या पुस्तकाचा भर पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा हे नाट्यसंगीतकार म्हणून कसे घडले, त्यांचे नाट्यसंगीतातील योगदान किती महत्त्वाचे आहे, यावर आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेली नाटके संगीतनाटकांच्या परंपरेला वेगळे परिमाण देणारी होती. उदाहरणार्थ, ‘कट्यार काळजात घुसली’. तर या नाटकाचे संगीत कसे निर्माण झाले, ते कसे गाजले याचा मनोज्ञ आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील दिवाळीच्या सणाला जसा दिवाळी अंकांचा साहित्यिक वारसा आहे तसा दिवाळी पहाटच्या गाण्याच्या कार्यक्रमांचा सांगीतिक वारसाही आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणाचे हे एक अविभाज्य अंग आहे, असे मला वाटते. यंदा दिवाळीच्या सुमारास माझ्या हातात अभिषेकी (पंडित जितेंद्र अभिषेकी : कला आणि जीवन प्रवास) हे शैला मुकुंद यांनी लिहिलेले पुस्तक आले. अभिषेकीबुवांच्या प्रेमात मी आधीपासूनच असल्यामुळे दिवाळीतच या पुस्तकाचे वाचन मी पूर्ण केले. हे पुस्तक ऑगस्ट 2024 मध्ये पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाची निर्मिती नितांत सुंदर पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे पुस्तक हातात घेतले की, संपूर्ण वाचल्यानंतरच ते ठेवावेसे वाटते.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच "पर्वता एवढे ऋण" असे म्हणून पुस्तक निर्मितीत ज्यांनी सहकार्य केले त्यांचा ऋणानुबंध व्यक्त करण्यात आला आहे. त्यात विनोद पालयेकर, रेखा मोहन मोहोळकर आणि परिवार यांचा उल्लेख आहे. या पुस्तकाची निर्मिती होत असताना जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी विद्याताई अभिषेकी यांचे निधन झाले. त्यामुळे हे पुस्तक विद्याताई अभिषेकी यांना अर्पण करण्यात आलेले आहे.
या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला "नवाथे – अभिषेकी" अशी वंशावळ देण्यात आलेली आहे. ही वंशावळ वाचल्यानंतर चकित व्हायला होते. या वंशाचे मूळ पुरुष भिकू भट्ट (अभिषेकी ही आडनाव व्यवसायामुळे पडले.) त्यांचे चिरंजीव वासुदेव भिकू भट्ट आणि त्यांचे चिरंजीव भिकू वासुदेव भट्ट. या भिकू वासुदेव भट्ट यांना एकूण पाच मुले. त्यापैकी गणेश यांनी आपल्या एका मुलाचे नाव पुन्हा भिकाजी ठेवले. याच भिकाजी यांचे चिरंजीव म्हणजेच गणेश अर्थात जितेंद्र अभिषेकी. या भिकाजीचे दुसरे भाऊ होते दीनानाथ मंगेशकर, म्हणजे लतादीदींचे वडील. म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी आणि लतादीदी ही सख्खी चुलत भावंडे आहेत. ही गोष्ट वाचून आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटले. आजवर मला या नात्याविषयी कल्पनाच नव्हती. मी या नातेसंबंधांचा उलगडा ज्यांच्या ज्यांच्या समोर केला त्यांनाही अभिषेकी आणि मंगेशकर कुटुंब यांचे नाते माहीत नव्हते. कदाचित अभिषेकी आणि मंगेशकर या आडनावांमधील फरकामुळे हे नाते आजवर अंधारात राहिले असेल.
प्रचलित पद्धतीने एखाद्याचे जसे चरित्र लिहितात तसे हे चरित्र लिहिलेले नाही. चरित्रात एकूण 13 प्रकरणे असून बुवांच्या सांगीतिक आयुष्याचा आढावा त्यात आलेला आहे. आवश्यक तेथे त्यांचे बालपण, तरुण वय आणि उतारवय यांचे उल्लेख आलेले आहेत. पण अगदी सनावळी अनुसार जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा आलेख या पुस्तकात आलेला नाही.
पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी यांना ज्या गुरूंचे मार्गदर्शन लाभले, ज्या प्रतिभावंत कलाकारांचा सहवास लाभला, आणि त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट वगैरे जी अनेक माणसे त्यांच्या यशापाठीमागे कारणीभूत होती, त्यांचे यथोचित उल्लेख व वर्णने पुस्तकात आहेत. गृहस्थाश्रमी जितेंद्र अभिषेकी बुवा गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण कसे देत होते याविषयी सविस्तर माहिती त्यात आहे. त्यामुळे या पुस्तकाची वाचनीयता वाढलेली आहे.
मात्र मुख्यतः या पुस्तकाचा भर पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा हे नाट्यसंगीतकार म्हणून कसे घडले, त्यांचे नाट्यसंगीतातील योगदान किती महत्त्वाचे आहे, यावर आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेली नाटके संगीतनाटकांच्या परंपरेला वेगळे परिमाण देणारी होती. उदाहरणार्थ, ‘कट्यार काळजात घुसली’. तर या नाटकाचे संगीत कसे निर्माण झाले, ते कसे गाजले याचा मनोज्ञ आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कट्यारनंतर आलेली काही अशी नाटके ज्यांच्याकडे नाट्यसंगीत म्हणून रसिकांचे फारसे लक्ष गेले नाही, त्यांचा उल्लेख "अलक्षित नाट्यसंगीत" या नावाने आलेला आहे. नाट्यसंगीत आवड म्हणून ऐकणारे अनेक रसिक असतात पण एखादे नाट्यपद कोणत्या रागावर आधारित आहे, याची माहिती रसिकांना असतेच असे नाही. ती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात अत्यंत चांगल्या प्रकारे केलेला आहे.
जे राग सामान्यपणे मैफिलीत सादर होत नाहीत त्यांना अनवट राग म्हणतात. जय जय बिलावल, विक्रम भैरवी, गांधारी, बिहागडी, डागोरी हंसकिंकणी, चारुकेशी, परज संजोग, नायकी कानडा, धनकोणी कल्याण, धनी भैरवी या आणि अशा अनवट रागांत अनेक लोकप्रिय नाट्यगीते अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केली. त्यापैकी काही राग मिश्र स्वरूपाचे आहेत. आरोह आणि अवरोहात वेगवेगळ्या रागांची झलक दाखवणारे सूर त्यांत असतात. हे मिश्रण अत्यंत विहंगम असते. यापैकी काही राग स्वतः जितेंद्र अभिषेकी यांनी निर्माण केले आहेत. तर काही राग त्यांनी ज्या ज्या गुरूकडे जे जे शिकले त्याच्या स्मृतीतून आलेले आहेत. काही राग त्यांचे गुरुबंधू पं. सी.आर. व्यास यांनी निर्माण केले आहेत.
नाट्यसंगीतात केवळ रागदारीचेच नव्हे तर वेगवेगळ्या गायनप्रकारांचेही प्रयोग त्यांनी केले. कीर्तनाच्या अंगाने जाणारी दिंडी, लावणी, भक्तिसंगीत, अंगाई अशा वेगवेगळ्या भावरसांनी सजलेली नाट्यगीते त्यांनी केली. हे विलक्षण प्रतिभा असणाऱ्या कलावंताचेच काम आहे.
जितेंद्र अभिषेकी हे एक शास्त्रीय गायक, नाट्यसंगीतकार म्हणून किती अभ्यासू आणि प्रगल्भ विचाराचे होते, त्यांना रसिकांच्या नेमक्या आवडीचा अंदाज कसा येत असे, त्यानुसार ते कसे चाल देत असत, नाटकातल्या कथानकाला आणि भावनेला पूरक अशाच रागाची निवड कशी करत असत, त्यातही बरेच अनवट राग कसे वापरत, नाट्यसंगीतात ते कसे वेगळे प्रयोग करीत, नाट्यसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा कसा होता, त्यानी देशपरदेशात केलेल्या मैफिली, त्यांच्या शिष्यांची परंपरा, त्यांनी मोजक्याच चित्रपटगीतांना दिलेले संगीत अशा गोष्टी विस्ताराने चर्चिल्या आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांबरोबरच नाट्यअभ्यासकांच्यासाठीही हे पुस्तक विलक्षण उपयुक्त आहे असे माझे मत आहे.
बुवा आकाशवाणी पुणे केंद्रावर काम करत असताना त्यांनी कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांच्या कोकणी व मराठी कवितांना चाली लावल्या. त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. बोरकरांच्या कवितांना चाली लावण्यासाठीच बुवांनी अवतार घेतला की काय असे काही चाहत्यांना वाटे. संगीतकार म्हणून बुवांनी संपादन केलेल्या यशामध्ये सुरुवातीच्या काळातील बोरकरांच्या गीतांचा मोठा वाटा आहे. त्यातून त्यांनी प्रतिभा व प्रयोगशीलता सिद्ध केली.
बुवा स्वतः एक उत्तम लेखक होते. त्यांनी एका लेखात असे लिहून ठेवले आहे की, “हिंदुस्थानात शास्त्रीय संगीत मोठे की सुगम संगीत मोठे हा वाद सनातन काळापासून चालत राहिलेला आहे. माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कार्दुस या पाश्चात्य समीक्षकाने या वादाला बिनतोड उत्तर दिले आहे .तो म्हणतो, “Music is either good or bad, it is neither classical nor light.”
हेही वाचा - सहज, सुरेल मालिनीबाई!
समीक्षकांनी केलेल्या टीकेचा बुवांवर कधीच फारसा परिणाम झाला नाही. पण जेव्हा त्यांचे गुरू पं. जगन्नाथ यांनी टीका केली, तेव्हा मात्र त्यांना वाईट वाटले. जोगकंस रागातील बुवांची एक रचना जगन्नाथबुवांना आवडली नाही. परंपरागत संगीतात बदल करून केलेला प्रयोग आपल्या गुरूला आवडला नाही याने काही क्षणापुरते बुवा नाराज झाले. मात्र जगन्नाथ बुवा किंवा त्यांच्या पिढीतील इतर बुजुर्ग यांना ठराविक लहेज्याने रागदारी ऐकण्याची सवय आहे. त्या बाबतीत त्या गुरुजनांचा काही पारंपरिक विचार आहे, त्यामुळे हा बदल सहजासहजी त्यांना रुचेलच असे नाही मात्र तो अयोग्यच असेल असेही नाही, असा वेगळा विचारही त्यांनी केला. कदाचित या चाकोरीबाहेरच्या विचारामुळेच त्यांना अपार यश मिळाले असावे.
आपल्या अनेक शिष्यांची ओळख जितेंद्र अभिषेकी यांनी स्वतः करून जशी करून दिली होती तशी पुस्तकात मांडलेली आहे. आणि त्या शिष्यांनीही आपल्या गुरूचा वारसा कलेतून सार्थपणे दाखवून दिलेला आहे. आजचे आघाडीचे गायक महेश काळे यांचा उल्लेख मात्र या पुस्तकात आलेला नाही. एवढेच या पुस्तकाचे उणेपण जाणवते.
बुवांच्या बरोबर अनेक मान्यवर लोकांची छायाचित्रे पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अभिषेकी बुवांचे ऐन उमेदीच्या काळातले रुबाबदार छायाचित्र मुखपृष्ठकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी दिलेले आहे. पुस्तकाचा आकार हा वेगळ्या पद्धतीचा आहे. सहसा चरित्रविषयक पुस्तकाचा ज्या प्रकारचा आकार असतो, त्या प्रकारचा आकार या पुस्तकाला राजहंस प्रकाशनाने मुद्दामून दिलेला नसावा. कारण पुस्तकाचा चाहता वर्ग हा एकदम वेगळ्या प्रकारचा असण्याची शक्यता आहे.
जितेंद्र अभिषेकी यांचे व्यक्तिमत्त्व, आणि त्यांनी नाट्यसंगीताच्या क्षेत्राला दिलेले अमूल्य योगदान याविषयी जिज्ञासा असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे.
- अॅड. देविदास वडगांवकर, उस्मानाबाद
+91 94230 73911
पुस्तकाचे नाव - अभिषेकी (पंडित जितेंद्र अभिषेकी : कला आणि जीवन प्रवास)
लेखिका - शैला मुकुंद
प्रकाशक - राजहंस प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
किंमत - 500 रुपये
Tags: jitendra abhisheki shailamukund wadgaaonkar classical music shastriya sangit natya sangit Load More Tags
Add Comment