भारतीय सिनेमाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सर्व प्रमुख भाषांमधून दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या काही हजारांमध्ये जाते. मात्र हिंदी सिनेमाचा प्रभाव देशभर आहे. तो अनेक प्रकारचा आहे. त्यातील ‘हिंदी चित्रपट आणि आयडिया ऑफ इंडिया’ ही संकल्पना समोर ठेवून लिहिलेला ‘हिंदी चित्रपट आणि देश’ हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा तिसरा लेख.
हिंदी चित्रपटात बदलती सामाजिक स्थित्यंतरे तत्काळ दिसू लागतात. स्वातंत्र्योत्तर भ्रमनिरास, गावाचे होणारे शहरीकरण, शहरांचे बकालीकरण; गरीब-श्रीमंत, गाव-शहर यांच्यात वाढत जाणारी दरी, वाढती बेरोजगारी, (आणि त्यामुळे) फोफावलेली गुन्हेगारी, गुन्हेगारांचा राजकीय वापर, गुन्हेगारीचे राजकीयकरण, गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश, संघटीत गुन्हेगारी, टोळीयुद्धे, एन्काऊंटर्स, क्रॉस-बॉर्डर दहशदवाद, त्याला आलेले अतिरेकी स्वरूप, जगताकीकरण व त्यामुळे फोफवलेला चंगळवाद, माणसाचे झालेले वस्तू-करण, स्त्री-पुरुष-युवक यांची बदलती रूपे हिंदी चित्रपटात लगेच दिसतात. इतके की, देशात बँक घोटाळे झाले की लगेच इथे चित्रपटात व्हिलनची माणसे बँक घोटाळे करू लागतात.
गुन्हेगारपट ही हिंदी चित्रपटाची आवडती पठडी! तशी ती नेहेमीच होती. अगदी अशोककुमार पासून. पण पूर्वीचे गुन्हेगार सभ्यतेच्या बुरख्यात असत, आणि मुख्य म्हणजे ते जन-निंदेला घाबरत. ते साधारण करीम लाला, हाजी मस्तान पठडीतले असत. स्मगलिंग हा त्यांचा मूळ व्यवसाय असे. कधीकधी ‘वक्त’ मधल्या चिनॉय सेठसारखे (रेहेमान) व्हिलन हिरे पळवण्यासाठी राजकुमारसारखे चोर पाळत (पुढेपुढे ते चक्क पोलिसच पाळू लागले... लफडाच मिटला). एखादे राष्ट्रीय वाद्य असल्याप्रमाणे यांच्याकडे पियानो हमखास असतो. त्यांची असलियत अगदी त्यांच्या मुलींनाही माहित नसे. गुत्ते, जुगाराचे अड्डे अशा त्यांच्या बेनामी मालमत्ता त्यांनी ‘आउटसोर्स’ केलेल्या असतात. त्यांचे सर्व व्यवहार काही लाखात असत. कोटी ही रक्कम अजून त्यांनी पाहिलेली नव्हती.
हिरेचोरांना पकडण्यासाठी मग देवआनंदला ‘ज्यूवेल थीफ’मध्ये ‘खुफिया’ इन्स्पेक्टर बनावे लागे. पुढे (डूगडूगत्या मानेचा राजेश खन्ना नावाचा न-नट गेल्यावर) अमिताभ बच्चन आला. त्याच्यात खुफिया असे काही नव्हते. ‘मै आ राहा हुं’ अशा Short Notice वर तो मुख्य खलनायकाच्या बंगल्यात घुसे, त्याच्या गुंडाची धू-धू धुलाई करे आणि मुख्य खलनायकाचा खात्मा करे. विषय संपला! ‘जंजीर’ सारख्या चित्रपटात तो इमानदार इन्स्पेक्टर बनून शेरखान नावाच्या गुंडाला (प्राण) लाथेने खुर्ची उडवत, “जब तक बैठने को न कहूं शराफतसे खडे रहो, ये पुलीस स्टेशन है तुम्हारा बाप का घर नही.”, असे ठणकावून सांगे. असेच एकट्याने लढणारे इन्स्पेक्टर पुढे ‘दबंग’ (सलमान खान), ‘सिंघम’ (अजय देवगण) चित्रपटात दिसतात.
अमितभच्या काळात गुन्हेगारी हळूहळू संघटीत होऊ लागली होती. पण अजूनही ती सोन्याचे, मूर्तींचे स्मगलिंग, दारू, जुगाराचे अड्डे, वगैरे या पुरतीच मर्यादित होती. ड्रग्ज, हत्यारे याचे मोठ्या प्रमाणावर स्मगलिंग होत नव्हते. गुन्हेगारी अधिक संघटीत झाली, टोळीयुद्धे होऊ लागली तेव्हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट तयार झाले. हे स्थित्यंतर देखील हिंदी चित्रपटात आलेच. त्याचे पहिले पडसाद दिसतात ते राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’मध्ये (मनोज वाजपेयीने सादर केलेला भिकू म्हात्रे तुफान गाजला). ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ (संजय दत्त,- ए.सी.पी खान ), ‘शूट आऊट अॅट वडाला’ (मन्या सुर्वे एन्काऊंटर), महेश मंजरेकरांचा ‘वास्तव’, नाना पाटेकरने सादर केलेला ‘अबतक छप्पन’ ही त्याची काही ठळक उदाहरणे. कल्याणकारी, प्रजासत्ताक राष्ट्राची ही दुसरी बाजूही चित्रपटांनी चित्रबद्ध केली होते. भूतकाळातील घटनांकडे हिंदी चित्रपट वेळोवेळी वळत असला तरी त्याचा संदर्भ नेहेमीच ताजा आणि समकालीन राहिलेला आहे.
नव्वदीनंतर अतिरेकी हल्ले सुरु झाले, आणि ते इतके वाढले की पुढे सवयीचेच झाले. दहशदवादाची प्रथम दखल घेतली ती गुलजार यांनी आपल्या ‘माचीस’मध्ये. (या चित्रपटात खलिस्तानी अतिरेकी युवकांची मानसिकता चित्रित करण्यात आली आहे) पण हे चित्रण काहीसे मवाळ आहे. गोविंद निहलानींचा ‘द्रोहकाल’ नसीर आणि ओमपुरी यांच्या सशक्त अभिनयामुळे सच्चा आणि भेदक वाटतो. निहलानींच्याच ‘हजार चौरासी की माँ'मध्ये एक आई (जया भादुरी) नक्षलवादी कारवाईत मारल्या गेलेल्या आपल्या मुलाच्या प्रेताचा 1084 हा बिल्ला नंबर शोधत फिरताना दिसते. अमीर खानची भूमिका असलेला ‘सरफरोश’, नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेला मेहुलकुमारचा ‘कोहराम’ हे चित्रपट काहीसे अॅक्शनपटच्या वळणाने जातात.
अतिरेक्यांकडे तीन वेगळ्या दृष्टीकोनातून बघणारे चित्रपट म्हणजे उमेश शुक्लाचा ‘अमीर’ हा चित्रपट अतिरेक्याच्या दृष्टीकोनातून उलगडत जातो. जिहादच्या नावावर ब्रेनवॉश केला गेलेला हा टेररिस्ट अखेर बसमध्ये बॉम्ब ठेवताच नाही. निरपराध माणसांची हत्त्या करणे त्याला अशक्य होते. ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये अनुराग कश्यपने अत्यंत वेगळ्या ‘डॉक्युड्रामा’ म्हणता येईल अशा तंत्राने मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांची वास्तव गोष्ट सांगितलेली आहे. या चित्रपटाची सुरुवात पोलीस स्टेशनमध्ये होते. संशयित अतिरेक्यांना पोलीस विचारतात, ‘तुमचा प्लॅन काय आहे?’. शिवसेना भवनात बॉम्ब ठेवायचाय हे ऐकुन पोलिसांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नाही. अतिरेक्यांची ‘मोडस ऑपेरेंडी’, नंतर अंमलबजावणी, फरारी होणे, पोलिसांचा ससेमीरा, हे सर्व प्रकरण रूपाने समोर येते. चित्रपटाचा शेवट दुबईत होतो. मुंबईतला सूत्रधार दाउदला सांगत आहे, ‘भाई मुंबई को हिला देनेवाला कुछ काम करना होगा’. दाउद विचारतो ‘लेकीन करोगे क्या?’ लगेच साखळी बॉम्बस्फोटांची दृशे दिसतात. चित्रपट संपतो. नसिरुद्दीन शहाची प्रमुख भूमिका असलेला ‘वेन्सडे’ चित्रपट अतिरेकी आणि राजकारणी यांच्याकडे सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून बघतो. हा सामान्य माणूस जागोजागी बॉम्ब पेरल्याची धमकी देऊन पोलिसांना पकडलेल्या अतिरेक्यांना एकांत जागी घेऊन जायला सांगतो आणि स्वतःच तिथे ठेवलेल्या बॉम्बने त्यांना उडवतो. हे सामान्य माणसांचे स्वप्नरंजन वाटले तरी सामान्य माणसाला या प्रश्नावर नेमके असेच वाटते!
बेरोजगार तरुणांचा उद्रेक अनेक चित्रपटातून आलेला आहे. बेरोजगारी मुळे हिंसेकडे वाळलेल्या तरुणांचा विषय प्रथम हाताळलेला दिसतो तो गुलजार यांच्या ‘मेरे अपने’मध्ये (विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, असरानी, मीना कुमारी इ.) पुढे एन. चंद्राच्या ‘अंकुश’मध्ये त्याला स्वतःचा एक चेहेरामोहोरा, ‘माहोल’ मिळतो. उदा. दादर मधील टायकलवाडी, गणेशोत्सवातील हाणामारी, दोन्ही गॅंगचा राजकीय वापर. एन.चंद्राच्या ‘नरसिम्हा’मध्ये (सनी देओल) असाचा राजकीय वापरासाठी पाळलेला गुंड दिसतो. राहुल रवेल यांनी ‘अर्जुन’ या चित्रपटातून सर्व हिंदी चित्रपटाचा मसाला वापरून अर्जुन मावळंकर नावाचा असाच एक चेहेरामोहरा असलेला तापट तरूण दिला. (हा चित्रपट विलक्षण ‘सिनेमॅटिक होता. प्रत्येक फ्रेमकडे लक्ष पुरवलं होतं.)
अनुराग कश्यपने 'गँग्ज ऑफ वासेपूर’मधून गावतील अंदाधुंद हिंसेचा स्वतंत्र्यपूर्व काळांपासून मागोवा घेतला होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर या गँग्ज कंत्राटदार बनतात. तर काही राजकारणात शिरतात. गावातील जातीभेद, हिंसा, राजकारण या गोष्टी प्रकाश झा यांच्या ‘दामुल’, ‘गंगाजल’ ‘राजनीती’ सारख्या चित्रपटांतून भेदकपणे येतात. सरंजामशाहीला विरोध खऱ्या ताकदीने व्यक्त झालाय तो श्याम बेनेगलांच्या ‘अंकुर’मध्ये (शेवटी मालकाच्या बंगल्यावर दगड फेकणारा लहान मुलगा आणि नंतर लाल झालेला स्क्रीन लक्षात राहतो.) ‘निशांत’मध्येही सरंजामशाही उलथवून टाकलेली दिसते. पण त्याकाळी या चित्रपटांची गणना ‘समांतर’ चित्रपट म्हणून होत असे.
जातीय तेढ समर्थपणे मुख्यप्रवाही चित्रपटात आणली ती गोविंद निहलानी यांच्या ‘तमस’ने. त्यांच्याच ‘अर्धसत्य’ चित्रपटात तर वैयक्तिक, संघटीत, सामुहिक अशा सर्व पातळी वरची हिंसा दिसते. ओमपूरीचा इन्स्पेक्टर वेलणकर आणि सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेला रामा शेट्टी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. चित्रपट मूळ प्रवाहात येतो. सरंजामशाही, पुरुषी दमन यंत्रणेला स्त्रियांनी दिलेली झुंज लोककथेच्या अंगाने केतन मेहताच्या ‘मिर्च मसाला’ (स्मिता पाटील, ओमपुरी, नसीरुद्दीन) चित्रपटात येते. शेखर कपूरची ‘बँडीट क्वीन’ (फुलनदेवी) तर अंगावरच येते. स्त्रियांची लढवय्यी ‘गुलाबी गँग’ देखील चित्रबद्ध झाली. देशाच्या संकल्पनेत असलेला ‘समाज’ ज्या अनेक स्थित्यंतारातून जात होता त्याची नोंद अशा पद्धतीने हिंदी सिनेमात झालेली दिसते.
देशाला जोडणारा आणखी एक दुवा म्हणजे खेळ. आपल्याकडे खेळ युद्धासारखे खेळले जातात (विशेषतः क्रिकेट). कुणीतरी बिचारा काहीतरी (रन/गोल) करायला धडपडतोय, त्याला ते करण्यापासून सर्वांनी एकत्र येत आडवायचे, हा ढांचा आपण कुठून घेतला कोण जाणे! खेळातून देशप्रेम दाखवणारे तीन चार आप्रतिम चित्रपट आधुनिक काळांत आले. अमीर खानची प्रमुख भूमिका असलेला आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ त्यांपैकीच एक. ब्रिटीश राजवटीत ब्रिटीश व ‘नेटीव्ह’ यांच्यात झालेला हा काल्पनिक क्रिकेट सामना आहे. आज आपण ज्या जिवाच्या आकांताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळतो तसे यात ‘नेटिव्ह’ ब्रिटीश सोल्जर/खेळाडूंशी भिडतात. सामना जिंकला तर ‘लगान’ म्हणजेच शेतसारा माफ होणार असतो. सर्व भेदभाव विसरुन लोक एकत्र येतात. नायक ‘भुवन’ (अमीर खान) त्याना एकत्र आणतो. ब्रिटीश ‘मॅडम’ त्यांना क्रिकेटचे नियम समजावून सांगते. अखेर भुवनच्या शेवटच्या निर्णायक षटकारामुळे ‘आपण’ सामना जिंकतो! ‘अपनी जीत, उनकी हार’ होते. पिटातला प्रेक्षक देशप्रेमाने छाती फुगवून घरी जातो (आणि ‘लगान’ ऑस्करला जातो).
दुसरा चित्रपट म्हणजे शाहरुख खानचा ‘चक दे इंडिया’ (इथे मात्र प्रमुख व्यक्तिरेखा मुस्लिम दिसते). अपयशाचा ठपका, आणि मुसलमान म्हणून अवहेलना वाट्याला आलेला कबीर खान हा हॉकीचा कोच स्त्रियांची हॉकी टीम घेऊन जागतिक हॉकी स्पर्धा जिंकतो आणि स्वतःचा आणि देशाचा आत्मसन्मान परत मिळवतो. (वेगवेगळ्या प्रांतांचे नेतृत्व करणाऱ्या मुलींना तो आपण प्रथम भारतीय आहोत हे पटवतो. ते दृश बोलके आहे). ‘भाग मिल्खा भाग’ (धावपटू-फरहान अख्खर), ‘मेरी कोम’ (बॉक्सिंग) किंवा अलीकडेच आलेला अमीर खानचा ‘दंगल’ (कुस्ती) खेळातून आणि राष्ट्रीय भावनेतून देशाची शान जगात उंचावतात. (‘मेरी कोम’ चित्रपटाने ईशान्य भारताला पुन्हा भारतात आणले असे म्हटले तर ते खोटे ठरणार नाही)
देश संकल्पनेमधील आणखी एक घटक म्हणजे भूप्रदेश ( Territory). हा बदल तर थेट चित्रित होत आलेला आहे. बैलगाडीवाली गावे- ज्यात शहरी ‘परदेसी बाबू’ यायचा आणि ‘गावकी छोरी’ परदेसियो से ना अखिया मिलाना करत त्याच्या प्रेमात पडायची. रम्य परिसरात नायक नायिका प्रेमगीत म्हणायचे आणि त्यातील कडव्यामध्ये उगाच बरोबर असावीत म्हणून कुल्ल्यावर मटकी ठेवून गावातल्या तमाम एक्सट्रा छोऱ्या बांधावरून ठुमकत जायच्या. गावातील बैलगाडी आणि शहरातील टांगा यांनी अनेक संगीतकारांच्या गाण्यांना ठेका दिला. जुनी गावे, आता निमशहरी झालेली गावे; टांगा, घोडागाडी, मुबलक मोकळी जागा, दुतर्फा पसरलेली झाडं असलेली मुंबई सारखी शहरे, आणि आताची मॉल वाली आडझोड वाढलेली शहरे आणि त्यातील अफाट पसरलेली झोपडपट्टी ही सारी दृश्ये आजही आपण प्रत्यक्ष पाहू शकतो ते हिंदी चित्रपटांच्या कृपेनेच!
गाव-शहर, अमीर-गरीब दरी वाढत होती. दारू पिण्याला सामाजिक अधिष्टान मिळाले होते. राजरोसपणे लेडीज बार चालत होते. (असाच एक लेडीज बार मधुर भांडारकर यांच्या ‘चांदनी बार’ मधून दिसतो). शहराचे कॉर्पोरेटकरण झपाट्याने होत होते. भांडारकरांच्याच ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’, ‘ट्राफिक सिग्नल’ या चित्रपटांमधून ऊर्ध्वविश्व (आणि अधोविश्व) दिसते.
देश झपाटयाने बदलत होता. ‘ये रातें, ये मौसम, नदी का किनारा ये चंचल हवा’ महसूस करण्यासाठी लागणारा निवांतपणा आणि संवेदनक्षमता हरवली होती. देशवासियांच्या रात्री एक तर ‘नाईट-आउट’ डिनर मध्ये किंवा एखाद्या लेडीजबारमध्ये दौलतजदा करण्यात व्यतीत होत होत्या. जोडीला टी.व्ही. होताच. (नाहीतर पूर्वी नायकांना रात्री इतका वेळ असायचा की देवआनंद वहिदाला एका जागी उभे करून 'खोया खोया चांद, खुला आसमान’ म्हणत अख्खी उटी फिरून यायचा. इतका वेळ त्यांच्याकडे होता.)
हा देश स्वतंत्र आणि सार्वभौम असला तरी त्यामध्ये अंतर्गत कलह होते. आणि त्याला बाह्यशत्रूही होते. प्रमुख अडचण होती ती पाकिस्तानची. ज्याने दोन उघड युद्धे आणि एक छूपे युद्ध (कारगिल) आपल्यावर लादले. त्याने केलेले अतिरेकी हल्ले, दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन यांची दखल हिंदी चित्रपटांनी वेळोवेळी घेतलेली आहे. भारतावर जेव्हा परकीय आक्रमणे झाली तेव्हा सर्व देश एकत्रितपणे उभा राहिला होता. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले आणि लगेचच 1964 मध्ये चेतन आनंदने आपल्या ‘हकीकत’ चित्रपटात त्याची दखल घेतली. ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ म्हणत आपले जवान धारातीर्थी पडले. यात विजयआनंद, बलराज सहानी, धर्मेद्र (आणि अर्थताच प्रिया राजवंश) यांच्या तगड्या भूमिका होत्या. हा आपल्याकडील पहिला युद्धपट!
शांतारामबापूंच्या ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ला चीनी युद्धाची पार्श्वभुमी होती (डॉ. कोटणीस चीन युद्धात वैद्यकिय पथकात होते). देवआनंदचा डबल रोल असलेल्या ‘हम दोनो’ला पण हीच पार्श्वभूमी (तोंडी लावायला) होती. वेगवेगळ्या काळात आलेले ‘हिंदुस्तान की कसम’, ‘आक्रमण’, ‘गदर-एक प्रेमकथा’, ‘मिशन काश्मीर’, ‘लक्ष्य’, ‘ललकार’, ‘एल.ओ.सी. कारगिल’, ‘परमवीरचक्र’, ‘शौर्य’, ‘विजेता’, ‘बॉर्डर’ आणि गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेले ‘उरी-सर्जिकल स्टाईक’ व ‘गाझी अॅटॅक’ या सर्वांना युद्धाचीच पार्श्वभूमी आहे. यातील बऱ्याच चित्रपटांत प्रेमकथा देखील गुंफलेली आहे.
डिफेन्स फोर्सेस आणि त्यांची जडणघडण (प्रशिक्षण) यावरही काही चित्रपट आले. हवाई दलाच्या कॅडेटवर पूर्ण तयारीनिशी काढलेला गोविंद निहलानींचा ‘विजेता’ (शशी कपूर, कुणाल कपूर), कमांडोवर काढलेला नाना पाटेकर यांचा ‘प्रहार’ (यात नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांची अप्रतिम भूमिका आहेत. दिग्दर्शक म्हणून नाना पाटेकर यांची चित्रपट मध्यमाची समज आणि त्यावरील पकड सतत जाणवते.) हे दोन्ही चित्रपट पूर्ण अभ्यास करून काढलेले होते. हे दोन्ही चित्रपट युद्धतंत्र, आणि कौशल्ये यावर पुरेसा प्रकाश टाकतात.
आता देशासमोर असलेली ‘उप-अडचण’ किंवा अवघड जागीचे दुखणे म्हणजे ‘काश्मीर’. ‘काश्मीर’ हा विषय हिंदी चित्रपटांसाठी काही नवीन नाही. हिंदी चित्रपटांचे’ ते ‘स्वित्झरर्लंड ’ आहे. मात्र आता आपण शिकारा (काश्मिरी बोट) आणि ‘काश्मीर की कली’ या भूतकाळातील काश्मीरबद्दल बोलत नसून आजच्या धगधगत्या काश्मीरबद्दल बोलतोय. काश्मिरी माणसाला हिंदी चित्रपटात (कथानकाच्या मागणीनुसार) कधी पाकिस्तान धार्जिणा तर कधी अस्सल देशप्रेमी दाखवण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर मणीरत्नमचा ‘रोजा’ (हिंदू-मुस्लीम प्रेमकथा), विधू विनोद चोप्रांचा ‘मिशन काश्मीर’, कुणाल कोहलींचा ‘फना’, असे उल्लेखनीय चित्रपट आलेले आहेत. विशाल भारद्वाज यांचा ‘हैदर’ हा जरी शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ वर आधारित असला, तरी त्यात काश्मीरच्या पार्श्वभूमीचा आणि खदखदत्या वातावरणाचा इतका चपखल वापर केलेला आहे की खूद्द शेक्सपिअरने देखील टाळ्या वाजवल्या असत्या! जगातील अनेक नामवंत दिग्दर्शकांनी हॅम्लेट’ वर आधारित चित्रपट दिलेत पण ‘हैदर’ मात्र खासच! काश्मीरच्या पार्श्वभूमीमुळे प्रेक्षक तत्काळ त्याचाशी ‘रीलेट’ होतो, आणि चित्रपट समकालीन होऊन जातो. राजकुमार हिरानीचा परग्रहावरून भारतात आलेला पीके (अमीर खान) इथल्या रूढी वगैरे बघून जसा चक्रावून जातो, अगदी तसेच हिंदी सिनेमात दिसणारा हा देश पाहून आपणही चक्रावून जातो.
- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)
चार भागांत प्रकाशित होणाऱ्या या लेखातील इतर दोन भाग वाचा:
१. हिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा
२. स्वतंत्र भारत आणि हिंदी चित्रपट
Tags: Film Movies Cinema and India Meghnad Kulkarni भारत आणि चित्रपट सिनेमा चित्रपट मेघनाद कुळकर्णी हिंदी चित्रपट Load More Tags
Add Comment