पंडित सी. आर. व्यास. यांनी स्वतंत्रपणे काही रागांची निर्मिती केली आहे. त्यात ‘धनकोणी कल्याण’ या रागाचा उल्लेख करता येईल. संगीत रंगभूमीवर मराठी शास्त्रीय संगीतकार आणि गायकांनी आपली छाप सोडलेली आहे. पंडित सी .आर. व्यासही त्याला अपवाद नाहीत. गोविंद आफळे लिखित ‘जय जगदीश हरे’ या नाटकाला त्यांनी संगीत दिल्याची माहिती याच पुस्तकातून मिळते.
पं. सी. आर. व्यास हे नाव मी पहिल्यांदा कधी ऐकले ते मला आठवत नाही, पण माझ्या घरात शास्त्रीय संगीताचा वारसा असल्यामुळे हे नाव मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. 1982 मध्ये त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला. मराठवाडा पातळीवरचे संगीत संमेलन तत्कालीन उस्मानाबाद येथे आम्ही आयोजित केले होते. त्या संमेलनाचा सहसचिव म्हणून मी काम पाहत होतो. संमेलनातील एका दिवसाच्या मैफिलीची सांगता पं. सी. आर. व्यास यांच्या गाण्याने झाली. त्यांनी इतर कोणते राग गायले हे मला आठवत नाही. पण ‘स्वानंदी’ नावाचा राग आळवला, तो मात्र नीट आठवतो. तो त्यांच्या गुरूंनी निर्माण केलेला राग होता. खरे तर त्यावेळेला मी शास्त्रीय संगीताचा रसिक नव्हत तो राग ऐकून मला शास्त्रीय संगीत आवडू लागले. ‘स्वानंदी’ राग मला खूपच आवडला. त्यावरून मी माझ्या एका मुलीचे नावही स्वानंदी ठेवले.
पं. सी. आर व्यास हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील, धाराशिव तालुक्यातील तेर या गावचे. तेर हे गाव ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ लाभलेले आहे. संत परंपरेतील गोरोबाकाका यांची ती जन्मभूमी, कर्मभूमी. त्या भूमीत असा हिरा जन्मावा हा दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल. पुढे बार्शी येथे शालेय शिक्षण आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेऊन त्यांनी मुंबई गाठली आणि एका कंपनीत काम करू लागले. संगीताची आराधना केली. त्यांचे गुरू राजारामबुवा पराडकर म्हणजे त्यांचे साडूच होते. हे दुहेरी नाते अत्यंत सुरेखपणे त्यांनी सांभाळले, याची अनेक उदाहरणे या पुस्तकात आलेली आहेत. राजाराम बुवांच्या सांगण्यावरूनच त्यांनी नंतर पं. जगन्नाथबुवा पुरोहित उर्फ पंडित गुणीदास यांच्याकडे शिक्षण घेतले. शब्दप्रभू आणि स्वरप्रभू दोन्ही असलेला कलावंत दुर्मिळ असतो. हे संचित महाराष्ट्राच्या एका छोट्या गावातून आलेल्या कलावंताच्या ठिकाणी होते पण त्याची कदर झाली नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्काराशिवाय शासन दरबारी अन्य पुरस्कार मिळाले नाहीत.
पं. सी. आर. व्यास यांच्या दोन भगिनी आमच्या आसपास राहत होत्या. त्या दोन्ही कुटुंबांचे आमचे कौटुंबिक घरोब्याचे संबंध होते. सुहास व्यास ,सतीश व्यास आणि शशी व्यास यांची नावे ही मी ऐकली होती. त्यापैकी शशी व्यास हे माझी भाची, गायिका भाग्यश्री देशपांडे, हिला खूप मदत करतात, हे मला माहीत होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘चिंतामणी एक चिरंतन चिंतन’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे जेव्हा मला कळाले, तेव्हा मी साधना मीडिया सेंटरशी संपर्क साधून ते मागवून घेतले आणि झपाटल्यासारखे वाचून काढले. मांडणी आणि आशय या दोन्ही दृष्टींनी हे पुस्तक अत्यंत देखणे झालेले आहे.
पंं. सी. आर. व्यास यांना, त्यांच्या कलेला न्याय देऊ शकेल एवढी अधिक प्रसिद्धी मिळाली नाही, ही सल कुठेतरी मला बोचत होती. मराठवाड्यातील माझ्या जिल्ह्यातील तेर गावच्या या कलाकाराच्या वाट्याला अशी उपेक्षा का यावी याची कारणे मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. हे पुस्तक वाचून त्यापैकी बऱ्याच कारणांचा शोध लागला. अर्थात त्यात त्यांच्या कर्तृत्वाला कमीपणा येईल असे कोणतेही कारण नव्हते. त्यांची प्रतिभा म्हणजे बावनकशी सोने होते, याबद्दल माझ्या मनात आजही शंका नाही.
गायकाची प्रतिभा ही सादरीकरणाप्रमाणेच रागनिर्मिती आणि बंदिशरचनेतूनही दिसते. ‘गुणीजान’ हे टोपणनाव घेऊन सी. आर. व्यास यांनी प्रामुख्याने आपले गुरू ‘गुणीदास’ यांच्यासाठी आणि अन्यही काही बंदिशी रचल्या. त्या बहुतांशी अनवट रागांशी संबंधित आहेत. ‘वरहरी तोडी’, ‘बैरागी भैरव’, ‘जोगिया’ या रागांतील त्यांच्या बंदिशी प्रसिद्ध आहेत. आपला मुलगा सुहास याच्या लग्नानंतर आपल्या घरात आलेल्या पहिल्या सूनबाईवर त्यांनी ‘बागेश्री’ रागातील बंदिश रचली. अशा बंदिशींचा पुस्तकात एक स्वतंत्र विभाग असून त्या बंदिशींचा अर्थ, ती निर्माण करण्यामागची पार्श्वभूमी या भागात विशद करण्यात आली आहे. हे या पुस्तकाचे आगळे वैशिष्ट्य आहे. हे प्रकरण म्हणजे या पुस्तकाचे सार आहे असे मला वाटते. आपल्या जवळच्या माणसांच्या जीवनातील रागलोभाचे प्रसंग घडले की, त्यातून त्यांना बंदिशी सुचत.
शब्दांच्या माध्यमातून स्वररचना सादर करण्याची स्वरप्रधान परंपरा शास्त्रीय संगीतात आहे, त्यात शब्द आपोआप मागे पडतात. पंडितजींनी मात्र शब्दरचनांनाही महत्त्व दिले. या रचना हिंदीत आहेत. शास्त्रीय संगीताच्या बंदीशी हिंदीतच का असतात? हा मला पडलेला प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. व्यास यांचे शिक्षण हिंदीत झालेले नव्हते. मराठमोळ्या वातावरणात त्यांची सगळी जडणघडण झाली. तरीही अत्यंत चांगल्या हिंदी भाषेत, त्या त्या रागातील स्थायीभाव व्यक्त होईल अशा शब्दरचना त्यांनी केल्या आहेत. बंदिशकार म्हणून मला पं. सी. आर. व्यास यांचे महत्त्व वेगळे वाटते. ते या पुस्तकात सविस्तरपणे आलेले आहे.
पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. भातखंडे यांनी संगीत लिहिण्याची लिपी विकसित केली. लिपीतून खरोखर संगीत व्यक्त होते काय, हे मला माहीत नाही. संगीत क्षेत्रात त्याबाबत वादविवादही आहेत. पण संगीत कला म्हणून विस्तारित होण्यासाठी या लिपीचा खूपच उपयोग झाला. या लिपीतील सी.आर. व्यास यांनी काढलेली त्यांच्या हस्ताक्षरातली काही नोटेशन्स या पुस्तकात दिलेली आहेत.
पंडित सी. आर. व्यास. यांनी स्वतंत्रपणे काही रागांची निर्मिती केली आहे. त्यात ‘धनकोणी कल्याण’ या रागाचा उल्लेख करता येईल. आपले स्वतःचे राग आणि आपल्या गुरूने रचलेले राग याचा स्वतंत्र उल्लेख न केल्यामुळे एका ज्येष्ठ कलाकारासोबत पंडितजींचा कसा वाद झाला याचेही वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे.
संगीत रंगभूमीवर मराठी शास्त्रीय संगीतकार आणि गायकांनी आपली छाप सोडलेली आहे. पंडित सी .आर. व्यासही त्याला अपवाद नाहीत. गोविंद आफळे लिखित ‘जय जगदीश हरे’ या नाटकाला त्यांनी संगीत दिल्याची माहिती याच पुस्तकातून मिळते.
पंडित सी .आर .व्यास यांचे नाव ‘चिंतामणी’, त्यांची चिरंतन संगीतसेवा, आणि त्याविषयीचे त्यांचे स्वतःचे चिंतन उलगडून दाखवणारे हे पुस्तक ‘चिंतामणी, एक चिरंतन चिंतन’ हे अर्थपूर्ण संबोधन घेऊन आलेले आहे. पुस्तकातील प्रकरणांची नावे शास्त्रीय संगीताच्या संकल्पनांवर आधारित आहेत. जसे की, ‘विलंबित’, ‘आध्दा’, ‘मध्यलय’, ‘दृतलय’, ‘भैरवी’ इत्यादी. या संकल्पना आणि त्या त्या प्रकरणात आलेले पंडित सी.आर .व्यास यांच्या जीवनातील टप्पे यांची सार्थ संगती जाणवते.
पुस्तकाचे देखणेपण त्याच्या आशयाइतकेच मांडणीतही आहे. पुस्तकाचा आकार सामान्यपणे जसा असतो त्यापेक्षा मोठा आहे. त्यात अनेक रंगीत छायाचित्रे आहेत. लेखिका श्रुती पंडित आणि लेखक शशी व्यास यांनी हे पुस्तक सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेऊन हे सारे फोटो जमा केले आहेत.
हा रूढार्थाने चरित्र ग्रंथ नाही. ‘स्मृती ग्रंथ’ स्वरूपाचा आहे. चरित्र ग्रंथात जशी एका लेखकाची मांडणी असते तशी या ग्रंथात दिसत नाही. पंडितजींच्या जवळच्या नातेवाईकांनी, मुला-मुलींनी, नातवंडांनी लिहिलेले लेख, त्यांच्याविषयीच्या आठवणी, ऋणनिर्देश पुस्तकात दिलेले आहेत, पु .ल. देशपांडे यांनी सी. आर. व्यास यांच्या साठीनिमित्त त्यांची सांगीतिक कामगिरी, आणि पत्नीने दिलेली खंबीर साथ यांविषयी केलेले भाषण म्हणजे तर एक संदर्भठेवा आणि पुस्तकाचे भूषण आहे.
पुस्तकाचे लेखन हे बहुतांश ऐकीव स्वरूपातील माहितीच्या आधारे आहे. त्या त्या वेळेला तसा संदर्भ देण्यात आलेला आहे. हे पुस्तक श्रुती पंडित यांनीच शब्दबद्ध केलेले असावे व शशी व्यास यांचे या पुस्तकाच्या निर्मितीतील योगदान माहिती व छायाचित्रे पुरविणारे सहकारी या स्वरूपाचे असावे. परंतु तरीही सहलेखक म्हणून शशी व्यास यांचे नाव यावे हे थोडे खटकते.
त्यांनी गुरूकडून घेतलेले शिक्षण आणि स्वतः गुरू म्हणून दिलेले शिक्षण यासाठी एक स्वतंत्र विभाग दिलेला आहे. त्यांच्या शिषयांची माहिती आहे. प्रभाकर कारेकर, पंडितजींचे चिरंजीव सुहास व्यास ,सतीश व्यास ,संजीवची मुलगी, श्रीपती हेगडे, नीलाक्षी जुवेकर इत्यादींची नावे आहेत. मात्र आमच्या जिल्ह्यातील एक ठळक नाव विसरल्याचे दिसते. ते म्हणजे जेष्ठ हार्मोनियमवादक दीपक लिंगे. दीपक लिंगे हे पंडित सी.आर .व्यास यांचे गंडा बंधन झालेले शिष्य होते. त्यांनी पंडित सी. आर. व्यास यांना गायनाच्या अनेक कार्यक्रमात हार्मोनियमवर साथ केली. पण त्यांचे नाव पंडित सी. आर .व्यास यांचे शिष्य म्हणून या ग्रंथात नमूद करण्यात आलेले नाही. शशी व्यास व व्यास कुटुंबीय यांच्या आठवणींवर आधारित हा ग्रंथ आहे, तर त्यांनी हा उल्लेख का केला नसेल? एका ज्येष्ठ सर्जनशील कलाकाराची अशी उपेक्षा करावी हे रुचले नाही.
पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन संस्थेने केलेले आहे. मौज प्रकाशन गृहाच्या संपादक मोनिका गजेंद्रगडकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. श्रुती पंडित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे. रामदास भटकळांसारख्या ज्येष्ठ संपादकाने संपादन केलेले आहे. अच्युत पालव यांनी सुलेखन केलेले आहे. मुखपृष्ठ श्रद्धा पालव यांनी तयार केले आहे.
ज्यांना पंडित सी. आर .व्यास यांच्या कारकिर्दीचा, त्यांच्यातील सृजनशील कलाकार समजून घ्यावयाचा आहे. त्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे.
चिंतामणी : एक चिरंतन चिंतन
लेखक:- श्रुती पंडित, शशी व्यास
प्रकाशक:- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठे:- 333
किंमत:- 2000 रुपये
- अॅडव्होकेट देविदास वडगांवकर, तांबरी, धाराशिव
मोबाईल:- 94230 73911
(लेखक व्यवसायाने वकील आणि संगीत रसिक आहेत.)
Tags: pandit C R Vyas चरित्र सी आर व्यास पं. सी आर व्यास पुस्तक परिचय चिंतामणी - एक चिरंतन चिंतन Load More Tags
Add Comment