पहिला Sci-Fi हिंदी सिनेमा बनवण्याच्या जबाबदारीची जाणीव मला होतीच.

‘नेटफ्लिक्स’वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कार्गो’ सिनेमाच्या लेखक- दिग्दर्शक आरती कडव यांची मुलाखत...

‘कार्गो’ सिनेमाच्या लेखक- दिग्दर्शक आरती कडव

जगभरातील सिनेमांमध्ये Sci-Fi हा अतिशय महत्त्वाचा सिनेप्रकार आहे. Sci-Fi म्हणजे Science- Fiction. या प्रकारच्या सिनेमाचे कथानक विज्ञान – तंत्रज्ञान यांच्या भोवती फिरत असते. असे सिनेमे जगभरातील प्रेक्षकांत लोकप्रिय ठरत असले तरी भारतात मात्र Sci-Fi म्हणता येईल असा सिनेमा आजवर तयार झाला नव्हता. ही उणीव यशस्वीपणे भरून काढली आहे ‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नुकत्याच (9 सप्टेंबर 2020) प्रदर्शित झालेल्या ‘कार्गो’ या सिनेमाने... 

‘कार्गो’मध्ये मनुष्य आणि राक्षस यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार राक्षस आपले अंतराळवीर आकाशात पाठवतात. माणूस मेला की त्याच्या सर्व जखमा बऱ्या करून, त्याची स्मृती पुसून टाकून त्याला पुन्हा जन्मण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्याचे काम राक्षसांचे आहे. पृथ्वीवरील जीवनयात्रा संपवून राक्षसांच्या अंतराळयानात येणाऱ्या माणसांना इथे ‘कार्गो’ म्हटले जाते. प्रहस्था (विक्रांत मेस्सी) पुष्पक 634 A या अंतराळयानाचा कॅप्टन आहे. तब्बल 75 वर्षे एकट्याने अंतराळात राहिलेल्या प्रहस्थाला एक मदतनीस मिळते,-युविष्का (श्वेता त्रिपाठी). तर राक्षसांच्या ग्रहावरील ऑफिसमध्ये बसून प्रहस्थाला काम पाठवणारा अधिकारी आहे नितीग्या- (नंदू माधव). 

एकलकोंड्या स्वभावाचा प्रहस्था, मनमोकळी युविष्का आणि पूर्णवेळ अंतराळयानातील एका छोट्या चौकोनी पडद्यावर दिसणारे नितीग्या सर यांच्याभोवती ‘कार्गो’ची कथा फिरते. विविध कार्गोंच्या छोट्या छोट्या कथादेखील यात आहेत. ‘मृत्यू’ आणि ‘एकटेपण’ यातून ‘जगणं’ आणि ‘साथ-सोबत’ यांच्यावर भाष्य करणारा, अंतर्मुख करणारा सिनेमा आहे. 

‘कार्गो’पाहताना दरवेळी नवीन काहीतरी हाती लागत जाते. या सिनेमाची लेखिका आणि दिग्दर्शिका आरती कडव या मूळच्या मराठी भाषिक आहेत. लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये ‘कार्गो’चे विशेष कौतुक होत आहे, ऑनलाईन माध्यमांमध्येही हा सिनेमा ट्रेंडिंग आहे. यानिमित्ताने आरतीशी साधलेला संवाद... 

सुरवातीला Sci-Fi सिनेमा या संकल्पनेविषयी थोडं सांगा. 
- Sci-Fi म्हणजे Science-Fiction. तसं पाहिलं तर भारतामध्ये science- fiction सिनेमा याआधी आलेला नाही. मिस्टर इंडिया हा एक Sci-Fi बनवण्याचा प्रयत्न होता. Sci-Fi म्हणजे एका अर्थाने काल्पनिकताच. science-fiction आणि fiction यात फार फरक नाहीय. फक्त Sci-Fi मध्ये, थेट जादू न दाखवता काल्पनिकच पण एक तंत्रज्ञान दाखवलं जातं. सोबत यंत्रं दाखवली जातात, जी एका अर्थाने जादूच करत असतात. म्हणजे Sci-Fi मध्ये जादूचं समर्थन करणारी यंत्रं आपण वापरतो. जादूला काल्पनिक science चा आधार देण्याचा प्रयत्न म्हणजे Sci-Fi सिनेमा. 

सगळी भारतीय पुराणं- महाभारत, रामायण- science- fiction च आहे. मला लहानपणापासून या पुराणकथांमध्ये खूप रस होता. भारतीय साहित्यामध्ये इतकी समृद्ध Sci-Fi ची परंपरा असतानाही भारतीय सिनेमामध्ये त्याचं तितकं यशस्वी प्रतिबिंब मात्र दिसत नाही. 

असे एक काल्पनिक जग तयार करत असताना, काहीवेळा ते अपरिपक्व, बालिश वाटू शकतं. Sci-Fi सिनेमामधला हा धोका आहे असं वाटतं तुम्हाला?
- हो खरं आहे. पण मला Sci-Fi सिनेमाविषयी खूप आधीपासून आवड आहे. Sci-Fi शैलीमधले सिनेमे बघणं, वाचन करणं, अभ्यास करणं.. या Sci-Fi शैलीमध्ये काम करताना मी बरंच स्ट्रगल केलंय. मी काही Sci-Fi लघुपट देखील केलेले आहेत. मी कम्प्युटर इंजिनिअर आहे. त्यानंतर मी फिल्म स्कूलला गेले. मशीन लर्निग, आर्टीफ़िशिअल इंटेलिजन्स हे विषय मी इंजिनिअरिंगमध्ये निवडले होते. एक वेगळं विश्व निर्माण करणं आणि या ना त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात जादू निर्माण करणं, हे मला आवडतं. 
जागतिक स्तरावर असे सिनेमे बनवण्याचे खूप यशस्वी प्रयत्न झाले आहेत. 2001 space odyssey, Metrix, eternal sunshine of the spotless mind, 12 monkeys, अशा अनेक पाश्चात्य Sci-Fi फिल्म्स तुम्ही बघू शकता. चीन आणि जपान मध्ये सुद्धा चांगले Sci-Fi सिनेमा बनत आलेले आहेत. पाश्चात्य Sci-Fi सिनेमांपेक्षा आशियाई Sci-Fi सिनेमा मला जास्त जवळचे वाटतात. संस्कृती आणि इतिहास किंवा सामाजिक-कौटुंबिक जडणघडण यामधील साम्यामुळे असेल कदाचित. 

‘कार्गो’ला पहिला हिंदी Sci- Fi सिनेमा म्हटले जात आहे… याबद्दल काय वाटतं?
- पहिला Sci-Fi हिंदी सिनेमा बनवण्याच्या जबाबदारीची जाणीव मला होतीच. मी वाईट सिनेमा बनवला तर आपण भारतीय Sci-Fi सिनेमाला अजून 10 वर्षे मागे नेऊन ठेऊ हे मला माहिती होतं. आणि जर यशस्वी झालो तर पाहिलेपणाचे श्रेय आपल्या टीमला मिळेल आणि भारतीय प्रेक्षकांना एक नवीन सिनेमा प्रकार देखील बघायला मिळेल, हे ही डोक्यात होतं. Sci-Fi सिनेमाचा प्रेक्षकवर्ग आणि निर्माते असे दोन्ही तयार व्हायला कार्गोपासून सुरवात होऊ शकेल. आपण आपल्या लहान मुलांना, तरुणांना अशा जादूभऱ्या गोष्टींपासून वंचित ठेवतोय. पडद्यावर काल्पनिक जग बघणारी मुलं कदाचित स्वतःही अधिक कल्पक होऊ शकतील. 

'कार्गो' एकटेपणावर सुरु होतो. आणि सिनेमाभर एकटेपणा व सोबत या संकल्पनांचा अप्रत्यक्षपणे उहापोह होत राहतो...
- हो माझ्या सिनेमात हे आहे आणि हे तुला सापडलं याचा मला खूप आनंद झालाय. मला खूप जणांनी विचारलं तुम्ही स्पेसशिप कसं बनवलं, मशीन्स कसे बनवले. पण स्पेसशिप तो बस एक बहाना है. आपण एकटे असतो, आपलं आयुष्य नक्की काय आहे, आपण एका दरवाजातून या जगात येतो आणि त्याच दरवाजातून परत जातो. कितीही जवळचे लोक असले तरी जन्माला येताना, मरताना माणूस एकटा असतो. आणि आयुष्यातल्या सुद्धा खूपशा वळणावर आपण एकटे असतो. आपल्या बरोबरचे लोक मरतात, शहर सोडून जातात. त्यांची कथा आपल्यापुरती संपते, आपली त्यांच्या सोबतची कथा संपते. युविष्का शेवटी म्हणते तसं, ‘सर आप मुझे भूल जायेंगे. शायद अचानक कभी आपको मेरी याद आयेगी भी. पर आप वापस मुझे भूल जाओगे.’ या अशा सगळ्या गोष्टींचा शोध मला या सिनेमाच्या माध्यमातून घ्यायचा होता, मला या गोष्टींवर भाष्य करायचं होतं. आपल्या आजूबाजूचे बघ खूप लोक एकटे राहतात. कधीकधी गर्दीमध्ये सुद्धा ते एकटे असतात. या एकटेपणावर मला बोलायचं होतं. 

म्हणून प्रहस्था एकटा राहणारा आहे. त्याने ते निवडलं पण आहे आणि स्वीकारलं पण आहे. युविष्का सोबतीने राहणारी आहे, नितीग्या सर सोबत करणारे आहेत. असं ढोबळमानाने म्हणता येईल?
- हो अगदीच. बघणाऱ्याने आपल्या पद्धतीने त्याचे अर्थ लावावेत. त्यातले जितके कंगोरे प्रेक्षकांना सापडतील तेव्हढा मला आनंद होईल. लक्षात घ्या, गोष्ट स्पेसशिपमध्ये घडती आहे. संपूर्ण अनोळखी ठिकाण आहे ते. Trying to discover something new is always a very lonely journey.  

तशी तर सिनेमात आपल्याला खूप माणसं दिसतात. तरी देखील ही दोनच व्यक्तींची कथा आहे आणि आपण दोनच माणसांना बघतोय असं वाटतं....
- सिनेमा एका स्पेसशिपमधे घडतो. ही स्पेसशिप म्हणजे एक इमिग्रेशन ऑफिस आहे. इमिग्रेशन ऑफिसमध्ये इमिग्रेशनसाठी येणाऱ्या लोकांचं विशेष अस्तित्व नसतं. ते त्या इमिग्रेशन प्रोसिजरला सरेंडर करतात. म्हणजे बघा हं, आपण एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जातो, पासपोर्टसाठी, लायसन्ससाठी, तिथे त्या सगळ्या प्रोसिजर्सना आपण सरेंडर होतो.  युविष्का आणि प्रहस्था त्या ऑफिसमध्ये काम करतायत. आणि त्या दोघांच्या नजरेतून या थोड्या थोड्या वेळासाठी येऊन जाणाऱ्या लोकांकडे आपण बघतो आहोत. कथा या दोघांचीच आहे. आणि सिनेमाच्या सुरवातीला आम्ही मुद्दाम जास्ती कार्गो येऊन गेलेले दाखवले आहेत कारण आम्हाला ती संकल्पना, ती प्रक्रिया प्रेक्षकांच्या मनावर ठसवायची होती. पुढे पुढे येणारे कार्गो या दोघांना नवीन विचार देतात, दिशा देतात आणि अधिकाधिक परिणामकारक होत जातात. मी इतक्या कार्गोच्या कथा दाखवते आहे पण मला अपेक्षा आहे की प्रेक्षक त्या कथांमधून स्वतःच्या कथेकडे वळतील. अंतर्मुख होतील. मी तसे मुद्दाम काही अनुत्तरीत प्रश्न कार्गोमध्ये ठेवलेले आहेत. 

प्रत्येक कार्गोचे आयुष्यातले काही शेवटचे सेकंद तुम्ही दाखवले. There are so many tiny and yet indeed complete stories of cargos. हे तुम्ही कसं जमवलंत?
- मला हाच परिणाम साधायचा होता. त्या कार्गोंचा मृत्यू मी दाखवत होते पण खरंतर मला त्यांचं जगणं अधोरेखित करायचं होतं. माणूस जगण्याची कारणं शोधून, ध्येय उराशी घेऊन जगत असतो. तहान भूक विसरून तो एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो. सगळं सुरळीत सुरु असताना अचानक कधीही कुठेही कसाही मृत्यू येतो आणि मग या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलतात. या धकाधकीमध्ये मरणच त्याला विचार करायला भाग पाडतं आणि मग त्याच्या लक्षात येतं की माझ्या इच्छा, स्वप्नं किती प्रासंगिक आहेत. 

या कार्गोच्या कथा लिहितानाच snapshot मध्ये तशा लिहिल्या होत्या. त्या पूर्ण वाटाव्यात असा माझा प्रयत्न होताच. ज्या कलाकारांनी हे छोटे छोटे रोल केले त्यांचंदेखील हे श्रेय आहे. ज्या कलाकाराने ‘एक्स्ट्रा’चं काम केलंय तो ‘कवि’ नावाच्या लघुपटात बालकलाकार होता. हा लघुपट ऑस्करपर्यंत गेला होता. राक्षस-मानव सामंजस्य कराराविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीचं काम ज्येष्ठ दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलेलं आहे. अंजुम राजाबली यांनी टाईम ट्रॅव्हल विषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं काम केलेलं आहे. रामचंद्र नेगीचं काम बिस्वापती सरकारने केलेलं आहे. मंदाकिनीची अगदी छोटी भूमिका कोंकणा सेनने केलेली आहे. एकंदरीतच या छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या सगळ्या कलाकारांनी त्या छोट्या कथा आपला जीव ओतून जिवंत आणि संपूर्ण केलेल्या आहेत. 

संपूर्ण सिनेमाभर मरणाचं अस्तित्व आहे. मृत्यू आहे. पण मृत्यूमुळे निर्माण होणारं भयाण वातावरण मात्र सिनेमात अजिबात नाही...
- मी हे फार जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक केलेलं आहे. मला ते भेसूर वातावरण तयार व्हायला नको होतं. विनोदी पद्धतीने काही गोष्टी दाखवल्याने बघणारा मोकळा होतो, त्याची स्वीकाहार्यता वाढते. आधीच सिनेमामध्ये तत्वज्ञान बऱ्याच प्रमाणात आहे. मला हा सिनेमा आणखी जड बनवायचा नव्हता. नाहीतर मग तो कंटाळवाणा झाला असता. गंभीर गोष्टी मला हलक्याफुलक्या पद्धतीने सांगायच्या होत्या. 

प्रहस्था, युविष्का, नितीग्या ही पात्रांची नावं कुठून आली?
- आपल्या पुराणातून ही नावं उचलली आहेत. ही राक्षसगणातील नावं आहेत. आणि सिनेमातल्या त्या त्या भूमिकांना न्याय देणारे या नावांचे पौराणिक संदर्भ आहेत. जसे प्रहस्था हा कॅप्टन आहे या स्पेसशिपचा. पुराणामध्ये प्रहस्था रावणाचा सेनापती होता. नीतीने काम करणारे नितीग्या सर, न झोपणारे चैतन्य. युविष्का हे तर माझ्या मुलीचं नाव आहे. माझ्या दीड वर्षाच्या मुलीला सोडून मी या सिनेमाच्या कामात असायचे. म्हणून मी माझ्या हिरोईनचं नाव युविष्का ठेवलं. 

कार्गो मध्ये Sci-Fi वातावरण तयार करण्यात संगीत आणि VFX यांचा मोठा हातभार आहे. त्याविषयी काही सांगा.. 
- मी माझ्या सिनेमामधल्या प्रत्येक कलाकारासोबत एक रॅपो तयार करण्याचा प्रयत्न करते. माझ्या डोक्यातल्या संकल्पना सही सही त्यांच्यापर्यंत पोचायला हव्या असतील तर हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मी स्वतः वेळ घेते आणि त्या सर्व कलाकारांना देखील वेळ देते. कार्गोचं VFX आणि animation झेनिश मेहताने केलंय. तो माझा फिल्म स्कूलपासूनचा मित्र आहे. 

सिनेमाच्या म्युजिकचं म्हणाल तर कोणी यशस्वी संगीतकार घेण्याइतकं आमचं बजेट नव्हतं. आम्ही नवीन कलाकार शोधत होतो आणि सिनेमा पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आम्हाला हिरे सापडले आहेत. सागर देसाईने कार्गोच्या गाण्यांना संगीत दिलं आणि शेझान शेखनं पार्श्वसंगीत केलेलं आहे. शेझान शेख मुळात एक गेम डिजाईनर आहे. त्यानं आधी कधी सिनेमासाठी संगीत केलेलं नव्हतं. पण तो काम चालू असताना म्हणायचा की ‘अब ये मेरे लिये प्रोजेक्ट नहीं है बल्की एक मिशन है’. VFX आणि म्युजिक दोन्हीसाठी आम्ही 7-8 महिन्याचा वेळ घेतला. या दोन्हीसाठी सगळ्यात जास्त मेहनत घेतलीय. 

'कार्गो'साठी मिळालेली आत्तापर्यंतची सर्वोत्तम प्रतिक्रिया कोणती?
- ‘मामी’ फिल्म फेस्टिवलमध्ये कार्गो दाखवली गेली. त्यानंतर एक परीक्षण आलं होतं की, ‘कार्गो वर्षानुवर्ष चालणारी फिल्म आहे. तिची प्रासंगिकता कमी होणार नाही. त्याचबरोबर पहिली हिंदी Sci-Fi फिल्म म्हणून तर तिची नोंद कायम राहिल’. पण याहून सामान्य प्रेक्षकांकडून मिळालेली पावती मला जास्त मोलाची वाटते. बंगाल, महाराष्ट्र, साउथ अशा वेगवेगळ्या भागातल्या छोट्या शहरांतून प्रतिक्रिया मिळाल्या. आणखी कोणीतरी एक व्हिडीओ बनवला - ‘6 hidden philosophies of cargo’. आणखी सांगायचं झालं तर तुमचे प्रश्न. ती सुद्धा एक प्रतिक्रिया आहे. मी आत्तापर्यंत कार्गोसाठी बऱ्याच मुलाखती केल्या पण तुमच्या प्रश्नांनी मी भावनिक झाले आहे. तुमच्या प्रश्नांवरून मला कळलं की तुम्हाला सिनेमा कळला आहे. 

मी नंदू माधव सरांची सुद्धा मुलाखत घेणार आहे. मी त्यांना काय विचारावं असं तुम्हाला वाटतं?
- नंदू माधव सरांविषयी काय सांगू. मीच काय आमच्या संपूर्ण टीमला वाटत होतं की सरांचे आपण पाय धरावे बस. एवढी मोठी भूमिका आहे सरांची सिनेमामध्ये. पण इतकं सगळं काम त्यांनी फक्त एक दिवस आणि दुसऱ्या दिवशीचे दोन तास एवढ्या कमी वेळात पूर्ण केलं. मला सुद्धा इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करताना टेन्शन आलं होतं पण This film is blessed by his good soul and by his presence. त्यांना फक्त विचार की ते किती परेशान झाले आमच्यासोबत काम करताना. 

(मुलाखत आणि शब्दांकन - मृदगंधा दीक्षित)

'कार्गो' या सिनेमामध्ये निताग्या सर ही भूमिका साकारणाऱ्या नंदू माधव यांची मुलाखत कर्तव्यवर उद्या सकाळी प्रसिद्ध करण्यात येईल.  

Tags: नेटफ्लिक्स सिनेमा साय- फाय आरती कडव कार्गो विज्ञान मृदगंधा दीक्षित नंदू माधव Interview Arati Kadav Mrudgandha Dixit Nandu Madhav Cargo Netflix Sci-Fi Load More Tags

Comments:

रेखा जोशी

मुलाखत आवडली. सिनेमा बघायला हवाच अशी प्रतिक्रिया उमटली मनात. महत्त्वाचे म्हणजे मृत्यू संदर्भात सिनेमा परंतु हलक्या वातावरणाचा आहे हे वाचून उत्सुकता वाढली.. धन्यवाद.. रेखा जोशी

Add Comment