कोरोनानंतरचे जग कसे असेल?

फोटो: कर्तव्य साधना

सध्या जगात कोरोनाने जे थैमान घातलंय ते ‘न भूतो न भविष्यति’ असे आहे. बहुरंगी, बहुढंगी, गरीब, श्रीमंत असे संपूर्ण जगच कोरोनाने आपल्या कवेत घेतलंय. कम्प्युटरच्या भाषेत 'जग रिबूट (reboot) होतंय', असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण रिबूट झाल्यावर कोरोनानंतरचे जग कसे असेल या विषयी एक अनामिक भीती, चिंता, उत्सुकता सर्वत्र दाटून आलीय. आपण सर्वजण एका वेगळ्याच संक्रमणातून जात आहोत.            

एका बाजूला, माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती चटकन तळागाळापर्यंत गेल्यामुळे ही साथ काहीशी आटोक्यात आली असे म्हणावे, तर दुसऱ्या बाजूला नको तितक्या माहितीचा भडीमार मिनटा-मिनटाला होतोय, आणि त्याचा मनावर उगाचच ताण येत आहे.

त्यातल्या त्यात काही गोष्टी 'old-is-gold' असं म्हणत आपलं अस्तित्व ठसठशीतपणे जाणवून देत आहेत. रहदारीचा आवाज नसल्याने स्पष्टपणे ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट मनाला सुखावतोय. एरवी सुपरमार्केटमुळे आजवर लक्ष न गेलेला घरासमोरील कोपऱ्यातला भाजीपाला विकणारा आता आपलासा वाटतोय. झोमॅटो - स्वीगी यांवरून ऑर्डर केलेल्या पिझ्झा-बर्गरपेक्षा घरीच बनवलेला साधा डाळ-भात भूक शमवतोय. एरवी कामानिमित्ताने बाहेर वेगवेगळे मुखवटे बाहेर घालून फिरणारा चाकरमानी क्वारंटाइनमुळे आपल्या कुटुंबीयांसोबत मुखवट्याविना शांत पडून आहे. मोबाईलवरील इन्स्टंट न्यूज अ‍ॅप्सपेक्षा चोवीस तास धीर धरत दुसऱ्या दिवशी येणारे वृत्तपत्र वाचायला अधिक विश्वासार्ह वाटतेय.      

मूळच्या युक्रेनच्या, पण आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या पन्नाशीतील माझ्या ऑफिसमधील ज्येष्ठ सहकाऱ्यासोबत मी ऑनलाईन चॅटिंग करत होतो. अमेरिकेतील कोरोनोच्या संदर्भात 'तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे' असे काळजीच्या सुरात त्याला विचारले, तर त्याने खांदे उडवीत 'मी तसंही नेहमी सोशल डिस्टंसिंग पाळतो, त्यामुळे मला कोरोनामुळे काही जास्त फरक पडला नाही. कोरोनापेक्षा घरात राहायची भीती जास्त आहे लोकांमध्ये.' असे उत्तर दिले. त्याच्या या काहीशा वेगळ्या दृष्टिकोनावर मी निरुत्तर झालो. त्याला रिप्लाय म्हणून दोन हात जोडल्याची फक्त एक स्मायली पाठवून दिली! 

खरंच या साथीतून मानवजातीला खूप काही शिकायचं आहे. बरीच गृहीतकं परत मांडावी लागणार आहेत. आणि हे सारे धडे एकरेषीय असून चालणार नाहीत. तर विज्ञान, अर्थशास्त्रीय, आरोग्य, मानसिक, सामाजिक, कला, साहित्य, धार्मिक अशा सर्व परिप्रेक्ष्यातून  या बदलाकडे आता आपल्याला पाहावं लागेल. या परिणामांची व्यामिश्रता समजून घेण्यासाठी क्रॉस - फील्ड निष्णातांची जगाला प्रचंड गरज लागेल असं दिसतंय.

पीटर थील हे अमेरिकेतील एक अब्जाधीश. 1998 मध्ये ऑनलाईन पेमेंटची प्रथम कल्पना मांडणाऱ्या 'पे-पाल' या कंपनीच्या सह-संस्थापकांपैकी एक. त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठात काही वर्षांपूर्वी एक विधान केलं होतं. त्या विधानाची पार्श्वभूमी अशी- ऐंशीच्या दशकात विज्ञानाशी निगडित लोकांनी, 2020 पर्यंत जगात विज्ञानामुळे काय काय बदल होतील याच्या सुरस कथा सांगण्यास सुरुवात केली होती. बऱ्याच जणांनी असे भाकीत केले होते की, निसर्ग मनुष्याच्या अधिक नियंत्रणात येईल. आजूबाजूला उडणाऱ्या कार असतील, मोठमोठ्या दुर्धर आजारांवर औषधे असतील, पृथ्वी आणि पृथ्वीबाहेरही मानवाने त्याच्या प्रगतीची पताका फडकवलेली असेल, वगैरे वगैरे. पण आज जर आपण आजूबाजूला पाहिले तर या स्वप्नापासून (जरी मानवाने काही प्रमाणात प्रगती केली असली तरी) आपण बरीच वर्षे दूर आहोत. तेव्हा मानवजातीच्या या 'poor - performance' च्या पार्श्वभूमीवर येल विद्यापीठात पीटर असं म्हणाला की, 'We wanted flying cars by now, instead we got 140 characters' (आम्ही आतापर्यंत आपल्या आजूबाजूला उडत्या कार असण्याची अपेक्षा केली होती, पण त्या ऐवजी आम्हाला 140 अक्षरांचे बंधन असलेलं ट्विटर मिळालं). 'जगातील बरंच संशोधन हे आयटी क्षेत्राभोवती नको तितक्या प्रमाणात रेंगाळलंय आणि त्यामुळे विज्ञानाच्या इतर क्षेत्रावर दुर्लक्ष झालंय' असा गर्भित अर्थ असलेल्या या विधानावर सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे.            

नफाकेंद्रित भांडवलशाही आणि विज्ञान एकत्र आले खरे पण त्यातून जे तंत्रज्ञान जन्मास आले त्याने जगाचे किती मूलभूत प्रश्न सोडविले आणि किती नवीन समस्या तयार केल्या, याचे कठोर परीक्षण करण्याची आता वेळ आलेली आहे. मंगळ आणि इतर ग्रहांवर मानवी वसाहत वसविण्याच्या देशा - देशांतील महत्वाकांक्षेसोबतच आपल्या आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या विषाणूंची शास्त्रीय वर्गवारी करणेही तितकेच महत्वाचे आहे, हे आता समजून घ्यावे लागेल. अर्थात यासाठी सर्व देशांना एकत्र येऊन युद्धपातळीवर हे काम करावे लागेल.

कोरोनाची ही साथ, विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वैयक्तिक वापर करणाऱ्या पण एरवी या क्षेत्राशी कसलेही देणेघेणे नसणाऱ्या सर्वांनाच आरसा दाखवणारी आहे. 'वैज्ञानिक नावाचा गूढ प्राणी कोण? तो कोणत्या परिस्थितीत संशोधन करतो? त्यांना निधी कोण पुरवते?' यांविषयी काहीही माहिती नसलेले, 'अरे वैज्ञानिकांना कोरोनावर औषध सापडते की नाही?' असे विचारत बसतात. संपूर्ण जगाला लागू पडेल असे औषध शोधण्यासाठी या क्षेत्रात निष्णात असलेल्या पण जगभर विखुरल्या गेलेल्या संशोधकांमध्ये समन्वय लागेल. ती फौज अशी चटकन कशी तयार होईल?

आज जगाला केवळ कोरोना व्हायरसवर लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांचीच आवश्यकता आहे असे नव्हे, तर विज्ञानावर विश्वास असलेले आणि त्याचबरोबर संशोधनासाठी लागणारा आर्थिक निधी उभा करू शकणारे तज्ज्ञ मंडळींचीही आज तितकीच गरज आहे. तर दुसरीकडे, क्लिष्ट संज्ञा आणि व्याख्या यांच्या कचाट्यातून विज्ञानाला मुक्त करून कलेच्या माध्यमातून, साध्या सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे लोकही आता लागतील.

या साथीची सर्वांत जास्त झळ पोहोचलेले बलाढ्य युरोप आणि अमेरिका या संकटातून योग्य तो धडा घेतीलच, पण भारत यातून काही धडा घेईल का? एका बाजूला या साथीच्या फैलावामुळे देशातील विविध यंत्रणा कोसळण्याची भीती वाटतेय; तर दुसरीकडे, अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे जेरीस आलेल्या गरीब जनतेचे होणारे हाल पाहून मन विषण्ण होतंय. भारत यातून काही शिकेल का? की पाश्चात्त्य देशांपेक्षा झळ कमी पोहोचली म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाला दूर करून आपण भारतीय संस्कृतीचे गोडवे गात बसू?

टाळेबंदीमुळे शेअर मार्केट काही वर्षे मागे गेलाय म्हणून काही उदास आहेत, तर दुसरीकडे टाळेबंदीमुळे प्रदूषण कमी होऊन पृथ्वी मात्र काहीशी निवांत झाली आहे. जगातील ही शीतलता फक्त अशा साथीमध्येच अनुभवण्यास मिळावी का? की राजकीय इच्छाशक्ती हा आल्हादायकपणा पुढेही मिळवून देण्यासाठी काही उपाययोजना आखेल?

देश विकसित असो वा विकसनशील, या साथीत माणसे सर्वांत जास्त घाबरली आहेत त्याच्या मुळाशी दोन कारणे आहेत. एक कारण म्हणजे या साथीच्या आजाराने उद्भवणारा संभाव्य मृत्यू आणि दुसरं म्हणजे लॉकडाउनमुळे निर्माण झालेला पोटा-पाण्याचा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न माणसाला आदिम काळापासून सतावत आले आहेत. आणि या दोन्ही प्रश्नांवर उतारा शोधण्यासाठी बहुतांश मानवजात अनुक्रमाने धर्म आणि राजकारण यांचाच आधार घेते. या दोन्हीही मानवनिर्मित व्यवस्था या मोठ्या साथीमुळे पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. धर्म तोंडावर आपटलाय तर राजकारण तोंड बंद करून बुक्याचा मार खातोय.  

कोरोनात देवांनी खरेच मैदान सोडले आहे. त्यामुळे लोकांना आकर्षून घेऊ शकेल अशा नवीन कथेची फेरमांडणी धर्मगुरूंना आता कोरोनाच्या प्रादुर्भावात करावी लागेल. तर राजकारणात सामाजिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य हे मुद्दे आता तरी देशांतर्गत राष्ट्रवाद आणि प्रांतवाद यांपेक्षा वरचढ ठरतील, अशी किमान अपेक्षा आपण करू शकतो.

जागतिकीकरणामुळे प्रत्येक देशांचे पाय एकमेकांत अडकलेले आहेत. मात्र असे असले तरी काही प्रमाणात प्रत्येक देशाला (अशा साथीच्या अडचणीला तोंड देण्यासाठी) स्वयंभू व्हावे लागेल, ही मागणी आता प्रत्येक देशात जोर पकडेल असे दिसतेय. या संदर्भात ट्रम्प आणि मोदी या  दोन बलाढ्य नेत्यांचे औषधासंदर्भात बोलणे बरेच काही सांगून जाते. ट्रम्प यांनी काहीशा हतबलतेतून आलेल्या उद्वेगाने मोदींना (कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरणारे) मलेरियाचे औषध तातडीने पाठविण्याचा धमकी वजा इशारा दिला आणि आर्थिक परिणामांची जाणीव असल्याने जास्त आढेवेढे न घेता मोदींनी ती सारी औषधे पाठवून दिली. ही घटना मानवतेच्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रशंसनीय असली तरी सत्ताधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दोन पॉवरफुल नेत्यांचा हा एक हतबल क्षण आहे!

अशा महासाथीची शक्यता परत उद्भवली तर त्यापासून दक्ष राहण्यासाठी प्रत्येक देशाला आता स्वतंत्र यंत्रणा उभारावीच लागेल. त्यासाठी मोठा निधी लागेल. राज्यकर्ते हा निधी कसा उभा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्वांच्याच मनात बऱ्याच प्रश्नांची गर्दी झालीय. ही साथ कधी संपुष्टात येईल? ढासळत्या अर्थव्यवस्थेची वैयक्तिक आणि देशपातळीवर किती मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल? विवेकवाद्यांसाठी हा काळ एक सुवर्णसंधी असेल का? उठसूट बाहेर पडणाऱ्या लोकांना घरात राहणं आवडू लागेल का? की एकांतवास म्हणजे 'क्वारंटाईन' म्हणत त्याला अधिकच कमी लेखलं जाईल? या साथीचे खापर (चीनबरोबरच) WHO वर फोडलं जाईल का? की IMF (International Monetary Fund) आणि वर्ल्डबँक या दोन संस्थांप्रमाणेच WHO ला देखील आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड महत्त्व येईल? मूळ पर्यावरण मुद्द्यावरच्या दुर्लक्षाचे काय? की तेथेही आपण काही मोठे संकट येण्याची वाट पाहतोय? इटली, न्यूयॉर्क, दुबई व एकंदरीतच जगातील पर्यटन क्षेत्राचे ग्लॅमर परत येण्यास किती वेळ लागेल? कोणाकडे असतील या साऱ्या प्रश्नांची उत्तरे? आणि ही उत्तरे किचकट असतील की विश्वास न बसण्याएवढी साधी सोपी? सध्या तरी (नोबेल पुरस्कारप्राप्त) बॉब डॅलन या अमेरिकन गायकाने 1962 मध्ये लिहिलेलं हे गीत आठवण्याशिवाय काही पर्याय नाही...

How many ears must one person have
Before he can hear people cry?
And how many deaths will it take 'till he knows
That too many people have died?
The answer, my friends, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind...

-  डॅनिअल मस्करणीस, वसई
 danifm2001@gmail.com
(विवेकवादी गटामध्ये सहभागी झाल्यानंतर लेखकाने एकूणच विवेकवाद व व्यक्तिगत आणि सामाजिक चर्चामंथन करणारे 'मंच' हे अतिशय महत्वाचे पुस्तक लिहिले. साधना प्रकाशनाने हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित केले आहे.) 

Tags: कोरोना विज्ञान तंत्रज्ञान संस्कृती वैज्ञानिक अर्थव्यवस्था भारत युरोप अमेरिका Daniel Mascarenhas Corona COVID19 Science Technology Culture Scientist Economy India Europe America World after corona Load More Tags

Comments: Show All Comments

damodar vishnu lele

सुंदर सर्वस्पर्शी लेख.

Alphie Monteiro

विज्ञानाचा आग्रह मांडणारा विवेकनिष्ठ उत्तम लेख.

प्रदीप मालती माधव (धुळे)

धर्म सुट्टी वर आणि विज्ञान ड्यूटीवर अशी परिस्थिती संपूर्ण जगात आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा धर्माकडे आकर्षित करण्यासाठी नवनविन क्लुप्त्या शोधल्या जातील. ..... एकुणच कोरोना नंतर काय? हा सर्वसामान्यांच्या मनात भेडसवत असलेल्या प्रश्नाचे सर्वांगाने छान विवेचन लेखकाने केले आहे.

Dattaram Jadhav.

थोडक्यात पण वैविध्यपूर्ण महत्वाची माहिती.

John Colaco

चांगले विश्लेषण।।।।

Sachin Mendes

खूप सोप्या भाषेत व चांगली उदाहरणे देऊन विषय मांडला आहे. कोरोनापश्चात जग हे जागतिक अर्थव्यवस्था व वैयक्तिक क्रयशक्तीवर खूप अवलंबून असणार आहे. ते जर लवकर रूळावर आलं तर ‘येरे माझ्या मागल्या’ होण्याची शक्यता अधिक.

RAVISHANKAR PILLAI 0035739906

कोरोना पूर्व , कोरोनाजन्य आणि कोरोनापश्चात या तिन्ही भागाची उत्तम सांगड लेखकाने घातली आहे . उत्तम विवेचन .

Bernadette Rumao

क रोना संदर्भात विविध स्तरावर काय स्थिती असेल याचा आढावा घेणारा लेख. दोन पॉवर्फुल नेत्यांमधील हतबल क्षण.अगदी खरं.धर्म या संस्थेला हादरे बसण्याचा हा काळ जरूर आहे.लेख आवडला.

Dominic Gonsalves

अभ्यासपूर्ण लेख आहे.

संजय डाबरे

अथा योग्य माहिती, खुप मोल्ययवान. आभारी.

Cajetan Gonsalves

Well written with dip thinking

Carmeline Rodrigues

Very well explain.

Cyril

Unlike fear and endless desires driving the human race, mankind when faced with immient fear of death in wake of crisis such as these, a fundamental truth of life is being searched, well journey will continue in its search for meaning as long as we are inhabitants in this world...

Add Comment

संबंधित लेख