरच जोतीबांच्या सत्याचे संपूर्ण स्वरूप लक्षात आले असे होईल.
पृथ्वीवर देवाचे राज्य यावे याकरिता एखादा द्रष्टा एकदम प्रकट होतो व तो एका मंगल सत्याचे बीज देऊन जातो. त्या सत्याचे ते संपूर्ण बीज रोवले तर त्यातून देवाचे राज्य पृथ्वीवर निर्माण होऊ शकते. परंतु असे कधी झाले नाही. कारण अनुयायी त्या सत्याचा अर्धाच भाग स्वीकारतात व नरकाचा धोका निर्माण होतो. अंतर्गत यादवी हा सामाजिक नरक होय.
'गुलामगिरी' किंवा 'सार्वजनिक सत्यधर्म' या दोन पुस्तकातील जोतीराव फुले यांची भारताच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक इतिहासाची उपपत्ती ही एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील युरोपीय व इंग्लिश इतिहासकारांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आधारे सांगितली आहे हे त्यांच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या निबंधाच्या तळातील टिपण्यांवरून उघडकीस येते. इंग्रजी शिक्षण बेताबाताचे होते तरी ते इंग्लिश लिहू शकत होते व महत्त्वाचे उच्च दर्जाचे ग्रंथ समजून वाचू शकत होते ही गोष्टही यावरून निदर्शनास येते. अलीकडे गेल्या शंभर वर्षांत प्राचीन भारतीय इतिहासाचे जे मौलिक संशोधन झाले आहे, त्या संशोधनाने पूर्वीच्या संशोधकांचे बरेचसे निर्णय काही बाबतीत चुकीचे ठरले आहेत व काही बाबतीत अंशत: काल्पनिक ठरले आहेत.
मत्स्यावतारापासून परशुराम अवतारापर्यंतच्या अवतारांचा जोतीरावांनी केलेला ऐतिहासिक अर्थ वामन व परशुराम वगळल्यास केवळ काल्पनिक आहे असे मानावे लागते. विशेषत: भारतीय विषम ब्राह्मणप्रधान समाजरचनेस बाहेरून आलेले ऋग्वेदिक आर्य हे मूलत:च कारण होत, या विधानाला आता विशेष पुष्टी मिळू शकत नाही. ऋग्वेदिक आर्य संख्येने अत्यल्प होते व कायम पगडा बसवतील इतके बलवानही नव्हते. विषम समाजरचनेची निर्मिती ही समाजाच्या आंतरिक सामाजिक शक्तींच्या आर्थिक व राजकीय बलामुळे निर्माण होते व ती परिवर्तन पावत असते हा सामाजिक विकासाचा सिद्धान्त मान्य करावा लागतो.
आर्यपूर्व अवैदिक भारत हा विकसित अशा द्राविडी संस्कृतीने व्यापला होता व वर्तमान हिंदू धर्म हा त्याच संस्कृतीचा परिवर्तित आविष्कार आहे, ही उपपत्ती आता सर्वमान्य झाली आहे. काही विद्यमान आधुनिक संस्कृतिशास्त्रज्ञ जातिभेद हा आर्यपूर्व संस्कृतीत भारताच्या दक्षिण प्रदेशाला वाढीस लागला व तो वैदिक आर्यांना स्वीकारावा लागला असेही म्हणू लागले आहेत. जोतीरावांनी 'गुलामगिरी' या पुस्तकात दाखवलेल्या आर्यपूर्व जोतीबा, खंडोबा, म्हसोबा, बहिरोबा, बाणासुर इ. देवता व त्यांचे पूजा संप्रदाय हे आर्यपूर्व लोकांचे होते हे जोतीरावांनी स्वतःच सांगितले आहे. येथील द्राविडी संस्कृतीला आसुरी असे म्हणता येते. ही गोष्ट जोतीरावांनीही सुचविली आहे व त्यात बरेच तथ्य आहे. त्याच संस्कृतीतील मोठा व मूळचा पुरोहितवर्ग हाच विद्यमान भारतातील ब्राह्मणवर्ग, ही गोष्टही जोतीरावांना मान्य झाली असती असे 'सार्वजनिक सत्यधर्म' पुस्तकाच्या (पृ. 397) टिपणीवरून लक्षात येते. येथील देशस्थ ब्राह्मण हे शूद्र व अतिशूद्र यांच्यापैकीच आर्षीकरण झालेले ब्राह्मण होत, असे जे विधान त्यांनी केले आहे त्यावरून हे सूचित होते.
सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेवर जोतीरावांनी कडाडून हल्ला केला आहे. सोवळ्या-ओवळ्याची ही कल्पना आर्यांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता आर्येतरांवर लादली व ती त्यांनी भुलून पत्करली असे जे जोतीरावांनी जागोजागी विधान केले आहे, ते आधुनिक मानवजातिशास्त्रज्ञांना मान्य नाही. सोवळ्या-ओवळ्यांची कल्पना प्राथमिक मानवसमाजांमध्ये जगात सर्वत्र होती व वर्तमान कालापर्यंत कमी-जास्त प्रमाणात अद्ययावत किंवा आधुनिक पश्चिमी समाज सोडल्यास सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात आहे हे शास्त्रज्ञांच्या गेल्या दीडशे वर्षांतील जागतिक संशोधनावरून सिद्ध होते. 'टाबू' (Taboo) आणि 'माना' (Mana) या मौलिक अशा मानवजातिशास्त्रज्ञांनी स्वीकारलेल्या कल्पना आहेत. त्या जादूटोणा व विविध धार्मिक विधी यांचा अर्थ उमगण्यास उपयोगी पडतात. प्राथमिक व मध्ययुगीन सर्व मानवसमाजांच्या धार्मिक चालीरीती, मंत्रतंत्र, जादूटोणा इत्यादी व्यवहारांचा 'टाबू' व 'माना' या कल्पनांच्या साहाय्याने मानवजातिशास्त्रज्ञांना अर्थ करता येतो. 'टाबू' म्हणजे निषिद्ध पापशक्ती व 'माना' म्हणजे विधायक पुण्यशक्ती होय. उदा. गोमांस भक्षण हे महापाप मानणे, मृताच्या नातेवाइकांना अस्पृश्य मानणे म्हणजे सुतक पाळणे, प्रेताला अपवित्र मानणे, डुकरांचे मांस निषिद्ध मानणे इत्यादी प्रकारच्या निषेधात्मक चालीरीती आर्य व आर्येतर या सर्वांच्याचमध्ये पडतात. गोमांस भक्षण हे पाप आहे ही कल्पना मूळची आर्याची नव्हे. ती आर्येतरांची आहे व ती कालांतराने आर्यांनी स्वीकारली ही कल्पना जोतीरावांनाही मान्य झाली असती. हे वैदिक आर्य गोमांसभक्षक होते असे त्यांनी वारंवार केलेल्या विधानांवरून स्पष्ट होते. मृतांच्या नातेवाइकांची अस्पृश्यता म्हणजे सुतक पाळण्याची चाल ही आर्येतरांपांसून आर्यांनी स्वीकारली ही गोष्ट स्मृतींवरून अनुमानता येते. शूद्रांनी सुतक एक महिना पाळावे असे विधान स्मृतीत आढळते. स्मृतींमध्ये भक्ष्याभक्ष्यविषयक किंवा स्पृश्यास्पृश्याविषयक सांगितलेल्या चालीरीती या परंपरांगत असलेल्या त्या त्या जमातींच्या चालीरीती होत, नव्या कायद्याने निर्माण केलेल्या चालीरीती नव्हेत, ही गोष्ट स्मृतींच्या आधुनिक अभ्यासकांना नव्याने सांगण्याची गरज नाही.
'सार्वजनिक सत्यधर्म' या पुस्तकाचे योग्य व आवश्यक तितके मूल्यमापन केल्याशिवाय, जीवनातले जे सत्य शोधण्यासाठी जोतीबा जीवनसंग्राम चालवीत होते त्याचा खराखुरा अर्थ कळणे अशक्य आहे. हे पुस्तक जोतीरावांनी अर्धांगाचा झटका आल्यानंतर उजवा हात लुळा झाल्यावर, शरीरातील व्यथा सहन करीत, डाव्या हाताने लिहून पुरे केले आहे. 'गुलामगिरी'मध्ये जे सत्य दाखविले आहे ते अर्धसत्य आहे, त्याची दुसरी बाजू लक्षात घेतली नाही तर ते भयानक ठरेल, अशी त्यांची भूमिका होती. म्हणून शारीरिक व्यथा सहन करीत त्यांनी हे पुस्तक लिहून काढले. जोतीबांच्या विश्वकुटुंबवादाचा 'सार्वजनिक सत्यधर्म' हा जाहीरनामा आहे. भारतीय लोकशाही क्रांतीची मूलभूत तत्त्वे विशद करून सांगणारा तो जाहीरनामा आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' मध्ये जोतीबांच्या महात्मतेचे तेजोवलय पूर्ण प्रकट झाले आहे. या तेजोवलयाचे तीन भाग आपल्या दृष्टीसमोर पडतात. ते म्हणजे मूलभूत मानवी हक्क, त्यांवर आधारलेला विश्वकुटुंबवाद आणि जीवनाचे व विश्वाचे सत्यस्वरूप प्रकट करणारा बुद्धिवाद हे होत. पश्चिमेकडून म्हणजे आधुनिक पाश्चिमात्य संस्कृतीकडून जोतीबांना या तीन प्रेरणा मिळाल्या. या तीन प्रेरणांतच त्यांची लोकशाही जीवनदृष्टी सिद्ध होते. (प्रकरण 8 : सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह , जोतिचरित्र)
बऱ्याचशा अनुयायांना व चाहत्यांना न मानवणारे असे अनेक विचार जोतीरावांनी मांडले आहेत. उदा. ज्ञानदेवांची 'ज्ञानेश्वरी' व अन्य संतप्रणित ग्रंथ शूद्र अतिशूद्रांना फसविण्याकरिता, ब्राह्मणांचे आधिपत्य दृढ करण्याकरिता निर्माण केलेले कारस्थान आहे असे जोतीराव अनेक ठिकाणी बजावतात. विष्णू व पंढरीचा विठ्ठल यांची जोतीरावांनी खूप थट्टा उडविली आहे हे महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना व अनुयायांना कितपत पटले असेल याची शंका आहे. हिंदुधर्मातील मूर्तिपूजा हे ब्राह्मणांनी पोट भरण्याकरिता काढलेले थोतांड आहे; तीर्थयात्रा, श्राद्ध इत्यादी विधी हा लबाडपणाचा धंदा आहे; ख्रिस्ती धर्म व मुसलमान धर्म हे हिंदुधर्मापेक्षा अधिक श्रेष्ठ धर्म आहेत; इत्यादी जोतीरावांची विधाने चाहत्यांनी व अनुयायांनी विशेषकरून लक्षात घ्यावीत, अशी आहेत. महंमदावर एक उत्कृष्ट प्रशंसापर कविता जोतीरावांनी लिहिली आहे. ती या संदर्भात वाचावी. ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी येथील हिंदूंना बाटविण्याचे पूर्वी केलेले प्रयत्न जोतीरावांस स्वागतार्ह वाटतात. त्याबद्दलची पोटदुखी केवळ ऐतखाऊ ब्राह्मणांनाच बाधते, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. उदा. पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म पत्करून केलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसाराची जोतीबांनी प्रशंसा केली आहे. (सत्सार : पृ. 286). मात्र याचा अर्थ असा नव्हे की, हिंदूंनी मुसलमान वा ख्रिस्ती व्हावे असे जोतीरावांचे मत होते.
ग्रंथनिष्ठ सर्वच धर्म हे मानवामानवात फूट पाडणारे असल्यामुळे अयोग्य होत, असा त्यांचा अंतिम निर्णय होता. तुलनात्मक दृष्टीने विचार करता, प्रचलित हिंदू धर्मापेक्षा मुसलमान वा ख्रिश्चन धर्म कैक पटीने श्रेष्ठ होत, एवढेच त्यांना सांगावयाचे होते. खरा धर्म सर्व मानवांचा एकच आहे. सर्व धर्मनिष्ठ सामाजिक भेद हे मिथ्या भेद होत असा त्यांनी काढलेला अंतिम निष्कर्ष होता.
हिंदू धर्मावरील विशेषत: ब्राह्मणप्रधान हिंदू समाजरचनेवरील व ब्राह्मणप्रधान संस्कृतीवरील त्यांचा हल्ला एका तत्कालीन ऐतिहासिक विशिष्ट सामाजिक व राजकीय परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया होती व ती तीव्र प्रतिक्रिया तटस्थ रीतीने पाहणाऱ्या आधुनिक विचारवंतांस मर्यादित अर्थाने समर्थनीयच वाटेल यात शंका नाही व ती समर्थनीय आहेच. अव्यवस्थित व बेजबाबदार अशा उत्तर पेशवाईत व अव्वल इंग्रजीमध्ये ब्राह्मणांचे महाराष्ट्रात प्रस्थ वाढले व सामाजिक विषमतेची धार अधिक तीक्ष्ण झाली. ही गोष्ट लोकहितवादी, न्या. रानडे, आगरकर, इत्यादी आधुनिक विचारवंतांना देखील खंत व उद्वेग उत्पन्न करणारी बाब वाटत होती, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. उत्तर पेशवाई बेजबाबदार व हीन दर्जाची होती असेच लोकमान्य टिळकांचे मत होते.
लोकहितवादींची 'शतपत्रे'ही या गोष्टीची साक्ष देतात. ही शतपत्रे म्हणजे ब्राह्मणी विद्यांवर व ब्राह्मणी संस्कृतीवर उगारलेली बुद्धिवादी शतशस्त्रेच होत. ती अजूनपर्यंत गंजलेली नाहीत, त्यांचे तेज अजूनही तळपत आहे. वर्तमान परंपरावादी विद्यापीठीय अनेक सुशिक्षितांना — विशेषतः मराठी प्राध्यापकांना — त्यांच्यापासून इशारा अजूनही लक्षात आलेला नाही. परंतु आता स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणेतर वाद हा जीर्ण झाला असून त्यातील अभिनिवेश कमी झाला आहे. ब्राह्मणेतरांच्या हातात लोकशाहीने कठोर संघर्षाशिवाय सत्तांतर केले आहे.
भारताचे यांत्रिकीकरण त्वरित होत आहे. सर्व जाती, जमाती व धर्म यांची एक बाजारपेठ होत आहे. शिक्षणात त्या सर्वांना दरवाजे खुले होत आहेत. नोकऱ्यांत पारंपरिक अस्पृश्य व तत्सम जमातींना सवलती आहेत. अप्रगत जमातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये जास्त वाव मिळावा यासाठी चळवळी चालू आहेत. लोकशाहीमुळे हिंदूंमधील यादवीचा धोका फार कमी झाला आहे. पण याच सुमारास भारतातील मुसलमान, शीख व हिंदू यांच्यातले संघर्ष जोरदार वाढत आहेत. हिंदू व शिखांमध्ये यादवी आहे. हिंदू-मुसलमानांमधली यादवी आता दूर नाही.
हिंदू व शीख आणि हिंदू व मुसलमान यांच्या दहशती संघर्षातून भारतीय प्रजासत्ताकाच्या ऐक्याला व स्थैर्याला धोका आला आहे. जोतीरावांचे तत्त्वज्ञान या धोक्यातून बाहेर काढण्यास समर्थ आहे. जोतीरावांचा निर्मिक ईश्वर या संघर्षाची आच कमी करू शकतो. जोतिरावांचा 'सत्यवर्तन हाच धर्म' हा संदेश बहुसंख्य हिंदूंना विचारप्रवर्तक करून हा संघर्ष विझवू शकतो. आगामी धार्मिक यादवी अटळ नाही. सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले महाराष्ट्राप्रमाणेच सबंध भारताला कायमची मार्गदर्शक मशाल आहे.
टीप :
धनंजय कीर व सं. ग. मालशे : महात्मा फुले समग्र वाड्मय, (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित, 1969) या ग्रंथातील प्रस्तावनेवर आधारीत हे प्रकरण लिहिले आहे.
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
हेही वाचा :
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे वाचन - सुनीलकुमार लवटे
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी काही प्रश्नोत्तरे
Tags: महात्मा फुले सत्यशोधक समाज स्थापना दिन सत्यशोधक जोतीराव सावित्रीबाई फुले वाडा धार्मिक यादवी हिंदू मुस्लीम Load More Tags
Add Comment