बदलत्या साहित्याचा नकाशा

विश्राम गुप्ते यांच्या 'नवं जग नवं साहित्य' या पुस्तकाचा परिचय

साहित्यिक हा करमणुकीच्या पलीकडे काहीतरी शोधत असतो. त्याला सत्याचा शोध म्हणजे काय ते समजतं. सत्य काय आहे हा प्रश्न न विचारता सामान्यांच भागतं पण, साहित्यिकाला मात्र हा प्रश्न अनिवार्य आहे. सत्ता हे साहित्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. साहित्य हे मुक्त जाणीवेचा अविष्कार असतं. राजकीय सत्ता या अविष्कारावर बंदी आणण्यासाठी टपून बसलेली असते. सत्ता सेन्सॉरशीप लावते तर साहित्यिक ती धुडकावून लावतात. म्हणून सत्ता व साहित्यिक यांचं नातं हे तणावपूर्ण असतं. आज पर्यावरणाचा प्रश्न हा साहित्यासमोरचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. ‘नवं जग नवं साहित्य’ हे पुस्तक या सर्व बदलांचा नकाशा आहे. तो वाचकांना, तसेच लिहू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.

स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी स्वीकारलेल्या समाजवादी धोरणांमुळे भारतात औद्योगिक क्रांती होण्यास तसा उशीरच झाला. नेहरूंनी समाजवादी धोरण स्वीकारल्यामुळे भारतात डाव्या विचारसरणीने चांगलेच हातपाय पसरले. याचा परिणाम असा झाला की, जे साहित्य गरिबी, कामगार, उपेक्षितांचे प्रश्न मांडेल ते सर्वच नैतिक आणि जे आधुनिक, श्रीमंत, औद्योगिकीकरणाच्या बाजूने बोलणारे असेल ते सर्वच अनैतिक अशी नाही म्हटली तरी साहित्याची सरळ सरळ विभागणी झाली. पुढे 1991 मध्ये भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारले आणि मध्यमवर्गीय लोकांकडे पैसा खेळू लागला. या आर्थिक सुबत्तेतून मध्यमवर्ग हा उपभोक्तावादाचा सर्वात मोठा बळी ठरला. या झपाट्याने बदलत्या काळात या वर्गाच्या साहित्यिक जाणिवादेखील झपाट्याने बदलत गेल्या. साठोत्तरी समाजात, ज्यांचा बदल स्वीकारण्याचा वेग मंद होता त्यांनी या उदारीकरणामुळे थेट टॉप गिअर टाकला. या 25 वर्षांतील बदललेलं मराठी साहित्य, साहित्यिक जाणिवा, साहित्यासमोरची महत्त्वाची आव्हाने, बदलत्या काळातील साहित्यासमोरची प्रलोभने, प्रादेशिकता, देशीयता, आधुनिकता, उत्तर आधुनिकता, इलेक्ट्रॉनिक मीडियाची मानवी मनावर असलेली सर्वंकष सत्ता, आणि देशांतर्गत सुरू झालेलं अस्मितेचे राजकारण इत्यादी गोष्टींना नवा बहर आला. आर्थिक उदारीकरणानंतरच्या बदलत्या मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे विश्राम गुप्ते यांनी आपल्या ‘नवं जग नवं साहित्य’ या नव्या पुस्तकात. हे पुस्तक प्रकाशित केलंय ‘देशमुख आणि कंपनी’ यांनी. पुस्तकात एकूण 25 विश्लेषणात्मक लेख समाविष्ट केले आहेत.

प्रत्येक माणसात ‘मी’पणाची किंवा ‘स्व’ची अशी भावना वसत असते. पण आजच्या तंत्रज्ञानकेंद्रित जगात हा ‘मी’ किंवा ‘स्व’ हा एकसंध राहिला नाहीये तर, शतखंडित झाला आहे. यालाच ‘मल्टिफ्रेनिक’ असं म्हटलं जातं. मानवी मनाची खंडित होण्याची प्रक्रिया ही विज्ञान-तंत्रज्ञान जसजसं विकसित होऊ लागलं तसतशी क्रमाक्रमाने होत गेली. आज त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्मार्टफोन, इंटरनेट, युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर इत्यादींचा समावेश होतो. अपारंपारिक विचार करायचा असेल तर त्याची किंमत चुकवावी लागते. असा विचार करणाऱ्यांना प्रस्थापित साहित्य बहिष्कृत करू शकते. आज उत्तर आधुनिक काळात आपला सामाजिक आणि सांस्कृतिक परिसर जाहिरातबाजीने झाकोळून गेला आहे. अशा उपभोक्तावादी वातावरणात गंभीर साहित्याचा विचार मागे पडतो. वाचन, जे साहित्याचा प्राण असतं ते उपभोक्तावादी समाजाची गरज म्हणून उरत नसतं. 

आपण आधुनिक साहित्य, आधुनिक साहित्य वगैरे बोलत असतो पण सर्वप्रथम आधुनिक साहित्य म्हणजे काय हे ठरवावे लागेल. यात मराठी साहित्य हे आधुनिक झालं आहे का? झालं असेल तर ते कधी झालं, हे सर्व आधी ठरवावं लागेल तेव्हा उत्तर आधुनिकतेचा विचार करता येईल. केशवसुतांची ‘तुतारी’ म्हणजे आधुनिक का? सेक्युलर होणं म्हणजे आधुनिक का? नेमाडे यांच्या साहित्याचे भक्त होणे म्हणजे आधुनिक का? वडिलोपार्जित भूमिकेला आव्हान न देणे, त्याबद्दल सतत भक्तिभाव बाळगणे असा हितसंबंधांची राखण करणारा साहित्यिक असला तर पोस्टमॉडर्न तर सोडाच तो मॉडर्नसुद्धा नाही; तर तो हौशी म्हणजेच निरुपद्रवी आहे. मीडिया आणि मार्केट या दोन्ही गोष्टी माणूस असेपर्यंत राहतील. त्यामुळे त्यांचा बाऊ न करता दोन्हींचा कल्पक वापर करून मानवी कल्याण कसं साधायचं यावर लेखकाने विचार करायला हवा. मराठी आणि एकूणच भारतीय समाजमन हे श्रद्धाळू आहे म्हणूनच प्रतीकांवर आधारित सांस्कृतिक संघर्ष भारतासारख्या भावनिक समाजाला चुकले नाहीत. मराठी साहित्य संमेलनातही यावरून संघर्ष झालेले आहेत. ते थांबवायचे असतील तर मिथककथांचं सामाजिक विश्लेषण व्हायला हवं. मिथकं ही सत्ताकांक्षेचं द्योतक असतात. ही उत्तर आधुनिकवादाची भूमिका आहे. साहित्याचं जगसुद्धा जातीपातीमध्ये विभागल्याने हे घडतं आहे. ही विभागणी नाकारणं फक्त नव्या जाणिवेच्या लेखकाला शक्य आहे. नवी जाणीव आत्मसात करणं म्हणजे लोकप्रिय साहित्य-निकषांना नाकारणं. आज किती लेखकांना हा नकार देता येईल? 

विश्राम गुप्ते

आपल्याकडे प्रसिद्ध लेखकांच्या मुलाखती ‘साहित्यिक गप्पा’ किंवा ‘लेखक आपल्या भेटीला’ अंतर्गत होत राहतात. नव्या मराठी साहित्यिकांनी ‘पॅरिस रिव्ह्यू’ या साप्ताहिकामधील लेखकांच्या मुलाखती वाचायला हव्यात. आपल्या संवेदनशीलतेच्या मर्यादाच लक्षात येऊन जातात. पिकवलेलं विकलं जात नसेल तर विकतं तेच नाईलाजाने पिकवावं लागतं ही मराठी प्रकाशकांची बोटचेपी भूमिका आहे. विकतं ते पिकवण्याऐवजी नवं काही पिकवून ते विकणं हे खरं धाडस आहे आणि ते सृजनशीलसुद्धा आहे. मराठी साहित्याचे डिसकोर्सेस हे प्रामुख्याने पुराणकथा, मिथककथा, ऐतिहासिक पराक्रम आणि तथाकथित क्रांतिकारी समाजवादी राज्यव्यवस्था अशा चार गोष्टींशी संबंधित आहे. साहित्याचं ध्येय हे सकल संवेदनशीलतेत वाढ करणे आहे. करमणूक हे लेखकाचं बायप्रॉडक्ट आहे, तर चिकित्सक विचार हे एंडप्रॉडक्ट आहे. 

साहित्याचं ध्येय अनुभवातलं तरल तत्व ओळखून ते कथा, कविता, किंवा कादंबरीतून मांडणे हे असतं. आपलं रोजचं जगणं स्वयंचलित यंत्रांसारखं असतं. झोपून उठलो की हे यंत्र सुरु होतं. झोपलो की ते आपोआप बंद होतं. परिस्थिती ह्या यंत्राची कळ फिरवते आणि आपण त्यानुसार जगतो. पण हे जगणं खरं नसतं. जगताना आयुष्याची ‘लिरिकल व्हेन’ गवसली पाहिजे. तिचा शोध म्हणजेच साहित्य. हा शोध लेखक ज्या चष्म्यातून करतो त्या चष्म्याला ‘साहित्यिक संवेदनशीलता’ म्हणतात. आज सगळीकडे मिडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट, मेडिटेशन या पाच ‘म’कारांचं प्रस्थ आहे. मार्केट नियंत्रित आजच्या एकविसाव्या शतकात अतिशय आक्रमक पद्धतीने केले जाणारे मार्केटिंग याने पुस्तक विक्री तर जोरदार होते. पण अशा या भन्नाट आर्थिक वातावरणात उपभोग्य साहित्य आणि वाचनीय साहित्य या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक क्रमाने नष्ट होऊ लागला आहे. आपण नॉस्टॅल्जिया का कुरवाळतो? कारण चालू काळात असमाधान असतं म्हणून माणसं भूतकाळात रमतात; हा मानसशास्त्रीय नियम समूहाला लागू होतो. भारतीय माणूस हा प्रायः भावूक पद्धतीने विचार करतो. स्मरणरंजन हा त्यांचा स्थायिभाव. चालू काळाशी दुष्मनी आणि भूतकाळाशी दोस्ती हे भारतीय मानसिकतेचं लक्षण आहे म्हणून इथे रॅडिकल काही घडत नाही. घडलं तर वाढत नाही. जागतिकीकरणाच्या या नव्या संस्कृतीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला आपल्यात काही अंतर्यामी बदल करावे लागणार आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे आपली नाळ पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक किंवा लोकवेद संस्कृतीशी आहे आणि तिलाच केवळ आपण बांधील आहोत असं न समजता, मिथककथांचा खजिना असलेल्या ह्या विविध सांस्कृतिक वारश्यांपासून आपण मुक्त आहोत,असं क्षणभर समजणं. असा एक अनोखा प्रयोग करणं हे आपल्या हाती आहे. कारण मुक्ती ही सगळ्या पूर्वसंस्कारांना नाकारूनच संभवते. 

मराठी प्रादेशिक साहित्याने काही गोष्टी या मातीत खोलवर रुजवल्या आहेत. मुळांअभावी माणूस उपरा होतो, तो पोरका होतो, नव्हे, असांस्कृतिक होतो, ही समज साहित्य-संस्कृतीवाल्यांची लाईन असते. ती एकदा घेतली की आपल्याच गावी सुरक्षितता अनुभवणाऱ्या साध्याभोळ्या वाचकांचा मोठा मतदारसंघ खूश होतो. वाचकांना खूश करण्याच्या नादात मराठीतले बहुतांश लेखक सांस्कृतिक, प्रादेशिक आणि भाषिक वर्चस्वाचे नकळतपणे प्रवक्ते होतात. स्वतःच्या मुळांबद्दल जे लेखक अभिमानाने बोलतात त्यांना वाचक आणि वाङ्मयीन पारितोषिकं मिळतात. कारण प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक मुळात लेखकाचे आर्थिक हितसंबंध दडलेले असतात. साहित्य संस्कृती ही आध्यात्मिक साक्षात्कारातून नव्हे तर आर्थिक हितसंबधांतून फोफावते. आज काल इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्याला इतकं व्यापून टाकलं आहे की विचारता सोय नाही. या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दादागिरीचं प्रतिबिंब असलेलं कितीसं साहित्य मराठीत उपलब्ध आहे? या मीडियाच्या मगरमिठीतून सोडवू शकेल आणि पुढची वाट दाखवू शकेल असं कोणतं साहित्य आपण प्रसवू शकलो आहोत? आपल्या जाणीवांवर होणाऱ्या डिजिटल हल्ल्यांना आपण कसं परतवून लावणार यावर साहित्य कधी विचार करणार आहे? जाणिवेला तल्लख ठेवण्यासाठी स्वतंत्र वृत्तीने विचार करावा लागतो आणि तो मीडियाच्या प्रभावक्षेत्राबाहेर राहूनच करता येत असतो. 

साहित्यिक हा करमणुकीच्या पलीकडे काहीतरी शोधत असतो. त्याला सत्याचा शोध म्हणजे काय ते समजतं. सत्य काय आहे हा प्रश्न न विचारता सामान्यांच भागतं पण, साहित्यिकाला मात्र हा प्रश्न अनिवार्य आहे. सत्ता हे साहित्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. साहित्य हे मुक्त जाणीवेचा अविष्कार असतं. राजकीय सत्ता या अविष्कारावर बंदी आणण्यासाठी टपून बसलेली असते. सत्ता सेन्सॉरशीप लावते तर साहित्यिक ती धुडकावून लावतात. म्हणून सत्ता व साहित्यिक यांचं नातं हे तणावपूर्ण असतं. आज पर्यावरणाचा प्रश्न हा साहित्यासमोरचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. ‘नवं जग नवं साहित्य’ हे पुस्तक या सर्व बदलांचा नकाशा आहे. तो वाचकांना, तसेच लिहू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.

नवं जग नवं साहित्य
लेखक : विश्राम गुप्ते
प्रकाशक : देशमुख आणि कंपनी 
पृष्ठे : 256, किंमत : ₹350

- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com 

Tags: मराठी साहित्य साहित्यिक साहित्यविश्व साहित्य संमेलन literature books Authers bhalchandra nemade kosala Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Introductory article about the book is good. Certenly it will provide substantial knowledge about literature

Satish Badwe

लेख आवडला. महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. अशाच पद्धतीने विचार करायला हवा. विश्राम गुप्ते हे अत्यंत मूलभूत चिंतन मांडतात, जाणकारांनी याचा विचार करणे व त्यावर मंथन करणे आवश्यक आहे.

आत्माराम जगदाळे

खूपच सुंदर माहिती - पुस्तक खरेही करून वाचणार .

Manisha Ugale

विश्राम गुप्ते वाचकांना भानात आणणारे लेखक आहेत. त्यांचं लेखकाची गोष्ट आणि नवे जग... ही दोन्ही पुस्तकं फार आवडली आहेत. जास्तीत जास्त लिहित्या माणसांपर्यंत ही पुस्तके पोहोचायला हवीत असं वाटतं, त्यादृष्टीने हा लेख निश्चितच उपयुक्त आहे. पुस्तकाव्यतिरिक्त दिलेले इतर संदर्भ देखील फार आवडले.

लक्ष्मण बिराजदार

उत्तम लेख.

Add Comment

संबंधित लेख