द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय

रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका इंग्रजी युद्धपटावरील लेखाची पुनर्भेट

साधना साप्ताहिकाच्या 66व्या वर्धापनदिनानिमित्ताने ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर विशेषांक 15 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिध्द केला होता. या विशेषांकात सिनेमांतील लोक, सिनेमाचे समीक्षक आणि साहित्यातील लोक अशा तीन विभागांतून मिळून 21 व्यक्तींनी लिहिले आहे. संबंधित लेखकांना त्यांच्या आयुष्यावर किंवा जडणघडणीवर, आकलनावर किंवा भावनिक/वैचारिक प्रक्रियेवर किंवा कलाविषयक जाणिवांवर प्रभाव टाकून गेलेल्या एका सिनेमावर लिहिण्याबद्दल सुचवण्यात आले होते. कालांतराने पाच नव्या लेखांची भर घालून या विशेषांकाचे पुस्तकही त्याच नावाने प्रकाशित झाले. त्यामधील ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या इंग्रजी युद्धपटावर अरुण टिकेकर यांनी लिहिलेला हा लेख. रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा लेख कर्तव्यवरून पुनःप्रसारित करत आहोत. - संपादक

नंदा नारळकर हे पु.ल. देशपांडे यांचे जवळचे मित्र. एकदा ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले असताना त्यांच्या बोलण्यात असे आले की, पु.ल. आणि इतर मित्रांनी त्यांच्या तरुणपणी त्या सर्वांना प्रभावित करणाऱ्या असामान्य शंभर इंग्रजी चित्रपटांची एक यादी तयार केली होती. ती यादी पाठवाल का, अशी मी नारळकरांना विनंती केली आणि म्हटले, निदान आमचे किती आणि कोणते चांगले इंग्रजी चित्रपट पाहायचे राहिले आहेत, ते तरी कळेल आणि संधी मिळताच एकेक करून ते पाहताही येतील. नारळकरांनी स्मरण ठेवून पुण्याला परतल्यानंतर ती यादी पाठवली. त्यांतले सुमारे पन्नास चित्रपट मला पाहायला मिळाले होते. मी ज्यांच्याबद्दल ऐकलेसुद्धा नव्हते, असे काही चित्रपट त्यांच्या यादीत होते. काहींच्याबद्दल ऐकले पण पाहण्याचा योग आला नव्हता, असे होते. मला आवडलेल्या- किंबहुना ज्या चित्रपटांचा प्रभाव बराच काळ माझ्या मनावर बिंबून राहिला होता, तेही काही त्या ‘मास्टर्स-लिस्ट’मध्ये होते, हे पाहून बरे वाटले होते. दोन्ही -विशेषतः दुसऱ्या- महायुद्धासंबंधी असलेलेही काही चित्रपट त्यात होते. ‘गन्स ऑफ नव्हरोंन’, ‘द लाँगेस्ट डे’, ‘द ग्रेट एस्केप’ वगैरे... भव्य पार्श्वभूमी आणि नितांतसुंदर अभिनय या दोन कलागुणांव्यतिरिक्त हे सर्व युद्धपट कोणत्या न कोणत्या बाबतीत श्रेष्ठतेत एकमेकांवर कुरघोडी करणारे होते, यात शंका नाही.

‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ हा मला माझ्या तरुणपणी भलताच प्रभावित करणारा चित्रपटसुद्धा त्यांच्या यादीत होता. मला प्रभावित करणारे काही चित्रपट त्या यादीत नव्हते, हेही कबूल केले पाहिजे. प्रभावित होण्यासाठी कित्येकदा कोणाबरोबर चित्रपट पाहिला, कोणत्या ‘मूड’मध्ये पाहिला वगैरे चित्रपटबाह्य कारणेही महत्त्वाची ठरतात. ‘मास्टर्स-लिस्ट’मध्ये तसा प्रकार नव्हता. अर्थात आवड-निवडीच्या बाबतीत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हणून मतभेद दाखवणे त्यात नव्हते. निखळ कला आणि रस यांचा विचार त्यात होता. त्या यादीतील प्रत्येक चित्रपट अभिनय, कथानक, वातावरण-निर्मिती, रस-निष्पत्ती अशा चित्रपट-निर्मितीच्या अंगउपांगांचा गांभीर्याने विचार करून अधिकारी व्यक्तींनी निवडला होता. ही यादी म्हणजे चित्रपट रसग्रहणासाठी विचारात घ्यावेत असे एकेक वस्तुपाठ आहेत, असे वाटून मी ती काळजीपूर्वक जपून ठेवली आहे. पण अतिशय जपून ठेवलेली वस्तूच हवी तेव्हा मिळू नये, तसे झाले आहे. प्रत्येक कागद जपून ठेवावा, तो ऐतिहासिक महत्त्वाचा ठरू शकतो- इतिहासपुरुष दत्तो वामन पोतदारांच्या या शिफारसीप्रमाणे बहुतेक कागद पिशव्यांत भरून ठेवले आहेत, पण कोणत्या पिशवीत काय आहे ते कळेनासे झाले. माझ्याकडे ती यादी आहे, नक्कीच आहे; पण ती कोणत्या पिशवीत आहे, हे मात्र उमजत नाही. हरवले ते कधी तरी गवसेलच, ही आशा आहे. फक्त कोणी तरी टिकेकर दफ्तर उघडून त्यातील कागद-दस्तावेज म्हणा हवे तर- धुंडाळणाऱ्याचा शोध जारी आहे.

वर उल्लेखिलेल्या सर्वच्या सर्व युद्धचित्रपटांनी ते पाहत गेलो तसतसे मला प्रभावित केले होते. कोर्ट-रूम ड्रामा, सस्पेन्स, कॉमेडी वा युद्धपट युवा, अप्रगल्भ मनाला नेहमीच प्रभावित करतात असे म्हणतात. राष्ट्रभक्तीचा मर्यादित अर्थ लावल्याने युद्धपट आवडत असावेत. असेलही तसे. पण मला ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या चित्रपटाने सर्वाधिक प्रभावित केले होते, हे नाकारता येणार नाही. अन्य युरोपीय संस्कृतींपेक्षा ब्रिटिश संस्कृती, त्यांची राष्ट्रनिष्ठा (राष्ट्रभक्तीत एक प्रकारचे आंधळेपण असू शकते, राष्ट्रप्रेमात एक प्रकारचे भाबडेपण येऊ शकते, राष्ट्रनिष्ठा डोळस आणि जाणीवपूर्वक जोपासलेली असते), त्यांचे स्वतःवरील नियंत्रण, आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करण्याची त्यांची कर्तव्य-भावना, आपण केलेल्या निर्मितीबद्दलचा त्यांचा अभिमान याचे मला सुप्त आकर्षण आहे. नाही कशाला म्हणू? ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या चित्रपटात यांतील अनेक गुण मला दिसले, म्हणून कदाचित या चित्रपटाने मला प्रभावित केले होते.

डेव्हिड लीनने दिग्दर्शित केलेला आणि विल्यम होल्डन, जॅक हॉकिन्स आणि अलेक गिनेस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने नटलेला 1957 मध्ये प्रथम प्रदर्शित झालेला हा चित्रपट नवीन पिढीच्या खिजगणतीतही नसेल.

1957 मध्ये मी 11-12 वर्षांचा होतो. त्या वेळी कुठलाही चित्रपट- अगदी युद्धपटसुद्धा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची संधी आई-वडिलांकडून मिळणे शक्य नव्हते आणि त्यांची नजर चुकवून तो पाहायला गेलो तरी अमेरिकन आणि ब्रिटिश अभिनेत्यांचे इंग्रजी कळणे संभव नव्हते. साठीच्या दशकाच्या मध्यावर हा चित्रपट पुनर्प्रदर्शित झाला, त्या वेळी 1966-67 च्या महाविद्यालयीन जीवनात मी पाहिला आणि त्यातील राष्ट्रनिष्ठेच्या दर्शनाने भारावून गेलो होतो, असे स्मरते. राष्ट्रप्रेम नावाचा उत्कट गुण शत्रू-सैनिकांना पकडल्यानंतर अतीव तिरस्काराच्या अवगुणात कसा आणि किती लवकर रूपांतरित होतो आणि बघता-बघता तो गुण किती भयावह अवगुणात पालटतो, हेच युद्धपट दाखवितात.

‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या चित्रपटातील शत्रुपक्षाच्या युद्धकैद्यांविषयी कमालीचा तिरस्कार, शत्रुपक्षाकडून मिळणारी वर्तणूक, युद्धकैद्यांना कसे वागवावे यासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन यांचे दर्शन होता-होता भावोत्कट अभिनयाने ‘वास्तव असेच असणार’ असे वाटून काही दिवस एक प्रकारच्या उदासीने मन झाकोळले होते. युद्धपटात एका बाजूचे जिंकणे जसे अपेक्षित असते, तसा दुसऱ्या पक्षाचा पराभवही अपेक्षित असतो. कोणाचा जय झाला, हे कळणे अवघडच असते. जीवित-वित्त हानी दोहों बाजूंची होत असते आणि तरीही ‘जितं मया, जितं मया’ असा गलका पक्ष-विपक्षाच्या बाजूने होत असतो. ज्या देशाच्या मंडळींनी जय मिळवला, त्या देशाची मंडळीच आपल्या देशवासीयांच्या शौर्यगाथांवर चित्रपट काढणार हे कळूनही त्यातील मंडळींच्या शौर्यगाथा पाहाव्याशा वाटतात; एवढेच नव्हे, तर दोन परक्या देशीय क्रिकेट संघांमधील सामना त्यातीलच एकाची बाजू घेऊन पाहावासा वाटतो- तसे युद्धपट पाहताना वाटते.


हेही वाचा :  ऑडिओ : ब्रूनोचा मित्र श्मूल (चित्रपट - द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज)


ब्रिटिश युद्धकैद्यांच्या फलटणीला मार्च करत कर्नल साइतो कमांड करत असलेल्या जपानी छावणीत आणले जाते. तो युद्धकैद्यांना सांगतो की, ‘तुम्हा युद्धकैद्यांकडे बर्मा रेल्वेसाठी क्वाय नदीवर ब्रिज बांधावयाची जबाबदारी आहे.’ युद्धकैदी सारे सारखे. कोणाची कोणतीही रँक असेल, ती विसरून सर्वांना अंगमेहनत करावीच लागेल. येथून चित्रपटाची सुरुवात होते.

ज्येष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना शारीरिक मेहनत करायला लावणे, हे युद्धकैद्यांना कसे वागवायचे याचे दिग्दर्शन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय जीनिव्हा कराराचे उघड-उघड उल्लंघन असल्याचे सांगून ब्रिटिश लेफ्टनंट कर्नल निकोल्सन मजुरीचे काम करण्यास नकार देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर युद्धकैदी कामावर गेले तरी तो आपल्या सर्व साथीदार कैद्यांसह कामावर न जाता मागेच राहतो. कर्नल साइतो त्याच्या दिशेने जीनिव्हा कराराची प्रत भिरकावतो आणि सर्व ब्रिटिश कैद्यांसमोर त्याच्या श्रीमुखात देऊन त्याचा अपमान करतो. सर्व कैद्यांना कडक उन्हात दिवसभर उभे राहण्याची शिक्षा देतो. शेवटचा मार्ग म्हणून लेफ्टनंट कर्नल निकोल्सनला अन्न-पाण्यावाचून एका गरम भट्टीत रात्रभर एकटे राहण्याची शिक्षा देतो. तरी निकोल्सनच्या हाताखालचे सैनिक कामावर जायला तयार होत नाहीत.

शेवटी कर्नल साइतोलाच माघार घ्यावी लागते, कारण ब्रिज बांधून पुरा करण्यासाठी त्याला मर्यादित मुदत दिलेली असते आणि त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मुदतीत ब्रिजचे निर्माण झाले नाही तर साइतोला पदभार तर सोडवा लागणार असतोच, पण त्याला जीवदान मिळणेही अशक्य असते. कामावर गेलेले इतर कैदी लाकडाचा ब्रिज बांधताना मुद्दाम टंगळमंगळ करत असतात. निष्काळजीपणा करत असतात, निकृष्ट प्रतीचे काम करत असतात. ब्रिजच्या लाकडावर वाळवी वगैरे आणून सोडतात. कर्नल निकोल्सन सर्व अमेरिकन, डच आणि ब्रिटिश कैदी अधिकारी आणि सैनिक यांची कानउघाडणी करतो. जपानी सैन्याच्या उपयोगी पडला तरी बेहत्तर, पण ब्रिटिशांनी निकृष्ट प्रतीचा ब्रिज बांधला असा ठपका नको, असे सुनावतो.

निकोल्सनची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असते. जागेची तो प्रथम पाहणी करतो. ब्रिजची जुनी जागा चुकीची असल्याने ती तो बदलायला लावतो, आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना ब्रिजचा योग्य आराखडा बनवायला लावतो, त्याप्रमाणे वेळेपूर्वी तो बांधून पुरा करण्यासाठी कडक शिस्तपालन करायला लावतो. काही अधिकारी पळून जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांतले दोन मारले जातात, जखमी होऊनही एखादा-दुसरा पळून जाण्यात यशस्वी होतो. पण ब्रिटिश आर्मीने हा ब्रिज बांधला आहे, असे अभिमानपूर्वक सांगता आले पाहिजे, या एकाच ध्येयाने प्रेरित झालेला निकोल्सन प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहतो. सैन्य त्याचे ऐकून पावसात-वादळात तो ब्रिज पुरा करत आणते.


हेही वाचा : क्वेमाडा - अच्युत गोडबोले


निकोल्सन ब्रिज बांधत असताना इकडे अमेरिकन कमांडो पॅराशूटच्या साह्याने हेलिकॉप्टरमधून उतरतात, बांधलेल्या लाकडी ब्रिजला सुरुंग लावून रेल्वे येत असतानाच तो बॉम्बने उडवून देण्याचा घाट घालतात. नदीच्या पाण्याची पातळी अनपेक्षितपणे खाली जाते, निकोल्सनला सुरुंगाच्या वायरी दिसतात, तो साइतोला सावध करतो, पण तोपर्यंत ट्रेन अगदी जवळ आल्याची सूचना मिळते. कमांडो साइतोला मारतात. ट्रेन येते, बॉम्बही उडतो. हा अमेरिकन प्लॉट असल्याचे निकोल्सनला कळते, तेव्हा त्याला धक्का बसतो. पण बॉम्ब उडतो तेव्हा तो स्वतःसुद्धा जखमी होतो. ट्रेन नदीत कोसळते, ब्रिजही कोसळतो. निकोल्सन ‘हे मी काय केले’ म्हणत पश्चात्ताप व्यक्त करतो. वैद्यकीय अधिकारी क्लिप्टन ‘वेडेपणा, वेडेपणा’ असे पुटपुटत राहतो. हे कथानक!

कोणत्याही युद्धपटात कल्पना आणि सत्य यांची बेमालूम सरमिसळ केलेली असते, तशी या चित्रपटातही केलेली आहे. व्यक्तिमत्त्वाची आणि नावांची अदलाबदल केली आहे. काल्पनिक घटना घुसडणे आणि वास्तव लपविणे म्हणजे पर्यायाने इतिहासाचा विपर्यास करणे होय. पण चित्रपट म्हणजे ‘डॉक्युमेंट्री’ नव्हे, हे तर खरेच.

कलात्मक आनंद देण्यासाठी असा विपर्यास क्षम्य ठरतो, असे लेखक-कलावंत यांचे नेहमी म्हणणे असतेच. ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ या युद्धपटात तर असा सत्याचा विपर्यास खूपच आहे. त्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. पण त्याची दखल घेण्याचे येथे कारण नाही. ब्रिज बांधण्याच्या या जपानी ‘प्रोजेक्ट’वर काम करताना 1300 युद्धकैदी आणि 80,000 ते 1,00,000 गावकरी मृत्युमुखी पडले, असा अधिकृत अहवाल आहे. पार्श्वभूमी ब्रह्मदेशाची असली संपूर्ण चित्रपट श्रीलंकेच्या कितुलगला भागात चित्रित झाला. फारच थोडा भाग इंग्लंडमध्ये चित्रित झाला होता. आजही तो ब्रिज पाहावयास मिळतो, असे म्हणतात.

हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात राहिले ते निकोल्सन (अलेक गिनेस), साइतो (सेसू हायकावा) आणि मेडिकल ऑफिसर क्लिप्टन (विल्यम होल्डन). तिसाव्या अकॅडेमी ॲवॉर्डसच्या वेळी ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ला ‘उत्कृष्ट चित्रपट’ यासह एकंदर सात ॲवॉर्डस् मिळाली, तेव्हा आपल्या चोखंदळपणाबद्दल माझा मलाच अभिमान वाटला. त्यावर शिक्कामोर्तब झाले 1997 मध्ये, जेव्हा सार्वकालिक उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेसने समावेश केला, तेव्हा कारण दिले होते की- सांस्कृतिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या आणि कलात्मकतेच्या दृष्टीने लक्षणीय!

- अरुण टिकेकर


साधना प्रकाशनाचे 'मला प्रभावित करून गेलेला सिनेमा' हे पुस्तक अ‍ॅमेझाॅनवरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.


द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय (चित्रपट)

 

Tags: युद्धपट युद्ध युक्रेन रशिया साधना चित्रपट विशेषांक अरुण टिकेकर सिनेमा हॉलिवूड Load More Tags

Add Comment