युद्धकालीन, अमेरिकन संदेशपट

युद्धपटांवरील लेखमाला : 11 (भाग 4/4)

'ग्रेट डिक्टेटर'मध्ये चार्ली चॅप्लिन

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत जगभरातील काही निवडक युद्धपटांवरील मालिका कर्तव्य साधना वरून प्रसिद्ध करण्यात आली. विविध क्षेत्रांतील सात मान्यवरांनी एकूण दहा लेख या मालिकेसाठी लिहिले आहेत. त्या मालिकेतील हा समारोपाचा लेख. युद्धपटांच्या इतिहासात मनुष्यहानी, विस्थापन, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान इत्यादी युद्धाचे भीषण परिणाम दर्शवणारे चित्रपट जसे महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे विशिष्ट विचारप्रवाहाच्या प्रसारार्थ निर्माण केल्या गेलेल्या चित्रपटांचीही यादी मोठी आहे. सोव्हिएतनाझी, ब्रिटिश व अमेरिकन सिनेमाविश्वातील अशा काही उल्लेखनीय प्रचार/संदेशपटांचा आढावा घेणारा, जवळपास 12 हजार शब्दांचा हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करत आहोत. 

अमेरिका युद्धात नंतर उतरली. पण युद्धाआधीपासूनच त्यांचे प्रचारपट / संदेशपट जगात प्रसारित होत होते. वॉर इन्फोर्मेशन ऑफिस तर संदेशपट निमंत्रित करत होतंच पण त्याचबरोबर ब्यूरो ऑफ मोशन पिक्चर्स थेट हॉलिवुडलाच संदेशपटांसाठी सामावून घेत होते. फ्रँक काप्रा, चार्ली चॅप्लिन, अगदी वॉल्ट डिस्ने, मायकेल कर्टीझसारख्या नामांकित हॉलिवुड दिग्दर्शकांनी अविस्मरणीय संदेशपट केलेले आहेत. फ्रँक काप्राची ‘व्हाय वी फाईट’ सिरीज म्हणजे नाझी प्रचारपटांना चपराक होती. चॅप्लिनच्या ‘ग्रेट डिक्टेटर’मध्ये तर खुद्द हिटलरचंच विडंबन होतं. अमेरिकन संदेशपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्ण वेळ लांबीचे हॉलिवुडपट होते आणि चित्रपटांची कथनशैली, रचना त्यात वापरण्यात आली होती. त्यात गोष्ट होती, घटना होत्या, नावाजलेल्या हॉलिवुड नटनट्या होत्या. ग्रेट डिक्टेटरमध्ये खुद्द चार्ली चॅप्लिन, मायकेल कर्टीस दिग्दर्शित ‘कॅसाब्लॅन्का’मध्ये हम्फ्रे बोगार्ट, इनग्रीड बर्गमन अशी तगडी स्टारकास्ट घेऊन ते पूर्ण वेळेचे चित्रपट म्हणून सिनेमागृहात लागत. अमेरिकन सरकारचं ‘हॉलिवुड कनेक्शन’ पुढे कोल्ड वॉर, अफगाण, व्हिएतनाम प्रत्येकच युद्धकाळात चालूच राहिलं.

चित्रपट तंत्रज्ञानावर अमेरिकनांनी प्रभुत्व मिळवलं होतं. हॉलिवुडची आर्थिक उलाढाल, चित्रपटाची बजेट्सदेखील महाकाय होती. हॉलिवुडनं संदेशपट काढणं कुणा दिग्दर्शकावर किंवा निर्मात्यावर लादलं नव्हतं. अनेक निर्माते-दिग्दर्शक स्वतः प्रेरित होऊन पुढे येत होते. सरकार त्यांना आर्थिक साहाय्य करत होते.

जाहिरातपट ही तर अमेरिकन्सची जगाला दिलेली देणगी, हा संदेशपटाचा प्रकार, अमेरिका उत्तमरीत्या आणि प्रभावीपणे हाताळत होती. खरं तर पूर्ण वेळेचा फिचर फिल्ममध्ये मोडणारा संदेशपट हीदेखील अमेरिकेची देणगी. कसं ते बघायचं तर आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन 1915 पर्यंत जावं लागेल. मूकपटाच्या जमान्यात डी. डब्ल्यू. ग्रिफिथने सिनेमाचं तंत्र दिलं. आतापर्यंत कॅमेरा न हलवता चित्रीकरण केलं जायचं. ग्रिफिथने कॅमेरा हलवला आणि ‘शॉट डिव्हिजन’ची सुरुवात झाली. सातत्य असलेले संकलन, ‘कंटिन्युटी एडिटिंग’चा तर तो जनकच. त्याने प्रथमच चित्रपटाला परिभाषा दिली. चित्रपटात प्रथमच क्लोजअपची निर्मिती दिली, फेड आउट्स दिले, प्रथमच चित्रपट पाहताना लाइव्ह ऑर्केस्ट्राची साथ दिली. 1915 मध्ये त्याच्या पूर्ण वेळ लांबीचा 12 रिळांचा चित्रपट ‘बर्थ ऑफ अ नेशन’ आला आणि त्यानं इतिहास घडवला. तो पहिला बॉक्स ऑफिस हिट चित्रपट होता. एक लाख डॉलरमध्ये बनवलेल्या चित्रपटाने 100 दक्षलक्ष डॉलर्सचं कलेक्शन केलं. अब्राहम लिंकन यांनी गुलामीची प्रथा बंद केली त्या सुमारास झालेल्या नागरी युद्धावर, सिव्हिल वॉरवर हा चित्रपट आधारित आहे. यात निग्रोंना पाशवी, अमानुष आणि असंस्कृत दाखवलं आहे. गुलामी रद्द झाल्यावर काळे माजतात आणि हिंसा, अत्याचार करू लागतात असं दाखवलंय. याला उत्तर द्यायला गोरे वर्चस्ववादी कू कुक्क्स क्लॅन स्थापन करून निग्रोंना अद्दल घडवताना हिंसेला हिंसेने उत्तर देतात असं चित्रीकरण आहे. उघड पाठिंबा आहे. (मुळात चित्रपट थॉमस डिक्सन या केकेके सदस्याच्या clansman या कादंबरीवर आधारित आहे.) अब्राहम लिंकन यांची हत्या समर्थनीय वाटू लागते. आतापर्यंतच्या सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त चित्रपट समजला जातो. ‘व्हाइट हाउस’मध्ये दाखविलेला हा पहिला चित्रपट. उत्तर अमेरिकेतील प्रथा रद्द करण्याच्या बाजूनं असलेलं स्टोनमन कुटुंब आणि त्याच्या विरुद्ध असलेलं दक्षिण अमेरिकेतील कॅमेरॉन कुटुंब यांची समांतर आणि एकमेकांत मिसळणारी गोष्ट हा चित्रपट सांगतो.

पूर्ण तीन तासांच्या या चित्रपटात दोन भाग आहेत. अब्राहन लिंकन यांची हत्या झाल्यावर मध्यांतर होतं. त्यानंतर गोऱ्या वर्चस्वाच्या पुनर्जीवनाचा काळ येतो. निग्रो लोकांच्या अन्यायाचा, अमानुष वर्तनाचा, गोरे कसा प्रतिकार करतात हे ठळकपणे येतं. केकेकेची पुनर्स्थापना करणं आणि गोरे वर्चस्व प्रस्थापित करणं हा चित्रपटाचा उद्देश कुठेही लपून राहत नाही. ग्रिफिथ कुठेही तसं शब्दातून बोलत नाही. आपण एक खरी गोष्ट सांगतो आहोत असाच त्याचा आविर्भाव आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रेमकथेची गुंफण करणं हा प्रकारदेखील ग्रिफिथनं केलेला आहे. आईवडील, दोन मुलं आणि एक मुलगी असं उत्तर अमेरिकेतील स्टोनमन कुटुंब आहे. तर दक्षिणेकडील कॅमेरून कुटुंबात आईवडील, तीन मुलगे आणि दोन मुली अशी माणसं आहेत. फिल स्टोनमन एकदा आपल्या दक्षिणेतील मित्रांना आपल्या भावाबरोबर गेलेला असताना मार्गारेट कॅमेरॉनच्या प्रेमात पडतो. जुना दक्षिण अमेरिका प्रांत, त्यातील लागवडीची शेतं, प्लॅन्टेशन्स, त्यातील काम करणारे निग्रो मजूर अशी दृश्यं दिसतात. स्टोनमन बंधू कॅमेरॉनच्या प्लॅन्टेशनवर जातात तेव्हा हे सर्व दिसतं. दुसरीकडे बेन कॅमेरून एल्सी स्टोनमनच्या प्रेमात पडलाय. आता यादवी युद्ध सुरू होतं आणि दोन्ही कुटुंबांतील मुलं सैन्यात भरती होतात. लहान स्टोनमन आणि दोघं कॅमेरॉन युद्धात मारले जातात. असंख्य माणसे, घोडेस्वार, तोफा अशा महाकाय लवाजम्यातून ग्रिफिथने युद्धाचे प्रसंग चित्रित केले आहेत. युद्धपटाची एक अत्यंत वरची पट्टी, पायंडा ग्रिफिथने टाकून दिला आहे.

समांतर संकलनातून दोन्ही कुटुंबांतील घटनादेखील एकीकडे दिसत आहेत. कॅमेरून कुटुंबावर निग्रो सैनिकांचा हल्ला होतो. (कॉन्फेडरेटचे, गुलामी प्रथा रद्द करण्याच्या विरुद्ध असलेले) गोरे सोल्जर्स त्यांना वाचवतात. इथे युद्धभूमीवर बेन कॅमेरॉन पीटसबर्ग उठावाचं नेतृत्व केलं आहे. पण तो जखमी झाला आहे. त्याला युनियन्सच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये वॉशिंग्टनला आणलं जातं. डॉक्टर त्याला सांगतो की, त्याला फाशी देणार आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये एल्सी स्टोनमन नर्स म्हणून काम करत असते. दोन प्रेमींची भेट होते. लिंकनकडून ते दोघं क्षमापत्र आणतात. पण नंतर लिंकनची हत्या होते. नंतरच्या पुनरुत्थानाच्या काळात (Reconstruction) स्टोनमन आणि त्याचा अनुयायी लिंच राजकारणात सक्रिय झाले आहेत. इलेक्शनच्या काळात काळे मतपेट्यात मतदान पत्रिका घुसवताना दिसतात. साउथ कॅरोलिनामध्ये निवडून आलेले निग्रो उमेदवार बूट काढून टेबलावर पाय ठेवणे, ऑफिसमध्ये दारू-मांस खाणे असे ‘कमअस्सल’ प्रकार करताना दिसतात. निग्रो मठ्ठ, रानटी, असंस्कृत असतात हे अशा प्रकारच्या दृश्यातून वेळोवेळी ठसवलं जातं. पुढे तर आपला वॉर हिरो बेन कॅमेरून चक्क गोऱ्या वर्चस्ववादी कूकूक्ल्स पंथ स्थापन करतो. पुढे फ्लोरा कॅमेरून गुलामीतून मुक्त झालेल्या जस या निग्रोमुळे आत्महत्या करते तेव्हा क्लानची माणसं त्याला पकडून मारून टाकतात. या वेळेस क्लॅनचे पोशाख, चिन्हे, त्यांच्या रिचुअल्स ग्रिफिथने तपशीलवार दाखवल्या आहेत. चित्रपट आला त्या काळी कूकूक्स क्लॅन विसरला गेला होता. जवळजवळ संपलाच होता. चित्रपट आल्यावर तो पुन्हा एकत्र आला. चित्रपटात दाखवलेला पोशाख, चिन्हे, बुरखे, मास्क वापरू लागला. चित्रपटातील चिन्हे, प्रतीके, इतकी परिणामकारक ठरली.

स्टोनमनचा अनुयायी लिंच आता गव्हर्नर झाला आहे. तो क्लबच्यापाठी ससेमिरा लावतो. डॉ. कॅमेरूनला अटक होते. एल्सी लिंचकडे त्याच्या सुटकेची मागणी करायला जाते तेव्हा लिंच तिच्याशी लग्न करण्याची मागणी करतो. पुन्हा बेन आणि क्लॅन एल्सीच्या मदतीसाठी धावून येतो. इलेक्शनच्या दिवशी क्लॅनची माणसं बंदुका घेऊन निग्रो वस्तीबाहेर उभी राहतात. आणि क्लॅनचे लोक निग्रोंना मतदान करण्यापासून रोखतात. हे सर्व रास्त आणि न्याय्य आहे असं वाटण्यासारखा माहोल ग्रिफिथनं निर्माण केलाय. शेवटी दोन प्रेमी जोड्या एकत्र येतात. त्यांचं लग्न होतं. फिल स्टोनमनच मार्गारेट कॅमेरूनशी आणि एल्सी स्टोनमनचं बेन कॅमेरूनशी...

कूकूक्स क्लॅन प्रस्थापित करून (आर्यन) गोरे वर्चस्व प्रस्थापित करून काळ्या लोकांना काळ्या रंगात रंगवून झाल्यानंतर चित्रपट मानभावीपणे म्हणतो, “आपण अशा सुवर्णदिनी स्वप्ने पाहू या जेव्हा युद्ध आपल्यावर वर्चस्व गाजवत नसेल तर.... सर्वच शहरात बंधुभावाचं वातावरण असेल." चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काळ्या संघटनांनी त्यावर बंदी आणण्याची मागणी केली. पुढे ग्रिफिथलादेखील चित्रपटातील प्रक्षोभक दृश्यं काढावी लागली. पण चित्रपटाचा गोऱ्या वर्चस्वाचा संदेश इतका प्रभावशाली होता, की त्याने काळ्या-गोऱ्यांत उभी फूट पाडली. चित्रपट परिभाषा, संकलनाचं व्याकरण यात इतिहास घडवता घडवता या चित्रपटानं असा विपरीत सामाजिक इतिहासही घडवला.

आपण अमेरिकन संदेशपटाबद्दल बोलताना ग्रेट डिक्टेटर (चार्ली चॅप्लिन) आणि कॅसाब्लॅन्का (मायकेल कर्टीस) या चित्रपटांबद्दल बोललो नाही तर लेख अपूर्ण राहील. चॅप्लिनने हा चित्रपट केला तेव्हा अमेरिका अजून युद्धात उतरली नव्हती. या चित्रपटात चॅप्लिन पहिल्यांदा बोलला नाही, तर चित्रपटात आवाज आल्यानंतर देखील मूकपटच काढत होता. त्याच्या कॉमेडी स्लॅपस्टिक शैलीला ते जास्त योग्य होतं. पण या चित्रपटात चॅप्लिनला जगाला संदेश द्यायचा होता. जर्मन अमानुषतेच्या विरुद्ध मानवतेचा संदेश. चित्रपटात हिटलरची, त्याच्या हावभावांची, त्याच्या ज्यूद्वेषाची, त्याच्या विचारसरणीची यथेच्छ टिंगल आहे. पण चॅप्लिनने आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय की, ज्यू छळछावण्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणातलं वास्तव त्याला त्या वेळेस कळलं असतं तर कदाचित त्यानं हा चित्रपटदेखील केला नसता.

हिटलरसारखा हेन्केल नावाचा हुकूमशहा (चॅप्लिन) जर्मनसदृश अनाकलनीय भाषेत सभेत भाषण करताना चित्रपटाच्या सुरुवातीस दिसतो. निवेदक त्याचं भाषांतर करून ऐकवत आहे. चॅप्लिन जर्मनसदृश विचित्र भाषेत गुरकावतो, खोकतो, हिटलरच्या हावभावांची इतकी टिंगल चित्रपटाच्या इतिहासात कुणी केली नसेल. हिटलरच्या सभा, त्याचे शक्तिप्रदर्शन, त्याचा तांत्रिक प्रगतीचा हव्यास सर्वांचीच प्रचंड टिंगल चित्रपटात केली आहे. मुसोलिनीसदृश दुसरा हुकूमशहा तह करायला येतो. त्या वेळेस दोघेही खुर्चीवर एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात तो प्रसंग, हसून हसून पुरेवाट करून टाकतो. हेन्केलचा प्रचारप्रमुख गार्बेज (नावसुद्धा गोबेल्सचं विडंबन करणारं आहे) त्याला सांगतो की तू लवकरच जगज्जेता होणार आहेस. त्यानंतरच्या गाजलेल्या प्रसंगात चॅप्लिन पडद्यावर चढतो. पृथ्वीगोल नाचवत त्याच्याशी खेळतो, पृथ्वीगोल पायाने, कुल्ल्याने उडवतो, बोटावर फिरवतो, हा प्रसंग हिटलरच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचं कलात्मक विडंबन आहे. चॅप्लिनच्या अनेक गाजलेल्या प्रसंगांपैकी हा एक महत्त्वाचा प्रसंग. (पृथ्वीगोलाचा फुगा अखेरीस फुटतो.) दुसरीकडे त्या हुकूमशहासारखा दिसणारा न्हावी (पुन्हा चॅप्लिन) पहिल्या महायुद्धात जखमी होऊन आणि स्मृतिभ्रंश होऊन पुन्हा आपल्या जुन्या वसाहतीत (ही ज्यूंची वसाहत आहे) आपल्या केशकर्तनालयात आलाय. बदललेली परिस्थिती त्याच्या हळूहळू लक्षात येऊ लागते. नाझींचं राज्य आलंय.


हेही वाचा : शिंडलर्स लिस्ट : हादरवून सोडणारा चित्रपट - नीलांबरी जोशी


ज्यूद्वेष वाढलाय हे अनेक प्रसंगांतून दिसून येतं. गस्त घालणाऱ्या एस. एस.च्या लोकांशी अनेक वेळा चॅप्लिनशैलीत मुकाबला होतो. सैनिक त्याला रस्त्यावर फाशी देण्याच्या बेतात असताना त्याला कर्नल शुल्झ सोडवतो. शुल्झचे प्राण या न्हाव्याने सैनिक असताना वाचवलेले आहेत. पुढे हा कर्नल हुकूमशहाच्या मर्जीतून उतरतो आणि हॅनाच्या घरी येऊन लपतो. हॅना (पॉलेट गोदार्द) ही न्हाव्याची शेजारीण आणि प्रेयसी, अनेक प्रसंगात प्रसंगावधान दाखवून तिने चॅप्लिनला वाचवलय. पुढे हे कुटुंब दुसऱ्या देशात स्थलांतरित होतं. पोलिस न्हाव्याच्या आणि भूमिगत झालेल्या शुल्झच्या शोधात आहेत. त्यांना एका ठिकाणी हुकूमशहा हेन्केल साध्या वेषात बदकांची शिकार करताना सापडतो. त्याला ते न्हावी म्हणून ताब्यात घेतात आणि छावणीत टाकतात. इथे न्हावी आणि शुल्झ लष्करी नाझी गणवेश घालून सरहद्द पार करण्याच्या प्रयत्नात आहेत. लोक त्याला हुकूमशहा हेन्केल समजतात आणि मानाची वागणूक देतात. हुकूमशहानं बाजूचा देश ऑस्ट्रिया ताब्यात घेतलेला आहे. प्रचारप्रमुख गार्बेज त्या न्हाव्याला थेट व्यासपीठावरून भाषण करायला सांगतो. त्यानंतर चॅप्लिन जे भाषण करतो ते चित्रपट-इतिहासात अमर झालेलं भाषण आहे.

“क्षमा करा, मला जगज्जेता व्हायचं नाही. मला कुणाला जिंकायचं नाही. कुणावर राज्य करायचं नाही. शक्य झालं तर मला सर्वांची मदत करायची आहे. ज्यू, काळे लोक, गोरे, जेन्टाईल सर्वांचीच, मनुष्यप्राणी असाच असतो. आपल्याला एकमेकांची मदत करावीशी वाटते."... तो सुरुवात करतो... "या जगात सर्वांसाठी जागा आहे आणि आपली पृथ्वी सर्वांची काळजी घेऊ शकते. हावरटपणानं मनं कलुषित केलेली आहेत. आपण विचार जास्त करू लागलोत पण संवेदनाच हरवून बसलो आहोत."... पुढे तो लोकांना सांगतो... "माणसामाणसांतील द्वेष संपेल, हुकूमशहादेखील मरतातच, लोकांकडून त्यांनी हिसकावून घेतलेली सत्ता पुन्हा लोकांच्या हाती येईल."... नंतर तो सैनिकांना सांगतो... "अनैसर्गिक, यांत्रिक मनाच्या लोकांना तुमचा ताबा घेऊ देऊ नका. हे लोक तुम्हांला त्यांचे गुलाम बनवतात. गुलागिरीसाठी लढू नका. स्वातंत्र्यासाठी लढा. लोकशाहीसाठी एकत्र या." ... शेवटी तो हॅनाला उद्देशून सांगतो... "हॅना तू जिथे ऐकत असशील तर ऐक. क्षितिजावरून काळे ढग दूर होत आहेत... एका नव्या जगाची सुरुवात होत आहे." हॅना ग्रामीण भागात हताश होऊन जमिनीवर पडून हुंदके देत असताना हे ऐकते, ऐकता ऐकता ताठ उभी राहते आणि म्हणते, "ऐका." चित्रपट संपतो. चॅप्लिन जे म्हणाला ते जगाने ऐकलं. नाझींना दिलेली ती एक सणसणीत लोकशाही, मानवतावादी चपराक होती.

हे दोन्ही अमेरिकन संदेशपट अमेरिकेतच घडतात. कॅसाब्लॅन्का (1943) हा मायकेल कर्टीस दिग्दर्शित चित्रपट घडतो. नॉर्थ आफ्रिकेतील मोरोक्को येथील कॅसाब्लॅन्का शहरात हा चित्रपटदेखील एक कल्ट फिल्म म्हणून ओळखला जातो. हॉलिवुडच्या कथनशैलीतला एक गोष्ट सांगणारा हा संदेशपट त्यातील संवादामुळे आणि हम्फ्रे बोगार्ट आणि इन्ग्रीड बर्गमनच्या अप्रतिम अभिनयामुळे विशेष गाजला. नाझींच्या जाचापासून सुटून अमेरिकेत जाणारे ज्यू पोर्तुगालच्या लिस्बन बंदरातून अमेरिकेत जात. कॅसाब्लॅन्कापासून स्पेन, पोर्तुगाल (लिस्बन) जवळ आहे. युद्धातील या वास्तवावर हा चित्रपट आधारलेला आहे. मोरोक्को फ्रेंच वसाहत आहे. चित्रपटाची सुरुवात मार्सेलिस या फ्रेंच राष्ट्रगीताने होते. निवेदन संपल्यावर आपल्याला रेडिओवरून बातमी मिळते की, ट्रेनमध्ये दोन जर्मन अधिकाऱ्यांची हत्या केली आहे आणि खुनी कॅसाब्लॅन्कामध्ये शिरला आहे. चौकशीसाठी जर्मन अधिकारी स्टासर कॅसाब्लॅन्कामध्ये येतो.

फ्रेंच अधिकारी लुईस त्याला भेटतो आणि सहकार्याची हमी देतो. आता हा खुनी जाणार कुठे? शक्यता असते की, इतर सर्व स्थानिक लोकांप्रमाणेच तो रिकच्या नाइट क्लबमध्ये जाईल. आपल्या स्टायलिश कॅसिनो आणि नाईट क्लबप्रमाणे त्याचा मालक रिकसुद्धा स्टायलिश आहे. (हम्फ्रे बोगर्ट आहे तो!) “मी कुणासाठी माझी मान पुढे करत नाही." म्हणत म्हणत हा सिनिकल अमेरिकन कुणाची पत्रं पियानोत लपव, फ्रेंच बंडखोरांना मदत कर, आपल्या माजी प्रेयसीच्या झेक नवऱ्याला पळून जाण्यास मदत कर- असे प्रयत्न करतच असतो. ज्यू असा उल्लेख नसला तरी हे सर्व पाहून पळून जाण्याच्या तयारीत, पेपर्स मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे ज्यू आहेत, हे जाणवत राहतं.

एका फ्लॅशबॅकमध्ये रिक आणि लिसाचं पूर्वाश्रमीचं प्रेमप्रकरण आपल्याला दाखवलं जातं. त्यांची ताटातूट कशी झाली, लिझाने आपण कधीच भेटू शकत नाही; अशी चिठ्ठी कशी पाठवली हे दिसतं. फ्लॅशबॅक संपतो आणि आपण पुन्हा कॅसाब्लॅन्काच्या रिकच्या पबमध्ये येतो. मेलेल्या जर्मन सैनिकांचा ट्रान्झिस्ट व्हिसा रिककडे आहे. फ्रेंच अधिकारी लुईसबरोबर त्याच चांगले वैयक्तिक आणि प्रोफेशनल संबंध आहेत. एका बल्गेरियन दांपत्याला ट्रान्झिट पेपर्स मिळवण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून तो त्यांना चक्क रुलेटवर जिंकू देतो. लिझाचा नवरा लाझोलो रिकीला सांगतो, "मी ती कागदपत्रं विकत घ्यायला तयार आहे.’’ तेव्हा रिक नकार देतो. "का?" लाझोलो विचारतो. "तुझ्या बायकोला विचार." रिक सांगतो. लाझोलो एक क्रांतिकारक आहे. आणि लिझाचं रिकशी फ्रान्समध्ये प्रेमप्रकरण झालं त्या वेळेसही लिझा आणि लाझोलोचं लग्न झालं होतं असं लिझा सांगते.

पबमधलं वातावरण, तिथे जमलेले भिन्नधर्मीय लोक, मोरोक्कन फ्रेंच, इतर देशीय, पबमध्ये होणारे व्यवहार, सॅमची पियानोवर गायलेली गाणी यामुळे पूरक वातावरणनिर्मिती होते. जर्मनांचं आगंतुक येणंदेखील अधोरेखित होतं. एका प्रसंगात जर्मन सैनिक पबमध्ये जर्मन राष्ट्रगीत म्हणू लागतात. लगेचच लाझोलो, पबमधले वादक फ्रेंच राष्ट्रगीत म्हणू लागतात. पबमधले लोक फ्रेंच राष्ट्रगीत मार्सेलिस सुरू करतात, बघता बघता पबमधील सर्व लोक ते गाऊ लागतात.

वरवर कणखर वाटणाऱ्या रिकची संवेदनक्षमता अनेक प्रसंगातून दिसते. ट्रांझिट पेपर्स मागण्यासाठी लिझ येते आणि ‘‘माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे,’’ असं सांगते तेव्हाच रिकला कळून चुकलं असतं की, हिचं खरं प्रेम हिच्या नवऱ्यावरच आहे.

शेवटी तो आपला प्रतिस्पर्धी फेरारी याला आपला पब विकतो. फ्रेंच पोलिसाला सांगतो की, तो आणि लिझ ते पेपर्स वापरून अमेरिकेत जाणार आहेत. प्रत्यक्षात मात्र तो लिझ आणि तिचा नवरा लाझोलोला स्थलांतर करण्यास मदत करतो. नाझी अधिकारी स्टाईस त्यांचं विमान थांबवण्यासाठी टेलिफोनकडे वळतो. तेव्हा रिक त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार करतो. विमान उड्डाण घेतं. फ्रेंच पोलिस येतात. तेव्हा लुईस हा फ्रेंच पोलिस अधिकारी त्यांना सांगतो. "जर्मन अधिकाऱ्याला गोळ्या घालून मारलाय. नेहमीचेच संशयित गोळा करा." रिकला तो सोडतो. रिकला म्हणतो “You were always a sentimental now you have become patriotic." आणि जर्मन दारूची बाटली फेकून देऊन फ्रेंच दारूची बाटली उघडतो.

रिक म्हणतो, “एका सुंदर मैत्रीची ही सुरुवात आहे." अशी अनेक गाजलेली वाक्यं चित्रपटात आहेत. लिझाला टोस्ट करताना रिक म्हणतो, “Here is looking at you kid.” तेव्हा त्याचा कणखर चेहरा मृदू आणि संवेदनशील झालेला दिसतो. आज संध्याकाळी भेटू या का, असं जरी विचारलं तरी तो म्हणतो, “मी इतक्या पुढचा विचार करत नाही.” अचूक पटकथा, अप्रतिम अभिनय आणि उत्तम गोष्ट आणि फिचर फिल्म हॉलिवुड पठडीची निवड यातून हा चित्रपट एक गोष्ट सांगता सांगता देशप्रेमाचा संदेश समर्थपणे देऊन जातो.

जर्मन संदेशपटातील प्रतिमासृष्टी, रशियन संदेशपटातील मोन्टाज तंत्र, ब्रिटिश संदेशपटातील मानवी चेहरा आणि अमेरिकन चित्रपटातील खिळवून ठेवणारी गोष्ट अशी वैशिष्ट्ये आपण या लेखातून पाहिली. जर्मनीची लेनी रिफेन्स्टाल, रशियाचा सर्जी आयझेस्टाईन, ब्रिटनचा हम्फ्रे जेनिंग्ज आणि अमेरिकेचे डी. डब्ल्यू ग्रिफिथ, चार्ली चॅप्लिन आणि मायकेल कर्टीस यांचे चित्रपट आपण तपासले. असे समर्थ आणि स्वयंभू दिग्दर्शक लाभल्याने या उंचीचे चित्रपट बनू शकले. हे चित्रपट स्वतःचे पायंडे, स्वतःची परिभाषा, स्वतःची शैली, स्वतःचा दृष्टिकोन घेऊन आले आणि म्हणूनच ते चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झाले.

खरं तर यातील प्रत्येक दिग्दर्शक आणि प्रत्येक चित्रपट हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या लेखात एक धावता आढावा घेऊन दिग्दर्शक आणि त्याच्या संदेशपटांचा ‘फील’ देण्याचा प्रयत्न केलाय.

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


ग्रेट डिक्टेटर या सिनेमाची लिंक :

 

Tags: प्रचारपट चित्रपट दिग्दर्शन युद्धपट युद्ध पहिले महायुद्ध युद्धकालीन चित्रपट चार्ली चॅप्लिन अमेरिकन Load More Tags

Add Comment