वर्ष 1973. ‘बॉबी’ने नुसता धुमाकूळ घातला होता. डिंपल कपाडियाप्रमाणे छातीशी दुमडलेल्या हातामध्ये जाडजूड रबरबँडमध्ये अडकवलेली पुस्तकं घेतलेल्या मुली शाळेत फिरताना दिसू लागल्या होत्या. शाळेतल्या मुलग्यांवर काय परिणाम झाला होता आठवत नाही, पण ऋषि कपूरच्या राजाने तमाम मुलींच्या मनाचा ठाव घेतला होता. मीही त्यातली एक होते. माय फर्स्ट क्रश.
‘बॉबी’च्या आधी ऋषि कपूर दिसला तो अर्थातच ‘मेरा नाम जोकर’मधून. आणि या पहिल्याच सिनेमात त्याने थेट राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. (आपल्या सिनेमांच्या यादीत ऋषि कपूरने ‘श्री 420’चं नावही टाकलेलं आहे. वर, या सिनेमासाठी आपल्याला श्रेय मिळालेलं नाही, अशी टिप्पणीही केलेली आहे. ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ या गाण्यातल्या ‘मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेगी निशानियाँ’ या ओळींमध्ये जी लहान मुलं पावसातून जाताना दिसतात त्यातला एक ऋषि कपूर आहे.) मात्र ‘मेरा नाम जोकर’मध्ये दिसणाऱ्या गुबगुबीत, गोल, गोंडस ऋषि कपूरचं रुपांतर दोनच वर्षांनी आलेल्या ‘बॉबी’मध्ये देखण्या, हँडसम नायकामध्ये झालेलं होतं.
‘बॉबी’च्या यशानंतर या नव्या, नाजुक नायकाला खूप सारे सिनेमे मिळू लागले यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. रोमँटिक हिरो म्हणून ऋषि कपूरने आपलं बस्तान चांगलंच बसवलं. ते थेट वयाची पंचेचाळीशी गाठेपर्यंत. अख्ख्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणी केलं नसेल एवढं काम ऋषि कपूरने नव्या नायिकांबरोबर केलेलं आहे. त्याच्या पुस्तकामध्ये त्याच्याबरोबर पहिल्यांदा नायिका बनलेल्या तीस अभिनेत्रींची यादी आहे. याचं कारण सांगताना त्याने म्हटलंय, ‘नायक म्हणून माझ्या पहिल्या सिनेमाने मला स्टार बनवलं आणि मग दिग्दर्शकांच्या लक्षात आलं की अतिशय तरुण असलेल्या माझ्यासारख्या नव्या कोऱ्या हॉट स्टारसमोर शोभतील अशा नायिका आपल्यापाशी नाहीत. माझी मोठी पंचाईत झाली. आपला पहिला सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच डिंपल लग्न करून चित्रपट संन्यास घेऊन निघून गेली होती. बाकीच्या नायिका माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या आणि तशा त्या दिसतही... नीतू सिंग आणि मौशुमी चटर्जी या दोनच नायिका होत्या. पण त्यांच्याबरोबर मी किती सिनेमे करू शकणार? गरजेपोटी दिग्दर्शकांनी तिसरा पर्याय शोधून काढला. नवीन चेहऱ्यांना आणण्याचा. आणि त्यामुळे एक नवीन विक्रम आपोआप माझ्या नावावर झाला.’
1973 मध्ये ‘बॉबी’ आला आणि त्यापुढच्या सात वर्षांमध्ये ऋषि कपूरचे जवळपास दोन डझन सिनेमे प्रदर्शित झाले. खरं तर हा काळ अमिताभ बच्चनचाही होता. या अँग्री यंग मॅनने देशाला वेड लावलं होतं. त्याचा अभिनय, व्यवस्थेविरुद्धचं त्याचं बंड हे सगळं इथल्या तरुणाला आपलं वाटत होतं. त्या तुलनेत उत्तम अभिनेता असूनही ऋषि कपूरच्या काही मर्यादा होत्या. एक म्हणजे, तो कधीच गरीब, हालअपेष्टा सोसणारा नायक वाटणं शक्य नव्हतं. त्यामुळे केवळ रोमँटिक नायकाचा शिक्का त्याच्यावर बसणं स्वाभाविक होतं. पण तरीही ज्या भूमिका मिळाल्या त्यात तो कधीही कुठेही कमी पडला नाही. अगदी बच्चनबरोबरचे त्याचे सिनेमे पाहिले तरी, ‘बच्चनने याला खाऊन टाकलाय’ असा विचार एकदाही मनात येत नाही. मग तो ‘कभी कभी’ असो, ‘कुली’ असो, ‘नसीब’ असो, ‘अमर अकबर अॅन्थनी’ असो की अगदी अलीकडचा ‘102 नॉट आऊट’ असो. किंबहुना, या दोघांची जोडी एकमेकांना खूप कॉम्लीमेंट करायची.
नीतू सिंगबरोबरची त्याची जोडी तर फारच फर्मास जमलेली होती. कपूर खानदानातल्या प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च नृत्याची जाण असते असं म्हटलं जातं. ऋषि कपूरही त्याला अपवाद नव्हता. त्याला नाचताना पहायला छान वाटायचं. किती सहजी वाटतात याच्या स्टेप्स असाही विचार यायचा. पण नीतू सिंग त्याच्यापेक्षा अधिक चांगली डान्सर होती असं त्यानेच एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. ‘डान्स मास्टरबरोबर मी माझ्या स्टेप्सची खूप प्रॅक्टिस करायचो. मग नीतू सेटवर यायची. त्यांच्याकडून स्टेप्स पहायची आणि एका झटक्यात त्या तिला जमलेल्या असायच्या.’
ऋषि कपूरचे सगळेच सिनेमे काही मी थिएटरमध्ये जाऊन पहात नव्हते. एव्हाना त्याच्याविषयी वाटणारं ‘प्रेम’ही संपुष्टात आलेलं होतं. उघड्या डोळ्यांनी सिनेमे पहायला शिकू लागले होते. सिनेमातलं चांगलं-वाईट किंचित का होईना पण उमगायला लागलं होतं. जागतिक सिनेमाशी ओळख होऊ लागली होती आणि ऋषि कपूर नावाचा कोणी स्टार आपला हिरो होता हे मी जणू विसरूनही गेले.
वर्ष 1985. ‘चंदेरी’ या सिनेमाशी संबंधित साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाची तयारी जोरात चालू होती. रमेश सिप्पीच्या ‘सागर’विषयी डिंपल कपाडियाच्या पुनरागमनाची फिल्म म्हणून उत्सुकता होती. त्यातून पुन्हा एकदा ती तिच्या ‘बॉबी’तल्या नायकाबरोबर दिसणार होती. स्वाभाविकच पहिली कव्हरस्टोरी ‘सागर’वर करावी असं गौतम राजाध्यक्षांनी सुचवलं. या सिनेमाच्या सेटवर ते बरेचदा गेले होते, त्यांनी तिथे खूप फोटो काढलेले होते. त्यामुळे हा लेख तेच लिहिणार होते. मी त्या इंग्रजी लेखाचं भाषांतर केलं. ऋषि कपूर नव्याने माझ्या आयुष्यात आला होता.
‘चंदेरी’च्या कामाच्या निमित्ताने मी सिनेमांच्या सेट्सवर फिरू लागले होते. कलाकारांच्या मुलाखती घेऊ लागले होते. काही ऑफबीट सिनेमांची आवर्जून दखल आम्ही घेत होतो. त्यावेळेस, राजिंदर सिंग बेदी यांच्या कथेवर आधारित दिग्दर्शक सुखवंत धड्डा ‘एक चद्दर मैली सी’ हा सिनेमा बनवत होते. हेमा मालिनी, ऋषि कपूर आणि पूनम धिलाँ यांच्या प्रमुख भूमिका. भावाच्या मृत्यूनंतर गावातल्या रिवाजानुसार त्याच्या विधवा पत्नीशी लग्न करावं लागणाऱ्या मंगलची ही कहाणी.
ऋषि कपूरची मुलाखत घेण्यासाठी मी सिनेमाच्या सेटवर पोचले. आपल्या शाळेतल्या हिरोला आपण भेटणार म्हणून कमालीची उत्सुकता मनात होती. थोडीशी धडधडही.
मुलाखत झाली, मी सेटवरून बाहेर पडले आणि लक्षात आलं की आपण थोडे खट्टू झालो आहोत. उत्तरं तर ऋषि कपूरने छान दिली होती. सिनेमाविषयी अगदी मोकळेपणाने तो बोलला होता. मग तरीही मनात रुखरुख का होती? आणि मग विचार करता करता लक्षात आलं, मी ‘बॉबी’मधल्या राजाला भेटायला निघाले होते आणि मला भेटला होता ‘एक चद्दर मैली सी’मधला मंगल. या दोघांची तुलनाच होऊ शकत नव्हती. मूर्खपणा माझाच होता.
त्यानंतर मी ऋषि कपूरला कधीच भेटले नाही.
वर्ष 2017. ऋषि कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या इंग्रजीमधल्या आत्मचरित्राचं मराठी भाषांतर कराल का असं विचारणारा इंद्रायणी साहित्यच्या सागर कोपर्डेकर यांचा फोन आला. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. यावेळी ऋषि कपूरच्या आयुष्यात खूप जास्त डोकावायला मिळालं. एखादं आत्मचरित्र वाचताना आपण त्या व्यक्तीच्या जितके जवळ जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त भाषांतर करताना गुंतले जातो. त्या तीन चार महिन्यांच्या काळात आपण त्या व्यक्तीबरोबर जणू सतत वावरत असतो. संवाद करत असतो. ऋषि कपूरच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने तर मला भूतकाळातही रमण्याची संधी मिळाली होती.
त्याच्या तरुणपणातल्या सिनेमांविषयी वाचताना नकळत त्या सिनेमांशी जोडल्या गेलेल्या माझ्या आठवणी मनात ताज्या झाल्या. ‘खेल खेल में’, ‘दुसरा आदमी’, ‘कर्ज’, ‘प्रेम रोग’, ‘दुनिया’, ‘चांदनी’, ‘हिना’ असे त्याचे अनेक सिनेमे आठवले. शाहरुख खान आणि दिव्या भारतीबरोबर त्याने केलेल्या ‘दिवाना’मधला त्याचा त्याग करणारा नवरा मला आवडला होता. किंवा ‘दामिनी’मध्ये सनी देओल भाव खाऊन गेला असला आणि ती गोष्ट मीनाक्षी शेषाद्रीची असली तरी कुटुंबाचा दांभिकपणा आणि बायकोचा खरेपणा यामध्ये अडकलेल्या साध्या, शांत नवऱ्याची भूमिका निभावणं सोपं नव्हतं.
तरीही थोडं अलिप्त होऊन विचार केल्यावर वाटलं, ऋषि कपूर उत्तम अभिनेता आहे हे तर निर्विवाद, पण त्याचा आपल्याला सर्वात जास्त आवडलेला सिनेमा कोणता असा प्रश्न जर आपण स्वत:ला आज विचारला तर त्याच्या त्या रोमँटिक सिनेमांपेक्षा त्याचे आजचे सिनेमेच आपल्याला अधिक आठवताहेत. नंतरच्या काळात त्याने केलेल्या वेगळ्या भूमिका मला जास्त भावल्या आहेत. ‘लक बाय चान्स’मधला रोमी रॉली हा निर्माता काय अफलातून साकारला होता त्याने. किंवा ‘दो दुनी चार’मधला संतोष दुग्गल. किंवा मग ‘डी डे’मधला इक्बाल सेठ. ‘कपूर अँड सन्स’मधला अमरजीत कपूर. आणि ‘मुल्क’मधला मुराद अली मोहम्मद. खरंच, ऋषि कपूरने नट म्हणून आपल्याला भरभरून दिलंय.
या पुस्तकात त्याने स्वत:चं वर्णन फार मजेशीर केलंय. ‘एका प्रसिद्ध बापाचा मुलगा, एका लोकप्रिय मुलाचा बाप. या दोघांना जोडणारा मी एक दुवा आहे. आय अॅम द हायफन इन बिटवीन.’
दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ऋषि कपूरचा सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्याची जाहीर मुलाखतही झाली. त्यावेळी ऋषिचं आत्मचरित्र मराठीत भाषांतर होऊन आलंय अशी माहिती देत डॉ. जब्बार पटेल यांनी स्टेजवरून माझा उल्लेख केला होता. प्रेक्षकांमध्ये मी असेन तर स्टेजवर ये असंही ते म्हणाले. दुर्दैवाने मी तेव्हा तिथे नव्हते.
पण समजा असते, तर काय बोलले असते मी त्याच्याशी? तुझ्या पुस्तकाचं भाषांतर केल्यामुळे मी तुझ्या आयुष्याचा एक भाग बनले आहे असा माझ्या मनात आलेला विचार मी त्याला बोलून दाखवला असता का? माझ्या मनात त्याचं कोणतं रुप असतं? आणि पुन्हा एकदा माझा अपेक्षाभंग झाला नसता कशावरून? ‘एक चद्दर मैली सी’च्या सेटवर झाला तसा?
वर्ष 2020. ऋषि कपूर गेल्याची बातमी वाचून मला नेमकं काय वाटतंय? 29 एप्रिलला इरफान खान आणि 30 एप्रिलला ऋषि कपूर हा धक्का तर मोठा आहेच, पण ऋषि कपूरने माझ्या शालेय आणि त्यानंतर कॉलेजच्या जीवनाचा केवढा मोठा भाग व्यापला होता याची नव्याने झालेली जाणीव काही केल्या मनातून काढून टाकता येत नाहीये. त्यातून निर्माण झालेली पोकळी पुढचा बराच काळ सोबत राहील एवढं नक्की.
- मीना कर्णिक, मुंबई
meenakarnik@gmail.com
Tags: ऋषी कपूर Load More Tags
Add Comment