गेल्या महिन्यात ‘नेटफ्लिक्स’वर ‘दी हंटिंग ऑफ ब्लाय मॅनोर’ हॉरर सिरीज प्रदर्शित झाली आणि त्या सिरीजची वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांच्या त्यावर उड्या पडल्या. प्रेक्षकांना असलेल्या त्या प्रतीक्षेचं मूळ दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘दी हंटिंग ऑफ हिल हाऊस’ या सिरीजच्या यशामध्ये आणि तिच्या जबरदस्त परिणामामध्ये दडलेलं आहे आणि त्याहूनही अधिक त्या सिरीजचा कर्ता-लेखक-दिग्दर्शक माईक फ्लॅनॅगन याच्या शैलीमध्ये!
माईक फ्लॅनॅगन हे हॉरर सिनेमातलं एक मोठं नाव. त्यानं तयार केलेलं भीतीचं जग वैशिष्ट्यपूर्ण आहे... कारण ते जग ‘भीती एके भीती’ असं एकांगी नाही. त्याला सर्व तऱ्हेच्या भावनांची, सादरीकरणातल्या कल्पकतेची, कथावस्तूतल्या वैविध्याची जोड आहे... म्हणूनच त्याचे सिनेमे प्रेक्षकांना घाबरवून टाकण्यापलीकडे परिणाम करतात. ‘दी हंटिंग ऑफ ब्लाय मॅनोर’च्या निमित्तानं माईक फ्लॅनॅगनकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न...
एक लहानशी रूम. चार पांढऱ्या भिंती आणि एक दरवाजा. भिंतीला रेलून उभी असलेली, पांढऱ्या कपड्याखाली झाकलेली उंच वस्तू. तिच्यासमोर तीन कॅमेरे, तीन टीव्ही मॉनिटर, मोबाईल, लँडलाईन फोन, टायमर क्लॉक अशा विविध साहित्यासह लढाईच्या पवित्र्यात उभा असलेला ‘तो’!
कपडा सरकवला जातो आणि त्याखालचा जुनापुराणा, नक्षीदार चौकटीत बसवलेला आरसा नजरेस पडतो. दी लॅसर ग्लास... त्या आरशाचं संबोधन! कित्येक पिढ्यांपासून त्या आरशाच्या सान्निध्यात विचित्र मृत्यू घडत आले आहेत. त्यामागे आरशातली अमानवी शक्ती कारणीभूत आहे हे त्याला सिद्ध करायचं आहे. त्याचा पुरावा कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करायचा आहे... किंबहुना तो आरसाच नष्ट करायचा आहे... पण त्याला ते जमेल? जागेवरून तसूभरही न हलणाऱ्या आरशाला तो हरवू शकेल?
दिग्दर्शक माईक फ्लॅनॅगनने लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ‘ऑक्युलस - चॅप्टर थ्री - दी मॅन विथ दी प्लॅन’ ही तीस मिनटांची शॉर्टफिल्म. लहान जागा, साधा कॅमेरा, कमी पात्रं आणि कमी बजेट असतानाही ही फिल्म भय आणि थरार यांचा उत्तम अनुभव देऊन जाते.
या छोट्या फिल्मद्वारे माईक फ्लॅनॅगनचं भीतीच्या जगात पहिलं पाऊल पडलं. माईकने स्वतःच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘अॅब्सेन्टिया’, ‘ऑक्युलस’ (त्याच्याच शॉर्टफिल्मवर आधारलेला पूर्ण लांबीचा सिनेमा) या चित्रपटांमधून भयकारक अनुभवांची विशिष्ट रचना करण्यास सुरुवात केली.
त्या सिनेमांमध्ये कथेची मांडणी भय-मृत्यू यांच्याशी थेटपणे डील करणारी होती. ‘अॅब्सेन्टिया’मध्ये हरवणारी माणसं आणि एक भुयारवजा रस्ता यांचा असलेला विलक्षण संबंध होता... तर ‘ऑक्युलस’ या सिनेमात लहानपणी ‘लॅसर ग्लास’ या आरशामुळे बालपण होरपळलेले दोघं, बहीणभाऊ... आणि ते वयात आल्यानंतर त्या आरशाला नष्ट करायचे त्यांचे प्रयत्न यांची ही कहाणी होती. (आपल्याकडे ऑक्युलसचा रिमेक असलेला ‘दोबारा’ या नावाचा टुकार सिनेमा तयार झाला.)
माईकचं कथेच्या व्हिज्युअल मांडणीबाबतचं पडद्यावरचं भान विलक्षण आहे. केवळ कथांच्या रचनांमधून नाही तर सिनेमाचं शॉट डिव्हिजन (सीन कशा तऱ्हेने शूट करावा त्याची प्रक्रिया), एडिटिंग, कलाकारांचा अभिनय आणि शब्दांपेक्षा दृश्यांना महत्त्व देण्याकडे असलेला कल या साऱ्यांमधून माईकची कल्पकता दिसून येते.
सत्य आणि भ्रम यांतल्या सीमारेषा पुसून टाकणं हा तर त्याचा ट्रेडमार्क! त्या आधारे तो पुस्तकांच्या पानांत सापडणारे विभ्रम पडद्यावर प्रत्यक्ष निर्माण करतो आणि तेवढाच गोंधळून टाकणारा त्याचा अनुभव प्रेक्षकांना देतो. त्याच्या ‘हश’, ‘बिफोर आय अवेक’, ‘आउजा - ओरिजीन ऑफ इव्हील’ अशा प्रत्येक सिनेमांमध्ये त्यानं कथावस्तू, पटकथा, त्यांचं सादरीकरण अशा विविध गोष्टींत प्रयोग करून पाहिले... पण त्याचा खरा शोध होता तो भीती या भावनेबाबतचा...!
सिनेमाक्षेत्रात पडद्यावर भय प्रकट करताना कुणी भुताखेतांच्या चेहऱ्याला महत्त्व दिलं आहे... तर कुणी प्रेक्षकांना दचकवण्याच्या क्लृप्त्यांना! मात्र फारच कमी चित्रपटकर्त्यांनी प्रेक्षकांच्या मनात भय कसं निर्माण होईल याकडे लक्ष दिलं. माईक दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतो. त्यानं त्याच्या सुरुवातीच्या सिनेमांमध्ये प्रेक्षकांना भीतीचा अस्सल अनुभव देण्याच्या दृष्टीनं कथा आणि प्रसंग यांची रचना केली. त्याच्या सिनेमांमध्ये काही ‘जम्प स्केअर्स’ आहेत... मात्र ते अगदीच नावाला.
भीतीची वेगवेगळी रूपं सिनेमात असावीत यासाठी माईक प्रयत्नशील दिसतो. ‘बिफोर आय अवेक’ या सिनेमात एका लहान मुलाची स्वप्नं प्रत्यक्ष रूप घेतात. स्वप्नात फुलपाखरं दिसली तर त्याच्या रूममध्ये फुलपाखरं भिरभिरतात... पण एखादा भयप्रद चेहरा दिसला तर मात्र त्या लहानग्याच्या मनातल्या खळबळीची, त्यामुळे त्याला पडणाऱ्या स्वप्नांची भीती या सिनेमानं समोर आणली. तो सिनेमा हॉररपेक्षा सुपरनॅचरल ड्रामा या प्रकारात अधिक मोडतो. माईकच्या दुर्दैवानं तो सिनेमा निर्माण करणारा स्टुडिओ बंद झाल्यामुळे ‘बिफोर...’ चित्रपटगृहात कधीच प्रदर्शित झाला नाही. पुढे तो नेटफ्लिक्सनं सादर केला.
‘हश’ या सिनेमात मूकबधिर असलेली एक लेखिका निर्जन ठिकाणी असलेल्या घरात राहतेय. एक मास्कधारी हिंसक व्यक्ती तिच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते आणि ती लेखिका स्वतःच्या शारीरिक कमतरतेसह त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करते. माईक फ्लॅनॅगन आणि त्याची पत्नी - ‘हश’ आणि माईकच्या इतर सिनेमांची अभिनेत्री केट सिगल या दोघांनी मिळून तो सिनेमा लिहिला.
केटनं घराच्या आत राहायचं आणि माईकनं वेगवेगळ्या मार्गांनी त्या घरात शिरण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रयोगंमधून त्यांना कथा सांगण्याचे विविध पर्याय सापडले. कोणत्या तऱ्हेचा थरार किती वेळेपर्यंत कायम ठेवायचा याची गणितं त्यांनी मांडली आणि ‘हश’ सिनेमाची पटकथा तयार झाली.
कमी बजेटमध्ये तयार झालेला आणि भय-थरार यांचा उत्तम अनुभव देणारा माईक फ्लॅनॅगनचा हा आणखी एक सिनेमा. हॉरर सिनेमांमध्ये शेकडो वेळा वापरल्या गेलेल्या प्लॅंचेटसारख्या कल्पनेवर माईकनं ‘आउजा...’ हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला. परिचित चौकट असतानाही तो सिनेमा वेगळा ठरला हे त्याच्या लेखनाचं आणि दिग्दर्शीय कौशल्याचं यश!
माईक एकीकडे कथा, त्यातल्या भीतीच्या छटा यांतलं वेगळंपण मांडत होताच... शिवाय त्याबरोबरच त्यानं ती भीती सादर करण्याच्या पद्धतीसुद्धा बारकाईनं अवलंबल्या. त्याच्या चित्रपटांत जसे प्रेक्षकांना दचकवण्याचे प्रकार घडत नाहीत... तसेच हॉन्टेड, पोझेस्ट, घोस्ट असे रटाळ झालेले शब्द उच्चारलेही जात नाही. तो ते सारं प्रेक्षकांना उमगेल अशा खुबीनं मांडतो. त्याच्या पात्रांवर असलेली मृत्यूची किंवा विशेषतः भूतकाळाची सावली शब्दांविना अधोरेखित करणं, सिनेमातल्या काजळलेल्या वातावरणाची धग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं माईकला लीलया साधतं.
‘आउजा…’ नंतरच्या सिनेमानं माईकचं काम आणखी उंचीवर नेलं. तो सिनेमा होता ‘गॅरॉल्ड्स गेम’! माईकनं भयकथांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या स्टिफन किंग याची ‘गेरॉल्ड्स गेम’ ही कादंबरी अडॉप्ट करून तिचं सिनेमात रूपांतर केलं. माईक फ्लॅनॅगनला अडॉप्टेशन उत्तम जमतं. त्यानं त्याच्याच ‘ऑक्युलस’ या शॉर्टफिल्मचं रूपांतर पूर्ण लांबीच्या चित्रपटात असं केलं की, ज्यांनी ती शॉर्टफिल्म पाहिली आहे त्यांनासुद्धा त्या सिनेमातून नवी कथा पाहिल्याचा अनोखा अनुभव मिळाला.
‘ऑक्युलस’ या चित्रपटानं स्टिफन किंगला आधीच प्रभावित केलं होतं. त्यानं त्या चित्रपटाचं जाहीर कौतुकही केलं होतं. त्याच्या कादंबरीवर तयार झालेल्या ‘गॅरॉल्ड्स गेम’ या चित्रपटानं भय ही भावना नव्या चौकटीत सादर केली.
एकांतात असलेल्या घरात प्रणयाराधनात मग्न असलेलं वयस्क जोडपं, त्यानं तिचे हात पलंगाला बांधलेले आणि प्रणय पूर्ण होण्याआधीच त्याचा अवचितपणे झालेला मृत्यू. साथीदार गमावल्याचं दुःख आणि हतबलपणे बंदिस्त होऊन पडलेली असताना साकळत चाललेली मृत्यूची भीती अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची तिची धडपड सिनेमानं मांडली.
यामध्ये अगतिकपणातल्या मरणाचं भय आहेच... शिवाय त्या भयाचा एक पदर तिच्या भूतकाळाशीही जोडलेला आहे. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून त्या सिनेमाचं कौतुक झालं. माईकनं या सिनेमापासून अडॉप्टेशनचा सपाटाच लावला.
माईकनं शर्ली जॅक्सन या लेखिकेच्या ‘दी हंटिंग ऑफ हिल हाऊस’ या कादंबरीवर त्याच नावाची वेबसिरीज तयार केली. ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झालेल्या त्या सिरीजचा तो लेखक, प्रोड्युसर, दिग्दर्शक, क्रिएटर असं सर्व काही होता. त्यानंतरची त्याची सिरीज, ‘दी हंटिंग ऑफ ब्लाय मॅनोर’ ही हेन्सी जेम्स या लेखकाच्या ‘दी टर्न ऑफ दी स्क्रू’ या कादंबरीवर आधारलेली आहे. ती ऑक्टोबर २०२०मध्ये ‘नेटफ्लिक्स’वर आली.
या दोन्ही सिरीजमधून माईकनं हॉरर ड्रामासारखा दुर्मीळ (कदाचित नवा!) प्रकार हाताळला. या कथेला मोठं जुनंपुराणं घर, अंधारे कोपरे, कथा-पात्रांवर दाटलेलं मृत्यूचं सावट, अमानवी अस्तित्वाची चाहूल अशा आवश्यक गोष्टी तर आहेतच... शिवाय दिग्दर्शकानं कथेला निवळ हॉरर ट्रिटमेंट न देता अधिकाअधिक मानवी, संवेदनात्मक पातळीवर साकारलं.
गल्लाभरू गोष्टी अशा तऱ्हेनं टाळणं सोपं नसतं... मात्र माईकनं कथेला कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, पात्रांमधले दुरावे आणि त्यांच्या भावनिक-मानसिक गरजा असे अनेक पैलू बहाल केले... त्यामुळंच ही सिरीज अगदी चाणाक्ष प्रेक्षकांचेही अंदाज चुकवत पुढे सरकते. भयप्रद प्रसंगापासून सुरू होणारी ती कथा अगदी संवेदनशील पातळीवर भयाचा परिणाम निर्माण करत जाते.
माईकनं याच दिशेनं प्रयत्न करत ‘दी हंटिंग ऑफ ब्लाय मॅनोर’ ही सिरीज आणखी वेगळ्या ढंगात सादर केली. जुन्या काळातलं जुनं घर, भूतकाळातल्या घटनांचे वर्तमानावर होणारे परिणाम अशा समान गोष्टी असतानासुद्धा ही कथा आधीच्या सिरीजपेक्षा वेगळा परिणाम करते. या सिरीजमध्ये भय या भावनेइतकीच प्रेम भावनाही प्रबळ आहे.
‘दी हंटिंग...’ या दोन्ही सिरीजचं एडिटिंग ही त्यांची खासियत आहे. सिनेमा किंवा कोणतीही गोष्ट चित्रित करताना ती कशी एडिट होईल याचा आराखडा तयार असतो... (हे परदेशात घडतं. आपल्याकडे तेवढी शिस्त आणि प्लॅनिंग नाही.) मात्र या दोन्ही सिरिजच्या एडिटिंगची ट्रिटमेंट प्रथमपासूनच बारकाईनं ठरवली गेली होती. इथे एडिटिंग ही केवळ पडद्यावर प्रसंग उभी करण्याची तांत्रिक बाब न राहता कथनशैलीचा भाग होऊन गेली आहे. ‘ब्लाय मॅनोर’च्या बाबतीत तर अधिकच.
‘प्रेक्षकांना कळणार नाही’ या सबबीपोटी पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी शब्दांतून सांगण्याचा अट्टाहास आपल्याकडे केला जातो... मात्र माईक प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास टाकून त्या गोष्टी शाब्दिक स्पष्टीकरणाशिवाय मांडत जातो.
या दोन सिरीजच्या मधल्या वेळात माईकनं स्टिफन किंगच्या आणखी एका कादंबरीवर सिनेमा तयार केला. ‘डॉक्टर स्लीप’! हा सिनेमा तयार करणं हे एकाच नव्हे तर वेगवेगळ्या तऱ्हेनं आव्हानात्मक काम होतं. पहिलं म्हणजे स्टिफन किंगला राजी करणं.
‘डॉक्टर स्लीप’ हा किंगच्या ‘दी शायनिंग’ या प्रचंड गाजलेल्या कादंबरीचा दुसरा भाग. ‘शायनिंग’वर स्टॅनली क्युब्रिक या प्रतिभावंत दिग्दर्शकानं त्याच नावाचा सिनेमा तयार केला होता. तो जगभर गाजला. कल्ट क्लासिक म्हणून त्याला आजही गौरवलं जातं... मात्र किंगला तो सिनेमा आवडला नाही.
माईकला ‘डॉक्टर स्लीप’चं सिनेमातलं रूपांतरण हे ‘शायनिंग’चा सिक्वेल म्हणूनच अभिप्रेत होतं... ज्याला किंगची मान्यता सहजासहजी मिळाली नसती. माईक त्यात यशस्वी झाला... मात्र त्याच्यापुढचं आव्हान दुहेरी होतं. ‘शायनिंग’च्या तोडीस तोड असा सिनेमा तयार करताना कादंबरीशी इमान राखणंही आवश्यक होतं.
‘डॉक्टर स्लीप’ हा सिनेमा म्हणून आणि साहित्याचं रुपेरी पडद्यावरचं अडॉप्टेशन असा दोन्ही बाबतींत उत्तम उदाहरण ठरला. माईकनं त्यातली पात्रं, हिंसा असं सारं काही स्वतःच्या ढंगात मांडलं. त्यातल्या एका प्रसंगानं तर स्टिफन किंगही थरारला. ‘ऑक्युलस’पासून सुरू झालेला, पात्रांच्या भूतकाळाचा वर्तमानाशी असलेला संबंध हा फॅक्टर माईकला इथे आयताच मिळाला. या तऱ्हेनं आणून भूतकाळ वर्तमानाशी जोडणं हा माईकचा दुसरा ट्रेडमार्क...!
माईक फ्लॅनॅगनकडे विलक्षण कल्पकता आहे. ती कथेपासून दिग्दर्शीय सादरीकरणापर्यंत सर्वत्र जाणवत राहते. परिचित प्रकारांपासून नव्या पद्धतीच्या कथांपर्यंत, ओरिजिनल कामांपासून अडॉप्टिव्ह लेखनापर्यंत सर्व प्रांतांत तो मुशाफिरी करतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर स्वतःची छाप सोडतो.
प्रेक्षकांना घाबरवण्यापलीकडे जाऊन तो भय या प्रकाराकडे पाहतो. भयाच्या सान्निध्यात निर्माण होणाऱ्या किंवा बदलणाऱ्या भावना, परिस्थितीनुसार माणसाच्या वर्तनाच्या बदलत जाणाऱ्या छटा अशा गोष्टी तो सादर करू पाहतो... त्यामुळंच त्याच्या सिनेमांची कथा ‘भीती’ या एका शब्दावर तोललेली राहत नाही. ती निरनिराळ्या घटकांशी बिलगून सामोरी येते... म्हणून त्याचे सिनेमे नवनवे अनुभव बहाल करतात.
माईककडे सिनेमासाठी लागणारं तांत्रिक कसबही मुबलक आहे... त्यामुळं त्याला त्याची कथा रूढ सादरीकरणांना सोडून, कधी मुरड घालून, कधी पूर्णतः तोडून सांगता येते. तो स्वतः एडिटर असल्यानं त्याची एकूणच मांडणी बारकाईनं आखली जाते आणि ती तशीच पडद्यावरसुद्धा उमटते.
रहस्यपटांच्या प्रांतात हिचकॉकचं नाव ज्या सन्मानानं घेतलं जातं... तितकाच आदर माईक फ्लॅनॅगनच्या नावाला आणि त्याच्या सिनेमांना मिळत आहे. तो यथोचित आहे... पण ही माईकची केवळ चौदा वर्षांतली कमाई आहे. त्याच्या पोतडीतून वैशिष्ट्यपूर्ण शैलीसह विविध कथा बाहेर पडतच राहतील... कारण हॉरर सिनेमांच्या अंगंणातल्या या झाडाला आत्ता कुठे बहर येऊ लागला आहे...!
- किरण क्षीरसागर
kiran2kshirsagar@gmail.com
माईक फ्लॅनॅगनचे सिनेमे कुठे पाहाल?
युट्यूबवर - ऑक्युलस शॉर्ट फिल्म
नेटफ्लिक्स - ऑक्युलस (सिनेमा), हश, गेरॉल्डस् गेम, दी हंटींग ऑफ हिल हाऊस, दी हंटींग ऑफ ब्लाय मॅनोर
अमेझॉन प्राईम व्हिडीओ - ऑक्युलस (सिनेमा), डॉक्टर स्लिप.
Tags: मराठी सिनेमा किरण क्षीरसागर माईक फ्लॅनॅगन भयपट Cinema Horror Michael Flanagan Load More Tags
Add Comment