यशस्वी जीवनासाठी महत्त्वाची, भावनिक बुद्धिमता!

‘इमोशनल इंटेलिजन्स’ या पुस्तकात डॅनिअल गोलमन बुद्धी, भावना आणि यशाचा संबंध उलगडून दाखवतात..

आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साह्याने हाताळल्या पाहिजेत. आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचं नियमन करता येतं. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं. योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्ट्या समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून गोलमन म्हणतात, केवळ बुद्ध्यांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्ध्यांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.

एक प्रसिद्ध जादूगार एकदा एका प्रेक्षागृहात जादूचे प्रयोग करत होता. दोन-चार हजार माणसे बसतील एवढे मोठे प्रक्षागृह होते ते. जादूचा प्रयोग ऐन रंगात आल्यावर एक अधिकारी मंचावर आले आणि जादूगाराच्या कानात काहीतरी पुटपुटले. त्यावर जादूगाराने होकारार्थी मान हलवत, “आपण हे करुयात” असे अधिकाऱ्याला सांगितले. मग प्रेक्षकांकडे वळून तो म्हणाला, “आत्ता या अधिकारी साहेबांनी एक विचित्र जादू पाहायची इच्छा व्यक्त केली आहे, पण ती जादू मी सभागृहात करू शकत नाही, ती मला बाहेर करावी लागेल, जिथे मी हवेत हळुवार उडू शकतो आणि गायब होऊ शकतो. तेव्हा मी आपल्या सर्वांना बाहेर येण्याची विनंती करतो.” ते अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून, एक अग्निशमन अधिकारी होते, जे खरंतर भीतीपोटी निरोप द्यायला आले होते की, “प्रेक्षागृहाला आग लागली आहे, आणि थोड्याच वेळात आग सर्वत्र पसरू शकते. तेव्हा सर्वांना लवकरात लवकर हे प्रेक्षागृह रिकामे करायला सांगा.” अजिबात भावनिक न होता क्षणात जादूगाराने युक्तीने, वरील कारण देऊन लोकांना प्रेक्षागृहाबाहेर काढले. तो जादूगार होता ब्लॅकस्टोन. प्रसंगावधान दाखवत त्याने स्वतःच्या व प्रेक्षकांच्या भावनेवर जे नियंत्रण मिळवले त्याला म्हणतात भावनिक बुद्धिमत्ता.

स्वत:ला योग्य प्रकारे ओळखणं आणि स्वत:च्या भावनांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येणं या भावनिक बुद्धिमत्तेसाठी करायच्या पहिल्या दोन पायऱ्या. आसपासच्या माणसांना ओळखता येणं, त्यांचे स्वभाव जाणून घेता येणं ही तिसरी पायरी आहे. कोणत्याही धर्माच्या शिकवणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे दुसऱ्यांवर प्रेम करणं. किती सोपं वाक्य आहे हे. पण यात अनंत अडचणी असतात. दुसऱ्याबद्दल मनात संशय निर्माण होणं, मत्सर निर्माण होणं, उच्च किंवा हीन भावना निर्माण होणं. या सर्व भावना नकारात्मक आहेत. या भावना माणसाला माणसापासून दूर करतात. मैत्री, प्रेम यांच्यामध्ये त्या भावना कळत किंवा नकळत घुसतात, घर करून बसतात, त्रास देत राहतात. काही वेळा स्पर्धेची भावना निर्माण होते. स्पर्धा करायचीच असेल तर फक्त स्वत:शीच स्पर्धा करायला हवी. दुसऱ्यांची प्रगती आणि यश यात आनंद घेता आला पाहिजे.

स्वत:मध्ये कधीही कोणाबद्दलही नकारात्मक भावना येऊ न देणं हे शक्य असतं का? अशी भावना येत असेल तर सोडून देता यायला हवी. स्वच्छ, छान, मोकळं जगण्यासाठी आपला जन्म झाला आहे याच्यावर आपला विश्वास हवाच! ‘नावडतीचं मीठ अळणी’ हा मनुष्यस्वभाव. मात्र भावनिक बुद्धिमान माणसाचा हा स्वभाव असू शकत नाही. किंवा जरी ही भावना नैसर्गिकरीत्या मनात आली तरी तिचं समायोजन कसं करायचं हे आपल्याला केव्हाही शिकता येतं.

आपल्या एका स्वतंत्र दृष्टीने जगाकडे बघा. प्रवासी ट्रकच्या मागे एक वाक्य अनेकदा वाचायला मिळतं – देखो मगर प्यार से. जीवनविषयक तत्त्वज्ञानच लिहिलं आहे या तीन शब्दांत. रंगीबेरंगी फुलझाडांनी डवरलेल्या एखाद्या बागेत नुसतीच हिरवी पानं ल्यालेलं झाडही लक्ष वेधून घेतं. सुंदर दिसतं. इतरांपेक्षा उठून दिसतं. आपण एखाद्या ‘विषारी’ टीव्ही मालिकेतलं विषारी पात्र नाही. आपलं स्क्रिप्ट आपण लिहितो. दुसऱ्याने लिहून दिलेले संवाद आपल्याला बोलायचे नसतात. प्रत्येक सकारात्मक किंवा नकारात्मक भावना ही अत्यंत नैसर्गिक असते. ही भावना मनात आली तर आधी ती स्वीकारली पाहिजे. ती मनात येईल. तिचं अस्तित्व दाखवून देईल, रेंगाळेल. त्यानंतरच या भावनांचा निचरा होईल. हा निचरा होणं आवश्यक तर खरंच. नकारात्मक भावनांना रेंगाळू न देणं हीच तर भावनिक बुद्धिमत्ता.


Read Also : Creativity : Art as well as Science - Datta Naik


भावना बऱ्याचदा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. पण त्यांचं नियमन आपल्याकडे घ्यावं. यावर एक महत्त्वाचं संशोधन डॅनिअल गोलमन यांनी केलं आहे. त्यांनी अभ्यासलेल्या केसेसमधून जे हाती आलं त्यातून त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हा विषय नीट समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात डॅनिअल गोलमन बुद्धी, भावना आणि यशाचा संबंध उलगडून दाखवतात. त्यांच्या मते – माणूस हा भावनांच्या भरात काहीही करू शकतो. बुद्धिमान समजल्या गेलेल्या माणसांच्या हातूनही भावनिक चुका होतात. अशा चुका यशाचं रूपांतर अपयशात करू शकतात. म्हणून आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साह्याने हाताळल्या पाहिजेत. आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचं नियमन करता येतं. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं. योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्ट्या समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्ध्यांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्ध्यांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.

सामान्य बुद्धिमत्ता तुम्हाला नोकरी मिळवून देण्यास मदत करेल; भावनिक बुद्धिमत्ता पदोन्नतीस. आपल्या अवतीभोवती असे कित्येक लोक असे असतात की ज्यांच्या जवळ तीक्ष्ण बुद्धी असूनसुद्धा, केवळ त्यांच्या ‘तिरसट’ किंवा एकलकोंडया स्वभावामुळे त्यांनी स्वतःच्या प्रगतीचे मार्ग रोखले आहेत. याउलट सामान्य क्षमतांचे असे कित्येक लोक असतात, की जे केवळ इतरांवर ‘प्रभाव’ टाकण्याच्या गुणाच्या आधारे जीवनात बरेच यशस्वी झाले आहेत. कित्येक व्यवस्थापक, अधिकारी, कलाकार व नेते या दुसऱ्या गटात मोडतात. इतरांवर प्रभाव टाकण्याची जेव्हा गोष्ट केली जाते तेव्हा याचा अर्थ चापलुसी किंवा तोतयागिरी होत नाही. या उलट अशा व्यक्ती इतरांना व परिस्थितीला लगेच समजून घेतात व त्यानुसार स्वतःच्या भावनिक वर्तनात बदल घडवून आणतात. या द्वारे /त्यांची इतरांना समजून घेण्याची क्षमताही दिसून येते. भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर खूप लिहिता येईल पण थोडे शास्त्रीय विवेचन करण्यासाठी आपण गोलमनने सुचवलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच घटकांचा थोडक्यात आढावा घेऊ या.

• स्वतःच्या भावनांची जाणीव

आपण स्वतःच्या भावनांना अगदी व्यवस्थित ओळखतो असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं. परंतु हे नेहमीच खरं नसतं. बऱ्याच व्यक्तींना स्वतःच्या सध्याच्या स्थितीत नेमक्या काय भावना आहेत हेच समजत नसतं. त्यामुळे त्यांना बरेच महत्त्वाचे निर्णय व्यवस्थित घेता येत नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांना बऱ्याचदा स्वतःच्या भावना चेहऱ्यावरचे हाव-भाव, आवाजात बदल किंवा देहबोली यांद्वारे व्यक्त करता येत नाहीत.

• स्वतःच्या भावनांवरील नियंत्रण

बऱ्याचदा आपण ‘डोकं सरकलं’ किंवा ‘जिभेवरचा ताबा सुटला’ असं म्हणतो. काही व्यक्ती आपल्याला चार-चौघांमध्ये दुःख अनावर झाल्याने रडताना दिसतात. अशा वेळेस आपण बोलत असतो स्वतःच्या भावनांवरील नियंत्रणाबाबत. हे नियंत्रण जर व्यवस्थित नसेल, तर बऱ्याचदा व्यक्ती महत्त्वाच्या ध्येयापासून वंचित राहू शकते. हे कार्यालयातील पदोन्नतीपासून वंचित राहणं (वरिष्ठांवर त्यांच्यासमोर राग काढल्यास) असू शकतं किंवा पती/पत्नीचं प्रेम (घरात सारखी चिडचिड करत असल्यास).

• स्वतःस प्रेरित करणे

दैवावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती दोन प्रकारच्या असतात. एक, ज्यांना विश्वास असतो की, 'असेल माझा हरि, तर देईल खाटल्यावरी!' आपण आस्तिकतेवर चर्चा करत नसलो तरी, एखादे ध्येय प्राप्त करण्याकरिता परिश्रम करण्याची व्यक्तीची तयारी या अभिवृत्तींद्वारे दिसून येते. काही व्यक्ती खूप धडपड करणाऱ्या असतात, ज्या नियोजनबद्ध पद्धतीने ध्येयप्राप्तीच्या मार्गावर वाटचाल करत असतात. अशा व्यक्ती लहान-सहान आमिषांना बळी पडून जीवनातील मोठ्या ध्येयांपासून परावृत्त होत नाहीत.

• इतरांच्या भावना ओळखणे व प्रभावित करणे

स्वतःच्या भावनांवरील नियंत्रणासोबत इतरांच्या भावना जाणून घेणंदेखील महत्वाचं असतं. लहान मुलांना वडिलांना ‘केव्हा’ एखादी गोष्ट मागायची हे बरोबर समजतं. वडिलांचा आनंदित किंवा प्रफुल्लित ‘मूड’ पाहूनच मागणी केली जाते. प्राध्यापकांकडून वही तपासून घेण्यापूर्वी विद्यार्थी त्यांच्या ‘मूड’चा अंदाज घेतात. अशाच प्रकारची स्थिती जीवनातील विविध परिस्थितींमध्ये आढळते. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती केवळ इतरांच्या भावना समजून घेत नाही तर, इतरांच्या भावनांना प्रभावितदेखील करते. याद्वारे त्यांना हव्या असलेल्या भावना इतरांमध्ये निर्माण होतात व ध्येयप्राप्तीचा मार्ग सोपा होतो. राजकीय पुढारी या घटकामध्ये निश्चितच तज्ज्ञ असतात.

• आंतरवैयक्तिक संबंध हाताळणे

असे खूप लोक असतात ज्यांचं कुणाच सोबत ‘जमत’ नाही. या उलट अशा व्यक्तीदेखील तुमच्या पाहण्यात आल्या असतील ज्यांचं कुणाशीच वैर नसतं. अशी ‘अजातशत्रू’ माणसं स्वतःदेखील नेहमी हसत-खेळत राहतात व इतरांना देखील हसत-खेळत ठेवतात. अशा व्यक्ती कधीही इतरांवर स्वतःचा प्रभाव बळजबरीने टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांचा प्रभाव आपोआप इतरांवर पडतो. साहजिकच अशा व्यक्तींच्या मार्गात कोणी अडथळे निर्माण करत नाही.या उलट गरज असल्यास, लोक स्वतःहून त्यांच्या मदतीकरता धावून येण्यास तत्पर असतात.

- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com

Tags: emotional intelligence marathi book emotions intelligence success bestseller अनुवादित ग्रंथ परिचय बुद्धी भावना Load More Tags

Comments:

Govardhan Garad

वास्तव जीवन जगण्यासाठी आवश्यक असे मत मांडले आहे.

Add Comment