उत्सवाला सुरुवात...

20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान पणजी येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे.

malayalam.samayam.com

आजपासून पणजी येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु होत आहे. त्यानिमित्ताने तिथे उपस्थित राहून मीना कर्णिक पुढचे दहा दिवस कर्तव्यसाठी पाच-सहा भागांची डायरी स्वरूपातील लेखमाला लिहिणार आहेत.

पणजी. वर्षातल्या या आठ दिवसांचं घर. घरच! शहरात गाडी शिरली की खरोखरच आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. आधी आयनॉक्सशी भेट होते, मग कला अकादमी, आणि मग दर वर्षीची आपली वाटणारी ठिकाणं. आयनॉक्सच्या आवारात डोकावलं की ओळखीचे चेहरे हमखास दिसतात. एकमेकांना एकमेकांची नावं माहीत नसली तरी ओळखीचं हसू येतं. हाय, हॅलो होतं. आणि सुरू होते या वर्षीच्या महोत्सवातल्या चित्रपटांविषयीची चर्चा.

20 ते 28 नोव्हेंबर या आठवड्यात दर वर्षी पणजीला भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया- इफ्फी) आयोजन केलं जातं. हे वर्षं तर सुवर्णमहोत्सवी वर्षं आहे. त्यामुळे पणजी शहर जरा जास्तच नट्टापट्टा करून सजलंय. आज उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर ओपनिंग फिल्म दाखवली जाईल. आणि मग उद्यापासून जगभरातल्या विविध देशांमधून आलेल्या सिनेमांच्या स्क्रिनिंगला सुरुवात. म्हणजे खर्‍या अर्थाने चित्रपट महोत्सवाचा श्रीगणेशा.

आज भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये असे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्हायला लागले आहेत. आणि या महोत्सवांना स्थानिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळू लागलाय. अशा महोत्सवांचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे? काय मिळतं आपल्याला विविध देशांमधल्या निरनिराळ्या दिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टी पाहून? काही फरक पडतो का आपल्या रोजच्या जगण्यामध्ये? कशाला बघायचे हे सिनेमे?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोणत्याही महोत्सवाला हजेरी लावली की मिळतात. उदाहरणादाखल या वेळच्या महोत्सवांमधल्या एक दोन सिनेमांची झलक पाहू. या वर्षीची ओपनिंग फिल्म आहे ‘डिस्पाईट द फॉग.’ गोरान पास्कलेएविक या दिग्दर्शकाचा हा इटॅलियन सिनेमा रोममधल्या एका जोडप्याची आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या मोहम्मद नावाच्या लहान मुलाची गोष्ट सांगतो. मोहम्मदचे आईवडील त्याला घेऊन आपल्या देशातून पळतात. मात्र, समुद्रात त्यांची रबराची बोट उलटते आणि त्यात त्यांचा अंत होतो. काम आटोपून घरी परतणार्‍या पावलोला मोहम्मद सापडतो आणि तो त्याला घरी घेऊन येतो. बायकोला ते अजिबात आवडत नाही. नवरा, बायको आणि मोहम्मद यांच्यातल्या ताणतणावाची ही गोष्ट आहे.

किंवा युक्रेनच्या ‘मिस्टर जोन्स’चं उदाहरण घ्या. 1933च्या मार्च महिन्यात वेल्श पत्रकार गॅरेथ जोन्सने मॉस्कोहून युक्रेनच्या खारकोव्हला जाणारी ट्रेन पकडली. एका स्टेशनवर तो उतरला आणि पायी चालू लागला. मानवनिर्मित दुष्काळाचा भयानक अनुभव घेत. त्याचे दाखले आपल्या कॅमेर्‍यात पकडत. 1905 साली जन्माला आलेल्या आणि वयाची तिशी गाठत असतानाच मरण पावलेल्या गॅरेथ जोन्स या महान पत्रकाराच्या या प्रवासाचा वेध हा सिनेमा घेतो. ही सत्यकथा तर आहेच, पण त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जॉर्ज ऑर्वेलची आणि जोन्सची भेट झाल्यानंतर, जोन्सचे अनुभव ऐकल्यानंतर ऑर्वेलने आपली जगप्रसिद्ध ‘अ‍ॅनिमल फार्म’ ही कादंबरी लिहिण्याची स्फूर्ती घेतली असं म्हटलं जातं. हे आणि असे अनेक सिनेमे आपल्याला एरवी कधी बघायला मिळणार असतात?

इटली असेल, युक्रेन, कझाकिस्तान, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, अर्जेंटिना, फिलिपिन्स, चीन, कोरिआ... अशा वेगवेगळ्या देशातल्या संस्कृतींची, तिथल्या माणसांची भेट होण्याची ही नामी संधी असते. आणि त्याला जोड अर्थातच इंडियन पॅनोरामाची. भारतातली सगळी राज्यं काही आपल्या माहितीची नसतात. तिथे घडणार्‍या आगळ्या कथांमधून आपण एका नव्या भारताशीही ओळख करून घेत असतो. इथे एखाद्या निर्वासिताच्या नजरेतून त्याची कहाणी आपल्यासमोर उलगडते तेव्हा एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळते. मग आपल्या देशात येणार्‍या ‘बाहेरच्या’ माणसाकडे पाहण्याची नजर बदलू शकते. एरवी, आपण आपल्या छोट्याशा जगात इतके अडकून पडलेलो असतो, गुंतून गेलेलो असतो की त्या पलीकडे असलेलं विश्व जणू विसरूनच जातो. मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटू लागतात. लहान लहान हेवेदावे म्हणजे आयुष्यातल्या महत्त्वाच्या स्पर्धा वाटू लागतात. या सिनेमांमुळे आपलं जग विस्तारतं. संकुचितपणा कमी होऊ लागतो. व्यक्ती म्हणून आपण अधिक समृद्ध होतो. व्यापक होतो. आपल्यातलं माणूसपण अधोरेखित होऊ लागतं. म्हणूनच हा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. आपोआपच तुम्हाला पुन:पुन्हा यावंसं वाटेल.

मीना कर्णिक 
meenakarnik@gmail.com

Tags: मीना कर्णिक सिनेमा Load More Tags

Comments:

राजेंद्र गुर्जर

लेख वाचुन चित्रपट महोत्सवास आवर्जून उपस्थित रहावे असे वाटू लागले आहे

Rahul Ramesh Gudadhe

खरच सिनेमां मुळे आपल जग विस्तारत हे मनातील विचार बोललात

Add Comment