ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांची 18 मे 2022 पासून शतकोत्तर सुवर्ण जयंती सुरु झाली आहे. त्यानिमित्ताने रसेल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख.
बर्ट्रांड रसेलचे रसेल हे घराणे इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध अशा खानदानी घराण्यांपैकी एक. या रसेल घराण्याने इंग्लंडला कित्येक मुत्सद्दी पुरवले. बर्ट्रांड रसेल यांचे आजोबा लॉर्ड रसेल हे लिबरल पक्षातर्फे इंग्लंडचे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. बर्ट्रांड रसेल यांचे वडील एक मुक्त चिंतक होते. त्यांनी आपल्या मुलांवर पाश्चिमात्त्य वंशपरंपरेतून आलेल्या ईश्वरशास्त्राचा बोजा लादला नाही. बर्ट्रांड रसेल वंशपरंपरा नाकारतात, म्हणूनच रसेल यांनी आपल्या नावामागे कधीही ‘लॉर्ड’ हे नामाभिधान लावले नाही. महायुद्धाच्या विरोधात स्पष्ट, रोखठोक भूमिका घेतल्यामुळे त्यांची ‘केंब्रिज’मधून हकालपट्टी करण्यात आली. युद्धविरोधामुळे रसेलला आपल्याच मायदेशी इंग्लंडात सामान्यांपासून ते राजकारणी, विचारवंतांपर्यंत सर्वांच्याच रोषाला सामोरे जावे लागले होते. तर्कशास्त्राच्या गुणांवर त्यांनी फार जोर दिला होता. गणिताला त्यांनी आपला देव मानलं होतं. ‘माझ्याविषयी विचाराल तर गणिताशिवाय मला दुसरा देव नाही’ असं ते म्हणत. विचार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत म्हणून तर ते गणिताकडे वळले होते. एकोणिसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला असता ते निःसंदेहपणे 'गणितातील प्रगती' असं सांगत. या गणित व तर्कशास्त्राच्या ओझ्याखाली जे रसेल पुरले गेले होते, गप्प बसलेले होते ते अचानक उठले, जागे झाले, मुक्त ज्वालेप्रमाणे पेटले.. जेव्हा युरोपात महायुद्धाचा मुर्खपणा सुरू झाला होता तेव्हा हा हडकुळा, मरतुकडा प्राध्यापक असीम धैर्यशील आहे, मानव जातीचा उत्कट प्रेमी आहे ही गोष्ट जगाला कळली व जग चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले होते.
आपल्या तर्ककठोर चिंतनातून आलेल्या विचारांच्या पायावर त्यांनी युद्ध विरोधासाठी आपल्याच देशातील उच्चपदस्थ लोकांवर टीकेची झोड उठवली होती. वेळीच लेखणीला वेसण घातली नाही तर विद्यापिठातून काढून टाकण्यात येईल या धमकीलाही त्यांनी भीक घातली नाही. गॅलिलिओप्रमाणे त्यांनाही इंग्लंडमधील तुरुंगात डांबण्यात आले होते. रसेलच्या विचारांविषयी ज्यांना शंका होती त्यांना त्यांच्या कळकळीविषयी मात्र शंका नव्हती. तर ते त्यांनी अचानकपणे घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे गडबडले होते.
मानवी जीवनातील परमोच्च गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिमत्त्व अशक्य असतं. जीवन आणि ज्ञान आज इतके गुंतागुंतीचे झाले आहे की मोकळ्या चर्चेनेच आपल्याला सर्वांगीण दृष्टी प्राप्त होऊ शकते. खुल्या मार्गाने चर्चा केल्याशिवाय पूर्वग्रह व चुका यातून मार्ग तरी कसा सापडणार? खुला विचार व चर्चा सर्वत्र व्हायला पाहिजे. माणसे, शिक्षक, प्राध्यापक सर्वांना चर्चा करू देत. झाले तर होऊ देत मतभेद असं रसेल म्हणत असे. आपल्या शाळा व आपली विद्यापीठे यांची जर योग्य रीतीने वाढ करू, योग्य माणसे तेथे नेमू, मानवी स्वभावाची पुनर्रचना करण्याचे काम जर बुद्धिपूर्वक हाती घेऊ, तर मानव काय करू शकणार नाही? आपण सगळं काही करू शकतो असा आशावाद त्यांच्याठायी असायचा. उदार तत्त्वज्ञानातील एक मूलभूत गोष्ट म्हणजे मुद्रण/भाषण स्वातंत्र्य. रशियात या गोष्टींना स्थान नाही हे पाहून रसेल रागावले होते. रशियात पद्धतशीरपणे प्रचाराचे प्रत्येक स्थान कसे ताब्यात घेण्यात आले आहे हे पाहून ते इतके रागावले की रशियात निरक्षरता आहे हे पाहून रसेलला आनंदच झाला. ते म्हणाले की, ज्या काळात वर्तमानपत्रे सरकारी मदतीने चालतात अशा काळात वाचता येणे म्हणजे सत्यप्राप्तीचा मार्गातील मोठी धोंडच म्हणायची! रसेल म्हणजे अनेक बाबतीत नुसते वैपुल्य आहे. रसेलना 1950 साली साहित्याचे नोबेल मिळाले होते. नोबेल समितीने पुरस्काराच्या मानपत्रात म्हटले होते की, रसेल बहुश्रुत आहेत. त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम जर कोणते असेल तर ते सतत विचारस्वातंत्र्य आणि मानवतेच्या बाजूने उभे राहिले.
खरंतर ज्यांचा देवावर वगैरे विश्वास नसतो त्यांनी देवावर श्रद्धा असणाऱ्यांसोबत वाद घालण्यात अर्थ नसतो. परंतु अनेक कट्टर नास्तिक, ठाम विज्ञानवादी आणि स्केप्टिक उर्फ शंका/संशयवादी 'देव नाहीच' हे सिद्ध करू पाहत असतात. फारच थोडे आस्तिक हे विचाराने नास्तिक झालेले आहेत. पंडित नेहरू हे विचाराने नास्तिक होते, वृत्तीने व व्यवहाराने शंभर टक्के विज्ञानवादी होते; पण स्वभावाने सहिष्णू व उदारमतवादी असल्याने त्यांनी देववाद्यांची टिंगल-टवाळी केली नाही व त्यांच्या तोंडीही ते कधी लागले नाही. बर्ट्रांड रसेल शंकावादी म्हणजेच स्केप्टिक होते आणि देवाच्या मुद्द्यावर ते 'ॲग्नाॅस्टिक' उर्फ अज्ञेयवादी होते. 'एथिइस्ट' म्हणजे निरीश्वरवादी नव्हते. त्यांनी तर 'मी ख्रिश्चन का नाही' (व्हाय आय एम नॉट अ ख्रिश्चन) या विषयावर प्रबंधरूपी पुस्तिका लिहून इंग्लडमध्ये एकच खळबळ माजवली होती; पण रसेल यांनीच 'मी कम्युनिस्ट का नाही' (व्हाय आय एम नॉट अ कम्युनिस्ट) अशीही पुस्तिका लिहून डाव्या मंडळींमध्ये एक सुरुंग पेरला होता. त्यामुळे रसेल असोत वा नेहरू या दोघांबद्दलही बोलताना कम्युनिस्ट मंडळी कधी बुद्धिवादी अहंतेने तर कधी तुच्छतेने बोलतात. पण गंमत म्हणजे जेव्हा ईश्वरवाद्यांशी वाद घालण्याचा प्रसंग येतो तेव्हा मात्र रसेल यांच्याच तर्कवादी मांडणीचा आधार घेतात.
'मॅरेज अँड मॉरल्स' या आपल्या पुस्तकात बर्ट्रांड रसेल स्पष्टपणे म्हणतात की, ख्रिश्चन समाजाची रचना ही पूर्वेकडील आशिया, तुर्कस्थान या जुन्या समाजांप्रमाणे जीवशास्त्रीय पद्धतीने करणे शक्य नाही. तसेच कामशास्त्र हा विषय 'विषय' म्हणून सर्वच धर्मांनी दाबल्याचे आपल्याला दिसून येते. रसेल आपल्या 'इंट्रोडक्शन टू सेक्स इन सिव्हिलायझेशन' या पुस्तकात म्हणतात की, विद्यापीठांमध्ये समाजशास्त्र या विभागात फक्त एखाद्याच विषयाचा अभ्यास करून चालणार नाही. एखाद्या गावात जाऊन काही आकडे गोळा केले आणि त्याची सांखिकी मांडून एक महानिबंध लिहिणे म्हणजे समाजशास्त्र नव्हे. कामशास्त्र, सुप्रजननशास्त्र, उत्क्रांती, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र या सर्वांचं मिळून समाजशास्त्र उभं राहतं. पण कामविकारालाही पवित्र मानणाऱ्या, तसेच गीतेत 'धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ' (गीता 7/11) असं स्पष्टपणे म्हटलेलं असतानाही आमच्या भारतीय समाजाने मात्र 'कामा'ला टॅबू ठरवलं.
रसेल यांच्या जीवनात त्यांनी घेतलेल्या भूमिका किंवा केलेली अनेक विधाने ही वादग्रस्त ठरलीत. वादग्रस्त होण्याचे महत्त्वाचे कारण त्यांनीच एकदा सांगितले होते. 'माय मेंटल लाईफ वॉज पर्पेच्युअल बॅटल' या त्यांच्या उद्गारातून यामागचे कारण आपण समजू शकतो. रसेल यांची मते व भूमिका ह्या अनेकदा बदलत गेल्या हे आता त्यांच्या बहुतेक वाचकांना कळले आहे. विचारांचा व वृत्तीचा अखंड विकास हा रसेल यांना भूमिका-सातत्यापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटला आहे. रसेलवर इतरांनी टीका करण्यापेक्षा रसेल हे स्वतःच स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार राहिले आहेत.
हेही वाचा : मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का? - अंजली जोशी
रसेल यांची न्यूयॉर्क सिटी कॉलेज मध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. ही नियुक्ती करताना कॉलेजच्या चालकांनी 'तुम्ही इथे रुजू झालात ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे' असे उद्गार काढले होते. रसेल तिथे तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, शुद्ध विज्ञानाचा तत्वमीमांसेशी असलेला संबंध हे विषय शिकवणार होते. झालं! या नियुक्तीविरुद्ध न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेत व जगात एकच वादळ उठले. वादळ उठवणाऱ्यांच्या तक्रारी जर अभ्यासल्या तर त्या किती अनाठायी होत्या हे लक्षात येते. अमेरिकेतील विविध ठिकाणचे बिशप, विविध वृत्तपत्रांच्या संपादकांनी रसेलवर टीकेची झोड उठवली. परंतु जॉन ड्युई सारखे एक जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ यांनी मात्र रसेल यांची बाजू उचलून धरली. जॉन ड्युई, अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारख्या माणसांनी रसेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल आपली प्रखर चीड जाहीर व्यक्त केली. 'रसेल यांची नेमणूक गणित, तत्वज्ञान व विज्ञान हे विषय शिकविण्याकरिता होती. विज्ञान व गणित शिकवीत असताना मुद्दाम विषयांतर करून रसेल त्याचे तथाकथित 'अनैतिक तत्त्वज्ञान' शिकविल, समलैंगिकतेचा प्रचार करेल असे मूर्खपणाचे आरोप न्यूयॉर्कसारख्या जगप्रसिद्ध शहराने एका प्रचंड विद्वान माणसावर करणे या प्रकाराने मन सुन्न होऊन जाते. महान व्यक्तींना या नरकयातना नेहमीच सहन कराव्या लागल्या आहेत' असे आईन्स्टाईन यांचे म्हणणे होते.
रसेल यांच्या मते, शिक्षक हा सुसंस्कृतपणाचा आद्य रक्षक होय. सुसंस्कृतपणा म्हणजे या जगात आपल्या मातृभाषेचे, आपल्या देशाचे, आपल्या स्वतःचे काय स्थान आहे याचे भान असणे होय. सुसंस्कृतपणा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हे शिक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे असे रसेलला वाटत असे. शिक्षकाने मुलांच्या मनातील मत बनवण्याची प्रक्रिया विवेकावर आधारित कशी राहील याची खबरदारी घ्यावी. राष्ट्राचे संरक्षण हे जेवढे सैन्यदलाच्या हातात असते तेवढेच ते शिक्षकांच्याही हातात असते अशी रसेल यांचे म्हणणे होते. जोपर्यंत शिक्षक मुळाक्षरे आणि पाढे यांसारखे निरुपद्रवी विशेष शिकवत असतो आणि त्यातून कुठल्याही प्रकारचे वाद उद्भवण्याची शक्यता नसते तोपर्यंत त्याच्या भोवतालच्या अधिकृत हट्टाग्रहांचा त्याच्या शिकवण्यावर कुठलाही वेडावाकडा परिणाम होत नाही. पण एकछत्री राजवटीखालील राष्ट्रांमध्ये अगदी साधे-सरळ विशेष शिकवताना सुद्धा शिक्षकाने त्याच्या दृष्टीने सर्वात परिणामकारक पद्धत वापरणे अभिप्रेत नसते.
वर्गात शिक्षकाने शिक्षक म्हणून सतत स्वतःचा अधिकार वापरावा, मुलांच्या मनात भीती, धाक, बोटचेपेपणा आणि आंधळा आज्ञाधारकपणा निर्माण करावा अशी अपेक्षा असते. यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची सत्ता निमूटपणे मान्य करावी, त्यास कधीही आव्हान देऊ नये, असेच संस्कार शिक्षकाने त्याच्यावर करावेत असा आग्रह धरला जातो. मुळाक्षरे आणि पाढे शिकवण्याचा टप्पा ओलांडून शिक्षक पुढे गेला रे गेला की कुठल्याही वादग्रस्त मुद्द्यावर त्याने राज्यकर्त्यांचा अधिकृत दृष्टिकोनच स्वीकारायला हवा अशी सक्ती होऊ लागते. या कारणामुळेच नाझी राजवटीतील जर्मन युवक वंश-वर्ण याबाबत कमालीचे दुराग्रही बनले होते. रशियातही तेच झालं होतं. लोकशाही राष्ट्रांमध्ये दुराग्रहांचे प्रमाण तुलनेने कमी आहे, मात्र तिथेसुद्धा शिक्षण क्षेत्रात ते तसेच वाढत जाण्याचा गंभीर धोका आहे हे मान्यच केले पाहिजे. हा धोका टाळायचा असेल तर वैचारिक स्वातंत्र्यावर विश्वास असणाऱ्यांनी शिक्षकांवर बौद्धिक गुलामगिरी लादली जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. ते करायचं असेल तर सर्वात प्रथम शिक्षकांची समाजाप्रती कर्तव्ये कोणती, याची सुस्पष्ट कल्पना असणे गरजेचे आहे.
धर्मगुरूंनी रोज अमुक इतके तास प्रवचन केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून कुणीही करत नाही पण शिक्षकाने मात्र पाच-सहा तास दररोज शिकवलेच पाहिजे. याचा परिणाम असा होतो की, शिक्षक कंटाळून जातो. त्यांना शिकवण्याचा ताण वाटू लागतो. त्यांना जे विषय शिकवायचे असतात त्या विषयांतील नवनवीन घडामोडींशी त्यांचा संपर्क राहत नाही. नवे ज्ञान, नवी समज यातून जो बौद्धिक आनंद मिळतो तो मिळवण्यासाठीची प्रेरणा ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकत नाहीत.
अर्वाचीन काळातल्या तत्त्वज्ञांचा पट उलगडला असता, प्रदीर्घ काळापर्यंत मानवी समाजाला उद्बोधन करीत राहणारे विचारवंत म्हणून बर्ट्रांड रसेल यांच्याकडे आपल्याला पाहावे लागेल. 98 वर्षांचे दीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. शिवाय शेवटपर्यंत त्यांची बौद्धिक व शारीरिक स्थिती उत्तम राहिली. दोन महायुद्धे, कित्येक देशांमधील क्रांती यांचे ते साक्षीदार होते. केवळ साक्षीदार हा कोणीही असू शकतो पण रसेल यांनी मात्र या सर्व घटनांचे सामाजिक, राजकीय, वैचारिक पृथक्करण केले होते. त्या पृथक्करणातून बाहेर आलेले चिंतन त्यांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता एका निरंतन स्त्रोताप्रमाणे समाजापुढे ठेवले.
- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com
Tags: रसेल शतकोत्तर सुवर्ण जयंती व्यक्तिविशेष समाजविज्ञान विचारवंत Load More Tags
Add Comment