हमीद दलवाई यांचे मुस्लीम मन...

साहित्य अकादमी आयोजित ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ या परिसंवादातील एक भाषण

भारतीय साहित्य आणि भाषा यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था म्हणजे साहित्य अकादमी. त्यामुळे अकादमीद्वारे आयोजित परिसंवाद आणि चर्चासत्र यांचे विशेष महत्त्व असते. एखादी व्यक्ति, साहित्य, विचार राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अकादमीचे कार्यक्रम उत्प्रेरक ठरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अकादमीने 25 मे 2021 रोजी ‘हमीद दलवाई - व्यक्ती आणि साहित्य’ याविषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले होते. न्यायमूर्ती हेमंत गोखले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य एकनाथ पगार यांच्यासह प्रा. नितीन रिंढे, विनोद शिरसाठ, अन्वर राजन आणि अझरुद्दीन पटेल या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या परिसंवादाचा वृत्तांत इथे वाचता येईल. सोबतच अझरुद्दीन पटेल यांनी शब्दबद्ध केलेले 'हमीद दलवाई यांचे मुस्लीम मन' हे मनोगत कर्तव्यच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

हमीद दलवाई यांचे व्यक्तित्व बहुआयामी होते. आपल्याला हे माहीतच आहे की, हमीदभाई हे पत्रकार होते. सुप्रसिद्ध लेखक होते. ते गांधीवादी–लोहियावादी कार्यकर्ते होते. तसेच ते विचारवंत होते आणि नुसते विचारवंत नसून कृतिशील समाजसुधारक होते. असे अनेक पैलू आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थिती आणि त्यांची जडणघडण कशा पद्धतीने झाली हे आधी समजून घ्यावे लागेल.  

ज्या मुस्लीम समाजात हमीद दलवाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी ज्या समाजात समाजसुधारणेचे कार्य केले तो मुस्लीम समाज  कसा होता  हे समजून घ्यावे लागेल. 

हा मुस्लीम समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला, सामाजिकदृष्टया पतीत आणि अशिक्षित, आधुनिक, विज्ञानवादी शिक्षणापासून दुरावलेला आणि स्वतःच्याच कोषात गुरफटलेला होता. तो धार्मिकदृष्ट्या प्रचंड कट्टर, कर्मठ आणि बुरसटलेल्या विचारांचा होता. अनेक अन्याय्य सामाजिक–धार्मिक प्रथा-परंपरा अभिमानाने मिरवणारा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात तो मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या इस्लामच्या प्रकांड पंडिताला नाकारणारा आणि बॅ. मोहम्मद अली जिनांसारख्या कट्टरपंथीयाच्या मागे लागलेला होता. 

...मात्र फाळणीमुळे हा समाज प्रचंड गोंधळलेला होता. धर्माची कास धरावी की आधुनिकतेची अशा द्विधा मनःस्थितीत तो होता. याचा अर्थ मुस्लीम समाज प्रचंड वाईट होता असे नव्हे मात्र चांगल्या म्हणता येतील अशा फार कमी गोष्टी त्याच्यात होत्या. आज मुस्लीम समाजाचे जे राक्षसी चित्रण केले जात आहे तसा तर तो नक्कीच नव्हता. अनेक चांगल्या, वैभवशाली गोष्टी या समाजात होत्या शिवाय अनेक चांगले, सुजाण, कर्तृत्ववान, प्रतिभासंपन्न लोकही या मुस्लीम समाजात होते. त्यातलेच एक होते हमीद दलवाई.

आधुनिक सुधारणावादी परंपरेचा अभाव  
मुस्लीम समाजाच्या पर्यायाने इस्लामच्या चौदाशे वर्षांच्या वाटचालीत धार्मिक आचारविचारांमध्ये निर्माण झालेल्या दोषांची वास्तवपणे, विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि आधुनिक मूल्यांच्या दृष्टीकोनातून चिकित्सा करून, धर्मचिकित्सा करून त्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न झालाच नाही. अपवाद फक्त तुर्कस्तानचे राष्ट्रपिता असणाऱ्या आतातुर्क मुस्तफा केमाल पाशा यांचा... पण केमाल पाशा यांनी राबवलेल्या सुधारणा या धर्मचिकित्सेतून झालेल्या नसून त्या तत्कालीन गरजेतून झालेल्या सुधारणा होत्या. 

इथे दुसरा एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. तो म्हणजे समजा जर असा प्रयत्न कोणी केला असता तर? म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनातून इस्लामची चिकित्सा करून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला असता तर? आपल्याकडे सम्राट अकबराने इस्लामच्या थोडे पलीकडे जाऊन विचार आणि कार्य करण्याचा प्रयत्न केला मात्र मग समाजाकडून त्याला कसा प्रतिसाद मिळाला? तर इस्लामी धर्मप्रमुखांनी अकबराला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण अकबर हा बादशहा असल्याने हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. जनतेकडूनही अकबराला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याचा नवीन धर्म दिन–ए–इलाही त्याच्याबरोबरच लयाला गेला म्हणजे अकबराने मानवतावादी दृष्टीकोनातून केलेला प्रयत्न मुस्लीम समाजाने स्वीकारलेला नव्हता.

याची आणखी काही उदाहरणे सांगता येतील. त्यांतील एक प्रमुख उदाहरण म्हणजे दारा शुकोह. या मुघल राजपुत्राने इस्लामी परंपरेच्या विरोधी जात उदारमतवादी इस्लाम मांडण्याचा प्रयत्न केला पण परिणाम काय झाला? तर त्याची हत्या केली गेली.  

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या इस्लामच्या प्रकांड पंडिताने पवित्र कुरआनावर भाष्य करत त्याची कालानुक्रमे पुनर्रचना झाली पाहिजे अशी मांडणी केली मात्र आझादांना मोजकेच अनुयायी मिळाले. याचा अर्थ समाजाने त्यांचे मत स्वीकारले नाही. त्यांना पाठिंबा मिळू शकला नाही.

...म्हणजे इस्लाममध्ये काही दोष निर्माण झाले होते, इस्लामचा प्रवाहीपणा संपून त्यात साचलेपणा आला होता आणि हे दोष आणि हा साचलेपणा दूर करण्यासाठी धर्मचिकित्सा होणे आवश्यक झाले होते पण त्याला इस्लाममध्ये स्थान नव्हते. याबाबत हमीद दलवाई यांनी मांडलेला विचारही बरेच काही सांगून जातो. एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे की, ‘इस्लामची निरपेक्ष भावनेतून चिकित्सा करणारा मुस्लीम विचारवंत अजून जन्मालाच आलेला नाही. असा विचारवंत मी अजून बघितलेला नाही.’ – हमीद दलवाई 

इस्लाममधील लोकशाही, समाजवाद, बंधुता 
इस्लाममध्ये बंधुता आहे, लोकशाही आहे असे म्हटले जाते पण कुणी विरोधी मत मांडले तर त्याला प्रचंड विरोध होतो. अकबर, दारा शुकोह, सरमद, मौलाना आझाद ही वर उल्लेखलेली उदाहरण तर आहेतच. आधुनिक काळातले उदाहरण म्हणजे प्रेषितांची व्यंगचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे चार्ली हेब्डो या मासिकाच्या कार्यालयावर झालेला हल्ला. विरोधी मत ऐकून घेण्याच्या मानसिकतेचा प्रचंड अभाव इस्लामी परंपरेमध्ये दिसून येतो. अर्थात हे सगळ्याच धर्मांत कमीअधिक प्रमाणात आहे पण मुस्लीम समाज या अशा बाबतीत जास्त प्रतिक्रियावादी आहे. 

धर्म परिपूर्ण – आचरण चुकीचे
मुळात इस्लाममध्ये काही दोष आहेत हेच मान्य करायला मुस्लीम समाजमन तयार होत नाही. इस्लाम हा दैवी, परिपूर्ण आणि अपरिवर्तनीय धर्म आहे अशी मुस्लीम समाजाची श्रद्धा होती आणि आजही आहे. ग्रंथ प्रामाण्यवादी असणाऱ्या या धर्मात काही दोष आहेत हेच मान्य करायला मुस्लीम समाजाचे मन धजावत नव्हते. उलट इस्लामधर्मीयांवर जी संकटे आली, धर्मपरंपरांमध्ये जे दोष निर्माण झाले आहेत त्यांचे मूळ धर्माचे आचरण व्यवस्थित न होण्यात आहे. आपले धार्मिक आचरण चुकीचे आहे, आपल्या धर्माचरणातच काही दोष आहेत ज्यांमुळे आपण अडचणीत आलो आहोत असे मुस्लीम समाज मानतो. 

आपण धर्माबरहुकूम वागलो, आपला धर्म व्यवस्थित अनुसरला तर आपल्या वाट्याला दुःख येणार नाही, आपल्या धर्माचा पराजय होणार नाही असे हा समाज समजतो. या आत्ममग्नतेचा मोठा फटका मुस्लीम समाजाला बसला आहे पण लक्षात कोण घेतो?  

या अशा पार्श्वभूमीवर आपल्याला हमीद दलवाई यांचे कार्य आणि व्यक्तित्व यांकडे पाहावे लागेल. त्यातून दलावाईंचे कार्य किती अवघड होते हे लक्षात येईल. तसेच त्यांच्या व्यक्तित्वाची जाणीवही होईल. जिथे विरोधी मताला जागाच नव्हती तिथे हमीद दलवाई नुसते विरोधी मत मांडून थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोडही दिली. आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोर्चे, व्याख्याने, परिषदा, संवाददौरे आयोजित केले. हे एक अफलातून धाडस होते. 

कृतिशील विचारवंत 
आपल्या समाजामध्ये अनेक सुधारक होते, आहेत. यांतील काही सुधाराकांनी फक्त समाजसुधारणेचे विचार मांडले मात्र त्यावर कोणतीही कृती केली नाही. हमीद दलावाईंचे मात्र तसे नव्हते. त्यांनी जे विचार मांडले त्यांना कृतीची जोड दिलेली होती त्यामुळे हमीद दलवाई हे एक कृतिशील विचारवंत आणि कार्यकर्ते होते. त्यांच्या काळातील घटनांवरून ही गोष्ट लक्षात येते. 18 एप्रिल  1966 रोजी हमीद दलवाई यांनी तलाक प्रथेला विरोध करण्यासाठी अवघ्या सात मुस्लीम महिलांचा मोर्चा काढला होता. नंतरच्या काळातही दलवाईंनी आपल्या विचारांना कृतीची जोड देण्याचा प्रयत्न केला. दलवाई यांचे हे वेगळेपण प्रकर्षाने उठून दिसते.  

निर्भीड कार्यकर्ता 
निर्भीडपणा हा हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा गुण होता. ते विरोधाला घाबरणारे सुधारक नव्हते. अनेक कठीण प्रसंगांतही ते कधी डगमगले नाहीत की घाबरले नाहीत. धैर्याने ते अशा प्रसंगांना सामोरे गेले. सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यातील मोमीनपुरा या मुस्लीमबहुल भागात हमीद दलवाई यांचा संवाददौरा काढण्यात आला होता. या वेळी काही कट्टरपंथीयांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. अलीगढ येथेही अशीच घटना घडता-घडता टळली होती. मुंबई येथील एका मोर्च्यातही जमावाने त्यांच्यावर लाठीहल्ला केला होता. इतरही काही प्रसंगी दलवाई यांना मारहाण होण्याचे प्रसंग उद्‌भवले होते. 

‘हमीद दलवाई यांना नैसर्गिक मृत्यू आला; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही ही एक आश्चर्याची गोष्ट आहे.’ असे नरहर कुरुंदकर म्हणाले होते. यावरून दलवाई यांच्या जिवाला असणाऱ्या धोक्याची कल्पना येते मात्र दलवाई अढळ राहिले. त्यांनी आपले कार्य नेटाने चालू ठेवले. त्यात कधीही खंड पडू दिला नाही.

वास्तववादी सुधारक 
ज्या सुधारणांचा पुरस्कार हमीद दलवाई करत होते त्या सुधारणा समाज लगेच स्वीकारणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्यांच्या कार्याला समाजातून, त्यातल्या त्यात उदारमतवादी हिंदू आणि समाजवादी गटांतून प्रचंड पाठिंबा मिळत होता. त्यांच्या कार्याचे प्रचंड कौतुक होत होते. धर्माची पोलादी पकड असणाऱ्या मुस्लीम समाजातूनही अल्पावधीतच त्यांना दोनशे-तीनशे अनुयायी मिळाले. त्यांचे कार्य विस्तारत गेले मात्र दलवाई स्तुतीने हुरळून जाणारे सुधारक नव्हते. त्यांना वास्तवाची जाणीव होती आणि आपण ज्या सुधारणांचा पुरस्कार करत आहोत त्यासाठी दीर्घकाळ चळवळ करावी लागणार आहे याचीही जाणीव होती. 

18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवाई यांनी तलाक प्रथेला विरोध करण्यासाठी अवघ्या सात मुस्लीम महिलांचा मोर्चा काढला होता तेव्हापासून ते मुस्लीम समाजातील अन्याय्य अशा ‘तीन तलाक’ प्रथेला विरोध करत होते, समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करत होते पण या प्रथेवर बंदी घालणारा कायदा मात्र 2017मध्ये म्हणजे सुमारे पन्नास वर्षांनंतर केला गेला. हमीद दलवाई यांच्या द्रष्टेपणाचे हे एक उदाहरण झाले. 

... मात्र ज्या इतर अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न ते करत होते त्या सुधारणांमुळे ज्या अयोग्य प्रथा बंद व्हायला हव्या होत्या त्यांपैकी काही प्रथांचे प्रचलन–आचरण कालौघात कमी झाले असेल पण त्यांवर कायद्याने अजूनही बंदी घातली गेलेली नाही. त्यासाठी अजूनही कायदे झालेले नाहीत यावरूनही हमीद दलवाई यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. 

आपण अंगीकारलेल्या या कार्याची पुरेपूर जाणीव दलवाईंना होती. ‘इस्लामला मानवतेचा अंगीकार करायला लावणे हे काम इतके मोठे आहे आणि कठीण आहे की, कोणीही एक माणूस त्याला पुरा पडणार नाही याची मला जाणीव आहे.’ असे त्यांनीच एका लेखात लिहिले आहे. या सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘मी मुसलमान आहे असे म्हणत’ संघर्ष करण्याची त्यांची तयारीसुद्धा होती. त्यांच्या दृष्टीने हे धर्मयुद्ध होते, जिहाद होता पण दुर्दैवाने त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही. 

सेक्युलर जडणघडण - सेक्युलर व्यक्तिमत्त्व
हमीद दलवाई यांची जडणघडण ही खऱ्या अर्थाने सेक्युलर जडणघडण होती. मुस्लीम समाजातील दोष दाखवत असताना, त्याच्यावर टीका करत असताना, इस्लामची निरपेक्ष चिकित्सा करत असताना ते हिंदू धर्माची आणि हिंदुत्ववाद्यांची पोलखोल करण्यासही कचरले नाहीत. हिंदू धर्मातील दोषांवरही त्यांनी तेवढीच टीका केली जेवढी ते मुस्लिमांवर करत होते. ते नेहमीच हिंदुत्ववादाला विरोध करत राहिले. या देशामध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यात सलोखा निर्माण व्हायचा असेल तर हिदूंमधील जातीयवादी वृत्ती बदलणेसुद्धा गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले होते. 

हमीद दलवाई यांच्या मृत्यूनंतर शोकसंदेशात भावना व्यक्त करताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की, ‘हिंदू समाजालासुद्धा एका हमीद दलावाईंची गरज आहे.’ यातच दलावाईंचे मोठेपण सामावलेले आहे. 

‘भारतीय मुस्लीम समाजाविषयी अद्यापही नीटशी कल्पना नसलेला फार मोठा वर्ग भारतात अस्तित्वात आहे. हिंदू-मुस्लीम प्रश्नांच्या संदर्भात मुस्लीम जनमानस नीट समजून घेण्याचा प्रयत्न अद्यापदेखील होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.’ असे हमीद दलवाई म्हणाले होते. हमीद दलवाई यांचा मृत्यू होऊन आज चाळीसहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत पण त्यांनी व्यक्त केलेले हे मत आजही तितकेच लागू आहे. 

आजही मुस्लीम समाजाविरोधात प्रचंड टीका केली जाते, त्यांचा प्रचंड द्वेष केला जातो, या समाजाला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, त्याला सतत दूषणे दिली जातात, पाकिस्तानधार्जिणे म्हणून त्यांना सतत हिणवले जाते. सीएए आणि एनआरसी यांच्या माध्यामातून त्यांच्या देशप्रेमावर, त्यांच्या  नागरिकत्वावरच संशय घेतला जातो पण मुस्लीम समाजाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र होताना दिसत नाही. उलट नुसत्या संशयावरून, पेहरावावरून, फ्रीजमध्ये ठेवलेल्या मांसावरून संशय घेऊन त्यांचा बळी घेतला जात आहे. अशाने या देशात शांतता नांदणार कशी आणि हा देश ‘विश्वगुरू’ होणार कसा... हा मोठा प्रश्न आहे. अर्थात याला उदारमतवादी हिंदू अपवाद आहेत पण ही संख्या वाढली पाहिजे. तसेच मुस्लिमांचे लांगुनचालन झाले पाहिजे असा याचा अर्थ नक्कीच नाही. 

हमीदच्या मनाचा कानोसा 
रामचंद्र गुहा यांनी आपल्या ‘The Makers of Modern India’ या पुस्तकात हमीद दलवाई यांचा ‘दि लास्ट मॉडर्निस्ट’ असा उल्लेख केला आहे. अशा या लास्ट मॉडर्निस्टला मुस्लीम समाजाने त्यांच्या हयातीत तर स्वीकारले नाहीच पण मृत्यूनंतरही त्यांची उपेक्षाच केली. त्यांच्याशी चर्चा करण्याच्या नावाखाली त्यांची टिंगलटवाळी करणे, त्याची चेष्टा करणे, टर उडवणे, मारहाण करण्याचे प्रयत्न करणे असे अनेक प्रकार त्या वेळी केले गेले. आजही त्यांत खंड पडलेला नाही. 

त्यांचे विचार समजून घेण्याऐवजी ते कसे काफिर होते, नास्तिक होते, आरएसएसचे किंवा जनसंघाचे एजंट होते, मुस्लीमद्वेषी होते, त्यांनी कसे स्वतःचे दहन करून घेतले या पद्धतीचे गैरसमज चघळण्यातच मुस्लीम समाज धन्यता मानत आहे. खरेतर हमीद दलवाई हे समाजवादी विचारांचे उपासक होते. गांधीवादी आणि लोहियावादी कार्यकर्ते होते. अशा वेळी ते आरएसएसचे एजंट होते असे म्हणणे किती हास्यास्पद आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. 

दलवाई हे रूढ अर्थाने मुसलमान नव्हते, ते स्वतःही तसेच मानत होते. तरीही ते मुसलमान होते, सच्चे मुसलमान होते पण मुस्लीम समाजाला ते न रुचणारे होते... त्यामुळेच आज आपण म्हणू शकतो की, ‘मुस्लीम समाज हमीद दलावाईंच्या मनाचा कानोसा घ्यायला कमी पडला आहे. किंबहुना मुस्लीम समाजाने त्यांच्या मनाचा कानोसा कधी घेतलाच नाही.’ हे दुर्दैव. लवकरात लवकर मुस्लीम समाजाला याची जाणीव होवो हीच सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.

- अझरुद्दीन पटेल, कराड. 
azharhistory@gmail.com

Tags: Azharuddin Patel Speech Sahitya Akademi Muslim Islam Reforms Social Movement हमीद दलवाई अझहरुद्दीन पटेल साहित्य अकादमी मुस्लीम इस्लाम समाज सुधारणा व्यक्तिवेध Load More Tags

Add Comment