युद्धकालीन, ब्रिटिश संदेशपट

युद्धपटांवरील लेखमाला : 11 (भाग 3/4)

'डायरी फॉर द टिमोथी' सिनेमातील एक दृश्य

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत जगभरातील काही निवडक युद्धपटांवरील मालिका कर्तव्य साधना वरून प्रसिद्ध करण्यात आली. विविध क्षेत्रांतील सात मान्यवरांनी एकूण दहा लेख या मालिकेसाठी लिहिले आहेत. त्या मालिकेतील हा समारोपाचा लेख. युद्धपटांच्या इतिहासात मनुष्यहानी, विस्थापन, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान इत्यादी युद्धाचे भीषण परिणाम दर्शवणारे चित्रपट जसे महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे विशिष्ट विचारप्रवाहाच्या प्रसारार्थ निर्माण केल्या गेलेल्या चित्रपटांचीही यादी मोठी आहे. सोव्हिएत, नाझी, ब्रिटिश व अमेरिकन सिनेमाविश्वातील अशा काही उल्लेखनीय प्रचार/संदेशपटांचा आढावा घेणारा, जवळपास 12 हजार शब्दांचा हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करत आहोत. 

दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि प्रचाराचा व प्रचारपटांचा एक युद्धातील हत्यार म्हणून उपयोग केला गेला. दोस्तांमध्ये ब्रिटन आघाडीवर होतं. सिनेमा, न्यूज रिल्स, रेडिओ यांचा सढळ हाताने उपयोग झाला. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे बनवलेल्या लोकांना शत्रूचा तिटकारा निर्माण व्हावा, दोस्तराष्ट्रांना बळ मिळावं इथपासून ते आपली साधनं, धातू, वीज वगैरे कशी वापरावी हे सांगणारी न्यूज रिल्स बाहेर पडत होती. विन्स्टन चर्चिलची रेडिओवरील, इतिहासात गाजलेली भाषणं हा तर युद्धाचाच एक भाग होऊन बसली होती. त्यांनी असंख्य लोकांना प्रभावित केलं.

डंकर्कमधे मार खात असतानादेखील चर्चिल प्रोत्साहन देत होता. लोकांना सांगत होता. आपले सैनिक नक्की घरी येणार. डंकर्कवर अलीकडच्या काळात चित्रपटदेखील आला. त्यातदेखील डंकर्कचं हे यशस्वी ऑपरेशन दाखवलं आहे. गाजलेल्या बहुतांश लढायांवर आणि लष्करी व्यक्तिरेखांवर पुढे अनेक चित्रपट आले. अनेक चित्रपटांना लष्करी पार्श्वभूमी होती. पण ‘कॅसाब्लॅन्का’सारखे मोजके अपवाद वगळता ते अभिजात चित्रपटांची उंची गाठू शकले नाहीत. त्यांच्या कल्ट फिल्मज् झाल्या नाहीत. युद्धपटांना मागे म्हटल्याप्रमाणे एकच संदेश द्यायचा असतो. ‘आम्ही श्रेष्ठ आणि ते दुष्ट.’ आपलं युद्ध कसं न्याय्य आहे हेदेखील सतत सांगावं लागतं. आणि त्यासाठी चित्रपटाची मदत घ्यावी लागते. पुढे अमेरिकेने व्हिएतनाम युद्ध नक्की कशाला लादलं, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला तेव्हा त्याची भलावण करण्यासाठी अमेरिकन नेव्हीने ‘टॉपगन’सारखा नेव्ही पायलटची (टॉम क्रूझ) व्यक्तिरेखा असलेला चित्रपट काढला. आजही अगदी हॉलिवुडपटदेखील अमेरिकेला जगाचा तारणहार म्हणून रंगवतच असतात.

ब्रिटिश चित्रपटांची स्वतःची अशी एक खास शैली होती. चकचकीत संवाद असलेले प्रसंग, (लोकांना कळेल असं) ब्रिटिश इंग्रजी, स्त्रियांना खुर्ची ओढून देणारी, हॅट खाली करून अभिवादन करणारी जंटलमन माणसं, दूरदृश्यात वातावरण प्रस्थापित करून, समीपदृश्यं, क्लोजअप यांची गुंफण करून जिवंत केलेले प्रसंग, (कंटीन्युटी एडिटिंग), गोष्ट पुढे नेण्यासाठी दृश्यांपेक्षा संवादावर भर- असा ब्रिटिश चित्रपटांचा घाट त्यांच्या प्रचारपटात दिसतो. ब्रिटिश यंत्रणेने असे अनेक प्रचारपट निर्माण केले. काही दिग्गज दिग्दर्शकदेखील यासाठी पुढे आले होते. डेव्हिड लीन, (इन विच वी सर्व्ह), अल्फ्रेड हिचकॉक (बॉन व्होयाज), हम्फ्रे जेनिन्स (त्रयी : लिसन टू ब्रिटन, लंडन कॅन टेक इट, डायरी फॉर द टिमोथी) हे सर्व दिग्दर्शक स्वतंत्र नावाजलेले दिग्दर्शक होते. यांना सरकारी अर्थसाहाय्य असलं तरी त्यांची आपापली स्वतंत्र अशी शैली होती.

ख्रिसमस अंडर फायर (चार्ल्स हेस, वॅट), ट्वेन्टीवन माइल्स, विनिंग युवर विंग्स (जॉन ह्युस्टन, ओवने क्रम्प) डेझर्ट व्हिक्टरी असे अकादमी ॲवॉर्ड मिळालेले चित्रपटदेखील गाजले. सायलेंट व्हिलेजसारख्या चित्रपटातून नाझी अत्याचार जगासमोर आणले होते. (लिडीस येथील नृसंहार) अनेक चित्रपटांत माणुसकीची मूल्ये अधोरेखित केली होती. ‘टू ग्लोरी’ (कॅरोल रिड) सारख्या चित्रपटातून युरोपचं शेवटचं आक्रमण आणि विजय दाखवला होता. या चित्रपटालादेखील अकादमी अ‍ॅवॉर्ड मिळालं. ब्रिटिश दिग्दर्शक विविध दृष्टिकोनांतून युद्धाकडे बघत होते. हिचकॉक हॉलिवुडला गेला असला तरी अमेरिकन सिटिझन झाला नव्हता. त्याला ब्रिटनने चित्रपट बनवण्यासाठी मायदेशी पाचारण केले. आर्थिक साहाय्य दिले. त्याने केलेल्या फिल्म्स चक्क युद्धाचा फोलपणा सांगणाऱ्या फिल्म्स होत्या. युद्धकाळात त्या दाखवल्या गेल्या नाहीत. पुढे त्या सापडल्या तेव्हा हिचकॉकप्रेमींना खजिना सापडल्यासारखं झालं.

बॉन व्होयाज’मध्ये हिचकॉकची बहरात असलेली सर्व वैशिष्ट्ये दिसतात. सस्पेंन्सची हाताळणी, छायाभेदाचा उपयोग, फ्लॅशबॅकचा वापर. सांगायची गोष्ट म्हणजे या मोजक्या दिग्दर्शकांनी आपली शैली, आपली कल्पकता, स्वायतत्ता सोडली नाही. या कालखंडात सातत्याने दर्जेदार संदेशपट बनवत असलेला एक महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणजे हम्फ्रे जेनिंग्ज. ‘लंडन कॅन टेक इट’, ‘हार्ट ऑफ ब्रिटन’, ‘लिसन टू ब्रिटन’ आणि ‘अ डायरी फॉर टिमोथी’ हे त्याचे महत्त्वाचे संदेशपट. प्रत्येक चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण होता. लंडन कॅन टेक इट (1940) हा चित्रपट अमेरिकनांना युद्धात प्रवेश करण्यासाठी मनधरणी करण्यासाठी केला होता. ‘हार्ट ऑफ ब्रिटन’मध्ये ब्रिटिश संस्कृती, ब्रिटिश मूल्ये उठून दिसतात. भव्य चर्चेस, देखणा, डोळ्यांना सुखावणारा ग्रामीण भाग, फॅक्टरीत काम करणारे स्त्री-पुरुष कामगार आणि बॉम्बिंग होऊन पडझड झालेल्या इमारती अशी दृश्यं दिसतात. ब्रिटिश लोकांची दुर्दम्य इच्छाशक्ती, व्यक्तिमत्त्वाची ताकद पुन्हा पुन्हा ठसवली जाते. लोक कोरसमध्ये गात आहेत आणि प्रमुख पात्र म्हणते, "जे लोक याही प्रसंगात गाऊ शकतात ते हरूच शकत नाहीत." दुसऱ्या प्रसंगात "नाझींना सरतेशेवटी पक्कं कळेल की, कुणीही अभद्र माणूस ब्रिटनच्या हृदयाला धक्का लावू शकत नाही." ‘लिसन टू ब्रिटन’मध्ये संवादधार्जिण्या ब्रिटिश शैलीला पूर्ण फाटा दिलाय. या चित्रपटात संवादच नाहीत. जे काही आहेत ते दिग्दर्शकाच्या इच्छेविरुद्ध नंतर टाकलेत. चित्रपटाच्या आधी तर एक भाषणच्या भाषण टाकलंय. आयझेस्टाईन किंवा लेनी रिफेनस्टालप्रमाणे हम्फ्रे जेनिंग्ज थेट दृश्ययोजना करत नसे. त्याच्या संदेशपटांचा पोत कथनात्मक आणि काव्यात्मक असे. त्याला गोष्टीची जोड असे. डॉक्युमेंटरी आणि फिचर फिल्म यांचा सुवर्णमध्य तो साधत असे. ‘फायर्स वेअर स्टार्टेड’ आणि ‘डायरी फॉर टिमोथी’ हे संदेशपट उत्तम फिचर फिल्म्सदेखील आहेत. ‘डायरी फॉर टिमोथी’ चित्रपटाचा थोडा तपशीलवार विचार करू. 

आपल्या इतर चित्रपटांप्रमाणे जेनिंग्ज प्रत्यक्ष युद्धभूमीवर नाही तर सामान्य जनजीवनावर आपले लक्ष केंद्रित करतो. युद्धकाळात लोक कसे जगत होते यावर त्याचा भर आहे त्यामुळे त्याच्या चित्रपटांना एक मानवी चेहरा दिसतो. जेनिंग्जचे वैशिष्ट्य म्हणजे तो कुठेही नाझींना शिव्या न देता त्यांना अनुल्लेखाने मारतो. युद्धकाळात देखील लोक कसे दर्जेदार जीवन जगताहेत, संगीत ऐकताहेत, नृत्य करताहेत, निसर्गात रममाण झालेत आणि तरीही प्रत्येक जण आपले कर्तव्य करत आहे हे तो दाखवतो. ही टिमोथी नावाच्या तान्ह्या बाळाला त्याच्या वडिलांनी सांगितलेली डायरी आहे. यात साधारण सप्टेंबर 1944 ते मार्च 1945 या कालखंडातील घटना एका लहानग्यासाठी डायरीत नमूद करून ठेवल्या जात आहेत. 


हेही वाचा : स्वतंत्र भारत आणि हिंदी चित्रपट - मेघनाद कुळकर्णी


ई. एम. फॉस्टरचं अप्रतिम लिखाण, मायकेल रेडग्रिव्हचं उमदं, हृदयस्पर्शी निवेदन आणि जेनिंग्जचं दिग्दर्शन, चित्रपटाला एका वरच्या अभिजात पातळीवर नेऊन ठेवतं. बीबीसीचा वार्ताहर रेडिओवर जर्मनीची पिछेहाट सांगत आहे. अचानक पार्श्वभूमीवर तान्ह्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. कॉमेन्ट्री चालूच आहे. कॅमेरा आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्यातील एका पाळण्यात आपल्याला तान्हा टिमोथी दिसतो. शांतपणे झोपलेला.

शेजारी त्याची आई झोपलेली आहे. आता त्याच्या वडिलांचं टिमोथीला उद्देशून केलेलं निवेदन सुरू होतं. “3 सप्टेंबर 1944 या दिवशी तुझा जन्म झाला. तुझा जन्म इथे झाला. तू नशीबवान आहेस. पोलंड, युद्धकालीन हॉलंड लिव्हरपूल किंवा ग्लासगोच्या झोपडपट्टीत तू जन्माला आला असतास तर गोष्टी वेगळ्या असत्या. पण तरीही तुला धोका आहे. जगातलं सर्वांत भयंकर युद्ध सुरू आहे." लगेचच सोल्जर्स मार्च करत असतानाची दृश्यं दिसू लागतात. “आम्ही लढत आहोत. आम्ही तुझ्यासाठी लढत आहोत. तुझ्यासाठी आणि इतर मुलांसाठी." जेनिंग्सच्या चित्रपटाचा वेगळेपणा आहे तो हाच. तो युद्धाबद्दल तर बोलतो आहेच, पण युद्धानंतरच्या जगाबद्दलदेखील विचार करत आहे. ‘डायरी फॉर टिमोथी’ भविष्याबद्दलदेखील बोलत आहे. नंतर जेनिंग्स आपल्याला ग्रामीण भागात घेऊन जातो. तिथे आपल्याला एक शेतकरी भेटतो, वरून उडणारे विमान दिसते, युद्ध चालू असतानादेखील प्रत्येक सामान्य माणूस धैर्याने आपले जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करत आहे हे जेनिंग्स सतत दाखवून देतो. लंडनमधील इंजीन ड्रायव्हर त्याचे कर्तव्य पार पाडत आहे. प्रत्येक जणच आपापल्या परीने हे युद्ध लढत आहे. शहरी आणि ग्रामीण दृश्यांचा सुरेख मिलाप जेनिंग्ज घडवून आणतो. 

हॉस्पिटलमध्ये जखमी नागरिक, सैनिक, खलाशी दिसतात. शेतकरी, इंजीन ड्रायव्हर, फायटर पायलट यांचा नावानिशी उल्लेख येतो आणि त्यांना एक मानवी चेहरा प्राप्त होतो. “हे सर्व तुझ्यासाठी लढत आहेत टिम, तुझ्या आयुष्याची सुरुवात आणि युद्धाचा अंत." समुद्रकिनारी पेरलेले सुरुंग काढून टाकले जातील आणि तुला समुद्रकिनाऱ्यावरून धावता येईल. तू आता घरी आला आहेस, तुझ्या कुटुंबात, पण कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती गैरहजर आहे - ‘वडील’, लाखो लोकांप्रमाणे ते युद्धभूमीवर लढत आहेत. टिमोथीचं लहानपण, शहरी-ग्रामीण जनजीवन, युद्धभूमीवरील बातम्यांचं निवेदन, अशा रचनेतून चित्रपट साकार होत राहतो. सायरन वाजतात. बॉम्बिंग होतं पण जनजीवन व्यवस्थित चालू आहे. “लोकं क्लबमध्ये मायरा हेझनी पियानोवर, वाजवलेलं मोझार्टचं संगीत ऐकत आहेत, थिएटरमध्ये गिलीगुडनी सादर केलेलं हॅम्लेट बघत आहेत. भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोक दर्जेदार जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्धाच्या बातम्या रेडिओवर येत आहेत. मायरा हेस जर्मन, मोझार्ट जर्मन पण जेनिंग्स कुठेही जर्मनद्वेष न धरता त्यांना योग्य तो मान देतो. एका हृदयस्पर्शी प्रसंगात जमलेले स्त्रीपुरुष दारूचे ग्लास उंचावून गैरहजर मित्रांना टोस्ट करतात. टिमोथीचं नामकरण होताना दिसते. हॉस्पिटलमध्ये जायबंदी सोल्जर्स दिसत आहेत. नागरी जीवनातदेखील ते दिसत आहेत. एक सैनिक म्हणतो की मला घरी जायचं आहे, बायको वाट पाहत आहे. डॉक्टर म्हणतो की, तुम्हांला घरी नाही, हॉस्पिटलमध्ये जायचंय. आता नोव्हेंबर उजाडलाय. खतरा अजूनही आहे. “मृत्यू टेलिग्रामद्वारे लोकांच्या घरी येतोय." (अशी अनेक हृदयस्पर्शी वाक्ये ई. एम. फॉस्टर यांनी जागोजागी लिहून ठेवलीत. अप्रतिम लेखन.) जॉन गिलीगुडचा हॅम्लेटचा प्रसंग लोकांच्या प्रसंगांबरोबर उत्तमरीत्या इंटरकट केलेला आहे. दिवस सरताहेत. युद्ध अंतिम टप्प्यावर आहे. डिसेंबर उजाडलाय. होमगार्डची परेड दिसते.

टिमचा पहिला ख्रिसमस आला आहे. लोकांमध्ये ख्रिसमसचा उत्साह आहे. लोक ख्रिसमसचं शॉपिंग करत आहेत. सैनिकही दिसत आहेत. दुकानातील खिडकीतून दिसणाऱ्या स्त्रियांच्या अर्धपुतळ्यांचा कलात्मक वापर केलेला आहे. दृश्यांवर संगीत सुरू होतं आणि ते आपल्याला क्लबमधे घेऊन जातं. बॉम्बचे आवाज येतात. 16 डिसेंबरला न्यूज ब्रॉडकास्ट, “नाझींनी अमेरिकन्सच्या विरुद्ध मोठा प्रतिहल्ला आयोजित केला आहे." ख्रिसमसच्या दृश्यात वरील निवेदन, अप्रतिम निवेदनाचा नमुना. विविध दृश्यांत लोक गैरहजर मित्रांना टोस्ट करताना दिसतात आणि टिमोथीच्या घरी लोक टिमोथीला टोस्ट करतात. लहान मुलं खेळत आहेत. नृत्य करत आहेत. लोकांत मिसळत आहेत. अचानक कॅमेरा कुबड्या घेतलेल्या पायांवर स्थिर होतो. हा जखमी पायलटदेखील नंतर नृत्यात सामील झालेला दिसतो. 1944 असा संपतो आणि टिमोथी चार महिन्यांचा होतो. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. “1945 मध्ये काय घडणार आहे? जेव्हा आम्ही इथे नसू आणि तू असशील. आम्हीदेखील तुझ्यासारखेच अंधारात आहोत." जानेवारीत स्टॅलिन त्याचा मोठा हल्ला करतो. त्याचा रिपोर्ट रेडिओवर ऐकू येतो. वॉर्सा पुन्हा ताब्यात घेतलं जातं. रशियन आणि पोलिश राष्ट्रगीते रेडिओवर वाजवली जातात. रशियन जर्मनीपासून 25 किलोमीटरपर्यंत घुसलेत, हे ऐकू येतं. इथे ब्रिटनमध्ये जनजीवन सुरूच आहे. व्यापाऱ्यांचा वर्ग दिसतो. पार्श्वभूमीवर रेडिओवरील निवेदन सुरूच आहे. अमेरिका बर्लिन बेचिराख करत आहे. दुसरीकडे टिमोथीची दृश्यं दिसतात. त्याला लाडाने खेळवत आहेत. डायरी टिमोथीला सांगतेय. “आयुष्य आता जास्त भीतिदायक होणार आहे. कारण आता आपल्याला निवडस्वातंत्र्य आहे. टीका करायचा हक्क आहे. आपण आता मुक्त आहोत. असं जीवन तुझ्यापुढे आहे." (ई. एम. फॉस्टर यांच्या अशा लिखाणाला उच्च प्रतीचं साहित्यमूल्यदेखील आहे.)

आता वडिलांचं दृश्य येतं. ‘‘त्या संध्याकाळी मी युद्धाच्या भूतकाळाचा विचार करत होतो. हानी, बेकारी, मोडलेली विस्कळीत घरं, वाताहत झालेली कुटुंबं. आणि मी विचार केला हे सर्व पुन्हा घडायला हवं का? आता आपल्याकडे स्वतःच्या रुग्णवाहिका, स्वतःची हॉस्पिटल्स, स्वतःच्या मोटारी आहेत. जर या काळात हे आपण साधू शकतो तर भविष्यात कोणीही आपल्याला प्रगतीपासून अडवू शकत नाही.’’ पायलट पीटर दिसतो. पीटर पुन्हा आपल्या विमानाकडे- आपल्या कर्तव्याकडे वळतो. ब्रिटिश आणि अमेरिकन्स जोरदार हल्ले करताहेत. निवेदनाच्या पार्श्वभूमीवर लहान टिमोथीची दृश्यं दिसत आहेत. बॉम्ब पडताहेत, आगी लागल्यात, डायरी म्हणतेय, "टिमोथी तू सुरक्षित आहेस, आतापर्यंत आपण बोललो, ते एके दिवशी तू उठून बसशील, आणि तुला ते कळेल. युद्धानंतर भविष्यकाळ कसा असेल? युद्धानंतरची बेकारी, पुन्हा एक युद्ध, अधिक बेकारी, असं काही वाढून ठेवलयं का? तुला सत्ता आणि पैशाची हाव भुलवणार आहे का? का तू एक नवीन जग उभारणार आहेस? तू आणि इतर बाळं?" नंतर अनेक वेळ कॅमेरा टिमोथीवर रेंगाळत राहतो. आता साऱ्या ब्रिटनचं लक्ष, साऱ्या जगाचं लक्ष त्याच्यावर आहे. युद्ध जिंकणार हे तर निश्चित आहे पण जेनिंग्सच्या चित्रपटातून युद्धज्वर, विजयाचा उन्माद कुठेही दिसत नाही. उलट युद्धानंतरच्या भविष्याची चिंता, सिनीसिझम, अनिश्चितता त्यातून जाणवत राहते आणि  चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो.

(क्रमशः)

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


डायरी फॉर द टिमोथी या सिनेमाची लिंक :

 

Tags: प्रचारपट चित्रपट दिग्दर्शन युद्धपट युद्ध पहिले महायुद्ध युद्धकालीन चित्रपट Load More Tags

Add Comment