कोलकाता आणि त्यापाठोपाठ बदलापूर येथील प्रकरणांनंतर जी निदर्शने झाली, त्यामुळे एक बाई म्हणून जी अस्वस्थता निर्माण झालीय, त्याला वाट करून देणे गरजेचे आहे. कोलकाता हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर समजलं जायचं म्हणून, किंवा कदाचित लहान मुली तरी ह्या लिंगपिपासू लोकांपासून सुटतील म्हणून, किंवा डॉक्टरसारखे आदरास पात्र profession ह्याला अपवाद असेल म्हणून वाटू शकणाऱ्या सगळ्या आशावादावर पाणी फिरवणाऱ्या ह्या घडामोडी आहेत.
त्यातही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपा आणि महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने ह्या घटनांचे भांडवल करून राजकारण आरंभले आहे त्याचा जास्त उद्वेग आहे. काही काळ तर हा paranoia इतका प्रचंड वाढला होता की, बस स्टँड वर दिसणारा प्रत्येक पुरुष एक बलात्कारी असू शकतो अशी भीती वाटत होती. तशी परिस्थिती आहे की नाही माहिती नाही; पण बायका आणि त्यातल्या त्यात लहान मुलींच्या माता प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. आणि वाईट ह्या गोष्टीचं जास्त वाटतंय की ह्यावर उपाययोजना कोणालाच करायची नाहीये. राजकीय पक्षांना ह्या प्रशनाचं फक्त भांडवल करायचं आहे.
उपायांचं नंतर पाहू. आधी प्रश्नाची व्याप्ती आपल्या लक्षात आलीय का, ते पाहू. बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार हे स्त्रियांविरोधातील अत्याचारांच्या प्रकारांतील हिमनागाचे फक्त टोक आहे, असे म्हणावे लागेल. जन्माला येण्याच्या आधीपासूनच स्त्रिया अशा प्रकारच्या विविध असमानतेला तोंड देत आहेत.
जन्माच्या आधी गर्भजलपरीक्षण आणि गर्भपात,
मुलीचा जन्म झाल्या झाल्या तिला मारून टाकणे, किंवा सोडून देणे, कचऱ्यात टाकणे,
आनंद साजरा न करणे,
मुलीच्या आईचा शारीरिक-मानसिक छळ करणे,तिला सोडून देणे, तिला खायला प्यायला नीट न देणे,
ऐन वाढीच्या वयात मुलीच्या पोषणाची काळजी न घेणे,
घरातील पुरुष आणि मुलग्यांपेक्षा ती कमी महत्वाची आहे असे तिच्या मनावर बिंबवणे,
शिक्षण देताना किंवा निवडताना कमी खर्चिक पर्याय निवडायला भाग पाडणे,
शाळांमध्ये होत असणाऱ्या लैंगिक अत्याचारांची शक्यता,
कॉलेज मध्ये होणाऱ्या छेडछाडीच्या शक्यता,
वेगवेगळ्यां कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणे,
उच्च शिक्षण घेण्याची संधीच न मिळणे,
बालविवाह किंवा इच्छा नसताना लग्न करावे लागणे,
हुंडा,
हुंडाबळी,
घरगुती हिंसाचार,
Anemia, कुपोषण,
कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा recognition शिवाय घरकाम करावं लागणे,
Acid attacks,
एकतर्फी प्रेमातून होणारे खून आणि तसे प्रयत्न,
Honor killing,
बलात्कार,
सामूहिक बलात्कार आणि खून,
अत्याचार झाल्यानंतर victim blaming,
मानवी तस्करी,
वेश्याव्यवसाय करण्याची जबरदस्ती,
म्हाताऱ्या बायकांना सोडून देणे,
खटना/genital mutilation,
लहानपणापासून प्रॉपर्टी मध्ये भाग न मिळणे,
Blackmailing,
Cyber bullying / trolling,
मुलंबाळं/ संसार ह्यासाठी निरुपायाने compromise करावे लागणे,
घरात घरकाम आणि सणवार/आजारपणं ह्यासाठी कायम गृहीत धरले जाणे,
कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण/ backbitching,
मणिपूर किंवा हाथरस सारख्या ठिकाणी होणारे जातीयवादी विद्वेषातून सामूहिक अत्याचार
इत्यादी अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक अत्याचारांचा / अन्यायांचा सामना एक मुलगी करत असते. ह्या प्रत्येक गोष्टींसाठी एक सामान्य मुलगी vulnerable राहते. कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या अन्यायाच्या आहेत, ह्याची जाणीव सुद्धा मुलींना होत नाही. दुय्यमपण स्वीकारूनच तिला जगायला शिकवले जाते. बरं, कुटुंबासाठी ही पडती बाजू घ्यायला तिची तक्रारसुद्धा नाहीये. माझ्या ओळखीतल्या एक बाई म्हणाल्या होत्या की, बाई दुय्यमपणा घेते म्हणून कुटुंबसंस्था टिकून आहे. जे खरंही आहे. पण किती पडती बाजू घ्यावी ह्यालाही मर्यादा असायला पाहिजे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे समाजात वावरताना बाई सतत एक प्रकारची भीती मनात बाळगून असते. त्याचा तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत राहतो.
बलात्कार करणाऱ्यांमध्ये स्त्रियांच्या ओळखीतले पुरुष जास्त असतात असे एक ढोबळ निरीक्षण आहे. तिचे वडील, भाऊ, दीर, सासरे, काका, मामा, शिक्षक, मित्र, सहकारी, subordinates, प्रियकर, नवरा असे सगळे आजूबाजूला वावरणारे पुरुष वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळ्या कारणांनी अत्याचार करताना सापडतात. म्हणजे विश्वास ठेवायला कुठेही जागा नाही. आणि पूर्णपणे सुरक्षित म्हणावी अशी जागाही ह्या भूतलावर नाही. म्हणजे मोकळ्या सुनसान जागा आहेतच; पण घरीसुद्धा, दिवसाढवळ्यासुद्धा अत्याचार होऊच शकतात. शक्यता नाकारता येत नाही.
स्वसंरक्षणाचे धडे ती गिरवू शकतेच पण ते कधीही पुरेसे होणार नाहीत. ह्यावर उपाय सत्ताधारी करू शकतात पण त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही. पश्चिम बंगाल सरकारने ‘अपराजिता’ विधेयक आणले खरे, पण त्यावर साधक बाधक चर्चा करून मार्ग काढण्याचे विरोधकांचे धोरण नाही. तीच गत महाराष्ट्रात आहे.बलात्कारी लोकांना फाशी द्यावी अशी मागणी जोर धरतेय पण तो ह्यावर उपाय नाही आणि प्रयत्न केला तरी बलात्कारी लोकांविषयी करुणा वाटत नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी असे वाटते, पण त्यानेही प्रश्न मिटणार नाही. बलात्काराची वारंवारिताच एवढी आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की फक्त कठोर शिक्षेने विषय संपत नाही. खरं तर जे लोक असे लिंगपिपासू आहेत, बाहेर मोकाट फिरत आहेत, त्यांना कशाचीच तमा नाहीये. त्यांना विधिनिषेधच नाही. किंबहुना हे लोक इतके paranoid आहेत की अशी शिक्षा जरी सुरू झाली तरी त्यांना त्याची बातमीही समजणार नाही. हे लोक पॉर्नच्या आहारी गेलेले मनोरुग्ण आहेत. आणि त्यांना वेळेच्या आधी ओळखण्याचा काहीच मार्ग नाहीये.
पॉर्न हा एक वेगळा विषय आहे. आता हे बॅन होण्याच्या पलीकडे गेलंय. शाळकरी मुलेही सर्रास पॉर्न बघत आहेत. ह्याला भयंकर म्हणावे असे स्वरूप आले आहे. काही संघटना "लैंगिक शिक्षण", "No means No" अशा विषयांवर काम करून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे अजिबातच पुरेसे नाही. लैंगिक शिक्षण महत्वाचं असणारच आहे. कारण मुलामुलींना वयात येण्याआधी किंवा वयात येताना जी माहिती नको त्या स्रोतांमधून नको त्या प्रकारे मिळत जाते, त्याऐवजी इथे योग्य माहिती योग्य प्रकारे मिळाली की, बदल होण्याची शक्यता आहे. पण हे करायचे कुणी आणि कसे हा प्रश्न आहे.
बलात्कार आताच वाढलेत असे नाहीये. इतिहासात सर्व ठिकाणी ह्याच्या खुणा सापडतात. प्रसंगी बलात्कार हे युद्धात हत्यार म्हणून वापरले गेलेले आहेत. अजूनही हे घडतंच. त्यामुळे ह्या सार्वकालिक प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे हेही खरंय. बलात्काऱ्याला शिक्षा मिळाली म्हणजे बलात्कारितेला न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे पुनर्वसन आणि समुपदेशन हेही गरजेचे आहे. समुपदेशन तर फक्त बलात्कारित महिलेचे नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाचे व्हायला हवे. आणि इथेही मेख आहे. आपल्याकडे मोठ्या माणसांच्या शिक्षणाचा मार्गच नाहीये. त्यामुळे समाजातील adults, प्रौढ, जे एवढे rigid झालेत, त्यांचं काय करायचं? त्यांना कसं शिकवायचं?
शाळकरी मुलांना शिकवणे त्या मनाने सोपं आहे. त्यातही मुलगे आठवी-नववीच्या पुढे गेले की, एकदम मर्द व्हायला लागतात. त्याआधी आईच्या पदरात राहणारा मुलगा अचानक आईलाच वेड्यात काढू लागतो. शहाणपणा शिकवू लागतो, आणि आपण म्हणतो मुलगा मोठा झाला. ह्या वयातील मुलामुलींना आपण वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करू शकतो.
अलीकडे उत्तर प्रदेश मध्ये बलात्कार झाल्यावर अटक झालेल्या मुलांना जामीन मिळाल्यावर घरातील बायकांनी ओवाळून मोठे स्वागत केल्याची बातमी वाचली आणि आपण किती हतबुद्ध आहोत याची कीव वाटली.
ह्या सगळ्यात आपण काय करू शकतो? पुन्हा एकदा आपण आपल्या स्तरावर सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करू शकतो जसे की, पेपर स्प्रे बाळगणे किंवा रात्री उशिरा घराबाहेर न पडणे, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, आपल्या आजूबाजूच्या लोकाचे प्रबोधन करणे.
शासनस्तरावर महिला सन्मान विधेयक लवकरात लवकर घेऊन येऊन त्यावर साधक बाधक चर्चा होऊन त्याचे कायद्यात रूपांतर करणे. कारण कायदा, न्यायव्यवस्थेत बदल आणि गतिमानता आली तरच प्रश्नाची दाहकता कमी व्हायला मदत होईल. महिला अत्याचार रोखण्यासाठी विशेष कोर्ट स्थापन करून चौकशी आणि न्यायप्रक्रिया सुलभ आणि जलद करणे, बलात्कार किंवा तत्सम गुन्ह्यातील आरोपींना कोणत्याही प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा न मिळू देणे किंवा त्यांच्यावरील आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत कोणत्याही विशिष्ट अधिकाराच्या पदावर बसू न देणे. भविष्यातील बलात्कार करू शकणारे लोक तर आपण ओळखू शकत नाही पण लहान मुलींसोबत काम करणाऱ्या लोकांचे प्रबोधन आणि त्यांची ओळख ठेवू शकतो. ह्या सगळ्या बाबींमध्ये समाजातील पुरुषांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. आणि तिथेच खरी मेख आहे. पुरुष त्यांचं privilege सोडायला तयार नाहीत. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. सध्या जे होताहेत ते अजिबातच पुरेसे नाहीत. खरं म्हणजे ह्या सगळ्या बाबतींत युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला हवे, पण लोकांना जाणीव नाही.
आज हा लेख लिहीत असताना कोलकात्यामधील डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलंय आणि कामावर रुजू झालेत, आणि बदलापूरमधील बलात्कार करणाऱ्याला Encounterमध्ये मारून टाकलंय. पण ह्याचं राजकारण अजून संपलेलं नाहीये. आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. आणि victimsना न्याय मिळाला का? तर ह्याचं उत्तर नाही असंच आहे. शेवटी हातात काय पडलं, तर हताशा!
- स्नेहलता जाधव
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)
Tags: rape sexual harrassment feminism women saftey for women Load More Tags
Add Comment