व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल : वर्तमानावरचं भाष्य

युद्धपटांवरील लेखमाला : 5

हॉलीवूडमध्येही युद्धपटांची कमी नाही. पण ‘व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल’ची निवड मी केली कारण हा आपल्या नजीकच्या इतिहासाचा, नव्हे आपल्या वर्तमानाचा तुकडा आहे. आणि म्हणून महत्त्वाचा आहे. 2013 साली घडलेल्या एका सत्यघटनेवर तो आधारलेला आहे. नाटोच्या हेलिकॉप्टर्सनी अफगाणिस्तानातल्या गावावर केलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये दोन लहान मुलं मारली गेली होती. ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवरून ही बातमी प्रसारित झाली आणि देशभर त्याचे पडसाद उमटले. शेवटी मंत्र्यांना या मुलांच्या कुटुंबांसाठी मदत जाहीर करावी लागली होती. 

‘व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल’ हा काही फार थोर सिनेमा नाही. काही वेळा तर व्यक्तिरेखांची शोकांतिका मांडताना ‘कले’पेक्षा ‘कुसर’च जास्त असल्याचं जाणवतं. गोष्टीची मांडणी अतिशय साधी, सरळसोट आहे. पण तरीही, युद्धाचे परिणाम किती भयंकर असतात आणि त्यात सर्वाधिक होरपळली जातात ती लहान मुलं, ही वस्तुस्थिती हा सिनेमा ठामपणे अधोरेखित करतो.

ऑस्ट्रेलियन- इराणी दिग्दर्शिका ग्रानाझ मौसवी यांचा हा दुसरा सिनेमा. ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या अ‍ॅडलेड चित्रपट महोत्सवाने या सिनेमासाठी आर्थिक हातभार लावलेला आहे. 2020मध्ये ऑस्ट्रेलियाने ऑस्करसाठी हा सिनेमा पाठवलेला होता.

‘व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल’ची गोष्ट घडते अफगाणिस्तानमध्ये, काबूलच्या आजुबाजूच्या परिसरात. मौसवी यांनी प्रत्यक्ष काबूलच्या रस्त्यांवर केलेलं शूटिंग ही या सिनेमाची एक जमेची बाजू म्हणायला हवी. त्यामुळे प्रत्येक फ्रेम खरी वाटते. सिनेमाचा नायक आहे हेवाद. एक नऊ वर्षांचा मुलगा. गावावरच्या बॉम्बहल्ल्यात वडील ‘शहीद’ झालेले आहेत. आसपासच्या अनेक घरांमधले कर्ते पुरुष अशा प्रकारे शहीद झाल्याचा उल्लेख सिनेमात अधूनमधून येतो.

घरात आता आई, आजी आणि एक लहान बहीण. या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे हे हेवादने पक्कं ठरवलंय. त्याच्या आईने काकाशी लग्न करावं आणि एका पुरुषाच्या हाती घराची सगळी जबाबदारी द्यावी असा आजीचा प्रयत्न आहे. पण हेवादला हे मान्य नाही. त्यामुळे आपण काम करून कमावू शकतो आणि घर चालवू शकतो हे दाखवून देण्याची त्याची धडपड आहे.

हा हेवाद आहे मोठा स्मार्ट. शहरातल्या दुकानांमधून वेगवेगळं सामान घेऊन, ते भाजीच्या गाडीवर टाकायचं आणि गावातल्या निरनिराळ्या भागांमध्ये जाऊन विकायचं हे त्याचं मुख्य काम. यात लहान मुलांसाठीच्या पिपाण्यांपासून ते डाळींबांपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश आहे. फावल्या वेळात तो दुसर्‍या गावांमधल्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना डाळींबाचं सरबत देण्याचं काम करून पैसे मिळवतो. आणि आपण खूप मोठे फिल्म स्टार बनणार आहोत हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या रोजच्या कष्टांना सामोरं जातो.

हेवादची भूमिका केली आहे अराफत फैज या मुलाने. हा काही नट नाही. या आधी त्याने कधीही अभिनय केलेला नाही. पण कदाचित म्हणूनच, त्याच्या चेहर्‍यामध्ये एक खराखुरा निरागसपणा आहे. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपणही त्याच्या या स्वप्नावर पट्कन विश्वास टाकतो.   

हेवादच्या निमित्ताने आपण काबूलच्या बाजारांमधून फेरफटका मारतो. गावातल्या मुलांच्या आयुष्यात डोकावतो. भोवताली चोवीस तास युद्धाचं वातावरण आणि त्याच्याशी जमवून घेताना माणसं किती निर्ढावून जातात याचाही अनुभव घेतो. 


हेही वाचा : शिंडलर्स लिस्ट : हादरवून सोडणारा चित्रपट - नीलांबरी जोशी


हे सगळं दाखवत असताना दिग्दर्शिका कुठेही दु:खाचे कढ काढत नाही. किंबहुना, हेवादच्या आगाऊपणातून अनेकदा विनोद निर्माण होतात. फिल्म स्टार झाल्यावर आपण एक तीन मजली घर बांधू असं आईला हेवाद सांगत असतो. एका मजल्यावर आई आणि बहीण, एका मजल्यावर आजी आणि एक मजला स्वत:साठी. आपलं घर तळमजल्यावर असेल असं सांगताना आईला म्हणतो, ‘माझी बायको गरोदर असेल तर तिला जास्त चढउतार करायला नको ना!’

मौलवीकडून आणलेले गंडे विकताना तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. ही मुलगी आपल्यालाच काय, पण हेवादलाही दिसत नाही. दिसतात फक्त तिचे हात. बांगड्या घातलेले. मेंदी लावलेले. हेवाद तिला मौलवींकडून आणलेला गंडा विकतो, वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तिच्या दरवाजाच्या फटीतून धूप फिरवतो. आणि मनोमन हीच आपली होणारी बायको आहे असं ठरवून टाकतो.

शहरात दोन माणसांच्या मारामारीत एकाचे सनग्लासेस रस्त्यावर पडतात. हेवाद ते उचलतो आणि त्यानंतर सबंध वेळ डोळ्यावर ते लावून एखाद्या हिरोसारखा वावरतो. त्याच्या भाजीच्या/ खेळण्यांच्या गाडीवर आरनॉल्ड श्वाझनेगरचा फोटो लावलेला आपल्याला दिसतो.

गावात झालेला बॉम्बहल्ला कव्हर करण्यासाठी आलेला एक फोटोग्राफर हेवादचा फोटो घेतो आणि आता आपण फिल्म स्टार बनणार याची खात्री हेवादला पटते. तो या फोटोग्राफरला गावातून फिरवतो, कोंबड्यांची झुंज बघायला नेतो, माझ्याबरोबर माझ्या मित्राचेही फोटो काढ असा आग्रह करतो.

या फोटोग्राफरच्या निमित्ताने दिग्दर्शिका पाश्चात्य जगाचा एकूणच अशा प्रकारच्या शोकांतिकांकडे पाहण्याचा ‘अगं आई ग, बिच्चारे’ या दृष्टिकोनाकडेही लक्ष वेधून घेते. आपल्या मुलासाठी बूट घ्यायचे म्हणून माप हवं याकरता तो हेवादला घेऊन एका दुकानात जातो. मग स्वत:लाच ऑक्वर्ड वाटल्यामुळे हेवादसाठीही नवे कोरे बूट घेतो. त्याच्या मनातल्या अपराधीपणाशी हेवादला काही देणंघेणं नाही. नवे बूट मिळाल्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी मोठा असतो. आजुबाजूला केवळ हिंसा पहात वाढलेल्या हेवादसारख्या मुलांच्या आयुष्यात एखादी नवीन गोष्ट मिळणं किती क्वचित घडत असेल! 

या फोटोग्राफरने दिलेला कॅमेरा घेऊन हेवाद घरी येतो आणि आपण आता सिनेमा करणार असं अभिमानाने आईला सांगतो. झोपलेल्या बहिणीचे, आजीचे फोटो काढतो. आईचे कष्ट कॅमेर्‍यात कैद करू पाहतो. आणि तो कॅमेरा घेऊन गावभर फिरतो. आपल्या मित्रांना गोळा करतो आणि फिल्म स्टार कोणाला बनायचंय त्यांनी अमुक इतके पैसे मला द्या आणि माझ्यासमोर अ‍ॅक्टिंग करून दाखवा असं सांगून छोटीमोठी कमाईसुद्धा करतो.

मात्र, या सगळ्या हलक्या फुलक्या प्रसंगांना असलेली काळी झालर आपल्याला सतत दिसत राहते. कोणत्याही क्लृप्त्या न वापरता दिग्दर्शिकेचा कॅमेरा जे घडतंय ते शांतपणे टिपत जातो. यामुळे काही वेळा डॉक्युमेंटरीचाही फील येतो. नॅरेशनमध्ये वेगळेपण नाही, गोष्ट साधारण कुठल्या वळणाने जाणार हेही आपल्या लक्षात येऊ लागतं. एका लहान मुलाची गोष्ट सांगताना, त्याचे काबाडकष्ट दाखवताना, त्याच्या आयुष्याची शोकांतिका मांडताना प्रेक्षकांचे डोळे ओलावणार हे दिग्दर्शिकेला पक्कं माहीत आहे याची जाणीव काही वेळा होत राहते. ती कुठेही कढ काढत नाही, पण सहानुभूती मिळण्यासाठी काही गोष्टी निश्चितच करते.

‘व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल’पेक्षा सकस आणि अधिक परिणामकारक असे असंख्य युद्धपट मी बघितलेले आहेत. अगदी आताआतापर्यंत युरोपियन सिनेमा, विशेषत: पूर्व युरोपियन सिनेमा दुसर्‍या महायुद्धामध्ये भोगलेल्या अन्यायाच्या आठवणींमधून बाहेर पडलेला नाही असं वाटायचं. कधी हिटलरचे अत्याचार, तर कधी कम्युनिस्ट राजवटीकडून झालेली मुस्कटदाबी. विषयांचं वैविध्य तर आहेच, पण अनेक सिनेमे आयुष्यभर सोबत राहतील एवढे दमदार आहेत. आंद्रे वायदा यांच्या ‘कटीन’सारखे सिनेमे मनात कायम घर करून राहतात. यिरी मेन्झील यांचा ‘क्लोजली वॉच्ड ट्रेन्स’ हा जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या चेकोस्लोव्हाकियामध्ये एका स्टेशनवर काम करणार्‍या मुलाची गोष्ट सांगतो आणि आपल्याला हादरवून टाकतो. रॉबर्तो बेनिनीचा ‘लाईफ इज ब्युटिफल’ किंवा यानिस टॅनोविचचा ‘नो मॅन्स लॅन्ड’ किंवा रोमन पोलनस्की यांचा ‘पिआनिस्ट’ कोण कसं विसरू शकेल?

ही यादी खूप मोठी आहे. हॉलीवूडमध्येही युद्धपटांची कमी नाही. पण ‘व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल’ची निवड मी केली कारण हा आपल्या नजीकच्या इतिहासाचा, नव्हे आपल्या वर्तमानाचा तुकडा आहे. आणि म्हणून महत्त्वाचा आहे. 2013 साली घडलेल्या एका सत्यघटनेवर तो आधारलेला आहे. नाटोच्या हेलिकॉप्टर्सनी अफगाणिस्तानातल्या गावावर केलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये दोन लहान मुलं मारली गेली होती. ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवरून ही बातमी प्रसारित झाली आणि देशभर त्याचे पडसाद उमटले. शेवटी मंत्र्यांना या मुलांच्या कुटुंबांसाठी मदत जाहीर करावी लागली होती. 

('व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल'च्या दिग्दर्शिकेची मुलाखत)

हा सिनेमा म्हणजे आज, आत्ता, या क्षणी जे देश युद्धाचे दुष्परिणाम भोगताहेत त्यांच्या परिस्थितीवर केलेलं भाष्य आहे. इतिहासापासून आपण फार काही शिकलेलो नाही याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे. 

चढ असलेल्या रस्त्यावरून भाजीची गाडी ढकलण्याचा प्रयत्न करताना छातीचा भाता होणार्‍या हेवादचं बिचारेपण त्यामुळे अधिकच अंगावर येत रहातं. मोठ्यांच्या युद्धामुळे त्याच्या संपूर्ण पिढीचं हरवलेलं बालपण आपलं मन कुरतडत राहतं. लग्नघरावर पडलेल्या बॉम्बमध्ये विखुरलेली प्रेतं, लहान मुलांना खेळता खेळता ऐकू येणारे बंदुकांचे आवाज आणि तरीही त्यांचं तसंच खेळत रहाणं, भग्न आणि भकास गावं सारखी दिसत राहणं आपल्याला अस्वस्थ करतात. ही परिस्थिती इथे राहणार्‍या माणसांच्या अंगवळणी पडलेली असली तरी आपल्याला ती टोचणी देत राहते. हेवादच्या आयुष्यात चांगलं काही घडणारच नाहीये हे माहीत असूनही आपण चमत्काराची अपेक्षा करत राहतो.

प्रत्यक्ष आयुष्यात असे चमत्कार घडत नाहीत. धर्मासाठी, देशासाठी युद्ध होतात आणि त्यात माणसं होरपळून निघतात. पुरुष, बायका आणि मुख्य म्हणजे लहान मुलं. ते युद्ध मग अफगाणिस्तानातलं असो, सिरियामधलं, युक्रेनमधलं किंवा धार्मिक ज्वर चढलेल्या माणसांनी देशांतर्गत पुकारलेलं असो...

- मीना कर्णिक, मुंबई
meenakarnik@gmail.com
(लेखिका, 30वर्षांहून अधिक काळ सिनेमाविषयक पत्रकारिता करतात. अनेक प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


'व्हेन पॉमेग्रॅनेट्स हाऊल'चा ट्रेलर :

 

Tags: सिनेमा चित्रपट महोत्सव युद्धपट अफगाणीस्तान साधना साप्ताहिक इफ्फी Load More Tags

Add Comment