डिजिटल किमानतावाद

कार्ल न्यूपोर्ट यांच्या 'डिजिटल मिनिमलिझम' या पुस्तकाचा परिचय

समाजमाध्यमं जन्माला येऊन आताशी कुठे एक तप उलटलंय. म्हणजे अजून हे तंत्रज्ञान तसं नवीनच आहे. त्यामुळे त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा मनोरंजनाचे एक साधन म्हणून पाहण्याइतकाच आहे. फेसबुकच्या घोषवाक्यामध्येच म्हटलं आहे की, ‘लोकांना अशी शक्ती प्रदान करा की ते त्यांचा असा एक लोकसमूह उभा करू शकतील आणि जग जवळ येईल.’ वरवर पाहता हे घोषवाक्य विधायक वाटतं पण नक्की कोणत्या मार्गाने फेसबुक किंवा इतर माध्यमं हे ध्येय साकारीत करणार आहेत? तसेच काय किंमत मोजून?

डीप वर्क या दणदणीत खपाच्या पुस्तकानंतर लेखक कार्ल न्यूपोर्ट यांचं ताजं पुस्तक म्हणजे 'डिजिटल मिनिमलिझम' हे होय. डिजिटल क्रांतीनंतर आणि समाजमाध्यमांच्या विस्फोटानंतर मानवी एकाग्रतेची कधी नव्हे ती इतकी शकले उडाली आहेत. समाजमाध्यमांचं व्यावसायिक प्रारूप हेच मुळात 'दिखावे की दुनिया' यावर आधारित आहे. अशा या काळात उपभोक्तावादाने जगातील सर्व वादांवर मात केली आहे. समाजमाध्यमांवर सतत क्रियाशील असल्याने मी त्यावर नियमितपणे काही ना काही केलंच पाहिजे हे एक मोठं दडपण आपल्यावर पडत असतं. या क्रियाशीलतेचा सेलेब्रिटी वर्ग सोडल्यास इतरांना तसा आर्थिक फायदा काहीच नसतो. मात्र समाजमाध्यमांवर वेळ घालवल्यामुळे त्यांचा मात्र चांगलाच आर्थिक फायदा होतो. आता प्रश्न आहे आपला की, आपण त्यांच्या जाळ्यात किती अडकायचं? किती वाहत जायचं? फेसबुक मित्रयादीतलं कुणीतरी हॉटेलमध्ये जेवायला गेल्याचे, फिरायला गेल्याचे, ट्रेकिंगला गेल्याचे फोटो टाकतं त्यामुळे आपणही अशा आनंदापासून वंचित रहायला नको म्हणून आपल्यालाही तसं करावं वाटतं. हा जो दबाव समाजमाध्यमं आपल्यावर टाकत आहेत या पासून स्वतःचं संरक्षण करायचं कसं? या सर्व प्रश्नांमागचं व्यावसायिक मानसशास्त्र, त्यांचे वास्तव रुप आणि मनाला शतखंडीत होण्यापासून वाचवायचं असेल तर त्यावर काय उपाय करावे याची चर्चा केली आहे कार्ल न्यूपोर्ट यांनी आपल्या पेंग्वीन बिझनेस तर्फे प्रकाशित झालेल्या 'डिजिटल मिनिमलिझम' या पुस्तकात. 

तंत्र-तत्त्वज्ञ जेरॉन लॅनिअर म्हणतात की, ‘समाजमाध्यमांचा अतिवापर करणारी व्यक्ती रागीट होण्याची संभावना जास्त असते. तसेच त्या व्यक्तीच्या रागाचे प्रतिबिंब मग त्याच्या फेसबुक, ट्विटर खात्यावरही दिसू लागतं. समाजमाध्यमांची रचनाच अशी आहे की, इथे नकारात्मक भावनेला हवा देणारा मजकूर जास्त पसरवला जातो. त्याचा परिणाम हा आनंद कमी होण्यात, दडपण वाढवण्यात, तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींपासून तुमचं लक्ष विचलित होण्यात होतो.’  तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी जात आहोत की, आपण सुखाच्या क्षणांचा आनंद घेणेही विसरत चाललो आहोत. नव्याने जन्माला आलेल्या मुलाला/मुलीला अंघोळ घालण्याचा आनंद लुटण्याऐवजी आम्ही ते मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीचा आम्हाला एक तर फोटो काढायचा असतो किंवा व्हिडिओ तरी तयार करायचा असतो. गोष्टी कॅमेरात कैद करण्यामागे आम्हाला त्या क्षणाचा आनंद घ्यायचा नसून त्या क्षणांवर आमचा मालकी हक्क प्रस्थापित करायचा असतो.
एच.बी.ओ च्या ‘रियल टाईम’ या शोचे निवेदक बिल माहेर आपल्या एका शोमध्ये म्हणाले होते की, ‘सोशल मीडिया सम्राटांनो! तुम्ही एक चांगलं जग निर्माण करण्याचा जो भ्रम निर्माण करत आहात ना, तो थांबवा. कारण तुम्ही 'लाईक' नावाची एक तंबाखू विकता आहात ज्याचं मुलांना व्यसन लागतंय.’ ट्रिस्टन हॅरीस हे सिलिकॉन व्हॅली येथील ‘गुगल’मधील इंजिनियर. त्यांना अँडरसन कूपर यांनी बोलतं केलं होतं. ही मुलाखत चांगलीच गाजली होती. कूपर यांनी हॅरीस यांना विचारलं की, सिलिकॉन व्हॅली ‘ॲप्स’ना प्रोग्राम करतात की माणसांना प्रोग्राम करतात?  हॅरीस म्हणतात की, ते माणसांनाच प्रोग्रॅम करतात. ते दाखवतात की, तंत्रज्ञान हे उदासीन तटस्थ असतं. पण असं काही नाहीये. हे आमच्यावर अवलंबून आहे की आम्ही या माहितीचा वापर कसा करतो. तंत्रज्ञानाचं, समाजमाध्यमांचं जे व्यसन लागलं आहे; तो काही अपघात नाहीये. हे सर्व विचारपूर्वक प्रोग्राम केलेलं आहे.’ आपला मेंदू अशा गोष्टींच्या प्रभावाखाली फार लवकर येतो. आपल्या स्मार्टफोनची रचनाच अशी असते की, तुम्हाला तो वारंवार उघडून पहावा वाटतो. याची खरी सुरुवात झाली ती 2009 मध्ये, जेव्हा फेसबुकने सर्वप्रथम ‘लाईक’चा पर्याय दिला. फेसबुकने दिलेला हा लाईकचा पर्याय याने फेसबुक वापरकर्त्यांची तसेच पर्यायाने फेसबुकची सर्व मानसिकताच बदलून टाकली. सीन पार्कर जे फेसबुकमध्ये एका उच्च पदावर कार्यरत होते. 2017च्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, ‘हे ‘लाईक’ बटन देण्यामागे ग्राहकांचा कशाप्रकारे जास्तीत जास्त वेळ हा फेसबुक ॲप वापरण्यामध्ये जाईल हा त्यामागील खरा विचार होता. बदल्यात वापरकर्त्याच्या भावना प्रत्येक वेळी चाळवल्या पाहिजे. त्यांना प्रतिसाद दिला गेला पाहिजे.’

नवनवीन तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या या मोठमोठ्या प्रश्नांवर छोटे-छोटे उपाय करून चालणार नाहीये. गतीने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी मुकाबला करायचा असेल तर आपल्याला बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पलीकडे पाहायला हवं. त्यासाठी आपल्या आत खोलवर रुजवलेल्या मूल्यांचा पाया म्हणून वापर करता येईल. सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाशी एका वेगळ्या पद्धतीने जोडून घेतलं पाहिजे. मग प्रश्न पडतो की, डिजिटल किमानतावाद म्हणजे काय? डिजिटल किमानतावाद म्हणजे तंत्रज्ञान वापरण्याचे एक असे तत्त्वज्ञान ज्यामध्ये आपण आपला ऑनलाईन वेळ हा काळजीपूर्वक निवडलेल्या गोष्टींसाठी खर्च करतो. आपल्या आत खोलवर रूजलेल्या मूल्यांशी अनुकूल असलेल्या गोष्टींना प्राधान्य देतात तसेच इतर सर्व गोष्टींवर आनंदाने तुळशीपत्र ठेवतात. समाजमाध्यमांवर क्रियाशील असलेल्यांना वाटतं की, समाजमाध्यमं वापरायची आपण बंद केली तर आपण बऱ्याच गोष्टींपासून वंचित राहू, मागे पडू अशी भिती वाटते त्यांना. डिजिटल किमानतावादींना मात्र याची फिकीर नसते. ते या माध्यमांवरील कमअस्सल गोष्टींवर वेळ खर्च करत नाहीत. आणि या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडू देत नाहीत. समाजमाध्यमं वापरकर्त्यांसमोर ती माध्यमं वापरायचे सोडून देण्याची कोणतीही ठोस कारणं नसतात. न्यूपोर्ट डिजिटल किमानतावादाची तीन तत्वे सांगतात. 1) किमानतावादींना चटकन लक्षात येतं की, त्यांचा वेळ मोबाईलमधील खूप सगळ्या ॲप्स, साधनं (डिव्हाइस) आणि सेवा घेण्यात जातोय आणि याचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो आहे. छोट्याशा फायद्यासाठी ही इतकी मोठी किंमत मोजणं योग्य नाही. 2) किमानतावादींना हे पक्कं समजतं की, त्यांच्या मूल्यांशी अनुकूल तंत्रज्ञान कोणतं, ते कसं वापरायचं असतं. 3) किमानतावादी हे त्यांची बांधिलकी असलेल्या गोष्टींसोबत समाधानी असतात. मुळात समाधानाच्या स्रोताचा उगमच त्यांच्या बांधिलकीत असतो. 

समाजमाध्यमं जन्माला येऊन आताशी कुठे एक तप उलटलंय. म्हणजे अजून हे तंत्रज्ञान तसं नवीनच आहे. त्यामुळे त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा मनोरंजनाचे एक साधन म्हणून पाहण्याइतकाच आहे. फेसबुकच्या घोषवाक्यामध्येच म्हटलं आहे की, ‘लोकांना अशी शक्ती प्रदान करा की ते त्यांचा असा एक लोकसमूह उभा करू शकतील आणि जग जवळ येईल.’ वरवर पाहता हे घोषवाक्य विधायक वाटतं पण नक्की कोणत्या मार्गाने फेसबुक किंवा इतर माध्यमं हे ध्येय साकारीत करणार आहेत? तसेच काय किंमत मोजून? समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये म्हणून न्यूपोर्ट पुस्तकात काही उपाय सुचवतात. 1) स्वतःला कमीत कमी तीस दिवसांसाठी समाजमाध्यमांपासून दूर ठेवा. 2) या 30 दिवसांत ऑनलाईन गोष्टी सोडून तुम्हाला ज्या ज्या गोष्टींनी आनंद मिळतो त्या त्या करा. उदाहरणार्थ, वाचन, एखादं वाद्य शिकणे, मित्रांसोबत फिरायला जाणे इ. 3) समाजमाध्यमं कशी वापरायची या संदर्भातले आपले स्वतःचे असे नियम ठरवा. कामातून सुट्टी घेण्याचेही काही फायदे असतात. त्यामुळे परिस्थितीकडे आपण एका वेगळ्या नजरेने, तटस्थपणे पाहू शकतो. अमेरिकन गृहयुद्धाच्या दरम्यान अब्राहम लिंकन म्हणूनच व्हाईट हाऊसमधून काही दिवस बाहेर पडत व एका जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी त्यांनी एक साधीशी झोपडी बांधून घेतली होती, त्यात ते राहत. या सुट्टीमुळे लिंकन गृहयुद्धाच्या अतिताणावर मात करू शकले. गृहयुद्ध संपल्यानंतर वर्तमानपत्रांनी या सुट्टीचा 'देशाची फाळणी वाचवणारी सुट्टी' म्हणून स्तुती केली होती. समाजमाध्यमांचे ॲप मोबाईल मध्ये न वापरता त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन मगच आपलं खातं वापरावं. यामुळे समाजमाध्यमांचे सारखे सारखे येणारे नोटिफिकेशन बंद होतात. त्यात आपण गुरफटले जात नाही.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात न्यूपोर्ट आपल्याला मनाला शतखंडीत करणाऱ्या समाजमाध्यमांपासून एकटे राहण्यासाठी काही कृती सांगतात. जसे की, गदारोळापासून दूर जात अमेरिकन तत्त्वज्ञ हेन्री थोरो याने वॉल्डन काठी एकटे राहणे पसंत केले. पण असं करणं प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. म्हणून न्यूपोर्ट म्हणतात की, एकटं राहणं म्हणजे एकाकी राहणं असं नव्हे तर, आपल्या मूल्यांना धरून आपल्या विचारात एकटं राहणं होय. शाळांमधून मुलांची मैत्री अतिशय पातळ होत चालली आहे. त्यांना समाजमाध्यमांवर हजारो मित्र असतात पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एक भावनिक पोकळी जाणवते. अमेरिकन समाज मानसशास्त्रज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. शेरी टर्केल या म्हणतात की, ‘आजकालची मुलं निष्ठुर नाहीत. परंतु, त्यांना संवादाची आवश्यकताच भासत नाही. त्यांना इतरांच्या भावना समजून घेता येत नाहीत. मुलांमध्ये समानुभूती (एँपॅथी) नाहीशी होत चालली आहे. हातात मोबाईल असताना माणसं बोलण्याऐवजी टंकलिखित संदेश का पाठवतात? टर्केल म्हणतात की, संदेशामुळे दोन व्यक्तीत सुखावह अंतर राहतं. यामुळे इतर माणसांचा संपर्क नकोसा झाला आहे. संवादापेक्षा टंकलिखित संदेश सोपा व सुरक्षित वाटू लागला आहे. फोनवर प्रत्यक्ष आणि स्वयंस्फूर्त बोलावं लागतं, हे टाळण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. संवादापासून पळणारे हे तरुण एकमेकांशी संदेशवाहनातून ‘संवाद’ साधतात. समाजमाध्यमांद्वारे ह्या तरूणांचं बोलून झाल्यावर त्यांना हा प्रश्न पडतो की, आपण संभाषण तर बराच वेळ केलं पण तो ‘संवाद’ होता का? संवादामधील आत्मीयता घटून वाढत चाललेल्या रुक्षतेची ही परिणीती आहे.

डिजिटल मिनिमलिझम
लेखक : कार्ल न्यूपोर्ट
प्रकाशक : पेग्वींन बिझनेस
पृष्ठे : 250 किंमत : 599

- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com 

Tags: तंत्रज्ञान फेसबुक समाजमाध्यमे उपयुक्ततावाद ट्विटर Load More Tags

Comments:

Sachin

सर या पुस्तकाचं विवेचन खूप छान शब्दात केल आहे.

रमेश वाघ

व्वा, खूपच मोजक्या शब्दांत संपूर्ण पुस्तकाचा सारांश मांडला आहे. अभिनंदन सर.

Jyoti Adhat/Tupe

All the best Ajinkya sir

Add Comment