मराठी कलावंत कुठे आहेत?

इफ्फी डायरी  2019 या विशेष लेखमालेतील तिसरा लेख

'आनंदी गोपाळ' या सिनेमाची टीम

ब्राझीलचे दिग्दर्शक वाग्नर मौरा (wagner moura) यांचा 'मारिघेल्ला' हा सिनेमा संपल्यानंतर त्यांना थिएटर मधल्या कोणीतरी सांगितलं, "तुमचे राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो या वर्षी आमच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत".

"खरंच? मला माहित नव्हतं. पण हे चुकीचं आहे, ते fascist आहेत." 

मौरा यांचं हे उत्तर आश्चर्यकारक नव्हतं. त्यांचा सिनेमा बघितल्यानंतर तर यापेक्षा दुसरं उत्तर अपेक्षितच होतं.१९६८ सालच्या ब्राझीलची गोष्ट हा सिनेमा सांगतो. कम्युनिस्ट राजवट उलथून टाकण्यासाठी लष्कर बंड करत, लवकरच निवडणुका घेण्याचं आश्वासन देतं. ते अर्थातच पाळलं जात नाही. या लष्करी राजवटीच्या विरोधात उभा राहतो मारिघेल्ला. सशस्त्र क्रांती करण्याच्या ध्येयाने. त्याची ही गोष्ट.  या दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा. म्हटलं तर सरळसोट आहे, पण पूर्ण अडीच तासांमध्ये एकदाही दिग्दर्शकाची पकड सुटलेली नाही. 

चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. इफ्फीमध्ये तिकिटं काढण्यासाठी उभी होते आणि माझ्या मागे दक्षिणेतून आलेले काही सिनेमाप्रेमी आपापसात कोणते सिनेमे बघायचे यावर चर्चा करत होते. मी मराठी आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वाभाविकच माझ्याकडून काही टिप्स मागितल्या. “आम्ही ‘एलिझाबेथ एकादशी’विषयी खूप ऐकलंय. या वर्षी आहे ना तो इंडियन पॅनोरामामध्ये?” त्यांनी म्हटलं.

“हो, आणि खूप छान सिनेमा आहे. अजिबात चुकवू नका.” मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मराठी सिनेमा या विषयावर आमच्या बर्‍याच गप्पा झाल्या.

मराठी सिनेमाने एव्हाना चित्रपट महोत्सवामध्ये अमराठी लोकांमध्ये आपलं स्थान पक्कं केलेलं होतं. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून इंडियन पॅनोरामामधला मराठी सिनेमांचा आकडा वाढू लागला. या सिनेमांना गर्दीही खूप होत होती. एकदोन वर्षांपूर्वी तर थोडेथोडके नाही, नऊ मराठी सिनेमे पॅनोरामामध्ये होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मराठी दिग्दर्शकांची नावं दिसू लागली.

स्पर्धेत असतील किंवा पॅनोरामामध्ये, पण त्यामुळे मराठी दिग्दर्शक, कलावंतही बर्‍यापैकी हजेरी लावत होते. दुर्दैवाने त्यातले बहुसंख्य केवळ आपल्या सिनेमापुरते येत, माध्यमांशी बोलत आणि परत जात. त्यापलीकडे भारतातल्या इतर भाषांमधल्या किंवा जगभरातल्या सिनेमांना त्यांनी आवर्जून हजेरी लावली आहे असं दिसायचं नाही. अर्थात, त्याला काही अपवाद होतेच. विजय केंकरे, मृणाल कुलकर्णी, किशोर कदम, संदीप सावंत, नीरजा पटवर्धन, इरावती कर्णिक, समीर विद्वांस यांच्यासारखे काही सिनेमांच्या रांगेत दिसायचे, दिसतात.

या वर्षी मात्र एकूणच मराठी कलावंत कमी दिसताहेत. आदिनाथ कोठारेंचा ‘पाणी’ महोत्सवामध्ये आहे. त्यामुळे ते इथे आलेत आणि मुख्य म्हणजे केवळ सिनेमांनाच नव्हे, तर काही चर्चासत्रांनाही ते आले होते. ‘आनंदी गोपाळ’ इंडियन पॅनोरामामध्ये असल्यामुळे ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद या मुख्य कलावंतांसह त्यांची टीम इथे होती. ललित प्रभाकर नंतर सिनेमेही पहात असल्याचं दिसलं. अवधूत गुप्ते महोत्सवाला आले होते, पण त्यांनी सिनेमे पाहिले की नाही, माहीत नाही.

पण एकूणच मराठी सिनेसृष्टीचं काय? आपल्या कलावंतांना महोत्सवाला जावं, आपल्या क्षेत्रात जगभरात आज काय चाललंय ते समजून घ्यावं, असं त्यांना का नाही वाटत?
 

मीना कर्णिक 
meenakarnik@gmail.com

इफ्फी डायरी 2019 या विशेष लेखमालेतील इतर लेख वाचा : 
1. उत्सवाला सुरवात...
2. गर्दी वाढू लागली आहे... 

Tags: इफ्फी सिनेमा iffi 2019 meena karnik Load More Tags

Add Comment