स्वतंत्र भारत आणि हिंदी चित्रपट

भारतीय सिनेमाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सर्व प्रमुख भाषांमधून दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या काही हजारांमध्ये जाते. मात्र हिंदी सिनेमाचा प्रभाव देशभर आहे. तो अनेक प्रकारचा आहे. त्यातील ‘हिंदी चित्रपट आणि आयडिया ऑफ इंडिया’ ही संकल्पना समोर ठेवून लिहिलेला  ‘हिंदी चित्रपट आणि देश’ हा दीर्घ लेख चार भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा दुसरा लेख. 

आपल्याला इथून चंबुगबाळे आवरायला लागणार हे चाळीसच्या सुमारास ब्रिटीशांच्या लक्षात येऊ लागल्यामुळे ते आवराआवर करू लागले होते. सेन्सॉरशिपही जरा शिथिल झाली होती. स्वातंत्र्याची झलक दाखवणारे प्रभातचे ‘हम एक है’ (1946) आणि ‘एक कदम’ (1947) हे चित्रपट याच सुमारास येऊन गेले. देश स्वतंत्र झाला होता. स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी राष्ट्र ही संकल्पना आता घटनाबद्ध झाली होती. त्यात आता नवी जान भरायची होती. हे गांधीच्या स्वप्नातले स्वयंपूर्ण Minimalistic  ग्राम राज्य नव्हते तर एक प्रगतिशील, Forward Looking आधुनिक राष्ट्र होते. ब्रिटिशांप्रमाणे एकसंध आणि फ्रेंचांप्रमाणे स्वतंत्र्य, समता, बंधुभाव ही मुल्ये जपणारे राष्ट्र आपल्यासाठी नवे होते. (रोमन साम्राज्य जाऊन बायझनटाइन हे राष्ट्रस्वरूप प्रारूप आले, तसे प्रारूप आपल्याकडे फक्त मौर्य साम्रज्यात दिसते. चंद्रगुप्त नावाच्या शूद्र राजाने हे साम्राज्य आपल्या मनगटाच्या बळावर उभे केले हे मुद्दाम नमूद केले पाहिजे).  

राष्ट्रनिर्माणातील प्रमुख घटक म्हणजे समाज. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका झेंड्याखाली आलेला हा भारतीय समाज नक्की होता कसा? तो पूर्वीसारखाच होता. त्यात अजूनही वंशभेद, वर्णभेद, स्पृश्यास्पृश्यता, प्रादेशिक अस्मिता आणि कलह होते; गरीब-श्रीमंत, उच्च-नीच या गोष्टीही अस्तित्वात होत्याच. फक्त स्वातंत्र्याच्या जल्लोशात हे सर्व सुप्तावस्थेत गेले होते इतकेच! भारतमातेच्या गर्भात ‘इंडिया’ नावाचा एक वेगळाच देश आकार घेत होता. या बदलाची चाहूल हिंदी चित्रपटांनाही लागली होती. स्वातंत्र्याने उल्हसित होऊन हिंदी चित्रपट एकीकडे ‘नया खून है,नयी उमंगे, अब है नयी जवानी, नये दौर में लिखेंगे मिलकर नयी कहानी... हम हिंदुस्तानी’, ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान कि औलाद है इंन्सान बनेगा’ (धूल का फुल), ‘अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नाही, सर कटा सकते है लेकीन सर झुका सकते नही’ (लीडर) अशी गाणी गात होता, दुसरीकडे बकाल वेश्यावस्तीतून माणुसकीची झालेली दैना पाहून दारू पिऊन गुरुदत्त ‘जिन्हे नाझ है हिंदपर वो कहा है?’ विचारत फिरत होता. तर बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’मध्ये एक गरीब शेतकरी (बलराज सहानी) आपली ‘दो बिघा जमीन’ वाचवण्याची जीवाच्या आकांताने खटपट करताना दिसत होता. 

गांधीजींच्या स्वप्नाप्रमाणे तरुण खेड्यात जात नव्हते. तर ते ‘कहने को हम कलंदर आते है बोरीबंदर’ असे म्हणत शहरात येत होते.  तेथे ‘जितनी भी बिल्डींगे थी, सेठोने बाट ली है; फुटपाथ हर सडक का है आशिया हमारा’ अशी स्थिती आहे. एकीकडे फुटपाथ त्याला माणुसकी दाखवत होते. तर दुसरीकडे शहर त्याला नागवत होते. ‘श्री 420’मध्ये राजकपूरला आपले ‘इमानदारीचे मेडल गहाण’ टाकून पैसे उधार घ्यावे लागत होते. ‘जागते रहो’ मधून ही विषमता अधिकच ठळकपणे पुढे येते. साम्यवादाची ही छटा ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) सिनेचळवळीत आणि या काळात आलेल्या राजकपूरच्या हिंदी चित्रपटांतून दिसते. त्याच्या ‘अनाडी’, ‘बरसात’ चित्रपटात असाच एक भांबावलेला Vulnerable युवक दिसतो. 

1956-61 या कालावधीत देशात दुसरी पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली. या काळातील नेहरूप्रणीत भारत प्रयोगशील अवस्थेत होता, स्वतःला तपासत होता. त्यामुळे ‘नया दौर’ (1957) सारख्या चित्रपटात दिलीपकुमार सेंट्रल प्लानिंगमधून येणाऱ्या परिणामांचा विचार करताना दिसतो आणि अशीच दोलायमान अवस्था ‘फिर सुबह होगी’ (1958) मधूनही दिसते.

देशाच्या संकल्पनेतील ‘समाज’ या घटकाला सामाजिक मन आणि सामुहिक संज्ञा आहेत. यात पुराणांतील देवदेवता, इतिहासातील आणि आधुनिक काळातील महानायक (हिरो) आले, तशाच महत्त्वाच्या नैसर्गिक, मानवी, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटनादेखील आल्या आहेत. त्या सामुहिक भारतीय मनावर कायमच्या कोरलेल्या आहेत. आणि हा प्रवास हिंदी चित्रपटात बद्ध झालेला आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे पुराण कथा, खेळ (विशेषतः क्रिकेट) आणि हिंदी सिनेमा यांनी सर्व देशाला एक प्रकारे एकत्र बांधून ठेवले आहे. कोण म्हणते की, इतिहास हा जेत्यांचाच असतो? हिंदी सिनेमा हा सामान्यांचा सामान्यांसाठीचा इतिहास आहे.

महाभारत, रामायण आदि भारतीय जनमानसात पक्के रुजले आहे. वेदिक परंपरा नसलेल्या प्रदेशातही ते नृत्य,नाट्य,लोककला अशा कुठल्या ना कुठल्या स्वरुपात प्रकटतेच. हिंदी चित्रपटांना असे साचे पुरवले ते याच महाकाव्यांनी! एक अत्यंत सद्गुणी नायक, एक सीतेसमान पतिव्रता नायिका, शूर्पणखेसारखी एक कामांध खलनायिका.  पुढे साधारणपणे महेश भट्टच्या ‘अर्थ’च्या जमान्यात ‘नाजूक’ विषय ‘मेनस्ट्रिम’ सिनेमात येऊ लागले, आणि नायिका हळूहळू सर्वच बंधनातून मुक्त होऊ लागली (यात कपड्यांवरील बंधनेदेखील आलीच).

हे परंपरागत साचे एखाद्या विधीनाट्याप्रमाणे हिंदी चित्रपटात आलटून पालटून येतच राहिले. यावर ‘संपूर्ण रामायण’, ‘संपूर्ण महाभारत’ हे चित्रपट ही आले. पुढे तर रामानंद सागर यांचे ‘रामायण’ आणि बी. आर. चोप्रा यांचे ‘महाभारत’ टी.व्ही.वर आले व ते सर्व देशाने पहिले. या देशाला त्यांनी पुन्हा एकदा एकत्र बांधून ठेवले. या मालिकांच्या प्रसारण वेळेत रस्ते ओस पडत, इतके ते लोकप्रिय झाले (आज नव्या पिढीसाठी हीच आपली अधिकृत महाकाव्ये आहेत).

पुढे झाडाभोवती गाणी म्हणणाऱ्या सिनेमाने आपले असे खास साचे दिले. ‘बिछडे हुए जुडवे भाई’, ‘बदले की आग’, ‘खानदान कि इज्जत’, ‘माँ के आंसू’, (खास तुरुंगात खाण्यासाठी केलेला) ‘गाजर का हलवा’, एकट्याने किंवा दोन तीन असिस्टंट घेऊन ‘रेप’ करणारा व्हिलन, त्यातून फाटलेल्या ब्लाउजमधून दिसणारा नायिकेचा ब्रेसिअरचा पट्टा, नायकाला हाणामारी करण्यास सोयीस्कर अशी लटकती झुंबरे, व्हिलन पडल्यावर चटकन तुटणारी कलिंगडाची गाडी, खुफिया गुहा, नायकाला खाण्यासाठी उपाशी ठेवलेले वाघ, सिंह; नायकाला बुचकळण्यासाठी खास तयार ठेवलेले अ‍ॅसिडचे टँक, गोळ्या संपल्यावर फेकून देण्यासाठी हिरोंनी विकत घेतलेली पिस्तुलं, खलनायकाचा नायनाट करण्यास सदैव आशीर्वाद देणारे देवदेवता, सर्वात शेवटी येणारे पोलीस, शिवाय नायक नायिका पडद्याखाली गेल्यावर एकमेकाचे चुंबन घेणारी फुले, शेकोटी आणि वाळत टाकलेली साडी म्हणजे ‘सेक्स’ अशी अफलातून प्रतिके या काळातील हिंदी चित्रपटांनी दिली. गोष्ट आलटून पालटून एकच असली तरी, दशावतार पाहतात, त्या भक्तिभावाने लोक कित्येक दशके ती पाहत राहिले. भारताला गारुड्यांचा आणि दोरीवरील करामती करणाऱ्यांचा देश समजणाऱ्या लोकांना असा एक कल्पनेपलीकडचा अजब भारत देश या हिंदी चित्रपटांनी दाखवला यात शंकाच नाही.

मुसलमान, ख्रिश्चन, पारशी अशा इतर धर्मियांचे ठराविक साचे या प्रकारच्या चित्रपटाने दिले. मुसलमान दाढी वाढवून केसांना मेंदी लावून नमाज पढे, ख्रिश्चन, माणूस ‘माका-पाव’ इंग्रजी बोलून सतत एक दारूची ‘क्वार्टर’ घेऊन फिरे, (शक्य झाले तर गिटार वाजवे), पारशी माणूस विशिष्ट टोपी घालून विशिष्ट विनोदी हेल काढत बोले. आजही ज्याने (उदा. मणिपुरी माणसाने) आयुष्यात कधी पारशी पाहिलेला नाही, त्याच्या दृष्टीने हिंदी चित्रपटात दिसणारा पारशी हाच खरा ‘प्रमाणभूत’ पारशी ठरेल. इतर धर्मीय नेहमीच दुय्यम पात्रे राहिलेली आहेत. हिरोसाठी आणि मैत्रीसाठी बलिदान देणे असे कामही त्यांना असे (यात प्राण आघाडीवर होता). यांच्या उलट झालेलं, म्हणजे हिंदू हिरोने मुसलमान मित्रासाठी बलिदान दिलेले कुठेही दिसत नाही.

इतर धर्मियांचे कुटुंब/ जीवन दाखवणारे चित्रपट अर्थातच अपवाद म्हणता येतील! ‘चौदहवींका चाद’ (गुरुदत्त), ‘नसीम’ (सईद मिर्झा- या चित्रपटाला बाबरी मस्जिद चे संदर्भ आहेत. चित्रपटाच्या शेवटी कुटुंबप्रमुख मारतो तेव्हा त्याचा मुलगा म्हणतो, ‘आप सही टाईम पे गुजर गये’ आणि शस्त्र घेऊन हिंदू-मुस्लिम दंगलीत सामील होतो.), ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्युं आता है’ (सईद मिर्झा), ‘मम्मो’ (श्याम बेनेगल) अशा काही चित्रपटांत ते इतर देशवासीयांप्रमाणे हे ‘अल्पसंख्याक’ ‘नॅार्मल’ वाटतात. सत्यूच्या ‘गर्म हवा’मधील बलराज साहानीप्रमाणे ते स्वाभिमानी आणि देशभक्त असतात. फाळणी झाली तरी ते देश सोडत नाहीत. ‘हिंदू’ हिरो मात्र कुठलेही कपडे घालून, कुठेही जाण्यास, कसेही वागण्यास, नाचण्यास, मोकळा असे. 

‘अवतार’ महानायक, सुपर हिरो, सुपर नेता हा आपल्या जनमानसात बसलेला आणखी एक आर्ष साचा. आपल्याला संकटातून सोडवायला त्याची नेहमीच गरज भासते. पौराणिक काळात तो देवाच्या स्वरुपात, इतिहास काळात शूर राजा किंवा योध्याच्या स्वरूपात, आधुनिक काळांत नेत्याच्या स्वरुपात तो हिंदी चित्रपटांतून सतत येत राहिलेला आहे. पुराण, इतिहास, क्रांतिकारी उठाव/चळवळी, आधुनिक युद्धे (चीन पाकिस्तान), यात तो आहेच शिवाय एक मिथक म्हणून तो सुप्तावस्थेत दिसतोच. अलीकडेच आलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘बाहुबली’चे उदाहरण घ्या. तो ग्रीक योद्धा, रोमन ‘ग्लॅडीएटर’, भारतीय ‘नरपुंगव’ अशा सर्व मिथकांचा एकत्रित ‘अर्क’ आहे. समजूतदार पुरुष हिंदी सिनेमाने वेळोवेळी दाखवलेला असला तरी अजूनही आपल्या प्रेक्षकांना असे 'नरपुंगव'च आवडतात असे दिसते. (शाहीद कपूरचा कबीर खान आणि त्यावर झालेला वादविवाद आठवा.)
 
मध्ययुगीन म्हणजे मोगलकालीन शौर्यवान किंवा सुधारणावादी व्यक्तिरेखा हिंदी चित्रपटाने टिपून ठेवलेल्या आहेत. यात अजूनही मुसलमानांकडे ‘परके’ म्हणून पाहिलेले दिसत नाही, उलट देशाच्या एका उज्ज्वल परंपरेचा भाग म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलेले दिसते. एक ‘सेक्युलर अकबर’ (पृथ्वीराज कपूर) के.असिफच्या भव्य-दिव्य ‘मुघल ए आझम’मध्ये दिसतो. फार नंतर (2008) आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’मध्ये असाच सर्वधर्मसमभाव असलेला अकबर दिसतो. त्याला हिंदू धर्माविषयी प्रेम आहे, जो एका राजपूत राजकन्येशी (जोधाबाई) विवाह करतो. सामान्यांना नाडणारा जिझिया कर रद्द करतो. हिंदूंसाठी तीर्थयात्रा खुल्या करतो. या चित्रपटांमध्ये निवेदन एकजिनसी, सर्वधर्मसमभाव असलेला देशच करत आहे. अनेकतेत एकता हा धागा इथे पुरेपूर स्पष्ट स्वरुपात दिसतो.

सोहराब मोदींच्या चित्रपटातून देखील शूर, देशभक्त, स्वाभिमानी, स्वतंत्र बाण्याचे इतिहास पुरुष दिसतात. अ‍ॅलेक्झांडर दी ग्रेट शी कडवी झुंज देणारा पौरस त्यांच्या ‘सिकंदर’(1941) सिनेमात दिसतो. ‘पुकार’ (1939) मध्ये जहांगिर बादशहा, दंतकथेवर आधारित ‘रुस्तम सोहराब’, देशासाठी प्राणपणाने लढणारी राणी लक्ष्मीबाई त्यांच्या ‘झांसी की नायिका ‘रानी’(1952) मध्ये दिसते. झाशीची राणी हे एका लढाऊ मातेचे देखील रूप आहे, जी आपले मूल अंगावर बांधून शत्रूंशी भिडते. पुढेही राणी चित्रपटातून आणि टी.व्ही. मालिकांतून दिसते. 1857च्या बंडावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर अनेक चित्रपट आले. केतन मेहतांचा रायझिंग- अ बॅलड ऑफ मंगल पांडे, आमीर खानच्या पीळदार मिशांच्या मंगल पांडेमुळे आणि समर्थ हाताळणीमुळे लक्षात राहतो. 

स्वातंत्र्यलढयातील व्यक्तिरेखादेखील दमदारपणे हिंदी चित्रपटांत येतात. शहिद भगतसिंगावरतीच पाच-सहा चित्रपट आले असतील! मनोजकुमारवाला ‘शहीद’ के. एम. बन्सलचा शम्मी कपूरवाला भगतसिंग, सोनू सूदचा ‘शहिद-ए-आझम’, बॉबी देवलचा ‘शहीद’, अजय देवगणवाला ‘लीजंड ऑफ भगतसिंग’ असे अनेक भगतसिंग आपल्याला दिसतात. भगतसिंग (पंजाबी असल्याने) भांगडा नाचू शकतो आणि गाऊ शकतो याचादेखील पुरेपूर उपयोग चित्रपटांनी केलाय. (नशिब, आपल्या आधुनिक नेत्यांना नाचता गाता येत नाही. फक्त नेहरुंचे आदिवासींबरोबर नृत्य करतानाचे एक ‘फुटेज’ उपलब्ध आहे. नाही तर गांधी, सुभाषचंद्र,आंबेडकर आपल्याला नाचता-गाताना दिसले असते!) भगतसिंगांवर इतके चित्रपट आले पण त्यांची विद्वत्ता, प्रचंड वाचन, तुरुंगातील त्यांच्या ‘प्रिझन डायरीज’, त्याचे कम्युनिस्ट असणे एकाही चित्रपटात दिसले नाही.

राकेश ओमप्रकाश मेहेरांनी आपल्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटात (अमीर खान,कुणाल कपूर, इ.) या इतिहासाचा फार खुबीने वापर करून त्याला आधुनिक काळाशी जोडले आहे. स्यूई ही विदेशी तरुणी चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाकउल्ला खान, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या आयुष्यावर माहितीपट बनवण्यासाठी येते. या पात्रांसाठी अमीर खान, कुणाल कपूर अशा आपल्या मित्रांची निवड करते, हळूहळू ते या पात्रांशी ‘रिलेट’ करू लागतात. अशातच सोहाचा पायलट मित्र सदोष अशा लढाऊ मिग-21 विमान अपघातात दगावतो. या विमान खरेदीत गृहमंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेला असतो. तरुण चिडतात, एक प्रसारण केंद्र ताब्यात घेतात आणि देशवासियांना वस्तुस्थिती सांगतात. गृहमंत्र्यांना गोळ्या घालतात. म्हणजे स्वतःच क्रांतिकारी पाउल उचलतात. शवपेट्या, तोफा, विमाने अशा लष्करी सामग्रीतील भ्रष्टाचाराविरुद्ध त्यावेळी तरुणांच्या मनात तीव्र चीड होती, ती या चित्रपटाने नेमकी पकडली, आणि त्याला योग्य कालखंडात नेऊन टाकले!

याच्या अगदी उलट, म्हणजे गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान राजकुमार हिरानींचा गुंड ‘मुन्नाभाई’(संजय दत्त) विलक्षण वेगळ्या कथासुत्राने आणि मांडणीने पुढे नेतो आणि त्याची ‘गांधीगिरी’ आणि ‘जादू की झप्पी’ तरुणांना इतकी आवडते की कधी नाही ते महात्मा गांधीचे ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र विकत घेऊन वाचू लागतात (खरोखरच त्यावेळी या पुस्तकाची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली होती). अहिंसा हे भारतीय मूल्यदेखील तरुणांना स्पर्श करून जाते!

स्वातंत्र्यकालीन नेत्यांवरदेखील हिंदी चित्रपट आले. केतन मेहतांचा परेश रावल यांनी साकारलेला ‘सरदार’ (वल्लभभाई पटेल), जब्बार पटेलांचा मम्मुतीने साकारलेले ‘आंबेडकर’, श्याम बेनेगल यांचा सचिन खेडेकरने साकारलेले ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या चित्रपटांचा उल्लेख करता येतो. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढ तपासणारा ‘ताश्कंद फाइल्स’देखील गेल्या वर्षी येऊन गेला. राजीव गांधीच्या हत्येवर ‘मद्रास कॅफे’ आला. गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटात इंदिरा गांधीसदृश्य एक व्यक्तिरेखा होती. अलीकडच्या काळात मनमोहन सिंगांवर ‘द अ‍ॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ आला. तर मोदी आणि ठाकरे यांच्यावर ही चरित्रपट आले, पण त्यात प्रचाराचा किंवा अपप्रचाराचा भाग अधिक होता. ऐन निवडणुकीच्या आधी ते प्रसारित झाले यावरून काय ते ओळखा! एकंदरीतच नेहरुकालीन देश घडवतानाची दखल मुख्यप्रवाही हिंदी चित्रपटाने हवी तेवढी घेतलेली दिसत नाही. समांतर सिनेमात श्याम बेनेगल यांनी ‘सहकारी चळवळ’ (मंथन), ‘सरंजमशाहीचा अंत’ (निशांत), ‘शोषितांची चीड’ (अंकुर) असे विषय हाताळलेले दिसतात.

देशाला लागणारा प्रमुख घटक जो समाज, त्याच्या समूह संज्ञावलीत काही घटना कायमच्या कोरलेल्या असतात, आणि त्या देशाशी कायमच्या जोडलेल्या असतात. दुसरे महायुद्ध, छळछावण्या, नुरेम्बर्ग ट्रायल, हिरोशिमा - नागासाकी या घटना जशा जागतिक संज्ञाप्रवाहाचा भाग झालेल्या आहेत; तशा काही घटना, कालखंड, स्थित्यंतरे, व्यक्तिरेखा भारतीयांच्या मनःपटलावर कायमच्या कोरलेल्या आहेत. ब्रिटीशराज, स्वातंत्र्यपूर्व मोर्चेबांधणी, 1930चा दांडी मार्च, 8 ऑगस्ट 1942चा भारत छोडो (ऑगस्ट क्रांती), 1943चा बंगालचा मानवनिर्मित दुष्काळ, भारताची फाळणी, स्वातंत्र्य, आणि पाकिस्तानची निर्मिती, नौखालीची आणि आजपर्यंत झालेल्या जातीय दंगली, गांधीहत्या, नेहरूंचे निधन, शास्त्री, संजय गांधी अपघाती निधन, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्या, बाबरी मशीद पाडणे, संसद हल्ला ते  26/11 चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला, असे वेळोवेळी अनेक ठिकाणी झालेले अतिरेकी हल्ले, पाकिस्तान, चीनबरोबर झालेली युद्धे, पाकिस्तानचे छुपे दहशतवादी हल्ले आणि या सर्व हल्ल्यांना आपण दिलेले प्रत्युत्तर! आणि यातील फारच थोड्या घटना हिंदी सिनेमाच्या नजरेतून सुटल्या आहेत.

- मेघनाद कुळकर्णी
eureka.publicity.mk@gmail.com
(लेखक जाहिरात क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी चित्रपटांसंबंधी विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे.)

चार  भागांत प्रकाशित होणाऱ्या  या लेखाचे  इतर भाग वाचा :

हिंदी चित्रपट आणि भारतीय स्वातंत्र्यलढा 

सामाजिक स्थित्यंतरे आणि हिंदी चित्रपट

Tags: Film Movies Cinema and India Meghnad Kulkarni भारत आणि चित्रपट सिनेमा चित्रपट मेघनाद कुळकर्णी हिंदी चित्रपट Load More Tags

Comments:

डॉ अनिल खांडेकर

भारतीय चित्रपट आणि स्वातंत्र्य लढा , भारतीय चित्रपट आणि स्वातंत्र्योत्तर काळ ...दोन्ही लेख चांगले आहेत. वाचनीय आहेत. पण पसरट आहेत. फार खोलवर चर्चा करण्यापेक्षा आढावा घेतला आहे. तरीही दुर्मिळ आहे.

Add Comment