भारतीय चित्रपटांचा लिंगविविधतेबाबतचा बदलता दृष्टिकोन

सामाजिक समस्यांबाबत वाढती जागरूकता, LGBTIQA+ हक्क गटांद्वारे चालवलेल्या चळवळी आणि विषयांची वास्तविकता चित्रित करण्याची इच्छा यातून हा बदल होतो आहे.

भारतीय समाज हा परंपरेने पितृसत्ताक समाज मानला जातो. त्यातूनच, सिनेजगतातही पुरुषांव्यतिरिक्त इतर सर्वच लिंगांच्या व्यक्तींना दुय्यम स्थान दिसतं. पूर्वग्रहांना बळकटी किंवा आव्हान देण्याचं सामर्थ्य चित्रपटासारख्या प्रभावशाली माध्यमाकडे असतं. सामान्यतः मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांत काही पात्रांना स्टिरियोटाइपसह - जसं की, मुस्लिमांना खलनायक किंवा दहशतवादी म्हणून, तर शीखांना ड्रायव्हर म्हणून - चित्रित केलं गेलं आहे. अगदी त्याच धर्तीवर, पारंपरिक दृष्टिकोनातून भारतीय चित्रपटसृष्टीत पारलिंगी (ट्रान्सजेंडर) व्यक्तींचं व्यंगात्मक, उपहासात्मक किंवा दैवीकरण करून नकारात्मक, विकृत, व्यभिचारी किंवा असहाय्य असं चित्रित केलं जायचं. पण बदलत्या परिस्थितीसोबत हे चित्रही आता हळूहळू बदलताना दिसत आहे. 

चित्रपट हे जनतेशी संवाद साधण्याचे एक मोठे माध्यम आहे. दरवर्षी जवळपास एक हजार चित्रपटांची निर्मिती एकट्या भारतात होते आणि लाखो लोक दर आठवड्याला सिनेमागृहांत, लॅपटॉप किंवा मोबाईलवर हे चित्रपट पाहतात. थोडं खोलात जाऊन विचार केल्यास हे लक्षात येतं की, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसतं. चित्रपट पाहून लोक एखाद्या गोष्टीविषयी आपली मतं बनवत असतात, त्यातून त्या विषयीचा त्यांचा दृष्टिकोन घडत असतो. इतर कोणत्याही माध्यमाचा इतका मोठा पगडा दिसणं कठीणच! संस्कृती, शिक्षण, करमणूक आणि प्रचार या सर्व बाबतीत चित्रपट हे एक मजबूत वाहन बनलं आहे. आणि म्हणूनच चांगले चित्रपट लोकांची वृत्ती, विश्वास आणि मूल्यप्रणाली बदलण्यास सक्षम असतात. जनधारणा घडवण्याची चित्रपटांची ही प्रचंड क्षमता लक्षात घेता, त्यात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींची, त्यातील पात्रयोजनेची आणि एकंदर समाजावर पडणाऱ्या प्रभावाची चर्चा करणं गरजेचं ठरतं.

एखादा चित्रपट बघताना आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो म्हणजे नेमकं काय करतो? तर त्या आभासी जगातील पात्रांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतो.. जितकं जास्त आपण स्वतःला त्याच्याशी ‘रिलेट’करू शकलो, तितका तो चित्रपट उत्तम समजायचा! पण आपल्या समाजातील सगळ्याच घटकांना चित्रपटांशी, त्यातील विषयांशी किंवा पात्रांशी तेवढ्या प्रमाणात जुळवून घेता येत नाही. याचं कारण, आपले चित्रपट सगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व सारख्या प्रमाणात करत नाहीत. विशिष्ट घटकांचंच प्रतिबिंब त्यात जास्त झळकत असल्याने समाजातील काही उपेक्षित घटकांना त्याविषयी परकेपणाची भावना वाटत असते. यात भर म्हणजे परिघाबाहेरील घटकांचं प्रमाण तर त्यात जवळपास नसतंच! अशावेळी या घटकांना प्रश्न पडतो की, ‘तुमच्या या सगळ्या पसाऱ्यात आम्ही कुठंय?’ तेव्हा, ‘चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असते’ या समजुतीला तडा जातो. आणि म्हणूनच कुठल्याही चित्रपटाचं मूल्यमापन करताना, समाजात घडणाऱ्या घटनांचं, समस्यांचं, दुर्लक्षित घटकांचं आणि एकंदर समाजमनाचं प्रतिबिंब त्यात किती प्रमाणात उतरलं आहे हे तपासणं महत्त्वाचं ठरतं.

प्रश्न प्रतिनिधित्वाचा:

अजूनही भारतीय चित्रपट वर्ग-जाती-लिंग वर्चस्वातून बाहेर येऊन पूर्णपणे समावेशक झालेला दिसत नाही. त्यात भारतीय समाजरचनेच्या उतरंडीतील वरच्या स्तरातील पुरुषांचंच प्रतिनिधित्व प्रामुख्याने अधोरेखित होतं. याचे दाखले आपल्याला चित्रपटनिर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून देता येतील. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी जेव्हा ‘राजा हरिश्चंद्र’(1913) या चित्रपटाची निर्मिती केली, तेव्हा स्त्री पात्रांच्या भूमिकाही पुरुष कलाकारांनीच केल्या होत्या. कालांतराने स्त्रियांनी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवल्याने त्यात बरेच बदलही झालेत. पण सद्यस्थितीतही भारतीय चित्रपट सतत पुरुषी वर्चस्व प्रदर्शित करत असतात. बहुतेकदा चित्रपटांत स्त्रियांची ओळख ही पुरुषाशी संबंधितच म्हणजे कोणाची तरी पत्नी, आई, मुलगी किंवा सून म्हणूनच दाखवली जाते. क्वचितच स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यक्तीरेखा निर्माण केलेली आहे.

अभिनेते आणि अभिनेत्रींना मिळणाऱ्या वेतनातील तफावत, मुख्य भूमिकांचं वाटप, स्त्री-केंद्रित कथनाचा अभाव, वाढत्या वयासोबत अभिनेत्रींना मिळणाऱ्या भूमिकांमधील घट, दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनातील महिलांचं अपुरं प्रतिनिधित्व आदि बाबतींतही चित्रपटांतील ही लैंगिक असमानता प्रकर्षाने जाणवते.

भारतीय समाज हा परंपरेने पितृसत्ताक समाज मानला जातो. त्यातूनच, सिनेजगतातही पुरुषांव्यतिरिक्त इतर सर्वच लिंगांच्या व्यक्तींना दुय्यम स्थान दिसतं. पूर्वग्रहांना बळकटी किंवा आव्हान देण्याचं सामर्थ्य चित्रपटासारख्या प्रभावशाली माध्यमाकडे असतं. सामान्यतः मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांत काही पात्रांना स्टिरियोटाइपसह - जसं की, मुस्लिमांना खलनायक किंवा दहशतवादी म्हणून, तर शीखांना ड्रायव्हर म्हणून - चित्रित केलं गेलं आहे. अगदी त्याच धर्तीवर, पारंपरिक दृष्टिकोनातून भारतीय चित्रपटसृष्टीत पारलिंगी (ट्रान्सजेंडर) व्यक्तींचं व्यंगात्मक, उपहासात्मक किंवा दैवीकरण करून नकारात्मक, विकृत, व्यभिचारी किंवा असहाय्य असं चित्रित केलं जायचं. पण बदलत्या परिस्थितीसोबत हे चित्रही आता हळूहळू बदलताना दिसत आहे.

लैंगिक अल्पसंख्याक (LGBTQIA+) समुदायातील व्यक्तीच्या चित्रीकरणाचं बदलतं स्वरूप:

लैंगिक अल्पसंख्य समुदायाचा चित्रपटांतील सहभाग वाढून, त्यांच्या जटिल प्रश्नांना वाचा फोडण्यास सुरुवात झाली ती 1990 च्या दशकात. रियाद वादीचा यांचा 1996 ला प्रदर्शित झालेला ‘बॉमगे’(Bomgay) हा बॉलीवूडचा पहिला समलैंगिक चित्रपट समजला जातो. यात 1990 च्या दशकातील भारतीय समलिंगी समुदायाचे चित्रण करून, त्यांच्या ओळखीबद्दलचे प्रश्न उपस्थित केले होते. परिणामी, त्यावेळी त्यावर बरेच वादही निर्माण झाले होते. बॉमगे हा सहा भागांमध्ये विभागलेला एक लघुपट आहे. प्रत्येक भाग आर. राज राव यांच्या कवितेवर आधारित आहे.

यानंतरचे बॉलीवूड चित्रपटांमध्ये झालेले प्रयत्नही उल्लेखनीय आहेत. अमोल पालेकर दिग्दर्शित ‘दायरा’(1996), आरिफ झकारिया यांनी पारलिंगी भूमिका साकारलेला ‘दरमियाँ’(1997), महेश भट्ट दिग्दर्शित ‘तमन्ना’(1997), राजकीय पदावर निवडून आलेली भारतातील पहिली पारलिंगी व्यक्ती शबनम मौसीच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित ‘शबनम मौसी’(2005), श्रेयस तळपदेची भूमिका असलेला ‘वेलकम टू सज्जनपूर’(2008), वास्तव जीवनातील कथांवर आधारित ‘ओमर’, ‘आफिया’, ‘अभिमन्यू’आणि ‘मेघा’या चार लघुपटांचा समावेश असलेला ओनिर यांचा ‘आय ऍम’(2010), तसेच 2016 मध्ये आलेले ‘कपूर अँड सन्स’व ‘अलिगड’यांसारख्या अनेक चित्रपटांनी या समुदायाचे प्रश्न गंभीरपणे दाखवण्यासाठी प्रयत्न केले.

लैंगिक अल्पसंख्याकांच्या समस्यांचे चित्रण करण्यात प्रादेशिक चित्रपटांचीही मोठी परंपरा राहिलेली आहे. यातील काही चित्रपट तर बॉलीवूडच्या कितीतरी आधीच चित्रित झाल्याचे आढळून येते. उदा., मल्ल्याळममध्ये बनवण्यात आलेला दिग्दर्शक मोहन यांचा ‘रांडू पेनकुट्टीकल’, ‘द जर्नी’(1978) हा चित्रपट केरळमधील स्त्री समलैंगिक संबंध सामान्यीकृत करण्याचा प्रयत्न करणारा सर्वात जुना चित्रपट ठरतो. तेलुगू भाषेतील भानुशंकर चौधरी दिग्दर्शित ‘अर्धनारी’(2016), कन्नडमधील बी.एस. लिंगदेवरु दिग्दर्शित ‘नानू अवनल्ला अवलू’(2015), विजय सेतुपतिचा जोरदार अभिनय असलेला तामीळमधील ‘सुपर डिलक्स’(2019), मल्ल्याळममधील’निजान मेरीकुट्टी’(2018), तर मराठीतील शंतनू रोडेंचा ‘जयजयकार’(2014), सुहास भोसलेंचा ‘कोती’(2016), पारो नाईक यांच्या कादंबरीवर आधारित रमेश मोरे दिग्दर्शित ‘आम्ही का तीसरे’(2012), उपेंद्र लिमयेंनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर गाजवलेला, उपेक्षितांच्या शोषणाचा पर्दाफाश करणारा ‘जोगवा’(2009), रवी जाधव यांचा ‘नटरंग’(2010), तर बंगाली भाषेतील सुब्रता सेन यांचे ‘निल निरजाने’(2003) व ‘कोयेक्ती मेयेर गोलपो’(2012), कौशिक गांगुली यांचा ‘अरेकती प्रेमर गोलपो’(2010), ऋतुपर्णो घोष यांचा ‘चित्रांगदा’(2012), अग्निदेव चॅटर्जी यांचा ‘तीन कन्या’(2012), रातुल गांगुली यांचा ‘10 जुलै’(2014), असे कित्येक चित्रपट लैंगिक अल्पसंख्याकांचे प्रश्न दाखवण्यात अग्रेसर असल्याची उदाहरणे देता येतील. काही तज्ज्ञांच्या मतांनुसार तर लैंगिक अल्पसंख्य समुदायातील पात्रांची दुर्दशा आणि त्यांचे परस्परसंबंध स्पष्टपणे मांडण्यात प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत हिंदी चित्रपटच अयशस्वी ठरले आहेत.  

2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात भारतीय संविधानातील कलम 377 रद्द करून ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’ असं म्हटलं अणि समलैंगिक संबंधांना नैसर्गिक ठरवत त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळवून दिला. तेव्हापासून समाजातही या समुदायाबद्दलची स्वीकृती वाढत जाऊन एक सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. याचेच पडसाद चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही दिसून येत आहेत आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांत समलैंगिकतेवर भाष्य करणार्‍या मुख्य प्रवाही चित्रपटांची संख्या वाढताना दिसत आहे.

यात प्रामुख्याने जरा हटके चित्रपटांत काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुष्मान खुराना यांच्या चित्रपटांचा जरूर उल्लेख करावा लागेल. पराग छापेकर यांच्या म्हणण्यानुसार तर आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांनी अभिनय केलेला ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’(2020) हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. त्यांच्या मते, व्यावसायिक चित्रपट श्रेणीत पुरुष समलैंगिक प्रेमावर भाष्य करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. न्यायालयाने समलैंगिक संबंधांवर कायदा निश्चित केल्यानंतरही भारतीय समाजात असे संबंध स्वीकारले जाणं किती कठीण आहे, हेच या चित्रपटातून चित्रित केलं गेलं आहे.

‘चंडीगढ़ करें आशिकी’(2021) मध्येही अनेक गंभीर मुद्दे वेगवेगळ्या प्रसंगी हलक्याफुलक्या कॉमेडीसह मांडण्यात आलेले आहेत. अनेक संवेदनशील मुद्द्यांवरील चर्चा तितक्याच गांभीर्याने आणि परिपक्वतेने दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. पारलिंगी व्यक्तींच्या प्रश्नांबद्दलचे आपले अज्ञान असो, त्यांच्याशी संबंधित अपमानाची चर्चा असो किंवा आपला समाज ‘सर्वसमावेशक’असण्याच्या मुद्द्यावरून वाढत चाललेला विवाद असो, अशा अनेक पैलूंना हाताळण्यात दिग्दर्शक अभ‍िषेक कपूर बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात. 

असाच आणखी एक प्रयत्न आताच्या ‘ताली: बजाऊंगी नही, बजवाउंगी’ (2023) या रवी जाधव दिग्दर्शित हिंदी भाषेतील चरित्रात्मक टीव्ही मालिकेद्वारे केला आहे. यात सुष्मिता सेन यांनी पारलिंगी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांची मुख्य भूमिका साकारून, त्यांच्या जीवनसंघर्षातील महत्त्वाचे क्षण दाखवले आहेत.


हेही वाचा : ‘जेंडर आयडेंटिटी'पेक्षा काम महत्त्वाचे : तृतीयपंथी अंजली पाटील - हिनाकौसर खान


नवनिर्मितीतील आव्हाने:

नाविन्याचा ध्यास घेतलेले काही निर्माते व दिग्दर्शक धाडसाने पारलिंगी व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून काहीतरी नवनिर्माण करू पाहताहेत. पण त्यांना सेन्सॉरशिपचे नियम, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी, कलात्मक अभिव्यक्ती, जबाबदार प्रतिनिधित्व आणि व्यावसायिक बाजू यांच्यातील असमतोलाच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. यासोबतच, काही वेळा त्यांना प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. उदा., भारतीय-कॅनेडियन फिल्मनिर्मात्या दीपा मेहता यांचा दोन स्त्रियांच्या प्रेमकथेवर आधारलेला ‘फायर’(1998) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याला ‘संस्कृती संरक्षणा’च्या नावाखाली बजरंग दलासारख्या धार्मिक संघटनांनी कडाडून विरोध दर्शवत जाळपोळसुद्धा केली होती. तरीही, इतर सर्व आव्हानांसोबत प्रतिगामी विचारांचा सामना करत आपले चित्रपट सर्वसमावेशकतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत.

आशादायी चित्र:

भारतातील स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी अभ्यास केला तर भारतीय संस्कृतीत समलैंगिकतेविषयी असलेले खुलेपणाचे दाखले जागोजागी मिळतील. गुप्तकाळातील वात्सायनलिखित ‘कामसूत्रा’त पुरुषा-पुरुषांमधील शारीरिक संबंधांचे सविस्तर वर्णन असो, खजुराहो मंदिरावरील कलाकृतींतील खुलेपणा असो, बंगालमधील 14 व्या शतकातील दोन विधवा महिलांच्या लैंगिक संबंधांविषयीच्या लोककथा असो, मध्ययुगीन भारतातील भक्ती परंपरेतील संतांचे श्रीकृष्ण किंवा शंकराला भजताना स्वत:ला स्त्रीरूप देणे असो किंवा 18 व्या शतकात ‘अवध’च्या दरबारात नवाबांनी विशिष्ट पवित्र दिवशी स्त्रीवस्त्रे परिधान करणे असो... हे सर्व हेच दर्शवते की, लिंगविविधता हे भारतीय संस्कृतीचं एक अविभाज्य अंग राहिलेलं आहे.

पुष्पेश पंत यांनी त्यांच्या ‘बीबीसी मराठी’वरील लेखात म्हटलं आहे की, ‘ख्रिश्चन मिशनरी आणि कट्टरपंथी मुसलमान मौलवी यांचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी हिंदूधर्मीय त्यांच्या कामजीवनाबद्दल बोलताना अवघडून जात नसत’. पण, कालांतराने समलैंगिकतेविषयी असलेले समज फारच संकुचित आणि प्रतिगामी होत गेल्याचं दिसतं. विश्व हिंदू परिषदेने तर समलैंगिकतेला एक ‘आयातित रोग’(Imported disease) म्हटलं, तर सुब्रमण्यम स्वामींनी समलैंगिकांच्या अधिकारांसाठी भांडणे हा एक ‘अमेरिकन गेम’आहे असे म्हणण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा या पार्श्वभूमीवर, समलैंगिकतेविषयी तयार झालेल्या गैरसमजुतींना दूर करण्यासाठी नवीन चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ही एक जमेची बाजू आहे.

आपल्याला इथे ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की, अशा बदलत्या चित्रणांचा प्रभाव पडद्यापुरताच मर्यादित न राहता खऱ्या जीवनातही पसरतो. असे चित्रपट भारतीय समाजातील लिंगभाव धारणांच्या बदलत्या प्रवाहात महत्त्वाचं योगदान देत असून, अंतर्भूत पूर्वग्रहांना आव्हान देऊन, अधिक समावेशक वृत्ती वाढवताना दिसत आहेत. लैंगिक अल्पसंख्याकांचं मानवपण अधोरेखित करणार्‍या, सहानुभूती आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देणाऱ्या कथाही प्रेक्षकांसमोर येत आहेत. शिवाय, काही चित्रपटनिर्माते लैंगिक अल्पसंख्याक समुदायातील व्यक्ती अभिनेते म्हणून किंवा सल्लागार म्हणून नियुक्त करत आहेत. त्याद्वारे सत्यता आणि संवेदनशीलता सुनिश्चित करून, कथाकथन प्रक्रियेत या समुदायाचा सक्रियपणे सहभाग करून घेत आहेत.

समकालीन चित्रपट किंवा मालिका निर्मात्यांनी एक-आयामी पूर्वग्रहांपासून दूर जात अधिक सूक्ष्म आणि प्रामाणिक कथा शोधण्यास सुरुवात केली आहे. या बदलाचं श्रेय सामाजिक समस्यांबाबत वाढती जागरूकता, LGBTIQA+ हक्क गटांद्वारे चालवलेल्या चळवळी आणि आधुनिक भारतातील विविध विषयांची वास्तविकता चित्रित करण्याची इच्छा यांना दिलं जाऊ शकतं. असे चित्रपट निर्माते लैंगिक अल्पसंख्याकांची आव्हाने आणि दैनंदिन जीवन यावर प्रकाश टाकून त्यांच्या अनुभवांची जटिलता चित्रित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहेत.

अद्याप पूर्ण समानता आलेली नसली तरी, अलीकडील चित्रपटांत लैंगिक अल्पसंख्याक पात्रांना अधिक सहानुभूती, आदर आणि संवेदनशीलतेने चित्रित केलं गेलं आहे. लिंग-ओळखीपलीकडे जात त्यांचं माणूसपण मान्य केलं आहे. हा बदल आसपासच्या लैंगिक विविधतेबाबतच्या आणि सर्वसमावेशकतेबाबतच्या व्यापक सामाजिक संभाषणांचंदेखील फलित म्हणावं लागेल.

एकंदरीत, भारतीय चित्रपटातील लैंगिक अल्पसंख्याक समुदायाच्या प्रतिनिधित्वाची वाटचाल लिंगविविधतेबाबतच्या दृष्टिकोनातील व्यापक बदल दर्शवते. चित्रपट निर्माते स्वतःहून आखून घेतलेल्या किंवा समाजाने लादलेल्या सीमारेषा ओलांडून, अस्सल चित्रण सादर करत असल्याने चित्रपटांचं माध्यम शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी उत्प्रेरक म्हणून उदयाला येत आहे. आणि लैंगिक अल्पसंख्याकांना समाजमान्यता मिळवून देण्यातही मोठी भूमिका बजावत आहे, हे चित्र खूप आशादायी वाटतं!

- विशाल चौधरी
chaudharivishal597@gmail.com 
(लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक असून स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, एमआयटी - वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे सहयोगी संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: ट्रान्सजेंडर  चित्रपट प्रतिनिधित्व  सिनेमा माध्यम Transgender Cinema Films Bollywood Homosexuality Load More Tags

Comments: Show All Comments

Koushalya rahul Kondhalkar

सखोल व चिकित्सक मांडणी करून या विषयाला नावीन्यपूर्ण रीतीने हाताळले, तसेच त्याला दिलेले इतिहासाचे दाखले...खूपच अप्रतिम लेख!!

Monali Meshram

विषयाचा खोल अभ्यास आणि उत्तम अशी विषयाची मांडणी

Dayanand waghmode

Apratim badalnari vichardhra suyogya drushtikonatun mandali

Baliram Manohar Khatgawe

Khup chan vishal sir....

maxwel lopes

Very nice article

Shrikrushna Bramhankar

अतिशय मुद्देसूर मांडणी आणि विश्लेषनात्मक लेख

Add Comment