मागच्या शतकात मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी अंगावर शेणाचे गोळे झेलले म्हणून आज आपल्याला शिकलेल्या, शिकणाऱ्या मुली दिसत आहेत. म्हणून वैयक्तिक पातळीवर मुलींनी विज्ञानात करिअर करण्यासाठी संघर्ष आज केला, तर उद्या आपण आणखी चांगले जग निर्माण करू शकू. हा संघर्ष विविध पातळीवर मुलींना करावा लागणार आहे.
युनेस्को मार्फत दर वर्षी 11 फेब्रुवारीला ‘आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला आणि मुली दिवस’ (International Day for Women and Girls in Science) साजरा केला जातो. अर्थात, बायकांचा वेगळा विज्ञान दिवस. 2015 पासून याची सुरुवात झाली. यंदा हे दहावे वर्ष आहे. विज्ञान क्षेत्रातील महिला आणि मुली यांचा सहभाग आणि योगदान साजरे करणे असा या दिवसाचा उद्देश आहेच, तसेच हा सहभाग आणखी वाढावा यासाठी प्रयत्न करणे हाही उद्देश आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (Science-Technology-Engineering-Mathematics = STEM = स्टेम) या क्षेत्रांत महिलांचा सहभाग बराच कमी आहे. अगदी 30 टक्क्यांपेक्षाही कमी. याची कारणे निरनिराळी आहेत. आणि ही समस्या फक्त आपली नसून सर्व जगाची आहे. आधी हे समजून घेऊ की, हा सहभाग वाढणे का गरजेचे आहे. इथे Gender (लिंगभाव) हा भाग तर आहेच. म्हणजे जवळजवळ सगळ्यांच व्यवसायक्षेत्रांत महिला आणि मुली कमी असतात. त्यातही काहीच क्षेत्रे अशी आहेत ज्यात पुरुषांपेक्षा महिला जास्त असतात, जसे की नर्सिंग. स्टेममध्ये हा सहभाग विशेष कमी आहे. त्याला Leaky pipeline (गळणारी पाईपलाइन) मॉडेल म्हटले जाते. म्हणजे करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांनी महिलांची गळती होत जाते.
आपल्याकडे तर ह्याची सुरुवात मुलींच्या जन्मापासूनच होते. म्हणजे आधीच मुलींचा जन्मदर कमी, त्यात शाळेत जाण्याचे प्रमाण कमी, त्यातही विद्यान-तंत्रज्ञान ह्या बाजूला मुलींना जाऊ देण्याचा कल कमी, बालविवाह, कौटुंबिक जबाबदारी, मुले बाळे, वगैरे वगैरे... आणि हा सहभाग वाढावा म्हणून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर निरनिराळे प्रयत्न केले जात असले तरीही ही संख्या विशेष वाढत नाही. तसेच gender पॅरिटी (विशिष्ट व्यवसाय क्षेत्रातील स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांच्या संख्येचे आणि कामाच्या विभागणीचे संतुलन), pay पॅरिटि (वेतन समानता) यांबाबत अन्याय्य परिस्थिती दिसून येतेच.
ह्याचा अर्थ ह्या क्षेत्रात कर्तबगार बायका आल्याच नाहीत असे नाही. Gender stereotypes (लैंगिक ठोकताळे / पूर्वग्रह) तसेच वेगवेगळे सांस्कृतिक अडथळे पार करून मारी क्युरी सारख्या विदुषीने पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र अशा दोन विषयांत नोबेल पारितोषिक मिळवण्याची कर्तबगारी केली आहे. विज्ञानात नोबेल मिळवणाऱ्या अनेक सन्माननीय महिला आहेतच, तरीही ज्यावेळी आपण तुलना करतो त्यावेळी त्यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे असे आढळते. ही महिलांच्या सहभागाची, उपस्थितीची उणीव भरून काढायची असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक आणखी प्रयत्न केले पाहिजेत.
(शकुंतला देवी - गणितज्ञ)
ह्यात आणखी एक युक्तिवाद असा असतो की, “काय गरज आहे विज्ञानाला बायकांची? (बायकांनी हा भार उचलायची गरज नाही, घरी बसावे, घर सांभाळावे...)” तर गरज अशासाठी आहे की, मुली आणि महिला ह्यांना सामावून घेण्याने आपल्याला एक चांगला आणि वेगळा दृष्टीकोन (diverse perspective) मिळू शकतो; ज्यामुळे सध्या आपल्या समोर ज्या समस्या आणि प्रश्न आहेत त्यांची आपण चांगली उत्तरे शोधू शकतो. आणि जसे स्वामी विवेकानंद सांगतात की, “पक्षी एका पंखाने उडू शकत नाही,” तसेच विकासाचा गाडा एका पायावर पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच जर महिला आणि मुलींची उपस्थिती STEM क्षेत्रात कमी असेल तर ते चांगल्या संतुलित विकासाचे लक्षण नाही. त्याचबरोबर जशी गणितातली अद्वितीय बुद्धिमत्ता आपण शकुंतला देवी ह्याच्या रूपाने पाहिली, तशीच शक्यता येणाऱ्या काळात अबाधित राहण्यासाठी, किंबहुना आवर्जून निर्माण करण्यासाठी मुलींना संधी द्यायला आपण कमी पडून चालणार नाही.
ह्याबाबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानात असे अनेक ठिकाणी झाले आहे की, केलेल्या कामाचे क्रेडिट / श्रेय बाईला मिळालेच नाही. ते श्रेय कुणीतरी दुसऱ्यानेच लाटले आणि काही बाबतीत हे उशीरा दिले गेले. उदाहरण द्यायचे झाले तर गुणसूत्रांच्या संरचनात्मक विश्लेषणासाठी (DNA - Structural elucidation) रोजालिंड फ्रँकलिन यांनी क्ष-किरण स्फटिकविज्ञानामधून (x-ray crystallography) जी माहिती संकलित केली, तिचा उपयोग करून वॉटसन आणि क्रीक यांनी DNA चे एक मॉडेल (प्रारूप) तयार केले. आजही हे मॉडेल म्हणजे जीवशास्त्रीय संशोधनातला एक अतिशय महत्वाचा मैलाचा दगड समजला जातो. त्यासाठी त्यांना नोबेल पण मिळाले, पण त्याचे श्रेय रोजालिंड यांना तेव्हा मिळाले नाही. आता त्यांना DNA लेडी म्हणून ओळखले जात असले तरी विज्ञान जगत त्यांच्या हयातीत त्यांच्या या योगदानाची योग्य दखल घेऊ शकले नाही, ही खेदाची गोष्ट आहे.
पुन्हा एकदा, समाज म्हणून आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला सर्वांना सोबत घेऊन गेले पाहिजे. आणि या मार्गात अडचणी असणारच आहेत. म्हणजे मागच्या शतकात मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी अंगावर शेणाचे गोळे झेलले म्हणून आज आपल्याला शिकलेल्या, शिकणाऱ्या मुली दिसत आहेत. म्हणून वैयक्तिक पातळीवर मुलींनी विज्ञानात करिअर करण्यासाठी संघर्ष आज केला, तर उद्या आपण आणखी चांगले जग निर्माण करू शकू. हा संघर्ष विविध पातळीवर मुलींना करावा लागणार आहे. जसे की, मुलींनी या कामातून बाहेर पडण्याचे एक प्रमुख कारण 'लग्न आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या' हे आहे. बहुतांश काम करणाऱ्या बायका हा दुहेरी ताण घेऊन काम करत आहेत. इथेही विविध माध्यमातून प्रयत्न चालू असले तरी परिणाम विशेष दिसत नाही. तसेच दुसरे मुख्य कारण मुलांचा जन्म आणि संगोपन ह्यासाठी मुली करिअर सोडतात. त्यामुळे लग्नाळू मुलींना काही लॅब (प्रयोगशाळा) / वैज्ञानिक / कंपन्या कामावर घेतानाच कचरतात. आणि ह्या काळात मुलींची खूप सारी शक्ती आणि वेळ कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर खर्च होतो. परंतु ह्या मुलींनी वर्कफोर्समध्ये पुनरागमन करावे म्हणून सरकारी आणि काही खाजगी कंपन्याही विशेष प्रयत्न करीत असतात. त्या संधीचे बोट पकडून त्याचे सोने करणे हे निश्चितपणे मुलींनी करायला पाहिजे.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी पिळवणूक आणि मानसिक तसेच लैंगिक छळ. ह्याचीसुद्धा वारंवारता आपल्याकडे खूप जास्त आहे. सुरक्षा मिळाली नाही तर मुली बाहेर पडणार नाहीत. म्हणूनच अजूनही कितीतरी ठिकाणी रात्रपाळी मधील नोकऱ्यांसाठी मुलींचा विचारही केला जात नाही. ही आहे संधीची असमानता. शिवाय विज्ञानात संशोधन करणे ही फार किचकट, लांबलचक प्रक्रिया आहे. काही वेळा संशोधक एकेका प्रकल्पा साठी काही दशके खर्च करतात. इतका वेळ सलग बाईला मिळेल ह्याची शाश्वती नसते. तसेच बायकांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या प्रकल्पांसाठी अनुदान किंवा प्रायोजकांकडून फंड (पैसे) मिळतानासुद्धा भेदभाव होताना आणि कमी पैसे मिळताना आढळले आहे. इतके अडथळे असतानाही त्यांना तोंड देत, आणि त्यांच्यावर मात करत आजघडीला ज्या अनेक महिला स्टेम क्षेत्रात संशोधन करत आहेत त्यांना सलाम करायलाच पाहिजे!
- स्नेहलता जाधव
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)
Tags: महिला संशोधक महिक वैज्ञानिक स्टेम STEM अभियांत्रिकी विज्ञान तंत्रज्ञान गणित संशोधन Load More Tags
Add Comment