'बाईपण भारी देवा'च्या निमित्ताने...

मराठीतले ‘चालणारे’ चित्रपट अजूनही मंगळसूत्र, हळदीकुंकू आणि मंगळागौर या भोवतीच घिरट्या मारतात याबद्दल वाईट वाटते...

चित्रपट हे समाज प्रबोधनाचे माध्यम मानले जात नाही पण काही चित्रपट समाजबदलाला गती देण्याचे काम या ना त्या प्रकारे करत असतात. चित्रपट हे मुख्यतः मनोरंजनाचे माध्यम आहे. आणि ह्या आघाडीवर ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट यशस्वी होतो आहे असे म्हणावे लागेल. सध्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ह्या चित्रपटाने कमाईचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चांगले आणि आणखी ‘व्हर्सेटाईल कन्टेन्ट’ असलेले सिनेमे यायला आता पोषक वातावरण मिळेल अशी आशा वाटते. 

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ह्या चित्रपटाबद्दल सांगायची विशेष बाब म्हणजे कुर्डुवाडीसारख्या निमशहरी गावातल्या एकमेव चित्रपटगृहातही ‘बाईपण भारी देवा’चे दुपारचे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ सुरु आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे या सिनेमाला प्रामुख्याने बायका गर्दी करत आहेत. एरवी ह्या गावात बायका क्वचितच चित्रपटगृहात जातात. या चित्रपटासाठी हाऊसफुल्ल असणाऱ्या चित्रपटगृहात मात्र पुरुषांची संख्या तुरळक, असे व्यस्त चित्र दिसत आहे. शनिवार-रविवार तर बसायला जागा न मिळाल्याने बायकांनी जमिनीवर बसून हा चित्रपट पाहिल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे सर्वप्रथम, हा चित्रपट पाहण्यासाठी बायकांना समुहाने घराबाहेर पडायला भाग पाडल्याबद्दल दिग्दर्शक आणि टीमचे हार्दिक आभार आणि सिनेमाच्या व्यावसायिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन! 

या आधी बायकांनी समुहाने अशा प्रकारे डोक्यावर घेतलेला चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’. म्हणजे एकंदर माहेरच्या साडीनंतर आपण बरीच सामाजिक प्रगती केलीय म्हणायची! 

या सिनेमात सहा बहिणी मंगळागौरीच्या स्पर्धेची तयारी करतात, त्याची गोष्ट दाखविली आहे. देशी आणि विशेषतः मराठीतले ‘चालणारे’ चित्रपट अजूनही मंगळसूत्र, हळदीकुंकू आणि मंगळागौर या भोवतीच घिरट्या मारतात याबद्दल थोडेसे वाईट वाटते. दिग्दर्शक आणि टीम यांचे म्हणणे असे आहे की, ही आपली संस्कृती आहे आणि या सिनेमामध्ये ती मॅग्निफाय होऊन समोर येते आहे. मंगळागौरीमुळे नवीन नवरीचे ग्रूमिंग होते आणि मंगळागौरीतले खेळ बायकांच्या व्यायामासाठी असतात, हे आर्ग्युमेंट खरे की खोटे माहीत नाही पण सर्वसाधारणपणे असे खेळ बायका खूप एन्जॉय करतात, त्यात एक प्रकारचा रोमॅन्टिसिझम असतो. आणि हा हळवा कोपरा या सिनेमाच्या टीमला बरोबर सापडला आहे. मंगळागौर प्रतिकात्मक आणि निमित्तमात्र असली तरी सामान्य मराठी बायका आता ह्यातून बाहेर पडल्या आहेत आणि नसतील तर पडाव्यात. चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा नव्या जोमाने मंगळागौरी चालू होऊ नयेत म्हणजे मिळविली! तरीही यंदा शाळांच्या ‘गॅदरिंग’मध्ये मंगळागौरीचे खेळ दिसतील असा अंदाज आहे. 

सर्वसामान्य स्त्री घरातील आणि बाहेरचे बरेच ताणतणाव समर्थपणे हाताळत आहे आणि त्यात तिच्या प्रकृतीचा बळी चालला आहे. या मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने कित्येक दिवसांनी भेटलेल्या बहिणी-बहिणींमधील मधील नातेसंबंध आणि भांडणं छान दाखवली आहेत. चित्रपटात पुरुषांना जास्त जागा नाही आणि अभिनयाच्या पातळीवर फक्त बायकांनी हा चित्रपट तोलून धरला आहे. सहाही बहिणींचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटतो. चित्रपटाचे कास्टिंग अतिशय उत्तम झाले आहे. सहा बहिणींच्या पात्रांमध्ये काम करणाऱ्या एकेकाळच्या उत्तम आणि सुंदर अभिनेत्री एकत्र पाहणे हा चांगला अनुभव आहे. पण निमित्ताने आणखीही एक गोष्ट लक्षात येते म्हणजे ह्यांच्या ‘कॅलीबर’चे काम ‘इंडस्ट्री’मध्ये तयार होत नाहीये. 

चित्रपट पाहताना तो कुठेही बोअर वाटत नाही. चित्रपटाला छान गती आहे. गाणी चांगली आहेत. ‘नाच ग घुमा’ मात्र इतके जलद गतीने पुढे जाते, की त्यातले सौंदर्य लक्षात येत नाही. नृत्य सुंदर आहेत पण पडद्यावर ‘लार्जर दॅन लाईफ’ गोष्टी दिसत असल्याने हे पुरेसे वाटत नाही. चित्रपटातील विनोद मराठी गल्लाभरू चित्रपटांच्या एकंदर शैलीला पूरक आहेत! काही ठिकाणी ओढून ताणून कॉमेडी घुसडल्यासारखे वाटते. काही प्रसंग असे आहेत की, जिथे चित्रपट पाहणाऱ्या बायका पात्रांसोबत रडतात... पण एकंदरीत फार मेलोड्रामा न करता गोष्ट पटकन पुढे सरकते हे दिग्दर्शकांना फार चांगले साधले आहे. 

बाईपण हे आईपणाशी आणि आईपण देवपणाशी जोडलेले असते. पण फक्त आईपण म्हणजेच बाईपण नसते हे सिनेमात अधोरेखित केलं गेलं आहे ही समाधानाची बाब आहे. 


हेही वाचा : एका दुर्लक्षित चित्रपटाची पंचविशी - मॅक्सवेल लोपीस


या सिनेमाला बायका गर्दी करताहेत पण पुरुष का कमी जाताहेत? यात पुरुषांनी पाहू नये असे काहीच नाही. बायका महान असतात वगैरे अशी स्तुती त्यात नाही. साध्या बायका, त्यांचं आयुष्य आणि त्यांचे छोटे-मोठे प्रश्न यांनी हा सिनेमा बनलाय. पण कदाचित ‘बायकांचा सिनेमा’ म्हणून पुरुष तो पाहायला जात नाहीत. याची सुरुवात नावापासूनच आहे. बाई भारी वगैरे असते हे बहुतांश पुरुषांना मान्य नाही. किंवा तसे मान्य करण्यात पुरुषांना प्रॉब्लेम आहे. दुसरी एक शक्यता म्हणजे चित्रपटगृह बायकांनी भरून गेल्याने पुरुषांना अवघडल्यासारखे होत असावे. पण पुरुषांनी भरून गेल्याने बायकांनाही कित्येक महत्त्वाच्या आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी अवघडल्यासारखे होते हे कधी पुरुष जातीच्या गावी आहे का? सामाजिक/कौटुंबिक विषय स्त्री-पुरूष यांनी एकत्र चर्चिले पाहिजेत. लहान मुलांना आपण बऱ्याच गोष्टी शाळेत शिकवू शकतो पण मोठ्यांना शिकण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थाच नाही. मोठ्या लोकांचे प्रबोधन कसे करावे ह्याला मार्ग नाही. ‘बाईपण भारी देवा’ सारखे चित्रपट किमान चर्चेस तोंड तर फोडू शकतात. पण पुरुषांनी या चित्रपटास वाळीतच टाकल्याने तीही शक्यता दिसत नाही. 

चित्रपटाच्या किंवा एकुणात कुठल्याही गोष्टीच्या प्रसिद्धीसाठीचा ‘माउथ पब्लिसिटी’ हा मार्ग आपण सर्वजण इतक्या दिवसांत विसरलो होतो का, असा प्रश्न पडतो. बायका गर्दी करून समुहाने सिनेमाला जात आहेत; कारण बायका एकमेकींना या चित्रपटाविषयी सांगत आहेत आणि मग नटून, तयार होऊन घोळक्याने जात आहेत. ही नवी गंमत या निमित्ताने पाहायला मिळते आहे. चित्रपटांच्या प्रेक्षक बायकाही असतात, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टीही मोठ्या पडद्यावर दिसल्या पाहिजेत ही जाणीव या निमित्ताने तयार झाली तरी पुरेसे आहे. 

बाहेर काम करणाऱ्या किंवा काम न करणाऱ्या; श्रीमंत किंवा सर्वसाधारण या सगळ्याच प्रकारच्या बायका पूर्णतः सुखी नाहीत, हे सिनेमात दाखवले आहे. ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ सांभाळताना बायकांची किती तारेवरची कसरत होते हे खरं म्हणजे पुरुषांनी जास्तकरून बघायला पाहिजे..पण ते घडत नाही ह्याची खंत वाटते. पळून जाऊन लग्न केले तरीही बाई पुन्हा अडकतेच. एकंदर बाईचे आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत होऊन जाते. एका पिढीनंतर दुसरी पिढी पुन्हा त्याच चिखलात रुतत जाते हे खूप कमी वेळात दाखवणे चित्रपटात साधले आहे. त्यामुळेच हा चित्रपट वेगवेगळ्या स्तरातील आणि वयोगटातील बायकांच्या काळजाला भिडतोय असे दिसते. या सहा बहिणींपैकी प्रत्येकीची आपापल्या प्रवासाची वेगवेगळी गोष्ट असली तरी एकूण चित्रपटाची भेळ उत्तम जमून आली आहे. चित्रपट हसवतो, रडवतो आणि स्त्रीसुलभ लाजायलाही लावतो. 

चित्रपट हे समाज प्रबोधनाचे माध्यम मानले जात नाही पण काही चित्रपट समाजबदलाला गती देण्याचे काम या ना त्या प्रकारे करत असतात. चित्रपट हे मुख्यतः मनोरंजनाचे माध्यम आहे. आणि ह्या आघाडीवर ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट यशस्वी होतो आहे असे म्हणावे लागेल. सध्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ह्या चित्रपटाने कमाईचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चांगले आणि आणखी ‘व्हर्सेटाईल कन्टेन्ट’ असलेले सिनेमे यायला आता पोषक वातावरण मिळेल अशी आशा वाटते. 

पण या सिनेमाचा विषय तद्दन मध्यमवर्गीय सुखवस्तू बायकांभोवती फिरत राहतो ह्याचे वाईट वाटते. मुळात ह्याच कारणामुळे सिनेमाला जाणाऱ्या बायका स्वतःला त्याच्याशी ‘रिलेट’ करताहेत आणि सिनेमाला गर्दी करताहेत. परंतु बाईपणाचा कैवार घेतलेल्या या सिनेमात वेश्या नाहीत, पोलीस बायका नाहीत की बायकांमागचे कॉर्पोरेट ताणतणाव नाहीत. गेला बाजार घरकाम करणाऱ्या मोलकरणीही नाहीत. आणि ज्या बायका आहेत त्या स्वयंपाक सोडून इतर घरकाम करताना दिसत नाहीत. म्हणजेच चित्रपटाचा परीघ खूप अरुंद तर आहेच पण शेवटी तो अत्यंत गुळगुळीत गल्लाभरू चित्रपट होऊन जातो. सगळ्या गोष्टी एकाच चित्रपटात आणणे शक्य नाही हे समजून घेतलं तरी हा चित्रपट बघून बायकांना नक्की काय मिळतंय हे सांगणं अवघड आहे.

सारांश असा की, ‘बाईपण भारी देवा’मध्ये दिग्दर्शक केदार शिंदेना बायकांच्या मनात काय चाललंय ह्याचा सुगावा लागलेला दिसतो आणि ही अशक्यप्राय जादू घडल्याने भविष्यात त्यांच्याकडून येणाऱ्या चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावल्या आहेत! 

- स्नेहलता जाधव, सोलापूर
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)  


'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा ट्रेलर :

 

Tags: बाईपण भारी देवा केदार शिंदे मराठी चित्रपट रोहिणी हट्टंगडी वंदना गुप्ते सिनेमा Load More Tags

Comments:

मंजिरी देशमुख

लेख चांगला आहे…. पण एकच सांगावेस वाटते की डोकं शांत ठेऊनदोन अडीच तास विरंगुळा म्हणून हा चित्रपट पाहावा.. व आनंद घ्यावा..

Chandrahar shinde

1).हा चित्रपट पाहताना प्रत्येक स्त्री कुठे ना कुठेतरी स्वतःला रिलेट करते व कनेक्ट होते 2) स्त्री स्वभावाचे बारकावे व्यवस्थित मांडले गेलेत 3) हा चित्रपट पुरुषांनी उत्सुकता म्हणून आणि स्त्रियांना अजून समजून घेण्यासाठी पहायला हरकत नाही 4) चित्रपट पाहून बाहेर पडताना खरच आपण स्त्रियांच्या लोकल डब्यातून बाहेर पडलो की काय असा भास होतो....

Rakesh Shete

चित्रपटाचा ओघवता सारांश आणि धन व ऋण बाजूने मांडलेली समीक्षा योग्य वाटते. स्त्रीजन्मावरील भाष्याबरोबरच लेखिकेची लेखनशैलीही उत्तम आहे.

Add Comment

संबंधित लेख