केरळ हे ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक राज्य आहे. प्राचीन भारतात हे राज्य व्यापाराचे प्रमुख केंद्र होते त्यामुळे ख्रिश्चन आणि इस्लाम हे दोन परकीय भूमीतून आलेले धर्म भारतात प्रथम इथे आले. सर्वात जुने म्हणजे अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या शतकापासून स्थायिक झालेले ख्रिस्ती आणि मुस्लीम या राज्यात आहेत.
केरळच्या एकूण लोकसंख्येपैकी 45 टक्के जण हे ख्रिस्तीधर्मीय वा इस्लामधर्मीय आहेत. हजारो वर्षांपासून हे दोन्ही समाज इथे सलोख्याने राहत आलेले आहेत. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून राजकीय फायद्यासाठी या दोन्ही समाजांचे ध्रुवीकरण चालू आहे... तर अशा या केरळमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये दोन लक्षवेधी घटना घडल्या. या दोन्ही घटना जरी स्वतंत्र असल्या तरी त्यांच्यातील विसंगती नजरेआड करण्याजोगी नाही.
पहिला प्रसंग आहे तो प्राध्यापक जोसेफ यांचा. प्राध्यापक टी.जे. जोसेफ हे केरळमधील एका छोट्या शहरातील 'न्युमन कॉलेज' या ख्रिश्चन चर्चद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये मल्याळमचे प्राध्यापक. 2010मध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते भाषा विषयाची प्रश्नपत्रिका तयार करत होते. केरळ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला असलेल्या मल्याळी चित्रपट दिग्दर्शक पी.टी. कुंजुर मुहम्मद यांच्या नाट्यविषयक पुस्तकातील एक उतारा त्यांनी या प्रश्नपत्रिकेत घेतला. तो उतारा 'देव आणि माणूस' यांच्यातील संवादावर होता. 'ब्लॅक ह्युमर' म्हणजे मानवी जीवनातील विसंगती दाखवणाऱ्या विनोदी शैलीतला तो संवाद होता.
प्राध्यापक जोसेफ यांनी या संवादातील दोन पात्रांपैकी एका पात्राला मूळ लेखकाचेच म्हणजे 'मुहम्मद' असे नाव तो संवाद प्रश्नपत्रिकेत छापताना दिले. यथावकाश प्रश्नपत्रिका छापली गेली व ती विद्यार्थ्यांसमोर आली. पुस्तकातील या प्रसंगाची काहीही पार्श्वभूमी लक्षात न घेता इस्लाम धर्मियांमधील कट्टरपंथीय संघटनांनी त्यावर आक्षेप नोंदवला. 'प्रेषित मुहम्मद यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा असा हा प्रसंग आहे.' असे म्हणत त्यांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. त्यातून परिसरातील ख्रिस्ती आणि मुस्लीम या दोन समाजांमध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न झाला. परिसरातील काही कट्टर इस्लामी संघटनांनी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासारख्या काही राजकीय पक्षांनी या आगीवर पोळी भाजून पाहिली. ती प्रश्नपत्रिका काही संवेदनशील मुस्लीम परिसरांत वाटण्यात आली. प्राध्यापक जोसेफ ज्या कॉलेजमध्ये शिकवत होते तिथे मोर्चे काढण्यात आले त्यामुळे वातावरण बरेच गढूळ झाले.
प्राध्यापक जोसेफ यांना धमक्या येऊ लागल्या त्यामुळे ते घाबरून गेले. प्रश्नपत्रिकेत सहज टाकलेल्या छोट्या प्रसंगातील नावबदलामुळे इतका मोठा गदारोळ होईल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. जीव मुठीत घेऊन ते काही दिवस भूमिगत राहिले. परिचितांपैकी कोणीही त्यांना आपल्या घरात लपवून ठेवण्यास तयार झाले नाही. शेवटी एका गरीब मुस्लीम कुटुंबाने त्यांना आश्रय दिला. काही दिवस ते तिथे राहिले. पुढे समाजात द्वेषभावना पसरवल्याच्या आरोपावरून त्यांना पोलिसांकडून अटक झाली. त्यांनी जाणूनबुजून काहीही केले नव्हते हे निष्पन्न झाल्यावर काही दिवसांतच त्यांची सुटका झाली.
...परंतु त्यांचा त्रास इतक्यात संपणार नव्हता... द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला म्हणून चर्चसंचलित कॉलेजमधून त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांच्यावर तीनदा हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्नही झाला आणि एके दिवशी चर्चमधून ते त्यांची पत्नी आणि दोन मुलं यांच्यासोबत घरी परतत असताना आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या उजव्या हातावर कुऱ्हाडीने अगणित प्रहार करून हल्लेखोरांनी तो हात त्यांच्या शरीरापासून वेगळा केला. त्यांच्या पायांवरही कुऱ्हाडीने वार करण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या कुटुंबीयांनाही हल्लेखोरांनी दुखापत केली. प्राध्यापक जोसेफ यांना बरेच महिने इस्पितळात राहावे लागले आणि अगणित सर्जऱ्यांना सामोरे जावे गेले.
नोकरी गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांची बरीच आर्थिक वाताहात झाली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांच्या पत्नीने 2014मध्ये नैराश्यातून आत्महत्या केली... त्यामुळे हे प्रकरण पुढे खूपच तापले. बऱ्याच नागरिकांनी प्रशासनावर दबाव आणला. न्यायालयात हा खटला दहा वर्षे चालला. त्यांतील आरोपींना आठ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. पुढे राजकीय दबावामुळे चर्चनेही निवृत्त होण्याच्या फक्त एक दिवस अगोदर प्राध्यापक जोसेफ यांना परत नोकरीवर घेतले.
प्राध्यापक जोसेफ काही दिवसांपूर्वी पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी मल्याळी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. 'पेंग्विन' या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेतर्फे त्यांच्या या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद ‘ए थाउजंड कट्स- ॲन इनोसंट क्वेश्चन ॲन्ड डेडली आन्सर्स’ या नावाने गेल्या महिन्यात प्रकाशित झाला. या निमित्ताने त्यांच्या बऱ्याच मुलाखती इंग्लीश वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांत त्यांनी दिलेली उत्तरे सध्याच्या धार्मिक कोलाहलात सर्वांनी लक्ष देऊन ऐकण्यासारखी आहेत.
एका मुलाखतकाराने त्यांना प्रश्न विचारला, 'तुमच्यावर इतका प्राणघातक हल्ला झाला. तुमचा उजवा हात तुम्हाला गमवावा लागला. तुमची नोकरी गेली, तुमच्या पत्नीने आत्महत्या केली. तुम्हाला राग येत नाही का? तुम्ही इतके शांत, धैर्यवान कसे? तुम्ही चक्क तुमच्या मारेकऱ्यांना क्षमा कसे करू शकता? त्यांना धडा नाही का शिकवावासा वाटत?' तेव्हा प्राध्यापक जोसेफ उत्तराची सुरुवात करताना म्हणाले ‘त्यांना क्षमा करणे हाच मोठा धडा मी त्यांना शिकवू इच्छितो...’ पुढे अधिक स्पष्टीकरण देत ते शांतपणे उद्गारले 'माझ्यावर हल्ला करणारे सर्व तरुण मला वैयक्तिकपणे ओळखत नव्हते. त्यांचे माझ्याशी काही व्यक्तिगत वैर नव्हते. कुणीतरी त्यांचं ब्रेनवॉश केलं म्हणून ते मला मारायला आले त्यामुळे त्यांना दोष देणं म्हणजे माझ्यावर ज्या हत्यारानं हल्ला झाला त्या कुऱ्हाडीला दोष देण्यासारखं आहे. हा हल्ला त्या तरुणांनी नव्हे तर त्यामागील कट्टर धार्मिक प्रवृत्तींनी केला होता.'
इस्लामधर्मियांतील काही कट्टरतावाद्यांनी त्यांचा उजवा हात तोडून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केला असला तरी त्यांच्या चर्चने मात्र त्यांच्यावर मोठा मानसिक अत्याचार केला असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. चर्चने त्यांना त्यांच्या नोकरीवरून काढून त्यांच्या पोटावर पाय तर दिलाच शिवाय ‘दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावल्या तर काय होऊ शकते’ अशा आशयाचे वक्तव्यही त्यांचे नाव घेऊन शंभर चर्चेसमधून प्रसारित केले गेले... त्यामुळे सोयीस्करपणे एका धर्माला दोषी ठरवण्याऐवजी, सर्व धर्मांतील धर्मांध प्रवृत्तीला दोषी ठरवण्याचा प्रगल्भपणा ते दाखवतात.
आता याच केरळमधील जोसेफ नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीविषयी... गेल्या महिन्याच्या सुरुवातीला केरळमधील पलई परिसरातील चर्चमध्ये प्रार्थनाविधीदरम्यान बिशप जोसेफ यांनी केलेल्या वक्तव्याने गदारोळ उडाला. चर्चच्या वेदीवरून धार्मिक प्रवचन देत असताना ते म्हणाले, 'केरळमधील बऱ्याच बिगर-इस्लामिक तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवले जात आहे.' हे सांगताना त्यांनी 'लव्ह जिहाद'च्या धर्तीवर 'नारकोटिक जिहाद' असा नवीन शब्दप्रयोग केला. त्याच प्रवचनात 'लव्ह जिहाद' या वादग्रस्त शब्दाचाही (खरेतर संकल्पनेचा) त्यांनी उल्लेख केला. ख्रिस्ती धार्मिक नेत्याने व्यासपीठावरून एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्याची केरळमधली ही पहिलीच घटना. अर्थात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ताबडतोब या वक्तव्याची दखल घेतली. विविध अधिकृत आकडेवारी समोर ठेवत ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणाईचा आणि त्यांच्या धर्माचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकाच राज्यात घडलेल्या वरील दोन घटनांमधील दोन जोसेफ पैकी आपण कोणत्या जोसेफचा आदर्श घ्यावा? व्यापक मानवतावादी दृष्टीकोन बाळगून हल्लेकऱ्यांना क्षमा करणाऱ्या प्राध्यापक जोसेफ यांचा की संकुचित विचारसरणी असलेल्या व आपल्या पदाचा गैरवापर करून बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या बिशप जोसेफ यांचा? क्षमाशील वागण्याने धर्मवेड्या दुष्टचक्राची ही साखळी तोडू पाहणाऱ्याचा की द्वेषपूर्ण बोलण्याने दोन समाजांत दुही माजवणाऱ्याचा? अहिंसेच्या शिकवणुकीशी नाते सांगणाऱ्या येशूच्या या खऱ्या अनुयायाचा की येशूला क्रुसी खिळणाऱ्या शास्त्री-परुशी मानसिकतेचा?
- डॅनिअल मस्करणीस, वसई/पुणे
danifm2001@gmail.com
(लेखक आय. टी. क्षेत्रात इंजिनिअर म्हणून कार्यरत असून त्यांचे 'मंच' हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.)
Tags: केरळ डॅनिअल मस्करणीस टी जे जोसेफ धर्म मुस्लीम ख्रिस्ती इस्लाम धर्मांध Daniel Mascarenhas T J Joseph Religion Muslim Islam christianity Christians Church Radicals Fundamentalists Load More Tags
Add Comment