हिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा

1935 साली प्रदर्शित झालेल्या 'धर्मात्मा' या चित्रपटातील एक दृश्य

भारतीय सिनेमाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सर्व प्रमुख भाषांमधून दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या काही हजारांमध्ये जाते. मात्र हिंदी सिनेमाचा प्रभाव देशभर आहे. तो अनेक प्रकारचा आहे. त्यातील 'हिंदी चित्रपट आणि आयडिया ऑफ इंडिया' ही संकल्पना समोर ठेवून लिहिलेला  'हिंदी चित्रपट आणि देश' हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा पहिला लेख. 

देश म्हटले की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? काही तरी येतच असेल ना? समजा एखाद्या परकीय व्यक्तीने उदा. फ्रेंच माणसाने तुम्हाला विचारले ‘हमारे पास आयफेल टॅावर है; पँन्थिऑन है; ऱ्हाइन, फ्रेंच रिव्हरसारख्या नद्या तसेच आल्प्स, मॅान्त ब्लांकसारखे पर्वत किंवा बॉर्डोक्स बर्गंडी जातकुळीतील उंची वाईन्स आहेत; आमच्याकडे व्हॅनगॉ, प्राउस्ट, मोपासा, व्होल्तेर, बाल्झाक आहेत. आमच्याकडे इम्प्रेशनिझम, बॅले आहे; शिवाय गोदार्द, तृफॉ, फ्रेंच न्यू वेव्ह आहे. थोडक्यात, मेरे पास बंगला है, गाडी है, दौलत है, तुम्हारे पास क्या है?’ यावर तुम्ही ‘मेरे पास मोदी है’ असे फिल्मी उत्तर नाही ना देऊ शकत! अर्थात तुम्ही ‘हम उस देश के वासी है, जिस देश मे गंगा बहती है’ (वास्तववादी), ‘गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम हिमाला’ (जेनेटिक), ‘यहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा’ (स्वप्नरंजित) अशी फिल्मी उत्तरे लगेच देऊ शकता. देश म्हटले की मूर्त स्वरूपाचे काही डोळ्यांसमोर येते का? एखादी प्रतिमा, एखादे चित्र, एखादे घोषवाक्य? देश ही एक अमूर्त संकल्पना असल्याने, तसे होणे जरा कठीणच आहे. 

लॅटीनमधील Nato आणि फ्रेंचमधील Nacion या शब्दांपासून Nation हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘Birth’ किंवा ‘Place of Birth’ असा आहे. बेनेडिक्ट अँडर्सन आणि पॅाल जेम्स हे त्याची 'कल्पित समाज' (Imagined community) किंवा 'अमूर्त समाज' (Abstract community) अशी व्याख्या करतात. देशासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे समाज/लोकवस्ती (Community), भौगोलिक प्रदेश (Territory), सरकार, सार्वभौमत्व, आणि समान (कायदेशीर व इतर) हक्क (यात एक चलन, एक कायदा, मुक्त संचार हे देखील अनुस्यूत आहे). हा आपल्यासारखा नागरी देश (Civic Nation) किंवा पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्यासारखा एक धर्म, एक भाषा, एक वंश असलेला वांशिक देश (Ethnic Nation) असू शकतो. भारतात अनेक संस्कृतींचा मिलाफ आहे, अनेक समाज घटक आहेत. 

त्या फ्रेंच माणसाला नुसते आपले राष्ट्रगीत ‘जनगणमन’ म्हणून दाखवले तरी त्याला देशाचा भूप्रदेश कळेल. (पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, वंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, वगैरे) आपली भौगोलिक वैशिष्ट्ये सांगणारे असे राष्ट्रगीत विरळाच. इतर देशांच्या राष्ट्र्गीतांतून वीरश्री, युद्ध-जोश, राजा किंवा राणीप्रति निष्ठा ठासून भरलेली असते. शिवाय त्या फ्रेंच व्यक्तीला असेही ठासून सांगता येईल की, भौगोलिकदृष्ट्या आमच्याकडे काय नाही? बर्फ आहे, वाळवंट आहे, नद्या आहेत, उंचसखल भाग आहेत, चित्रपटाला लागणारी विविध लोकेशन्स आहेत. पुरातन वास्तूंबद्दल बोलायचे झाल्यास, आमच्याकडे 'ताजमहाल' आहे. 'बीबी का मकबरा'ही आहे. राजस्थान जेसलमेरचे विलासी, राजेशाही राजवाडे; हम्पी ते हिमाचल प्रदेश अशी देशभर पसरलेली देवळे आहेत. जोडीला मशिदी, चर्च, गुरुद्वाराही आहेत. आमच्याकडे गोलघुमट आहे, कुतुबमिनार आहे (ज्यात आमच्याकडे नुतन आणि देवानंद ‘दिल का भंवर करे पुकार’ गाणे म्हणतात.) आमच्या देशात प्रचंड ‘जीववैविध्य’ आहे. पिचपिच्या डोळ्यांच्या बुटक्या मणीपुरी, आसामींपासून आडदांड पठाणांपर्यंत सर्व प्रकारचे लोक आहेत. (आमच्या हिंदी चित्रपटांत ते बद्ध झालेले आहेत.) तुमच्याकडे बाल्झाक, व्होल्तेर इत्यादिक आहेत, तर आमच्याकडे वाल्मिकी, व्यास (आणि हे कमी म्हणून कि काय, नेमाडेदेखील आहेत.) शिवाय एकेकाळी असलेल्या आणि आता नसलेल्या असंख्य गोष्टी आहेत. उदा. पुष्पक विमान, अण्वस्त्रे, कोहिनूर हिरा वगैरे. तुमच्याकडे 'फ्रेंच न्यू वेव्ह' आहे तर आमच्याकडे ‘बॉलिवूड’ आहे.

आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. 'बॉलिवूड’ म्हणजे हिंदी चित्रपटांत, देश ही संकल्पना दिसते का? तर नाही, कारण देश ही एक अमूर्त संकल्पना आहे. तिच्याकडे एकत्रितदृष्ट्या पाहावे लागते. पण भारतीयत्व, भारतीय आकांक्षा, देशभक्ती, सामाजिक-सांस्कृतिक ताणेबाणे, सहकार्य आणि संघर्ष, संकेत, रूढी-परंपरा, सामाजिक व राजकीय घडामोडी, लोककला, लोकसंगीत, अभिजात कला आणि संगीत यांचा सुलभ, सुटसुटीत आणि लोकाभिमुख दस्तावेज हिंदी चित्रपटांत खणखणीतपणे विपुल आणि काळानुसार दिसतो. खरेतर हिंदी सिनेमा हाच एक मोठा दस्तावेज आहे.

देशाचा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असा लोकरंजक इतिहासच हिंदी सिनेमाने आपल्यासाठी ठेवलाय. अनेक महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय-सामाजिक स्थित्यंतरे, व्यक्तिमत्त्वे, कथासूत्रे सिनेमाने गोळीबंदपणे, सारांशरूपाने पण तरीही नेमकेपणाने नोंदवली आहेत. भारतीयांची ग्रहणशैलीच गोळीबंद, संश्लेषणात्मक आहे. विश्लेषण करण्यापेक्षा सारांश सांगण्याकडे आपला कल आहे. (आपले निर्माते/दिग्दर्शकही आधी ‘चरबा’ (One-liner) मागतात.) आपली वृत्तीच मुळी उत्सवप्रिय आहे. दशावतार बघण्यासारखी ती एक सामुहिक विधी, किंवा इव्हेंट आहे. हिंदी चित्रपटाकडे अभिव्यक्तीचा प्रकार किंवा एकट्याने बघून चिंतन करण्याचा प्रकार म्हणून पाहिले जाऊ लागले, ते गेल्या दोन दशकांत.

हिंदी चित्रपटात ‘भारतीयत्व’ दिसते का या प्रश्नाचे उत्तर आहे... हो! एकशेएक टक्के दिसते! देशातील सर्वच स्थित्यंतरे हिंदी चित्रपटांत नोंदवली गेली आहेत. हिंदी चित्रपट म्हणजे चित्रपटाचा शोध लागण्यापासूनचा शंभर वर्षांचा काळ का? इतकेही ते सोपे नाही. हा काळ (आशुतोष गोवारीकरने तर तो थेट ‘मोहेनजोदारो’पर्यंत नेला आहे) ऐतिहासिक कालखंडापर्यंत पोहोचू शकतो. (हिंदी चित्रपट सुरु होतो, तोच पौराणिक काळापासून) पुराणकथा, क्रिकेट आणि हिंदी चित्रपट या तीन गोष्टी अखंड भारताला जोडणारे महत्त्वाचे  दुवे आहेत.

हिंदी चित्रपटांवर भारतीयत्वाचे पडलेले पडसाद तपासायचे तर ढोबळमानाने देश मिळवताना (स्वातंत्र्यलढा), देश घडवताना, देश टिकवताना, देश पुढे नेताना असे चार टप्पे करावे लागतील. कदाचित देश ‘समजावून घेताना’ देखील हिंदी चित्रपटांचा उपयोग होऊ शकतो. एका परीने तो होतोच. फक्त हिंदी चित्रपटांत या नोंदी कालक्रमानुसार होतातच असे नाही. काही तात्काळ होतात, काही पुढे-मागे होतात, तर काही व्हायला कित्येक वर्षे जावी लागतात. स्वातंत्र्यलढ्याचा काळ आणि गांधींचे योगदान हिंदी चित्रपटांत यायला अ‍ॅटेनबरोचा ‘गांधी’ उजाडावा लागला.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयत्वाची ज्योत पेटवणारे मोजके दहा-बारा चित्रपट आले असतील. (ब्रिटीश सेन्सॉरशिप आजच्या इतकीच कडक होती!) काही पौराणिक रूपके घेऊन, काही ऐतिहासिक घटनांच्या आडून देशप्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होते; स्वराज्याचा संदेश देऊ पाहत होते. 1931मध्ये शांतारामबापूंनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘स्वराज्याचे तोरण’ हा चित्रपट आणला. पोस्टरवरचा ‘स्वराज्य’ शब्द बघून ब्रिटीश सेन्सॉरशिप खवळली. त्यात भरीस भर म्हणून शेवटच्या दृश्यात शिवाजी महाराज भगवा झेंडा फडकावत असल्याचे चित्रित करण्यात आले होते. ते पाहून ब्रिटीश आणखीनच पिसाटले. शेवटी वितरक बाबुराव पै यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. अनेक ठिकाणी कात्री लावून व झेंड्याचा प्रसंग पूर्णपणे उडवून, हा चित्रपट ‘उदयकाळ’ या नावाने प्रसारित झाला. ‘उदयकाळ’ शीर्षकातून आणि चित्रपटातील घटनांमधून प्रेक्षक काय समजायचे ते समजलेच. चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक रूपकांआडून बलदंड ब्रिटीश सत्तेला आडूनआडून दंश करतच होते. ब्रिटीश सेन्सॉरशिपदेखील सजग होती. त्यांना हिंदी कळत नसले तरी त्यातील मेख त्यांच्या बरोबर लक्षात येई. (मला वाटतं, काही हिंदी ‘जल्पक’ त्यांनी ‘पे-रोल’ वर ठेवले असावेत.)

मुकपट जमान्यात 1921 साली ‘भक्त विदुर’ नावाचा एक मुकपट आला होता. त्यातील विदुराची ‘विशिष्ट टोपी’ आणि नशिबचक्र (चरखा) यांना देखील ब्रिटीश सेन्सॉरने चहात पडलेल्या माशीप्रमाणे चिमटीत पकडले. ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढायचे; तर संघटीत व्हायला हवे, सर्व अनिष्ट रूढी-परंपरा टाळून पुरोगामी विचार केला पाहिजे, हा संदेश 1937मध्ये आलेल्या ‘दुनिया ना माने’ या चित्रपटाने दिला. मनाविरुद्ध लावलेल्या लग्नांचा निषेध आणि विधवा विवाहाचा पुरस्कार या चित्रपटात केला गेला होता. लगेच ब्रिटीश सेन्सॉरशिप सरसावली. त्यांनी चित्रपटातून वल्लभभाई पटेलांचे ‘फुटेज’ उडवले. (खरे तर असे फुटेज यांचेच जल्पक कॅमेरामन पुराव्यासाठी म्हणून चित्रित करत असत, आज या जल्पक कॅमेरामनमुळे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्या नेत्यांची भाषणे, सभा पाहता येतात.)

चंदुलाल शहांनी 1940मध्ये अस्पृश्यता या सामाजिक विषयावरचा ‘अछूत’ हा चित्रपट आणला. केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर खुद्द महात्मा गांधींनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले. भारतीयांच्या या सामाजिक उपद्व्यापामध्ये सेन्सॉरने फार लुडबुड केली नाही. पुढे याच विषयावर ‘अछूत कन्या’ हा चित्रपटदेखील आला. अशा चित्रपटांवर गांधी विचारसरणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्यानंतर आला ‘ब्रांडी कि बोतल’. पुन्हा गांधीवादी नैतिकतेचा प्रत्यय आला. मनोजकुमारचा ‘पूरब और पश्चिम’ येण्याच्या कितीतरी आधी 1940मध्येच आलेल्या ‘घर की रानी’ने पाश्चात्य जीवनशैलीचे अनुकरण करण्यातील धोके दाखवले होते. शांतारामबापूंचा ‘धर्मात्मा’ खरे तर ‘महात्मा’ या शीर्षकाने रिलीज होणार होता. पण आपलेच संस्कृतीरक्षक आडवे आले. कन्हैयालाल मुन्शींनी (त्या वेळचे मुंबईचे गृहमंत्री) त्याला तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्या मते शांतारामबापू स्वतःच्या फायद्यासाठी (म्हणजे पैसे मिळवण्यासाठी) गांधींच्या नावाचा उपयोग करत होते. (आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा अशी कुठल्या निर्मात्याची इच्छा नसते? असो, याबाबतीत शांतारामबापू म्हटल्यावर संशयास जागा होती!)

या काळातील चित्रपटांची गाणी ब्रिटीश सेन्सॉरला चकवा देणारी असत. (शिवाय जे प्रत्यक्ष दाखवता येत नाही ते गाऊन दाखवण्याची दिव्य ‘सिनेमॅटीक’ परंपरा आपल्याकडे होतीच.) अमरज्योती (1939), ‘अपना घर’ (1942), तराणा (1943) या चित्रपटांत अशी गाणी सुरुंगासारखी पेरून ठेवलेली होती. ‘आज का हिंदुस्तान’(1940)मध्ये चक्क ‘चरखा चलाओ बहनो’ असे एक गाणे होते. 1940मधील ‘बंधन’मध्ये, कवी प्रदीप यांचे ‘चल चल रे नौजवान’ होते.

कवी प्रदीप यांनीच लिहिलेले 1943मधील ‘किस्मत’ चित्रपटातील ‘दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा है’ हे गाणे मात्र ब्रिटीश सेन्सॉरच्या कात्रीत सापडले! (हे गाणे पडद्यावर चक्क भारताच्या नकाशावर चित्रित करण्यात आले होते.) कवी प्रदीप आणि संगीतकार अनिल बिस्वास यांच्यावर अटक वॅारंट बजावण्यात आले. अटक टाळण्यासाठी दोघेही भूमिगत झाले. शेवटी त्या गाण्यातली ‘तुम ना किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी’ ही ओळ कमी करण्यात आली. हा चित्रपट जर्मन-जपान आघाडीविरुद्ध, म्हणजे ब्रिटीश लोकांची बाजू घेणारा आहे असे सेन्सॉरशिपला सांगण्यात आले. (त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरु होते; आणि हिटलर व जपान ब्रिटिशांच्या विरुद्ध लढ़त होते. ‘किस्मत’ तुफान चालला. अशोककुमार सुपर हिरो झाला. ‘किस्मत’चे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडायला ‘शोले’ यायला लागला.

बंकिमचंद्र यांच्या 1872-75च्या सुमारास लिहिलेल्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील ‘वन्दे मातरम’ हे गीत स्वातंत्र्य चळवळीत एक युद्धगर्जना झाली होती. गीता हातात घेऊन वन्दे मातरम म्हणत कित्येक स्वातंत्र्यसैनिक शहिद झाले होते. पुढे त्याला राष्ट्रगीत म्हणण्यास मुसलमानांनी तीव्र विरोध केला. जीना त्यात अग्रणी होते, कारण या गीतात देवीची भक्ती किंवा मूर्तीपूजा आहे असा त्यांचा आक्षेप होता. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर शेवटची कडवी वगळून त्याला ‘राष्ट्र-गान’ हा मान मिळाला. ‘भारतमाता’ हे देशाचे प्रतिक प्रथम मिळाले ते ‘वन्दे मातरम’ या गीतातून! (भारतमातेचे असेच एक सोज्वळ रुप पुढे मेहबुब खानच्या मदर इंडियात दिसले. नर्गीसने यात स्वाभिमान जपणाऱ्या मातेची भूमिका केली होती)

‘वन्दे मातरम’चा आणि  स्वातंत्र्य चळवळीचा अतूट संबंध आहे. 1770मध्ये बंगालमधील नबाब आणि त्याच्या वतीने कर्जवसुली करणारी इस्ट इंडिया कंपनी यांच्या विरुद्ध संन्याशांनी केलेल्या बंडावर आधारीत ही कादंबरी होती. त्या कादंबरीवर आधारीत ‘आनंदमठ’ हा सिनेमा आला 1952मध्ये. दिग्दर्शक होते, हेमेन गुप्ता. पृथ्वीराज कपूर, भारतभूषण, प्रदीप कुमार, अजित आणि मुख्य म्हणजे गीताबाली अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. पगडी घातलेल्या, पुरुषी वेशातील गीताबालीने ज्या तडफदारपणे हे गीत पडद्यावर सादर केलेले आहे, त्याला तोड नाही. आजही ‘वन्दे मातरम’ म्हटले, की ती चाल आणि गीताबालीचा उत्कट अभिनय डोळ्यांसमोर येतो. एक ऐतिहासिक महत्त्व असलेले गाणे अशा रीतीने चित्रबद्ध होऊन लोकांसमोर आले, ते या चित्रपटामुळे.

संन्याशांच्या बंडाप्रमाणे देशातील इतर बंडांचीही दखल हिंदी सिनेमाने घेतलेली आहे. 1857च्या बंडाला आपण पहिले स्वातंत्र्ययुद्ध मानतो. नबाब वाजिद अली शाहची राजवट जनरल ऑट्रमने क्रूरपणे उलथवून लावले; आणि 1854मध्ये इस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटीश साम्राज्यात रुपांतर झाले. हे स्थित्यंतर सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ (1977) मध्ये वेगळ्याच पद्धतीने येते. इतक्या ढवळून टाकणाऱ्या स्थित्यंतरातदेखील दोन उमराव आपले बुद्धिबळ खेळण्यात मग्न आहेत. युद्धाच्या बातम्या येत आहेत पण यांचे आपले बुद्धिबळ युद्ध चालूच! ब्रिटीश सत्ता पूर्ण ताबा घेते, तेव्हा यांच्या दृष्टीने फरक इतकाच पडतो की, पटलावर राजा जाऊन राणीला महत्त्व येते. ही राणी म्हणजे ब्रिटनची राणी असे रे सूचित करतात. आत्ममग्न, सुस्त यंत्रणा आणि ब्रिटिशांची सतत पुढे चाललेली दमन यंत्रणा यांना रेंचा चित्रपट स्पर्शून जातो. पुढे चितगाव उठावावरही चित्रपट आला. रामोश्यांचे बंड सुप्त, मिथक रूपाने कधी कधी डोके वर काढते. मंगल पांडे, झाशीची राणी यांसारख्या 1857च्या संग्रामातील क्रांतिकारी व्यक्तिरेखाही हिंदी चित्रपटांत येतात. सोहराब मोदींनी 1953मध्ये ‘झांसी की रानी’ काढला होता. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेला आमीर खानचा अभिनय असलेला ‘मंगल पांडे’ पुढे अनेक वर्षांनी पडद्यावर आला. भारतीय समूह संज्ञेचा भाग बनलेल्या या घटना आणि व्यक्तिरेखा हिंदी सिनेमाने जतन करून ठेवलेल्या आहेत.

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)

Tags: film movies cinema and india भारत आणि चित्रपट सिनेमा चित्रपट meghnad kulkarni मेघनाद कुलकर्णी Load More Tags

Comments:

Rahul Ramesh Gudadhe

खरंच खूप छान लिहलेले आहे. आणि चित्रपटावर असे विश्लेषण व्यायलाच हवे होते . खूप छान. पुढील लेखाची वाट पाहू

Add Comment