मूक आक्रोश

बिशप फ्रँको प्रकरणातील कोर्टाच्या निकालानिमित्ताने...

indianexpress.com

जालंधरचे ख्रिस्ती धर्मगुरू (बिशप) फ्रॅंको मुलक्कल यांना एका वरिष्ठ धर्मभगिनीवरील बलात्कार प्रकरणात केरळ येथील कनिष्ठ न्यायालयाने नुकतेच निर्दोष मुक्त केले. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आरोप लावल्यानंतर मुलक्कल यांना जालंधर बिशपच्या अधिकारातून आणि कर्तव्यातून मुक्त करण्यात आले. भारतात बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली कॅथोलिक बिशपला अटक आणि गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  या घटनेच्या निमित्ताने, तक्रार निवारणासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसताना चर्चमध्ये धर्मभगिनींना ज्या भयावहतेचा सामना करावा लागतो त्याची चर्चा करणारा हा लेख. 

संपूर्ण देशात चर्चा झालेल्या बिशप फ्रँको ह्यांच्यावरील केसचा नुकताच निकाल लागला. जून 2017 मध्ये ‘मिशनरीज ऑफ जीझस’ कॉन्व्हेंटशी संबंधित एका वरिष्ठ धर्मभगिनीने (Catholic Nun) स्थानिक चर्च प्रशासनाकडे धर्मगुरू फ्रॅंको मुलक्कल ह्यांच्याविरोधात गैरवर्तन केल्यासंबंधी तक्रार केली होती. चर्चकडून ह्या तक्रारीकडे लक्ष देण्यात आले नाही. मग वर्षभराने, जून 2018 मध्ये तिने कुरविलंगड पोलीस स्टेशनमध्ये फ्रँकोंविरोधात तक्रार दाखल करून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. FIR दाखल झाल्यावर आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याबरोबर चक्रे वेगाने फिरू लागली. तीन वर्षे केस चालल्यावर गेल्या शुक्रवारी (14 जानेवारी 2022) ख्रिस्ती धर्मगुरू (बिशप) फ्रॅंको मुलक्कल ह्यांना धर्मभगिनीवरील बलात्कार प्रकरणात केरळ येथील कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. तक्रारदार व तिला साथ देणाऱ्या इतर सहकारी धर्मभगिनींनी हायकोर्टात अपील करून आपला लढा पुढे सुरु ठेवण्याविषयीचे सूतोवाच केले आहे.  

कॅथलिक धर्मभगिनींकडून धर्मगुरुंवर बलात्काराचा आरोप करण्याची ही भारतातील पहिली केस असली तरी व्हॅटिकन चर्चला ती नवीन नाही. जगात इतरत्र ख्रिस्ती धर्मगुरूंविरोधात लैंगिक शोषणाच्या बऱ्याच केसेस चर्चिल्या जात आहेत. कित्येक धर्मगुरूंना (ह्यात बिशप, कार्डिनल्सही आहेत) विविध देशांतील कोर्टाने दोषी ठरविले आहे आणि माध्यमांच्या दबावामुळे सरतेशेवटी व्हॅटिकनने ह्या धर्मगुरूंना पदमुक्तही केले आहे. ह्या लैंगिक शोषणात फक्त धर्मभगिनी किंवा महिलाच नाही, तर लहान मुलेही बळी पडलेली आहेत. पोप फ्रान्सिस ह्यांनीसुद्धा जगभर लैंगिक शोषणात अडकलेले ख्रिस्ती धर्मगुरू ही त्यांच्यापुढील मोठी डोकेदुखी असल्याचे मान्य केले आहे. उपलब्ध माहितीनुसार चर्चने अधिकृतरीत्या 2001 ते 2010 ह्या दहा वर्षांत तब्बल 3000 धर्मगुरूंची लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्यासंबंधी चौकशी केलेली आहे. ह्यावरून एकंदरीत प्रकरणांची भीषणता लक्षात यावी. सध्यातरी ह्या सर्व चौकशी होत असलेल्या धर्मगुरूंत युरोप-अमेरिकेतील धर्मगुरू जास्त आहेत.

जगभरातील ह्या गुन्ह्यांचा ट्रेंड पाहता भारतासारख्या देशात काही वेगळी परिस्थिती असण्याची शक्यता कमी आहे. ख्रिस्ती धर्मगुरू एखाद्या गुन्ह्यात अडकतो तेव्हा केवळ ती व्यक्ती नव्हे तर बलाढ्य चर्चचेही नाव त्या गुन्ह्यात गोवले जाते. त्यामुळे चर्च, आपल्या उमेदवारांची 'पवित्रता' सिद्ध करण्यासाठी त्यांच्यामागे सर्व ताकदीनिशी उभी राहते. ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी भारतात आतापर्यंत ‘लैंगिक वर्तनाशी’ निगडित दोन केसेस कोर्टात चाललेल्या आहेत. भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच बिशप फ्रँको यांना निर्दोष घोषित करणारी ही केस दुसरी आहे.

पहिली केस 28 वर्षांपूर्वीची आहे. मार्च 1992 मध्ये कोट्टायम, केरळ येथील एका कॉन्व्हेंटमध्ये धर्मभगिनी होण्यासाठी शिकत असलेल्या 18 वर्षीय सिस्टर अभया हिचा मृतदेह कॉन्व्हेंटच्या आवारातील विहिरीत सापडला. सीबीआयसहित सर्व राज्यस्तरावरील तपासणायंत्रणांनी ही 'आत्महत्या' असल्याचा निष्कर्ष काढून फाईल बंद केली. नागरिकांच्या एका ग्रुपला मात्र ह्या तरुण सिस्टरच्या अकाली मृत्यूत काहीतरी काळंबेरं असल्याची शंका आली आणि त्यांनी तपासयंत्रणेवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कोर्टाने याची दखल घेऊन सीबीआयच्या तपासावर 1997 मध्ये ताशेरे ओढले (सीबीआयच्या तपासपद्धतीवर कोर्टाने संशय व्यक्त करणे हीदेखील या केसच्या निमित्ताने घडलेली भारतातील पहिली घटना) आणि पुन्हा चौकशीचे आदेश दिले. सीबीआयच्या नवीन टीमने केलेल्या तपासात मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे व यात आरोपी म्हणून फादर थॉमस कोत्तुर, फादर जोस आणि सिस्टर सेफी ह्यांच्यावर बोट ठेवले. सिस्टर अभया यांनी या आरोपींना आक्षेपार्ह अवस्थेत कॉन्व्हेंटमध्ये पाहिले म्हणून तिचा काटा काढण्यासाठी ही हत्या केली गेली असा निष्कर्ष काढून सीबीआय कोर्टाने फादर थॉमस आणि सिस्टर सेफी (दुसऱ्या फादरना पुराव्याअभावी 2018 मध्ये सोडण्यात आले) ह्या दोघांना तब्बल 28 वर्षांनी (ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 23 डिसेंबर 2020 रोजी!) सिस्टर अभयाच्या खुनाचे दोषी ठरविले. दोघांना आजन्म कारावास व पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. कॅथलिक धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांना खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा होण्याची भारतातील ही पहिली केस.

भारतातील व जगभरातील अशा विविध लैंगिक शोषणाच्या घटनांमागचे प्रमुख कारण म्हणजे धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांच्यावर चर्चने सक्तीने लादलेला ब्रह्मचर्याचा नियम. ख्रिश्चन धर्मीयांतील प्रोटेस्टंट पंथियांप्रमाणे कॅथॉलिक पंथीय चर्चनेही ह्या नियमाच्या सक्तीला सोडचिठ्ठी ह्यावी ही मागणी गेली कित्येक वर्षे जगभरातून होत आहे. धर्मगुरूंतर्फे धर्मभगिनींच्या होणाऱ्या शोषणामागे 'लैंगिक भावनांचं दमन' हे एकच कारण नाही तर त्या जोडीला स्त्री म्हणून तिला (इतर पुरुषसत्ताक धर्मांप्रमाणे) चर्चमध्ये आणि समाजामध्ये असलेलं दुय्यम स्थान हे सामाजिक कारणही जबाबदार आहे.            

ख्रिस्ती धर्मगुरूंचे आणि धर्मभगिनींचे विविध मठ असतात. धर्मगुरूंना चर्चमध्ये पौराहित्य करण्याचा हक्क असतो. त्यामुळे चर्चमधील आर्थिक उत्पन्नावरही अर्थातच ह्या धर्मगुरूंचे नियंत्रण असते. तर धर्मभगिनींच्या कॉन्व्हेंट्सना मात्र चर्चमध्ये पौरोहित्याचा असा काही अधिकार नसल्याने, ह्यातील काही धर्मभगिनी, स्वतंत्रपणे शाळा, हॉस्पिटल, सामाजिक संस्था चालवून आपले सेवेचे व्रत पुढे नेत आर्थिक गाडा पुढे हाकतात. तर इतर कॉन्व्हेंट्स आपल्या धर्मभगिनींना, शिक्षकी पेशा, संगीत, नृत्य, कला, शिल्पकला, इ.मध्ये प्रशिक्षित करून आपले कार्य नेटाने राबविण्याचा प्रयत्न करतात. धर्मभगिनींच्या उत्पन्नाचा स्त्रोतही बऱ्याच अंशी धर्मगुरूंच्या हाताखालील चर्चच्या विविध संस्थांवर (शाळा, हॉस्पिटल, स्वयंसेवी संस्था वगैरे) आधारित असतो. त्यामुळे बहुतांश कॉन्व्हेंट्सच्या आर्थिक नाड्या अप्रत्यक्षरित्या बिशप आणि धर्मगुरूंच्या हातात राहतात.

रोम येथे राहणाऱ्या व 'Women Church World' ह्या व्हॅटिकनतर्फे चालवल्या जाणाऱ्या मासिकाच्या संपादिका लुसेटा स्काराफिया (Lucetta Scaraffia) यांनी मार्च 2018 मध्ये 'स्त्रिया धर्मभगिनी होण्यासाठी येतात; गरीब आणि दुःखी लोकांची सेवा करण्यासाठी, धर्मगुरूंची धुणीभांडी करण्यासाठी नाही' असे वैतागून संपादकीयात नमूद केले होते. पुढे तर तिने फेब्रुवारी 2020 च्या अंकाचा विषयच मुळी 'धर्मभगिनींचे चर्चमधील धर्मगुरुंकडून होणारे शोषण' हा ठेवला. आणि या विविध प्रकारच्या शोषणामुळेच धर्मभगिनी होण्यास येणाऱ्या उमेदवार मुलींचे प्रमाण जगभर घटत आहे अशी आकडेवारीही तिने त्यात नमूद केली. हा अंक प्रसिद्ध झाल्याच्या काही दिवसांतच खुद्द पोप फ्रान्सिस यांना या अंकाची दखल घेऊन ख्रिस्ती धर्मभगिनींवर चर्चमधील धर्मगुरुंकडून होणारे अत्याचार मान्य करणे भाग पडले. अर्थात लुसेटा यांनाही संपादकपदाचा राजीनामा द्यावा लागला!

धर्मगुरू आणि धर्मभगिनी होण्यासाठी बऱ्याच उमेदवारांची निवड ही कोवळ्या 17-18 व्या वर्षीच होते. बरेचसे उमेदवार हे गावातून आलेले असतात. तेही बहुतांश धार्मिक गरीब कुटुंबांतून. 'देवाच्या हाकेला साद दिलेले तरुण वा तरुणी' म्हणून धर्मगुरू आणि धर्मभगिनी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ख्रिस्ती समाजात आपसूक मान मिळत असल्याने, बरीच गरीब कुटुंबे आपल्या कोवळ्या मुलांना 'देवाच्या मळ्यात' कार्य करण्यासाठी पाठवितात. बहुतेक उमेदवारांनी वयाची विशीही गाठलेली नसते. त्यामुळे आपल्या लैंगिक जाणिवांचं पूर्ण भान विकसित न झालेलं असं हे अडनिडं वय असतं.

सेमिनरीतून धर्मगुरू म्हणून बाहेर पडल्यावर काही वर्षांतच छोट्या गावातील हे तरुण धर्मगुरू पुरेशा अनुभवाविना अन् पुरेशा संघर्षांविनाच मोठ्या शहरातील चर्चच्या दिग्गज संस्थांचे सहज संचालक, प्राचार्य होतात. चर्चच्या बऱ्याच संस्था या सुस्थितीत असल्याने, या संस्थांच्या उच्चपदस्थांसाठी असलेल्या सर्व भौतिक सुखसुविधा ह्या तरुण धर्मगुरूंच्या पायाशी लोळण घालू लागतात. आणि मग येथेच त्यांना विविध मोहपाश खुणावू लागतात. तर दुसरीकडे धर्मभगिनी होण्यास आलेल्या मुली, अगोदरच स्त्री म्हणून सामाजिक बंधनाच्या शृंखलेत असतात आणि त्यात पुढे धर्मभगिनी म्हणून धर्माच्या पिंजऱ्यातही त्यांना बंदिस्त राहावं लागतं.      

धर्मगुरू वा धर्मभगिनी होण्यासाठी एकदा एखाद्या मठात प्रवेश घेतला की मध्येच सोडून येणाऱ्या उमेदवारांची 'पवित्रपदी राहण्यास कमी लायक ठरलेला वा ठरलेली' म्हणून समाजात विटंबना होते. त्यात तो मुलगा असेल तर, प्रॉपर्टीमध्ये एक हिस्सेदार वाढला म्हणून घरचे इतर भागीदार नाराज होतात आणि मुलगी असेल तर घरच्यांना लग्न लावून देण्याचा ताण; त्यामुळे कुटुंबही आपल्याच मुलामुलींना परत स्वीकारण्यासाठी तितके अनुकूल नसते. त्यामुळे लग्न करून सर्वसामान्य आयुष्य जगण्याची इच्छा झालेल्या बऱ्याच उमेदवारांना नंतर मागे वळता येत नाही.  

हे सर्व समजून घेतल्यावर ख्रिस्ती मठातील ह्या विविध समस्यांची भीषणता आणि वेदना मग अधिकच गहिरी होते. भारतीय कोर्टात चाललेल्या वरील दोन वेगवेगळ्या केसच्या निमित्ताने 'धर्मभगिनींची सुरक्षितता' हा विषय आता तरी येथील ख्रिस्ती लोकांत उघडपणे चर्चिला जावा.  

नको त्या वेळी नको ते पाहिले म्हणून खून झालेली सिस्टर अभया, 'आमेन' हे आत्मचरित्र लिहून कॉन्व्हेन्टमधील वाईट अनुभव मांडणारी सिस्टर जेसमी, सुरुवातीला बिशप फ्रँकोविरोधात जाहीर निषेध केला म्हणून निलंबित केली गेलेली सिस्टर लूसी, वा अजून एवढे धाडस एकवटू न शकलेल्या इतर अनेक मूक कळ्या. ह्या सर्व धर्मभगिनी अक्षरशः आपले सर्वस्व पणाला लावून काहीतरी बोलू पाहतायेत. आणि ते हुंकार शांतपणे आणि सहवेदनेने ऐकण्यासाठी समाजाने त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

- डॅनिअल मस्करणीस, वसई/पुणे
danifm2001@gmail.com      

(आय. टी. क्षेत्रात इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या डॅनियल मस्करणीस यांची 'मंच' ही लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली आहे.)

Tags: कॅथोलिक लैंगिक छळ धर्मभगिनी चर्च Load More Tags

Comments: Show All Comments

शिरीष पाटील

अतिशय अभ्यासपूर्ण लेख,परखड असला तरी वास्तवाची मांडणी केली आहे. धर्मगुरु आणि धर्म भगिनी यांच्यावर असलेले ब्रह्मचर्याचे बंधन चर्चने बदलले पाहिजे. त्यांचे लक्ष संसारात अडकू नये व तशी जबाबदारी त्यांच्यावर असू नये हे ठिक पण कामप्रवृृत्ती या सहजप्रवृत्तीला दाबुन टाकणे योग्य वाटत नाही. विषय मांडला म्हणून डॅनियल यांचे अभिनंदन

बॅप्टिस्ट वाझ

लेख एकांगी वाटतो. त्या बिशपांची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे. न्यायधिशांच्या निकालाबाबत लेखात कोणतेही भाष्य न करता मत व्यक्त करणे किंवा बिशपांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख न करता दोषारोप करणे हे सुद्धा अन्यायकारक आहे. बॅप्टिस्ट वाझ.

Saby Pereira

विषयाच्या सर्व बाजूंवर विचार करायला लावणारा उत्तम लेख. ख्रिस्ती धर्मगुरूंनी केलेल्या बलात्काराच्या घटनांपेक्षा समाजात इतरत्र होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्या आरोपींवर ब्राह्मचर्यांची कोणतीही सक्ती नसते तरीही ते बलात्काराला उद्युक्त होतातच ना! त्यामुळे, "लैंगिक शोषणाच्या घटनांमागचे प्रमुख कारण म्हणजे धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांच्यावर चर्चने सक्तीने लादलेला ब्रह्मचर्याचा नियम." हे काहीसं jumping to the conclusion वाटतं.

देवकुमार अहिरे

अभ्यासपूर्ण लेख! विषयाचे अनेक मुद्दे आपण मांडले. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य आणि गुंतागुंत समजून घेता येते.

डॉ सिसिलिया कार्व्हालो

अत्यंत समतोल लेख. त्या बिशपची निर्दोष मुक्तता होणं ही बातमी संतापजनक आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा असा कंठशोष करणारे धर्माधिकारी मूग गिळून बसतात हे तर त्याहूनही शोचनीय आहे.

Maxwel Andrew Lopes

उत्तम लेख. या विषयावर चर्चपातळीवर खुलेपणाने चर्चा होण्याची गरज आहे.

BrandBond Nilesh B+

उत्तम अभ्यासपूर्ण रिपोर्ट. हिंदू-जैन साध्वी काय किंवा ख्रिस्ती नन काय शेवटी सगळ्या धर्मात स्त्रियांचे खुलेआम शोषण चालते ते ही लोकांना धर्म म्हणजे काय ते समजविण्याचा ठेका घेतलेल्या नालायक निर्लज्ज निगरगट्ट धर्मगुरूंकडून..

Add Comment