सुवर्णमहोत्सवी वर्षातला थंड महोत्सव!

इफ्फी डायरी 2019 या विशेष लेखमालेतील चौथा लेख

photo credits: IFFI Goa

अखेर भारताचा सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काल संपला. उद्घाटनाप्रमाणेच समारोपाचा कार्यक्रमही पार पडला. या वर्षी महोत्सवामध्ये 190 सिनेमे दाखवले गेले, यापैकी जवळपास 50 सिनेमे महिला दिग्दर्शकांचे होते. हा आकडा निश्चितच आश्वासक आहे. शिवाय 90 भारतीय सिनेमांचे प्रिमिअर, 11 आशियाई सिनेमांचे प्रिमिअर आणि 9 जागतिक प्रिमिअर्स असा थाट यंदा बघायला मिळाला. यामुळे स्वाभाविकच बहुसंख्य सिनेमे हे 2019चे होते. यापूर्वी ताज्या वर्षातले इतके जास्त सिनेमे कधी होते, हे बघायला हवं. कान किंवा व्हेनिस किंवा बर्लिनाले चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या सिनेमांचाही समावेश असल्यामुळे आणि सिनेमांची माहिती देणार्‍या कॅटलॉग्समध्ये तशी नोंद केल्यामुळे प्रेक्षकांना डोळसपणे सिनेमांची निवड करता येणं शक्य झालं.

‘पार्टिकल्स’ या दिग्दर्शक ब्ले हॅरीसन यांच्या सिनेमाला सुवर्ण मयुर पुरस्काराने गौरवलं गेलं. ‘मारीघेल्ला’ (दिग्दर्शक वाग्नर मौरा) या ब्राझिलच्या सिनेमातल्या नायकाला, सेवू जॉर्ज यांना सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता म्हणून पारितोषिक मिळालं तर उषा जाधव यांना ‘माईघाट : क्राईम नंबर 103/ 2005’साठी (दिग्दर्शक अनंत महादेवन) सर्वोत्कृष्ट महिला अभिनेता म्हणून पुरस्कार दिला गेला. ‘बलून’ (दिग्दर्शक पेमा सेडेन) या चीनच्या सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

समारंभ संपल्यानंतर आपल्याला आवडलेला सिनेमे आणि पारितोषिकप्राप्त सिनेमे यांची गुणवत्ता ताडून पाहणं, त्यावर चर्चा करणं असं सर्वसाधारणपणे होत असतं. या वर्षी तसं काही झालं नाही. एकूणच, यंदाचा महोत्सव थंड होता असं म्हणायला हवं. नऊ हजार प्रतिनिधींची नोंद झालेली आहे, असं सांगितलं गेलं असलं तरी प्रत्यक्ष थिएटर्सच्या आवारातली तुरळक माणसं काही वेगळंच चित्र दर्शवत होती. सिनेमा हाऊसफुल्ल आहे असं म्हणून ज्यांची तिकिटं दिली जात नव्हती त्या सिनेमांनाही थिएटरमध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. सुरुवातीचे दोनतीन दिवस सोडले, तर उत्साहही कमी दिसत होता. सिनेमांच्या शेड्युलिंगविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कानावर पडत होत्या. एकाच वेळेला तीन मोठ्या दिग्दर्शकांचे सिनेमे ठेवणं, जगभरातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेले सिनेमे सकाळी साडेआठ आणि रात्री दहा, साडेदहा, पावणेअकराला असणं हे तसं त्रासदायकच होतं. पहिल्या अर्ध्या भागात जेवढे चांगले सिनेमे होते तेवढे दुसर्‍या अर्ध्या भागात नव्हते. शिवाय, पहिल्या चार दिवसांमध्ये दाखवलेले गेलेले चांगले सिनेमे रिपीट झाले, ते पणजीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या पॉरवोरिमला. तिथे जायला इफ्फीच्या प्रतिनिधींसाठी खास बससेवा होती हे खरं, पण तिथे गेल्यानंतर ताबडतोब आयनॉक्स किंवा कला अकादमीला सिनेमा पहायला येणं शक्य व्हायचंच असं नाही.

‘पॅरासाईट’ या दिग्दर्शक बून जून हो यांच्या कोरिअन सिनेमाचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही. महोत्सवामधला हा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणायला हवा. कानच्या चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमाला पाम अ दोर पारितोषिक मिळालेलं असल्याने तो पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यातून, ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा बघितला होता, ते सगळे त्याविषयी भारावून बोलत होते. सुदैवाने महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पॉरवोरिमला या सिनेमाचा दुसरा शो ठेवला असल्यामुळे तो बघता आला आणि त्याचं वर्णन करण्यासाठी ‘अचाट’ हा एकच शब्द मनात आला. एक उत्कृष्ट सिनेमा पाहून महोत्सवाची सांगता झाली, हा आनंदही काही थोडका नाही!

मीना कर्णिक 
meenakarnik@gmail.com

इफ्फी डायरी 2019 या विशेष लेखमालेतील इतर लेख वाचा : 
1. उत्सवाला सुरवात...
2. गर्दी वाढू लागली आहे... 
3. मराठी कलावंत कुठे आहेत?

 

Tags: iffi 2019 cinema मीना कर्णिक इफ्फी 2019 सिनेमा Load More Tags

Add Comment