ख्रिस्ती कॅलेंडरमध्ये दोन सण फार महत्त्वाचे मानले जातात, एक इस्टर आणि दुसरा नाताळ. एक सण - येशूने मरणावर विजय मिळविल्याचा आणि दुसरा - येशूच्या जन्मदिनाचा. थोडक्यात, एक सण येशूला देवत्व बहाल करणारा तर दुसरा सण येशूचं 'असामान्य सामान्यपण' साजरा करणारा !
दोन हजार वर्षांपूर्वी इस्राईल देशातील कैसर ऑगस्टीन या राजाने 'रोमन राज्यातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे' असा हुकूम काढला. (थोडक्यात त्याने NRC राबविण्याचा आदेश दिला!) नावनोंदणी करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या मूळ गावी जाऊ लागला. पेशाने सुतार असलेला योसेफ नावाचा तरुणसुद्धा गालीली प्रदेशातील नाझरेथ गावाहून दाविद लोकांच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला. ती गरोदर होती. तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली. त्यांना तेथे कोणी राहण्यास जागा दिली नाही. शेवटी एका गाईच्या गोठ्यात त्यांना रात्र काढण्यास जागा मिळाली व तेथेच मरीयेने येशू बाळाला जन्म दिला. येशू, ज्याने आपल्या सबंध आयुष्यात दया, क्षमा, शांतीचा संदेश जगाला दिला, त्याचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला. 'माणसाची ओळख त्याच्या जन्माने नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वाने ठरत असते' हा एक मोठा संदेश येशूचा जन्मदिन देत असतो.
नाताळचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मराठमोळ्या वसईतही या उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत असतो. डिसेंबर महिन्यातील थंडी, सणाला लागूनच येणारी वर्षअखेर या बाबीही हा सण साजरा करणाऱ्या ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहात आणखी भर टाकतात. नाताळ हा सण नेहमी आनंदाचे क्षण भरभरून जमा करण्याचा काळ समजला जातो.
लहानपणीचा नाताळ जेव्हा मी आठवतो, तेव्हा अनेक आठवणींचं मोरपीस हळुवारपणे चेहऱ्यावर फिरल्याचा भास होतो. पहिली आठवण म्हणजे, गावागावात गाईचा गोठा बनवून ख्रिस्तजन्माचा देखावा सादर करण्यासाठी सुरु झालेली तयारी. लहानपणी गावात गोठा बनताना पाहणे, हा आनंददायी अनुभव असायचा. गावातील मध्यवर्ती अशी एक विस्तीर्ण मोकळी जागा गोठयासाठी निवडली जायची. नाताळच्या 15 दिवस अगोदरपासून हा गोठा बनविण्याची तयारी सुरु व्हायची. दरवर्षी गावातील गोठा बनविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणा एका चळवळ्या तरुणाने, त्यावर्षी गोठा कसा बनवायचा आहे, हे स्वतःच्या मनात अगोदरच साकारलेले असायचे. फक्त ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याला गावातील सारी मुले मदत करायची. शेतातून कापून आणलेले बांबू, पेंढा, नारळाच्या सुकलेल्या झावळ्या यांनी गाईचा गोठा साकारला जायचा. बाजूच्याच आंब्याच्या वा चिंचेच्या झाडावर चढून कोणी सराईतपणे आकाशकंदील लावायचे. गोठ्याच्या बाजूने रोषणाई केली जायची. पताका लावल्या जायच्या. 24 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत गावातील मुलांची ही लगबग चालू असायची. गावातील लहान-थोर सारीच मंडळी या उपक्रमात सहभागी व्हायची. काळोख झाला की कोणीतरी बटण दाबायचे आणि संपूर्ण परिसर रोषणाईत न्हाऊन निघायचा. त्या कलंदर तरुणाच्या चेहऱ्यावर, मनातील गोठा प्रत्यक्षात उतरल्याबद्दल कृतार्थतेचे भाव असायचे; तर गावातील तरुणांनाही 'आपल्या गावाच्या' गोठ्यासाठी मेहनत घेणाऱ्या या तरुणाला साथ दिल्याचे समाधान!
येशूचा जन्म मध्यरात्री झाला असे मानले जाते. त्यामुळे 15 वर्षांपूर्वीपर्यंत चर्चमधील मिस्सा/प्रार्थना ही मध्यरात्री सुरु व्हायची. (ध्वनिप्रदूषणाच्या कायद्यामुळे सध्या चर्चमधील प्रार्थना रात्री 10 ला सुरु होते व मध्यरात्रीपर्यंत आटोपते.) अर्थात, लहानपणी इतकावेळ जागे राहण्याची सवय नसायची; पण नाताळच्या उत्साहात व नवीन कपडे घालण्याच्या आनंदात आम्ही लहानगे जागे राहायचो आणि आई-वडिलांसोबत सहकुटुंब चर्चमध्ये जायचो. चर्चमध्ये जाताना गावाच्या वेशीवर आल्यावर, रोषणाईत न्हालेल्या त्या गावातील गोठ्याकडे परत एकदा पाहावेसे वाटायचे. त्या गोठ्याच्या समोरच, साधेच कपडे घातलेला गावातील तो कलंदर तरुणही शेकोटीसमोर शेकत बसलेला दिसायचा. वर्षानुवर्षे गावातील नाताळचा गोठा तन्मयतेने सजवणारा तो, चर्चमध्ये मात्र कधी दिसायचा नाही. बंडखोरी वगैरे न कळण्याच्या वयात त्याचं वागणं बुचकळ्यात टाकायचं.
चर्चमध्ये गेल्यावर नटूनथटून आलेले, परिसरातील सर्व लोक भेटायचे. मध्यरात्रीचे ठोके वाजले की धर्मगुरू 'बाळ येशू जन्मला आहे' अशी घोषणा करून येशूबाळाची प्रतिकृती भक्तांपुढे उंचवायचे आणि मग चर्चमधून आनंदाचा क्षण म्हणून घंटानाद केला जाई . त्यानंतर सारे भाविक जोरात 'गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्माला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला' हे गीत जोरात आळवीत. मिस्सा संपल्यावर चर्चच्या आवारातच केक आणि गरमागरम चहा यांचे वाटप होई. कुडकुडणाऱ्या थंडीत त्याचा आस्वाद घेत व एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत, आम्ही घरी येण्यास निघायचो. रात्रीचा एक वाजून गेला असल्याने, घरी परत येण्यासाठी काही वाहन मिळत नसे आणि मग डोळ्यांत झोप घेऊन आम्ही लहानगे आई-वडिलांच्या मागे घरापर्यंतचे 3-4 किमीचे अंतर पायीपायी चालत घरी परतायचो, ते गाढ झोपी जाण्यासाठीच. नाताळच्या सकाळी उशिरा जाग यायची, ती आईने स्वयंपाकघरात केलेल्या स्वादिष्ट पक्वानांच्या खमंग वासाने.
वसईतील ख्रिस्ती समाज हा पोर्तुगीजांच्या काळात धर्मांतरित झाल्याने, येथे पक्वान्नांमध्ये स्थानिक महाराष्ट्रीयन तसेच पोर्तुगीज खाद्यसंस्कृतीचा मेळ झालेला जाणवतो. त्यामुळे, ओल्या नारळाच्या करंज्या, अनारसे, लाडू, चिवडा या फराळासोबत, आंबवलेल्या पिठापासून बनवलेले गोल भाकरीसारखे सान्ने, पुडींग, वाईन केक, व्हिनेगर घालून केलेले, चिकन किंवा पोर्क विंदालू व इतर मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते. नाताळच्या दिवशी एकत्र कुटुंबात, नातेवाईक व मित्रमंडळींसोबत या भोजनाचा आस्वाद घेतला जातो.
नाताळच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर प्रत्येक गावात वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले जाते. लहान मुले-मुली , विवाहित जोडपी, प्रौढ, वृद्ध स्त्री-पुरुष असे सर्वचजण ह्या खेळांत सहभागी होऊन सणाचा आनंद द्विगुणित करतात.
नाताळच्या आठवड्यात शाळेला सुट्टी असल्याने तसेच कामावर जाणारे लोकही वर्षाच्या अखेरीस सुट्टी घेत असल्याने, वसईत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अगदी उधाण येते. चर्च वा गावपातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम, नाताळ अंक प्रकाशन, काव्यवाचन-व्याख्याने, संस्कृती महोत्सव तसेच इतर गावांतील ख्रिस्तजन्माचा देखावा साकारलेले गायीचे गोठे पाहण्यासाठी जाणे, एखाद्या ठिकाणी पिकनिकसाठी जाणे अशा बऱ्याच कार्यक्रमांची गर्दी या आठवड्यात असते.
अर्थात, या झाल्या लहानपणीच्या मराठमोळ्या नाताळच्या आठवणी. आता सगळीकडे सुबत्ता आली आणि नाताळची जागा आता हळूहळू ख्रिसमसने घेतली. गावातील लहानथोरांचा सहभाग लाभलेले व निसर्गातील इको-फ्रेंडली गोष्टींचा कल्पक वापर करून केले जाणाऱ्या गोठ्यांना आता महागडे रेडिमेड फॅन्सी डेकोरेटिव्ह आयटम्स वापरून तयार केलेले 'ख्रिसमस क्रिब' रिप्लेस करू पाहतायत. घरगुती गोडधोड, रेडिमेड फूड डिलिव्हरीच्या तुलनेत काहीसे मागे पडतायेत. अर्थात या ना त्या प्रकारे सणाचे स्वरूप बदलले असले तरी सणानिमित्ताने एकमेकांना भेटण्याची आणि काही क्षण एकत्र घालवण्याची मूळ भावना मात्र अजूनही कायम आहे. वेगवेगळ्या कामानिमित्ताने बाहेर असलेली पाखरे या सणाच्या निमित्ताने घरी एकवटतात. एक आठवडा आपल्या चिवचिवाटाने आणि किलबिलाटाने पूर्ण परिसर गजबजून टाकतात आणि मग परत घराबाहेर, गावाबाहेर उडून आपापल्या विश्वात रममाण होतात. आठवडाभराच्या या नाताळच्या आठवणी मग पुढील वर्षभर पुरतात.
हार्लन मिलर ह्या अमेरिकन फ़ुटबॉल खेळाडूने किती स्पष्टपणे म्हटले आहे, "नाताळच्या सणाचा आनंद जर बाटलीत बंद करता आला आणि वर्षभर, प्रत्येक महिन्यात थोडा थोडा हुंगता आला तर किती छान?"
- डॅनिअल मस्करणीस
danifm2001@gmail.com
Add Comment