युद्धकालीन, नाझी संदेशपट

युद्धपटांवरील लेखमाला : 11 (भाग 2/4)

हिटलर आणि लेनी रिफन्स्टाल

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत जगभरातील काही निवडक युद्धपटांवरील मालिका कर्तव्य साधना वरून प्रसिद्ध करण्यात आली. विविध क्षेत्रांतील सात मान्यवरांनी एकूण दहा लेख या मालिकेसाठी लिहिले आहेत. त्या मालिकेतील हा समारोपाचा लेख. युद्धपटांच्या इतिहासात मनुष्यहानी, विस्थापन, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान इत्यादी युद्धाचे भीषण परिणाम दर्शवणारे चित्रपट जसे महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे विशिष्ट विचारप्रवाहाच्या प्रसारार्थ निर्माण केल्या गेलेल्या चित्रपटांचीही यादी मोठी आहे. सोव्हिएत, नाझी, ब्रिटिश व अमेरिकन सिनेमाविश्वातील अशा काही उल्लेखनीय प्रचार/संदेशपटांचा आढावा घेणारा, जवळपास 12 हजार शब्दांचा हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करत आहोत. 

हिटलरला युद्धात प्रचाराचं महत्त्व इतकं पटलं होतं की त्यानं आपल्या ‘माझा लढा’ या पुस्तकात दोन प्रकरणं या विषयाला दिलेली आहेत. बोललेला शब्द, लिहिलेला शब्द, भाषण, हावभाव, यांचा जनतेवर होणारा परिणाम त्यानं अभ्यासला होता. पहिलं महायुद्ध दोस्तराष्ट्रांनी केवळ प्रचाराच्या जोरावर जिंकलं, असं त्याचं मत होतं. (नाहीतर जर्मनीसारखी बलाढ्य शक्ती कशी काय हरणार?) हिटलरनं आपलं पुस्तक लिहिलं ते बिअरहाउस उठावानंतर घडलेल्या तुरुंगवासात. म्हणजे त्या वेळेस तो कुणीही नव्हता. पण आपल्याला कसलं राज्य स्थापन करायचंय आणि ते कशा प्रकारे हे त्याला पुरेपूर कळलं होतं. आणि प्रचारयंत्रणा हे त्या राज्यव्यवस्थेचं, हुकूमशाहीचं एक प्रभावी हत्यार असणार होतं.

‘माइन काम्फ’च्या सहाव्या प्रकरणात तो म्हणतो, "प्रचाराचा उद्देश हा व्यक्तीच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी नाही, तर समूहाच्या समोर, मासेसच्या समोर, विवक्षित निवडक वस्तुस्थिती, घटना, प्रक्रिया, गरजा ठेवण्यासाठी आहे. ज्याचं महत्त्व अगदी प्रथमच त्यांच्या दृष्टिक्षेपात आणलं गेलंय. प्रचार हा लोकप्रिय असला पाहिजे आणि त्याची बौद्धिक पातळी न्यूनतम स्तरावरची हवी. बौद्धिक पातळी जितकी कमी आणि भावनिक आवाहन जितकं जास्त तितका तो जास्त प्रभावी ठरतो. आणि हेच त्याच्या यशाचं खरं गमक आहे. केवळ काही बुद्धिजीवींना आणि सौंदर्यवाद्यांना आवडून काही होणार नाही." ... "प्रचाराची कला समूहाची भावनिक नस बरोबर पकडते. त्याला मानसिकदृष्ट्या योग्य ढाच्यात बसवते आणि जास्तीतजास्त मासेसपर्यंत घेऊन जाते. हे एकदा लक्षात घेतलं की प्रचाराने बहुस्तरीय शास्त्रीय बैठक देण्याचा प्रयत्न कधीही करू नये."... "समूहाची ग्रहणशक्ती मर्यादित असते. बुद्धिमत्ता तोकडी असते, पण त्यांची विसरण्याची शक्ती अमर्याद असते. त्यामुळे प्रचारात मोठे, नेमके तेवढेच मुद्दे घ्यावेत आणि ती स्लोगन्स इतक्या वेळा रेटून म्हणावीत, की समूहातल्या शेवटच्या (मनु) माणसालादेखील ती स्लोगन्स, तुम्हांला पाहिजे त्या पद्धतीने कळली पाहिजेत."... "प्रचाराने एक सोपी लाइन धरली पाहिजे आणि त्यात केलेल्या क्लृप्त्या मानसिकदृष्ट्या सुयोग्य हव्यात.उदा., एखाद्या पोस्टरने आपल्या साबणाची जाहिरात करताना इतर साबणालाही चांगलं म्हटलं तर कसं होईल? आपण फक्त मुंड्या हलवू (कृती करणार नाही). राजकीय जाहिरातीचंदेखील तसंच आहे. प्रचाराचा उद्देश अनेक लोकांचे हक्क विचारात किंवा लक्षात घेण्याचा नाहीच. तर त्यातून ठरावीक लोकांचा ठरावीक एक हक्क जो तुम्हांला लोकांसमोर ठेवायचाय, फक्त तोच अधोरेखित करण्याचा आहे. शत्रूला फावेल अशा एखाद्या सत्याचासर्वांगी वस्तुनिष्ठ अभ्यास करणं आणि आकलन निरपेक्षपणे मासेससमोर, जनतेसमोर ठेवणं हे तर नकोच नको. फक्त आपला (आणि आपलाच) हक्क नीट बजावला जाईल हेच आपण सदैव आणि कठोरपणे करायला हवं."

हिटलरच्या लिखाणातून लक्षात येतं की, हा माणूस प्रचारतंत्राला रशियन प्रचारापेक्षाही वरच्या पातळीवर घेऊन जाणार आहे. सोव्हिएत प्रचाराप्रमाणे त्याला जनतेची मनं वळवायची नाहीत तर त्यांच्या मनाचा संपूर्ण ताबा घ्यायचा आहे. त्यांच्या मनावर साम्राज्य करत आपलं साम्राज्य स्थापन करायचं आहे. माइन काम्फ सांगताना हिटलरनं Big lie (भव्य खोटं) हा शब्द बनवला. खोटं इतक अफाट असलं पाहिजे की समोरच्याला वाटलं पाहिजे इतकं मोठं धादांत खोटं, इतक्या उघडपणे बोलण्याची क्षमता तरी माणसात आहे का ? (त्या अर्थी हे भव्य खोटं खरंच असलं पाहिजे) हिटलरनं या कल्पना 1925 च्या पुढे नाझी वृत्तपत्रांतून मांडल्या.

1927 मध्ये गोबेल्स त्याला येऊन मिळाला. गोबेल्स हा वार्ताहर होता. पण इतर माध्यमांची ताकदही त्याने ओळखली होती. त्यामुळे ‘All quiet on the western front’ हा अमेरिकन युद्धविरोधी चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तो त्यानं उधळून लावला. त्यावर बंदी आणणं भाग पाडलं. हे सर्व हिटलरनं सत्ता हिसकावून घेण्याच्या अगोदरच घडलेलं. 1933 मध्ये हिटलर सत्तेत आला आणि त्याने नाझी जर्मनीखाली 13 मार्च 1933 रोजीच ‘मिनिस्ट्री ऑफ प्रॉपोगंडा’ स्थापन केली, त्याचा उद्देशच मुळी ज्यू, कम्युनिस्ट, रोमानी, समलैंगिक वगैरे ‘कमअस्सल’ लोकांबद्दल जनतेला सावध करणं आणि सांस्कृतिक विश्वातून ‘कमअस्सल’ कला नष्ट करणं हा होता. 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू होईपर्यंत नाझी प्रचारयंत्रणा ज्यू, पोलिश लोकांबद्दल द्वेष पसरवत होती. हिटलरनं पोलंडवर हल्ला केला तो ‘पोलंडने आमच्यावर हल्ला केला’ या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर! जनमानसात सुप्तावस्थेत असलेला ज्यूद्वेष नाझी प्रचाराने पृष्ठभागावर आणला. "ज्यू लोक जर्मन लोकांचे हक्क तुडवत होते. त्यांची मुलं पळवत होते. त्यांना सांस्कृतिक कम्युनिझम आणायचा होता, आणि त्यांचा मुळापासूनच नायनाट केला पाहिजे." असं विष समाजात पेरलं जात होतं. 1940 मध्ये प्रदर्शित झालेला फिल्झ हिपलरने दिग्दर्शित केलेला 'The Eternal Jew' हा चित्रपट बघून आजही अंगावर काटा येतो.

‘आर्य’ या शुद्ध वंशासाठी इतर ‘कमअस्सल’ औलादींना नष्ट करायला हवं, जे जीवन जगण्यायोग्य नाही ते नष्ट करायला हवं. मग त्यात मतिमंद, अपंग आले, ज्यू आले! रेडिओवरून, प्रचारपटांतून हे सर्व ठासून सांगितलं जात होतं. त्याला पूरक कायदे होत होते आणि ते कसे बरोबर आहेत याचादेखील प्रचार होत होता. 14 जुलै 1933 रोजी आनुवंशिक रोग टाळण्यासाठी ‘स्वेच्छामरण’ (खरं तर Mercy Killing चा कायदा केला) आणि त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू झाली. 1935 मध्ये न्यूरेम्बर्गचे कायदे आले. त्यातून बिगरआर्य लोकांना सरकारी नोकऱ्या वर्ज्य, बिगरआर्य लोकांशी लग्न वर्ज्य, असे कायदे आले. बिगरआर्य म्हणजे अर्थात ज्यू, निग्रो, रोमानी असे लोक. ज्यूंना तर हिटलर मुळात माणूसच समजत नव्हता. ‘माइन काम्फ’मध्ये हे त्याने स्पष्टपणे म्हणून ठेवलंय. नाझींचे जे शत्रू ते सर्व कमअस्सल (sub human). नाझी प्रचारयंत्रणा कम्युनिस्टांनादेखील (Red Sub human) निकालात काढत होत्या. युद्धादरम्यान तर ज्यूंवर अनन्वित अत्याचार होत होते. यावर इतर राष्ट्रे बोलली तर तो ज्यूंनी स्पॉन्सर केलेला प्रचार, तर सैन्याला असं सांगितलं जात होतं की, ज्यूंना वेठीस धरणं हा दोस्तराष्ट्रांना जेरीस आणण्यासाठी केलेला युद्धातील डावपेच आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी (1931) हिटलरनं प्रचारकी भविष्यवाणीचं केली होती. “जर आंतरराष्ट्रीय ज्यू वित्तसंस्थांनी जगाला युद्धाच्या खाईत ढकललं तर युरोपमधून ज्यू जमात नष्ट होईल."

चित्रपट माध्यमाने प्रचारात मोठाच आणि परिणामकारक वाटा उचलला. गोबेल्स आणि हिटलरनं 1937 पर्यंत फिल्म इंडस्ट्रीचं राष्ट्रीयीकरण केल होतं. हिटलरनं बघितल्याशिवाय फिल्मची एक फ्रेमदेखील प्रदर्शित होऊ शकत नव्हती. कोवळ्या मनावर चित्रपट विशेष प्रभाव टाकू शकतात हे जाणून प्रत्येक शाळेला फिल्म प्रोजेक्टर दिला होता. मुलांसाठी केलेल्या चित्रपटांना ‘लष्करी प्रशिक्षण’ असं नाव दिलं होतं. असंख्य लोक हे चित्रपट पाहत होते. त्यातील दृश्यांनी प्रभावित होत होते. चित्रपटांनी त्यांच्या मनावर गारुड केलं होतं.

हिटलरनंच त्याच्या ‘माइन काम्फ’मध्ये म्हणून ठेवलं होतं, “आम जनता सुस्त असते. आपल्या जुनाट कल्पनांना चिकटून असते. त्याविरुद्धचे साहित्य ती सहसा वाचण्याच्या भानगडीत पडत नाही. चित्रांचं, चित्रपटांचं तसं नाही. त्यात जास्त क्षमता आहे. एका झटक्यात, थोड्याच कालावधीत चित्र असं काही सांगून जातं, की जे लिखाणातून सांगायला आणि समजावयाला पुष्कळ वेळ आणि श्रम घेईल." गोबेल्सच्या चित्रपट धोरणाचा उद्देशच मुळात होता पलायनवादाला खतपाणी घालण्याचा, जेणेकरून आम जनतेला सतत उत्साही, समाधानी वाटावं. नाझी प्रचारपट हे समर्थपणे करत होते. या चित्रपटांत भाषेला महत्त्व होतं. नॅरेशन होतं. एका विशिष्ट दृष्टिकोनातून गोष्ट सांगणं होतं, पण केवळ दृश्यातून चित्रपट पुढे नेणं हे प्रभावीपणे होत नव्हतं.

दृकभाषेचा अत्यंत प्रभावी उपयोग करून प्रचारपटांच्या सीमा ओलांडून त्याला कलेच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं ते लेनी रिफन्स्टाल या तरुणीनं. चित्रपटाच्या दृकभाषेवर तिची विलक्षण पकड होती. आज हिटलर म्हटला तर काय डोळ्यांसमोर येतं? त्याच्या सभांना आलेली प्रचंड गर्दी, गर्दीने केलेला एकसाथ नाझी सलाम, सर्वत्र पसरलेले स्वस्तिकचे झेंडे, हिटलरसमोर सैन्याचं संचलन, ही सर्व लेनी रिफन्स्टालने प्रस्थापित केलेली दृश्ये आहेत. हिटलरची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा बनवण्यात लेनीचा आणि तिच्या वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरा अँगल्सचा सिंहाचा वाटा आहे.

लेनी उत्तम तरणपटू होती. नर्तकी होती, नाटकात काम करण्याचा तिला अनुभव होता. 16व्या वर्षीच तिनं ‘ओपीझम’ नावाच्या प्रचारपटासाठी ऑडिशन दिलं होतं. तिला तिच्याहून वीस वर्षं मोठा हेन्रीच सोकल हा ज्यू भेटला. (पुढे अर्थातच ती त्याला विसरली. त्याचा उल्लेख टाळू लागली). त्यानं तिच्या पहिल्या नर्तन कार्यक्रमासाठी हॉल घेऊन दिला. ही हिटलरच्या 1933 मधल्या बीअर हॉल पुशच्या जवळची घटना आहे. थिएटरदेखील तिथून जवळ. तिला त्यानंतर नाचाच्या कार्यक्रमांची निमंत्रणं पॅरिससारख्या देशातूनही येऊ लागली. तिने 'Mountain of destiny' चित्रपट पाहिला आणि ती इतकी प्रभावित झाली, की बर्लिन सोडून खरंच पर्वतात निघून गेली. लवकरच तिची ओळख अर्नाल्ड फ्रँकसारख्या दिग्दर्शकाशी झाली आणि अनेक वर्षं टिकली. फ्रँककडून ती चित्रपटकला शिकली. होली माउंटन नावाचा चित्रपट लेनीसाठी लिहिला गेला. हे ‘पर्वतराशी’चे चित्रपट म्हणजे जर्मन लोकांचे वेस्टर्नपटच होते. पुढे नाझी चित्रपटांत अधोरेखित केलेल्या सर्व गोष्टी त्यात होत्या. धष्टपुष्ट हिरो होते, लोकजीवन होते, लॉर्जर दॅन लाइफ जीवन होतं.

चित्रपटातलं लेनीचं नृत्य हिटलरनं पडद्यावर पाहिलं आणि आपल्याला प्रचारासाठी पाहिजे ती हीच तरुणी, अशी पारख त्यानं केली. लेनीला अजूनतरी चित्रपट दिग्दर्शनाचा अनुभव नव्हता. फ्रँककडून ती चित्रपट निर्मितीचे आणि दिग्दर्शनाचे धडे घेत होती. त्याच्या फिल्टर वापरण्याच्या तंत्राचं निरीक्षण करत होती. फास्ट मोशन, स्लो मोशन, परस्पेक्टिव्ह कसं वापरायचं बघत होती. तिने नंतर ब्ल्यू माउंटन नावाची स्वतःची फिल्म दिग्दर्शित केली. (त्यातील सर्व ज्यू तंत्रज्ञांची नावे तिने पुढे हटवली) मात्र त्याच सुमारास तिने हिटलरचं माइन काम्फ वाचलं आणि त्यानं प्रचंड प्रभावित झाली. हिटलरचं भाषण प्रत्यक्ष ऐकून तर ती झपाटली गेली. हा तिच्या दृष्टीनं भव्य हेलावून टाकणारा अनुभव होता. हिटलरला जशी त्याची प्रचार दिग्दर्शिका मिळाली तसाच लेनीला तिचा नेता मिळाला. लवकरच ती हिटलरच्या इतक्या मर्जीतली झाली, की अगदी गोबेल्सच्या काळातदेखील तिला तिची स्वायत्तता, चित्रपट निर्मितीचं स्वातंत्र्य मिळालं. ती चक्क गोबेल्सला बायपास करून आपले चित्रपट हिटलरला दाखवू शकत असे. ते सर्वप्रथम भेटले तेव्हाच हिटलरनं तिला सांगून ठेवलं होतं की, मी जेव्हा सत्तेत येईन त्या वेळी माझ्या फिल्म्स तू बनवायच्या.

1933 पासून लेनी हिटलरच्या जवळच्या गोटातील झाली. सर्व ठिकाणी जाऊ लागली. ती फक्त नाझी पार्टीची सदस्य झाली नाही म्हणून ती गोबेल्सचे वर्चस्व झुगारु शकली आणि पुढे जर्मनी हरल्यानंतर केलेल्या खटल्यांत युद्ध-अपराधी म्हणून कारवाई होण्यापासून वाचू शकली. नाझींच्या आतल्या गोटात स्वीकार झाल्यामुळे एक दिग्दर्शिका म्हणून तिच्या हातात अफाट चित्रपटसामग्री आणि साधनं आली. ती सोल्जर्स वापरू शकत होती, विमानं वापरू शकत होती. इतकंच काय खुद्द हिटलरचादेखील तिने एखाद्या अभिनेत्यासारखा उपयोग केलाय. हिटलरची काही दृश्यं कितीही उत्स्फूर्त आणि नैसर्गिक वाटली तरी ती पूर्ण स्टेज मॅनेज्ड होती.

आपल्याला जी दृश्यं, जो हिटलर, आठवतोय ती सर्व लेनीच्या 'Triumph of the will' आणि 'Olympia' मधली दृश्यं आहेत. हे दोन्ही चित्रपट चित्रपटाच्या इतिहासातील अमर झालेले चित्रपट आहेत. या चित्रपटातील तंत्रदेखील आपण थोडे तपशिलवार पाहू. लेनीची आयकोनोग्राफी, तिचे एक्स्ट्रीम लो अँगल्स व टॉप अँगल्स, टेलिफोटो लेन्सचा उपयोग प्रभावी परिणाम करून जातो. आकाशातून चित्रीकरण, क्रीडा चित्रीकरण, ट्रॉलीवर कॅमेरा ठेवून घेतलेले ट्रॅकिंग शॉट्स, पाण्याखालचे चित्रीकरण या तर लेनीनं चित्रपट इतिहासात पहिल्यांदा वापरलेल्या गोष्टी! तिच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम विचारपूर्वक कंपोझ केलेली आहे. कायम मनावर कोरलं जावं असं हे चित्रीकरण, चित्रीकरणाबरोबरच संकलन कक्षातदेखील तिच्या चित्रपटांना त्यांचा खरा पोत सापडतो. अत्यंत विचारपूर्वक केलेलं संकलन आहे. संकलनाद्वारे दृश्यं जोडून एक लय निर्माण होते. त्यातील जोश सांभाळला तर जातोच; पण उत्तरोत्तर वाढत जातो. ‘Sixteen years of the German suffering’ हे टायटल व्हर्सायच्या तहाची खपली पुन्हा काढतं. 'Triumph of the will' या नावातच नित्शेचे पडसाद दिसतात. संदेशपटाच्या सुरुवातीपासून प्रतिमा निर्मितीची सुरुवात होते. सुरुवातीलाच स्वस्तिकावर बसलेला गरुड दिसतो. कॅमेरा खाली सरकत आरंभीची टायटल्स दिसतात. फ्यूररच्या आज्ञेवरून निर्मिती मथळा : ‘Adolf Hitler flew once again to Nuremberg to hold a Military display.’ लगेचच विमानातून घेतलेले ढगांचे शॉट्स दिसतात. ढग अधिकाधिक जवळ येतात आणि पूर्ण पडदा व्यापतात. विहंगम दृश्यात न्यूरेम्बर्ग टॉवर व जुन्या ऐतिहासिक इमारती दिसू लागतात.

दृश्य अधिक जवळ येतं. आकाशात विमान उडत आहे, त्याची सावली इमारतीवरून सरकत आहे. खाली विहंगम दृश्यात सैनिकाची पलटण परेड करताना दिसते. विमान लॅन्ड होत आहे. सर्व जमलेले लोक हात हलवून स्वागत करत आहेत. नाझी सलाम देत आहेत. विमान लँड होतं आणि त्यातून एखाद्या मसीहाप्रमाणे हिटलर अवतरतो. हिटलर जीपमधून जात आहे. तुफान गर्दी आहे. लोकांत प्रचंड जोश, उत्साह आहे. पाठमोरा हिटलर सलाम स्वीकारत कमानीखालून प्रकाशात येतो. लोक नाझी पद्धतीनं सलाम करत आहेत. मोटारींचा ताफाचा ताफा पुढे सरकत आहे. प्रत्येक फ्रेमला खोली देण्यासाठी लेनी पुढे फोरग्राउंडला काही वस्तू वापरते. कधी पुतळा, कधी झेंडे आणि क्लोजअप घेताना टेलिफोटो लेन्सचा उपयोग करून खोली नष्ट करते. लहान मुलांचे हसरे चेहरे, कडेवर मुलं घेतलेल्या युवतींबरोबर हस्तांदोलन करणारा हिटलर, सैनिकांशी हसून हस्तांदोलन करणारा हिटलर, अशा दृश्यांतून लेनी हिटलरचा जनतेबरोबर आणि सैन्याबरोबर असलेला रॅपो स्थापन करते.

जागोजागी लावलेल्या झेंड्याचा उपयोग तर लेनी इतक्या वैविध्यपूर्णरीत्या करते, की ते झेंडे चित्रपटातील एक व्यक्तिमत्त्वच बनून जातात. व्यासपीठावर लावलेले झेंडे, इमारतींवर लावलेले झेंडे, सैनिकांच्या आणि हिटलरच्या बाहूवर लावलेले स्वस्तिक, कॅमेरा कधी झेंड्यावरून विहंगम दृश्यात खाली येतो, कधी झेंडे दृश्यातून सरकत जातात. (ट्रॅकिंग शॉट) कधी ते दृश्यात स्थिर असतात. हिटलरला हे झेंडे एक मर्दानी आणि अधिकाराचे स्वरूप प्राप्त करून देतात. त्याचा राजकीय चिन्ह म्हणून उपयोग तर आहेच. हिटलरच्या शॉटच्या मध्ये-मध्ये लेनी हसऱ्या प्रफुल्लित चेहऱ्यांचे इन्सर्ट्स टाकते. त्यामुळे त्यांचा ‘कट्-अवे’ म्हणूनदेखील उपयोग होतो. कधी चेहरे, कधी नाझी सलाम, कधी उंचावलेले हात- असे शॉट्स ती मधूनमधून पेरत जाते. हिटलर इमारतीच्या खिडकीत अवतरतो तेव्हा संगीत आणि लोकांचे आवाज एकत्रित केलेले आहेत. जुळणाऱ्या आवाजाला लेनी फाटा देते.


हेही वाचा : हिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा - मेघनाद कुळकर्णी


आता रात्र झालेली आहे तरी हातात मशाली घेऊन जनता उभी आहे. खिडकी उघडते. एक झेंडा खाली येतो. ठरावीक वेळानंतर झेंडे फ्रेममध्ये येतच राहतात, आणि ते नैसर्गिक वाटतात हे विशेष. नगारे वाजू लागलात. बिगुल वाजवले जातात. बलाढ्य सैनिक, रॅलीसाठी तयार होत आहेत. नाश्ता तयार होत आहे. सूप, सॉसेजेस, यांचे क्लोजअप, तंबूबाहेर सैनिक खेळताना, कुस्ती करताना (एखाद्या घटनेसाठी तयार होण्याचा हा पॅटर्न लेनीने तिच्या ऑलम्पिया चित्रपटातदेखील वापरलेला आहे.) पारंपरिक वेश केलेले जर्मन पडद्यावर दिसून जातात. हिटलर येतो. पुढच्याच दृश्यात तो पूर्ण तयार झालेल्या सैनिकांबरोबर खेळीमेळीने बोलताना दिसतो. हिटलरची मोटार निघते. पुढच्या दृश्यात ती कुठून निघते, वगैरे कंटीन्युटी एडिटिंगला लेनी फाटा देते. एकेका ‘स्ट्रेट कट’ मधून सरळ पुढच्या दृश्यात जाते. पुढचा कट आपल्याला थेट व्यासपीठावर घेऊन जातो. आधी गरुडाचं चिन्ह दिसतं. समोर बसलेले अमाप सैनिक दिसतात. प्रेसिडेंट हिन्डेबर्गला मानभावी आदरांजली देऊन सभा सुरू होते. इतर देशांच्या प्रतिनिधींचं स्वागत, आर्मीचं स्वागत, फ्यूररच्या आधिपत्याखालील देशातील सभा सुरू होते. ‘माझा फ्यूरर’ National Socialist पार्टीच्या चिन्हांनी घेरलेला आहे. लगेच ती चिन्हं, झेंडे दिसून जातात. नाझी पार्टीतले गोअरिंग वगैरेंचे चेहरे दिसतात. हिटलरचा जाहीरनामा वॅगनर वाचून दाखवतो. इतरांची भाषणं हा एक सोपस्काराचा भाग आहे. लोकांमध्ये हिटलर कधी व्यासपीठावर येणार ही उत्सुकता लेनी निर्माण करते. सर्वांच्या भाषणाचं सार एकच आहे. ‘देशाची प्रगती, जनतेचं समाधान.’

लेनीचं वैशिष्ट्य असं की, ती कुठेही स्वतःचे शब्द किंवा निवेदन चित्रपटात वापरत नाही. जे काय आहे ते लोक बोलतात. बिगुल वाजतात. स्वस्तिकाची चिन्हं दिसू लागतात आणि हिटलर भाषणासाठी अवतरतो. सर्वत्र नाझी सलाम, नजरेच्या कवेत न बसणारी माणसं, ‘विजय असो’ (Heil Hitler) च्या घोषणा, एक कॅडेट विचारतो की, तुम्ही कुठून आलात? लोक वेगवेगळ्या ठिकाणांची नावं घेतात. लगेच मथळा येतो. ‘One People One Furrer, One Reich One Germany’. लगेच स्क्रीनवर नाझी झेंडा फडकताना, लोक म्हणतात- “आम्ही फॅक्टरीत काम करतो, आम्ही शेतात काम करतो, आम्ही रस्ते बांधतो.” ‘Land and Bread for Germany’. तरुण सैनिक म्हणतात, “आम्ही कधी खंदकात गेलो नाही. कधी ग्रेनेडचा आवाज ऐकला नाही. पण आम्ही जर्मन सैनिक आहोत.” “धारातीर्थी पडलेल्या सैनिकांनो, तुम्ही जिवंत आहात. तुम्हीच आहात जर्मनी!” हिटलरच्या भाषणात पुन्हा वर्कर्सना साद आहे. सर्व लोकांना तो जर्मनीचे सेवक मानतो. हिटलरचे शॉट मुद्दाम खालच्या अँगलने घेतलेले आहेत. पूर्ण फ्रेम त्याच्या ऊर्जेनं भरून जाते. त्याच्या भाषणावर सैनिकांचे डिझॉव्ह्‌ल्स येतात. सैनिक मार्च करत कॅमेऱ्याकडे येतात. येतच राहतात. रात्र झाली तरी मशाली पेटवून ते चालतच आहेत. लेनी दृश्यबदल सरळ कटमध्ये करते. दिवस सरला, अंधार झाला असं दाखविण्यासाठी ‘टाइम लॅप्स’ दाखवत नाही. रात्रीची आतषबाजी, पेटलेल्या शेकोट्या अशी दृश्ये दिसतात आणि एका ‘फेड-इन’मध्ये सकाळ होते.

दृश्य हळूहळू अधिक उजळ होत जातं. आता किशोरवयीन मुलं बँड वाजवताना दिसतात. गर्दीतून वाट काढत हिटलर पुढं येतो. आणखी एक सभा, अशा तब्बल 140 सभा लेनीनं चित्रित केल्यात. काही चित्रपट अभ्यासक म्हणतात की, यातील एकही फ्रेम खरी नाही. अगदी हिटलरची भाषणंदेखील बहुधा स्टेज मॅनेज केलेली आहेत. तसं असेल तर लेनीला आणखीनच दाद दिली पाहिजे. कारण इतका मोठा जनसमुदाय, सैनिकी परेड, हिटलरची भाषणं स्टेज मॅनेज करणं हे येरागबाळ्याचं काम नाही. एखाद्या एपिक चित्रपटासारखा हा सर्व पसारा आहे.

हळूहळू हिटलरच्या सभांचा वेळ लेनी वाढवत जाते आणि हिटलरच्या भाषणावर लक्ष केंद्रित करते. हिटलर सतत कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनात राहतो. हिटलरची भाषणं (चर्चिलच्या भाषणाप्रमाणे) एक अभ्यासाचा विषय आहे. आपलं भाषण नीट वठावं म्हणून हिटलर खूप प्रयत्न करत असे. आरशासमोर उभं राहून रिहर्सल करत असे. या सभेत हिटलर दूरदृश्यात व्यासपीठावर दिसत आहे. एक्स्ट्रीम, कमालीच्या लो अँगल ट्रॅकिंग शॉटमुळे हिटलर भव्य हुकुमती वाटतो. भाषणात हिटलर लोकांना आवाहन करत असला, नवीन राजवटीचे सूतोवाच करत असला, व्हर्सायच्या लाजिरवाण्या तहाची आठवण करून देत असला तरी, “मी म्हणजेच राज्य”, असंच तो सांगत आहे. ‘‘राज्यानं आम्हांला तयार केलं नाही, तर आम्ही राज्य तयार केलं.’’ तो सांगतोय, “ड्रमआधी ड्रम येतील, झेंड्याआधी झेंडे येतील, गटाआधी गट येतील आणि सरतेशेवटी या देशाचा बलाढ्य ताफा एके काळी दुभंगलेल्या राष्ट्राचं नेतृत्त्व करेल.” अशा तऱ्हेने हिटलर वातावरण तयार करत आहे. खरं मर्म त्याच्या पुढच्या सभांत येणार आहे. त्यासाठीची ही तयारी आहे.

प्रत्येक सभेच्या आधी आणि नंतर लेनी एक भव्य परेड टाकते. लष्करी ताफ्याचे शॉट्स टाकते. या सर्व संकलनाच्या क्लृप्त्या आहेत. घडल्या त्या क्रमाने क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये घटना ती दाखवत नाही. तर वातावरणास योग्य त्याच प्रतिमा निवडून तिला हवा तो परिणाम साधते. या सर्व प्रतिमांमध्ये ती झेंडा, हिटलर, जनतेचा सलाम, परेड, गरुड, स्वस्तिक या प्रतिमा पुन्हापुन्हा वापरते. आणि एक तगडी प्रतिमासृष्टी तयार करते. सभा पुढे सरकते. आता एस. ए.चे लोक हिटलरशी प्रामाणिक राहण्याची प्रतिज्ञा करतात. एस.ए.च्या अर्न्स्ट-होम या शक्तिशाली नेत्याला तो प्रबळ होऊन हिटलरशी पंगा घेऊ नये म्हणून एस.एस.च्या लोकांनी मध्यरात्री ठार केलं होतं. ‘Night at long knives’. ही तीच रात्र! पण आता एस.ए. हिटलरबरोबर आहे हे जनतेला दाखवायचं आहे. हिटलर लगेचच एस.ए.ची सत्ता पदच्युत करणार आहे. नष्ट करणार आहे. इथे मात्र तो म्हणतोय, “Only a madman or a wilful liar would think that I or anyone else would intend to break what we ourselves have built.” (Madman and a wilful liar?) हिटलर हे दोन्ही होता. इथं लेनीनं हिटलरचं कमालीचं क्लोजअप आणि लाँग शॉट असं संकलन केलं आहे. लाँग शॉट वातावरण निर्मिती करतात तर क्लोजअप्स भाषणाकडे लक्ष वेधून घेतात. हिटलरच्या जोशपूर्ण भाषणात लाँगशॉट विरामचिन्हासारखे उपयोगी पडतात. कॅमेरा स्वस्तिकाच्या उंच पसरलेल्या झेंड्यावरून खाली सरकतो. पार्श्वभूमी sie heil (खरं तर याचं भाषांतर ‘तुम्ही सुरक्षित आहात’ असं होईल. पण सर्व लोक एकसाथ जेव्हा हे म्हणतात तेव्हा ‘विजय असो’ असाच भावार्थ निघतो) च्या गर्जनेने आसमंत दुमदुमून जातो. तोफांच्या सलामीच्या आवाजावर हिटलर समीप दृश्यात सैनिकाशी हस्तांदोलन करताना दिसते. स्क्रीनवर डोळ्यांत मावणार नाहीत इतके झेंडे आहेतच!

पुढच्या सिक्वेन्समध्ये जवळजवळ सतरा-अठरा मिनिटे कवायतींची, परेड्सची दृश्यं आहेत. संवाद नाही. काही घडत नाही. फक्त परेडच्या प्रतिमा, परेडची शिस्त, परेडची शक्ती, परेडचे अधिकार अधोरेखित करतात. परेड, सॅल्यूट, झेंडे. या परेडमध्ये लेनीने वेगळा पोत वापरला आहे. आधीच्या सभांत हसतमुख दिसणारा, लोकांशी खेळीमेळीने वागणारा हिटलर आता गंभीर झाला आहे. कवायतीतल्या माणसांची संख्या वाढलेली आहे. झेंड्यांची संख्या वाढलेली आहे. आधीच्याप्रमाणे ही परेड हिटलरच्या दृष्टिक्षेपातून (Point of view) घेतलेली नसून प्रेक्षकांच्या दृष्टिक्षेपातून घेतलेली आहे. लेनीनं कौशल्यानं आर्मीचे शॉट, पार्टीच्या सैन्याच्या शॉटशी जोडले आहेत. जणू काही राज्याची मिलिटरी आता पार्टीच्या अखत्यारीत आली आहे! (हिटलर पुढे हे करणारच होता.) विविध कॅमेरा कोनांतून आणि लोकांच्या दृष्टिक्षेपातून ही परेड दिसत असतानाच लेनी कॅमेरा परेडमध्ये घेऊन जाते. प्रेक्षकांना परेडचा भाग बनवून टाकते. याला म्हणतात मास्टरस्ट्रोक!

आता आपण चित्रपटाच्या शेवटाकडे येत आहोत. हिटलर त्याचे समारोपाचे भाषण करणार आहे. आतापर्यंतच्या चित्रीकरणातून आणि प्रतिमासृष्टीतून त्याला असलेला जनतेचा, सैन्याचा अमर्याद पाठिंबा पडद्यावर दिसलाय. आता त्याला सर्वोच्च नेता, जनतेचा उत्तराधिकारी, जर्मनीच्या उद्धारासाठी अवतरलेला अवतार म्हणून चित्रपटात प्रस्थापित करायचं आहे. लोकांना संदेश द्यायचाय. ‘‘आता निर्धास्त राहा, आता हिटलर आलाय.’’ (हिटलर है तो मुमकीन है) ‘‘आता भूतकाळातील अवहेलना संपणार, जर्मनी जगात आघाडीवर येणार आणि पार्टी उज्ज्वल भविष्य जनतेसाठी घडवेल.’’ (अच्छे दिन आनेवाले है) पडद्यावर सरकत जाणारे असंख्य झेंडे, कॅमेराच्या विविध कोनांतून टिपलेले, स्वतः हिटलर त्या झेंड्यांना अभिवादन करताना, झेंड्याचे आणि स्वस्तिक चिन्हाचे कॅमेऱ्याकडे येणारे (हेड ऑन) ट्रॅकिंग शॉट्स, जोशपूर्ण डायनॅमिक लो अँगल शॉट्स, पार्टीची, सैन्याची संपूर्ण निष्ठा, संपूर्ण चित्रपट व्यापून राहिलेली आहे. लेनीनं अशी प्रतिमासृष्टी निर्माण केली आहे की यातून लोकांना सुप्त संदेश जातो, ‘‘तुम्हांलादेखील हेच करायचं आहे. संपूर्ण आणि बिनशर्त निष्ठा! आता ते काय करेल जे हिटलरच करेल आणि फक्त तोच ते करू शकतो.’’ शेवटच्या समारोपाच्या भाषणाच्या आधी इतर व्यक्तींची भाषणं नाहीत. “फ्यूरर बोलतोय”म्हणून थेट हिटलरचं आगमन होतं. पार्श्वभूमीवर जयघोषाचे आवाज आणि हिटलर ते थांबण्याची वाट बघतोय.

“हे सहावं पार्टी काँग्रेस आता संपण्याच्या बेतात आहे. पार्टीबाहेरच्या असंख्य लोकांनी त्यात सहभाग घेतला. त्यांना या राजकीय सत्तेच्या आविष्काराने नक्कीच प्रभावित केलं असणार.” हिटलर बोलतोय. पार्टीच्या गोबेल्स, गोअरिंग इ. लोकांचे ऐकतानाचे शॉट्स. हिटलरला आपला 25 कलमी कार्यक्रम, नव्या जगाबद्दलची त्याची दूरदृष्टी आता सांगायची आहे. थोडक्यात फ्यूरर म्हणून आपला बाप्तिस्मा करायचा आहे. लेनीनं हे सर्व अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. हिटलर म्हणतोय, "आपल्या पार्टीत फक्त सात सदस्य होते तेव्हाही आमची ध्येयं स्पष्ट होती. पहिलं- आम्हांला जागतिक दृष्टिकोन ठेवून पुढे जायचं आहे आणि दुसरं - तिला जर्मनीत सार्वभौम सत्ता हवी कुठल्याही तडजोडीशिवाय." (खरं तर नाझी पार्टीच्या उदयाच्या वेळी हिटलरला त्यात शिरकाव करून त्यांच्या विरुद्ध माहिती गोळा करण्यास पाठवलं होतं, पण हा पठ्ठ्या त्यांच्या विचारधारेनं इतका प्रभावित झाला की पुढे पार्टीसाठी भाषण ठोकू लागला) सांगायची गोष्ट अशी की, नाझी पार्टीची स्थापना हिटलरने केली नव्हती, पण आज तो पार्टीचा सर्वेसर्वा होता. नाझी विचारसरणीत वैयक्तिक स्वातंत्र्य, घटना, कायदा आणि लोकशाही तत्त्वे यांना कुठलंही स्थान नव्हतं. हे सर्व वेळखाऊ आहे. फक्त एकाधिकार असलेला माणूसच (म्हणजे खुद्द हिटलर) वेगवान बदल घडवून आणू शकतो, अशी धारणा होती.

कम्युनिझममध्ये लोकशाही ही नेहमी ‘आहे रे’ लोकांची सत्ता असते अशी धारणा होती म्हणून लोकशाही नको, कम्युनिझम हवे. हिटलर म्हणतो, "मला अनिर्बंध सत्ता द्या. मग पहा मी जर्मनीला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो." (असं तो थेट म्हणत नाही पण लेनीला चित्रपटातून हेच लोकांना सांगायचं आहे). इथे जर्मन लोकांची वांशिक श्रेष्ठता सांगत असतानाच आता सत्ता हातात आली आहे हे ठासून सांगतो. दुफळी संपून आता एकतेचं राज्य आलं आहे. शुद्ध रक्ताच्या लोकांचं राज्य आलं आहे. मी विश्वास करतो इतकंच पुरेसं नाही. ‘‘मी लढेन’’ असं म्हटलं पाहिजे. सर्व जर्मन लोकांनी नाझी झालं पाहिजे हे आपलं उद्दिष्ट हवं. जे आपल्यासारखे नाहीत त्यांना ठेचून काढलं पाहिजे. भविष्य केवळ आपलंच आहे. आपली गौरवशाली सेना जेव्हा तुल्यबळ पारंपरिक पार्टी नेतृत्वाशी संगम करेल तेव्हा दोघंही मिळून जर्मन जनतेला शिकवण देऊन एकत्रित करेल." असं म्हणून हिटलर आपलं भाषण संपवतो. असंख्य लोक हात उंचावून (म्हणजे आडवे करून) सलाम करतात. (प्रचलित सलामांपेक्षा चित्रविचित्र सलाम यांना कसे सुचतात कोण जाणे! उदा., ‘आरएसएस’चा सलाम)

शेवटी हिटलर केकाटतो, "पार्टी म्हणजे हिटलर, हिटलर म्हणजे जर्मनी." पुन्हा स्वस्तिकाच्या झेंड्यावरून कॅमेरा फिरतो आणि पार्टी सदस्य गोअरिंग वगैरे दाखवून लोकांवर स्थिर होतो. युद्धात तथाकथित वीरमरण पत्करलेल्या सैनिकांना श्रद्धांजली देत लोक हात उंचावून गाणं म्हणतात. पार्श्वभूमीवर अवाढव्य स्वस्तिक चिन्ह आहे. स्वस्तिकाचं चिन्ह अधिक जवळ येतं, आणि चालणाऱ्या जनतेवर मिसळतं, डिझॉल्व्ह होतं. हा जर्मन लोकांच्या (म्हणजे अर्थात हिटलरच्या) दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय आहे. जर्मन लोकांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. लक्षात घ्या, हिटलरकडे सत्ता नुकतीच आलेली आहे. पण लेनी आपल्या प्रतिमासृष्टीच्या सामर्थ्यावर हिटलरला जर्मनीचा सर्वेसर्वा-फ्यूरर म्हणून प्रस्थापित करते. हे आहे संदेशपटांचं / प्रचारपटांचं सामर्थ्य! फक्त हे माध्यम लेनीसारख्या प्रतिभावान व्यक्तीकडे गेलं पाहिजे.

आपल्या 1938 मधल्या ऑलम्पिया या संदेशपटात तर लेनीनं आणखीनच कमाल करून दाखवलीय. हा चित्रपट 1936 मध्ये झालेल्या बर्लिन ऑलिम्पिक चित्रणातून बनवलेला आहे. भन्नाट कॅमेरा अँगल्स, कल्पक संकलन, ट्रॉलीवर ठेवलेला कॅमेरा, विमानातून बलूनला ऑटोमॅटिक कॅमेरे लावून चित्रीकरण, आकाशातून चित्रीकरण, असंख्य ठिकाणी पेरलेले कॅमेरे आणि त्यातील फूटेजचे कल्पक संकलन, सांधणी अशी त्या वेळी जगाने न बघितलेली चित्रपटतंत्रं लेनीनं विकसित केली. चित्रपटातील बर्लिन ऑलिम्पिकचा आरंभ आणि समारोप यांत हिटलर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी दिसतो. पुढच्या दोन भागांतून ‘फेस्टिव्हल ऑफ नेशन्स’ आणि ‘फेस्टिव्हल ऑफ ब्युटी’मधून या अकराव्या ऑलिम्पिकमधले खेळ आणि खेळाडू दिसतात. हिटलर खेळाचं उद्घाटन करतो आणि खेळ सुरू करतात. कॅमेरा पूर्ण वेळ मैदानावर खेळ आणि खेळाडूंवर केंद्रित केला आहे. हिटलर खेळ बघतानाचे, जर्मन खेळाडू जिंकल्यावर टाळ्या वाजवतानाचे मोजके शॉट्स आहेत ते अत्यंत जपून वापरलेत. सर्व जग खेळ बघणार आहे. हिटलरला प्राधान्य दिलं तर त्याचा उलटा परिणाम होईल हे भान लेनीला आहे. हिटलरचं महत्त्व तिनं ओपनिंग सेरीमनीमधे अधोरेखित केलंच आहे. ऑस्ट्रियासारख्या देशाचे खेळाडू तर हिटलरला नाझी पद्धतीनं अभिवादन करतात. पुढे जर्मन खेळाडूंशिवाय इतर काही देशांचे जिंकलेले खेळाडूसुद्धा हिटलरला नाझी सलाम देतात. असे नाझी सॅल्यूट लेनीने व्यवस्थित टिपले आहेत आणि वापरले आहेत.


हेही पाहा : लेनी रिफन्स्टालच्या आयुष्यावरील तीन तासांची डॉक्युमेंटरी


बर्लिन ऑलिम्पिकचं सर्वच भव्यदिव्य स्केलवर आहे. हे अकरावं ऑलिम्पिक बर्सिलोनाच्या ऐवजी बर्लिनला व्हावं यासाठी जर्मनीनं शर्थ केली. हिटलरचा जगप्रसिद्ध आर्किटेक्ट स्पिअर (याला लेनी जर्मनीतला दुसरा महत्त्वाचा माणूस मानते.) यानं भव्य, एक लाख माणसं बसतील असं स्टेडियम, सहा जिम्नॅशिअम आणि इतर छोटे विभाग उभारले. हा भव्य क्रीडा सोहळा नाझी प्रचारासाठी किती उपयुक्त ठरेल याची जाणीव प्रसारमंत्री गोबेल्सला झाली आणि त्यानं हिटलरला यासाठी राजी केलं. हिटलरला वांशिक वर्चस्व, आपली लष्करी आणि तांत्रिक प्रगती जगासमोर मांडण्याची ही सुसंधीच वाटली. अनेक गोष्टी पहिल्यांदा या ऑलिम्पिक घटनेत घडल्या. टेलिव्हिजन प्रसाराचा प्रथम उपयोग केला गेला. क्रीडा चित्रीकरण इतक्या भव्य स्केलवर प्रथमच केलं गेलं. लेनीला यासाठी सात दशलक्ष डॉलर्स दिले गेले. लेनीनं आपल्या चित्रपटातून अनेक नवीन तंत्रं पहिल्यांदा दिली. ऑलिम्पिक ज्योत अथेन्सपासून ऑलिम्पिक होणाऱ्या देशात हातोहाती आणण्याची प्रथा पहिल्यांदा टाकली गेली.

ज्यू खेळाडूंना या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यापासून वगळण्यात आलं. मार्गारेट लॅम्बार्टसारखी जर्मन रेकॉर्ड मोडणारी ज्यू स्त्रीदेखील यातून वाचली नाही. जर्मन खेळाडूंनी सर्वांत जास्त मेडल्स मिळविली खरी; पण जेसी ओवेन या आफ्रिकन अमेरिकन धावपटूनं चार गोल्ड मिळवून गोऱ्या वर्चस्वाचा नाझी सिद्धांत मोडीत काढला. हिटलरचा वंशवर्चस्वाचा दृष्टिकोन माहीत असूनही, लेनीनं जेसी ओवेनच्या खेळाला पूर्ण न्याय दिला आहे. हिटलरनं ओवेनची दखलदेखील घेतली नाही. हिटलरचं सोडा तो अमेरिकत परतला तेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्टनेदेखील जेसीची दखल घेतली नाही आणि विजेत्या खेळाडूंबरोबर खान्याकरता बोलावलं नाही. दुसऱ्या महायुद्धातदेखील हे बर्लिन स्टेडियम तसंच्या तसं टिकून राहिलं आणि युद्ध संपल्यावर ‘जेसी ओवेन रिटर्न टू बर्लिन’ असा अमेरिकन संदेशपटदेखील आला. यात जेसी ओवेन आपल्या 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकच्या आठवणी सांगताना दिसतो.

पण बर्लिन (नाझी ऑलिम्पिक) कायमच लक्षात राहतं, ते लेनीच्या ऑलिम्पिया चित्रपटामुळे. प्रचारकी वाटू न देता संदेश कसा द्यावा याचं हे उत्तम सकस उदाहरण आहे. ‘ट्रायम्फ ऑफ विल’मध्ये लेनीनं कॅमेरा हिटलरवर फोकस केला आहे. ऑलिम्पियामध्ये तो खेळांवर केंद्रित केला आहे. लेनीच्या चित्रपटांची सुरुवात नेत्रदीपक आणि कलात्मक असते. ऑलिम्पियाच्या सुरुवातीस आपल्याला ट्रॅकिंग शॉटद्वारा चित्रित केलेले ग्रीक पुतळे दिसतात. कधी चेहरा, कधी मांड्या, कधी दंड (लेनीनं आयझेस्टाइनच्या ऑक्टोबर चित्रपटापासून या दृश्यांची प्रेरणा घेतली असं वाटू लागतं. ‘ऑक्टोबर’मध्येदेखील पुतळ्यांचा असाच वापर आहे.) ही दृश्यं बलदंड खेळाडूंच्या शरीरांवर मिसळतात. (डिझॉल्व्ह). त्यांच्या शरीराचेदेखील वेगवेगळे भाग दिसतात. संथ संगीताच्या तालावर ही चित्रं संकलित केलेली आहेत. स्त्रियांच्या लयबद्ध काळ्या आकृत्या दिसतात. एकमेकांत मिसळतात, अलग होतात. एका तरुणीच्या पाठी अनेक तरुणी उभ्या करून, एखाद्या मल्टीपल एक्सपोझरप्रमाणे असंख्य हात एकाच तरुणीला फुटल्यासारखे वाटणारं दृश्य लेनीनं प्रथम चित्रित केलं. (आज हा प्रकार वापरून वापरून झिजलाय.) या आरंभीच्या सिक्वेन्समध्ये खेळाडू तयार होत आहेत. व्यायाम करत आहेत. लेनीनं त्यांची निसर्गाशी सांगड घातली आहे. नर्मविनोदही आहे. एक शीख खेळाडू उड्या मारत असताना एक कांगारूही तशाच उड्या मारत पलीकडे जाते. खेळाडूंचं शरीरसौष्ठव अत्यंत लयबद्धरीत्या लेनीनं चित्रित केलं आहे.

सर्व सिक्वेन्स म्हणजे एक सांगितिक आकृतिबंध, एक दृक सिम्फनी आहे. ही दृश्यं ऑलिम्पिकच्या ज्वाळेत विलीन होतात. ऑलिम्पिक ज्योत हातोहात अनेक देशांतून फिरत बर्लिनला येते आणि ग्रीक पुतळ्यांप्रमाणे दिसणारा जर्मन खेळाडू ती ज्योत पेटवतो. बिगुल वाजतो आणि खेळ सुरू होतात. पहिला खेळ थाळीफेक आहे. पार्श्वभूमीवर समालोचकांचे आवाज येतात. खेळाची दृश्यं दिसतात आणि मग समालोचकही दिसतात. विविध देशांचे समालोचक विविध भाषांमधून समालोचन करत आहेत. ऑलिम्पिकच्या झेंड्याबरोबर जगातील देशांचे झेंडेदेखील दिसत आहेत.

विविध देशांतील लोक आपापल्या देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांची वैशिष्ट्ये लेनीने बरोबर टिपलीत. अमेरिकन लोक टोप्या उंचावून प्रोत्साहन देतात, जपानी स्त्रिया खेळाडू जिंकल्यावर हातातील पंखे हलवतात. इटालिअन लोक हातातील झेंडे फडकवतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण हालचाली लेनी समर्थपणे बंदिस्त करते. या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लगेचच येतात. त्यामुळे त्या जिवंत आणि उत्स्फूर्त वाटतात.

कॅमेरा अँगल्सची निवड लेनी त्या त्या खेळानुसार करते. आकाशाच्या दिशेने केलेली भालाफेक, गोळाफेक, उंच उडी, हॉकीच्या, फुटबॉलच्या धावण्याच्या शर्यतीत जमिनीलगतचे शॉट्स, घोड्याच्या शर्यतीत, पोलो खेळात लांबून घेतलेले शॉट्स अशी समर्पक दृश्ययोजना ती करते. संकलनात अनेक शॉट्स जोडले असले तरी हालचालींची लय आणि सातत्यही सांभाळते. त्यामुळे त्या अत्यंत नैसर्गिक वाटतात. काही दृश्यं अत्यंत सर्जनशीलरीत्या घेतलेली आहेत. तलवारबाजीच्या स्पर्धेत आधी आपल्याला जमिनीवर पडलेल्या सावल्या तलवारीने लढताना दिसतात. कॅमेरा त्यावर बराच काळ रेंगाळतो आणि मग प्रत्यक्ष खेळाडूंवर सरकतो.

‘फेस्टिव्हल ऑफ ब्युटी’ हा चित्रपटाचा भाग म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे. यात समालोचन ऐकू येत असलं तरी प्रत्यक्ष समालोचक कमी वेळा दिसतात. दृश्यांवर भर आहे. त्यातूनही खेळावर! प्रेक्षकांची दृश्यंदेखील क्वचितच वापरली आहेत. यातील शिडाच्या नौकांची शर्यत, जलतरण शर्यत आणि जलतरण तलावात डायव्हिंग ही दृश्यं पाहून आपण थक्क होतो. शेवटी शेवटी येणाऱ्या डायव्हिंगच्या सिक्वेन्सच्या तर ओडेसा स्टेप्स सिक्वेन्सप्रमाणे अभ्यास करायला हवा. स्प्रिंगबोर्डवरून वर उसळताना, हवेत गिरक्या घेताना, पाण्यात मारलेला सूर, पाण्यातून वर येताना, पाण्यातून घेतलेले शॉट यासाठी इतके विविध कॅमेरे अँगल्स समर्पकरीत्या वापरलेत, की लेनीचं कौशल्य बघून आपण आश्चर्याने थक्क होतो. कधी कॅमेरा आपल्याला स्प्रिंगबोर्डवर जलतरणपटूच्या मागे घेऊन जातो. कधी पाण्याच्या पातळीवरून आकाशाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूच्या हवेतील गिरक्या टिपतो. सुरुवातीला लेनी स्प्रिंगबोर्डवरून उडी मारणे ते पाण्यातला सूर आणि पाण्यातून बाहेर येणे अशा सर्व हालचाली टिपते. शेवटी शेवटी फक्त स्प्रिंगबोर्डवरून उड्या मारतानाचे विविध खेळाडूंचे विविध कोनांतून, आकाशाच्या पार्श्वभूमीवर शॉट दाखवते. पुरुष खेळाडूच्या उड्यातून त्यांचा जोश दिसतो. स्त्रियांच्या उड्यातून सौंदर्य दिसते. हे करत असताना दृश्याची लय ती सांभाळतेच; पण अधिकाधिक उत्कट करत जाते. लयबद्ध दृश्याचा एक अप्रतिम, डोळ्यांचं पारणं फेडणारा आकृतिबंध तयार होतो. शिडाच्या होडीच्या शर्यतीतदेखील कॅमेरा कधी दुरून दृश्य विविध अँगल टिपतो, कधी थेट आपल्याला होडीत घेऊन जातो.

लेनीनं कॅमेरे कुठे कुठे ठेवलेत? आधी सांगितल्याप्रमाणे लेनीनं मिळेल त्या ठिकाणी जास्तीतजास्त कॅमेरे लावले होते. आता इतक्या सर्व कॅमेऱ्यांतून आलेलं फुटेज व्यवस्थित संकलित करायचं म्हणजे साधसुधं काम नाही. त्या वेळी फिल्म हातानी कापून जोडावी लागे. आजच्यासारखी अद्ययावत ऑनलाइन एडिटिंग सामग्री उपलब्ध नव्हती. म्हणजे इतके फिल्मचे तुकडे निवडणे, तेसुद्धा नेमके निवडणे आणि लय सांभाळत एकापुढे एक जोडणे हे शिवधनुष्य उचलण्याइतकं कठीण काम होतं; पण लेनीनं ते यशस्वीरीत्या पेललं.

ऑलिम्पियामध्ये हिटलरच्या नाझी राजवटीचा भव्यपणा, अचाट पसारा लेनी टिपते. खेळातील जोश, सौंदर्य, जिवंतपणा लेनी टिपते आणि प्रचाराचा एक शब्ददेखील न उच्चारता एक अभिजात संदेशपट जगाला देते. हिटलरसारख्या एका केवळ चॅन्सलरची प्रतिमा एक सर्वेसर्वा फ्यूरर म्हणून जनमानसात रुजवण्यात लेनी राफेनस्टालचा सर्वाधिक वाटा आहे. लक्षात घ्या, दुसरं महायुद्ध सुरू होण्यास अद्याप तीन वर्षं बाकी आहेत पण हिटलरची लष्करी आणि तंत्रज्ञानातील आघाडी सर्व जगानं पाहिलीय लेनीच्या कॅमेऱ्यातून.

लेनीचं पुढं काय झालं? जर्मनी हरत असता पळून जात असता ती दोस्तांच्या हातात पडली. युद्ध संपल्यावर युद्ध-गुन्हेगार म्हणून तिची उलटतपासणी झाली. ज्यू हत्याकांडाबाबत आपण अनभिज्ञ होतो, असं ती वारंवार सांगत राहिली. (ते खरं असेलच असं नाही. कारण कित्येक अभ्यासक म्हणतात की, लेनीनं आपले एक्स्ट्राज ज्यू छळछावण्यातून घेतले होते. सैनिकी वेशात कमरेला पिस्तूल लटकवलेले लेनीचे फोटो आजही उपलब्ध आहेत.) लेनी अखेरीस सर्व आरोपांतून मुक्त झाली. तिला सहप्रवासी (जिला आपल्या कृत्यांचे परिणाम माहीत नव्हते) म्हणून घोषित केलं. पुढे बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, हिटलरची भेट हा माझ्या आयुष्यातील सर्वांत दुर्दैवी क्षण. लेनी शंभर वर्षांवर जगली. आणि तिनं बनवलेल्या संदेशपटांना तर मरणच नाही. चित्रपट इतिहासात ते अजरामर झालेत. चित्रपट माध्यमांवर विलक्षण हुकुमत असलेल्या या समर्थ दिग्दर्शिकेला (आपण नाझी सलाम ठोकू शकत नाही) पण जमिनीवर पाय आपटून कडक सलाम!

(क्रमशः)

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


'ट्रायम्फ ऑफ विल' या सिनेमाची लिंक :

 

Tags: हिटलर लेनी रिफन्स्टाल सिनेमा प्रचारपट चित्रपट दिग्दर्शन युद्धपट युद्ध पहिले महायुद्ध युद्धकालीन चित्रपट Load More Tags

Comments:

Mahendra Patil

very good information about Nazismनाझीवाद विचारधारा

Add Comment