डॉनबास : देशभक्ती, माणुसकी आणि युद्ध

रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका युक्रेनियन युद्धपटावरील लेखाची पुनर्भेट

गोव्यातील पणजी येथे दरवर्षी 20 ते 30 नोव्हेंबर या काळात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतो, त्या महोत्सवाला मीना कर्णिक गेली अनेक वर्षे उपस्थित राहतात. 2018 या वर्षी त्या महोत्सवातील त्यांना विशेष भावलेल्या चित्रपटांविषयींचे त्यांचे पाच लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले होते. त्यांतील 22 डिसेंबर 2018 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख. गेले दोन आठवडे रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यवर काही विशेष युद्धपटांवरील, विविध लेखकांच्या सहा ते सात लेखांची मालिका प्रस्तावित आहे. सामान्यतः साप्ताहिकातील कोणताही लेख कर्तव्यवर थेट स्वरूपात प्रसिद्ध केला जात नसला तरी अरुण टिकेकर यांच्या ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या चित्रपटावरील आणि मीना कर्णिक यांच्या ‘डॉनबास’ या चित्रपटावरील लेखांची प्रस्तुतता लक्षात घेऊन ते कर्तव्यवर पुनर्प्रसिद्ध केले आहेत. -संपादक

युक्रेनचे दिग्दर्शक सेर्जी लॉझनित्सा यांच्या ‘डॉनबास’ या सिनेमाने इफ्फी 2018 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. दोन शत्रू एकमेकांसमोर युध्दाला उभे ठाकतात तेव्हा खरं तर कोणीच जिंकत नाही, मृत्यू होतो तो माणुसकीचा- असं सूचित करणाऱ्या या सिनेमाविषयी...

युक्रेनमधल्या डॉनेट्‌स्क आणि लुहान्स्क या दोन भागांना मिळून ‘डॉनबास’ असं म्हणतात. 2014 मध्ये युक्रेनमध्ये प्रस्थापित सरकारच्या विरोधात बंड झालं. युरोपियन युनियनशी अधिक चांगले संबंध असावेत, असं मानणाऱ्या गटाने युरोमेडन चळवळ सुरू केली. राष्ट्राध्यक्ष व्हितोर यानुकोविच यांना आपलं पद गमवावं लागलं. पण त्यांच्या बाजूने असणारा गटही रस्त्यावर उतरला. याच काळात डॉनबासमध्ये सरकारच्या  विरोधात आणि रशियाच्या बाजूने असलेल्या गटाने निदर्शनं केली.

दक्षिण व पूर्व युक्रेनमध्ये ही चळवळ पसरली आणि त्याला हिंसक रूप मिळालं. जणू काही डॉनेट्‌स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक हा विघटनवादी गट युक्रेनचं सरकार यांच्या दरम्यान युध्द सुरू झालं. विघटनवादी गटांमध्ये रशियन नागरिक आणि रशियन निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी होते. दि. 5 सप्टेंबर 2014 रोजी रशियाआणि युक्रेनने युध्दबंदी पुकारून मिन्स्क प्रोटोकॉलवर सह्या केल्या. मात्र, घुसखोरांनी काबीज केलेल्या भागावरून पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू झाली आणि 2015 च्या जानेवारी महिन्यात ही युध्दबंदी पूर्णपणे कोसळली. दोन्ही बाजूंकडून धुवांधार गोळीबार, बॉम्ब यांचा मारा होऊ लागला. कालांतराने ‘मिन्स्क-2’ या नावाने नव्याने शांततेची घोषणा झाली असली, तरी युक्रेनमधली अशांतता अजून पूर्णपणे संपलेली नाही.

युक्रेनचे दिग्दर्शक सेर्जी लॉझनित्सा यांचा ‘डॉनबास’ हा सिनेमा याच काळात घडतो. सिनेमाचे तेरा लहान-लहान भाग आहेत. कधी दक्षिण युक्रेनमधल्या एखाद्या गावातली घटना आपण पाहतो, तर कधी दिग्दर्शक आपल्याला पूर्व युक्रेनमध्ये नेतो. या सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेतच असं नाही, पण त्यांच्यात अर्थातच एक समान धागा आहे- हिंसा आणि भ्रष्टाचार. सिनेमाची सुरुवात होते, तेव्हा आपल्याला दिसतात एका व्हॅनमध्ये मेकअप करणारी काही माणसं- कुठल्या तरी चित्रीकरणासाठी तयार होत असलेली. या कलाकारांना मग व्हॅनमधून बाहेर काढण्यात येतं आणि कोणाच्या नजरेत येणार नाही अशा रीतीने एका ठरावीक स्थळी नेलं जातं. इथे उद्‌ध्वस्त झालेल्या गाड्या आहेत, जमिनीवर मरून पडलेली काही माणसं आहेत. आणि टेलिव्हिजनचे कॅमेरेही आहेत. या कलाकारांचं काम आहे, समोर दिसणारं दृश्य पाहून धक्का बसल्याचा अभिनय करण्याचं. ‘फॅसिस्टांनी हे काय चालवलंय?’ असं म्हणून दु:ख व्यक्त करण्याचं. प्रत्यक्षात घडलेल्या हिंसाचारावरच्या या प्रतिक्रिया टीव्हीवर खऱ्या म्हणून दाखवल्या जाणार आहेत. हा सगळा एका प्रचाराचा भाग आहे, हे आपल्या लक्षात यायला मग वेळ लागत नाही. प्रतिस्पर्धीही काही संतमंडळी नाहीत.


हेही वाचा : पहिला Sci-Fi हिंदी सिनेमा बनवण्याच्या जबाबदारीची जाणीव मला होतीच. - आरती कडव


पुढच्या दृश्यात दिग्दर्शक आपल्याला सरकारी बैठकीत घेऊन जातो, जिथे एक बाई आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले म्हणून मंत्र्यावर विष्ठा ओतते. दुसरा एक सरकारी अधिकारी हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना आपण कसे तुमच्यासाठी काम करत आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या प्रवाशांची बस मधेच थांबवली जाते. त्यांच्याही हे अंगवळणी पडलंय. इतकं की, एक सैनिक सूपमध्ये बुडवून खायला पाव नाही असं म्हणतो, तेव्हा बसमधली बाई थंडपणे आपल्या पिशवीतला पाव काढून त्याला देते. याच बसमधून पुरुषांना खाली उतरवलं जातं. सैनिक त्यांच्यावर भेकडपणाचा आरोप करतात. त्यांना कपडे उतरवायला लावतात. दुसरीकडे एका जर्मन पत्रकाराची खिल्ली उडवली जाते. त्याला फॅसिस्ट म्हणून धमकावलं जातं. आणि ‘तू नसशील, पण तुझा आजोबा निश्चितच फॅसिस्ट होता,’ असंही ऐकवलं जातं.  

आणखी एका ठिकाणी एका उद्योगपतीची गाडी चोरली गेली म्हणून तो तक्रार द्यायला येतो. गाडी मिळालेली असते, पण आता ती सरकारने आपल्या ताब्यात घेतलेली असते. ‘‘आम्ही तुमच्यासाठी इतकं करतोय, तुला एक गाडी देता येत नाही?’’ पोलीस त्याला प्रश्न विचारतात आणि त्याने ‘नाही’ म्हटल्यावर, ‘‘तुझ्या  मुलीला शाळेतून आणायला जायचंय ना तुला?’’ अशी धमकीही देतात. याच गदारोळात कोणी एक मुलगी आणि एक मुलगा लग्न करत असतात. त्या समारंभातलं नाचगाणं, तो आवेश सगळंच बीभत्स आणि हिंसक आहे. आणि हो, राष्ट्रभक्तिपरही. मधेच दिग्दर्शक आपल्याला बेसमेंटमध्ये राहणाऱ्या माणसांची बिकट परिस्थिती दाखवतो आणि बॉम्बस्फोटामध्ये होणाऱ्या गाड्यांच्या ठिकऱ्यासुध्दा. एका प्रसंगात शत्रुपक्षाची चाकरी करणारा एक पुरुष खांबाला बांधून ठेवल्याचं आपल्याला दिसतं. ‘‘मी केवळ तिथे स्वैपाकघरात नोकरी करत होतो-’’ असं  केविलवाण्या चेहऱ्याने सांगणाऱ्या या पुरुषावर येणारी  जाणारी जनता तुटून पडते.

कोणी त्याच्या मुस्काटात मारतं, कोणी पोटात गुद्दा. कोणी बाई देशद्रोही म्हणून त्याच्यावर थुंकते, तर कोणी तरुण रक्ताने माखलेल्या त्याच्या चेहऱ्यासोबत सेल्फी काढू पाहतो. आणखी कोणी अत्यंत आनंदाने या सगळ्याचं फोनवर शूटिंगही करतो. त्याच्याभोवती जमलेल्या गर्दीतल्या प्रत्येकाला त्याची हेटाळणी करायचीये. आपली देशभक्ती त्याव्दारे सिध्द करायचीये. जणू काही त्याच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारला की आपण आपोआपच सुजाण, जागरूक आणि देशावर प्रेम करणारे नागरिक बनणार आहोत! या सिनेमातले काही काही प्रसंग पाहताना भीती वाटते. इतक्या मोठ्या प्रमाणातल्या हिंसेपासून आपण आज कदाचित दूर आहोत, पण आपल्या देशातल्या आज घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब त्या प्रसंगांमध्ये दिसल्यावाचून राहत नाही. झिंग चढली की माणूस कुठल्या स्तराला जातो, सत्ता आली की समोरच्याला कुठल्या पातळीवर नेतो याचं भेदक चित्रण दिग्दर्शक प्रत्येक फ्रेममधून आपल्याला दाखवू लागतो आणि आपणही मग आपला भोवताल तपासून पाहू लागतो.

दिग्दर्शक सेर्जी लॉझनित्सा मूळचे बेलारूसचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा बेलारूस हा रशियाचा भाग होता. मात्र लहान असतानाच त्यांचं कुटुंब युक्रेनला आलं आणि तिथेच स्थायिक झालं. सतरा वर्षांपूर्वी सेर्जी यांनी आपल्या कुटुंबासहित जर्मनीला स्थलांतर केलं. पण म्हणून युक्रेनमधल्या घटनांपासून ते स्वत:ला दूर ठेवू शकले नाहीत. सुरुवातीला त्यांनी डॉक्युमेंटरीज केल्या, पण त्याबरोबरच ते सिनेमे बनवायलाही लागले. ‘माय जॉय’ हा त्यांचा पहिला सिनेमा. 2010 मध्ये केलेला हा सिनेमा रशियन भाषेत होता आणि कानच्या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये निवड झालेला पहिला युक्रेनियन सिनेमा ठरला. त्यानंतर आलेले त्यांचे ‘इन द फॉग’, ‘मैदान’, ‘द ब्रिजेस ऑफ सारायेवो’, ‘अ जन्टल क्रिचर’ हे सिनेमेही खूप गाजले. (‘द ब्रिजेस ऑफ सारायेवो’मध्ये युरोपातल्या तेरा दिग्दर्शकांनी सारायेवो या शहराचं युरोपियन इतिहासातलं स्थान आणि आजचं महत्त्व या थीमवर हा सिनेमा बनवला होता. सेर्जी लॉझनित्सा त्यांपैकी एक होते.) ‘डॉनबास’मध्ये युक्रेनची गोष्ट सांगायची तर तो युक्रेनमध्येच चित्रित व्हायला हवा, म्हणून सेर्जी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी युक्रेनच्या सरकारकडून आर्थिक साह्य घेतलं. अर्थात, युरोपमधल्या जर्मनी, फ्रान्स, चेक रिपब्लिक इत्यादी देशांनीही सिनेमाच्या निर्मितीमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

कानमध्ये सेर्जी यांना अनसर्टन रिगार्डच्या विभागात या वर्षीचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालाय, तर 2019 च्या ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषिक सिनेमासाठीची ती युक्रेनची अधिकृत एन्ट्री आहे. आपल्या या नव्या सिनेमाविषयी सेर्जी म्हणतात, ‘‘ही विभाजनाविषयीची गोष्ट आहे आणि याला केवळ रशिया जबाबदार आहे. आजूबाजूला सगळं उद्‌ध्वस्त होताना दिसतंय. माणसं, नैतिकता- सगळंच. आणि आम्ही त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. माझा सिनेमा मुळातच शोकात्म आहे. लोकांना जे सहन करावं लागतंय, त्याविषयी आहे. इथल्या लोकांच्या डोळ्यांत पाहा, आजूबाजूला नजर टाकून पाहा- सगळीकडे व्रण दिसतात. मग दुसरं काही मी कसं काय दाखवू शकणार? युक्रेनमध्ये चाललेल्या या युध्दाचे परिणाम प्रत्येक शहरात दिसताहेत. रस्त्यात लोकांमधल्या गप्पा ऐकल्या तरी ते जाणवतं.

2008 मध्ये ‘माय जॉय’चं चित्रीकरण करत असताना या भागात होणाऱ्या युध्दाची चाहूल मला लागली होती. त्यावेळी माझ्या सिनेमात काम करणाऱ्या इथल्या ट्रक ड्रायव्हर्सशी बोलताना मी त्यांना विचारलं होतं, रशियाने तुमचा भाग बळकवायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? आम्ही शरण जाऊ, असं उत्तर यातल्या बहुतेकांनी दिलं होतं. दोन देशांमधली सीमा नष्ट झाली, तर तुम्हाला तुमचं कामही गमवावं लागेल, असं मी म्हटल्यावर ते विचारात पडले होते. ‘डॉनबास’चं शूटिंग करताना सेर्जी यांनी लोकांकडून काही व्हिडिओज मिळवले होते. ते सांगतात, ‘‘युध्द चालू झालं की, लोक बेसमेंटमधल्या खोल्यांत आसरा घेतात, या व्हिडिओचा मी सिनेमात वापर करून घेतला. माझ्याकडे असे अनेक व्हिडिओ आले होते. त्यातून निवड करताना मी काही निकष वापरले. म्हणजे ती घटना वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचं वर्णन करणारी असायला हवी. भ्रष्टाचाराची व्याख्या म्हणजे केवळ कोणी कोणाला लाच दिली, इतकीच सीमित नाही; ती अधिक व्यापक आहे.’’

मूल्यांचा भ्रष्टाचार, व्यक्तीचा भ्रष्टाचार, समाजाचा भ्रष्टाचार आणि त्या समाजाचं  होणारं विभाजन- हे सगळं मला दाखवायचं होतं आणि त्यानुसार मी माझ्याकडे आलेल्या व्हिडिओंमधून निवड केली.’’ एक प्रकारे ‘डॉनबास’ हा निव्वळ सिनेमा नाही, तो डॉक्युमेंटरी सिनेमा आहे. यातल्या घटनांना सत्याचा आधार आहे, म्हणूनच तो अंगावर येतो. तो युध्दाचे भीषण परिणाम सांगणारा आहे तसंच देशभक्तीच्या फोल कल्पना मांडणाराही आहे. एक भीषण, रखरखीत वास्तव प्रेक्षकांसमोर ठेवणारा आहे. आणि अर्थातच, त्यावर विचार करायला लावणारा आहे. ‘डॉनबास’चं ट्रेलर तुम्हाला इथे बघायला मिळेल.

- मीना कर्णिक, मुंबई
meenakarnik@gmail.com 


'डॉनबास' (चित्रपट)

 

Tags: सिनेमा हॉलिवूड मीना कर्णिक दिग्दर्शक इफ्फी Load More Tags

Add Comment