कोरोनाकाळ आणि ग्रामीण महिला

या काळात त्यांच्या आधीच्याच त्रासाची तीव्रता मात्र वाढली

फोटो सौजन्य: https://www.cgiar.org/

15 ऑक्टोबर हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाकडून या दिवसासाठी निवडण्यात आलेली थीम (विषय) होती - 'कोरोनाकाळात ग्रामीण महिलांनी दाखवलेला लवचीकपणा'. या निमित्तानं 'कोरोनाकाळ आणि ग्रामीण महिला' या विषयाभोवती फिरणारे दोन लेख कर्तव्य साधनाच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. त्यांपैकी हा एक लेख...

कोरोनाचा कहर सुरु असला तरी  जनजीवन हळूहळू पूर्वपदावर  यायला लागलं आहे. अर्थात या काळात आपल्या सगळ्यांच्याच अडचणी वाढल्या. सर्वसामान्यांच्या आमदनीत घट झाली. ग्रामीण भागातली परिस्थितीही फार काही वेगळी नव्हती. ग्रामीण भागात कोरोना बराच उशिरा पोहोचला. तो पोहोचेपर्यंत लोक बरेच जागरूक झाले होते. कोरोनाच्या केसेस वाढण्याआधीच ग्रामीण भागात लॉकडाऊन सुरू झालं.

ग्रामीण जीवनात बरेचदा शारीरिक कष्टांचा, आर्थिक चणचणीचा भार महिलांना कायमच वाहावा लागतो. कोरोनाकाळात त्यांच्या या त्रासात नव्यानं भर पडली का हे पाहणं गरजेचं आहे. 

माझे काही पूर्वग्रह घेऊन मी आजूबाजूच्या बायकांशी बोलायला सुरुवात केली. माझ्या पाहण्यातल्या कितीतरी बायका सुखवस्तू मध्यम वर्गातल्या. त्यांच्याकडून काही मजेशीर गोष्टी समजल्या. अनेक बायकांनी घरकामात वाढ झाल्याची तक्रार केली. ‘पायलीचं दळण केलं तर आठवडाभरसुद्धा जात नाही, माणसं (पुरुष) खा-खा खातायत.’ 

लॉकडाऊनमुळे आलेली अस्वस्थता, घरी जास्तीत जास्त वेळ असणं आणि बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळे बायकांचा आणखी जास्त वेळ चुलीसमोर आणि भांडी घासण्यात जायला लागला... म्हणजे बायका आणखी जास्त वेळ माजघरात ढकलल्या गेल्या....

घरी बसणाऱ्या पुरुषांनी स्वयंपाकघरात लक्ष घालण्याचे अपवादात्मक प्रकार घडले असले तरी बऱ्याचशा पुरुषांना वेळ, ऊर्जा असेल तरी घरकामात बायकांना मदत करावीशी वाटत नाही. ही मंडळी टीव्हीसमोर बसून बायकांना ऑर्डर्स सोडण्यात धन्यता मानतात. किंबहुना तो त्यांचा अधिकार आहे असा त्यांचा समज असतो. 

बायकांनी नवरे मंडळींची सरबराई करावी हा त्यांचा जन्मजात अधिकार आणि बायकांचं कर्तव्य आहे हा गैरसमज एवढा चिवट आहे की, एखाद्या वेळी हे जमलं नाही तर बायकांनाच अपराधी वाटतं. बायकांशी बोलताना हे जाणवत होतं.

एरवी लेकरं शाळेत आणि पुरुष कामावर गेल्यावर घरातल्या बायकांना जरा मोकळेपणा वाटायचा, स्पेस मिळायची. लॉकडाऊनमुळे ती हक्काची स्पेसही या काळात मिळाली नाही. या वेळात जोपासल्या जाणाऱ्या छंद-आवडीतही खंड पडला. गेलाबाजार सकाळची धामधूम संपली की दुपारी आराम करायला वेळ मिळायचा तोही मिळाला नाही. थोडक्यात लॉकडाऊनमध्ये घरी बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यानं गैरसोय वाढली आणि त्याचा ताण बायकांवर यायला लागला. 

स्त्रियांना ही उसंत हवी असते, अहोरात्र घरकाम करताना त्यातूनही स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो याची जाणीवच समाज म्हणून आपल्याला नाही. उलट ‘घरीच आहेत. त्यांना वेगळ्या आरामाची काय गरज?’ असा सनातन विचार मात्र आपण प्रवाही ठेवतो. 

निदान स्त्रियांना उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी जायला मिळतं, या वेळी तेही मिळालं नाही... वर्षभराच्या गडबडीत हे चार दिवस हक्काचे, आरामाचे असतात... तेही हरवले. लेकरं दिवसभर घरी असल्यानं त्यांची सरबराई आणि त्यांचा मोबाईलचा स्क्रीनटाईम कसा कमी करायचा याचं टेन्शन वाढलं.  

बायकांनी आणखी एक तक्रार केली. एरवी लग्न-समारंभांना जाता येतं, मिरवता येतं... ते करता आलं नाही. या बायकांच्या म्हणण्यानुसार घरगुती हिंसाचार झाला नाही. झाला असेल तरी त्यांनी तो कधी कुणाला सांगितला नाही.

ग्रामीण भागातल्या शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षणात खंड पडला आणि आता लॉकडाऊननंतर कॉलेजमध्ये पुन्हा जाऊ द्यायचं की नाही या संभ्रमात लोक आहेत... शिवाय ‘घरीच तर आहेस... मग कर घरकाम’ किंवा ‘घरी बसलीयेस तर चार कामं शिकून घे. सासरी जड जाणार नाही... ’ असे संवाद मुलींना घरोघरी ऐकवले गेले.  

हाताशी काम असणं ही माणसाची मूलभूत गरज आहे याचा पुनःप्रत्यय लॉकडाऊनमध्ये आला. या काळात दोन प्रकारची बेरोजगारी होती...

1.  काम बंद पगार चालू (शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी वगैरे)

2.  काम बंद पगार बंद (असंघटित क्षेत्रांतले कामगार आणि खासगी क्षेत्रांतले कामगार)

पहिल्या वर्गातल्या लोकांनी लॉकडाऊनमध्ये अक्षरशः सुट्टीसारखी मजा केली. जास्त हाल झाले ते दुसऱ्या वर्गातल्या लोकांचे. कनिष्ठ वर्गातल्या काही बायकांशी मी बोलले. यामध्ये काही शेतमजूर बायका आणि घरकाम करणाऱ्या बायका होत्या.  

शेतमजूर बायकांच्या आयुष्यात काही विशेष फरक पडला नाही... कारण इतरत्र लॉकडाऊन असलं तरी शेतातली कामं अव्याहतपणे सुरू होती... पण इतर क्षेत्रांतल्या बेरोजगारीमुळे त्या क्षेत्रांतल्या बेरोजगारांचा ओढा शेतीकडे वळला... त्यामुळे स्पर्धा वाढली. या संधीचा फायदा घेत शेतमालकांनी बांध घालण्यासारखी शेतातली वाढीव कामं उरकून घेतली. काही ठिकाणी पगार काही वेळा उशिरा दिला गेला... पण बहुतेक वेळा तो मिळाला. 

शेतमालविक्रीवर परिणाम झाला होता. व्यापाऱ्यांनी अडवणूक करून भाव पाडल्याची उदाहरणं बघायला मिळाली किंवा काही ठिकाणी माल पडून राहून खराब झाल्यानं नुकसान सोसावं लागलं. कलिंगड, द्राक्ष यांच्या बागा नेमक्या लॉकडाऊनच्या काळात हाताशी आल्या होत्या. त्यांची वितरणसाखळी (सप्लाय चेन) विसकळीत झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या. 

घरकाम करणाऱ्या बायकांना मात्र या काळात फार त्रास झाला... कारण लोकांनी घरकाम करणाऱ्या बायकांना कामावर बोलावणं बंद केलं. काहींची कामं गेली तर काहींना कमी पैसे मिळाले. त्यात घरातला नवरा बेरोजगार झाल्यानं आणि ती बेरोजगारी अनिश्चित असल्यानं काही ठिकाणी घरी रोज भांडणं, मारहाण असे प्रसंग व्हायला लागले... पण तरीही यांपैकी बहुतांश प्रकरणं पोलिसांपर्यंत सहसा गेली नाहीत. 

लॉकडाऊनच्या काळातल्या अनुभवांतून धडा घेऊन महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलीस तक्रारीच्या आधीची एक पायरी प्रशासनानं आपल्या व्यवस्थेमध्ये उपलब्ध करून द्यायला हवी... जेणेकरून असे गुन्हे काळाच्या पोटात गडप न होता त्यांची नोंद घेतली जाईल. 

लॉकडाऊनमुळे दारू-तंबाखू मिळेनाशी झाली. काही ठिकाणी या गोष्टी काळ्या बाजारात दुप्पट, चौपट किमतीला मिळत होत्या... त्यामुळे व्यसनी पुरुष आणखी आक्रमक झाले. तंबाखूपासून तयार केली जाणारी मिसरी मिळत नसल्याची तक्रारही काही बायकांनी केली... पण या काळात काही लोकांचं व्यसन सुटलंसुद्धा...! 

लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी अनेकांनी अव्वाच्या सव्वा दरानं कर्जं उचलली. ती फेडायला आता त्यांना काही वर्षं तरी राबावं लागेल. मात्र सद्यःस्थितीत ना त्यांच्याकडे रोजगार आहे... ना रोजचं जगणं जगायला पैसा... सोबत निसर्गाचं रुद्र रूप या शेतकऱ्यांचं, मजुरांचं नुकसान करून अडचणी अधिकच वाढवत आहे. यात सगळ्यांत जास्त भरडल्या जातात त्या महिला. 

या सगळ्या दुःखांना आणि अडचणींना एक चंदेरी किनारही आहे. या काळात लोक आरोग्याच्या बाबतीत जरा जास्त सतर्क झाले... मात्र अतिरिक्त स्वच्छतेचा आणि सफाईचा ताणसुद्धा महिलांच्याच अंगावर पडला. बाकीची आजारपणं कमी झाली तरी रुग्णांच्या शुश्रूषेचा जास्तीचा ताणसुद्धा महिलांनाच उचलावा लागला. पूर्वी 'टेक केअर' असं फक्त शिकलेले लोक म्हणायचे... पण आता एकमेकांना फोनवरपण बोलताना ‘काळजी घ्याऽ’ हे परवलीचे शब्द झाले आहेत अशी पुस्ती एकानं जोडली. 

थोडक्यात... लॉकडाऊनमुळे ग्रामीण महिलांच्या आयुष्यात काय बदल झाले याचं संक्षिप्त उत्तर द्यायचं झालं तर ते 'काही विशेष नाही' असं असेल... कारण लॉकडाऊनच्या आधीही त्या एक प्रकारे ‘लॉक्ड अप’ आयुष्यच जगत होत्या. 

अर्धवट शिक्षण, तुटपुंजा रोजगार, कमी वयातलं लग्न, अपरिपक्व वयातलं बाळंतपण, शेतात आणि घरात राबत राहणं या गोष्टी त्यांच्या आयुष्याचा भागच होत्या... त्यामुळे ग्रामीण महिलांना विशेष वेगळा काही त्रास झाला नसला तरी आधीच्याच त्रासाची तीव्रता मात्र वाढली. 

लॉकडाऊननं आपल्या सगळ्यांच्या वेगवान आयुष्याला करकचून ब्रेक लावला आणि यात काही लोकांची गाडी उलटून तोंडावर आपटलीसुद्धा... पण जीवन इथं थांबत नाही... 

लाईफ जस्ट गोज्‌ ऑन....

- स्नेहलता जाधव 
snehalatajj@gmail.com

Tags: स्नेहलता जाधव कोरोना ग्रामीण महिला लॉकडाऊन ग्रामीण महिला दिवस Snehlata Jadhav Corona Rural Women Women Issues Lockdown Load More Tags

Comments:

_गणेश

मास्क मध्ये राहणं म्हणजे किती गुदमरने असतय त्यामुळे बुरख्या मध्ये होणारी मुस्लिम महिलांच्या घुसमटीची कल्पना सर्वांनाच आली

Add Comment

संबंधित लेख