मणी कौल: शैलीदार दिग्दर्शक

चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांचा 9 वा स्मृतिदिन

फोटो सौजन्य: thenormancrane.wordpress

चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांच्याविषयी बोलताना अनेकांचा स्वर हेटाळणीचा असतो. आणि गंमत म्हणजे ही मंडळी पूर्णपणे वेगळ्या प्रवृत्तीची असतात. त्यांचे चित्रपट पाहून सामान्य प्रेक्षक म्हणतो, ‘ही काय फिल्म आहे?’ किंवा ‘काय बोअरिंग स्लो फिल्म आहे’. तर फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेतलेला चित्रपट कलेतील उच्चशिक्षित विद्यार्थी त्यांच्याविषयी म्हणतो, ‘मणी कौल स्नॉबिश (गर्विष्ठ) आणि प्रिंटेशिअस (दिखाऊ) आहे.’

अर्थात पहिला प्रेक्षक बरा कारण तो निदान चित्रपटाविषयी तरी बोलत असतो. उच्चविद्याभूषित तर सरळ मणी कौल या दिग्दर्शकाच्या मुळावरच उठतो. तारकोव्हस्की म्हणतो, ‘ज्यांची तुमच्या चित्रपटाच्या तरंगाशी नाळ जुळते, तो तुमचा होतो. ज्यांची जुळत नाही तो परका राहतो.’ आणि हे नैसर्गिकच नव्हे तर अटळ आहे. 

एखादी कलाकृती जवळची वाटली नाही तर त्यापासून लांब राहणे वेगळे आणि ती कलाकृती ‘कलाकृतीच नाही’ किंवा ते वाङ्मय ‘वाङ्मयच नाही’ किंवा ते वाङ्मय अत्र्यांच्या भाषेत ‘विष्ठा वाङमय’ आहे, म्हणणे वेगळे. आणि आपल्याकडे हेच पिढ्यानपिढ्या चालू आहे. 

प्रत्येक चित्रपट स्वत:चा स्वभाव व प्रकृती घेऊन येतो आणि त्या कितीही भिन्न असल्या तरी जर त्या सच्च्या असतील तर त्यांच्याशी नाळ सहजपणे जुळते. कुरुसावा, बर्गमन किंवा आयझेनस्टाईन, ताराकोव्हस्की ही दिग्दर्शक मंडळी एकमेकांपेक्षा कितीही वेगळी असली तरी आपले त्यांच्याशी जमतेच. 

तर हे दोन वेगळे प्रेक्षक मणी कौलबद्दल असं का बोलतात बरं? कारण एकच आहे. दोघांच्याही मनात चित्रपट कसा असतो किंवा असावा याचे पूर्वग्रह आहेत. सामान्य प्रेक्षकाच्या मनात हिंदी चित्रपटाचा साचा आहे. हिंदी चित्रपटांचा पेस, लय, लकबी, संगीत, कृत्रिम वेग, डायलॉगबाजी, स्टाईलबाजी, कधीही शांत नसलेला, साउंडट्रॅक त्यांच्या अंगवळणी पडलाय. त्यामुळे शांतता हा सुद्धा ध्वनीचा एक अविभाज्य भाग आहे हेच त्यांना समजलेलं नाही. यात त्यांची चूक नाही कारण त्यांनी इतर प्रकारचा चित्रपट पाहिलेलाच नाही.

मात्र (फिल्म स्कूलमधून शिक्षण घेतलेले) दुसऱ्या प्रकारचे प्रेक्षक जास्त धोकादायक आहेत, कारण त्यांनी इतके चित्रपट पाहिले आहेत, की चित्रपट म्हणजे काय हेच त्यांना समजेनासे झालयं. चित्रपट या वास्तवाशी त्यांनी पूर्ण फारकत घेतली आहे. त्याचं एखाद्या गणितज्ज्ञांसारखं किंवा शास्त्रज्ञासारखं झालयं, ज्यांच्या दृष्टीने जग म्हणजे केवळ काही आकडे आणि प्रमेय आहेत.

चित्रपट विद्याविभूषित लोकांसाठी 'चित्रपट म्हणजे विशिष्ट शैलीत, विशिष्ट चित्रिकरणाने चित्रित केलेली आणि विशिष्ट संकलनाने सांधलेली व स्वतःचा खास ठसा असलेली रचना.' चित्रपट या एकसंघ, एकजीव, स्वत:चा प्राण असलेल्या वास्तवाशी त्यांनी पूर्ण फारकत घेतलेली आहे.

चित्रपट शिक्षणात अनेक दिग्दर्शकांचा अभ्यास करताना यांना स्वतःची शैली सापडते. ‘आपल्याला करायचंय ते हेच’, असा साक्षात्कार होतो आणि बाहेर आले की ते करून दाखवतात आणि तेच-तेच पुन:पुन्हा करून दाखवतात. चित्रपटाच्या प्रवासास आपण का निघालो हेच ते विसरतात.

तारकोव्हस्की फिल्म स्कूलचा विद्यार्थी असला तरी तो हा प्रवास, चित्रपटातून सत्याचा शोध विसरत नाही. आर्ट स्कूलमध्ये कधीही न गेलेले वर्ड मास्टर्स शेवटपर्यंत हा शोध चालू ठेवतात. म्हणूनच त्यांचा चित्रपट सार्वत्रिक, विशाल, सखोल, नवी परिमाणं देतो. मणी कौलदेखील फिल्म स्कूलचा विद्यार्थी होता आणि त्याच्याबाबतीतही इतर फिल्म स्कूलवाल्यांसारखं ‘मला हे सापडलंय, हे मी करणार’, अस झालं नसेल असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल.

मणी कौलचे चित्रपट बघताना जाणवतो तो फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रोबर्ट ब्रेसाँ (Robert Bresson) यांचा प्रचंड प्रभाव. ब्रेसाँची चित्रपट शैली हॉलीवुड आणि बॉलिवुडला पूर्णपणे न मानवणारी आहे. त्यांच्या कथनशैलीत संवाद नावालाच आहेत आणि ते काहीही सूचित करीत नाहीत. किंवा कुठलीही गोष्ट पुढे नेत नाहीत, कारण ब्रेसाँचा चित्रपट गोष्ट सांगणारा चित्रपट नाही. अनुभूती देणारा चित्रपट आहे. दृश्य प्रतिमा, ध्वनी आणि दुर्मिळ असणारी शांतता यांची गुंफण केलेली ती एक बंदिश आहे. आणि ती देखील लय, लयातील लयांगाने विस्तार करणारी. आपल्याला सूर समजतो, ठेका समजतो; पण लय पटकन हातात येत नाही. ठेका मोजता येतो, ठेक्यानंतर दृश्य सहजपणे कापता येते. लयीशी एकरूप व्हावं लागतं. दृश्य लयीवर कापता येत नाही, ते अशा पध्दतीने कापावं लागतं की लयीचा आंतरीक स्त्रोत अव्याहतपणे चालू रहावा लागतो. हे उत्कटपणे आणि नैसर्गिकपणे जमलेले दोन दिग्गज म्हणजे ब्रेसाँ आणि तारकोव्हस्की. 

नि हो, आपण संकलनाबद्दलच बोलतोय. प्रत्येक कलेत संकलन असतंच. काय निवडतो आणि काय टाकतो यात संकलन आहेच. संकलन करताना त्या कलेचं व्याकरण (उद्गारवाचक चिन्हात) माहीत असणं गरजेचं आहे. भाषेचा मूळ घटक शब्द धरला तर चित्रपटाचा काय? आणि त्यातून अर्थ येतो तो कशामुळे? ‘रंगहीन हिरव्या संकल्पना शांतपणे हिंस्त्र अस्ताव्यस्त झोपल्या होत्या’, हे (चॉम्स्कीचं) वाक्य चूक आहे की बरोबर? वाक्य, व्याकरणदृष्ट्या पूर्णपणे बरोबर आहे. मग खटकतंय ते काय आहे? ते वाक्य बाहेर डीप स्ट्रक्चरमध्ये आहे. चित्रपटात आपण सब टेक्स्ट म्हणतो. चित्रपटाचा परिणाम हा खरा चित्रपटाने सूचित केलेल्या किंवा अनुभूती दिलेल्या चित्रपटात न दिसलेल्या प्रतिमांमध्ये असतो. म्हणजे काय? 

एक हायकू घेऊ.

आळस अंगात कसा भरून राहिलाय 
टीप टीप पाऊस पडताना, झुळझुळ वारा वाहताना
हे लोक मला उठवू कसे शकतात.

याचा अर्थ काय आहे? तो यातून येणाऱ्या संपूर्ण अनुभूतीत आहे. पावसाची रिपरिप दिसते, ऐकू येते, वाऱ्याची झुळझुळ दिसते, ऐकू येते, आळस जाणवतो. आणि निसर्गाशी आळसातून तल्लीन झालेल्या माणसाला ऐहिक जगात हे लोक का बरं आणतात, असं निरागस प्रश्नचिन्ह दिसतं. काही लोकांना यात तत्त्वज्ञानही दिसेल. (आळसाचं असं कोणी तत्त्वज्ञान मांडल्यास ते आयुष्यभर प्रामाणिकपणे पाळण्याची माझी तयारी आहे.) आपल्या बॉलिवुडपटात असं सूचित करण्याची किंवा प्रेक्षकांवर सोपवण्याची पध्दत नाही. ‘नायक नायिका झुडूपाखाली गेली आणि दोन फुलं एकमेकांना चिकटली की चुंबन’, असं ते बटबटीत सूचक सिम्बॉलिझम होतं, पण ते तर आता पूर्ण निकालात काढलंय.

साउंडट्रॅक सतत दणादणा वाजत राहिला नाही किंवा पात्रं काहीच न बोलता शांत बसून राहिली की आपल्या प्रेक्षकांना चुकल्या-चुकल्या सारखं वाटतं. त्यामुळे गभितार्थ किंवा सबटेक्स्ट ही तर फारच पुढची गोष्ट. माँ ढळाढळा रडतेय हे आपल्याला दिसतयं तरी नायकाला विचारावं लागतं, ‘माँ तुम्हारे आँखो में आँसू?’ किंवा व्हिलन लाळ गाळत तारवटलेल्या नजरेने नायिकेकडे झेपावतोय. का ते प्रेक्षकांना चांगलंच माहीत आहे. तरीही नायिका विचारतेय, ‘तुम्हारे इरादे कुछ ठीक नहीं लगते.’

आता या पार्श्वभूमीवर मणी कौलच्या ‘उसकी रोटी’ मधले जग्गी आणि लडकी यांचे प्रसंग प्रेक्षकांना अनाकलीय वाटणारच.

जग्गी पहिल्यापासूनच हिच्या मागे आहे. पहिल्याच प्रसंगात कैरी देतो, एकदा उसाचा रस प्यायचा आग्रह करतो. एकदा खांद्यावर हात ठेवून, एकदा घरी भुट्टा घेऊन जातो. संवाद असे. तुटक.
वो है?
कौन? भागो 
क्यू?
भुट्टा लाया था क्यू?
भुट्टा लाया था 
वो बाहर गयी है आती ही होगी 
भुट्टा लाया था 

हे संवाद सरळ एखाद्या ‘थिएटर ऑफ अ‍ॅबसर्ड’मधून घेतल्यासारखे वाटतात. आणि मणी कौलने ते केलेले आहे, कारण त्याला तोच परिणाम साधायचाय. पुढे शेतातील बलात्काराच्या प्रसंगात तसा परिणाम तो साधतोच. त्या दृश्यात फक्त काहीच क्षण एकमेकांत घुसणारी शरीरं दिसतात. खर तर दिसतदेखील नाहीत. आता अशा प्रकारचे दृश्यं आणि संवाद प्रेक्षकांना कसे रुचणार? (‘क्या घटिया शॉट! कुछ दिखाया ही नही.’) 

मणी कौल ब्रेसाँशी फारकत घेतो तो अशाप्रकारे. मणी कौलच्या हालचाली आणि संवाद अत्यंत शैलीदार, स्टायलाईज्ड असतात. ब्रेसाँ हे करत नाही. संवादातील भावना उच्चारातून व्यक्त न होता त्यातील रचना आणि आशयातून व्यक्त व्हाव्यात म्हणून मणी कौल संवाद आणि चेहऱ्यावरचे हावभाव सपाट, निर्जीव व भावनाविरहित ठेवतो. (पॉइन्ट पॉज नव्हे) अशा प्रकारे एलिनगेन करून तो प्रेक्षकांना गोष्टींच्या, भावनांच्या व संवादांच्या बाहेर ठेवतो. या प्रकारचे एलिअनेशन ब्रेख्तच्या शैलीपेक्षा अस्तित्त्ववादी शैलीला जास्त जवळचे वाटते. ब्रेसाँ हे करत नाही. पण तसा अनुभव मात्र ताकदीने देतो.

आणखी एका ठिकाणी मणी कौल ब्रेसाँशी फारकत घेतो, ते म्हणजे संगीताचा वापर. मणी कौल ध्वनी आणि संगीत यांचा वापर एखाद्या बंदिशीप्रमाणे जाणीवपूर्वक करतो. ‘उसकी रोटी’ मधल्या आवाजांची गुंफण बघा. बैलगाडीचा आवाज, वाऱ्याचे घोंघावणे, गुरांचे आवाज, सुच्चा सिंगच्या बसचा आवाज, बसचे दार आपटणे, दारुच्या बाटल्यांची किणकिण, पत्ते खाली आपटतानाचे जोरकस आवाज, मोठे होणारे जुने चित्रपटगीत. हे इतक्या अचूकपणे गुंफले आहेत (पुन:ध्वनी- मंगेश देसाई) की त्याशिवाय चित्रपट अपूर्ण वाटला असता. 

मणी कौलचा शास्त्रीय संगीताचा मोह त्याच्या अनेक चित्रपटातून जाणवतो. ‘सिध्देश्वरी’ हा तर मणी कौलचा एका शास्त्रीय गायिकेवरचा (राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त) लघुपट. पण इतरही चित्रपटांत तो शास्त्रीय किंवा लोकसंगीत वापरतो. ‘उसकी रोटी’ मध्ये संतुरवादकाला मुद्दाम पाचारण केलेले आहे. ते का? मणी कौल हा काही सत्यजित रे प्रमाणे लेट मॅटिफ किंवा सिग्नेचर ट्यून वापरणारा दिग्दर्शक नव्हे. ते काम तो साइड इफेक्ट मधून साधतो. ‘उसकी रोटी’ मध्ये संतूरचे संगीत तुकडे परिणाम कमी करत नसले तरी ते वाढवतदेखील नाहीत. कानाला चांगले वाटते. ब्रेसाँ पार्श्वसंगीत कमीत कमी आणि शक्यतो त्या कॉन्टेक्स्टमध्ये (संदर्भात) वापरतो. म्हणजे जणू ग्रामोफोन चालू आहे. मणी कौलला संगीताचं विलक्षण फॅसिनेशन आहे.

चित्रिकरणावर ब्रेसाँचा प्रभाव तर ठळक आहे. खुंटीवर फेकले गेलेले कपडे हे ब्रेसाँच्या मुशेची रखेलीचे, तर सुच्चासिंगच्या कोटातून पैसे काढून घेतानाचे हाताचे क्लोजअप पिकपॉकेटची आठवण करून देतात. चेहऱ्याची शैलीदार कंपोझिशन्स, हालचाली अंथरुणाच्या खाली गुडूप होणारे पाय हे मणी कौलची भर, ब्रेसाँ हे करत नाही.

आता आपण लेखात सुरुवातीला स्पर्श केलेल्या दोन महत्त्वाच्या मुद्यांकडे येऊ. ते म्हणजे, चित्रपटाचे व्याकरण आणि चित्रपटाचे संकलन. चित्रपटाचा मूलभूत घटक काय- शॉट? एक शॉट म्हणजे एक शब्द नव्हे तर कमीत कमी एक वाक्य किंवा त्याही पलिकडे काही असते. एका झाडाचा शॉट म्हणजे हे झाड आहे हे वाक्य नसून त्याही पलिकडचे काही आहे. ब्रेसाँ आणि ताराकोव्हस्की हे त्याही पलिकडे आपल्या कक्षेत घेतात. त्यासाठी ते म्हटलं तर अत्यंत नैसर्गिक पण प्रत्यक्षात अत्यंत कठीण संकलनशैली वापरतात. ही शैली आटझेनस्टाईनच्या मोन्टाज शैली, त्यामागची वैचारिक भूमिका पूर्णपणे नाकारते. मोन्टाजमध्ये दोन दृश्य जोडून तिसरीच प्रतिमा किंवा अर्थ प्रेक्षकांच्या डोक्यात तयार करता येतो. त्यातील संकलनाची लय गणिती यांत्रिकपणेदेखील साधता येते.

संकलनावरचं तारकोव्हस्कीचं भाष्य प्रत्ययकारी आहे. दृश्यापुढे दृश्य रचत जाणे याला तो संकलन म्हणत नाही. त्याच्या दृष्टीने प्रत्येक शॉट एक अंतर्गत समय टाईम घेऊन येतो. हा टाईम दृश्याच्या लांबीवर अवलंबून नसतो तर दृश्यावर अवलंबून असतो. त्याला स्वत:ची लय असते. संपूर्ण चित्रपटातून एक दृश्य दुसऱ्या जोडताना त्यातील काळाची लय सांभाळणे म्हणजे संकलन. 

आयझेनस्टाईनचे मोन्टाज संकलनातून ‘आपलं तेच खरं करणं’ हे त्याला बहुदा मान्य नाही. प्रत्येक दृश्य स्वत:चा काळ, लय आणि अगणित प्रतिमा, सब-टेक्स्ट आणि इंटरप्रिटेशन घेऊन येतो. ते एकसंघपणे, काळाची लय साधून जोडणे म्हणजे संकलन. ब्रेसाँदेखील हेच करतो. आणि हे करणं अतिशय कठीण असतं. मणी कौलने हे शिवधनुष्य उचललं, तेही अशा प्रकारच्या चित्रपटाची कुठलीही परंपरा, पोषक वातावरण, प्रेक्षक यांपैकी काहीच नसताना. चित्रपट काढून त्याने ते कान्सला पाठवले नाहीत, तर ते आपल्याकडे हिरीरीने प्रदर्शित केले.

‘उसकी रोटी’ची गोष्ट मोहन राकेशच्या तेच शीर्षक असलेल्या कथेवर आधारित आहे. गोष्ट म्हटली तर एक बेपर्वा ड्रायव्हर नवरा आणि न चुकता त्याची रोटी घेऊन जाणारी त्याची बायको. पण मणी कौलला ही गोष्ट सांगायची आहे का, तर अर्थातच नाही. त्याला गोष्टी बाहेरचे मानवी संघर्ष दाखवायचेत आणि ते ब्रेसाँ सदृश्य शैलीत दाखवायचेत. ब्रेसाँमध्ये रूढ़ अर्थाने गोष्ट नसतेच. मणी कौलला ह्युमन कंडिशन म्हणतात ते दाखवायचं आहे. बघा हे असं आहे, पण लाईफ गोज ऑन... 

सुच्चासिंग बायकोला नाकारावून निघून जातो आणि बायको निरुद्देश फ्रेममध्ये, क्लोजपमध्ये ऑफ द कॅमेरा बघते आणि चित्रपट संपतो. अ‍ॅण्ड द लाईफ गोज ऑन, मानवी संबंध, ह्युमन कंडिशन यांची जाणिव देऊन संपतो. पण संपतो. या शैलीतील ब्रेसाँचे आणि ताराकोव्हस्कीचे चित्रपट संपत नाहीत, ते डोक्यात सतत चालत राहतात आणि उत्क्रांत होत राहतात.

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)

Tags:Load More Tags

Comments:

SHUBHA KARMAKAR

मणी कौल सारख्या दिग्गज दिग्दर्शकाला हाताळताना लेखकाने ब्रेस्त आणि तारकोव्हाकी यांच्या दिग्दर्शन शैलींशी केलेली तुलना व वेगळे पण फारच आवडले. त्यामुळे मणी कौल जास्त छान उलगडत जातो, तसेच लेखकाचा गाढा व्यासंगही लक्षात येतो. भरीव आशय असलेला अप्रतिम लेख...........

Add Comment