मुक्त स्त्रीचे गाणे

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या 'टिपंवणी' या आत्मचरित्रपर पुस्तकाविषयी  

(फोटो सौजन्य: डॅनिअल मस्करणीस)

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे 'टिपंवणी' हे आत्मचरित्रपर पुस्तक नुकतेच वाचनात आले. सर्वसामान्य गरीब धार्मिक ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्या व वसईतील माणिकपूरसारख्या खडकाळ प्रदेशात उभी हयात गेलेल्या डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा मराठी भाषेतील सिद्धहस्त साहित्यिका होईपर्यंतचा प्रवास थक्क करणारा तर आहेच, पण तो खऱ्या अर्थाने मुक्त स्त्रीचे गाणे गाणारा आहे. आपल्या क्षमता स्थळांचा व कौशल्याचा सुयोग्य वापर करत त्यांचे स्वतःला साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात मनःपूर्वकपणे झोकून देणे प्रेरणादायी आहे. समोर योग्य ध्येय असेल तर लग्नाच्या साखळीत न अडकता चांगले 'क्वालिटी' आयुष्य जगता येऊ शकते, हे  'टिपंवणी' या आत्मचरित्रातून आपल्याला अप्रत्यक्षरीत्या उमगते.      

वसईतील तत्कालीन 1960-70-80 च्या दशकातील सामाजिक जीवनाची स्पंदनेही या पुस्तकात प्रभावीपणे आणि मोकळ्या ढाकळ्या रूपात उमटलेली आहेत. आत्मचरित्र म्हणजे स्मरणरंजन. आणि स्मरणरंजन म्हटले म्हणजे आपल्याला फक्त आनंददायी आठवणींचाच झरा स्मरतो. पण कित्येक त्रासिक, दुःखदायक आठवणी काळाच्या ओघात आपण विसरून जातो किंवा त्यावर उदात्तीकरणाचा थर तरी बसतो. पण आपल्या आत्मचरित्रात घरातील पुरुषांचे दारू पिऊन बायकांवर हात उगारणे आणि ते पाहून लहान मुलांचे घाबरून कोपऱ्यात बसणे, पावसाळ्यात शेणाने सावरलेल्या कुडाच्या घरात जमिनीला धरणारे 'ओल', उघडयावर शौचास जाण्यासाठी होणारा त्रास, तेव्हाचे वेगवेगळे त्वचेचे आजार झालेली माणसं, स्वयंपाकासाठी सरपणही गृहीत न धरू शकणारी गरीब परिस्थिती असे सर्व बरे वाईट अनुभव लेखिका प्रांजळपणे आपल्यासमोर आणते आणि तेही कमालीच्या चित्रमय भाषेत.      

माणिकपूर हे लेखिकेचे जन्मगाव. 'माणिकपूर' म्हणजे वसईतील नापीक शेतजमीन (खारट मातीची जमीन) जास्त असलेला प्रदेश. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ही दगडाळ जागा आठ महिने तशीच पडून असायची. पावसाळयात भातशेती करून त्यातून मिळणारे अत्यल्प उत्पन्न पाहता ही शेतजमीन येथील शेतकऱ्यांनी हिरव्या वसईचे काँक्रीटीकरण करणाऱ्या बिल्डरांना का विकली, याचे आर्थिक उत्तर आपल्याला या पुस्तकात सापडते आणि ते पटतेही.

एका बाजूला असे खडकाळ परिसरातील लेखिकेचे घर तर दुसऱ्या बाजूला काही किलोमीटरवर असलेल्या 'मुळगाव' येथील मामाकडचा हिरवाईने नटलेला, संपन्न, सुखवस्तू परिसर. वसईच्या अशा दोन्ही बाजू सांस्कृतिक अंगाने या पुस्तकात येतात. त्यामुळे संपूर्ण समाजाचेही अनाहूत कथन यात होत राहते.

लेखिका, 'हातावर उगवलेले फोड देखील चांदण्यासारखे फुललेले दिसायचे' असे आपले बालपणीचे एक निरीक्षण नोंदवते, तेव्हा कल्पनाशक्ती फक्त साहित्यनिर्मिती करण्यासाठी नसून जीवनाच्या दुःखाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्यासाठीही आहे हे लक्षात येते.  पंधराव्या शतकातील संत फ्रान्सिस यांचे थडगे पाहण्यासाठी लेखिका आपल्या तरुणपणी कुटुंबियांसोबत गोव्याला जाते. तेथे 'फादर थॉमस स्टीफन्स ('ख्रिस्तपुराण' लिहणारे पंधराव्या शतकातील एक मराठी ख्रिस्ती धर्मगुरू) यांचे मराठी लेखन संत फ्रान्सिस यांच्या कुजलेल्या देहापेक्षा अधिक ताजे आहे' असे जेव्हा लेखिका म्हणते, तेव्हा कॉलेजला जाणाऱ्या तरुणीतील साहित्यिकदृष्टीचा प्रामाणिकपणा आपल्याला भावतो. एक 'संत' धर्मगुरू आणि 'लेखक' धर्मगुरू यांतील फरक या प्रसंगातून लेखिका आपणासमोर अगदी सहजपणे ठेवते.    

वसईतील 'वाडवळी' या बोलीभाषेतील (पुस्तकाचे शीर्षक असणारा 'टिपंवणी' हा शब्द याच बोलीभाषेतील आहे. 'थेंब थेंब पाणी' असा त्याचा अर्थ) विविध शब्दप्रयोगांचे अर्थासहित आलेले वर्णन, पोर्तुगीजकालीन रितीरिवाज येथील मातीत मिसळून गेल्याची प्रचिती देणारे विविध किस्से, साठच्या दशकातील वसईत कार्यरत असलेले स्पॅनिश धर्मगुरू, तेव्हा लॅटिनमध्ये होणारी 'मिस्सा' अशा बऱ्याच प्रसंगातून तत्कालीन वसईचं एक रंगेबेरंगी कोलाज आपणासमोर येतं.

'सुवार्ता' या वसईतून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात आणि नंतर चर्चप्रणीत कॉलेजमध्ये नोकरी करत असताना आलेले वादग्रस्त अनुभवही लेखिकेने या पुस्तकात कथन केलेले आहेत. वेळेप्रसंगी चर्चला प्रश्न विचारणे व चर्चच्या स्त्रीविषयक भूमिकेवर टीका करणं हे त्यांच्यातील अधिक प्रगल्भ होत गेलेल्या साहित्यिकाचाच एक अविष्कार आहे, हे आपल्याला उमगत जाते. मेरिट असूनही केवळ स्त्री म्हणून चर्चने त्यांना वसईतील कॉलेजचे प्राचार्यपद नाकारणे, आणि काही वर्षांनी त्याच कॉलेजमध्ये पुढे शासनाच्या प्राचार्य निकषांत बसल्याने त्यांची प्राचार्यपदी वर्णी लागणे, अशा प्रसंगांतून आपल्याला एक स्पष्ट संदेश मिळतो. तो म्हणजे, भारतामध्ये स्त्रीला धर्म जे स्थान देण्यास अजूनही कचरतो, ते समान स्थान भारतीय संविधान तिला सन्मानाने देते.
      
आज जरी बरंच समाजप्रबोधन होत असलं तरी ऐंशीच्या दशकात (आणि आजही ) 'लग्न' हे स्त्रीच्या आयुष्याचा केंद्रबिंदूच मानलं जायचं (आजही मानलं जातं). त्यात ख्रिस्ती समाजात तर, जर एखाद्या स्त्रीची लग्न न करण्याची इच्छा असेल तर तिच्यासमोर शेवटचा एकच पर्याय ठेवला जायचा, तो म्हणजे 'नन' (धर्मभगिनी) होण्याचा. पण तोही मार्ग न पत्करता अविवाहित राहण्याचा  लेखिकेचा निर्णय धाडसी होता (आणि आजही आहे). पारंपरिक 'घरसंसार' सोडून त्यांनी पुस्तकांसोबत जो आगळा वेगळा 'साहित्य-संसार' मांडला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते. परंतु 'अविवाहित' राहण्याच्या निर्णयाप्रत पोहोचेपर्यंत त्यांच्या मनात उद्भवलेली वैयक्तिक भावनिक आंदोलने पुस्तकात अधिक विस्ताराने यायला हवी होती असे राहून राहून वाटते. पण तरीही, सर्व गुणदोषांसह लेखिकेचा हा संपूर्ण संघर्ष मुळातच वाचण्यासारखा आहे.  
       
अर्थात कोणतेही आत्मचरित्र वाचले की ते आत्मसमर्थन आहे का असा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. पण ते आत्मसमर्थन आहे की नाही या प्रश्नाऐवजी 'लेखिकेने तिला प्रतीत झालेली बाजू आत्मचरित्रात प्रामाणिकपणे मांडली आहे का?' अशी वाचकांची माफक अपेक्षा असते. त्या कसोटीवर मात्र हे पुस्तक पूर्णतः खरे उतरते. पुस्तकातील बऱ्याच प्रसंगांतून लेखिकेचा प्रामाणिकपणा वाचकांना जाणवतो.  

पोलिओमुळे जन्मतः पायात त्रास असणारी, शालेय जीवनातील अबोल पण हुशार विद्यार्थिनी; चर्चच्या संघटनेत कार्य करणारी तरुणी; पुढे चर्चमधील अधिकाऱ्यांना न जुमानणारी बंडखोर, मराठी साहित्यिका; कॉलेजमधील प्राचार्य; प्रौढ कुमारीकांसाठी कार्य करणारी कार्यकर्ती; संबंध महाराष्ट्रात फिरलेली व्याख्याती; प्रेमळ बहीण; आपल्या वडिलांचे घर आणि भावांना सांभाळणारी खंबीर स्त्री... 'शिशिन'ची (सिसिलिया ह्या इंग्रजी नावाचे स्थानिक रूपांतर) अशी  विविध रूपे या आत्मचरित्रातून आपल्यासमोर उलगडत जातात.  पण या सर्वांत हृदयाला भिडणारं रूप म्हणजे धुळीपासून रक्षण करण्यासाठी आपले डोके फडक्याने गुंडाळून वेळोवेळी हातात झाडू घेऊन, 'कचरा' काढून साफसफाई करणारी आत्मविश्वासू व मेहनती स्त्री!! घरातली, मनातली, व्यवस्थेतील घाण बाजूला करण्याचा एक स्त्री म्हणून लेखिकेने केलेले प्रयत्न प्रेरणादायी आणि खचितच कौतुकास्पद आहेत.

 -  डॅनिअल मस्करणीस, वसई
 danifm2001@gmail.com

'टिपंवणी', ग्रंथाली प्रकाशन  
लेखक: डॉ सिसिलिया कार्व्हालो
पाने : 330 | किंमत: 400 रुपये

Tags: डॅनिअल मस्करणीस पुस्तक परीक्षण वसई ख्रिस्ती चर्च साहित्य Cecilia Carvalho Daniel Mascarenhas Book Review Tipanwani Chistian Vasai Church Literature टिपंवणी Load More Tags

Comments:

स्मिता ओगले

लेखिकेच्या "शिशिन" या नावाची प्रथमच ओळख झाली..

प्रदीप मा. सोनवणे (धुळे)

प्रस्थापित समाजरचने विरुध्द लढणार्या साहित्यिक , प्राचार्या, कार्यकर्ती आणि मुख्य म्हणजे पोलीओने पायाने अधु असलेल्या परंतु मनाने खंबीर असलेल्या भगिनी बद्दल अतिशय समर्पक शब्दात करुन दिलेला परिचय ....

लतिका जाधव

उत्सुकता निर्माण करणारा पुस्तक परिचय.

Add Comment