महाराष्ट्राचा उपेक्षित मानकरी

लोकहितवादींच्या जन्म-द्विशताब्दी वर्षाचा प्रारंभ

समाजात कोणतीही क्रांती होण्याअगोदर समाजाची वैचारिक मशागत होऊन त्यासाठी ‘बहुतांशी जनमत अनुकूल होणे’ हा एक फार महत्त्वाचा टप्पा असतो. लेखकाची भूमिका त्यात महत्त्वाची असते. 16व्या शतकातील धर्मसुधारणा चळवळ किंवा फ्रेंच व रशियन राज्यक्रांती, या जागतिक पातळीवरच्या महत्त्वपूर्ण घटीतांकडे पाहताना आपणांस ही बाब प्रकर्षाने जाणवते. 19व्या शतकात भारतातही ब्रिटिशविरोधी वातावरण तयार होत असताना दादाभाई, रानडे, विष्णुशास्त्री, टिळक-आगरकर, हे विविध नेते नवभारताचे शिल्पकार म्हणून उदयास येत होते. महाराष्ट्रातील या नेत्यांची वैचारिक पूर्वतयारी करण्यामागे शतपत्रांचा मोलाचा वाटा आहे.

18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुणे येथे जन्मलेल्या गोपाळ हरी देशमुख यांचा आज जन्मदिन. सबंध महाराष्ट्र त्यांना ‘लोकहितवादी’ म्हणून ओळखतो. आज त्यांची 199वी जन्मतिथी, म्हणजे आजपासून त्यांचे जन्म-द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे.

तरुण वयात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून त्यांनी ‘साहेबांच्या भाषेतील' उपलब्ध विद्येची विविध पुस्तके अभ्यासली. या इंग्रजी विद्येने त्यांचे डोळे उघडले. ‘लोक काय म्हणतील’ ह्याचा यत्किंचितही विचार न करता त्यांनी स्वकीयांना उद्देशून 108 पत्रे ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात 1848-1850मध्ये लिहिली. ‘लोकहिताचा विवेक’ परखडपणे मांडणाऱ्या ह्या पत्रांना आपण ‘शतपत्रे’ म्हणून ओळखतो. तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखाली असणाऱ्या भारताच्या भौतिक, सामाजिक आणि धार्मिक अधोगतीची कठोर मीमांसा त्यांनी या शतपत्रांतून केली आहे; अनेक सामाजिक विषयांवर परिणामकारक चर्चा केली आहे. जवळजवळ 170 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या शतपत्रांमध्ये त्यांनी ज्या दूरदृष्टीने आपली निरीक्षणे नोंदविलेली आहेत, ती थक्क करणारी आहेत. आजही समाजापुढे असलेल्या प्रमुख समस्यांवरचे उपाय यात दडलेले आहेत.

170 वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे, पेशवाई नुकतीच अस्ताला गेली होती. इंग्रजांचे राज्य सुरू झाले होते. समाजाचे नेतृत्व ज्या उच्चवर्णीयांकडे होते, त्यांचीही इंग्रजांच्या काळात रया गेलेली होती. पण या दुरवस्थेची कारणमीमांसा मात्र ‘देवाची करणी’ अशा पारंपरिक धार्मिक चष्म्यातूनच केली जात होती. लोकहितवादींनी पहिल्यांदाच तार्किक दृष्टिकोनातून ह्या स्थितीचे विश्लेषण केले आणि शतपत्रांच्या माध्यमातून त्यांवर विविध उपाय सुचविले. अर्थातच, स्पष्ट भाषेतील त्यांचे हे उपाय म्हणजे त्या काळातील रूढीप्रिय समाजासाठी एक मोठी शस्त्रक्रियाच होती.

तत्कालीन भारतीय समाजापुढील ज्ञान, भाषा, उद्योग, धर्म, परंपरा अशा विविध विषयांशी निगडित समस्यांवर त्यांनी सुचविलेले उपाय 170 वर्षांनंतर, आजही कालसुसंगत असणे हे एकाच वेळी विस्मयकारकही आहे आणि क्लेशदायकही!

ज्ञान ह्या विषयासंबंधीचे त्यांचे चिंतन शिक्षणक्षेत्रातील आजच्या सर्वच धुरिणांनी अभ्यासण्यासारखे आहे. 'श्लोकांचे पाठांतर करणे म्हणजे विद्या नाही. किंवा पुराणातल्या गोष्टी ऐकल्या म्हणजे ज्ञान संपादन केले असेही नाही. राजस्थानातील उच्चवर्गीयांत शोकप्रसंगी शोक करण्यासाठी पैसे देऊन ‘रुदालीं’ना रडण्यासाठी घरी बोलाविले जात असे, त्यांच्यात आणि विविध विधीसमयी धर्मग्रंथांतील विविध मुखोद्गत वचने बोलून दाखवणार्‍या पौराहित्य वर्गात फारसा फरक नाही' असे ते ‘पाठ करण्याची चाल’ या आपल्या 77व्या पत्रात लिहितात. इंग्रजांनी त्यांची केलेली भौतिक प्रगती ते पाहत होते, त्यामुळे 'समाजाने फक्त ‘तोंडाची’ मजुरी करण्याऐवजी विविध नवनवीन पुस्तके वाचून व भौतिक विद्या आत्मसात करून बौद्धिक मजुरी करणे कधीही उत्तम' असे ते ठामपणे मांडतात.

'विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, भूगोल, व्यापार, कायदा, अर्थ, आरोग्य अशा विविध विषयांवरील ज्ञानभांडार असलेली भाषा आत्मसात करून भारतीयांनी आपली आर्थिक, शारीरिक, सामाजिक भरभराट करावी' असा अगदी स्पष्ट व्यवहारी संदेश ते देतात. 'भाषेवर फक्त प्रभुत्व मिळवून न थांबता, त्या भाषेतील ज्ञानाचा साठा संचित करणे हे प्रमुख ध्येय समोर ठेवावे' असे सांगण्यास ते विसरत नाहीत. त्या काळात (मराठीतील ज्ञाननिर्मिती ही नगण्य असल्याने) मुख्यत्वेकरून वापरात असलेल्या संस्कृत आणि इंग्रजी भाषेची त्यांनी केलेली ही तुलना मुळातून वाचण्यासारखी आहे. आज ते हयात असते तर आजच्या 'इंग्रजी माध्यम विरुद्ध मराठी माध्यम' या वादावर त्यांनी ‘इंग्रजी भाषा’ आणि ‘इंग्रजी माध्यम’ ह्यांतील फरक स्पष्ट करूनच आपले मतप्रदर्शन केले असते. इंग्रजी माध्यमातून शिकून त्या भाषेतील काहीही अभिजात न वाचण्यापेक्षा मराठी माध्यमातून शिकूनही (अनुवादित साहित्यातून का असेना) शेक्सपिअर माहीत करून घेणे कधीही श्रेयस्कर असेच कदाचित त्यांनी आज म्हटले असते!

'भारतीयांत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव' याविषयी ते इंग्लिश समाजाचे उदाहरण देऊन खूपच मार्मिक टिप्पणी करतात. ते असा मुद्दा मांडतात की, 'इंग्रजांना आकाशातील ग्रहतार्‍यांविषयी वा झाडावरून खाली पडणार्‍या फळाविषयी कसलेही आश्चर्य वाटत नाही. कारण तेथील लोकांनी या सृष्टिनियमांची शास्त्रीय कारणमीमांसा शोधून काढलेली आहे. याउलट आपण ह्या निसर्ग-घटना पाहून आश्चर्यमूढ होतो. आणि त्यातूनच आपण हतबल होऊन कर्मकांडाच्या खोल गर्तेत अधिकच अडकून पडतो.' लोकहितवादींचे हे निरीक्षण आजही आपणा भारतीयांना चपखल बसते. प्राचीन काळी भारतात संस्कृतमध्ये संशोधनात्मक ग्रंथनिर्मिती झाली खरी, पण त्या संशोधनात पुढे सातत्य न राखले गेल्याने साचलेपण आले. 'व्यासांचे पाच हजारांपूर्वीचे निरीक्षण हे त्या काळातील जरी उत्तम संशोधन असले, तरी ते आपण काळाच्या कसोटीवर तपासून घेण्यास कचरतो' हेही ते नमूद करतात.

जातिभेदांविषयीही त्यांची मते स्पष्ट आहेत. पंडित, शिपाई, सावकार आणि चाकर असे भेद भारतासह इतर देशांतही आहेत. पण इतर देशांत ते वर्ण-वंशपरंपरेने मिळत नाहीत. वाण्याचा मुलगा बुद्धिमान असेल तर त्याला पंडितांत स्वीकारला गेले पाहिजे आणि पंडिताच्या मुलास पांडित्यात आवड नसेल तर त्याचे पोट भरण्यासाठी त्याला चाकरी करता आली पाहिजे.  


हेही वाचा : बिशप फ्रँको प्रकरणातील कोर्टाच्या निकालानिमित्ताने... - डॅनिअल मस्करणीस


'इंग्रजांसारखे शिक्षण येथील भारतीय जनतेस मिळाले तर त्यांच्या पायांतील विविध शृंखला तुटून ती सुज्ञ होईल, नव्या व्यापारात, नव्या विद्येत ती निपुण होईल. आणि मग स्वतःहून इथली जनता इंग्रजांना सांगेल की, तुम्ही आपल्या देशास परत जावे. आपले गुरुत्व आम्हाला नको. तुम्ही व्यापारापुरते इथे येऊ शकता, आमच्या प्रजेचे आम्ही जसे रक्षण करतो तसे आपलेही करू.' स्वातंत्र्य चळवळ सुरू होण्या आधीच्या काळात त्यांनी केलेले हे भाकीत पुढे शंभर वर्षांनंतर शंभर टक्के खरे ठरले! ‘इंग्रजी’ वाघिणीचे दूध प्यायलेल्या नेत्यांनी इथल्या इंग्रजांना ‘चले जाव’ असे सुनावून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. पुढे नव्वदच्या दशकात इतर देशांना व्यवसायांसाठी भारताची दारे खुली करून मुक्त आर्थिक उदारीकरणाचे धोरणही इथे राबवले गेले.

आर्थिक बाबतीतही त्यांची मते अभ्यासू आहेत. लोकहितवादींच्या काळात  इंग्रजांच्या वैभवाने व कर्तृत्वाने बहुसंख्य भारतीय दिपून गेले होते. पण इंग्रजांच्या व्यवसायवृद्धीमागील भांडवलसंचयाची व कारखानदारी व्यवहाराची कसलीही कल्पना येथील लोकांस नव्हती. ‘इंग्रज येथे आल्याने भारतीय मजुरांना काम मिळू लागले व त्यांना चार पैसे मिळू लागले, त्यामुळे त्यांची प्रगती होत आहे’, चक्क असा विचार बंगालमधील बर्‍याच पुढार्‍यांनी तेव्हा मांडला होता. लोकहितवादींनी मात्र ‘खरे तर भारत निर्धन व बेकार होत आहे’ असे अचूक अर्थशास्त्रीय विश्लेषण करून स्वदेशीचा पुरस्कार केला. येथील भारतीयांनी कारकुनी सोडावी, नवनवीन विद्या शिकून विविध मालाचे उत्पादन करावे व इंग्रजांनी बळकावलेल्या आपल्या मोठ्या बाजारपेठेचा पुरेपूर वापर करावा असा त्यांनी तेव्हा दिलेला उपदेश काळाच्या किती पुढे होता याची प्रचिती आजही आपल्याला येते आहे. उद्योगनिर्मितीवरच न थांबता, कमीअधिक प्रमाणात कमावलेल्या संपत्तीचा विनियोग कसा करावा याविषयीही ते काही उपाय सुचवितात.

इतरही बर्‍याच सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आपल्या अफाट प्रज्ञेने विस्तृत लिहिले आहे. हे सर्व त्या काळात त्यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी लिहिले यावर आजच्या काळात विश्वास बसणे कठीण आहे. पाश्चात्त्य आणि भारतीय समाजातील सूक्ष्म फरक आणि त्यावरील उपाययोजना त्यांनी ज्या पोटतिडकीने ह्या शतपत्रांत मांडली आहे ते वाचून आपण विस्मयचकित होतो. विविध विषयांवर अभ्यास करून त्यावरील चिंतनाद्वारे जे हाती लागले ते समाजापुढे कोणाचीही भीडभाड न बाळगता, निर्भयपणे मांडणे हे प्रमुख वैशिष्ट्य शतपत्रे वाचताना आपल्याला पानोपानी जाणवते. लेखकाचे विशीतले तरुण, बंडखोर वय आणि विषयांची स्फोटकता पाहता त्यांनी वापर केलेल्या शिवराळ भाषेतून त्यांची कळकळच जाणवते.

अर्थात, तेव्हाच्या रूढीप्रिय आणि कर्मठ समाजाला लक्ष्य करून सडेतोडपणे लिहिल्याने त्यांच्यावर त्याही काळात बरीच टीकाही झाली. इथल्या समाजाचे दोष अधोरेखित करण्यासाठी इंग्रज समाजाची जरा जास्तच स्तुती केल्याने त्यांना समकालीनांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

‘शतपत्रे’ ह्या प्रमुख लिखाणाबरोबरच समकालीन जोतिराव फुले यांना त्यांच्या शाळेच्या कामात मदत करणे असो, किंवा पंढरपूर येथे अनाथाश्रम सुरू करणे असो, वा मुंबई-पुणे-अहमदाबाद येथे विविध वृत्तपत्रे स्थापन करणे असो, लोकहितवादींनी त्यांत सक्रिय सहभाग नोंदविला होता. लहानमोठी 40 पुस्तकेही त्यांनी लिहिली. खरेतर विविध विषयांवर एवढा व्यासंग करून, विवेकी विचार कागदावर उतरवणे ही त्यांची एक प्रकारची वैचारिक कृतीच! पण तरीही त्यांना ‘बोलके सुधारक’ म्हणून हिणवले गेले. त्यामागील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे...

शतपत्रांत विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणार्‍या लोकहितवादींनी 1869मध्ये अशा विधवा पुनर्विवाहाच्या कार्यक्रमास पाठिंबा देण्यासाठी काढल्या गेलेल्या एका पत्रकावर सही केली नाही व त्या कार्यक्रमास ते हजरही राहिले नाहीत हे पहिले कारण. शतपत्रे लिहिल्याला तोपर्यंत 21 वर्षे झाली होती. तोपर्यंतच्या कालखंडात त्यांनी त्यांच्या परिसरातील अगोदरच्या इतर विधवा पुनर्विवाहांना पाठिंबा दर्शविला होता का? याची मात्र काही माहिती मिळत नाही. दुसरे कारण म्हणजे, परदेशगमन. तसे पाहिले तर परदेशगमन धर्मविरोधी असतानाही त्यांनी त्यांच्या मुलाला शिकण्यासाठी विलायतेस पाठविले होते. पण मुलगा परत आल्यावर लोकहितवादींनी परदेशगमनामुळे ‘अमंगळ’ झालेल्या आपल्या मुलाला साग्रसंगीत पवित्र करून घेतले. पुढे सरकारने खुद्द त्यांना परदेशगमनासाठी विचारले असता त्यांनी सरकारला नकार देताना धार्मिक कारण पुढे केले होते. तसेच मूर्तिपूजेच्या रूढींवर टीका करणारे लोकहितवादी देवदर्शनाला कुटुंबासहित जात असत. ते स्वतः कुटुंबाला देवळात घेऊन जात होते की कुटुंबाच्या दबावामुळे नाइलाजाने देवळात जात होते याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही. विचार ही जरी एकटेपणी केली जाणारी स्वतंत्र क्रिया असली तरी दृश्य कृतीमागे (ती खरी-खोटी कशी का असेना) मात्र सामाजिक गुंतागुंत असते, हेच खरे. असो.   

पण ह्या वरील प्रसंगावरून तत्कालीन समाजाने त्यांचा कठोर न्याय केला. अर्थात लोकहितवादींनी तरुणपणी केलेल्या ‘शत-चुकां’साठी तत्कालीन रूढीप्रिय समाज त्यांना सहज माफ करणे तसे शक्यच नव्हते. आयुष्याच्या काही वळणांवर त्यांना कोंडीत पकडून, त्यांनी केलेल्या टीकेची समाजाने केलेली जणू ही परतफेडच होती!       

बार्शी येथील 54व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान भूषविलेल्या गं.बा.सरदार या लेखकांनी 1941मध्ये ‘महाराष्ट्रातील उपेक्षित मानकरी’ नावाचे एक पुस्तक लिहिले. चेतनादायी ठरेल असे कार्य ज्यांनी महाराष्ट्रात केले पण ज्यांची उपेक्षा झाली, त्या ब्रिटीश काळातल्या काही विचारवंतांच्या कार्याचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. त्यात लोकहितवादींचाही त्यांनी सन्मानपूर्वक उल्लेख केला आहे.

समाजात कोणतीही क्रांती होण्याअगोदर समाजाची वैचारिक मशागत होऊन त्यासाठी ‘बहुतांशी जनमत अनुकूल होणे’ हा एक फार महत्त्वाचा टप्पा असतो. लेखकाची भूमिका त्यात महत्त्वाची असते. 16व्या शतकातील धर्मसुधारणा चळवळ किंवा फ्रेंच व रशियन राज्यक्रांती, या जागतिक पातळीवरच्या महत्त्वपूर्ण घटीतांकडे पाहताना आपणांस ही बाब प्रकर्षाने जाणवते.  19व्या शतकात भारतातही ब्रिटिशविरोधी वातावरण तयार होत असताना दादाभाई, रानडे, विष्णुशास्त्री, टिळक-आगरकर, हे विविध नेते नवभारताचे शिल्पकार म्हणून उदयास येत होते. महाराष्ट्रातील या नेत्यांची वैचारिक पूर्वतयारी करण्यामागे शतपत्रांचा मोलाचा वाटा आहे.

समाजाच्या हितासाठी एका तरुणाने तळमळीने लिहिलेली ही कालातीत शतपत्रे महाराष्ट्राच्या चिकित्सक परंपरेला शोभतील अशा एखाद्या लेण्यांप्रमाणे आहेत. अशा ह्या निर्भीड विचारवंताचे त्याच्या जन्मदिनी अभीष्टचिंतन!

- डॅनिअल मस्करणीस, वसई/पुणे
danifm2001@gmail.com 

(लेखक आय. टी. क्षेत्रात इंजिनिअर म्हणून कार्यरत असून त्यांचे 'मंच' हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.)

Tags: डॅनिअल मस्करणीस शतपत्रे Lokhitwadi Daniel Mascarenhas Shatapatre सामाजिक सुधारणा ब्रिटीशकालीन भारत Load More Tags

Comments:

पोपट पगार

लोकहितवादी काळाच्या पुढेच होते,शतपत्रातून त्यावेळी अन् आजही प्रबोधन च होत आहे, त्याची आजही तेवढीच गरज आहे, असो लोकहितवादी ना नमन.

अरविंद केशव पाटील

लोकहितवादींंच्या एकूण कार्याचे संक्षिप्त रुप आपण लिहीले आहे. त्यांचे एकूण कार्य त्या काळात प्रवाहाच्या विरुद्ध वाटले असेल, पण कालातीत आहे. आपण छान लिहिले आहे.

Ramesh Chavan

Appropriate and Apt and most suited article at present time. Thanks

Add Comment

संबंधित लेख